ball

यशस्वी भव

by कौस्तुभ चाटे

एक दहा-अकरा वर्षांचा लहान मुलगा एकट्याच्या हिमतीवर खूप लांबून ट्रेनचा प्रवास करून मुंबईत येतो. अशा शहरात जिथे त्याचं कोणीही नाही. ना कोणी नातेवाईक, ना कोणी ओळखीचे. आधी एका छोट्या डेअरीवजा दुकानात काम करायला सुरुवात करतो. ‘चाईल्ड लेबर’ असल्याने तसे ते अनधिकृतच, पण कुठेतरी या शहरात बस्तान जमवायला त्याची मदत होते. काही कारणाने त्याला ते काम जमत नाही, आणि त्याला हाकलून दिले जाते. तिथून त्याचा प्रवेश होतो आझाद मैदान सारख्या एका मोठ्या मैदानात. तिथे मैदानात काम करणाऱ्या सेवकांबरोबर – ज्यांना ‘ग्राऊंड्समन’ असं एक गोंडस नाव दिलं जात, तो जमवून घेतो. त्यांच्या तंबूमध्येच आपलं बस्तान मांडतो. जवळच एका पाणीपुरी विक्रेत्याकडे काम करू लागतो. कसेतरी चार पैसे कमवत तिथे मैदानावरच मुक्काम ठोकतो. आणि हे सगळं कशासाठी, तर लहानपणापासून बघितलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी…. त्याला क्रिकेट खेळायचं असतं. आता हे वाचून कोणीही म्हणेल की हा येऊ घातलेला बॉलिवूडचा सिनेमा आहे. ही गोष्ट म्हणजे अगदी कसलेल्या लेखकाने विचार करून लिहिली आहे. पण मित्रांनो, ही खरी गोष्ट आहे, प्रत्यक्षात घडलेली. या गोष्ट देखील खरी आहे आणि त्यातली पात्रे देखील, अगदी तो डेअरी दुकानदार असेल, आझाद मैदानावरचा ग्राऊंड्समन असेल किंवा पाणीपुरीवाला. आणि हो, या गोष्टीचा नायक तर या घडीचा भारतीय क्रिकेटमधला सिताराच जणू. मित्रांनो, ही गोष्ट आहे ‘यशस्वी जयस्वाल’ ची.  


यशस्वी जयस्वालने आपल्या पहिल्याच कसोटीत वेस्टइंडीज विरुद्ध शतक ठोकले. मागच्या आठवड्यात झालेल्या या सामन्यात फक्त २१ वर्षांच्या यशस्वीने उत्तम खेळाचे प्रदर्शन करत क्रिकेट रसिकांना आणि समीक्षकांना देखील प्रभावित केले. वेस्टइंडीजचा संघ तसा कमजोरच मानला गेला पाहिजे. पहिल्या कसोटीत त्यांनी अक्षरशः हात टेकले. ना त्यांच्या फलंदाजांनी चांगला खेळ केला, ना गोलंदाज प्रभावी ठरले. पण तरीही यशस्वीच्या खेळाचे मोल कुठेही कमी होत नाही. यशस्वीने या कसोटीत संयमी खेळ केला. विशेषतः पहिल्या शतकानंतर कुठेही लक्ष ढळू न देता मोठी खेळी करण्याकडे त्याची वाटचाल होती. ५०० मिनिटांच्या या मॅरेथॉन खेळीमध्ये त्याने १६ चौकार आणि १ षटकार लगावले. चांगल्या चेंडूला (जे तुलनेने खूपच कमी होते) योग्य तो मान देऊन, आणि खराब चेंडूवर अटॅक करून यशस्वीने दर्जेदार खेळी केली. अर्थात तो पुढे द्विशतक करू शकला असता तर धमाल होती. पण १७१ च्या धावसंख्येवर तो बाद झाला. मुळात डावखुरा सलामीचा फलंदाज असणे हे कोणत्याही संघासाठी महत्वाचे असते. उजव्या-डाव्याची जोडी कधीही समोरच्या संघातील गोलंदाजांची परीक्षा बघते. या कसोटीत देखील रोहित आणि यशस्वी हे दोन मुंबईकर खेळाडू चमकले. दोघांनीही शतके ठोकली. यशस्वीचा खेळ बघता हा लांबी रेस का घोडा आहे असे नक्की म्हणता येईल. मुळात वय देखील त्याच्या बाजूने आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तो क्रिकेटच्या तीनही फॉरमॅट मध्ये खेळू शकतो. सर्वच फॉरमॅट्स मध्ये स्वतःला सिद्ध करण्याची त्याला संधी आहे. 

अगदी लहान वयात क्रिकेटसाठी मुंबईला आलेल्या यशस्वी जयस्वालने अक्षरशः आझाद मैदानाला आपलं घर बनवलं होतं. उत्तर प्रदेशातील भदोई जिल्ह्यातील एका छोट्या गावातून मुंबईसारख्या महानगरात आलेला हा मुलगा या शहरात कुठेही भरकटला असता. ही अशी अनेक उदाहरणे आपण बघतोच. पण क्रिकेटच्या ध्यासापायी त्या मैदानावरच तो वाढला. हाताला मिळेल ते काम करत त्याने क्रिकेटचं शिक्षण सुरु ठेवलं. या शिक्षणाला तसा अर्थ नव्हता कारण एखाद्या हिऱ्याला जोखायला तो रत्न पारखी हवाच असतो. यशस्वीला देखील तो पारखी गवसला. मुंबईतल्या ज्वालासिंग नावाच्या क्रिकेटकोचने त्याला खेळताना बघितलं आणि पुढे त्याला जणू दत्तकच घेतलं. ज्वाला सिंगने त्याच्या क्रिकेटला आधार दिला. त्याला आर्थिक आणि सामाजिक आधार दिला आणि त्यायोगे त्याला क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यात मदत केली. इथेच खऱ्या अर्थाने यशस्वी सारख्या हिऱ्याला पैलू पाडायला सुरुवात झाली. जाईल्स शिल्डच्या एका सामन्यात त्याने ३०० पेक्षा अधिक धावा केल्या आणि मुंबई क्रिकेटमध्ये नवीन स्टार आल्याची जाणीव झाली. पुढे यशस्वीची दिलीप वेंगसरकर अकॅडमी मध्ये निवड झाली आणि त्यानंतर त्याने मागे वळून बघितलेच नाही. हळूहळू मुंबईतील क्लब क्रिकेट आणि १७-१९ वर्षांखालील संघात तो खेळू लागला. फलंदाजीतील आक्रमक स्वभाव जात्याच रक्तात होता, त्यात साथ मिळाली ती तंत्राची. यशस्वीची फलंदाजी आता नुसतीच आक्रमक नव्हती तर ती तंत्रशुद्ध देखील होऊ लागली होती. भारताच्या १९ वर्षांखालील संघात त्याची निवड झाली आणि तिथे देखील त्याने आपल्या खेळणे सर्वानाच प्रभावित केले. २०१९ मध्ये एका १९ वर्षांखालील खेळाडूंच्या कसोटी सामन्यात त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विशतक केले, आणि हा मुलगा कसोटी क्रिकेटसाठी देखील तयार आहे अशी खात्री पटली. २०२० मध्ये १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत देखील त्याची बॅट तळपली. त्या स्पर्धेत त्याने ६ इनिंगमध्ये १३३ च्या सरासरीने ४०० धावा केल्या. त्यामध्ये ४ अर्धशतके होती, आणि उपांत्य सामन्यात पाकिस्तान विरुद्ध केलेले खास शतक. 


या विश्वचषकानंतर यशस्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये देखील चमकू लागला. मुंबईसाठी खेळताना अनेकदा त्याने उत्तम कामगिरी केली. २०१९ मधेच विजय हजारे स्पर्धेत मुंबईकडून खेळताना त्याने द्विशतक केले. अशी कामगिरी करणारा तो सर्वात तरुण फलंदाज होता. त्या खेळीत त्याने तब्बल १७ चौकार आणि १२ षटकार मारले होते. अशा अनेक खेळींद्वारे यशस्वी स्वतःला सिद्ध करत होताच, आणि त्याच वर्षी त्याची वर्णी आयपीएल मध्ये लागली. राजस्थान रॉयल्स कडून खेळताना टी-२० स्पर्धेत देखील तो चमकला. आयपीएल स्पर्धेतील त्याची पहिली एक-दोन वर्षे शांत गेली असली तरी देखील या वर्षीच्या – २०२३ च्या स्पर्धेत त्याने तडाखेबंद फलंदाजी केली. यावर्षी त्याने केवळ १४ सामन्यात तब्बल ६२५ धावा केल्या. आयपीएल मधील कामगिरी हा सध्याचा भारतीय क्रिकेटमधील प्रवेशाचा हायवे झाला आहे. त्याच हायवे वरून यशस्वीची गाडी देखील भारतीय संघात दाखल झाली. अर्थात त्याला तितकेच पुरेसे बळ होते ते १९ वर्षांखालील संघासाठी आणि देशांतर्गत स्पर्धेतील कामगिरीचे. यशस्वी जयस्वालने २०२३ मध्ये भारतीय संघात प्रवेश केला आहे. कदाचित पुढची अनेक वर्षे तो भारतीय क्रिकेट गाजवत राहील. 

यशस्वी जयस्वालच्या बाबतीत त्याचे वय हा महत्वाचा मुद्दा आहे. तो फक्त २१ वर्षांचा आहे. तो अशावेळी भारतीय संघात आला आहे की येत्या २-३ वर्षात बहुतेक वरिष्ठ खेळाडू निवृत्त होतील आणि तरुण रक्ताला वाव असेल. येत्या काळात त्याची बॅट अधिकाधिक धावा करेल यात काही वाद नाही. फक्त एकाच गोष्टीची त्याने काळजी घेणे आवश्यक आहे ते म्हणजे पाय जमिनीवर ठेवणे. अनेक तरुण खेळाडू यश मिळाले की वाहवत गेल्याचे आपण बघितले आहे. अशावेळी जमिनीवर असणे, आणि आपली मुळे पकडून राहणे हे कोणत्याही खेळाडूसाठी महत्वाचे आहे. यशस्वी जयस्वालने या गोष्टी आत्मसात केल्या तर त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. ५० वर्षांपूर्वी (१९७१ च्या दौऱ्यात) एका मुंबईकर सलामीच्या फलंदाजाने प्रभावी कामगिरी करून भारतीय क्रिकेटमध्ये मोठे नाव कमावले होते. आता तब्बल ५० वर्षांनंतर अजून एका मुंबईकर सलामीवीराने त्याच्याच पावलावर पाऊल ठेवले आहे. त्याच्या या कामगिरीकडे बघून एकच म्हणावेसे वाटते, “यशस्वी भव !!”

To know more about Crickatha