ball

वानखेडे स्टेडियम – आठवणींचा कोलाज (दैनिक केसरी, पुणे)

by कौस्तुभ चाटे

तारीख होती २३ जानेवारी १९७५, वार गुरुवार. त्यादिवशी भारतीय क्रिकेट इतिहासात एक इतिहास रचला जात होता. भारतीय क्रिकेटच्या पंढरीत, मुंबईतील एका नवीन स्टेडियम मध्ये पहिलाच कसोटी सामना खेळला जात होता. याआधी मुंबईत कसोटी सामने झाले नव्हते असं नाही पण त्या सामन्याला एक वेगळंच महत्व होतं. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (त्यावेळेचं बॉम्बे क्रिकेट असोसिएशन) स्वतःच्या मैदानावर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा कसोटी सामना रंगणार होता. शेषरावजी वानखेडे आणि त्यांच्या टीमच्या मदतीने अगदी रेकॉर्ड कालावधीत तयार झालेल्या या मैदानाला वानखेडेंचंच नाव दिलं गेलं होतं. मुंबईचं हे वानखेडे स्टेडियम काही काळातच केवळ मुंबई नाही तर भारतीय क्रिकेटवर आपला ठसा उमटवेल अशी अपेक्षा सुद्धा त्यावेळी कोणी केली नसेल. १९७५ च्या आधी मुंबईतील सामने प्रामुख्याने क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (CCI) ‘ब्रेबॉर्न स्टेडियम’ वर होत. पण काही कारणाने CCI आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन यांच्यामध्ये खटके उडाले, आणि त्यातूनच पुढे जन्म झाला ‘वानखेडे स्टेडियम’चा.  या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला गेला तो भारत आणि वेस्ट इंडिज संघामध्ये. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कप्तान होता क्लाइव्ह लॉइड आणि भारताचा कप्तान होता मन्सूर अली खान पतौडी (हा त्याचा शेवटचा कसोटी सामना होता.) 


खऱ्या अर्थाने वानखेडे स्टेडियम म्हणजे भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनाचा हळवा कोपरा आहे. जे स्थान इंग्लंडमध्ये लॉर्ड्सचं, ऑस्ट्रेलियात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडचं तेच भारतात वानखेडे स्टेडियमचं. या मैदानाने भारतीयांच्या भावनांना अनेकदा हात घातला आहे. १९७८/७९ मध्ये सुनील गावसकरने वेस्टइंडीज विरुद्ध केलेलं द्विशतक (२०५ धावा) अजूनही क्रिकेट रसिकांच्या स्मरणात आहे. त्याच सामन्यात वेस्टइंडीजच्या अल्विन कालिचरणने देखील एक झुंजार शतक झळकावले होते. त्यानंतर १९७९-८० मध्ये भारताने पाकिस्तानवर मिळवलेला दिमाखदार विजय, पुढच्याच वर्षी इंग्लंडच्या इयान बोथमने केलेली शतकी खेळी आणि घेतलेले १३ बळी ह्यांची देखील चर्चा होत असते. रणजी ट्रॉफी सामन्यात रवी शास्त्रीने एकाच षटकात लागवलेले ६ षटकार देखील याच मैदानावर. (ही कामगिरी करणारा शास्त्री हा दुसरा फलंदाज ठरला.) सचिनने मुंबईसाठी केलेले पदार्पण, त्याचा रणजी ट्रॉफीचा पहिला सामना, आणि त्या सामन्यात झळकावले शतक देखील याच मैदानावर. पुढे १९९१ चा वानखेडे वरील रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खऱ्या अर्थाने गाजला. मुंबई विरुद्ध हरियाणा या सामन्यात हरियाणाने केवळ २ धावांनी विजय मिळवला. हा सामना देखील दीर्घकाळ लक्षात राहणारा आहे. १९९३ मध्ये भारताने इंग्लंडवर आणि १९९४ मध्ये वेस्टइंडीजवर अगदी सहजगत्या मिळवलेले विजय देखील लक्षात राहणारे. या इंग्लंड विरुध्दच्याच सामन्यात विनोद कांबळीने द्विशतकी खेळी केली होती. याच मैदानावर २००२ मध्ये  इंग्लंडच्या अँड्र्यू फ्लिन्टॉफने विजयानंतर केलेला उन्माद आपण सगळ्यांनीच बघितला (आणि गांगुलीने पुढे काही महिन्यातच लॉर्ड्सवर त्याची परतफेड केली ती देखील आपण अनुभवली आहे.) आत्ता आत्ता, काही वर्षांपूर्वी इंग्लंड विरुद्ध विराटने केलेल्या २३५ धावा त्याच्या सर्वोत्कृष्ट खेळींपैकी एक म्हणता येतील. इतकंच नाही, तर न्यूझीलंडच्या एजाज पटेलने कसोटी सामन्यात एका डावात १० बळी घेण्याचा केलेला पराक्रम देखील वानखेडेने बघितला आहे. अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेले हे मैदान खरोखर भारतीयांच्या क्रिकेटच्या आठवणींचा खजिना आहे. 

पण खऱ्या अर्थाने या मैदानावर घडलेल्या दोन सर्वात मोठ्या घडामोडी म्हणजे भारताने २०११ चा जिंकलेला विश्वचषक आणि सचिन तेंडुलकरचा शेवटचा कसोटी सामना. या दोन्ही घटना भारतीयांच्या मनावर कोरल्या आहेत, कायम राहतील. २ एप्रिल २०११ ती संध्याकाळ, भारत विरुद्ध श्रीलंका सामना, तो प्रेक्षकांचा जल्लोष, गौतम गंभीरची झुंजार खेळी आणि शेवटी कर्णधार धोनीचा तडका लागवणारा हेलिकॉप्टर शॉट, तो षटकार आणि भारताचा विजय. सगळंच अभूतपूर्व. जवळजवळ १२ वर्षे झाली तरीही ती संध्याकाळ आपल्या मनात घर करून आहे. त्या दिवशी वानखेडे स्टेडियम वरील त्या विजयाने संपूर्ण देशाला एकत्र आणले होते.

पुढे दोन वर्षातच सचिनने निवृत्तीचा निर्णय घेतला. त्याचा २०० वा आणि शेवटचा कसोटी सामना त्याच्याच होम ग्राउंडवर – वानखेडेवर होणार होता. संपूर्ण स्टेडियम सचिनमय झालं होतं, आणि सगळ्या देशाच्या नजर खिळून होत्या त्या वानखेडे स्टेडियमवर. सचिनची ती शेवटची खेळी, सामना संपल्यानंतर आपल्या संघाने त्याला दिलेला ‘गार्ड ऑफ ऑनर’, त्याचं ते प्रसिद्ध आणि काळजाला हात घालणारं भाषण आणि सर्वात शेवटी मैदानातून बाहेर पडताना सचिनने वानखेडेच्या पीचला वाकून केलेला नमस्कार. सचिन त्याच्या कृतीतून बरंच काही बोलून गेला. एका महान खेळाडूने त्याच्या कर्मभूमीला, त्याच्या मैदानाला मनापासून दिलेली ती मानवंदना विसरणे कधीही शक्य नाही. 

वानखेडे स्टेडियमच्या बाबतीत अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्या स्टेडियमवर असलेले स्टँड्स. मुंबईच्या तीन महान क्रिकेटपटूंच्या नावाने असलेले ३ स्टँड्स तितकेच प्रसिद्ध आहेत. विजय मर्चंट, सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर स्टँड्सनी या मैदानाची शोभा अधिकच वाढवली आहे. आणि अर्थातच तो जगप्रसिद्ध ‘नॉर्थ स्टॅन्ड’. त्या नॉर्थ स्टॅन्ड मधून क्रिकेट सामना बघण्याची मजा काही औरच आहे, काळ बदलला तसं क्रिकेट देखील बदललं. आता दर वर्षी जत्रा भरावी त्या प्रमाणे आयपीएलचे सामने वानखेडेवर होतात. नवीन खेळाडू, नवीन प्रेक्षक तिथे येऊन टी-२० चा आनंद लुटतात. त्यात काहीच गैर नाही, ते क्रिकेट देखील तेवढंच दर्जेदार आहे. तरीही खरा मुंबईकर क्रिकेट रसिक वानखेडेवर वर्षात एकदा होणारा एखादा रणजी ट्रॉफीचा सामना, दोन-तीन वर्षातून होणार एखादा कसोटी सामना बघण्यासाठी आतुर असतो. गेल्या काही वर्षात भारतात अनेक नवनवीन टेस्ट सेंटर्स झाली आहेत, अनेक नवीन मैदाने होत आहेत. हा खेळ खऱ्या अर्थाने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे. पण वानखेडे स्टेडियमचं ग्लॅमर कधी कमी होईल असं वाटत नाही.

वानखेडे स्टेडियम म्हटलं की एकीकडे मरीन लाईन्सचा तो झगमगाट आणि त्यापलीकडे तो अथांग सागर दिसतो. दुसऱ्या बाजूला मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वेचं जाळ दिसतं आणि सामन्याच्या वेळी मैदानाकडे धावत असलेला क्रिकेटवेडा दिसतो. वानखेडे स्टेडियम म्हटलं की त्या पहिल्याच कसोटी सामन्याच्या वेळी झालेली दंगल आठवते. वानखेडे म्हटलं २०११ च्या विश्वचषक अंतिम सामन्यात सचिन आणि सेहवाग बाद झाल्यानंतरची नीरव शांतता आठवते, आणि त्याच सामन्याचा शेवट देखील समोर येतो. नुवान कुलसेकराचा तो चेंडू महेंद्रसिंग धोनी टोलवताना दिसतो, आणि रवी शास्त्रीचा आवाज कानात ऐकू येतो. ” Dhoni hits the sixer, and India wins….” 

वानखेडे स्टेडियम म्हटलं की आठवणी जाग्या होतात आणि क्रिकेट रसिक अजूनच या मैदानाच्या प्रेमात पडतो. 

To know more about Crickatha