ball

भारतीय वेगवान गोलंदाज 

by कौस्तुभ चाटे

भारत ही फिरकी गोलंदाजांची खाण समजली जात असे. अगदी सुरुवातीच्या दिवसांपासून भारतीय फिरकीने क्रिकेटजगतात आपले स्थान मिळवले. विनू मंकड, सुभाष गुप्तेंपासून सुरु झालेली ही परंपरा आताच्या काळातील कुलदीप यादव, युझवेन्द्र चाहल पर्यंत अबाधित आहे. बेदी, प्रसन्न, चंद्र आणि वेंकट हे तर या फिरकी गोलंदाजीची मानबिंदूच. अनिल कुंबळे, हरभजन सिंग आणि नंतर आलेल्या रविचंद्रन अश्विन सारख्या गोलंदाजांनी फक्त कसोटीच नव्हे, तर एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट मध्ये देखील चमक दाखवली. आपण फिरकी गोलंदाजीतले दादा असलो तरी वेगवान गोलंदाजी हे आपलं अस्त्र कधीच नव्हतं. खरं सांगायचं तर अगदी सुरुवातीच्या काळात मोहम्मद निसार आणि अमर सिंग सारखे दर्जेदार वेगवान गोलंदाज आपल्याकडे होते. भारताच्या पहिल्या कसोटीत (१९३२ साली), त्यांनी इंग्लिश फलंदाजांच्या नाकी नऊ आणले होते. त्यानंतर एखादा रमाकांत देसाई सारखा वेगवान गोलंदाज भारताला लाभला. पण आपली भिस्त कायमच फिरकी गोलंदाजांवर होती. कपिल देवच्या आगमनानंतर हे चित्र थोडंफार बदलत गेलं. कपिलच्या जोडीला करसन घावरी, रॉजर बिन्नी, चेतन शर्मा आदी मंडळींनी भारतीय क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजीला जरा बरे दिवस दाखवले. ९० च्या दशकात जवागल श्रीनाथ भारतीय संघात आला, आणि वेग म्हणजे काय हे आपल्याला उमगलं. पाठोपाठ काही वर्षात अजित आगरकर, झहीर खान, आशिष नेहरा, रुद्रप्रताप सिंग, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार सारखे गोलंदाज देखील भारतीय संघाचा महत्वाचा भाग बनू लागले. २००० च्या दशकात खऱ्या अर्थाने आपण वेगवान गोलंदाजी बघितली असे म्हणता येईल. 


अर्थात या संपूर्ण कालावधीत क्रिकेट देखील बदलत होतंच. आता टी-२० क्रिकेट देखील बहरत होतं आणि क्रिकेटचे आयाम देखील बदलले होते. जगभरच वेगवान गोलंदाजी अधिकच वेगवान होत होती. त्याचे पडसाद भारतीय क्रिकेटवर देखील उमटत होते. गेल्या १० वर्षात आपण अनेक वेगवान गोलंदाजांचा खेळ बघितला. त्यात आयपीएलच्या आगमनानंतर तर प्रत्येक संघात ४-५ भारतीय वेगवान गोलंदाज दिसू लागले. त्यातले काही चमकले, काही काळाच्या ओघात हरवले. पण नवीन गोलंदाज पुढे येण्याचा आयपीएल हा ‘राजमार्ग’ अजूनही तसाच आहे. ती खेळाची गरज आहे, आयपीएल क्रिकेट हे या वेगवान गोलंदाजांना अवघड परिस्थितीमध्ये अजूनच समृद्ध करून जातं हे देखील खरं आहे. आणि अर्थातच त्याचा भारतीय क्रिकेटला सर्वात जास्त फायदा होतो. गेल्या ८-१० वर्षात आपण जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर सारखे भन्नाट गोलंदाज पहिले. यातल्या प्रत्येकाची शैली वेगळी, प्रत्येकाचा वेग वेगळा आणि प्रत्येकाचा प्रभाव निराळा. कदाचित त्यामुळेच आज आपल्याला आपली गोलंदाजी, खास करून वेगवान गोलंदाजी अधिकच बहरल्या सारखी वाटते. आज संघात प्रमुख वेगवान गोलंदाज उपलब्ध नसेल, तर त्याची जागा घेण्यासाठी आपल्याकडे इतर ४ गोलंदाज तयार आहेत. आणि महत्वाचं म्हणजे हे गोलंदाज कदाचित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनुभवी नसतील कदाचित, पण आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर खेळण्याचा अनुभव, आणि त्यांची प्रतिभा यामुळे ते आणखीनच प्रभावी ठरतात. 

मागच्या आठवड्यात बुमराहने भारतासाठी पुनरागमन केले. तो गेले जवळजवळ वर्षभर दुखापतीमुळे संघाबाहेर होता. बुमराह सारख्या गोलंदाजांची कमतरता कोणत्याही संघाला निश्चितच जाणवते, पण इतर गोलंदाजांमुळे तो नसणे हे काहीसे सुसह्य झाले. त्याच्या अनुपस्थितीमध्ये मोहमद सिराज सारखा गोलंदाज अधिकच प्रगल्भ झाला, तर उमेश यादव, शार्दूल ठाकूर सारखे गोलंदाजांना संघात आपले स्थान बळकट करण्याची संधी मिळत गेली. मोहम्मद शमी सारखा गोलंदाज भारतीय क्रिकेटचा प्रमुख वेगवान गोलंदाज झाला तर उमरान मलिक, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार सारखे गोलंदाज भारतीय संघात येण्याची स्वप्ने बघू लागले. यातील काही चमकले, तर काही काळाच्या पडद्याआड गेले, जातीलही. पण एक गेला की अजून काही खेळाडू  या न्यायाने इतर अनेक वेगवान गोलंदाज आज रांगेत उभे आहेत. गेल्या काही वर्षात आयपीएल आणि अंडर १९ संघांच्या यशामुळे अनेक उत्तमोत्तम वेगवान गोलंदाज आपल्यासाठी  विविध स्तरांवर खेळताना दिसतात. टी. नटराजन, शिवम मावी, कमलेश नागरकोटी, कार्तिक त्यागी, राजवर्धन हंगर्गेकर, तुषार देशपांडे ही त्यातलीच काही महत्वाची नावं. पुढेमागे ते भारतासाठी खेळतीलही, पण आजच्या घडीला भारतीय वेगवान गोलंदाजांच्या यादीत हे खेळाडू आहेत हे नक्की. 


काही वर्षांपूर्वी भारतात सुरु झालेल्या MRF पेस अकॅडमीने ९० आणि २००० च्या दशकात चांगली फळे दिली. तिथून येणारे गोलंदाज बऱ्यापैकी तावून सुलाखून निघत. ‘वेग’ ही गोष्ट मानवाला प्रभावित करणारीच आहे. नुकतीच गोलंदाजीची सुरुवात केलेले हे ‘रॉ’ खेळाडू त्यापासून दूर कसे असणार? भारतातील क्रिकेट फोफावत गेलं तसं इथे या वेगवान गोलंदाजांचा एक वेगळा क्लास दिसू लागला. हे गोलंदाज ऑस्ट्रेलिया, इंग्लंड सारख्या खेळपट्ट्यांवर कमाल करत होतेच, पण ते आता भारतीय खेळपट्ट्यांवर देखील धमाल करू लागले.  कपिलच्या उदयानंतर आपल्या वेगवान गोलंदाजीचा पहिला अध्याय सुरु झाला होता, इशांत-बुमराह-शमी नंतर आता दुसरा अध्याय सुरु झाला आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. अर्थात इतर वेगवान गोलंदाजांप्रमाणेच आपले गोलंदाज देखील ‘वेगवान’ गोलंदाजांना येणाऱ्या समस्यांना तोंड देत असतातच. त्यांना जाणाऱ्या दुखापती ही सगळ्यात मोठी समस्या. त्यादृष्टीने प्रत्येक गोलंदाजाने स्वतःची आणि भारतीय बोर्डाने आपल्या सगळ्याच गोलंदाजांची काळजी घेणे आवश्यक ठरते. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने, कमी जास्त प्रमाणात हे करत असतोच, आणि त्यात काही चुका देखील होतात. पण ही एक प्रोसेस आहे, आणि या गोष्टी नैसर्गिकरित्या घडत राहणारच. 

हे वेगवान गोलंदाज भारतासाठी चांगली कामगिरी करून येणाऱ्या काळात आपल्याला चांगले विजय मिळवून देवो हीच अपेक्षा आहे. वेगवान गोलंदाजांचा कार्यकाळ, अपवाद वगळता, खूपच कमी असतो. अशावेळी दुखापतग्रस्त न होता, देशासाठी चांगला खेळ करणे ही त्यांची जबाबदारी ठरते. आणि आता अगदी तरुण वयात असलेले हे खेळाडू नक्कीच त्यांच्या बॉलिंग विषयी, वेगाविषयी, अचूकतेविषयी जागरूक आहेत. आणि म्हणूनच भारतीय वेगवान गोलंदाजांचे भविष्य उज्ज्वल आहे असे म्हणता येईल. आता भारत ही केवळ फिरकीपटूंची भूमी राहिली नसून, या मातीत उत्तमोत्तम वेगवान गोलंदाज देखील चांगली कामगिरी करत आहेत ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. 

To know more about Crickatha