ball

हैदराबादी बिर्याणीचा तडका 

by कौस्तुभ चाटे

हैदराबादने आपल्याला अनेक अप्रतिम क्रिकेटपटू दिले आहेत. गेल्या ५०-६० वर्षातील खेळाडूंवर नजर टाकली तर अबिद अली, अब्बास अली बेग, एम एल जयसिम्हा, मोहम्मद अझहरुद्दीन, व्ही व्ही एस लक्ष्मण, अंबाती रायुडू किंवा हनुमा विहारी सारखी नावं सहज घेता येतील. प्रामुख्याने हे सगळे फलंदाज. अगदी गोलंदाजांची गणना करायची झाली तरी अर्शद अयुब, वेंकटपथी राजू किंवा प्रग्यान ओझा असे मंदगती गोलंदाज सुद्धा आठवतील. (हैद्राबादचाच नोएल डेव्हिड आठवतोय का?) पण वेगवान गोलंदाजांच्या बाबतीत हैद्राबादचं नाव पटकन कोणी घेतलं नसतं. आज मोहम्मद सिराजने ती उणीव देखील भरून काढली. गेल्या काही वर्षांत भारतीय वेगवान गोलंदाजांची एकप्रकारची दहशत निर्माण झाली आहे, त्यामध्ये बुमराह आणि शमी पाठोपाठ सिराजचं देखील नाव घेता येईल. कालच्या आशिया कपच्या अंतिम सामन्यानंतर तर सिराजचं नाव सुवर्णअक्षरांनी लिहायला हवं आहे. 


कालचा दिवस सिराजचा होता. ७ षटकात २१ धावा देऊन ६ बळी. एकाच षटकात चार बळी. केवळ १६ चेंडूंमध्ये श्रीलंकेचा संघ मुळापासून उखडला…. महर्षी व्यासांनी हे क्रिकेटचं महाभारत लिहायला घेतलं असतं तरी इतकं परफेक्ट लिहिलं नसतं. काळ सिराजच्या गोलंदाजीला बिर्याणीचा तिखटपणा होता, ती सुद्धा साधी सुधी बिर्याणी नाही, तर स्पेशल हैद्राबादी तडका बिर्याणी. कोणीही गोलंदाज स्वप्नात सुद्धा विचार करू शकणार नाही अशी ती गोलंदाजी होती. त्या षटकात सिराजने श्रीलंकेची वरची फळी अक्षरशः कापून काढली. खरं तर सलग चार चेंडूंवर चार बळी मिळायचे, पण एक चौकार गेलाच मध्ये. चालायचंच, चंद्रावर सुद्धा डाग असतोच की. निसंका, समरविक्रमा, असलंका आणि डिसिल्व्हा… श्रीलंकेचे चार फलंदाज माघारी परतले, पाठोपाठ पुढच्या दोन षटकात कप्तान दसून शनका आणि मेंडिस देखील. या ७ षटकातच सिराजच्या आशिया कप खिशात घातला होता. भारतीय गोलंदाजांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये काही भन्नाट स्पेल्स टाकले आहेत. सिराजच्या या स्पेलची गणना पहिल्या क्रमांकावर असेल यात काही वाद नाही. सिराजच्या त्या स्पेल्स मधले २ त्रिफळाचित (बोल्ड्स) – शनका आणि कुशल मेंडिस, आणि धनंजय डिसिल्वाला टाकलेला चेंडू तर दृष्ट काढण्याजोगे होते. 

या सामन्यात भारताने अवघ्या ५० धावांवर श्रीलंकेला बाद केलं. सिराजच्या ६ बळी मिळवलेच, पण हार्दिकने ३ आणि बुमराहने १ बळी मिळवताना आपले हात देखील धुवून घेतले. हार्दिकने आपल्या कोट्याच्या १० ओव्हर्स टाकणे किती महत्वाचे आहे हे आता आपल्या लक्षात येईल. सिराजमुळे झालेली ती पडझड श्रीलंकेला सावरूच शकली नाही. त्यांचा कोणताही फलंदाज क्रिझवर टिकण्याच्या मूडमध्ये नव्हता. त्यातच भारतीय गोलंदाजांच्या लाईन आणि लेंग्थ मध्ये हे फलंदाज अडकत होते. श्रीलंकेचा संपूर्ण संघ केवळ १५ षटकात सर्वबाद होणं ही खरं म्हणजे नामूष्कीच आहे. आनंदाची गोष्ट ही की अवघ्या १५-१७ दिवसांवरच विश्वचषक आला असताना भारतीय संघ एक एक बॉक्स टिक करायला लागला आहे. पाकिस्तानच्या सामन्यानंतर आपण ज्या पद्धतीने कात टाकली आहे त्याला तोड नाही. हो मधेच बांगलादेशच्या सामन्यासारखा एखादा स्पीड ब्रेकर येतो, पण प्रवासात असा स्पीड ब्रेकर देखील आवश्यक असतोच. 

श्रीलंकेला इतक्या स्वस्तात बाद केल्यानंतर आपला विजय होणारच होता, पण आपल्या तरुण तडफदार फलंदाजांनी तो विजय देखील अगदी सहज मिळवला. केवळ ६.१ षटकात भारताने ही माफक धावसंख्या ओलांडली, आणि ते करताना आपला एकही बळी जाणार नाही याची देखील काळजी घेतली. क्रिकेटच्या भाषेत अशा विजयला ‘क्लिनिकल’ म्हणतात. ईशान किशन आणि शुभमन गिल या दोघांनीही थंड डोक्याने विजय मिळवून दिला. इतक्या सहजपणे विजय मिळवणे आपल्यासाठी तशी अवघड गोष्ट आहे, पण ती देखील आता सध्या होताना दिसते आहे. हा आशिया कप आपल्यासाठी खरंच वरदान ठरला आहे. संघातील बहुतेक फलंदाजांनी चांगल्या धावा केल्या आहेत. रोहित, विराट, गिल, राहुल, ईशान आणि हार्दिक … सगळेच कुठे ना कुठे चमकले आहेत. तीच गत गोलंदाजांची. बुमराह अनेक महिन्यानंतर मैदानावर परतला तरी बळी घेण्याची त्याची भूक अजूनही शाबूत आहे. तिकडे कुलदीपने आपल्या फिरकी गोलंदाजीवर बळी मिळवले, तर शार्दूल किंवा शमी देखील चांगली गोलंदाजी करताना दिसले. हार्दिक आणि जडेजा गोलंदाज म्हणून देखील समर्थपणे उभे राहताना दिसत आहेत. आणि कालच्या सामन्यात सिराजने तर कमाल केली आहे. 

आशिया चषकासाठी आपला संघ जाहीर झाला तेंव्हा बरेच प्रश्न होते. अर्थातच काही खेळाडूंच्या निवडीवरून, काही खेळाडूंच्या फॉर्म वरून आणि काही खेळाडूंच्या दुखापतींमुळे. आता विश्वचषक स्पर्धा केवळ १७ दिवसांवर आली असताना यातील काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळाली असतील अशी आशा आहे. बहुतेक खेळाडूंनी या स्पर्धेत चांगला खेळ केला आहे. विश्वचषक स्पर्धेच्या आधी आपण ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ सामन्यांची एक मालिका खेळू, ती आपल्यासाठी पूर्वपरीक्षा असेल. पण आता आपलं लक्ष मात्र ५ ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या महत्वाच्या परीक्षेकडे आहे. १२ वर्षांपूर्वी धोनीच्या संघाने आपल्याला विश्वविजयी बनवले होते, आता अपेक्षा आहे रोहित आणि मंडळी त्या कामगिरीची पुनरावृत्ती करतील. आशिया कप नावाचा एक पेपर आपण सहज सोडवला आहे, अंतिम परीक्षेत काय होते ते बघणे महत्वाचे.  

To know more about Crickatha