ball

अमेरिकेतील क्रिकेट – मेजर क्रिकेट लीगच्या निमित्ताने 

by कौस्तुभ चाटे

अमेरिका आणि क्रिकेट हे नातं काहीसं वेगळं आहे. क्रिकेट हा खेळ अमेरिकेत खूप आधी आला, अगदी १९व्या शतकात. अर्थातच इंग्लंडमधून अमेरिकेत गेलेल्या रहिवाश्यांनी हा खेळ तिथे रुजवायचा प्रयत्न केला. काही प्रमाणात ते यशस्वी झाले देखील. अमेरिका आणि कॅनडा हे दोन्ही देश १८३०-४० च्या सुमारास क्रिकेट खेळू लागले होते. अगदी पहिला कसोटी सामना होण्याच्या अनेक वर्षे आधी, साधारण १८४४ मध्ये या दोन देशांत क्रिकेटचे सामने खेळले गेले. ते काही वर्षे सुरु होते, पण हळूहळू अमेरिकेतील क्रिकेट कमी होत गेलं. २०व्या शतकाच्या सुरुवातीला परत एकदा ते क्रिकेट सुरु करण्याचे प्रयत्न झाले, पण त्याला फारसं यश मिळालं नाही. त्याच सुमारास इतर खेळांनी अमेरिकेत पाय रुजवले आणि क्रिकेट काहीसं बाजूला झालं. बास्केटबॉल, बेसबॉल सारख्या खेळांनी आता तिथे आपलं स्थान पक्कं केलं होतं. अमेरिका आणि क्रिकेट हे समीकरण कमीच होत होतं. पण तरीही मुख्यतः भारतीय उपखंडातून अमेरिकेत स्थायिक झालेल्या स्थलांतरितांनी क्रिकेट जिवंत ठेवलं होतं. शेजारच्या कॅनडामध्ये (मुळातच ब्रिटिश वसाहत असल्याने) क्रिकेट सुरु होतंच. तशातच अनेक वर्षांपूर्वी बंद पडलेला ऑटी कप (अमेरिका आणि कॅनडा यांच्या दरम्यान खेळला जाणारा) परत एकदा सुरु करण्याचे प्रयत्न झाले. मध्येच २-३ वर्षे अमेरिकेत वेस्टइंडीज आणि अजून एक आंतरराष्ट्रीय संघ यातील टी-२० सामने खेळले गेले. काही ना काही पद्धतीने अमेरिकेतील क्रिकेटला जिवंत ठेवण्याचे प्रयत्न सुरु होते.  त्यातच २ वर्षांपूर्वी मेजर लीग क्रिकेट (MLC) ची घोषणा झाली, आणि पुन्हा एकदा अमेरिकेत क्रिकेटचे वारे वाहू लागले. 


ही MLC म्हणजे क्रिकेट विश्वातील अजून एक मोठी आणि वेगळी लीग. जगभर आता लीग क्रिकेटचं एक फॅड आलं आहे. आयपीएलच्या यशानंतर प्रत्येक देशात एक वेगळी लीग सुरु झाली. त्यातल्या बऱ्याचश्या सुरु होताच बंद झाल्या, काही लीग्स बंद होऊन परत नव्याने सुरु झाल्या. खऱ्या अर्थाने या लीग्समध्ये आयपीएल आणि बीबीएल टिकून आहेत. इतर लीग्सचं भविष्य काय असेल हे सांगणं अवघड आहे. एकीकडे या लिग्सचा सुळसुळाट होत असतानाच अमेरिकेसारख्या देशात क्रिकेटचा प्रचार आणि प्रसार होणे आयसीसीची गरज होऊन बसली होती. एकूणच जगाच्या नकाशावर अमेरिकेचा पगडा मोठा आहे. त्यावेळी खेळाच्या (किंवा क्रिकेटच्या) दुनियेत अमेरिका देखील आली तर त्याचा आयसीसीच्या, आणि पर्यायाने क्रिकेटलादेखील फायदाच होणार आहे. हो – नाही करता करता २०२३ मध्ये या मेजर क्रिकेट लीगने अमेरिकेत पदार्पण केले. ६ शहरांचे ६ संघ आणि २ शहरांत होणाऱ्या या स्पर्धेने अमेरिकेत नाही म्हटले तरी थोडी हवा करायला सुरुवात केलीच आहे. जगातील इतर यशस्वी झालेल्या लीग्सच्या धर्तीवरच या लीगची देखील रचना करण्यात आली आहे, आणि अर्थातच जगभरातील अनेक खेळाडू या लीगमध्ये भाग घेत आहेत. 

१३ जुलै पासून सुरु झालेली ही स्पर्धा पुढचे १५ दिवस चालेल, आणि ३० जुलै रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना हौल MLC चा पहिला विजेता आपल्यासमोर असेल. लॉस अँजेलिस, न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को, सिएटल, टेक्सास आणि वॉशिंग्टन अशा सहा संघात या वर्षीची स्पर्धा होत आहे. हे बहुतेक संघ हे भारतीय उपखंडातील (ते खासकरून आयपीएल संघ मालकांचे) संघ मालकांचे संघ आहेत. या पहिल्या वर्षीच्या स्पर्धेत सुनील नरेन, कायरॉन पोलार्ड, फाफ डू प्लेसी, आरोन फिंच, आंद्रे रसेल, जेसन रॉय, टीम डेव्हिड, रशीद खान, ट्रेंट बोल्ट, शादाब खान, क्विंटन डी कॉक, डेवोन कॉनवे सारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू भाग घेत आहेत. यापैकी बहुतेक खेळाडू जगभरातील लीग मध्ये खेळत असतात. त्याचबरोबर अमेरिकेमध्ये क्रिकेट खेळणारे किंवा त्या देशाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे काही महत्वाचे खेळाडू देखील या स्पर्धेत दिसत आहेत. जसकरण मल्होत्रा, सौरभ नेत्रावळकर, अली खान, गजानंद सिंग, मोनांक पटेल, स्टीव्ह टेलर, शुभम रांजणे अशी काही नावे घेता येतील. भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार उन्मुक्त चंद, न्यूझीलंडचा कोरी अँडरसन किंवा श्रीलंकेचा शेहान जयसूर्या  खेळाडू देखील अमेरिकेकडून आपलं भविष्य जोखण्याचा एक प्रयत्न करत आहेत.  या सर्वांसाठीच ही लीग महत्वाची असणार आहे. 

ही स्पर्धा आता साधारण मध्यावर आली असताना चांगली रंगेल असे वाटते आहे. कोरी अँडरसन आणि आंद्रे रसेल सारखे फलंदाज तसेच सौरभ नेत्रावळकर, मोहम्मद मोहसीन सारखे गोलंदाज या स्पर्धेत चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. अर्थात अजून अनेक सामने होणे बाकी आहे, पण एकूणच या स्पर्धेच्या निमित्ताने अमेरिकेसारख्या खंडप्राय देशाला क्रिकेटची चव चाखायला मिळत आहे हे नक्की. ही स्पर्धा सुरु करण्यामागे, पुढे नेण्यासाठी, समर्थन करण्यात भारत, पाकिस्तान, श्रीलंकेतून अमेरिकेत गेलेल्या अनेक क्रिकेटप्रेमींचे प्रयत्न आणि उत्साह आहे. क्रिकेट लोकप्रिय होण्यामागे त्याचे जगभर होणारे प्रसारण हा देखील महत्वाचा भाग आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने या वेगळ्या भूमीत खेळले जाणारे क्रिकेट देखील जगभरातील क्रिकेट रसिकांसमोर येते आहे. आणि अर्थातच आयसीसीला देखील हे हवंच आहे. ही स्पर्धा जितकी लोकप्रिय होईल, तितके अमेरिकेचे क्रिकेटशी ऋणानुबंध दृढ होतील. अमेरिकेत क्रिकेटचा प्रचार आणि प्रसार करणे हे आयसीसी समोरचे एक उद्दिष्ट आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने ही गोष्ट साध्य व्हायला मदत होईल. २०२३ मध्ये सुरु झालेले हे MLC चे पहिलेच वर्ष. अजूनही ही स्पर्धा रुजायला, पुढे जायला कदाचित २-३ वर्षे जातील सुद्धा. पण अथक प्रयत्नांनी सुरु झालेली ही अमेरिकन लीग चालणे, मोठी होणे, क्रिकेट प्रेमींपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळेच अमेरिकेत क्रिकेटचे वारे परत एकदा वाहू लागतील. अर्थात, त्याचे कदाचित काही दुष्परिणाम असतीलही, पण सध्यातरी क्रिकेट प्रसाराकडे लक्ष देऊया. 

To know more about Crickatha