भारत विरुद्ध न्यूझीलंड. क्रिकेट विश्वातील दोन असे संघ ज्यांचे सामने नेहेमीच चांगले होतात. न्यूझीलंड हा असा संघ आहे की जो बहुतेकवेळा प्रतिस्पर्ध्याला देखील आवडून जातो. किवी खेळाडू त्यांच्या मैदानावरील आणि बाहेरील वागणुकीने देखील कायमच समोरच्या संघावर आणि समर्थकांवर आपली छाप सोडतात. कदाचित त्यामुळेच न्यूझीलंडने आपल्याला टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत अंतिम फेरीत मात दिली त्याचा खूप त्रास नाही झाला. कदाचित न्यूझीलंड २०१९ च्या विश्वचषकात अंतिम सामन्यात ज्या पद्धतीने हरले त्याचे जास्त वाईट वाटले. एकूणच एक शांत आणि सज्जन संघ म्हणून न्यूझीलंड ओळखले जातात. तर असा हा किवी संघ ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळायला भारतात होता. नुकताच त्यांनी पाकिस्तान चा दौरा केला असल्याने ते या वातावरणाशी, भारतीय उपखंडातील मैदानांशी, विकेट्सशी समरस होतेच, कदाचित त्यामुळेच हे सामने चुरशीने खेळले जातील अशी क्रिकेट रसिकांची अपेक्षा होती. २०२३ या वर्षात एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक खेळला जाणार आहे, आणि त्यामुळेच बहुतेकांचे लक्ष ३ एकदिवसीय सामन्यांकडे होते. न्यूझीलंडचा विचार करता, संघातले तीन प्रमुख खेळाडू – केन विलियमसन, ट्रेंट बोल्ट आणि टीम सौदी या मालिकेत खेळणार नव्हते. तर भारतीय संघ देखील आता विश्वचषकासाठी तयारी करताना दिसत होता. नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारताने विजय मिळवला असला तरी न्यूझीलंड विरुद्धचे सामने रंगतील अशी अपेक्षा होती.
मालिकेतला पहिला सामना हैदराबादला खेळला गेला. हा सामना खऱ्या अर्थाने शुभमन गिलचा सामना म्हणून ओळखला जाईल. भारतीय फलंदाजांची नवीन फळी खरोखरीच उत्तम आहे. हे नवीन ताज्या दमाचे फलंदाज क्रिकेटला वेगळ्या स्तरावर घेऊन जात आहेत. काहीच दिवसांपूर्वी ईशान किशनने बांगलादेश विरुद्द्ध द्विशतक ठोकले होते. हैदराबादच्या सामन्यात शुभमनने त्याचाच कित्ता गिरवला. १४९ चेंडूंचा सामना करताना शुभमन गिलने २०८ धावा लुटल्या. त्यामध्ये तब्बल १९ चौकार होते आणि ९ षटकार. भारतीय फलंदाज आणि द्विशतक हे नातंच भारी आहे. सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतकाच्या रचलेल्या पायावर आणि तरुण खेळाडू कळस चढवताना दिसतात. त्या दिवशीची गिलची खेळी अप्रतिम होती. मैदानावर सगळीकडे धावांची लयलूट करत त्याने किवी गोलंदाजांवर हल्ला चढवला. एकाही गोलंदाजांची पर्वा देखील न करता गिलची बॅट बोलत होती. तो शेवटच्या षटकात बाद झाल्यानंतर किवी खेळाडूंनी अक्षरशः सुटकेचा निःश्वास टाकला असेल. तो दिवस शुभमनचाच होता. त्याच्या त्या मिडास टचमुळे हैदराबादचं मैदान देखील अगदी गल्ली क्रिकेटचं मैदान वाटू लागलं होतं. हा सामना भारत अगदी सहज जिंकेल असं वाटत होतं. पण मायकेल ब्रेसवेल नामक किवी खेळाडूच्या मनात काही वेगळंच सुरु होतं. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ब्रेसवेलने तळाशी असलेल्या सॅन्टनर ला हाताशी धरून भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवला. ६ बाद १३१ नंतर अचानक न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आपले शॉट्स खेळायला सुरुवात केली. ब्रेसवेलच्या खेळीत देखील १२ चौकार आणि १० अप्रतिम षटकार होते. त्याने किवी संघाला सामना जवळजवळ जिंकून दिलाच होता, पण फटकेबाजीच्या नादात तो बाद झाला आणि केवळ १२ धावांनी आपण विजयी ठरलो. दोन्ही संघांनी जिंकण्यासाठी कसून प्रयत्न केले, आणि क्रिकेट रसिकांना चौकार-षटकारांची आतषबाजी बघायला मिळाली.
मालिकेतील पहिला सामना जर फलंदाजांच्या नावे होता, तर दुसऱ्या सामन्यात गोलंदाजांनी मिळालेल्या संधीचे सोने केले. या सामन्यात टॉस जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला, आणि भारतीय गोलंदाजांनी तो निर्णय सार्थ ठरवला. गेल्या काही वर्षात, भारतीय गोलंदाजांना एक वेगळीच लय सापडली आहे. खास करून वेगवान गोलंदाज मैदानावर उत्तम कामगिरी करताना दिसतात. या सामन्यात देखील सुरुवातीच्या काही षटकात आपल्या गोलंदाजांनी किवी फलंदाजांना नुसतं जखडुनच नाही ठेवलं तर नियमितपणे त्यांच्या विकेट्स देखील घेतल्या. केवळ १० षटकात न्यूझीलंडची अवस्था ५ बाद १५ अशी होती. इथून पुढे हा संघ किती धावा करेल हे बघणे देखील औत्सुक्याचे होते. शमी, सिराज, शार्दूल आणि हार्दिक या चौघांनी मिळून न्यूझीलंडच्या फलंदाजीला सुरुवातीलाच जे खिंडार पाडलं त्यातून हा संघ फार काळ तगेल अशी शक्यता नव्हती. केवळ ३५ षटकात १०८ या धावसंख्येवर न्यूझीलंडचा संघ बाद झाला. ग्लेन फिलिप्स (३६ धावा), ब्रेसवेल (२२ धावा) आणि मिशेल सॅन्टनर (२७ धावा) ह्यांनीच थोडाफार प्रतिकार केला, पण अर्थातच तो पुरेसा नव्हता. न्यूझीलंडने दिलेलं हे आव्हान देखील तसं अपुरंच होतं. भारतीय फलंदाजांनी केवळ २० षटकात विजय मिळवला. त्यातही रोहित आणि शुभमनच्या सलामीच्या जोडीने किवी गोलंदाजांवर हल्ला चढवला. रोहितचे अर्धशतक हे या डावाचे वैशिष्ट्य ठरले. रोहित आणि विराटच्या मोबदल्यात भारताने ही धावसंख्या सहज पार केली.
मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात परत एकदा धावांची लयलूट बघायला मिळाली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामीच्या फलंदाजांनी इंदोरच्या विकेटवर चौकार-षटकारांची जणू आतषबाजीच केली. केवळ २६ षटकात २१२ धावांची भागीदारी करून दोघांनीही भारतीय संघाला विजयाचा मार्ग दाखवला. फॉर्म मध्ये असलेला रोहित शर्मा फटके लागवताना बघणं यासारखं सुख नाही. क्रिकेट रसिकांना अनेक दिवसानंतर तो रोहित सापडला. रोहित (१०१ धावा) आणि शुभमन (११२ धावा) हे दोघेही फटकेबाजीच्या नादात बाद झाले, अन्यथा आपल्याला त्यांची अजूनही मोठी खेळी बघता आली असती. ते दोघे मैदानावर होते तेंव्हा भारत ४०० ची धावसंख्या अगदी सहज पार करेल असं वाटत होतं पण नंतरच्या फलंदाजांना तीच लय कायम ठेवता आला नाही. भारतीय संघ ५० षटकात ३८५ पर्यंत जाऊ शकला. अर्थात ही धावसंख्या देखील पुरेशी होतीच. न्यूझीलंडच्या संघाने शर्थीचे प्रयत्न केले असले तरी ते २९५ या धावसंख्येवर सर्वबाद झाले. भारताने तब्बल ९० धावांनी हा सामना जिंकला. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवे ने सुंदर शतक झळकावले. या डावखुऱ्या फलंदाजाच्या खेळीत एक नजाकत आहे. त्याने मैदानावर चोहोबाजूला फटके लगावत धावा लुटल्या, पण त्याची खेळी किवी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.
ही तीन सामन्यांची मालिका दोन्ही संघांसाठी विश्वचषकाची पूर्वतयारी म्हणून बघता येईल, खास करून न्यूझीलंड संघासाठी. भारतीय संघाला या खेळपट्ट्यांवर खेळण्याची संधी वर्षभर लाभणार आहे, पण किवी संघाला ही मालिका निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. त्यांच्या काही खेळाडूंची कामगिरी अतिशय चांगली झाली. विशेषतः मधल्या फळीत खेळणाऱ्या मायकेल ब्रेसवेलने तीनही सामन्यात उत्तम फलंदाजी केली. पहिल्या सामन्यातील त्याचे आणि शेवटच्या सामन्यातील कॉनवेचे शतक न्यूझीलंडच्या दृष्टीने महत्वाचे आहे. गोलंदाजी मध्ये देखील न्यूझीलंडच्या खेळाडूंनी खूप चमकदार कामगिरी केली नसली तरी त्यांना भारतीय खेळपट्ट्यांचा अनुभव नक्की मिळाला असेल, ज्याचा उपयोग त्यांना विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी होईल. पण ही मालिका मात्र शुभमन गिलच्या नावावर होती असेच म्हणता येईल. तीन सामन्यात त्याने १२८ च्या सरासरीने ३६० धावा केल्या. ज्या पद्धतीने त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला ते बघता भारतासाठी पुढील काही काळ सलामीच्या फलंदाजांचा प्रश्न सुटला आहे असे निश्चित म्हणता येईल. रोहित आणि गिल वगळता इतर फलंदाजांना फारशी संधी मिळालीच नाही. तिसऱ्या सामन्यात विराटला आपल्या खेळातील चुणूक दाखवायची संधी होती, त्याच्या हातात पुरेशी षटके देखील होती, पण तो अगदी सहजपणे बाद झाला. या मालिकेत विराटला ठसा उमटवता आला नाही, अर्थात तो फॉर्म मध्ये आला आहे हेच भारतीय संघासाठी आणि रसिकांसाठी महत्वाचे. एकूणच ही छोटेखानी मालिका भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघांसाठी विश्वचषकाची पूर्वतयारी म्हणून महत्वाची होती. आणि या मालिकेत तरी भारतीय संघाने निर्भेळ यश मिळवले. जिंकण्यासाठी प्रयत्न करणे आणि ती सवय अंगी लावून घेणे हे संघासाठी महत्वाचे आहे. २०२३ या वर्षात अजून तरी भारतीय संघाचे फासे व्यवस्थित पडत आहेत, पुढील काही महिने आपण असाच खेळ करत राहो हीच अपेक्षा.
– कौस्तुभ चाटे