ball

लीग्सची दुनिया

by कौस्तुभ चाटे

ऐका हो ऐका … क्रिकेटच्या जगतात एक नवीन लीग सुरु झाली आहे हो. तुफान फटकेबाजी, एक से बढकर एक खेळाडू, संगीतावर नृत्य करणाऱ्या चियर गर्ल्स आणि एकूणच धमाल… ही नवीन लीग क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणीच आहे…. ऐका हो ऐका.. अशी दवंडी ऐकू आली का कुठे? नाही आली म्हणता…. अरे हो, नसेल आली. आपण इथे भारतात राहतोय ना… ही घोषणा झाली होती दक्षिण आफ्रिकेत. आपण तिथले पेपर्स वाचत नाही, त्यामुळे काही दिवसांपूर्वी तिकडे सुरु झालेली ही SA२० लीग आपल्याला फारशी माहित असायचं काही कारण नाही. पण ही लीग सुरु झाली आहे, क्रिकेट जगतातील अजून एक लीग. खरं तर उशीरच झाला आहे, पण दक्षिण आफ्रिकेने आपली लीग सुरु केली खरी. 

साल २००८. नुकताच भारताने टी-२० विश्वचषक जिंकला होता. क्रिकेटमधला हा नवीन फॉरमॅट सगळ्यांनाच भुरळ घालत होता. त्याच्या काही दिवस अलीकडेपलीकडेच झी ग्रूप ने आपली एक क्रिकेट लीग सुरु केली होती. हा खऱ्या अर्थाने बीसीसीआय ला धक्का होता. बीसीसीआयने लगोलग त्या खेळाडूंवर बंदी आणून लीगचा निषेध केला होता. पण ह्या सगळ्या गदारोळात प्रसिद्ध झालेल्या टी-२० क्रिकेटचा फायदा आपल्या क्रिकेट बोर्डाने उठवला नसता तरच नवल होते. २००८ च्या मार्च-एप्रिल महिन्यात आयपीएल ची सुरुवात झाली आणि बघता बघता ह्या लीगने ह्या वर्षी १५ वर्षे पूर्ण केली आहेत. ह्या लीगमध्ये अनंत अडचणी आल्या. कधी संघांची संख्या बदलत गेली, कधी नावे बदलली, खेळाडू बदलत गेले, कधी सरकारने लीग खेळण्यास असमर्थता दाखवली तर कधी आणखी काही. कोविड मुळे २ वर्षे तर सगळं जगच ठप्प होतं. पण अशातही आयपीएल खेळवली गेली. कधी भारतात, कधी दक्षिण आफ्रिकेत तर कधी युएई मध्ये. त्या दोन वर्षात अनेक क्रिकेट मालिका रद्द झाल्या, अगदी टेस्ट चॅम्पियनशीप आणि विश्वचषक स्पर्धेच्या तारखा, फॉरमॅट्स, नियम बदलले पण आयपीएल मात्र घडत राहिली. ह्या मागे कारणे काय आहेत हे न शोधलेलंच बरं, पण निदान रसिकांना क्रिकेट बघायला मिळत होतं. त्याच आयपीएलच्या यशानंतर आता गेल्या ५-१० वर्षात अनेक लीग्सचं पेव फुटलं आहे. ऑस्ट्रेलियाची बिग बॅश लीग, वेस्ट इंडिज बेटांवरील कॅरिबियन प्रीमियर लीग, इंग्लंड मधील टी२० ब्लास्ट, बांगलादेश प्रीमियर लीग, पाकिस्तान सुपर लीग अशा एक ना अनेक लीग्स सुरु झाल्या आहेत. थोडेफार नियम वेगळे असले तरी ह्या स्पर्धांचा ढाचा साधारण सारखाच आहे. ६-८-१० संघ (बहुतेकवेळा वेगवेगळ्या शहरांची नावं असलेले), त्यात साधारण १८-२५ खेळाडू, ६-८ परदेशी खेळाडू, त्यातील ३ किंवा ४ खेळाडूंना सामन्यात खेळण्याची परवानगी, ह्या सगळ्या खेळाडूंचा लिलाव, संघांमागे असलेले धनाढ्य राजकारणी, व्यावसायिक, फिल्म स्टार्स आणि त्यांनी फेकलेले पैसे. खरं तर आता ह्या सगळ्याची आपल्याला सवय झाली आहे. 

ह्या सगळ्या प्रकारात आपण देश विरुद्ध देश हा खेळ जणू विसरूनच गेलो आहोत. पूर्वी दुरंगी-तिरंगी-चौरंगी मालिका होत असत, त्या आता संपल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेट जणू शेवटाकडे वाटचाल करत आहे. टी-२० क्रिकेटचा सुकाळ झाला आहे, पण अनेक देशांमधलं कसोटी क्रिकेट जवळजवळ संपलं आहे. आता श्रीलंका, वेस्ट इंडिज, पाकिस्तान, झिम्बाब्वे, बांगलादेश ह्या देशांचे कसोटी संघ फक्त नावालाच आहेत. काही वर्षांपूर्वी आयर्लंड आणि अफगाणिस्तान संघांना कसोटीचा दर्जा मिळाला, पण त्यांनी शेवटचा कसोटी सामना खेळून किती वर्षे झाली ह्याचा कोणी शोध घेतला आहे का? कसोटी क्रिकेट खऱ्या अर्थाने शिल्लक आहे ते भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि काही प्रमाणात न्यूझीलंड मध्ये. ह्या वर्षी एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक होईल. दर चार वर्षांनी होणार हा विश्वचषक पूर्वी क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणीच असे. शेवटचा हा विश्वचषक २०१९ मध्ये झाला होता, तो देखील आपल्या चांगला लक्षात असेल. पण ह्या दरम्यान टी-२० क्रिकेटचे २ विश्वचषक होऊन गेले आहेत. टी-२० क्रिकेट हा प्रकार हा रॉकेट पेक्षाही जोरात सुरु आहे. टी-२० मुळे काही चांगल्या गोष्टी नक्कीच झाल्या, पण त्याच फॉरमॅट मध्ये सुरु झालेल्या लिग्समुळे मात्र खेळाडूंचं क्रिकेट देशांऐवजी वेगवेगळ्या शहरांकडे, संघांकडे केंद्रीत झालं आहे. आज एखादा खेळाडू भारताचा, ऑस्ट्रेलियाचा  किंवा आफ्रिकेचा ओळखला जात नाही, तर तो मुंबई इंडियन्सचा, चेन्नई सुपर किंग्सचा किंवा मेलबर्न स्टार्सचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. हळूहळू दोन देशांमधील क्रिकेट नष्ट होईल का अशी भीती वाटू लागली आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक खेळाडू आता देशाकडून खेळण्याच्या ऐवजी लीग्स मधील संघांकडून खेळण्यासाठी प्राधान्य देतात. खास करून वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची ही सवय आपल्याला दिसून येते. अनेकदा अनेक आजी-माजी क्रिकेटपटू ह्या विरुद्ध बोलताना दिसतात, पण ह्या गोष्टी काही बदलणार नाहीयेत.    

वर उल्लेख केलेल्या लीग्स ह्या खऱ्या अर्थाने प्रातिनिधिक म्हटल्या पाहिजेत. ह्या पलीकडेही अनेक लीग्स असलेल्या आपल्या दिसून येतात. काहीच दिवसांपूर्वी सुरु झालेली SA२० (दक्षिण आफ्रिका), सुपर स्मॅश (न्यूझीलंड), लंका प्रीमियर लीग (श्रीलंका), नेपाळ टी-२० लीग (नेपाळ) ही अशीच काही उदाहरणे. आता ह्या वर्षी कदाचित युएई मधील इंटरनॅशनल टी-२० लीग आणि अमेरिकेची मेजर क्रिकेट लीग सुरु झाली तर हे चित्र अधिकच विदारक होण्याची शक्यता आहे. ह्या लीग्स मधून मिळणारे पैसे, त्याकडे आकर्षित होणारे क्रिकेटपटू, त्यांची स्थैर्यता ह्या सगळ्याचा विचार करता कदाचित ह्या लीग्समुळे क्रिकेटचे सगळे संदर्भ बदलण्याची शक्यता आहे. आता पुढील काही वर्षात सगळेच क्रिकेटपटू ह्या लीगचे खेळाडू किंवा त्या लीगमध्ये सहभागी झालेले खेळाडू म्हणून ओळखले जाण्याची शक्यता आहे. क्रिकेटचं ग्लोबलायझेशन करण्याच्या नादात आपण कदाचित खेळाडूंना लीग क्रिकेट मधेच बांधून ठेवतो आहोत, आणि  हे चित्र नक्कीच भयावह आहे. 

To know more about Crickatha