२७ ऑगस्ट १९०८, बरोबर ११५ वर्षांपूर्वी त्या फलंदाजाचा जन्म झाला. वयाच्या २१ व्या वर्षी, १९२८ मध्ये तो आपला पहिला कसोटी सामना खेळला. त्या सामन्यात त्याची कामगिरी ठीकठाकच होती. पुढच्या कसोटीसाठी त्याला वगळलं गेलं, पण त्याच्या पुढच्या कसोटी सामन्यात तो परत एकदा संघात आला. त्या सामन्यात त्याने एक अर्धशतक आणि एक शतक केले, आणि त्यानंतर कधी मागे वळून बघितलंच नाही. पुढे ५२ कसोटी सामन्यात ६९९६ धावा, त्यात २९ शतकं (पैकी १० द्विशतकं आणि २ त्रिशतकं). धावांची सरासरी (९९.९४) कोणी मोडू शकलेलं नाही, आणि कोणी मोडेल अशी शक्यता देखील नाही. सर डोनाल्ड जॉर्ज ब्रॅडमन या माणसाने क्रिकेट गाजवलं आहे. त्याच्या काळात फक्त कसोटी क्रिकेट खेळलं जात असे म्हणून, नाहीतर एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट (किंवा इतर कोणत्याही फॉरमॅटमध्ये) देखील तो सर्वश्रेष्ठ ठरला असता यात काही वाद नाही.
त्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रामुख्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्येच होत असे. वेस्टइंडीज, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, भारत या सारखे देश आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तसे कच्चे बच्चे होते. ब्रॅडमनने ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केले तेव्हा या दोन देशातील क्रिकेटला साधारण ५० वर्षे झाली होती. पण त्यांच्यामधील मालिका तितक्याच चुरशीने खेळल्या जात असत. एक एक दौरा पाच-सहा महिने चालत असे. १९२८-२९ मध्ये इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आला तेव्हा ब्रॅडमनने क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पुढे दोन वर्षांनी, १९३०मध्ये ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर होता. हा दौरा खऱ्या अर्थाने ब्रॅडमनच्या क्रिकेटला कलाटणी देणारा ठरला. या दौऱ्यात खरा ‘डॉन’ समोर आला. नॉटिंगहॅमला पहिल्या कसोटीत १३१, लॉर्ड्सवर दुसऱ्या कसोटीत २५४, लीड्सवर तिसऱ्या कसोटीत ३३४ आणि ओव्हल मैदानावर पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत २३२ धावा अशी त्याची कामगिरी होती. पाच कसोटी सामन्यांच्या त्या मालिकेत ब्रॅडमनने १३९.१४ धावांच्या सरासरीने तब्बल ९७४ धावा केल्या. लीड्सवरील सामन्यात त्याने एका दिवसात ३०० धावा केल्या होत्या. इंग्लिश गोलंदाजीची एवढी कत्तल त्या आधी कोणी केली नव्हती. एका फलंदाजाने त्या मालिकेत इंग्लिश संघाला, त्यांच्याच मैदानावर, त्यांनीच शोध लावलेल्या खेळात लोळवलं होतं.
त्या मालिका विजयानंतर डॉन ब्रॅडमन हे नाव मोठा आदराने घेतलं जाऊ लागलं. अर्थातच कट्टर इंग्लिश खेळाडूंना आणि समीक्षकांना ब्रॅडमॅनचं हे कृत्य आवडलं नव्हतंच. आणि मग पुढच्या मालिकेत त्यांनी त्याचा तोडगा काढायचा प्रयत्न केला. १९३२ साली ऑस्ट्रेलियात झालेली पुढची मालिका वादग्रस्त ठरली. किंबहुना क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त मालिका असा उल्लेख करता येईल. या मालिकेत इंग्लिश कप्तान आणि गोलंदाजांनी अत्यंत तिखट मारा करून ऑस्ट्रेलियन फलंदाजांना नामोहरम करायला सुरुवात केली. अंगावर चेंडू टाकून त्याला जायबंदी करणे हेच त्यांचे शस्त्र ठरू लागले. त्या काळात हेल्मेट नव्हतं, चेस्ट गार्ड किंवा इतर संरक्षणात्मक गोष्टींचा शोध लागला नव्हता. त्याकाळी खेळपट्टी देखील आच्छादीत केली जात नसे. कोणा फलंदाजाच्या छातीवर चेंडू आपटला तर कोणाच्या डोक्यावर. इंग्लिश गोलंदाजांनी एकामागून एक बाउन्सर आणि बिमर टाकत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना जखडून ठेवलं होतं. ब्रॅडमनच्या त्या १९३० च्या दौऱ्यातील खेळीचा प्रचंड परिणाम इंग्लिश खेळाडूंवर झाला होता. तरीही त्या दौऱ्यात ब्रॅडमनची सरासरी साधारण ५७ होती, जी आजही कोणत्याही फलंदाजासाठी मोठी मानली जाते. या बॉडिलाइन मालिकेने क्रिकेटच्या नियमांचे सगळेच मापदंड बदलले, पण एका फलंदाजाला झुकवण्यासाठी मैदानावर काही अनैतिक, काही अंशी अमानवीय खेळ त्या आधी देखील झाला नव्हता, आणि त्या नंतरही झाला नाही. कदाचित यामध्येच ब्रॅडमनची महती लक्षात यावी.
ब्रॅडमन त्याच सुमारास वेस्टइंडीज आणि दक्षिण आफ्रिका संघांविरुद्ध देखील खेळला, आणि कारकिर्दीच्या शेवटी १९४८ साली भारतीय संघाविरुद्ध देखील. पण खऱ्या अर्थाने इंग्लिश संघाविरुद्ध त्याची बॅट चमकली. १९३८ ते १९४६ या काळात महायुद्धामुळे क्रिकेट खेळलं गेलं नाही. ब्रॅडमनच्या कारकिर्दीतील महत्वाची वर्षे युद्धामुळे वाया गेली, अन्यथा तो अजूनच चमकला असता. ज्या प्रकारचं क्रिकेट तो खेळत असे, त्याची धावांची सरासरी लक्षात घेता, कदाचित त्याने कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा देखील सहज गाठला असता. ब्रॅडमनने लीड्स मैदानावर २ त्रिशतकं ठोकली. १९३२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो २९९ धावांवर नाबाद राहिला, नाहीतर तीन त्रिशतकं करण्याचा रेकॉर्ड त्याच्यानावे लागला असता. ब्रॅडमन आणि मेलबर्न क्रिकेट ग्राउंड यांचं एक वेगळं नातं होतं. त्या मैदानावर ११ कसोटी सामन्यात त्याने १२८ च्या सरासरीने १६७१ धावा केल्या आहेत, आणि त्यामध्ये तब्बल ९ शतकं आहेत. हा देखील एक प्रकारचा विक्रम म्हणावा लागेल.
१९३० च्या सुमारास जगभर मंदी होती. अनेक उद्योगधंदे बंद झाले होते, पुरेश्या नोकऱ्या उपलब्ध नव्हत्या. ऑस्ट्रेलियाची अर्थव्यवस्था देखील याला अपवाद नव्हती. असे म्हणतात की अशावेळी डॉन ब्रॅडमनच्या त्या खेळींनी खऱ्या अर्थाने ऑस्ट्रेलियन तरुण पिढीला त्या संघर्षाचा मुकाबला करण्यासाठी एक वेगळी ऊर्जा दिली. ब्रॅडमन महान फलंदाज होता यात काहीच वाद नाही. १९४८ मध्ये युद्धानंतर तो इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला तेव्हा तो कप्तान होता. त्या दौऱ्यावर, वयाच्या ४० वर्षीदेखील तो अप्रतिम खेळला. त्या दौऱ्यावर देखील त्याने २ शतके केली. त्या संपूर्ण दौऱ्यावर ते एकूण ३४ सामने खेळले (५ कसोटी आणि इतर फर्स्ट क्लास सामने). पैकी २५ सामन्यात त्यांनी विजय मिळवला, आणि ९ सामने अनिर्णित ठरले. म्हणजे ते एकही सामना हरले नाहीत. या दौऱ्यावर शेवटच्या, पाचव्या कसोटीत ब्रॅडमन शून्यावर बाद झाला, आणि त्याची कसोटी सामन्यातील सरासरी शंभरचा आकडा गाठू शकली नाही. एकप्रकारे क्रिकेटच्या सुपुत्राने खेळाला दिलेली ही मानवंदनाच म्हटली पाहिजे. कोणत्याही खेळाडूंपेक्षा खेळ जास्त मोठा….
अर्थात डॉन ब्रॅडमन या फलंदाजाने आपली छाप या खेळावर अनेक वर्षांपूर्वीच सोडली आहे. गेल्या ९०-१०० वर्षांत त्याच्या तोडीचा कोणी झाला नाही, होण्याची शक्यता देखील नाही.