ball

२०२२ चा ताळे बंद

by कौस्तुभ चाटे

२०२२ हे वर्ष संपलं. खरं सांगायचं तर हे वर्ष भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने फार काही चांगलं गेलं असं म्हणता येणार नाही. ह्या वर्षात भारतीय क्रिकेटने बरेच चढ उतार बघितले, अर्थात त्यामध्ये उतारच जास्त होते. क्रिकेटच्या तीनही फॉरमॅट्स मध्ये भारतीय संघाने फार काही चांगली कामगिरी केली असे म्हणता येणार नाही. भारतीय संघाने तीनही फॉरमॅट्स मध्ये अनेक वेगवेगळे बदल केले, अनेक नवनवीन गोष्टी तपासून बघितल्या, बरेच कॅप्टन्स बदलून बघितले पण पाहिजे तितकं आणि पाहिजे तसं यश हाती लागलं असं काही म्हणता येणार नाही. दक्षिण आफ्रिका (२ कसोटी) आणि इंग्लंड मधील एकमेव कसोटी हारून देखील आपण अजूनही २०२३ मधल्या टेस्ट चॅम्पियनशीपसाठी पात्र ठरू बघतो आहोत हीच काय ती आनंदाची गोष्ट. अर्थात ह्या मध्ये आपल्या चांगल्या खेळापेक्षा इतर संघांचे वाईट खेळणे जास्त कारणीभूत आहे. ह्या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये आपण विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि के एल राहुल असे तीन कर्णधार बघितले, पण यश नावाची गोष्ट अजूनही थोडी लांबच आहे. आपल्या प्रमुख खेळाडूंचे अपयश ही देखील ह्या वर्षातील महत्वाची गोष्ट. विराट, रोहित, राहूल किंवा बुमराह सारखे खेळाडू ह्या वर्षी पाहिजे तितके चमकले नाहीत. त्यात रोहित, राहूल, बुमराह सारखे खेळाडू बराच काळ दुखापतीने ग्रस्त होते. २०२२ च्या वर्षात फारसे एकदिवसीय सामने खेळले गेले नाहीत. तुलनेने हे वर्ष टी२० क्रिकेटचे होते. ह्या वर्षात टी२० क्रिकेट आशिया चषक आणि विश्वचषक अश्या दोन प्रमुख स्पर्धा खेळवल्या गेल्या. त्यामुळे टी२० क्रिकेट जास्त खेळवलं गेलं. भारतीय संघाला ह्याही फॉरमॅटमध्ये फार काही यश मिळालं असं म्हणता येणार नाही. आशिया कप स्पर्धेत सेमी फायनल मध्ये पाकिस्तानकडून मात, आणि विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड संघाने उडवलेला धुव्वा, ह्या कारणाने आपण दोन्ही स्पर्धांमधून बाहेर पडलो. 

मग ह्या वर्षात चांगल्या गोष्टी काहीच घडल्या नाहीत का? नाही, काही चांगल्या गोष्टी नक्की घडल्या. गेल्या काही वर्षांमधील बेंच स्ट्रेंग्थ लक्षात घेता, आता आपल्याकडे उत्तमोत्तम खेळाडूंची फळी तयार झाली आहे. तीनही फॉरमॅट्स मध्ये आपण आता काही चांगले खेळाडू खेळवू शकतो. शुभमन गिल, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन सारख्या भारतीय खेळाडूंनी हे वर्ष निश्चित गाजवलं. प्रसंगी रवीचंद्रन अश्विन, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल हे खेळाडू देखील चमकून गेले. सूर्यकुमार यादव हा ह्या वर्षात गवसलेला हिरा म्हटला पाहिजे. खरं तर तो आधीपासूनच चमकतो आहे, पण त्याचे पैलू ह्या वर्षी आपल्याला पहिल्यांदा दिसले. खुद्द ए बी डिव्हिलियर्स बरोबर त्याची तुलना होते आहे. खेळाच्या छोट्या फॉरमॅट मध्ये, टी२० मध्ये तो जास्तच झळाळतो आहे. विश्वचषक स्पर्धेतील त्याच्या खेळी क्रिकेट रसिकांच्या कायम लक्षात राहतील. अश्विनने देखील योग्य प्रसंगी चांगला खेळ करून आपल्याला विजय मिळवून दिला. विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध हुशारीमुळे आणि नुकत्याच झालेल्या बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याच्या चिवटपणामुळे तो चमकून गेला. हार्दिक पंड्या आता नवीन कॅप्टन होऊ पाहतो आहे. आयपीएल मध्ये गुजरात टायटन्सची धुरा सांभाळताना त्याने संघाला पहिल्याच सीझनमध्ये विजेतेपद मिळवून दिले. त्याच जोरावर आता तो भारतीय जबाबदारी घेऊ शकेल अशी आशा आहे. 

संघातील इतर प्रमुख खेळाडू मात्र तुलनेने फारसे चमकले नाहीत. रोहितचे फलंदाज आणि कर्णधार म्हणून देखील अपयश जास्तच खटकले. ह्या वर्षी त्याच्या खेळापेक्षा दुखापतीचीच चर्चा जास्त झाली. विराट देखील गेली २-३ वर्षे फॉर्मशी झगडतो आहे. त्याचा परिणाम त्याच्या कॅप्टनसीवर झाला. ह्या वर्षात त्याचीही कामगिरी फारशी चांगली झाली नाही. आशिया कप मध्ये जवळजवळ तीन वर्षांनी झळकावले अर्धशतक आणि विश्वचषकात मोक्याच्या वेळी अप्रतिम खेळी करून पाकिस्तानविरुद्ध मिळवून दिलेला विजय ह्या विराटच्या जमेच्या बाजू. अर्थात पाकिस्तान विरुद्धची त्याची ती खेळी लाखात एक होती. पण संपूर्ण वर्षभर त्याची बॅट पाहिजे तशी तळपली नाही. के एल राहूल आणि ऋषभ पंत ह्यांच्यासाठी देखील हे वर्ष यथातथाच होते. दोघांनीही भारतीय संघाचे नेतृत्व केले, पण त्यांची एकूण कामगिरी नावाला साजेशी नव्हती हे नक्की. त्यांच्या नशिबी क्रिकेट रसिकांकडून दूषणेच जास्त होती. चेतेश्वर पुजारा कसोटीमध्ये फारसा चमकला नसला तरी इंग्लिश काउंटी मध्ये मात्र त्याने बहारदार कामगिरी केली. गोलंदाजी विभागात भुवनेश्वर कुमारचे अपयश प्रामुख्याने दिसले, तर बुमराह आणि रवींद्र जडेजाची दुखापत देखील पूर्ण वर्षभर चर्चेत राहिली. 

आयपीएल मध्ये गुजरातच्या संघाने विजेतेपद मिळवले. आयपीएलच्या भट्टीतून निघालेली अनेक रत्ने भारतीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करताना दिसतात. ईशान किशनच्या द्विशतकी खेळीने ह्या वर्षीच्या शेवटी धमाका केला. कोरोना काळात न झालेली रणजी ट्रॉफी स्पर्धा ह्या वर्षी खेळवली गेली. मध्यप्रदेशने मुंबईला हरवून ह्या वर्षी रणजी ट्रॉफी जिंकली. त्याप्रसंगी मध्यप्रदेशचा जल्लोष क्रिकेट जगताने बघितला. महत्वाची गोष्ट म्हणजे मध्यप्रदेश आणि मुंबई ह्या दोन्ही संघांचे प्रशिक्षक – चंद्रकांत पंडित आणि अमोल मुजुमदार, हे रमाकांत आचरेकर सरांचे शिष्य. नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये काही महत्वाच्या खेळी खेळल्या गेल्या. तामिळनाडूच्या जगदीशनने ह्याच स्पर्धेत केलेली २७७ ची खेळी लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी ठरली, तर ऋतुराज गायकवाडने एका षटकात सात षटकार मारून विक्रम केला. विजय हजारे ट्रॉफीनंतर आता रणजी स्पर्धा होत आहे. ह्या वर्षी आता ही स्पर्धा नेहेमीसारखी पूर्ण स्पर्धा असेल. (कोविड काळात कमी सामने खेळले गेले, तसे ह्या वर्षी नसेल.)  

एकूणच २०२२ हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी एक ‘मिक्स बॅग’ होतं. खूप काही गोष्टी भारतीय संघाच्या दृष्टीने चांगल्या झाल्या नाहीत, भारतीय खेळाडूंची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. २०२३ ह्या वर्षात भारतीय संघासाठी एक आव्हान असेल. ह्या वर्षी भारतीय संघ नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करो अशीच भारतीय क्रिकेट रसिकांची अपेक्षा असेल.

To know more about Crickatha