ball

अलौकिक अष्टपैलू 

by कौस्तुभ चाटे

दिवस होता ३१ ऑगस्ट १९६८, स्थळ स्वानसी (इंग्लंड). इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये नॉटिंगहॅमशायर विरुद्ध ग्लॅमॉर्गन सामना सुरु होता. फलंदाजी करणारा खेळाडू त्या दिवशी भलत्याच मूडमध्ये होता. अशावेळी ग्लॅमॉर्गनचा गोलंदाज माल्कम नॅश गोलंदाजी करायला आला, आणि फलंदाजाने त्या षटकातले सहाही चेंडू सीमारेषेबाहेर भिरकावले. त्या षटकात सहा षटकार मारले गेले होते. क्रिकेटच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत होतं. पहिल्यांदाच फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एका षटकात सहा षटकार मारले जात होते. एका शतकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील त्या वेळी मोडला गेला होता. त्या फलंदाजाने तडाखेबंद फलंदाजी करताना समोरच्या संघाला अगदी नामोहरम करून टाकलं होतं. तो प्रसिद्ध होता त्याच शैलीसाठी. काही वर्षांपूर्वी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ३६५ धावांची खेळी केली होती, तो देखील विश्वविक्रमच होता. जगभरातले क्रिकेटप्रेमी त्या फलंदाजाच्या जणू प्रेमातच होते. तो खेळाडू कोण हे क्रिकेटप्रेमींना सांगायची खचितच आवश्यकता नाही. सर गारफिल्ड उर्फ गॅरी सोबर्स हे नाव क्रिकेट रसिकांच्या मनामनात आहे. दोनच दिवसांपूर्वी सर गॅरी सोबर्स यांनी वयाची ८७ वर्षे पूर्ण केली आहेत. २८ जुलै १९३६ रोजी बार्बाडोसमध्ये जन्मलेला हा अवलिया क्रिकेटच्या दुनियेतील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे.

१९५४ ते १९७४ या तब्बल २० वर्षांच्या काळात सोबर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. या दोन दशकात त्यांनी क्रिकेट गाजवलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ९३ कसोटी, ८००० पेक्षा अधिक धावा, ५७-५८ ची सरासरी, २६ शतकं, २३५ बळी आणि १०९ झेल ही त्यांची कामगिरी ते किती महान खेळाडू होते हे सांगण्यासाठी पुरेशी आहे. याच कालावधीत ते जगभरदेखील खेळले (मुख्यतः इंग्लिश काउंटी आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये), आणि फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी ३८३ सामन्यात २८००० पेक्षा जास्त धावा ( ८६ शतके ) आणि १०४३ बळी मिळवले. आजच्या घडीला हे नंबर्स हिमालयासारखे वाटतात पण गॅरी सोबर्स हा मनुष्य प्रचंड अभिमानाने हे सगळं स्वतःच्या छातीवर घेऊन मिरवतो. 


बार्बाडोस मधल्या ब्रिजटाऊन येथे त्यांचा जन्म झाला. वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षीच वडिलांचं छत्र हरपलं होतं. पुढील पालनपोषण देखील आईनेच केलं. घरात ६ भावंडं. त्या कालच्या कॅरेबियन परंपरेला जागून ही सगळीच भावंडं वेगवेगळ्या खेळांत पुढे येत होती. लहानग्या गॅरीला रस होता क्रिकेट, फुटबॉल आणि बास्केटबॉल मध्ये. तीनही खेळात तो प्राविण्य मिळवत होता, पण कुठेतरी एका खेळात पुढे जाणं आवश्यक होतं. अशावेळी त्याचा मोठा भाऊ जेराल्ड मदतीला आला. जेराल्डच्या पुढाकाराने गॅरीने क्रिकेटमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. आधी शालेय क्रिकेट, मग क्लब साठी खेळत लहानगा गॅरी मोठा होत होता. वयाच्या १६ व्या वर्षी त्याने बार्बाडोस बेटांसाठी पहिला सामना खेळला. पुढे २ वर्षात त्याची निवड वेस्टइंडीजच्या संघात झाली देखील. १९५४ मध्ये इंग्लंड विरुद्ध किंग्सटन येथील सामन्यासाठी सोबर्स पहिल्यांदा खेळला तो डावखुरा गोलंदाज म्हणून. इंग्लंडच्या पहिल्या डावात त्याने ४ बळी मिळवून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आगमन केलं होतं. पुढच्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत देखील त्याला गोलंदाज म्हणूनच खेळवण्यात आलं. पण एका कसोटीमध्ये वेस्टइंडीज कर्णधार आणि सलामीचा फलंदाज जेफ स्टोलमायर खेळणार नव्हता, त्यावेळी सोबर्सला सलामीला पाठवलं गेलं. त्या डावात त्याने ४३च धावा केल्या, पण आपल्या फलंदाजीची छाप सोडली हे नक्की. सोबर्स म्हणतो, “त्यावेळी त्यांना सलामीची दुसरा फलंदाज पाठवायचा नव्हताच बहुतेक, मला बळीचा बकरा म्हणून पाठवलं गेलं, पण तीच माझ्यासाठी संधी होती.” पुढे न्यूझीलंड, इंग्लंड दौऱ्यावर त्याची वर्णी लागली. हळूहळू वेस्टइंडीज संघात त्याचा जम बसू लागला होता, पण मुख्यतः एक गोलंदाज म्हणून. त्याची फलंदाजी बरी होत होती, पण चांगली सुरुवात करून देखील मोठी धावसंख्या उभारायला तो अपयशी ठरत होता. १९५८ ची पाकिस्तान विरुद्धची किंगस्टनची कसोटी त्याच्यासाठी एक वरदान ठरली. त्या कसोटीत सोबर्स तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला गेला, आणि त्याने तब्बल ३६५ धावांची खेळी केली. कसोटी क्रिकेटमधला तो विक्रम होता. या खेळीनंतर सोबर्सने मागे वळून कधी बघितलंच नाही. वेस्टइंडीज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, पाकिस्तान… कोणत्याही देशातलं कोणतंही मैदान असो, सोबर्सची बॅट कायमच बोलत राहिली. मग इंग्लंड विरुद्ध ब्रिजटाऊन कसोटीमध्ये केलेले २२६ असो, भारताविरुद्ध १९५८ मध्ये पाठोपाठ केलेली २ शतके असो (मुंबई १४२ आणि कानपूर १९८) किंवा टाय टेस्ट मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेली १३२ ची खेळी असो, सोबर्सची बॅट कायमच बोलत राहिली. 

गॅरी सोबर्स या माणसाने क्रिकेटचं मैदान अक्षरशः गाजवलं. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात देखील तो चमकत होताच. इंग्लिश काउंटी मध्ये त्याच्या अनेक खेळींनी क्रिकेट रसिकांना तृप्त केलं होतं. १९६३ मध्ये त्याची विस्डेन तर्फे ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ म्हणून निवड झाली. पुढे वेस्टइंडीज संघाचे नेतृत्व देखील त्याच्याकडे आलं. १९६५ ते १९७४ या काळात तो वेस्टइंडीजचा कर्णधार होता, आणि त्याने ती जबाबदारी देखील समर्थपणे पेलली. त्याच काळात इंग्लिश काउंटी मध्ये एकदिवसीय सामान्यांचं पेव फुटलं होतं. सोबर्स तिथेदेखील चमकत होताच. इंग्लिश काउंटी मधली ७-८ वर्षे तो नॉटिंगहॅमशायर साठी खेळला. त्याआधी २ वर्षे तो दक्षिण ऑस्ट्रेलिया संघासाठी देखील त्याने मैदानावर पाऊल ठेवले. एकूणच जगभर तो क्रिकेट खेळत होताच. वेस्टइंडीज क्रिकेटचा त्याकाळचा दर्जा वेगळाच होता. वेस्टइंडीजच्या ३ डब्ल्यू (वीक्स, वॉरेल आणि वॉलकॉट) पासून सुरु झालेला तो प्रवास सोबर्सने कायमच पुढे नेला. पुढे तीच धुरा त्याने क्लाईव्ह लॉइडकडे सोपवली. 

सोबर्स मैदानावर जितका चमकला तितकाच तो बाहेर देखील. इतर कॅरिबियन खेळाडूंप्रमाणेच तो कायमच रम आणि रमा यांच्या सहवासात रमला, आणि त्याने त्यापासून कधी पळ देखील काढला नाही. १९६७-६८ च्या सुमारास त्याचे भारतीय अभिनेत्री अंजु महेंद्रू बरोबर सूत जुळले. ते प्रकरण अजूनही चवीने चघळले जाते. सोबर्स सारखा खेळाडू ललनांच्या सानिध्यात रमला नसता तरच नवल होते. कॅरेबियन प्रवृत्ती, ती हवा या खुल्या वातावरणात सोबर्स सारखा खेळाडू आपल्याच धुंदीत होता. सोबर्सने ठरवले असते तर बार्बाडोसचा पंतप्रधान देखील झाला असता, पण त्याने क्रिकेटलाच आपलं आयुष्य वाहून घेतलं होतं. निवृत्तीनंतर देखील तो क्रिकेटशी संलग्न होताच. १९८१-८२ सुमारास त्याने श्रीलंकेसाठी क्रिकेट कोच म्हणून काम बघितलं होतं. श्रीलंका क्रिकेट समृद्ध करण्यातदेखील त्याचा मोठा वाटा होता. इतर कॅरेबियन खेळाडूंप्रमाणे सोबर्स देखील आपल्याच अटींवर जगला, पुढे गेला. आज वेस्टइंडीज क्रिकेटची अवस्था वाईट आहे, ती बघून त्याला देखील नक्कीच वाईट वाटत असेल. वेस्टइंडीज क्रिकेटचा सुवर्णकाळ त्याने बघितला, नव्हे अनुभवला आहे. 

सर गॅरी सोबर्स यांनी वयाची ८७ वर्षे पूर्ण केली आहेत. क्रिकेटचा इतिहासात काही खेळाडूंचे योगदान विसरणे शक्यच नाही. जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंची यादी करायची झाल्यास, अष्टपैलू खेळाडूंमध्ये गॅरी सोबर्स यांचे नाव कायमच अग्रस्थानी असेल. गॅरी सोबर्स यांचा विस्डेनने ‘क्रिकेटर ऑफ द सेंच्युरी’ म्हणून गौरव केला होता. कदाचित हाच त्यांचा सर्वात मोठा सन्मान असेल. एका खऱ्या क्रिकेटचाहत्यासाठी सोबर्स हे जणू दैवतच आहे. सोबर्सना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा !! 
        

To know more about Crickatha