ball
Quote icon

CRICकथा … मराठीमधील क्रिकेट विषयक एकमेव दिवाळी अंक. 

क्रिकेट हा आपल्यासाठी फक्त खेळ नाही तर धर्म आहे. अगदी ६ वर्षांच्या बंडू पासून ८० वर्षांच्या बंडोपंतांपर्यंत सर्वांनाच क्रिकेट बदल बोलायला आवडतं. आपल्याकडे सगळ्यांनाच क्रिकेट समजतं आणि प्रत्येकालाच त्याबद्दल काहीतरी मत मांडायचं असतं.  क्रिकेटचे सामने सुरु असताना घरोघरी प्रत्येकजण टीव्हीसमोर खिळून बसलेला असतो. एकूणच क्रिकेट हा विषय आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा आहे. आजकाल क्रिकेटची आवड किंचित कमी झाली आहे असं देखील अनुभवास आलं आहे. क्रिकेटसह इतर अनेक खेळ उदा. हॉकी, फुटबॉल, कबड्डी, बॅडमिंटन किंवा इतर खेळांकडेही क्रीडा रसिक वळू लागले आहेत. त्या सर्व खेळांचा आदर आहेच, पण कुठेतरी क्रिकेटबद्दल कणभर जास्तच प्रेम असल्याने मागच्या वर्षी (२०२१ मध्ये) आम्ही CRICकथा चा विचार केला. मराठी साहित्यामध्ये दिवाळी अंकांची खूप मोठी परंपरा आहे. आपल्याकडे गेली अनेक वर्षे विविध प्रकारचे, विविध विषयांना वाहिलेले, अनेक नाविन्यपूर्ण माहिती आणि लेख असलेले दिवाळी अंक दर वर्षी प्रकाशित होत असतात. ह्यामध्येच क्रिकेट ह्या आपल्या  लाडक्या खेळाला वाहिलेला एक दिवाळी अंक असावा ह्या विचाराने CRICकथाची सुरुवात झाली. 

आपल्याकडे परंपरागत चालत आलेली वाचन संस्कृती हा महत्वाचा भाग आहे.  ह्या गोष्टीचा विचार करून हा दुसरा अंक – २०२२ चा दिवाळी अंक डिजिटल आणि प्रिंट माध्यमाद्वारे रसिकांसमोर येईल. क्रिकेटवरील हा अंक सुरु करण्यामागे अजून एक भूमिका होती. आज समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) एकमेकांची उणीधुणी काढण्याचे काम सर्रास सुरु असते. आपला एखाद्या विषयाशी काहीही संबंध नसताना देखील आपण त्या विषयातील तज्ज्ञांच्या बुद्धीची लक्तरे काढतो. हा प्रकार भीषण आहे. समाजमाध्यमांवर आपल्याला व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे हे नक्की, पण त्याचा अर्थ आपण दुसऱ्याचा अथवा त्याच्या मताचा अनादर करावा असे निश्चित नाही. क्रिकेट सारख्या लोकप्रिय खेळाच्या बाबतीत देखील हेच घडते. हातात कधी बॅट-बॉल देखील न घेतला व्यक्ती खेळातील दिग्गजांनी  मैदानावर काय करावे ह्याचे तारे तोडताना दिसतो. ह्याही गोष्टी क्रिकेट रसिक म्हणून कुठेतरी खुपत होत्या. परंतु हा प्रकार वादविवाद करण्यासारखा निश्चित नाही. त्याला योग्य शब्दात द्यायचे उत्तर (निदान क्रिकेटपुरते) म्हणजे CRICकथा, ह्या विचाराने ह्या दिवाळी अंकाची सुरुवात झाली. 

२०२२ चा CRICकथा दिवाळी अंक 

२०२२ हे CRICकथाचे दुसरे वर्ष. CRICकथा हा मराठीमधील क्रिकेटविषयक एकमेव दिवाळी अंक आहे.  ह्या अंकात देखील पहिल्या अंकाप्रमाणे अनेक मान्यवरांनी क्रिकेटबद्दल लिहिले आहे. काही माहितीपूर्ण लेख आहेत, काही आठवणी आहेत, काही विश्लेषण आहे, काही मुलाखती आहेत तर अनेक खेळाडूंचे किस्से, गोष्टी देखील रसिकांना ह्या अंकात वाचायला मिळतील. ह्या अंकासाठी भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि कॅनडा येथील लेखकांनी लेखन केले आहे. ह्या अंकात बरेचसे लेख आहेत तर काही मंडळींनी आपल्या आठवणी व्हिडीओ स्वरूपात देखील सादर केल्या आहेत. डिजिटल अंकात व्हिडीओ देणे शक्य आहे, परंतु प्रिंट अंकात ही सोपी गोष्ट नाही. तरीही तंत्रज्ञानाची मदत घेऊन आम्ही प्रिंट अंक विकत घेणाऱ्या रसिकांसाठी देखील व्हिडीओ बघता येतील अशी व्यवस्था करीत आहोत. कदाचित मराठीमधील हा असा पहिलाच प्रयोग असेल. 

CRICकथा च्या ह्या अंकात देखील अनेक विषयांची रेलचेल आहे. मराठीमधील ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी ह्यांचं मनोगत त्यांनी व्हिडिओद्वारे व्यक्त केलं आहे. सध्याच्या काळात श्रीलंकेची परिस्थिती बिकट होत चालली आहे. तिथली राजकीय आणि आर्थिक घडी पूर्णपणे बिनसली आहे. परंतु एकेकाळी श्रीलंका आणि तिथे खेळलं जाणार क्रिकेट ह्याचा जगभर बोलबाला होता. संझगिरींच्या श्रीलंकेविषयी, लंकन खेळाडूंविषयी काही छान आठवणी आहेत. त्याच आठवणी त्यांनी ह्या व्हिडिओमधून उलगडल्या आहेत. ह्या वर्षी भारतीय संघांनी क्रिकेट जगतातील २ महत्वाची पदके मिळवली. फेब्रुवारी २०२२ मध्ये झालेल्या १९ वर्षांखालील भारतीय संघाने विजेतेपद पटकावले. ह्या अंकात रसिकांना भारतीय १९ वर्षाखालील संघाचा कोच ह्रिषीकेश कानिटकर ह्याची मुलाखत वाचायला मिळेल. कॉमनवेल्थ खेळांमध्ये ह्या वर्षी प्रथमच महिला क्रिकेटचा समावेश केला गेला, त्यामध्ये भारतीय महिला संघाने रौप्यपदक मिळवले. त्या स्पर्धेबद्दलचा आढावा खास स्पर्धेसाठी इंग्लंडला गेलेल्या अभिजित देशमुख ह्यांनी घेतला आहे. भारताच्या राष्ट्रीय संघात अष्टपैलू खेळाडूची भूमिका पार पाडणारा,पालघरच्या शार्दूल ठाकूरच्या ह्या सगळ्या प्रवासाबद्दल त्याचे वडील श्री. नरेंद्र ठाकूर ह्यांची देखील मुलाखत ह्या अंकात आहे. 

क्रिकेट रसिकाला रमाकांत आचरेकरांची वेगळी ओळख करून द्यायला  नको. जितेंद्र शेंडे ह्यांनी त्यांच्या काही आठवणी आपल्या लेखामध्ये लिहिल्या आहेत. मुंबई क्रिकेट मधील अजून एक खूप मोठं नाव म्हणजे वासू  परांजपे, त्यांच्या बद्दल  लिहितोय त्यांचाच पुत्र, जतीन परांजपे. क्रिकेट सामन्यात मॅच रेफरी (सामनाधिकारी) ही व्यक्ती किती मोठी असते, त्यांची भूमिका काय असते हे मांडत आहेत भारतीय क्रिकेटमध्ये सामनाधिकारी म्हणून काम करत असलेले सत्यजित सातभाई, तसेच क्रिकेट पंचांविषयी लिहीत आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच विनीत कुलकर्णी. क्रिकेट स्कोअरिंग – कला की शास्त्र ह्या विषयावर सुबोध वैद्य ह्यांचा लेख आहे. मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमधून काम करणारे लोकप्रिय अभिनेते विजय पटवर्धन त्यांच्या क्रिकेटप्रेमाबद्दल बोलणार आहेत. तसेच टीव्हीवरील अजून एक लोकप्रिय चेहरा म्हणजे नम्रता वागळे त्यांच्या क्रिकेटच्या आठवणी उलगडत आहेत. 

ऑस्ट्रेलियन महिलांचा संघ क्रिकेट जगतात एक प्रबळ संघ मानला जातो. त्यामागे काय कारणं आहेत, ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट इतर संघांपेक्षा वेगळं का आहे, ह्याचा आढावा घेतला आहे ऍडलेड, ऑस्ट्रेलिया  येथून मिलिंद गावडे ह्यांनी. ह्या अंकात असलेला अजून एक वेगळा लेख लिहिला आहे प्रसिद्ध मानवाधिकार तज्ज्ञ आणि वकील ऍड. असीम सरोदे ह्यांनी. त्याचबरोबर महाराष्ट्रातील एका छोट्या पण प्रसिद्ध गावात भरवल्या जाणाऱ्या एका विशेष स्पर्धेविषयी देखील रसिकांना ह्या अंकात वाचायला मिळेल. एकूणच ह्या अंकात अनेकविध लेखांचा समावेश असेल. क्रिकेटच्या विविध अंगांचा विचार करून हे लेख लिहिले आहेत, त्याचबरोबर क्रिकेट विषयक मनोरंजन आणि माहिती दोन्ही गोष्टी विचारपूर्वक रसिकांसमोर ठेवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न  आहे. 

दिवाळी हा आपला प्रमुख सण. दिवाळी जशी फटाक्यांची, फराळाची, एकमेकांना प्रेमाने भेटण्याची.. तसेच दिवाळी चांगल्या विचारांची आणि सकारात्मक ऊर्जेची देखील असावी. क्रिकेट हा आपला लाडका खेळ नक्कीच ती ऊर्जा निर्माण करतो. तीच ऊर्जा आपल्या मायबोलीत, माय मराठी मध्ये रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न. आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा मिळत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना. 

२०२२ ची दिवाळी आपल्या सर्वांना आनंदाची, सुखाची आणि क्रिकेटमय जावो !! 

धन्यवाद 

– कौस्तुभ चाटे 

संपादक, CRICकथा 

To know more about Crickatha