ball

सूर्य तळपतोय

by कौस्तुभ चाटे

“अरे काय खेळतोय हा सूर्या, काय तुफान हाणतो यार तो.” आज सकाळी एका मित्राचा फोन आला होता. सूर्यकुमार यादवच्या राजकोटच्या खेळीवर स्वारी प्रचंड फिदा होती. “अरे हा खरोखर एबी डिव्हिलियर्स आहे रे. त्याचे शॉट्स बघ, कुठूनही ३६० अंशात फटके मारतोय.” सूर्यकुमार यादवचं कौतुक काही थांबत नव्हतं. खरं सांगायचं तर अशीच काहीशी भावना माझी पण झाली होती. पण ही भावना फक्त एका मॅचपूरती नव्हती, तर गेले काही महिने हा सूर्या जे खेळतो आहे त्या बद्दल होती. सूर्यकुमार यादव ह्या नावाभोवती आता एक वलय आहे. मुंबई, पश्चिम विभाग, इंडिया ए,  कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स आणि आता टीम इंडिया साठी खेळणारा सूर्या क्रिकेट रसिकांच्या गळ्यातला ताईत झाला आहे. त्याला बघून कोणाला एबीडी आठवतो, तर कोणाला त्याचा तो झोपून मारलेला हूक शॉट बघताना साक्षात रोहन कन्हायची आठवण होते. कदाचित ही खूप मोठी नावं असतील, पण आजच्या घडीला – गेले काही महिने, सूर्यकुमार यादव जे खेळतो आहे, त्याला काहीच तोड नाही. खेळाच्या छोट्या फॉरमॅट मध्ये, विशेषतः टी२० क्रिकेटमध्ये त्याची बॅट अक्षरशः तळपते आहे. ४५ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात १५०० पेक्षा जास्त धावा, तेही ४६ च्या सरासरीने, त्यात ३ शतकं आणि १३ अर्धशतकं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे १८० चा स्ट्राईक रेट. २ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या सूर्यासाठी हे आकडे खूप मोठे आहेत, जणू त्याच्या पराक्रमाची ग्वाही देणारे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सूर्या फलंदाजीला येतो ते २ किंवा ३ विकेट्स गेल्या नंतर. म्हणजे तो जास्तीत जास्त १२-१५ षटके फलंदाजी करतो, ह्याचा विचार केला तर हे आकडे अजूनच मोठे भासू लागतात. गेल्या सहा महिन्यात सूर्याने आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ३ शतके ठोकली आहेत (इंग्लन्ड विरुद्ध जुलै २०२२ मध्ये ११७, न्यूझीलंड विरुद्ध नोव्हेंबर २०२२ मध्ये १११ आणि परवा श्रीलंकेविरुद्ध ११२), आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन ३ शतके ठोकणारा तो एकमेव फलंदाज आहे.

सूर्यकुमार यादव आता ३२ वर्षांचा आहे. वयाच्या तिशीत त्याने टीम इंडिया मध्ये पाऊल ठेवलंय. मुंबई क्रिकेट मध्ये तो झळकायला लागला ते २०१० पासून. त्या १०-१२ वर्षात अनेक चढ उतार बघत त्याने मुंबई साठी अनेकदा चमकदार कामगिरी केली आहे. मुंबई ही क्रिकेटची खाण, आणि त्यातून मिळालेलं हे रत्न. ह्या सूर्याचा मुंबई पासून सुरु झालेला प्रवास जगाने बघितला आहे. नुकतंच सुरु झालेलं आयपीएल सूर्यकुमार यादव साठी जणू पर्वणीच ठरलं. आयपीएल मधला त्याचा प्रवास मुंबई-कोलकाता-मुंबई असा झाला आहे. ह्याच कालावधीत त्याच्या दोन्ही संघांनी आयपीएल स्पर्धा जिंकल्या, आणि त्यात सूर्याचा मोठा वाटा होता. मधल्या फळीतील चमकदार कामगिरी करणारा फलंदाज ही त्याची ओळख अजूनही कायम आहे. आयपीएल मुळेच कदाचित त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा सहवास लाभला. ह्या सर्वांबरोबर ड्रेससिंग रूम शेअर करणे हा देखील मस्त अनुभव असणार. सूर्याच्या पोतडीतून एक एक फटका बाहेर येत गेला आणि त्यावर छाप बसत गेली ती ए बी डिव्हिलियर्सची. आयपीएल मध्ये एक एका स्टारचे जणू कंपूच तयार झाले आहेत. कोणी धोनीचे फॅन्स आहेत, कोणी रोहितचे तर कोणी विराटचे. पण सर्वच क्रिकेट रसिक एबीडीचे मोठे पंखे आहेत. हा मनुष्य भारतीय नसला तरी भारतीय क्रिकेट रसिक त्यावर मनापासून प्रेम करतात. त्याच्या खेळाचे कौतुक करतात. सूर्यकुमार यादवची तुलना डिव्हिलियर्स बरोबर होणे, रसिकांना त्याच्या शॉट्स मध्ये एबीडीची झलक दिसणे हा सूर्याचा मोठा बहुमान आहे. आणि अर्थातच सूर्याला देखील त्यात आनंद वाटत असेल. 

सूर्याच्या समोर आता अनेक आव्हाने आहेत ह्यात काही शंका नाही. आता भारतीय क्रिकेट रसिकांची त्यांच्याकडून मोठी अपेक्षा आहे. जरी त्याच्या नावावर फक्त १५ एकदिवसीय आणि ४५ टी२० सामने असतील तरी देखील त्याच्याकडे संघाचा आधारस्तंभ म्हणून बघितले जात आहे. भारतीय संघाची मधली फळी आता ह्या पुढे सूर्याच्या खांद्यावर उभी असेल. आणि ही जबाबदारी खूप मोठी आहे. त्यात २०२३ हे वर्ष एकदिवसीय विश्वचषकाचं आहे, आणि तो विश्वचषक भारतात होणार आहे. अश्यावेळी हे जबाबदारीचं ओझं कैक पटीने वाढणार आहे. गेल्या काही वर्षात भारतीय संघाने आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही, आपण फलंदाजी विभागात अजूनही धडपडतो आहोत, अजूनही आपला कॅप्टन-कॅप्टन असा खेळ सुरु आहे, अनेक खेळाडूंच्या दुखापतींमुळे संघाची घडी थोडी बिघडली आहे… अश्या वेळी भारतीय क्रिकेट रसिकांना सूर्यकुमार यादवचा खरा आधार आहे. सूर्या उत्तम फलंदाज तर आहेच पण संघाची धुरा वाहून नेण्याची ताकद त्याच्याकडे नक्की आहे. तो एक अप्रतिम क्षेत्ररक्षक देखील आहे. त्यामुळे ह्या वर्षात त्याचं काम, त्याच्यावर असलेली जबाबदारी मोठी असेल. आता त्याचा समावेश कसोटी संघात देखील केला जावा अशी मागणी होते आहे. काही दिवसातच आपली ऑस्ट्रेलिया विरुद्धची कसोटी मालिका सुरु होईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात खेळायचं असेल तर भारताला ह्या मालिकेत विजय मिळवणे आवश्यक आहे. ह्या मालिकेत आणि जर अंतिम सामन्यात आपण प्रवेश केला तर त्या सामन्यात सूर्यकुमार यादव सारखा खेळाडू असणे आपल्या संघासाठी आवश्यक आहे कदाचित सूर्या ह्या मालिकेतील एक्स फॅक्टर ठरू शकेल. एकूणच त्याच्यासमोर असलेली आव्हाने आणि त्याची ती आव्हाने पेलून नेण्याची क्षमता लक्षात घेता, सूर्यकुमार यादव हा ह्या वर्षातील मोठा खेळाडू ठरणार आहे.  

गेल्या काही वर्षातील क्रिकेट मोठ्या प्रमाणावर बदललं आहे. एकूणच हे क्रिकेट खूपच वेगवान झालंय. आणि अश्यावेळी सूर्यकुमार यादव सारखा ३६० अंशात खेळणारा, आणि संघाच्या गरजेप्रमाणे स्वतःला बदलू शकणार फलंदाज भारतीय संघात असेल तर भारतीय क्रिकेट कडून ह्या वर्षात काही चांगल्या कामगिरीची अपेक्षा करता येईल. सूर्यकुमार यादव आता मोठा खेळाडू म्हणून ओळखला जातो, कदाचित २०२३ हे वर्ष त्याला एक लिजंड म्हणून घडवण्यात मोठं ठरू शकेल. हे घडावं अशी भारतीय क्रिकेट रसिकांची अपेक्षा आहे हे नक्की. 

To know more about Crickatha