ball

ना तुला ना मला… (दैनिक ऐक्य, सातारा)

by कौस्तुभ चाटे

अखेर तो सामना झाला. दोन्ही संघांनी चांगला खेळ केला, जिंकण्याची पराकाष्ठा केली, पण सामना मात्र अनिर्णित राहिला. प्रश्न सामना अनिर्णित राहिल्याचा नाही, क्रिकेटमध्ये अनेक सामन्यांचा निकाल नाही लागत. हा सामना अनिर्णित राहिल्याने गटातले दोन महत्वाचे संघ स्पर्धेबाहेर फेकले गेले. क्रिकेट रसिकांना मी कोणत्या सामन्याबद्दल बोलतो आहे ते लक्षात आले असेलच. ब्रेबॉर्न स्टेडियम वर खेळला गेलेला मुंबई विरुद्ध महाराष्ट्र हा सामना अनिर्णित राहिला, नव्हे पहिल्या डावात ‘टाय’ झाला, आणि दोन्ही संघांची पुढील फेरीत प्रवेश करण्याची शक्यता संपली. अचानक आंध्रप्रदेशच्या संघाला लॉटरी लागली आणि त्यांचा संघ पुढील फेरीत प्रवेश करता झाला. मुंबई आणि महाराष्ट्र दोन्ही संघांची अवस्था बघता एवढंच म्हणावसं वाटतं  … ‘ ना तुला ना मला…’ 


रणजी ट्रॉफी स्पर्धेत ‘ब’ गटात काय चुरस होती हे आपण बघितलंच. सौराष्ट्र संघाने गटात प्रथम क्रमांक मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला होता. आता दुसऱ्या स्थानासाठी खऱ्या अर्थाने चुरस होती ती मुंबई आणि महाराष्ट्र या दोन संघात. आणि अगदी किंचितशी शक्यता होती की कदाचित आंध्र चा संघ पुढील फेरी जाऊ शकेल. अर्थात त्यासाठी अनेक गोष्टी त्यांच्या बाजूने घडणे आवश्यक होते. म्हणजे मुंबई-महाराष्ट्र सामन्याचा निकाल न लागता, पहिल्या डावात दोन्ही संघांची सामान धावसंख्या होणे आणि त्याच बरोबर आंध्र संघाने आसाम विरुद्धचा सामना डावाच्या अधिपत्याने जिंकून बोनस गुण मिळवणे. आता या दोन्ही गोष्टी एकदम घडणे किती दुरापास्त आहे हे क्रिकेट रसिकांना नक्कीच ठाऊक आहे. पण कदाचित आंध्रच्या समर्थकांनी बहुतेक असतील नसतील ते सगळेच देव पाण्यात ठेवले होते. कदाचित त्यांची प्रार्थना कामाला आली. दैवाचे फासे आंध्रच्या बाजूने पडले आणि रणजी ट्रॉफीच्या या शेवटच्या सामन्यात बोनस गुणाने विजय मिळवत आंध्रने पुढील फेरीत प्रवेश मिळवला. आंध्रने सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी आसाम संघावर मात केली. आंध्रने सामन्याच्या पहिल्याच दिवशी आसाम संघाला पहिल्या डावात केवळ ११३ धावात बाद केले आणि तिथेच त्यांच्या विजयाचा पाया रचला गेला. खरं सांगायचं तर या संघात कोणीही स्टार खेळाडू नाही. एक कप्तान हनुमा विहारी सोडला तर कोणालाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नाही, पण योग्य वेळी चांगला खेळ करत या संघाने बाजी मारली. एक डाव आणि ९६ धावांनी विजय मिळवत आंध्रचा संघ २६ गुणांसह या गटात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला होता. 

इकडे मुंबईत देखील एक चांगला सामना सुरु होता. महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना ३८४ धावांची मजल मारली. खरंतर संघाची अवस्था बिकट होती, पण अनुभवी केदार जाधवचं खणखणीत शतक संघाला तारून गेलं. सौरभ नवले आणि आशय पालकर सारख्या तरुण खेळाडूंनी अर्धशतके झळकावून त्याला चांगली साथ दिली. ३८४ ही धावसंख्या पुरेशी होती कदाचित, पण समोर बलाढ्य मुंबई होती. आता त्या संघात पूर्वीची जादू नसली तरीही तो मुंबईचा संघ होता. हा संघ ‘खडूस’पणे खेळणार हे ठाऊकच होते. पण महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी कमाल केली होती. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा मुंबईची धावसंख्या होती ५ बाद १८७ आणि त्यांचे प्रमुख फलंदाज बाद झाले होते. म्हणजे महाराष्ट्राचा संघ नक्कीच पुढे होता. पण तिसऱ्या दिवशी मुंबईने जोरदार कमबॅक केलं. त्यात प्रमुख वाटा होता विकेटकिपर बॅट्समन प्रसाद पवारचा. प्रसादने एक अप्रतिम खेळी करताना १४५ धावा केल्या. तो बाद झाला तेंव्हा मुंबईची धावसंख्या होती ३०७, आणि पहिल्या डावाच्या आघाडीसाठी त्यांना अजूनही ७८ धावा हव्या होत्या. इथे मदतीला आला तो मुंबईचा तनुष कोटियन. स्वतः जखमी असून देखील, खालच्या फलंदाजांना बरोबर घेऊन त्याने मुंबईला हळू हळू पुढे नेले. ९ वा बळी पडला तेंव्हा देखील मुंबईला अजून १३ धावा हव्या होत्या. दोन्ही संघ बरोबरीला आले असताना (३८४ धावसंख्येवर) एक स्वीपचा फटका मारताना तनुष बाद झाला. पहिला डाव ‘टाय’ झाला होता. इथेच दोन्ही संघांची पुढे जाण्याची शक्यता धूसर झाली होती. 

आता या सामन्यात तसा पुरेसा वेळ राहिलेला नव्हता. एखाद्या संघाच्या गोलंदाजांनी कमाल केली असती, आणि प्रतिस्पर्धी संघाला कमी धावात उखडलं असतं तर कदाचित सामन्याचा निर्णय लागला असता. मुंबईच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात तसे प्रयत्न केले खरे. एकवेळ महाराष्ट्राची धावसंख्या ६ बाद १०१ होती, पण अझीम काझी, सौरभ नवले आणि आशय पारकरने परत एकदा संयमी खेळी करून संघाला पराभवापासून दूर नेले. महाराष्ट्राने २५२ धावा करून मुंबईसमोर आव्हान ठेवले होते. मुंबईच्या संघाला सरासरी ८-९ च्या धावगतीने हे आव्हान पार करणे आवश्यक होते. मुंबई संघाने दुसऱ्या डावात प्रयत्न केले देखील, पण ते अपुरे पडले. महाराष्ट्राने देखील मुंबईच्या ६ विकेट्स घेऊन चांगले प्रयत्न केले. शेवटी दोन्ही संघांनी सामना अनिर्णित ठेवण्याचा निर्णय घेतला आणि दोन्ही संघांचे यावर्षीचे रणजी ट्रॉफीतील आव्हान संपुष्टात आले. परिणामी महाराष्ट्र, सौराष्ट्र आणि आंध्र या तीनही संघांना सारखे गुण असून देखील महाराष्ट्राचा संघ बाद फेरी गाठू शकला नाही. 

ही परिस्थिती थोडीशी विचित्रच म्हटली पाहिजे. कारण या गटातील प्रत्येक संघाने ७ लढती खेळल्या. पैकी महाराष्ट्र संघाने एकही लढत गमावली नाही. त्यांनी ३ सामने जिंकले आणि ४ अनिर्णित ठेवले. गटातील इतर प्रमुख संघ – सौराष्ट्र, आंध्र आणि मुंबई यांना प्रत्येकी २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. विजय मिळवताना महाराष्ट्र संघाला एकही बोनस गुण मिळवता आला नाही, आणि तिथेच त्यांचा पराभव झाला. आंध्र आणि सौराष्ट्र संघांचे गन सारखे असले तरी देखील सौराष्ट्र ने २ तर आंध्रने १ बोनस गुण मिळवला होता. (तोही त्यांनी शेवटच्या सामन्यात मिळवला.) महाराष्ट्राला त्यांच्या हैदराबाद विरुद्धच्या सामन्याचा फटका बसला असे म्हणता येईल. विजयासाठी दुसऱ्या डावात केवळ २७ धावा हव्या असताना महाराष्ट्राला बोनस गुण मिळवणे सहज शक्य होते, पण पहिल्याच चेंडूवर ऋतुराज गायकवाड बाद झाला, अन्यथा आज चित्र काहीसे वेगळे दिसले असते. मुंबईने देखील हात तोंडाशी आलेला सामना घालवला. त्यांनी महाराष्ट्र पेक्षा एक धाव जास्त काढली असती तर कदाचित आज ते बाद फेरीत दिसले असते. अर्थात, या जर-तर च्या खेळाला अर्थ नाही. म्हणतात ना ‘जो जीता वही सिकंदर’. 

मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेटला मोठी परंपरा आहे. मुंबई क्रिकेट तर भारतीय क्रिकेटचा पायाच समजला जातो. अशावेळी देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा – रणजी ट्रॉफी, आणि या स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश न मिळणे हे दोन्ही संघांसाठी वाईटच आहे. पण आता या वर्षीच्या बाद फेरीतील संघ आता ठरले आहेत. मुंबई आणि महाराष्ट्र या दोन्ही संघांना एकदा शांतपणे या वर्षी घडलेल्या घटनांचा विचार करून त्याप्रमाणे पावले टाकणे आवश्यक आहे. 

To know more about Crickatha