ball

अखेर निवड झालीच 

by कौस्तुभ चाटे

२०२३ चा क्रिकेट विश्वचषक अवघ्या एक  महिन्यावर आला असताना मागच्या आठवड्यात भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीने १५ सदस्यीय संघाची घोषणा करताना आशिया कप साठी निवडलेला संघच कायम ठेवला. रोहित शर्मा संघाचा कर्णधार असेल आणि हार्दिक पांड्या उपकर्णधार. अर्थातच या संघात काही ‘सरप्राइजेस’ नाही बघायला मिळाले. बहुतेक खेळाडूंची निवड यथायोग्य होती, पण काही महत्वाच्या जागांसाठी कोणते खेळाडू निवडणार याकडे बहुतेकांचे लक्ष होतेच. १२ वर्षानंतर या विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे. २०११ मध्ये झालेली स्पर्धा आपण जिंकलो होतो. त्यानंतर २०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी वगळता एकही आयसीसी स्पर्धेत आपल्याला यश मिळालेले नाही. क्रिकेटच्या तीनही फॉरमॅट्स मध्ये आयसीसी स्पर्धेत आपण कायम उपांत्य किंवा अंतिम फेरीत जाऊन हरतो आहोत. कदाचित त्यामुळेच या विश्वचषक स्पर्धेकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष आहे. ही घरच्या मैदानावर होणारी स्पर्धा आपण जिंकावी अशीच भारतीय रसिकांची इच्छा आहे. 


निवडलेल्या संघाचा विचार करता कागदावर हा संघ नक्कीच तुल्यबळ वाटतो. पण तसेही कोणत्याही महत्वाच्या स्पर्धेतील भारतीय संघ कागदावर नेहेमीच तुल्यबळ असतो. आपल्या फलंदाजीचा विचार करता संघात रोहित, विराट, शुभमन गील , श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव सारखे दर्जेदार फलंदाज आहेत. पण सध्या बहुतेकांच्या बॅट्स त्यांच्यावर रुसल्या आहेत. फॉर्मात असलेला आणि सलग गोलंदाजांची पिसं काढणारा रोहित, किंवा सरळ बॅटने मैदानाच्या चारही कोपऱ्यात चेंडू भिरकावून देणारा विराट बघून आता किती महिने झाले हे आठवावेच लागेल. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर दोघेही पूर्वपुण्याईवर संघात आहेत असं म्हणता येईल. परवा पाकिस्तानविरुद्ध दोघेही ज्या पद्धतीने बाद झाले ते बघता विश्वचषक स्पर्धेत अनेक दर्जेदार गोलंदाजांचा सामना ते कसा करतील हा प्रश्न पडला आहे. आज दोघेही वयाच्या पस्तिशीत आहेत, अशावेळी खरं तर याआधीच दोघांनीही आपल्या फॉर्मकडे बघता आपली जागा रिकामी करायला हवी होती का? शुभमन गील आयपीएल पर्यंत प्रचंड फॉर्म मध्ये होता, पण टेस्ट चॅम्पियनशीप नंतर मात्र त्याची बॅट बोलेनाशी झाली आहे. हा खरोखर गुणवान फलंदाज आहे, पण पाठीशी धावा नसतील तर खेळाडूची निवड व्यर्थच ठरते ना. श्रेयस अय्यर देखील गेले अनेक महिने दुखापतग्रस्त आहे. आशिया कप मध्ये त्याने संघात पुनरागमन केले खरे, पण ९ चेंडूच्या एका खेळीनंतर त्याने विश्वचषक संघात येणे कुठेतरी खटकते. सूर्यकुमार यादवची देखील तीच तऱ्हा. तो टी-२० सामन्यात खोऱ्याने धावा काढतो आहे, पण एकदिवसीय सामन्यात मात्र त्याची बॅट रुसते. अशावेळी त्याच्याऐवजी दुसरा फलंदाज येऊ शकला असता का? 

आपल्याकडे के एल राहूल आणि ईशान किशन असे दोन यष्टीरक्षक फलंदाज आहेत. अर्थातच राहूलला आपण मारून मुटकून यष्टीरक्षक केलं आहे. तो देखील दुखापतीमधून सावरतो आहे. अशावेळी त्याची कोणत्याही प्रकारे फिटनेस टेस्ट न घेता, कमबॅक नंतरचा फॉर्म न बघता त्याला संघात स्थान मिळाले आहे. राहूल आणि श्रेयस गेले अनेक महिने कोणत्याही स्पर्धात्मक क्रिकेटपासून लांब आहेत. अशावेळी त्यांना लगेचच संघात स्थान मिळणे हा इतर अनेक क्रिकेटपटूंचा अपमान नाहीये का? दुसरीकडे ईशान किशन मात्र चांगल्या पद्धतीने धावा करतो आहे. सलामीला असो अथवा मधल्या फळीत, तो आपली भूमिका नक्कीच पार पाडतो. तो डावखुरा असल्याचा थोडा फायदा मिळतो हेही नसे थोडके. अर्थात त्याला आपल्या यष्टिरक्षणावर काम करणे आवश्यक आहे. पण कोणत्याही अंतिम संघात निवड होताना कर्णधार आणि उपकर्णधार यानंतर त्याची निवड होणे सार्थ वाटते. 

१९८३ किंवा २०११ चा विश्वचषक जिंकताना आपल्या संघात अनेक अष्टपैलू खेळाडू होते. कपिल किंवा युवराज भोवती आपण आपले डावपेच रचू शकत होतो. या विश्वचषक स्पर्धेत आपल्याकडे हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि शार्दूल ठाकूर सारखे अष्टपैलू खेळाडू आहेत. पैकी कोणत्या खेळाडू भोवती आपण आपली व्यूहरचना करणार आहोत? हार्दिक पांड्याने काही चांगल्या खेळी केल्या असल्या तरी त्याची तुलना कपिल देव बरोबर किंवा अक्षर पटेलची तुलना युवराज बरोबर नाही होऊ शकत. शार्दूल ठाकूर कधीतरी दोन-चार फटके मारतो, पण म्हणून त्याला ऑलराऊंडर म्हणणं म्हणजे नेपाळच्या क्रिकेट संघाला आशिया कपचा विजेता म्हणण्यासारखं आहे. रवींद्र जडेजा हा मात्र खऱ्या अर्थाने ऑलराऊंडर आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर तो प्रभावी गोलंदाज ठरेल, मैदानावर तो २०-२५ धावा अडवेल आणि गरजेच्या वेळी तो चांगली फलंदाजी देखील करेल याची खात्री वाटते. जडेजा आणि चालला तर हार्दिक यांच्या जोरावर आपण ‘अष्टपैलू’ विभागाचा कोटा पूर्ण करतो आहोत. इथे अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अक्षर पटेलची निवड. जडेजा संघात असताना परत त्याच पठडीतला गोलंदाज संघात असणे चुकीचे वाटते. आपण संघात आपल्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजाला स्थान देत नाही, किंबहुना त्याचा विचार देखील करत नाही याचे नवल वाटते. इतर संघांमध्ये अनेक डावखुरे चांगले फलंदाज असताना आपल्या संघात रविचंद्रन अश्विन नसावा हे आपले वैचारिक दारिद्रय म्हणावे का? अश्विन किंवा युझवेन्द्र चहलची निवड होणे आवश्यक होते. पण निवड समितीने या दोन उत्तम फिरकी गोलंदाजांना डावलून – तेही एक ऑफस्पिनर आणि दुसरा चांगला लेगस्पिनर, जडेजा-अक्षर-कुलदीप या तीन डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांना स्थान दिले आहे. 

वेगवान गोलंदाजी विभागात बुमराहचे पुनरागमन आशादायक आहे. त्याने काही सामने खेळून आपला फिटनेस देखील सिद्ध केला आहे. दुसरीकडे शमी आणि सिराज यांनी देखील आपली निवड सार्थ ठरवली आहे. हे तिघेही फॉर्मात असतील तर प्रतिस्पर्धी संघ हतबल होतो हे आपण बघितले आहे. पण एखाद्या दिवशी विश्वविजेत्या संघाला धूळ चारणारे आपले गोलंदाज नंतरच्या सामन्यात अगदी सामान्य संघापुढे हात टेकतात हे देखील आपल्याला ठाऊक आहे. किंबहुना तो आपला इतिहास आहे असे म्हटले तरी चालेल. परवा नेपाळ विरुद्धच्या सामन्यात देखील आपण हे अनुभवले आहे. अजून एक विशेष गोष्ट म्हणजे आपल्या संघात एकही डावखुरा वेगवान गोलंदाज नाही. खरे तर झहीर खान नंतर आपण असा कोणी गोलंदाज तयार केलाच नाही. आज जागतिक क्रिकेटमध्ये ट्रेंट बोल्ट, मिशेल स्टार्क, सॅम करन, शाहीन आफ्रिदी, मुस्ताफिझूर रहमान सारखे डावरे वेगवान गोलंदाज धुमाकूळ घालत असताना आपण मात्र त्यांना चटणी कोशिंबिरी इतके देखील स्थान देत नाही. 
एकूणच या १५ खेळाडूंचा संघ आताच्या घडीला कागदी वाघ वाटतो. या वाघांनी चांगला खेळ केला तर ठीक आहे, अन्यथा परत एकदा आपण या स्पर्धेतून लवकर बाहेर पडू. गेले तीन विश्वचषक आपण निदान उपांत्य फेरीत पोहोचतो आहोत, यावर्षी तेच ध्येय ठरवून आपल्याला पुढे जावे लागेल. मार्ग कठीण आहे, पण आपले १५ शिलेदार तोपर्यंत तयार होतील अशी आशा करूया. 

To know more about Crickatha