ball

एक पर्व संपलं 

by कौस्तुभ चाटे

तो इंग्लिश संघात येऊन जेमतेम एक वर्षच झालं होतं. क्रिकेटचं बाळकडू अगदी लहानपणापासून मिळालेलं. २००७ साली पहिल्या वाहिल्या टी-२० विश्वचषकात स्वारी खेळत होती. भारताविरुद्धच्या सामन्यात १९व्या षटकाच्या आधी युवराज सिंग आणि अँड्र्यू फ्लिन्टॉफ यांच्यात काही वादावादी झाली आणि त्याचं सारं उट्ट युवराजने त्या षटकात काढलं. सहा चेंडूत सहा षटकार मारत युवराजने त्या गोलंदाजांची पिसं काढली होती. त्याच्या जागी इतर कोणताही गोलंदाज कदाचित पूर्णपणे खचला असता, पण तो उभा राहिला. झालेली गोष्ट विसरून त्याने क्रिकेटच्या तीनही फॉरमॅट्स मध्ये आपलं स्थान पक्कं केलं. गेली सुमारे १६-१७ वर्षे क्रिकेट खेळणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडने अखेरीस आपली निवृत्ती जाहीर केली. १६५ कसोटी, १२१ एकदिवसीय सामने आणि ५६ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळणारा ब्रॉड गेल्या १० वर्षातील इंग्लंड संघाचा प्रमुख गोलंदाज होता. या तीनही फॉरमॅट्समध्ये मिळून सुमारे ८५० बळी घेणे हे निश्चितच साधे काम नाही. 


स्टुअर्टच्या घरातच क्रिकेट होतं. वडील ख्रिस ब्रॉड उत्तम क्रिकेट खेळायचे. ते जवळजवळ १५-१६ वर्षे इंग्लिश काउंटी मध्ये खेळले. सुमारे ४-५ वर्षे त्यांनी इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये प्रतिनिधित्व केलं. ख्रिस सलामीचे फलंदाज तर मुलाने – स्टुअर्टने वेगवान गोलंदाजीचा मार्ग पत्करला. खरं तर सुरुवातीला त्याने देखील फलंदाज होण्याचं ठरवलं होतं. शालेय जीवनात तो चांगली फलंदाजी करत असे देखील, पण साधारण वयाच्या सतराव्या वर्षी त्याने वेगवान गोलंदाजीला जास्त जवळ केलं. शाळेत तो क्रिकेट बरोबरच हॉकी देखील खेळत असे. आणि विशेष म्हणजे तो हॉकी संघात गोलकीपर होता. अगदी इंग्लिश हॉकी संघाच्या निवड चाचणीला देखील साहेब गेले होते. पण त्या तरुण वयात क्रिकेटकडे पावले वळली ती कायमचीच. त्या काळात इंग्लिश क्रिकेट एका संक्रमणातून जात होतं. (ते कधी नसतात… इंग्लिश क्रिकेट मध्ये सदैव काहीतरी उहापोह सुरूच असते…पण तो वेगळा विषय.) इंग्लंडमध्ये, प्रामुख्याने युवा वर्गात क्रिकेटची क्रेझ कमी होत होती. संपूर्ण इंग्लंड फुटबॉलने झपाटलंच होतं. अशावेळी तो काउंटी क्रिकेट खेळायला लिसेस्टरशायर कडून मैदानावर उतरला. इंग्लंडमध्ये काही वर्षांपूर्वीच टी-२० क्रिकेटची सुरुवात झाली होती. टी-२०, नंतर लिस्ट ए (एकदिवसीय सामने) करत करत पुढे तो ४ दिवसांचे सामने (फर्स्ट क्लास) खेळू लागला. उत्तम वेग, अचूक टप्पा आणि चांगली लाईन अँड लेंग्थ हे त्याच्या गोलंदाजीचं वैशिट्य म्हणता येईल. काउंटी क्रिकेटमधला त्याची कामगिरी बघून २००६ मध्ये त्याला इंग्लिश संघात खेळण्याची संधी मिळाली. 

ऑगस्ट २००६ मध्ये त्याने इंग्लंडसाठी टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच टी-२० सामन्यात त्याने आपली छाप सोडली होती. आपल्या दुसऱ्याच षटकात त्याने शोएब मलिकला पायचीत केलं आणि पुढच्याच चेंडूवर एका अप्रतिम बाउन्सरवर युनूस खानला यष्टिरक्षकाद्वारे झेलबाद. आपल्या पहिल्याच सामन्यात तो हॅट्ट्रिकवर होता. ती मिळाली नाही, पण स्टुअर्ट ब्रॉडने आपलं पदार्पण गाजवलं होतं. पुढे दोनच दिवसांनी तो पाकिस्तान विरुद्धच आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला. त्या मालिकेत त्याची कामगिरी तशी यथातथाच होती. ५ सामन्यात ५ बळी, त्यात साऊथहॅम्प्टन मधील सामन्यात ५७ धावांत ३ बळी. स्टुअर्ट ब्रॉडचा इंग्लंडसाठी आंतर्राष्ट्रीय क्रिकेटचा प्रवास सुरु झाला होता. २००७ मध्ये त्याला कसोटी खेळायची संधी मिळाली. श्रीलंकेविरुद्ध कोलंबोमध्ये त्याने कसोटीत पदार्पण केले. त्या सामन्यात त्याने एक बळी मिळवला होता. २००८ पासून तो अव्याहतपणे इंग्लंडसाठी कसोटी खेळतोच आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, भारत, पाकिस्तान, वेस्टइंडीज, श्रीलंका… बहुतेक सर्वच संघांविरुद्ध – इंग्लिश खेळपट्ट्यांवर आणि बाहेरही, त्याने चांगली कामगिरी केली आहे.

तो संघात आला तेंव्हा इंग्लंडकडे डॅरेन गॉफ, स्टिव्ह हार्मिसन, ख्रिस ट्रेमलेट सारखे गोलंदाज होते. प्रत्येकाची शैली निराळी, प्रत्येकाचा प्रभाव वेगळा. पण त्याही स्थितीत त्याने स्वतःचे स्थान निर्माण केले. पुढे दोन चार वर्षातच या गोलंदाजांनी आपली निवृत्ती जाहीर केली, आणि खऱ्या अर्थाने ब्रॉडकडे इंग्लिश गोलंदाजीची सूत्रे आली. जोडीला आणखी एक भिडू होताच. जेम्स अँडरसन, partner in crime. २०१०-११ नंतर दोघांनी खऱ्या अर्थाने क्रिकेट गाजवायला सुरुवात केली. वेगवान गोलंदाज कायमच जोडीने शिकार करतात. अँडरसन-ब्रॉड देखील काही वेगळे नव्हते. जगातल्या प्रत्येक खेळपट्टीवर दोघेजण दहशत म्हणूनच वावरत होते. इंग्लिश खेळपट्टीवर आणि हवामानात त्यांची जोडी जास्तच खुलायची. दोघेही आक्रमक गोलंदाज. फलंदाज चूक करण्याची वाट न पाहता, आपली चाल रचून त्याला बाद करण्यात दोघांचाही हातखंडा. अचूक टप्पा आणि स्विंग हे दोघांचंही अस्त्र. पण इतकं सगळं असूनही दोघेही वेगळे होते. अँडरसन आणि ब्रॉड, दोघेही एकत्र तब्बल १३८ कसोटी सामने खेळले आहेत, आणि दोघांनी मिळून थोड्या थोडक्या नाही तर ५४० च्या आसपास बळी टिपले आहेत. बरं, हे दोघे खेळत असतानाच जगभर उत्तमोत्तम फलंदाज होतेच. मायकल क्लार्क, स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, हाशिम अमला, विराट कोहली, बाबर आझम, केन विलियम्सन सारखे अनेक फलंदाज क्रिकेट जगतावर राज्य करत होते. अशावेळी या दोन गोलंदाजांनी आपला दरारा कायम ठेवला होता. 

स्टुअर्ट ब्रॉडने २०१५-१६ नंतर एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित केलं. गेली ७-८ वर्षे तो अव्याहतपणे इंग्लिश कसोटी संघाची धुरा आपल्या खांद्यावर वाहत आहे. इंग्लंडच्या कोणत्याही क्रिकेटपटूंचा ऍशेस (इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया) मालिका जीव की प्राण. ब्रॉड देखील काही वेगळा नाही. या दोन देशांमधलं द्वंद्व काही वेगळंच आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तब्बल ४० कसोटी सामन्यात तो खेळला, आणि एकूण १५० पेक्षा जास्त बळी त्याने मिळवले. कोणत्याही खेळाडूला, खास करून वेगवान गोलंदाजाला हेवा वाटावा असे हे रेकॉर्डस्. प्रत्येक ऍशेस मालिकेत त्याने उत्तम कामगिरी केली. इंग्लिश खेळपट्टी असो किंवा ऑस्ट्रेलियन, ब्रॉड कायमच प्रभावी ठरला. २०१५ च्या नॉटींगहॅम कसोटीत त्याने कमाल केली. बलाढ्य ऑस्ट्रेलियन फलंदाजीला त्याने गुढगे टेकायला लावले होते. केवळ ९ षटकात १५ धावांच्या मोबदल्यात त्याने ८ फलंदाज बाद केले. त्या ऑस्ट्रेलियन संघात दादा फलंदाज होते, पण एकाचेही काही चालले नाही. त्यादिवशी ब्रॉड चांगलाच फॉर्मात होता. ही त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी. ब्रॉडने कदाचित खोऱ्याने फलंदाज नसतील बाद केले, पण तो कायम बळी मिळवत असे. सुसंगतता आणि प्रभाव हे त्याच्या गोलंदाजीची वैशिष्ट्य म्हणता येईल. 

एकूणच २०१० हे दशक स्टुअर्ट ब्रॉडने गाजवले असे नक्की म्हणता येईल. अजून एक महत्वाचा रेकॉर्ड म्हणजे त्याने पाकिस्तान विरुद्ध एक तडाखेबंद शतक केलं होतं. २०१० साली लॉर्ड्सवर १६९ धावा करताना त्याने तब्बल १८ चौकार आणि १ षटकार मारले होते. विशेष म्हणजे त्याने हे शतक नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना केलं होतं. याव्यतिरिक्त त्याने अनेकदा अर्धशतकी खेळी करून इंग्लिश फलंदाजीला आधार दिला आहे. अर्थात तो कायम ओळखला जाईल ते त्याच्या गोलंदाजीसाठीच. स्टुअर्ट ब्रॉड-जेम्स अँडरसन ही जोडी इंग्लिश आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील कायमच लक्षात राहील. या मालिकेनंतर बहुतेक दोघेही निवृत्त होतील, पण ६०० बळी मिळवणारे हे दोघेही गोलंदाज कायमच विशेष असतील. २००७ साली युवराजने सहा षटकार मारल्यानंतर हा कमबॅक करणं सोपी गोष्ट नाही. एखादा गोलंदाज त्या ओझ्यानेच दबला असता, पण स्टुअर्ट ब्रॉड सारखा खेळाडू ते करू शकला यातच त्याचा ग्रेटनेस दिसून येतो. एकूणच स्टुअर्ट ब्रॉडने क्रिकेट रसिकांना खूप काही दिलं आहे. थँक यु स्टुअर्ट, निवृत्तीनंतरचे तुझे आयुष्य आनंदी असो. Happy Retirement.

To know more about Crickatha