ball

ना तुला ना मला… (दैनिक ऐक्य, सातारा)

अखेर तो सामना झाला. दोन्ही संघांनी चांगला खेळ केला, जिंकण्याची पराकाष्ठा केली, पण सामना मात्र अनिर्णित राहिला. प्रश्न सामना अनिर्णित राहिल्याचा नाही, क्रिकेटमध्ये अनेक सामन्यांचा निकाल नाही लागत. हा सामना अनिर्णित राहिल्याने गटातले दोन महत्वाचे संघ स्पर्धेबाहेर फेकले गेले. क्रिकेट रसिकांना मी कोणत्या सामन्याबद्दल बोलतो आहे ते लक्षात आले असेलच. ब्रेबॉर्न स्टेडियम वर खेळला गेलेला मुंबई विरुद्ध महाराष्ट्र हा सामना अनिर्णित राहिला, नव्हे पहिल्या डावात ‘टाय’ झाला, आणि दोन्ही संघांची पुढील फेरीत प्रवेश करण्याची शक्यता संपली. अचानक आंध्रप्रदेशच्या संघाला लॉटरी लागली आणि त्यांचा संघ पुढील फेरीत प्रवेश करता झाला. मुंबई आणि महाराष्ट्र दोन्ही संघांची अवस्था बघता एवढंच म्हणावसं वाटतं  … ‘ ना तुला ना मला…’ 


रणजी ट्रॉफी स्पर्धेत ‘ब’ गटात काय चुरस होती हे आपण बघितलंच. सौराष्ट्र संघाने गटात प्रथम क्रमांक मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला होता. आता दुसऱ्या स्थानासाठी खऱ्या अर्थाने चुरस होती ती मुंबई आणि महाराष्ट्र या दोन संघात. आणि अगदी किंचितशी शक्यता होती की कदाचित आंध्र चा संघ पुढील फेरी जाऊ शकेल. अर्थात त्यासाठी अनेक गोष्टी त्यांच्या बाजूने घडणे आवश्यक होते. म्हणजे मुंबई-महाराष्ट्र सामन्याचा निकाल न लागता, पहिल्या डावात दोन्ही संघांची सामान धावसंख्या होणे आणि त्याच बरोबर आंध्र संघाने आसाम विरुद्धचा सामना डावाच्या अधिपत्याने जिंकून बोनस गुण मिळवणे. आता या दोन्ही गोष्टी एकदम घडणे किती दुरापास्त आहे हे क्रिकेट रसिकांना नक्कीच ठाऊक आहे. पण कदाचित आंध्रच्या समर्थकांनी बहुतेक असतील नसतील ते सगळेच देव पाण्यात ठेवले होते. कदाचित त्यांची प्रार्थना कामाला आली. दैवाचे फासे आंध्रच्या बाजूने पडले आणि रणजी ट्रॉफीच्या या शेवटच्या सामन्यात बोनस गुणाने विजय मिळवत आंध्रने पुढील फेरीत प्रवेश मिळवला. आंध्रने सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी आसाम संघावर मात केली. आंध्रने सामन्याच्या पहिल्याच दिवशी आसाम संघाला पहिल्या डावात केवळ ११३ धावात बाद केले आणि तिथेच त्यांच्या विजयाचा पाया रचला गेला. खरं सांगायचं तर या संघात कोणीही स्टार खेळाडू नाही. एक कप्तान हनुमा विहारी सोडला तर कोणालाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नाही, पण योग्य वेळी चांगला खेळ करत या संघाने बाजी मारली. एक डाव आणि ९६ धावांनी विजय मिळवत आंध्रचा संघ २६ गुणांसह या गटात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला होता. 

इकडे मुंबईत देखील एक चांगला सामना सुरु होता. महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना ३८४ धावांची मजल मारली. खरंतर संघाची अवस्था बिकट होती, पण अनुभवी केदार जाधवचं खणखणीत शतक संघाला तारून गेलं. सौरभ नवले आणि आशय पालकर सारख्या तरुण खेळाडूंनी अर्धशतके झळकावून त्याला चांगली साथ दिली. ३८४ ही धावसंख्या पुरेशी होती कदाचित, पण समोर बलाढ्य मुंबई होती. आता त्या संघात पूर्वीची जादू नसली तरीही तो मुंबईचा संघ होता. हा संघ ‘खडूस’पणे खेळणार हे ठाऊकच होते. पण महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी कमाल केली होती. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा मुंबईची धावसंख्या होती ५ बाद १८७ आणि त्यांचे प्रमुख फलंदाज बाद झाले होते. म्हणजे महाराष्ट्राचा संघ नक्कीच पुढे होता. पण तिसऱ्या दिवशी मुंबईने जोरदार कमबॅक केलं. त्यात प्रमुख वाटा होता विकेटकिपर बॅट्समन प्रसाद पवारचा. प्रसादने एक अप्रतिम खेळी करताना १४५ धावा केल्या. तो बाद झाला तेंव्हा मुंबईची धावसंख्या होती ३०७, आणि पहिल्या डावाच्या आघाडीसाठी त्यांना अजूनही ७८ धावा हव्या होत्या. इथे मदतीला आला तो मुंबईचा तनुष कोटियन. स्वतः जखमी असून देखील, खालच्या फलंदाजांना बरोबर घेऊन त्याने मुंबईला हळू हळू पुढे नेले. ९ वा बळी पडला तेंव्हा देखील मुंबईला अजून १३ धावा हव्या होत्या. दोन्ही संघ बरोबरीला आले असताना (३८४ धावसंख्येवर) एक स्वीपचा फटका मारताना तनुष बाद झाला. पहिला डाव ‘टाय’ झाला होता. इथेच दोन्ही संघांची पुढे जाण्याची शक्यता धूसर झाली होती. 

आता या सामन्यात तसा पुरेसा वेळ राहिलेला नव्हता. एखाद्या संघाच्या गोलंदाजांनी कमाल केली असती, आणि प्रतिस्पर्धी संघाला कमी धावात उखडलं असतं तर कदाचित सामन्याचा निर्णय लागला असता. मुंबईच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात तसे प्रयत्न केले खरे. एकवेळ महाराष्ट्राची धावसंख्या ६ बाद १०१ होती, पण अझीम काझी, सौरभ नवले आणि आशय पारकरने परत एकदा संयमी खेळी करून संघाला पराभवापासून दूर नेले. महाराष्ट्राने २५२ धावा करून मुंबईसमोर आव्हान ठेवले होते. मुंबईच्या संघाला सरासरी ८-९ च्या धावगतीने हे आव्हान पार करणे आवश्यक होते. मुंबई संघाने दुसऱ्या डावात प्रयत्न केले देखील, पण ते अपुरे पडले. महाराष्ट्राने देखील मुंबईच्या ६ विकेट्स घेऊन चांगले प्रयत्न केले. शेवटी दोन्ही संघांनी सामना अनिर्णित ठेवण्याचा निर्णय घेतला आणि दोन्ही संघांचे यावर्षीचे रणजी ट्रॉफीतील आव्हान संपुष्टात आले. परिणामी महाराष्ट्र, सौराष्ट्र आणि आंध्र या तीनही संघांना सारखे गुण असून देखील महाराष्ट्राचा संघ बाद फेरी गाठू शकला नाही. 

ही परिस्थिती थोडीशी विचित्रच म्हटली पाहिजे. कारण या गटातील प्रत्येक संघाने ७ लढती खेळल्या. पैकी महाराष्ट्र संघाने एकही लढत गमावली नाही. त्यांनी ३ सामने जिंकले आणि ४ अनिर्णित ठेवले. गटातील इतर प्रमुख संघ – सौराष्ट्र, आंध्र आणि मुंबई यांना प्रत्येकी २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. विजय मिळवताना महाराष्ट्र संघाला एकही बोनस गुण मिळवता आला नाही, आणि तिथेच त्यांचा पराभव झाला. आंध्र आणि सौराष्ट्र संघांचे गन सारखे असले तरी देखील सौराष्ट्र ने २ तर आंध्रने १ बोनस गुण मिळवला होता. (तोही त्यांनी शेवटच्या सामन्यात मिळवला.) महाराष्ट्राला त्यांच्या हैदराबाद विरुद्धच्या सामन्याचा फटका बसला असे म्हणता येईल. विजयासाठी दुसऱ्या डावात केवळ २७ धावा हव्या असताना महाराष्ट्राला बोनस गुण मिळवणे सहज शक्य होते, पण पहिल्याच चेंडूवर ऋतुराज गायकवाड बाद झाला, अन्यथा आज चित्र काहीसे वेगळे दिसले असते. मुंबईने देखील हात तोंडाशी आलेला सामना घालवला. त्यांनी महाराष्ट्र पेक्षा एक धाव जास्त काढली असती तर कदाचित आज ते बाद फेरीत दिसले असते. अर्थात, या जर-तर च्या खेळाला अर्थ नाही. म्हणतात ना ‘जो जीता वही सिकंदर’. 

मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेटला मोठी परंपरा आहे. मुंबई क्रिकेट तर भारतीय क्रिकेटचा पायाच समजला जातो. अशावेळी देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा – रणजी ट्रॉफी, आणि या स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश न मिळणे हे दोन्ही संघांसाठी वाईटच आहे. पण आता या वर्षीच्या बाद फेरीतील संघ आता ठरले आहेत. मुंबई आणि महाराष्ट्र या दोन्ही संघांना एकदा शांतपणे या वर्षी घडलेल्या घटनांचा विचार करून त्याप्रमाणे पावले टाकणे आवश्यक आहे. 

वानखेडे स्टेडियम – आठवणींचा कोलाज (दैनिक केसरी, पुणे)

तारीख होती २३ जानेवारी १९७५, वार गुरुवार. त्यादिवशी भारतीय क्रिकेट इतिहासात एक इतिहास रचला जात होता. भारतीय क्रिकेटच्या पंढरीत, मुंबईतील एका नवीन स्टेडियम मध्ये पहिलाच कसोटी सामना खेळला जात होता. याआधी मुंबईत कसोटी सामने झाले नव्हते असं नाही पण त्या सामन्याला एक वेगळंच महत्व होतं. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (त्यावेळेचं बॉम्बे क्रिकेट असोसिएशन) स्वतःच्या मैदानावर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा कसोटी सामना रंगणार होता. शेषरावजी वानखेडे आणि त्यांच्या टीमच्या मदतीने अगदी रेकॉर्ड कालावधीत तयार झालेल्या या मैदानाला वानखेडेंचंच नाव दिलं गेलं होतं. मुंबईचं हे वानखेडे स्टेडियम काही काळातच केवळ मुंबई नाही तर भारतीय क्रिकेटवर आपला ठसा उमटवेल अशी अपेक्षा सुद्धा त्यावेळी कोणी केली नसेल. १९७५ च्या आधी मुंबईतील सामने प्रामुख्याने क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (CCI) ‘ब्रेबॉर्न स्टेडियम’ वर होत. पण काही कारणाने CCI आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन यांच्यामध्ये खटके उडाले, आणि त्यातूनच पुढे जन्म झाला ‘वानखेडे स्टेडियम’चा.  या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला गेला तो भारत आणि वेस्ट इंडिज संघामध्ये. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कप्तान होता क्लाइव्ह लॉइड आणि भारताचा कप्तान होता मन्सूर अली खान पतौडी (हा त्याचा शेवटचा कसोटी सामना होता.) 


खऱ्या अर्थाने वानखेडे स्टेडियम म्हणजे भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनाचा हळवा कोपरा आहे. जे स्थान इंग्लंडमध्ये लॉर्ड्सचं, ऑस्ट्रेलियात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडचं तेच भारतात वानखेडे स्टेडियमचं. या मैदानाने भारतीयांच्या भावनांना अनेकदा हात घातला आहे. १९७८/७९ मध्ये सुनील गावसकरने वेस्टइंडीज विरुद्ध केलेलं द्विशतक (२०५ धावा) अजूनही क्रिकेट रसिकांच्या स्मरणात आहे. त्याच सामन्यात वेस्टइंडीजच्या अल्विन कालिचरणने देखील एक झुंजार शतक झळकावले होते. त्यानंतर १९७९-८० मध्ये भारताने पाकिस्तानवर मिळवलेला दिमाखदार विजय, पुढच्याच वर्षी इंग्लंडच्या इयान बोथमने केलेली शतकी खेळी आणि घेतलेले १३ बळी ह्यांची देखील चर्चा होत असते. रणजी ट्रॉफी सामन्यात रवी शास्त्रीने एकाच षटकात लागवलेले ६ षटकार देखील याच मैदानावर. (ही कामगिरी करणारा शास्त्री हा दुसरा फलंदाज ठरला.) सचिनने मुंबईसाठी केलेले पदार्पण, त्याचा रणजी ट्रॉफीचा पहिला सामना, आणि त्या सामन्यात झळकावले शतक देखील याच मैदानावर. पुढे १९९१ चा वानखेडे वरील रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खऱ्या अर्थाने गाजला. मुंबई विरुद्ध हरियाणा या सामन्यात हरियाणाने केवळ २ धावांनी विजय मिळवला. हा सामना देखील दीर्घकाळ लक्षात राहणारा आहे. १९९३ मध्ये भारताने इंग्लंडवर आणि १९९४ मध्ये वेस्टइंडीजवर अगदी सहजगत्या मिळवलेले विजय देखील लक्षात राहणारे. या इंग्लंड विरुध्दच्याच सामन्यात विनोद कांबळीने द्विशतकी खेळी केली होती. याच मैदानावर २००२ मध्ये  इंग्लंडच्या अँड्र्यू फ्लिन्टॉफने विजयानंतर केलेला उन्माद आपण सगळ्यांनीच बघितला (आणि गांगुलीने पुढे काही महिन्यातच लॉर्ड्सवर त्याची परतफेड केली ती देखील आपण अनुभवली आहे.) आत्ता आत्ता, काही वर्षांपूर्वी इंग्लंड विरुद्ध विराटने केलेल्या २३५ धावा त्याच्या सर्वोत्कृष्ट खेळींपैकी एक म्हणता येतील. इतकंच नाही, तर न्यूझीलंडच्या एजाज पटेलने कसोटी सामन्यात एका डावात १० बळी घेण्याचा केलेला पराक्रम देखील वानखेडेने बघितला आहे. अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेले हे मैदान खरोखर भारतीयांच्या क्रिकेटच्या आठवणींचा खजिना आहे. 

पण खऱ्या अर्थाने या मैदानावर घडलेल्या दोन सर्वात मोठ्या घडामोडी म्हणजे भारताने २०११ चा जिंकलेला विश्वचषक आणि सचिन तेंडुलकरचा शेवटचा कसोटी सामना. या दोन्ही घटना भारतीयांच्या मनावर कोरल्या आहेत, कायम राहतील. २ एप्रिल २०११ ती संध्याकाळ, भारत विरुद्ध श्रीलंका सामना, तो प्रेक्षकांचा जल्लोष, गौतम गंभीरची झुंजार खेळी आणि शेवटी कर्णधार धोनीचा तडका लागवणारा हेलिकॉप्टर शॉट, तो षटकार आणि भारताचा विजय. सगळंच अभूतपूर्व. जवळजवळ १२ वर्षे झाली तरीही ती संध्याकाळ आपल्या मनात घर करून आहे. त्या दिवशी वानखेडे स्टेडियम वरील त्या विजयाने संपूर्ण देशाला एकत्र आणले होते.

पुढे दोन वर्षातच सचिनने निवृत्तीचा निर्णय घेतला. त्याचा २०० वा आणि शेवटचा कसोटी सामना त्याच्याच होम ग्राउंडवर – वानखेडेवर होणार होता. संपूर्ण स्टेडियम सचिनमय झालं होतं, आणि सगळ्या देशाच्या नजर खिळून होत्या त्या वानखेडे स्टेडियमवर. सचिनची ती शेवटची खेळी, सामना संपल्यानंतर आपल्या संघाने त्याला दिलेला ‘गार्ड ऑफ ऑनर’, त्याचं ते प्रसिद्ध आणि काळजाला हात घालणारं भाषण आणि सर्वात शेवटी मैदानातून बाहेर पडताना सचिनने वानखेडेच्या पीचला वाकून केलेला नमस्कार. सचिन त्याच्या कृतीतून बरंच काही बोलून गेला. एका महान खेळाडूने त्याच्या कर्मभूमीला, त्याच्या मैदानाला मनापासून दिलेली ती मानवंदना विसरणे कधीही शक्य नाही. 

वानखेडे स्टेडियमच्या बाबतीत अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्या स्टेडियमवर असलेले स्टँड्स. मुंबईच्या तीन महान क्रिकेटपटूंच्या नावाने असलेले ३ स्टँड्स तितकेच प्रसिद्ध आहेत. विजय मर्चंट, सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर स्टँड्सनी या मैदानाची शोभा अधिकच वाढवली आहे. आणि अर्थातच तो जगप्रसिद्ध ‘नॉर्थ स्टॅन्ड’. त्या नॉर्थ स्टॅन्ड मधून क्रिकेट सामना बघण्याची मजा काही औरच आहे, काळ बदलला तसं क्रिकेट देखील बदललं. आता दर वर्षी जत्रा भरावी त्या प्रमाणे आयपीएलचे सामने वानखेडेवर होतात. नवीन खेळाडू, नवीन प्रेक्षक तिथे येऊन टी-२० चा आनंद लुटतात. त्यात काहीच गैर नाही, ते क्रिकेट देखील तेवढंच दर्जेदार आहे. तरीही खरा मुंबईकर क्रिकेट रसिक वानखेडेवर वर्षात एकदा होणारा एखादा रणजी ट्रॉफीचा सामना, दोन-तीन वर्षातून होणार एखादा कसोटी सामना बघण्यासाठी आतुर असतो. गेल्या काही वर्षात भारतात अनेक नवनवीन टेस्ट सेंटर्स झाली आहेत, अनेक नवीन मैदाने होत आहेत. हा खेळ खऱ्या अर्थाने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे. पण वानखेडे स्टेडियमचं ग्लॅमर कधी कमी होईल असं वाटत नाही.

वानखेडे स्टेडियम म्हटलं की एकीकडे मरीन लाईन्सचा तो झगमगाट आणि त्यापलीकडे तो अथांग सागर दिसतो. दुसऱ्या बाजूला मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वेचं जाळ दिसतं आणि सामन्याच्या वेळी मैदानाकडे धावत असलेला क्रिकेटवेडा दिसतो. वानखेडे स्टेडियम म्हटलं की त्या पहिल्याच कसोटी सामन्याच्या वेळी झालेली दंगल आठवते. वानखेडे म्हटलं २०११ च्या विश्वचषक अंतिम सामन्यात सचिन आणि सेहवाग बाद झाल्यानंतरची नीरव शांतता आठवते, आणि त्याच सामन्याचा शेवट देखील समोर येतो. नुवान कुलसेकराचा तो चेंडू महेंद्रसिंग धोनी टोलवताना दिसतो, आणि रवी शास्त्रीचा आवाज कानात ऐकू येतो. ” Dhoni hits the sixer, and India wins….” 

वानखेडे स्टेडियम म्हटलं की आठवणी जाग्या होतात आणि क्रिकेट रसिक अजूनच या मैदानाच्या प्रेमात पडतो. 

लीग्सची दुनिया

ऐका हो ऐका … क्रिकेटच्या जगतात एक नवीन लीग सुरु झाली आहे हो. तुफान फटकेबाजी, एक से बढकर एक खेळाडू, संगीतावर नृत्य करणाऱ्या चियर गर्ल्स आणि एकूणच धमाल… ही नवीन लीग क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणीच आहे…. ऐका हो ऐका.. अशी दवंडी ऐकू आली का कुठे? नाही आली म्हणता…. अरे हो, नसेल आली. आपण इथे भारतात राहतोय ना… ही घोषणा झाली होती दक्षिण आफ्रिकेत. आपण तिथले पेपर्स वाचत नाही, त्यामुळे काही दिवसांपूर्वी तिकडे सुरु झालेली ही SA२० लीग आपल्याला फारशी माहित असायचं काही कारण नाही. पण ही लीग सुरु झाली आहे, क्रिकेट जगतातील अजून एक लीग. खरं तर उशीरच झाला आहे, पण दक्षिण आफ्रिकेने आपली लीग सुरु केली खरी. 

साल २००८. नुकताच भारताने टी-२० विश्वचषक जिंकला होता. क्रिकेटमधला हा नवीन फॉरमॅट सगळ्यांनाच भुरळ घालत होता. त्याच्या काही दिवस अलीकडेपलीकडेच झी ग्रूप ने आपली एक क्रिकेट लीग सुरु केली होती. हा खऱ्या अर्थाने बीसीसीआय ला धक्का होता. बीसीसीआयने लगोलग त्या खेळाडूंवर बंदी आणून लीगचा निषेध केला होता. पण ह्या सगळ्या गदारोळात प्रसिद्ध झालेल्या टी-२० क्रिकेटचा फायदा आपल्या क्रिकेट बोर्डाने उठवला नसता तरच नवल होते. २००८ च्या मार्च-एप्रिल महिन्यात आयपीएल ची सुरुवात झाली आणि बघता बघता ह्या लीगने ह्या वर्षी १५ वर्षे पूर्ण केली आहेत. ह्या लीगमध्ये अनंत अडचणी आल्या. कधी संघांची संख्या बदलत गेली, कधी नावे बदलली, खेळाडू बदलत गेले, कधी सरकारने लीग खेळण्यास असमर्थता दाखवली तर कधी आणखी काही. कोविड मुळे २ वर्षे तर सगळं जगच ठप्प होतं. पण अशातही आयपीएल खेळवली गेली. कधी भारतात, कधी दक्षिण आफ्रिकेत तर कधी युएई मध्ये. त्या दोन वर्षात अनेक क्रिकेट मालिका रद्द झाल्या, अगदी टेस्ट चॅम्पियनशीप आणि विश्वचषक स्पर्धेच्या तारखा, फॉरमॅट्स, नियम बदलले पण आयपीएल मात्र घडत राहिली. ह्या मागे कारणे काय आहेत हे न शोधलेलंच बरं, पण निदान रसिकांना क्रिकेट बघायला मिळत होतं. त्याच आयपीएलच्या यशानंतर आता गेल्या ५-१० वर्षात अनेक लीग्सचं पेव फुटलं आहे. ऑस्ट्रेलियाची बिग बॅश लीग, वेस्ट इंडिज बेटांवरील कॅरिबियन प्रीमियर लीग, इंग्लंड मधील टी२० ब्लास्ट, बांगलादेश प्रीमियर लीग, पाकिस्तान सुपर लीग अशा एक ना अनेक लीग्स सुरु झाल्या आहेत. थोडेफार नियम वेगळे असले तरी ह्या स्पर्धांचा ढाचा साधारण सारखाच आहे. ६-८-१० संघ (बहुतेकवेळा वेगवेगळ्या शहरांची नावं असलेले), त्यात साधारण १८-२५ खेळाडू, ६-८ परदेशी खेळाडू, त्यातील ३ किंवा ४ खेळाडूंना सामन्यात खेळण्याची परवानगी, ह्या सगळ्या खेळाडूंचा लिलाव, संघांमागे असलेले धनाढ्य राजकारणी, व्यावसायिक, फिल्म स्टार्स आणि त्यांनी फेकलेले पैसे. खरं तर आता ह्या सगळ्याची आपल्याला सवय झाली आहे. 

ह्या सगळ्या प्रकारात आपण देश विरुद्ध देश हा खेळ जणू विसरूनच गेलो आहोत. पूर्वी दुरंगी-तिरंगी-चौरंगी मालिका होत असत, त्या आता संपल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेट जणू शेवटाकडे वाटचाल करत आहे. टी-२० क्रिकेटचा सुकाळ झाला आहे, पण अनेक देशांमधलं कसोटी क्रिकेट जवळजवळ संपलं आहे. आता श्रीलंका, वेस्ट इंडिज, पाकिस्तान, झिम्बाब्वे, बांगलादेश ह्या देशांचे कसोटी संघ फक्त नावालाच आहेत. काही वर्षांपूर्वी आयर्लंड आणि अफगाणिस्तान संघांना कसोटीचा दर्जा मिळाला, पण त्यांनी शेवटचा कसोटी सामना खेळून किती वर्षे झाली ह्याचा कोणी शोध घेतला आहे का? कसोटी क्रिकेट खऱ्या अर्थाने शिल्लक आहे ते भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि काही प्रमाणात न्यूझीलंड मध्ये. ह्या वर्षी एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक होईल. दर चार वर्षांनी होणार हा विश्वचषक पूर्वी क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणीच असे. शेवटचा हा विश्वचषक २०१९ मध्ये झाला होता, तो देखील आपल्या चांगला लक्षात असेल. पण ह्या दरम्यान टी-२० क्रिकेटचे २ विश्वचषक होऊन गेले आहेत. टी-२० क्रिकेट हा प्रकार हा रॉकेट पेक्षाही जोरात सुरु आहे. टी-२० मुळे काही चांगल्या गोष्टी नक्कीच झाल्या, पण त्याच फॉरमॅट मध्ये सुरु झालेल्या लिग्समुळे मात्र खेळाडूंचं क्रिकेट देशांऐवजी वेगवेगळ्या शहरांकडे, संघांकडे केंद्रीत झालं आहे. आज एखादा खेळाडू भारताचा, ऑस्ट्रेलियाचा  किंवा आफ्रिकेचा ओळखला जात नाही, तर तो मुंबई इंडियन्सचा, चेन्नई सुपर किंग्सचा किंवा मेलबर्न स्टार्सचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. हळूहळू दोन देशांमधील क्रिकेट नष्ट होईल का अशी भीती वाटू लागली आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक खेळाडू आता देशाकडून खेळण्याच्या ऐवजी लीग्स मधील संघांकडून खेळण्यासाठी प्राधान्य देतात. खास करून वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची ही सवय आपल्याला दिसून येते. अनेकदा अनेक आजी-माजी क्रिकेटपटू ह्या विरुद्ध बोलताना दिसतात, पण ह्या गोष्टी काही बदलणार नाहीयेत.    

वर उल्लेख केलेल्या लीग्स ह्या खऱ्या अर्थाने प्रातिनिधिक म्हटल्या पाहिजेत. ह्या पलीकडेही अनेक लीग्स असलेल्या आपल्या दिसून येतात. काहीच दिवसांपूर्वी सुरु झालेली SA२० (दक्षिण आफ्रिका), सुपर स्मॅश (न्यूझीलंड), लंका प्रीमियर लीग (श्रीलंका), नेपाळ टी-२० लीग (नेपाळ) ही अशीच काही उदाहरणे. आता ह्या वर्षी कदाचित युएई मधील इंटरनॅशनल टी-२० लीग आणि अमेरिकेची मेजर क्रिकेट लीग सुरु झाली तर हे चित्र अधिकच विदारक होण्याची शक्यता आहे. ह्या लीग्स मधून मिळणारे पैसे, त्याकडे आकर्षित होणारे क्रिकेटपटू, त्यांची स्थैर्यता ह्या सगळ्याचा विचार करता कदाचित ह्या लीग्समुळे क्रिकेटचे सगळे संदर्भ बदलण्याची शक्यता आहे. आता पुढील काही वर्षात सगळेच क्रिकेटपटू ह्या लीगचे खेळाडू किंवा त्या लीगमध्ये सहभागी झालेले खेळाडू म्हणून ओळखले जाण्याची शक्यता आहे. क्रिकेटचं ग्लोबलायझेशन करण्याच्या नादात आपण कदाचित खेळाडूंना लीग क्रिकेट मधेच बांधून ठेवतो आहोत, आणि  हे चित्र नक्कीच भयावह आहे. 

सूर्य तळपतोय

“अरे काय खेळतोय हा सूर्या, काय तुफान हाणतो यार तो.” आज सकाळी एका मित्राचा फोन आला होता. सूर्यकुमार यादवच्या राजकोटच्या खेळीवर स्वारी प्रचंड फिदा होती. “अरे हा खरोखर एबी डिव्हिलियर्स आहे रे. त्याचे शॉट्स बघ, कुठूनही ३६० अंशात फटके मारतोय.” सूर्यकुमार यादवचं कौतुक काही थांबत नव्हतं. खरं सांगायचं तर अशीच काहीशी भावना माझी पण झाली होती. पण ही भावना फक्त एका मॅचपूरती नव्हती, तर गेले काही महिने हा सूर्या जे खेळतो आहे त्या बद्दल होती. सूर्यकुमार यादव ह्या नावाभोवती आता एक वलय आहे. मुंबई, पश्चिम विभाग, इंडिया ए,  कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स आणि आता टीम इंडिया साठी खेळणारा सूर्या क्रिकेट रसिकांच्या गळ्यातला ताईत झाला आहे. त्याला बघून कोणाला एबीडी आठवतो, तर कोणाला त्याचा तो झोपून मारलेला हूक शॉट बघताना साक्षात रोहन कन्हायची आठवण होते. कदाचित ही खूप मोठी नावं असतील, पण आजच्या घडीला – गेले काही महिने, सूर्यकुमार यादव जे खेळतो आहे, त्याला काहीच तोड नाही. खेळाच्या छोट्या फॉरमॅट मध्ये, विशेषतः टी२० क्रिकेटमध्ये त्याची बॅट अक्षरशः तळपते आहे. ४५ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात १५०० पेक्षा जास्त धावा, तेही ४६ च्या सरासरीने, त्यात ३ शतकं आणि १३ अर्धशतकं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे १८० चा स्ट्राईक रेट. २ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या सूर्यासाठी हे आकडे खूप मोठे आहेत, जणू त्याच्या पराक्रमाची ग्वाही देणारे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सूर्या फलंदाजीला येतो ते २ किंवा ३ विकेट्स गेल्या नंतर. म्हणजे तो जास्तीत जास्त १२-१५ षटके फलंदाजी करतो, ह्याचा विचार केला तर हे आकडे अजूनच मोठे भासू लागतात. गेल्या सहा महिन्यात सूर्याने आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ३ शतके ठोकली आहेत (इंग्लन्ड विरुद्ध जुलै २०२२ मध्ये ११७, न्यूझीलंड विरुद्ध नोव्हेंबर २०२२ मध्ये १११ आणि परवा श्रीलंकेविरुद्ध ११२), आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन ३ शतके ठोकणारा तो एकमेव फलंदाज आहे.

सूर्यकुमार यादव आता ३२ वर्षांचा आहे. वयाच्या तिशीत त्याने टीम इंडिया मध्ये पाऊल ठेवलंय. मुंबई क्रिकेट मध्ये तो झळकायला लागला ते २०१० पासून. त्या १०-१२ वर्षात अनेक चढ उतार बघत त्याने मुंबई साठी अनेकदा चमकदार कामगिरी केली आहे. मुंबई ही क्रिकेटची खाण, आणि त्यातून मिळालेलं हे रत्न. ह्या सूर्याचा मुंबई पासून सुरु झालेला प्रवास जगाने बघितला आहे. नुकतंच सुरु झालेलं आयपीएल सूर्यकुमार यादव साठी जणू पर्वणीच ठरलं. आयपीएल मधला त्याचा प्रवास मुंबई-कोलकाता-मुंबई असा झाला आहे. ह्याच कालावधीत त्याच्या दोन्ही संघांनी आयपीएल स्पर्धा जिंकल्या, आणि त्यात सूर्याचा मोठा वाटा होता. मधल्या फळीतील चमकदार कामगिरी करणारा फलंदाज ही त्याची ओळख अजूनही कायम आहे. आयपीएल मुळेच कदाचित त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा सहवास लाभला. ह्या सर्वांबरोबर ड्रेससिंग रूम शेअर करणे हा देखील मस्त अनुभव असणार. सूर्याच्या पोतडीतून एक एक फटका बाहेर येत गेला आणि त्यावर छाप बसत गेली ती ए बी डिव्हिलियर्सची. आयपीएल मध्ये एक एका स्टारचे जणू कंपूच तयार झाले आहेत. कोणी धोनीचे फॅन्स आहेत, कोणी रोहितचे तर कोणी विराटचे. पण सर्वच क्रिकेट रसिक एबीडीचे मोठे पंखे आहेत. हा मनुष्य भारतीय नसला तरी भारतीय क्रिकेट रसिक त्यावर मनापासून प्रेम करतात. त्याच्या खेळाचे कौतुक करतात. सूर्यकुमार यादवची तुलना डिव्हिलियर्स बरोबर होणे, रसिकांना त्याच्या शॉट्स मध्ये एबीडीची झलक दिसणे हा सूर्याचा मोठा बहुमान आहे. आणि अर्थातच सूर्याला देखील त्यात आनंद वाटत असेल. 

सूर्याच्या समोर आता अनेक आव्हाने आहेत ह्यात काही शंका नाही. आता भारतीय क्रिकेट रसिकांची त्यांच्याकडून मोठी अपेक्षा आहे. जरी त्याच्या नावावर फक्त १५ एकदिवसीय आणि ४५ टी२० सामने असतील तरी देखील त्याच्याकडे संघाचा आधारस्तंभ म्हणून बघितले जात आहे. भारतीय संघाची मधली फळी आता ह्या पुढे सूर्याच्या खांद्यावर उभी असेल. आणि ही जबाबदारी खूप मोठी आहे. त्यात २०२३ हे वर्ष एकदिवसीय विश्वचषकाचं आहे, आणि तो विश्वचषक भारतात होणार आहे. अश्यावेळी हे जबाबदारीचं ओझं कैक पटीने वाढणार आहे. गेल्या काही वर्षात भारतीय संघाने आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही, आपण फलंदाजी विभागात अजूनही धडपडतो आहोत, अजूनही आपला कॅप्टन-कॅप्टन असा खेळ सुरु आहे, अनेक खेळाडूंच्या दुखापतींमुळे संघाची घडी थोडी बिघडली आहे… अश्या वेळी भारतीय क्रिकेट रसिकांना सूर्यकुमार यादवचा खरा आधार आहे. सूर्या उत्तम फलंदाज तर आहेच पण संघाची धुरा वाहून नेण्याची ताकद त्याच्याकडे नक्की आहे. तो एक अप्रतिम क्षेत्ररक्षक देखील आहे. त्यामुळे ह्या वर्षात त्याचं काम, त्याच्यावर असलेली जबाबदारी मोठी असेल. आता त्याचा समावेश कसोटी संघात देखील केला जावा अशी मागणी होते आहे. काही दिवसातच आपली ऑस्ट्रेलिया विरुद्धची कसोटी मालिका सुरु होईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात खेळायचं असेल तर भारताला ह्या मालिकेत विजय मिळवणे आवश्यक आहे. ह्या मालिकेत आणि जर अंतिम सामन्यात आपण प्रवेश केला तर त्या सामन्यात सूर्यकुमार यादव सारखा खेळाडू असणे आपल्या संघासाठी आवश्यक आहे कदाचित सूर्या ह्या मालिकेतील एक्स फॅक्टर ठरू शकेल. एकूणच त्याच्यासमोर असलेली आव्हाने आणि त्याची ती आव्हाने पेलून नेण्याची क्षमता लक्षात घेता, सूर्यकुमार यादव हा ह्या वर्षातील मोठा खेळाडू ठरणार आहे.  

गेल्या काही वर्षातील क्रिकेट मोठ्या प्रमाणावर बदललं आहे. एकूणच हे क्रिकेट खूपच वेगवान झालंय. आणि अश्यावेळी सूर्यकुमार यादव सारखा ३६० अंशात खेळणारा, आणि संघाच्या गरजेप्रमाणे स्वतःला बदलू शकणार फलंदाज भारतीय संघात असेल तर भारतीय क्रिकेट कडून ह्या वर्षात काही चांगल्या कामगिरीची अपेक्षा करता येईल. सूर्यकुमार यादव आता मोठा खेळाडू म्हणून ओळखला जातो, कदाचित २०२३ हे वर्ष त्याला एक लिजंड म्हणून घडवण्यात मोठं ठरू शकेल. हे घडावं अशी भारतीय क्रिकेट रसिकांची अपेक्षा आहे हे नक्की. 

वेध टेस्ट चॅम्पियनशीपचे

काही वर्षांपूर्वी आयसीसीने टेस्ट चॅम्पियनशीपची सुरुवात केली. हा एक प्रयॊग असला तरीदेखील क्रिकेटच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा होता.एकीकडे टी२० क्रिकेट फैलावत असताना क्रिकेटचा प्रमुख फॉरमॅट कसोटी क्रिकेट मात्र कुठेतरी कमी पडतंय अशी सर्वत्र भावना होती. ९० च्या दशकात जेंव्हा एकदिवसीय क्रिकेट जोरात होतं आणि सर्वत्र त्या फॉरमॅटची चर्चा असे, तेंव्हा कसोटी क्रिकेट आता लवकरच संपणार आहे असं बोललं जात असे. त्यानंतर काही वर्षांनी टी२० सामने सुरु झाले. त्याचबरोबर इतर काही फॉरमॅट्सचा (उदा. टी१० आणि हंड्रेड) जन्म झाला, पण टेस्ट क्रिकेट अजूनही तसेच आहे. हो, अनेकदा सामना ड्रॉ करण्याकडे संघांचा कल असायचा, त्यामुळे अनेकदा कसोटी सामने बोरिंग व्हायचे. ५-५ दिवस चालणारे सामने प्रेक्षकांना नको असायचे, त्या क्रिकेटमध्ये हाणामारी नसायची, पॉवर प्ले च्या ओव्हर्स नसायच्या… प्रेक्षकांनी कसोटी सामन्यांकडे जणू पाठ फिरवली होती. अर्थात, त्याला पूर्णपणे कसोटी क्रिकेट जबाबदार होतं असंही म्हणता येणार नाही. एकूणच प्रेक्षकांचा कसोटी क्रिकेटमधला इंटरेस्टच संपला होता. अशा वेळी कसोटी क्रिकेट वाचवणं आवश्यक होतं कारण आजही अनेक प्रेक्षक कसोटी क्रिकेटलाच महत्व देतात. त्यांच्यासाठी तेच खरं क्रिकेट आहे. इतकंच काय, प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अनेक क्रिकेटपटू देखील कसोटी क्रिकेटलाच प्राधान्य देतात. कसोटी किंवा टेस्ट क्रिकेट हे एक वेगळ्या प्रकारचं क्रिकेट आहे, आणि त्याचं महत्व इतर दोन्ही फॉरमॅट्सपेक्षा जास्त आहे असं जाणकार समीक्षक नेहमी सांगतील. ह्याच क्रिकेटला थोडंफार बदलायचा प्रयत्न टेस्ट चॅम्पियनशीप ह्या स्पर्धेने केला. 

अनेकदा अनेक लोक विचारतात की खरंच ह्या चॅम्पियनशीप ची गरज आहे का? कसोटी क्रिकेट टिकवणं खरंच इतकं आवश्यक आहे का? आजच्या टी२० च्या प्रेक्षकाला तीन तासातली ती बॅटिंग आणि बॉलिंग बघायची असते. त्याला संपूर्ण दिवस सामना बघण्याची इच्छा देखील नाही. पण टी२० क्रिकेटमध्ये आपण जे बघतो त्याला क्रिकेट म्हणता येईल का? खेळाडूंच्या स्किल्सना पुरेपूर संधी ह्या क्रिकेटमध्ये मिळते का? आडवेतिडवे फटके मारून धावा करणे ह्याने प्रेक्षकांचे समाधान होत असेल पण खेळाडूची भूक नाही ना भागत. आपण बाहेर कितीही दिवस बर्गर आणि पिझ्झा खाल्ला तरीदेखील घरी येऊन भाजी भाकरी मध्येच आपल्याला जास्त आनंद मिळतो ना. कसोटी क्रिकेट हे त्याचा समाधानाची, आनंदाची अनुभूती देणारं क्रिकेट आहे. आणि खरं क्रिकेट हवं असेल तर कसोटी क्रिकेट टिकावं आणि जगावं म्हणून प्रयत्न करणे आवश्यक आहे. क्रिकेट इतर अनेक देशात पोहोचवणं जितकं आवश्यक आहे तितकंच आवश्यक आहे ते म्हणजे कसोटी क्रिकेट टिकवणं. आणि तोच प्रयत्न आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या माध्यमातून करताना दिसतात. ह्यावर्षी – २०२३ मध्ये आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होईल. हा ह्या चॅम्पियनशीपचा दुसरा सिझन असेल. आजही ह्या स्पर्धेत काही त्रुटी आहेत हे नक्की, पण अशी स्पर्धा घडणे आणि वाढणे हे क्रिकेटच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. एकदिवसीय आणि टी२० क्रिकेटसाठी ज्या प्रकारे विश्वचषक स्पर्धा होते, त्याच प्रकारे कसोटी क्रिकेटमध्ये स्पर्धा होऊन त्यातील विजेत्याला मिळणारे बक्षीस म्हणजे ही टेस्ट चॅम्पियनशीपची गदा.    

टेस्ट चॅम्पियनशीप २ वर्षांची आहे. टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या संघांमध्ये ह्या दोन वर्षांच्या कालावधीत काही कसोटी सामने खेळवले जाऊन, काही वेगळ्या पद्धतीने त्याची मोजणी (पॉईंट्स सिस्टीम) करून मगच पुढे चॅम्पियनशीप साठीचे संघ ठरवले जातात आणि त्या दोन संघात अंतिम सामना खेळवला जातो. २०२१ साली झालेल्या पहिल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड आणि भारत हे डोंग एकमेकांशी भिडले, आणि त्यात न्यूझीलंडने विजय मिळवला. हा सामना इंग्लंडमध्ये खेळवला गेला. एका त्रयस्थ देशात झालेला हा अंतिम सामना (केवळ भारत खेळत होता म्हणून) अनेक प्रेक्षकांनी बघितला. ह्या सामन्यावर देखील टीका करण्यात आली. मुळात हा सामना त्रयस्थ देशात खेळवायला हवा होता का? कदाचित एक अंतिम सामना न ठेवता, तीन किंवा पाच सामन्यांची मालिका खेळवली गेली असती तर? भारत ह्या सामन्यात खेळत नसता तर त्याला मिळालं तितकं महत्व मिळालं असतं का असे अनेक प्रश्न विचारले गेले. कदाचित क्रिकेटच्या ह्या बिझी शेड्यूल मध्ये तीन सामन्यांची मालिका खेळवता आली नसती, पण सामना कुठे खेळवायला हवा ह्याचा निर्णय दोन अंतिम संघांवर सोडता आला असता तर? आणि त्रयस्थ देशच हवा तर मग भारतीय उपखंडातील एखाद्या देशात किंवा वेस्ट इंडिज मध्ये हा सामना का खेळवला गेला नाही? असेही प्रतिप्रश्न निर्माण होतात. हे प्रश्न ह्यासाठी महत्वाचे आहेत की ह्यावर्षी होणारा अंतिम सामना देखील असाच त्रयस्थ भूमीवर खेळवला जाईल. आयसीसीने खूप आधीच ह्या अंतिम सामन्याची जागा निवडली आहे. हा सामना २०२३ च्या जून-जुलै मध्ये इंग्लंडमध्ये खेळवला जाईल. (जिथे पहिल्या स्पर्धेचा देखील अंतिम सामना खेळवला गेला होता.) आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या वर्षीच्या अंतिम सामन्यासाठी इंग्लंड अपात्र ठरला आहे ह्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. म्हणजे पुन्हा एकदा पहिले पाढे पंचावन्न असेच म्हणावे लागणार आहे. 

ह्या वर्षी होणाऱ्या टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील दोन प्रमुख दावेदार आहेत ते म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि भारत. इतर दोन संघांना – दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका, ह्या अंतिम सामन्यात खेळण्याची अतिशय कमी का होईना पण संधी आहे. तरीदेखील आजच्या घडीला ऑस्ट्रेलिया आणि भारताचे पारडे अंमळ जड आहे हे नक्की. ऑस्ट्रेलियाचे ह्या स्पर्धेसाठी ५ कसोटी सामने शिल्लक आहेत आणि भारताचे ४. पण महत्वाची गोष्ट म्हणजे पुढच्या २ महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया ह्या दोन संघात ४ कसोटीची मालिका खेळवली जाणार आहे, ती देखील भारतात. ऑस्ट्रेलियाचे ह्या अंतिम सामन्यात खेळणे जवळ जवळ नक्की आहे, पण भारतासाठी ही चार कसोटीची मालिका अतिशय महत्वाची आहे. भारताने ही मालिका दोन कसोटीच्या अथवा त्यापेक्षा चांगल्या फरकाने जिंकली तर भारत देखील अंतिम सामन्यात खेळू शकेल. ही मालिका घराच्या मैदानावर खेळवली जात असल्याने भारतीय संघाला ही मालिका जिंकणे जड जाऊ नये. भारतीय संघाला घरच्या मैदानावर हरवणे तसे अवघडच आहे. दोन वर्षांपूर्वी भारतातील फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर आपण इंग्लंडवर मात करूनच टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला होता. 

आजच्या घडीला आपला संघ एका संक्रमणातून जात आहे. खराब फॉर्म, दुखापतग्रस्त खेळाडू, चुकीची संघनिवड, कॅप्टनसीचे गोंधळ अश्या सगळ्या वातावरणात आपण अंतिम फेरीपर्यंत पोहोचतो आहोत हीच मोठी गोष्ट आहे. त्यात पुढील मालिका (ऑस्ट्रेलिया विरुद्धची) फिरकी खेळपट्टीवर खेळणे आणि नंतर इंग्लंडमध्ये विपरीत वातावरणात आणि खेळपट्टीवर अंतिम सामना खेळणे भारतीय संघासाठी आव्हान असेल. त्यात समोर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल ते तर वेगळेच. जून जुलै महिन्यातील इंग्लंडमधील वातावरण आपल्यापेक्षा ऑस्ट्रेलियासाठी जास्त अनुकूल असेल. अश्यावेळी भारतीय खेळाडू ह्या आव्हानांचा कसा मुकाबला करतात हे पाहणे महत्वाचे ठरेल. भारतीय संघाने आयसीसीच्या बहुतेक स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवले आहे  आपल्या संघाने टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतही चांगली कामगिरी करून विजेतेपद मिळवावे अशीच भारतीय क्रिकेट रसिकांची अपेक्षा असेल. ही चांगली कामगिरी (आणि विजेतेपद) भारतीय क्रिकेटला देखील एका नव्या ऊंचीवर घेऊन जाईल ह्यात शंका नाही. 

२०२२ चा ताळे बंद

२०२२ हे वर्ष संपलं. खरं सांगायचं तर हे वर्ष भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने फार काही चांगलं गेलं असं म्हणता येणार नाही. ह्या वर्षात भारतीय क्रिकेटने बरेच चढ उतार बघितले, अर्थात त्यामध्ये उतारच जास्त होते. क्रिकेटच्या तीनही फॉरमॅट्स मध्ये भारतीय संघाने फार काही चांगली कामगिरी केली असे म्हणता येणार नाही. भारतीय संघाने तीनही फॉरमॅट्स मध्ये अनेक वेगवेगळे बदल केले, अनेक नवनवीन गोष्टी तपासून बघितल्या, बरेच कॅप्टन्स बदलून बघितले पण पाहिजे तितकं आणि पाहिजे तसं यश हाती लागलं असं काही म्हणता येणार नाही. दक्षिण आफ्रिका (२ कसोटी) आणि इंग्लंड मधील एकमेव कसोटी हारून देखील आपण अजूनही २०२३ मधल्या टेस्ट चॅम्पियनशीपसाठी पात्र ठरू बघतो आहोत हीच काय ती आनंदाची गोष्ट. अर्थात ह्या मध्ये आपल्या चांगल्या खेळापेक्षा इतर संघांचे वाईट खेळणे जास्त कारणीभूत आहे. ह्या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये आपण विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि के एल राहुल असे तीन कर्णधार बघितले, पण यश नावाची गोष्ट अजूनही थोडी लांबच आहे. आपल्या प्रमुख खेळाडूंचे अपयश ही देखील ह्या वर्षातील महत्वाची गोष्ट. विराट, रोहित, राहूल किंवा बुमराह सारखे खेळाडू ह्या वर्षी पाहिजे तितके चमकले नाहीत. त्यात रोहित, राहूल, बुमराह सारखे खेळाडू बराच काळ दुखापतीने ग्रस्त होते. २०२२ च्या वर्षात फारसे एकदिवसीय सामने खेळले गेले नाहीत. तुलनेने हे वर्ष टी२० क्रिकेटचे होते. ह्या वर्षात टी२० क्रिकेट आशिया चषक आणि विश्वचषक अश्या दोन प्रमुख स्पर्धा खेळवल्या गेल्या. त्यामुळे टी२० क्रिकेट जास्त खेळवलं गेलं. भारतीय संघाला ह्याही फॉरमॅटमध्ये फार काही यश मिळालं असं म्हणता येणार नाही. आशिया कप स्पर्धेत सेमी फायनल मध्ये पाकिस्तानकडून मात, आणि विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड संघाने उडवलेला धुव्वा, ह्या कारणाने आपण दोन्ही स्पर्धांमधून बाहेर पडलो. 

मग ह्या वर्षात चांगल्या गोष्टी काहीच घडल्या नाहीत का? नाही, काही चांगल्या गोष्टी नक्की घडल्या. गेल्या काही वर्षांमधील बेंच स्ट्रेंग्थ लक्षात घेता, आता आपल्याकडे उत्तमोत्तम खेळाडूंची फळी तयार झाली आहे. तीनही फॉरमॅट्स मध्ये आपण आता काही चांगले खेळाडू खेळवू शकतो. शुभमन गिल, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन सारख्या भारतीय खेळाडूंनी हे वर्ष निश्चित गाजवलं. प्रसंगी रवीचंद्रन अश्विन, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल हे खेळाडू देखील चमकून गेले. सूर्यकुमार यादव हा ह्या वर्षात गवसलेला हिरा म्हटला पाहिजे. खरं तर तो आधीपासूनच चमकतो आहे, पण त्याचे पैलू ह्या वर्षी आपल्याला पहिल्यांदा दिसले. खुद्द ए बी डिव्हिलियर्स बरोबर त्याची तुलना होते आहे. खेळाच्या छोट्या फॉरमॅट मध्ये, टी२० मध्ये तो जास्तच झळाळतो आहे. विश्वचषक स्पर्धेतील त्याच्या खेळी क्रिकेट रसिकांच्या कायम लक्षात राहतील. अश्विनने देखील योग्य प्रसंगी चांगला खेळ करून आपल्याला विजय मिळवून दिला. विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध हुशारीमुळे आणि नुकत्याच झालेल्या बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याच्या चिवटपणामुळे तो चमकून गेला. हार्दिक पंड्या आता नवीन कॅप्टन होऊ पाहतो आहे. आयपीएल मध्ये गुजरात टायटन्सची धुरा सांभाळताना त्याने संघाला पहिल्याच सीझनमध्ये विजेतेपद मिळवून दिले. त्याच जोरावर आता तो भारतीय जबाबदारी घेऊ शकेल अशी आशा आहे. 

संघातील इतर प्रमुख खेळाडू मात्र तुलनेने फारसे चमकले नाहीत. रोहितचे फलंदाज आणि कर्णधार म्हणून देखील अपयश जास्तच खटकले. ह्या वर्षी त्याच्या खेळापेक्षा दुखापतीचीच चर्चा जास्त झाली. विराट देखील गेली २-३ वर्षे फॉर्मशी झगडतो आहे. त्याचा परिणाम त्याच्या कॅप्टनसीवर झाला. ह्या वर्षात त्याचीही कामगिरी फारशी चांगली झाली नाही. आशिया कप मध्ये जवळजवळ तीन वर्षांनी झळकावले अर्धशतक आणि विश्वचषकात मोक्याच्या वेळी अप्रतिम खेळी करून पाकिस्तानविरुद्ध मिळवून दिलेला विजय ह्या विराटच्या जमेच्या बाजू. अर्थात पाकिस्तान विरुद्धची त्याची ती खेळी लाखात एक होती. पण संपूर्ण वर्षभर त्याची बॅट पाहिजे तशी तळपली नाही. के एल राहूल आणि ऋषभ पंत ह्यांच्यासाठी देखील हे वर्ष यथातथाच होते. दोघांनीही भारतीय संघाचे नेतृत्व केले, पण त्यांची एकूण कामगिरी नावाला साजेशी नव्हती हे नक्की. त्यांच्या नशिबी क्रिकेट रसिकांकडून दूषणेच जास्त होती. चेतेश्वर पुजारा कसोटीमध्ये फारसा चमकला नसला तरी इंग्लिश काउंटी मध्ये मात्र त्याने बहारदार कामगिरी केली. गोलंदाजी विभागात भुवनेश्वर कुमारचे अपयश प्रामुख्याने दिसले, तर बुमराह आणि रवींद्र जडेजाची दुखापत देखील पूर्ण वर्षभर चर्चेत राहिली. 

आयपीएल मध्ये गुजरातच्या संघाने विजेतेपद मिळवले. आयपीएलच्या भट्टीतून निघालेली अनेक रत्ने भारतीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करताना दिसतात. ईशान किशनच्या द्विशतकी खेळीने ह्या वर्षीच्या शेवटी धमाका केला. कोरोना काळात न झालेली रणजी ट्रॉफी स्पर्धा ह्या वर्षी खेळवली गेली. मध्यप्रदेशने मुंबईला हरवून ह्या वर्षी रणजी ट्रॉफी जिंकली. त्याप्रसंगी मध्यप्रदेशचा जल्लोष क्रिकेट जगताने बघितला. महत्वाची गोष्ट म्हणजे मध्यप्रदेश आणि मुंबई ह्या दोन्ही संघांचे प्रशिक्षक – चंद्रकांत पंडित आणि अमोल मुजुमदार, हे रमाकांत आचरेकर सरांचे शिष्य. नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये काही महत्वाच्या खेळी खेळल्या गेल्या. तामिळनाडूच्या जगदीशनने ह्याच स्पर्धेत केलेली २७७ ची खेळी लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी ठरली, तर ऋतुराज गायकवाडने एका षटकात सात षटकार मारून विक्रम केला. विजय हजारे ट्रॉफीनंतर आता रणजी स्पर्धा होत आहे. ह्या वर्षी आता ही स्पर्धा नेहेमीसारखी पूर्ण स्पर्धा असेल. (कोविड काळात कमी सामने खेळले गेले, तसे ह्या वर्षी नसेल.)  

एकूणच २०२२ हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी एक ‘मिक्स बॅग’ होतं. खूप काही गोष्टी भारतीय संघाच्या दृष्टीने चांगल्या झाल्या नाहीत, भारतीय खेळाडूंची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. २०२३ ह्या वर्षात भारतीय संघासाठी एक आव्हान असेल. ह्या वर्षी भारतीय संघ नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करो अशीच भारतीय क्रिकेट रसिकांची अपेक्षा असेल.

To know more about Crickatha