ball

कसोटी क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट -विराट कोहली. 

३० डिसेंबर २०१४. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील शेवटचा दिवस. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यात महेंद्रसिंग धोनी आणि अश्विन यांनी टिच्चून केलेल्या फलंदाजीमुळे भारताला सामना अनिर्णित राखण्यात यश मिळाले. धोनी नेहमीप्रमाणे पत्रकार परिषदेला जाऊन आला आणि ड्रेसिंग रूम मध्ये त्यानी सर्व खेळाडूंना जमा करून आपण कसोटी क्रिकेटमधून रिटायरमेंट घेत आहोत असे जाहीर केले. सर्व खेळाडूंसाठी हा आश्चर्याचा धक्का होता. कोणाच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हते कि धोनी असा काहीतरी निर्णय घेईल म्हणून. मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी धोनीने कसोटी क्रिकेटचा त्याग केला होता.

आता, भारताचा कर्णधार कोण होणार याची उत्सुकता सर्व क्रिकेट जगताला लागली होती. कसोटी क्रिकेट मध्ये कर्णधार पदासाठी एकच नाव सर्वांच्या डोळ्यासमोर होते ते म्हणजे विराट कोहलीचे. ऑस्टरेलियाविरुद्धच्या सिडनी मध्ये होणाऱ्या शेवटच्या सामन्यात विराटला कसोटी संघांचे नेतृत्व देण्यात आले. बचावात्मक पवित्रा घेणे विराटच्या स्वभावात न बसणारे होते. सिडनी कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारताला जिंकण्यासाठी ३४८ धावांची आवश्यकता होती.

 कोहलीने सर्व टीम ला एकत्र करून सांगितले की शेवटच्या डावात ३४८ धावांचा पाठलाग करणे सोपी गोष्ट नसली तरीही आपण आक्रमक क्रिकेटच खेळायचे. भले, तसे करताना आपल्याला सामना गमवावा लागला तरी चालेल पण आपण नेहमी जिंकण्याचा विचार करायचा, सामना अनिर्णित ठेवण्यासाठी खेळायचे नाही. ही कोहलीची आक्रमक विचारसरणी भारतीय टीम ला कसोटी क्रिकेट मध्ये वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार होती. ही सुरुवात होती एका वेगळ्या विराट पर्वाची…..

मायदेशात टीम इंडिया अभेद्य…

विराट कोहलीने जेव्हापासून भारतीय कसोटी टीम चे नेतृत्व करायला सुरुवात केली तेव्हापासून आजतागायत भारताने मायदेशात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. भारताने २०१२ साली शेवटची कसोटी मालिका इंग्लंडविरुद्ध गमावली. त्यावेळी धोनी भारतीय टीम चे नेतृत्व करत होता. त्यानंतर २०१३ च्या ऑस्ट्रेलियाच्या मालिकेपासून ते डिसेंबर २०२१ पर्यंतच्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपर्यंत भारताने सलग १४ मालिकांमध्ये विजय मिळवला आहे.

विराट कोहली भारतीय टीम चा कर्णधार झाल्यापासून भारताने मायदेशात फक्त २ कसोटी गमावल्या आहेत यावरून भारताला भारतामध्ये येऊन हरवणे किती अवघड आहे याचा अंदाज येऊ शकतो. मायदेशात सलग १४ कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे. यांनतर नंबर लागतो कांगारूंचा. त्यांनी  घरच्या मैदानावर सलग १० कसोटी मालिका जिंकल्या होत्या. 

SeriesNO. of TestsResult
2012-2013 – India v. England4Eng 2-1
2013 – India v. AustraliaIndia 4-0
2013-2014 – India v. West IndiesIndia 2-0
2015-2016 – India v. South AfricaIndia 3-0
2016-2017 – India v. New ZealandIndia 3-0
2016-2017 – India v. EnglandIndia 4-0
2016-2017 – India v. BangladeshIndia 1-0
2016-2017 – India v. AustraliaIndia 2-1
2017-2018 – India v. Sri LankaIndia 1-0
2017-2018 – India v. AfghanistanIndia 1-0
2018-2019 – India v. West IndiesIndia 2-0
2019-2020 – India v. South AfricaIndia 3-0
2019-2020 – India v. Bangladesh2India 2-0
2020-2021 – India v. England4India 3-1
2021-2022 – India v. New Zealand 2India 1-0

परदेशातही टीम इंडियाचा दबदबा…

भारतीय टीमच्या घरच्या मैदानावरील कामगिरीबाबत कोणाच्या मनात तसूभरही शंका नव्हती. पण, भारतीय संघाची विदेशातील कामगिरी खऱ्या अर्थाने सुधारली जेव्हा विराट कोहली टीमचा कर्णधार झाला. धोनी कर्णधार असताना भारतीय टीमने  ऑस्ट्रेलियामध्ये आणि इंग्लंडमध्ये ४-० असा सपाटून मर खाल्ला होता. २०१८ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून भारतीय टीमच्या कामगिरीमध्ये लक्षणीय फरक पडला.

त्या दौऱ्यात भारताने जोहान्सबर्ग येथे झालेल्या अतिशय  अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवला. भलेही भारताने ती मालिका २-१ अशी गमावली पण टीमचा नवा अवतार सगळ्यांना पाहायला मिळत होता. त्याच वर्षी भारत इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला. तिथेही भारताला फक्त एक सामना जिंकण्यात यश मिळाले पण त्या संपूर्ण मालिकेत भारतीय टीम ने खूप आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले होते.

२०१८ चा ऑस्ट्रेलिया दौरा भारतीय टीम साठी खूप ऐतिहासिक ठरला. भारताने तब्बल ७० वर्षांनंतर कांगारूंना त्यांचाच मैदानावर धूळ चारली आणि मालिका २-१ अशी खिशात घातली. याच कामगिरीची पुनरावृत्ती भारताने पुढच्या म्हणजेच २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर केली आणि कांगारूंना २-१ अशी मालिका गमवावी लागली. रिषभ पंतने केलेल्या तुफान फलंदाजीमुळे भारतने कांगारूंना ब्रिसबेन येथील कसोटी सामन्यात मात देत मालिकाविजय मिळवला.

२०२१ च्या इंग्लंड दौऱ्यात धमाकेदार कामगिरी केली. पहिल्या चार सामन्यात भारताने २-१ अशी आघाडी घेतली. पाचवा सामना कोविडच्या उद्रेकामुळे पुढे ढकलण्यात आला. तो सामना या वर्षी जुलै महिन्यात खेळवण्यात आला. इंग्लंडने सामना जिंकल्यामुळे मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली. गेल्या काही वर्षात भारतीय टीमच्या विदेशातील कामगिरीत कमालीची सुधारणा झाली.

गांगुली, धोनी आणि विराट- भारताचा सर्वोत्कृष्ठ कसोटी कर्णधार कोण?

गंगीली, धोनी आणि  विराट कोहली यांच्या कर्णधारपदाची तुलना करायला गेल्यास विराट कोहलीने भारताचे सर्वाधिक म्हणजे ६८ कसोटी  सामन्यात नेतृत्व केले आहे. त्यापैकी ४० कसोटी सामन्यात विजय मिळवण्यात त्याला यश मिळाले. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय टीम ऑक्टोबर २०१६ ते मार्च २०२० असे सलग चार वर्ष कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर होती.

कोहलीच्या नेतृत्वाखालीच भारतीय टीमची परदेशातील कामगिरी सुधारली.विदेशात ३६ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय टीम चे नेतृत्व करताना कोहलीने सर्वाधिक १६ विजय मिळवले. महेंद्रसिंग धोनीची घरच्या मैदानावरील कामगिरी चांगली असली तरी त्याला विदेशात विशेष असे यश मिळाले  नाही. ६० सामन्यांमध्ये नेतृत्व करताना धोनीने २७ कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवला.

गांगुलीने ४९ सामन्यांमध्ये भारतीय टीमचे नेतृत्व करताना २१ विजय मिळवले त्यापैकी ११ विजय हे परदेशात जाऊन मिळाले होते.

PlayerMatchesWonLostDraw Win %
ViratKohli6840171158.82
MS Dhoni6027181545
SouravGanguly4921131542.85

क्रिकेटस्मृतीची चाळता पाने…

परवा एका चॅनेलवर क्रिकेट मॅच दुसऱ्या वाहिनीवर फुटबॉलचा सामना आणि तिसऱ्यावर वाहिनीवर टेनिसचा सामना प्रसारित होत होता. तिन्ही खेळात रस असल्यामुळे मधल्या ब्रेक मध्ये इकडून तिकडे रिमोटचा प्रवास चालू होता. मध्येच सहज चित्रपट वहिनींकडे लक्ष गेले तर एका वाहिनीवर ‘राजा हिंदुस्थानी’, दुसरीकडे ‘अग्नीसाक्षी’ तर तिसऱ्या वाहिनीवर ‘दिलजले’ हे चित्रपट चालू होते. खरंतर हे चित्रपट सारखेच चालू असतात पण त्या दिवशी सहज तोंडातून निघालं

“आज काय १९९६ वर्षातील चित्रपट दाखवणे चालू आहे की काय ?”

पुन्हा क्रिकेटच्या वाहिनीवर आलो तर तिथे ब्रेक मध्ये भारताच्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसोबत होणाऱ्या पुढील सामन्यांची जाहिरात चालू होती.

चित्रपटाचा विषय मनात होताच आणि मन १९९६ ह्या वर्षात गेले आणि आठवला तो टायटन कप.

भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका अश्या तिरंगी लढती ह्या टायटन कप मध्ये रंगल्या होत्या. ६ नोव्हेंबर ला मुंबई इथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून हा कप जिंकला होता. भारताच्या अश्या कितीतरी लढती आणि विजय आहेत. पण मला हा टायटन कप लक्षात आहे तो आणखी एका वेगळ्या कारणासाठी.

ते वेगळे कारण म्हणजे एक खेळाडू. रॉबिन सिंग. रॉबिन सिंग एक अष्टपैलू खेळाडू, संघाला आवश्यक तेव्हा धावा करणे आणि बळी मिळवून देणे हे काम तो चोख करत असे. इतकंच नाही तर एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याचे नाव घेतले जाते. १९८९ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले पण त्यानंतर तब्बल ७ वर्षे कुठलाही आंतरराष्ट्रीय सामना तो खेळला नाही. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या संघासोबत सामना खेळतांना भारतीय संघाला देखील तोडीचा संघ बनवणे आवश्यक होते. ह्या दोन्ही संघाच्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही बाजू मजबूत होत्या. भारताला सगळ्या बाजूने भरभक्कम संघ हवा होता. तेव्हा निवड समिती आणि कप्तान सचिन तेंडुलकर यांच्यात झालेल्या चर्चेनंतर रॉबिन सिंगला बोलावणे आले. निवड समिती आणि सचिन तेंडुलकर ह्यांनी केलेली आपली निवड किती सार्थ होती हे रॉबिन सिंग ने दाखवून दिले. क्षेत्ररक्षणात तर रॉबिन सिंग एक नंबरचे नाव होते.

रॉबिन सिंग आज सुद्धा लोकांना माहिती आहे, लक्षात आहे. आजही तो क्रिकेटच्या क्षेत्रात वेगवेगळ्या भूमिकेत काम करत आहे.

हे झाले रॉबिन सिंग बद्दल. पण ह्या सोबतीनेच मला एक फार मोठी खेळाडूंची यादी डोळ्यासमोर आली. आम्ही मित्र जेव्हा कधी किमयाला, गिरीजा किंवा वैशालीला भेटतो तेव्हा आवर्जून ह्या सगळ्यांचा विषय निघतो. दरवेळेला कुणीतरी नवीन खेळाडू आठवून जातो.

हृषीकेश कानिटकरने पाकिस्तानच्या विरुद्ध ढाका येते  १८ जानेवारी १९९८ साली  सिल्व्हर ज्युबिली स्वतंत्रता कप च्या अंतिम सामन्यात मारलेला चौकार अजूनही कोणीही विसरला नाही.

असेच एक नाव म्हणजे अतुल बेदाडे. जो त्याच्या षटकारांसाठी प्रसिद्ध होता आणि जेव्हा त्याला शारजाह मध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने काहीवेळा आपली षटकारांची ताकद दाखवली सुद्धा पण फार काळ काही त्याची कारकीर्द चालली नाही. सुनील गावस्कर तेव्हा सामन्याचे समालोचन करत होते आणि त्यांनी अतुल बेदाडेचे आडनावं ‘बदडे’ किंवा ‘बदडवे’ हवे असे म्हंटले होते.

अश्या बऱ्याच खेळाडूंच्या कथा आहेत.

तेव्हा क्रिकेटला आतासारख्या आयपीएल सारखी आकर्षकता नव्हती तरीही सलील अंकोला आणि इतर काही खेळाडू त्यांच्या देखणेपणा मुळे चर्चेत राहायचे. 

कालौघात अशी बरीच नावे आहेत जी मुख्य करून ९० च्या दशकातील आणि २०००च्या शतकातील पहिल्या दशकातील आहे की जे काही प्रमाणात लोकांना आठवतात. यातील काहीजण आयपीएल च्या माध्यमातून अजूनही काही जवाबदाऱ्या पार पाडत आहेत.

पंकज धर्मानी, सुजित सोमसुंदर, हेमांग बदानी, विजय यादव, नोएल डेव्हिड, डेव्हिड जॉन्सन, प्रवीण कुमार, देवाशिष मोहंती, एबी कुरुविला, निखिल चोप्रा, आकाश चोप्रा, आशिष कपूर, जतीन परांजपे, सदागोपन रमेश, डोडा गणेश, राहुल संघवी, अमेय खुरासिया, दीप दासगुप्ता, गगन खोडा अशी कितीतरी नावे आहेत जी अजूनही क्रिकेटप्रेमींच्या लक्षात आहेत.

हे आठवता आठवता आणखीन एक आठवलं, एकदा कुठल्याशा घोडेस्वारी स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता आणि त्याच दिवशी भारत आणि झिम्बाब्वे ह्यांच्यात एकदिवसीय सामना चालू होता. दोन्ही खेळात रंगत आली होती. खेळाचे प्रक्षेपण होत असे. दूरदर्शनवर दोन्ही खेळांचे आलटून पालटून प्रक्षेपण चालू होते. क्रिकेट रंगात आले आणि इतक्यात दूरदर्शनवर घोडेस्वारीचा सामना दाखवणे सुरु केले. सगळ्यांची बरीच चिडचिड झाली होती पण क्रिकेटच्या सामना अखेरच्या षटकात आला आहे हे पाहून दूरदर्शनवर सामन्याचे प्रक्षेपण पुन्हा सुरु झाले. घोडेस्वारी सुद्धा तितकाच रंगतदार खेळ पण तो आपल्याकडे तितका रुजला नाही ह्याउलट क्रिकेट म्हणजे सगळ्याचा जीव.

असो आता काळ बदलला आणि तंत्रही बदलले.

१९९६ चे चित्रपट आणि क्रिकेट सगळं डोळ्यासमोर येऊन गेलं. चालू असलेला सामना भारताने जिंकला. टीव्ही बंद करून पाय मोकळे करायला बाहेर पडलो. आजूबाजूला फार मोठ्या प्रमाणात इमारतींची पुनर्निर्मिती चालू आहे. अश्याच एका इमारतीच्या बाहेर एक वॉचमन मोबाईलवर गाणी ऐकत होता. गाण्याचे बोल होते “पुछो ना कैसा मजा आ राहा हैं” अमित कुमार आणि एस जानकी ह्यांच्या आवाजातील हे गाणे देव आनंद निर्मित-दिग्दर्शित आणि अमीर खान अभिनित विस्मृतीत गेलेल्या ‘अव्वल नंबर ह्या १९९० च्या चित्रपटातील आहे. हा चित्रपट क्रिकेट ह्या विषयाला वाहिलेला होता. असो तसही भारतात क्रिकेट आणि चित्रपट यांचं घट्ट नातं आहे. क्रिकेट आणि क्रिकेटचे वेगवेगळे सामने ह्यांच्याशी निगडित कितीतरी स्मृती आहेत पण त्यांची चर्चा पुन्हा कधीतरी.

मिशन टी-२० विश्वकप २०२२

भारतीय संघ २०२२चा आशिया कप हरला. ऑक्टोबर महिन्यात सुरू होणाऱ्या टी-२० विश्वकपच्या पार्श्वभूमीवर ही मोठी हार मानली जाते. आपण कर्णधार बदलला पण नशीब काही बदलले नाही. धोनीने आपल्या शांत स्वभावाने टी-२० विश्वकप, एकदिवसीय विश्वकप, चॅम्पियन्स ट्रॉपी जिंकून दिली मात्र विराट उत्तम कप्तान असूनही त्याला मोठी स्पर्धा जिंकता आली नाही. त्यात त्याची आयपीएलची झोळीही रिकामीच. म्हणून आयपीएलच्या सर्वात यशस्वी कर्णधाराला पाचारण करण्यात आले. पण आशिया कप हरल्याने नव्याने प्रश्नचिन्ह उभे राहिले. आता विश्वकप जिंकता येईल का अशी शंका क्रिकेटप्रेमींच्या मनात येऊ लागली. 

मी काही तज्ञ नाही पण तरीही मोठी स्पर्धा जिंकण्यासाठी काही मूलभूत गोष्टी लागतात असे मला वाटते. 

क्रिकेटच्या इतिहासात ज्या संघांनी मोठ्या स्पर्धा जिंकल्या त्या संघात किमान तीन अष्टपैलू खेळाडू होते. आता तुम्हीच उदाहरण पहा

2007 टी-२० – युवराज, सेहवाग, पठाण

2011 विश्वकप- सेहवाग, रैना, सचिन, युवराज

मुंबई इंडियनची ट्रॉपी- पोलार्ड, हार्दिक व कुणाल पंड्या

सध्या हार्दिक सोडला तर उत्तम अष्टपैलू नाही कारण जडेजा दुखापतीमुळे बाहेर आहे. आता बहुधा त्यात बुमराहचे नाव जोडावे लागणार. बुमराहची कमतरता भारताला खूप भासेल.

आपल्या खेळाडूंमध्ये जिंकण्याची जिद्द कमी पडते. ज्या इर्षेने श्रीलंका आशिया कप खेळली ती आपल्या संघात कमी वाटते. त्यामुळे कुठलेही मोठे नाव संघात नसताना तो संघ जिंकला. (खरं तर अपूर्ण सुविधा असूनही, देशात आणीबाणी असूनही ज्या जिद्दीने अफगाणिस्तान व श्रीलंका खेळली त्याला सलाम). क्रिकेट हा सांघिक खेळ आहे त्यामुळे जेव्हा प्रत्येक खेळाडू त्याचे योगदान देतो तेव्हा टीम जिंकते.

मोठ्या स्पर्धेत मोक्याचे क्षण काबीज नाही केले तर बाजी पलटले (१९९९ च्या विश्वकप स्पर्धेत गिब्सने किंवा २०२२ च्या आशिया कपमध्ये अर्शदिपने सोडलेला झेल किंवा २००७ & २०११च्या वेळी गंभीरची खेळी). हे क्षण भारताने गमावू नये.

फिनिशरचा रोल खूप महत्त्वाचा असतो. ऑस्ट्रेलिया साठी बेवन, भारतासाठी युवराज व धोनी, मुंबई इंडियन साठी पोलार्ड व पांड्या बंधूने जे केले तेच भारतासाठी सातत्याने हार्दिक किंवा कार्तिकने केले तर भारतासाठी संधी असेल. 

सध्या आपण संघात इतके बदल करतो की प्रत्येकाला त्याच्या रोलमध्ये राहता येत नाही. शिवाय भारतीय बेंच स्ट्रेंथ इतकी प्रतिभाशाली आहे त्यामुळे संघातील स्थान टिकण्याचा दबाव खेळाडूंना जाणवतो. यशस्वी संघ वारंवार बदल करत नाही आणि एखादा खेळाडू जर सर्वोत्तम खेळत नसेल तरी त्याला न बदलता बॅक करतात.

आपण स्पर्धा हरलो की जास्त चर्चा होते. त्यात सोशल मीडियाचे रान प्रत्येकाला मोकळे आहेच, ट्रोल व टीका करण्यासाठी. आपण आयपीएलला दोष देऊन मोकळे होतो. आयपीएल मध्ये खेळताना खेळाडू फिट असतो पण देशासाठी खेळताना जखमी होतो हा आपला समज आहे (जो पूर्णपणे चुकीचा आहे असेही नाही). पण मागच्या टी-२० विश्वकप स्पर्धेत काही विदेशी खेळाडूंनी चांगला खेळ केला होता आणि त्याचे श्रेय त्यांनी आयपीएलला दिले होते. म्हणजेच काय, आपल्या स्पर्धेचा अनुभव व फायदा विदेशी खेळाडूंना जास्त झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. दुसरी गोष्ट- आपण संघ निवडताना आयपीएलची कामगिरी डोळ्यासमोर ठेवून करतो. आयपीएल मध्ये चांगले खेळणारे खेळाडू देशासाठी खेळताना ढेपळतात (काही अपवाद वगळता). त्यामुळे एक गोष्ट पक्की, देशासाठी खेळणे वेगळे आणि क्लबसाठी खेळणे वेगळे. सध्या फुटबॉल प्रमाणे क्लब संस्कृती क्रिकेटमध्ये रुजू लागली आहे हेच सत्य नाकारता येत नाही. 

सरतेशेवटी नशीब. टी-२० विश्वकप २०२१, आशिया कप या दोन्ही स्पर्धेत आपण महत्त्वाच्या सामन्यात टॉस हरलो. काही झेल क्षेत्ररक्षकाकडे गेले नाही किंवा नो बॉल वर फलंदाज बाद झाला. त्यामुळे नशीब सोबत असणे खूप महत्त्वाचे आहे. 

शेवटी एक भारतीय क्रिकेट चाहता म्हणून एकच सांगतो- तुम्ही जिद्दीने खेळा. तुमच्या कडून १००% द्या. शेवटच्या क्षणापर्यंत हार मानू नका. मग स्पर्धेत काहीही हो, टीममध्ये कुठलाही खेळाडू असो, एक भारतीय म्हणून आम्ही आपल्या टीमसोबत भक्कमपणे उभे राहणार. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

क्रिकेटचा कालिदास..!!


 तो क्रिकेटवर ‘बोलतो’. खरं, परखड, स्पष्ट बोलतो. नर्मविनोद करतो, कोपरखळ्या मारतो, मर्मावर बोटही ठेवतो. खेळातलं आणि खेळाडूतलं वैगुण्य, आणि त्याचं कारण अचूक हेरतो. कुठलाही खेळाडू चांगला खेळला, की हातचा न राखता भरभरून कौतुकही करतो. मैदानावरच्या परिस्थितीचं एक एक धागा पकडून उत्तम विश्लेषण करतो. एखाद्याची दुखरी नस नेमकी पकडून जखम पुन्हा ओली करण्याचं कसबही त्याच्याकडं आहे. आपलंतुपलं त्याच्याकडं नसतं. कुठल्याही पत्रकाराला आवश्यक असणारा, चांगल्या शत्रूलाही चांगलंच म्हणणारा मनाचा दिलेरपणा त्याच्याकडं आहे. खेळाच्या आर्थिक गणितांपासून मैदानं गाजवणाऱ्या खेळाडूंच्या आवडीनिवडीपर्यंत सगळं काही त्याला ठाऊक असतं. चर्चेच्या पटावर क्रिकेट आलं, की त्याच्यासारखा चालताबोलता संदर्भग्रंथ आजघडीला अख्ख्या क्रिकेटविश्वात दुसरा नाही.   

“It’s very less about talent, what really matters is your attitude towards career!!” अहमदाबादच्या IIM मध्ये बोलताना तो म्हणाला होता. प्रसिद्धी आणि पैशाच्या शिखरावर असतानाही तो स्वतःचे हे बोल विसरलेला नाही. कसलेल्या योद्ध्यानं तलवारीला नियमितपणे धार लावावी, तसा प्रत्येक मॅचच्या कॉमेंटरीला सुरुवात करण्याआधी तो शेक्सपिअर आणि पु.ल. वाचत असावा. जेवणातल्या सहा रसांची चव जिभेवर घोळवत असावा. ब्रॅडमन ते तेंडुलकरपर्यंत सगळ्यांना मनात साठवत असावा. असामान्य मैदानांचा असामान्य इतिहास आठवत असावा. शरद पवार आणि नरेंद्र मोदींवर लक्ष ठेवत असावा, दिलीपकुमार आणि अमिताभचा अभिनय पाहात असावा, बीथोवन आणि भीमसेन ऐकत असावा. या सगळ्या सोपस्कारानंतर कॉमेंटरी बॉक्समध्ये क्रिकेटशी हृदयाची तार जुळवून एकदा का ‘ट्युनिंग’ केलं, की कात टाकावी तितक्या सहजपणे तो बाहेरचं जग खुंटीवर अडकवतो, आणि क्रिकेटरागाची भूपाळी आपल्या खुमासदार, खुसखुशीत शैलीत गायला सुरुवात करतो. शेअर बाजारातल्या ट्रेडरसारखा तो अष्टावधानी आहे, आणि बिरबलासारखा हजरजबाबीसुद्धा!! म्हणून तर एके काळी फक्त क्लब क्रिकेट खेळलेल्या या माणसाला आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या क्षितिजावरचे चंद्र, सूर्य, तारे, ग्रह, नक्षत्रं अगदी क्षीरसागरातल्या विष्णूला द्यावा तसा मान देतात.     

हैदराबादेतल्या मराठी कुटुंबातलं तेलगुभाषिक राज्यातलं बालपण, आयआयटी मुंबईत केलेलं इंजिनिअरिंग, ते थेट आयआयएम अहमदाबादेत एमबीए. तीन राज्यं आणि चार किंवा अधिक भाषा, त्यांचा वेगवेगळ्या प्रकारचा लहेजा, या सगळ्याचाच चांगला परिणाम त्याच्या बोलण्यात दिसतो. क्रिकेटच्या निमित्तानं झालेली भरपूर भटकंती, विनोदवृत्ती आणि खेळाचं अफाट ज्ञान यांच्या ब्लेंड मधून तयार झाल्या या स्कॉचव्हिस्कीचा  दरवळच इतका चैतन्यदायी असतो, की मार्क निकोलस, सौरव गांगुली, डॅनी मॉरिसन, राहुल द्रविड, मायकेल होल्डिंग, नासिर हुसेन या सगळ्याच नावाजलेल्या कॉमेंटेटर्सच्या दरबारात सिंहासन आपोआपच खास  त्याच्यासाठी रिकामं राहतं. आत्ता तरी तो कॉमेंटरीतला अंतिम शब्द आहे.     क्रिकेटच्या लोकप्रियतेचं एक महत्त्वाचं कारण म्हणून ज्या कॉमेंटरीकडं पाहिलं जातं, तिला अत्युच्च उंची आणि दर्जा देण्याचं काम ज्या काही मोजक्या लोकांनी केलंय, त्यात ‘हर्षा भोगले’ हे नाव सर्वांत वरचं आहे. चक्क ‘Voice of Indian Cricket’ ही पदवी एखाद्या NONPLAYING व्यक्तिमत्त्वाला मिळण्याची बहुतेक ही पहिलीच वेळ!!    

Bring back Botham, Bring back Yuvraj, Bring back Tendulkar, Bring back Dhoni, bring back फलाणा, अमका तमका, असे फलक आवडत्या खेळाडूंसाठी अनेक वेळेला प्रेक्षकांत पाहायला मिळतात, पण फक्त एखाद्या कॉमेंटेटरसाठी सोशल मीडियावर BCCIला धारेवर धरल्याचं, टीका केल्याचं उदाहरण फक्त हर्षाच्या बाबतीत घडलेलं आहे. २०१५-१६ च्या आयपीएल मध्ये त्याचं नाव कॉमेंटेटर्सच्या यादीत दिसलं नाही, यावरून जो गदारोळ झाला, तो अभूतपूर्व होता. क्रिकेटप्रेमींचं एवढं निर्व्याज प्रेम त्याला मिळालं, याचं कारण एकच. भल्याभल्या EXPERTS ना शिरा ताणून, घसा खरडून बोलल्यानंतरही जे नेमकं बोलणं शब्दात पकडणं साधत नाही, ते तो एकदोन वाक्यांतच आपल्या सळसळत्या उत्साही आवाजात बोलून मोकळा होतो. टॉसपासून प्रेक्षकांच्या आवाजापर्यंत अगदी काहीही त्याच्या नजरेतून सुटत नाही, आणि मग त्याच्या जिभेवर सरस्वती नाचते!!   

ख्रिस गेलला षटकार आणि चौकार सोडून एकेरी दुहेरी धावा पचनी पडत नाहीत, हे सांगताना तो म्हणाला होता, “4s and 6s seems to be the new binary code for this man!!”   

किरॉन पोलार्डच्या ताडमाड उंचीचं आणि कुठेही, कसाही झेल घेण्याच्या त्याच्या कौशल्याचं कौतुक करताना, “If Pollard can’t take it, then it’s not a catch!” हे शब्द त्यानं वापरले.   

दोन तीन वर्षांमागं भारतात वेगवान गोलंदाजांचा दुष्काळ होता, आणि पाकिस्तानात त्याचं महामूर पीक होतं. वहाब रियाझ या वेगवान पाकिस्तानी गोलंदाजाला तिकडे संधी मिळत नसल्याची खंत वसीम अक्रमनं व्यक्त करताच हर्षा मिश्कीलपणे बोलता झाला, “Send him across the border then!!”   

टॉस हरण्याचा एम एस धोनीचा ‘बॅड पॅच’ सुरू असताना वातावरण हलकं करणाऱ्या हर्षाच्या “MS Dhoni has yet again called for heads to coin which has two tails” या शब्दांनी कॉमेंटरी बॉक्समधला ताण नक्कीच निवळला असेल. 

मायकेल क्लार्क स्पष्टपणे बाद झाल्यानंतरही फक्त पंचांनी बाद देण्याची वाट बघत असताना त्याची खिल्ली उडवत त्यानं म्हटलं, “I think he is waiting for tomorrow’s newspaper to declare him out!”   

चेतेश्वर पुजाराच्या सर्वांगसुंदर फलंदाजीचं वर्णन हर्षा “Classical musician in the era of T20” असं करतो.  

“If you make a team with all the number 11s from all teams, Hirwani would still come at no 11 in line up” अशा शब्दांत नरेंद्र हिरवाणीच्या फलंदाजीची टर उडवायला तो कमी करत नाही.   

संघासाठी काहीही, या राहुल द्रविडच्या स्वभावाला हर्षानं आपल्या शब्दांनी हिऱ्याचं मोल दिलंय, “Ask him to walk on water and he will ask you, how many kilometers?”   

सचिन तेंडुलकर त्याचा विशेष लाडका आहे, कुठल्याही इतर प्रेक्षकासारखाच. सचिन शेवटचा बॅटिंगला उतरला, तेव्हा प्रेक्षकांच्या मन:स्थितीचा अचूक अंदाज त्यानं मांडला, तो काहीसा असा..”Eruption of joy at the fall of an Indian wicket means only one thing”.   

गोष्ट जवळपास १० वर्षांपूर्वीची. एका सामन्यात सचिन आणि दुसऱ्या बाजूला तेव्हा कमालीचा आक्रमक असणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनी खेळत होते. सचिनच्या तंत्रशुद्ध शैलीचं, आणि धोनीच्या ओबडधोबड वाटणाऱ्या फटक्यांचं “We have surgeon at one end and the butcher at other” असं मूल्यमापन त्यानं केलं.   

सचिन तेंडुलकरची तुलना अनेक श्रेष्ठ फलंदाजांशी होऊ लागली, तेव्हा एकदा हर्षा कॉमेंटरी बॉक्समध्ये बोलून गेला, “Only problem of being Tendulkar is that you are always compared with Tendulkar!!”   

क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर शतक करणं ही अनेकांची महत्त्वाकांक्षा असते. अनेकांनी ती पुरी केलीही. पण आपल्या संपूर्ण कारकिर्दीत फलंदाजांचा बादशहा असलेल्या सचिनला त्या मैदानात शतक करून स्वतःचं नाव तिथल्या HONORARY BOARD वर कोरून ठेवणं जमलं नाही, याबद्दल इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेननं हर्षा भोगलेच्या सचिनप्रेमाची टोपी उडवायचा प्रयत्न केला. या हल्ल्याला प्रतिहल्ला न करेल, तो हर्षा कसला? “Sachin doesn’t have his name on Lords Honorary Board”, या नासिरच्या आढ्यतेनं, कुत्सितपणे बोलल्या खवचट वाक्यावर चेहऱ्यावरची रेषही न हलू देता “Then whose loss is it? Sachin’s or Honorary board’s?” असा प्रतिप्रश्न त्यानं केल्यानंतर नासिरची बोलती बंद झाली!!   

क्रिकेटचं सौंदर्य नव्या पिढीला कळावं, यासाठी तरी क्रिकेटवर बोललं पाहिजे असं त्याचं मत आहे. तो म्हणतो, “We must tell stories. We can never give up on that. I believe in the thought that we are custodians of cricket for the next generation. Storytelling is a good way to live that responsibility.”    

भारतातल्या ‘स्पोर्ट्स ब्रॉडकास्टिंग’ चा चेहरा असलेला हर्षा क्रिकेट जगत नाही, तो क्रिकेटलाच जगवतो; आणि जागवतोही, तो असा..बस्स!!

सर्वोत्तम प्रेक्षकाचा चेहरा..!! 

 “प्रेक्षकांत बसून क्रिकेट बघणं”, हे करिअर असू शकतं का? बँक बॅलन्सची चक्रवाढ जाऊ द्या, पण क्रिकेटच्या इतिहासात नाव अजरामर करण्याचा हा पर्याय असू शकतो का? दोन्ही प्रश्नांची उत्तरं होकारार्थी आहेत. सोशल मीडियाचं प्राबल्य असलेल्या आजच्या जमान्यात सर्वांगावर तिरंग्याबरोबरच सचिन तेंडुलकरचं नाव गोंदवून प्रत्येक मॅचला उपस्थिती लावणारा सुधीर कुमार चौधरी हा भारताच्या क्रिकेट प्रेक्षकांचा प्रातिनिधिक चेहरा म्हणून सगळीकडं ओळखला जातो. त्याचाच आडनाव बंधू असलेला अब्दुल जलील नावाचा पाकिस्तानी क्रिकेट चाहताही पंधरा एक वर्षांपूर्वी चांगलाच प्रसिद्ध होता.    देशीदेशींच्या अशा हौशी क्रिकेटरसिकांचा शिरोमणी म्हणा, पूर्वज म्हणा, किंवा आणखी काही; कोणे एके काळी, म्हणजे झाली आता त्यालाही शंभरेक वर्षं, ऑस्ट्रेलियात मशहूर होता. गोष्ट त्या काळातली आहे, जेव्हा प्रेक्षकांसाठी खास बसण्याची, खाण्यापिण्याची राजेशाही व्यवस्था क्रिकेटच्या स्टेडियममध्ये नव्हती; किंबहुना त्या मैदानाला स्टेडियम म्हणणंही योग्य ठरलं नसतं. मध्ये क्रिकेटचं मैदान, आणि आजूबाजूला नैसर्गिकरीत्या तयार झालेले ओबडधोबड उतार, टेकड्या, आणि परिस्थिती थोडी चांगली असेलच, तर तिथं लाकडी खुर्च्या किंवा बाकडी टाकलेली!!    मूळ मुद्दा, उपजीविकेसाठी गावभर फिरून ससे विकणारा एक इरसाल मनुष्य सिडने शहराचा रहिवासी होता. सिडनेमधला एकही क्रिकेटचा सामना न चुकवणारा माणूस म्हणून त्याची ख्याती होती. सिडने मैदानाच्या एका ठराविक टेकडीवजा कोपऱ्यात, ज्याला आजही Hill Stand म्हटलं जातं, स्कोअरबोर्डच्या खाली बिअरच्या बाटल्या आणि दिवसभराचं खाणं सोबत घेऊन त्याचा वावर असायचा. क्रिकेटचे सामने शांत राहून बघण्याची बाकी लोकांची सवय त्यानंच मोडली असावी, असं म्हणायला आज वाव आहे. अगदी हुल्लडबाजी नाही करायचा तो, पण पुलंच्या अंतू बर्व्याचा अंतर्बाह्य खवचटपणा मात्र त्याच्यात ठासून भरलेला होता. जोडीला प्रेक्षकांत फार दुर्मिळ असणारं क्रिकेटचं बारीकसारीक ज्ञानही त्याच्याकडं  पुरेपूर होतं. बिनाखर्चाच्या याच बौद्धिक भांडवलावर त्यानं खेळाडूंइतकीच मैदानं गाजवली.     ‘यब्बा’…ऑस्ट्रेलियन भाषेत या शब्दाचा अर्थ ‘अति बडबड्या’ असा होतो.

स्टीफन हॅरॉल्ड गॅसकॉइनला यब्बा हे टोपणनाव चिकटलं ते त्याच्या बडबड्या स्वभावामुळं. पुढं पुढं तर सापानं कात टाकावी, तसं त्याचं मूळ नावच विस्मरणात गेलं, आणि क्रिकेटच्या सुवर्णयुगातल्या पानापानांवर ध्रुवतारा होऊन अढळपद मिळण्याचा मान एका प्रेक्षकाला मिळाला!! त्या अढळपदाची पावतीच बघायची, तर १९३३-३४ ची कुप्रसिद्ध ‘बॉडीलाईन’ ऍशेस कसोटी मालिका चित्रपटरूपानं १९८४ साली प्रदर्शित झाली, त्यात डॉन ब्रॅडमन, डग्लस जार्डीन, आर्ची जॅक्सन, बिल पॉन्सफोर्ड, बर्ट ओल्डफील्ड अशा कसोटीवीरांच्या बरोबरीनं यब्बाचं पात्रही रंगवलं गेलं होतं!!     इसवी सन १९११. सिडनेतल्या पहिल्या ऍशेस कसोटी सामन्यात टिबी कॉटरच्या चेंडूवर इंग्लंडच्या सर जॅक हॉब्जचा झेल विकेटमागं असलेल्या हॅन्सन ऊर्फ सॅमी कार्टरनं घेतला. हा कार्टर पोट भरण्यासाठी शववाहिकेचा ड्रायव्हर म्हणून काम करायचा, आणि कित्येकदा मैदानावर येताना ती वाहिका स्वतः चालवत घेऊन यायचा. जॅक हॉब्ज परत फिरल्यानंतर कार्टरची ही पार्श्वभूमी नेमकी लक्षात ठेवत यब्बा ओरडला, “You can take that body away now, Hanson(तू हे प्रेत आता बाजूला करू शकतोस, हॅन्सन)!!” हा हजरजबाबी म्हणा, टोकेरी म्हणा, खवचट म्हणा, टोमणा चांगलाच लोकप्रिय झाला, आणि त्यानंतर  यब्बाही. सतरा वर्षांचा काळ लोटल्यानंतर १९२८ साली सर जॅक हॉब्ज सिडनेतला त्याचा शेवटचा कसोटी सामना खेळला. सामन्यातल्या मधल्या विश्रांतीच्या काळात त्यानं मैदानाला एक फेरी मारली आणि यब्बा जिथं बसायचा, तिथं जाऊन यब्बाशी त्यानं आवर्जून हस्तांदोलन केलं!!    यब्बाच्या काळात प्रेक्षकांना मैदानात मिळणारं मुक्तद्वार, कॉमेंटरीची न झालेली सुरुवात, आणि टेनिस सारखी मॅच शांतपणे बघण्याची पद्धत, याच गोष्टी त्याच्या पथ्यावर पडल्या असाव्यात!! त्यानं ओरडून बोललेलं सगळ्या मैदानभर ऐकू जायचं.

क्रिकेटबरोबरच आजुबाजूच्या सामाजिक परिस्थितीचं भान ठेवून त्याबरहुकूम उत्स्फूर्तपणे त्याच्या तोंडून बाहेर पडणारं एखादंच वाक्य ही प्रेक्षक आणि खेळाडूंनाही पर्वणी होती. सिडनेत त्या काळात झालेल्या प्रत्येक सामन्यानं ही पर्वणी अनुभवली. तो जे बोलला, त्यात जड जड शब्दांचा भरणा कधीच नव्हता, तरीही जे सांगायचं, ते त्याच्या विनोदबुद्धीतून जन्माला आल्या साध्याच पण खोचक टोमण्यांनी जगाला सांगितलंच.    एवढं असूनही त्यानं क्रिकेटचा हात कधी सोडला नाही, बोलताना क्रिकेटशी संबंध न सांगणारं एकही वाक्य त्याच्या तोंडून गेलं नाही. क्रिकेटबद्दलची त्याची आत्मीयता आणि ज्ञान एका किश्श्यातून अधोरेखित होतं. एका सामन्यात कीथ मिलर हा वेगवान गोलंदाज गोलंदाजी करत होता. सिडनेची संथ विकेट आपल्या वेगाला योग्य होईल की नाही, याची शंका वाटून त्यानं आपल्या नेहमीच्या वेगाला यावर घातला, आणि थोडी मंदगती गोलंदाजी करणं पसंत केलं. यब्बा हे पाहात होताच. काय घडतंय, ते त्यानं अचूक हेरलं, आणि मिलरनं चेंडू टाकल्या टाकल्या तो ओरडला, “वेल बोल्ड ग्रिमेट!!” त्याचवेळी ऑस्ट्रेलियाकडे क्लॅरी ग्रिमेट हा मंदगती गोलंदाज होता, त्याचा आणि कीथ मिलरच्या कमी केलेल्या वेगाचा संदर्भ देत, मिलरला ग्रिमेट ठरवून यब्बा मोकळा झाला.     आणखी एका सामन्यात एका वाईट गोलंदाजालाच त्याचा टप्पा आणि दिशा दोन्ही चुकताहेत हे सांगण्यासाठी तो एकच वाक्य बोलला, “Your Length is lousy, but you bowl a good width!!”    एक चिवट फलंदाज बाद होत नव्हता, तेव्हाची गोष्ट. ऑस्ट्रेलियात तेव्हा गर्भपात अवैध होता. नर्स मिशेल ते काम गुपचूप करायची. हीच गोष्ट आठवून  यब्बा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला म्हणाला, “I think you boys better call nurse Mitchell to get that bastard out.”    एक फलंदाज सारखा बीट होत होता. ते बघून यब्बा उद्वेगानं बोलता झाला, “Send him a grand piano, lets see if he can play that instead.”    अशाच एका संथ फलंदाजाला तो म्हणाला होता,”I wish you were a statue and I were a pigeon!”    १९३३-३४ ची बॉडीलाईन कसोटी मालिका ऐन भरात होती, ऑस्ट्रेलियात वातावरण इंग्लंडविरोधी होतं. इंग्लिश कर्णधार डग्लस जार्डीन सभोवतालच्या माशा उडवताना यब्बानं पाहिला, आणि पुढच्याच क्षणी तो ओरडला, “leave those flies alone, Jardine, those are the only friends you’ve got here!!”    वर उल्लेखलेल्या सगळ्या किश्श्यांवर कडी करणारा आणखी एक किस्सा क्रिकेटच्या इतिहासात नोंद आहे, कुठल्याही सेन्सर बोर्डानं त्यावर अजून आक्षेप घेतलेला नाही, कदाचित त्यामुळंच!! पुढचं वाचण्यापूर्वी एक वैधानिक इशारा, अश्लील या प्रकारात मोडणारा हा टोमणा वाचण्यापूर्वी, स्वतःला बांधून ठेवणारी तथाकथित संस्कृतीची जळमटं बाजूला करा, आणि मगच वाचा!!     एक फलंदाज अत्यंत वाईट फलंदाजी करत होता, अनेकविध प्रत्नानंतरही चेंडूपर्यंत न पोचणारी त्याची बॅट प्रेक्षकांना अस्वस्थ करत होती. त्याचं दैवही असं, कि तो बादही होत नव्हता. अशातच त्या फलंदाजाला काय लहर आली देव जाणे, पण आपला बॉक्स किंवा ज्याला साध्या भाषेत सेंट्रल गार्ड, किंवा ऍबडॉमिनल गार्ड म्हणतात, ते त्यानं हातानं नीट केलं आणि पुन्हा बसवलं. यब्बाची बारीक नजर त्याच्यावर खिळून होतीच. प्रेक्षकांच्या कानांवर एक वाक्य उकळतं तेल सोडावं तसं घुसलं, “Those are the only balls you’ve touched all day!!” काय अफाट विनोदबुद्धी असेल, याची कल्पना आज येणं शक्य नाही!!   

१८७८साली जन्म घेऊन १९४२ साली ८ जानेवारीला वयाच्या ६४ व्या वर्षी त्यानं डोळे मिटले, नव्हे, ओठ मिटले ते कायमचेच!! त्याची तिखट जीभ कायमची थंड झाली, पण सिडने मैदानातल्या त्याच्या त्याच Hill Stand मध्ये यब्बाचा कांस्यपुतळा क्रिकेट ऑस्ट्रेलियानं बसवला, आणि त्याला कायमची संजीवनी दिली!! आजही सिडनेत कुठलीही मॅच बघताना तो तिथं असतोच.     रे रॉबिन्सन हा ऑस्ट्रेलियन पत्रकार त्याच्याबद्दल लिहितो, “He stepped forward from the ranks of chorus!!” खरंय, सगळ्यांचा असूनही तो त्यांच्यातला एक कधीच नव्हता…निश्चितपणे वेगळाच होता तो. स्टीफन हॅरॉल्ड गॅसकॉइन ऊर्फ यब्बा… सर्वोत्तम प्रेक्षकाचा चेहरा!!

वेदनेचा उत्सव झाला..!!

भरत कुमारचं नाव ऐकलंय? गिरीश शर्मा? सुधा चंद्रन बद्दल नक्की माहिती असेल!! स्टीफन हॉकिंग्ज आता दुनिया सोडून गेलाय. एक नाव आणखी आहे. हसरे दुःख म्हणजे काय त्याचं मूर्तिमंत उदाहरण. जन्मतः उजवा हात नसलेला भरत जलतरणपटू झाला…गिरीश शर्मा एका पायावर उभा राहात बॅडमिंटन खेळायचा..लाकडाच्या पायाचा ठेका धरत सुधानं नृत्यकलेचा ध्यास घेतला!! स्टीफन..पाहताक्षणी कोणालाही दया नव्हे, कीव येईल असा व्हीलचेअरवर आयुष्य घालवलेला विख्यात शास्त्रज्ञ!!    शेवटचा हा…इतरांच्या तुलनेत तो तसा बरा होता. २ हात..२ पाय..पंचेंद्रियं..शाबूत मेंदू..सगळं ठीक असताना त्याला Rheumatoid Arthritisनं घेरायला सुरुवात केली. वय वर्ष २० फक्त, उमेदीचा काळ खाऊन टाकायला या रोगानं त्याची निवड केली, की या रोगाचं स्वतःचं अस्तित्व दुनियेच्या पटलावर ठळक व्हावं यासाठी, ते आज कळणं कठीण आहे; पण या Rheumatoid Arthritisला काखोटीला मारून ब्रेंट फ्रेझर उर्फ बिली बाऊडेननं क्रिकेटजगत शब्दशः आपल्या इशाऱ्यावर बरीच वर्षं नाचवलं; अगदी चार्ली चॅप्लिनच्या पावलावर पाऊल ठेवत!! मैदानावरचे विनोदी हावभाव किंवा हातवारे ही फक्त खेळाडूंची मक्तेदारी नव्हे, हे त्यानंच पहिल्याप्रथम जगापुढे अधोरेखित केलं असावं. न्यूझीलंडचा माजी दिवंगत कर्णधार मार्टिन क्रो त्याला क्रिकेटच्या मैदानावरचा BOZO THE CLOWN या नावानं संबोधायचा. या Bozo चा इतिहास पाहिला, तर कळतं, लहान मुलांच्या मनोरंजनविश्वात त्याचं योगदान किती मोठं होतं, ते!!    Rheumatoid Arthritis… साध्या भाषेत बोलायचं, तर संधिवाताचाच एक प्रकार…सांधे आखडतात, हात पाय सरळ लांब होत नाहीत, बोटं बधीर होतात, नाना गोष्टी. थंडीचे दिवस म्हणजे अशा रुग्णांसाठी कसोटीचा काळ. बिलीची जन्मभूमी असलेल्या न्यूझीलंडमध्ये सततच्या थंड वातावरणामुळं जवळजवळ सव्वापाच लाख लोक या रोगाचे शिकार आहेत. प्रत्येकाच्या शरीरातलं त्याचं प्रमाण कमी अधिक, एवढंच. वेचून वेचून खाणीतून पैलू पाडण्यासाठी हिरे निवडावेत, तशी नियतीनं बिलीचीही निवड ‘शिकार’ म्हणून केली असावी, आणि सांगितलं असावं, “अडथळा संधी म्हणून कसा पाहावा, हे लोकांनी तुझ्याकडून शिकलं पाहिजे!!”    पैजेचा हा विडा आत्मविश्वासानं उचलून खेळण्याचे मार्ग संधिवातानं बंद केल्यानं मैदानात परतण्यासाठी त्यानं अम्पायरिंगच्या रस्त्याची निवड केली.

२००३च्या विश्वचषकाच्या सुरुवातीला प्रचलित नसलेलं ‘बिली बाउडेन’ हे नाव त्याच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ‘Fourth Umpire’ च्या यादीत समाविष्ट झालं. जवळजवळ १६ वर्षांच्या एकूण कारकीर्दीत ८४ कसोटी, २०० एकदिवसीय आणि २४ टी-२० सामन्यांत तो अंपायर म्हणून उभा होता. ICCच्या खास अंपायर्सच्या यादीत तो सलग १० वर्षं राहिला. Everyone has certain bad days at office असं म्हणतात, तसे त्याचेही सगळेच दिवस काही यशस्वी नव्हतेच. २००७च्या अंतिम विश्वचषक सामन्यात अपुऱ्या प्रकाशामुळं गुंडाळाव्या लागलेल्या श्रीलंकेच्या डावामुळं त्याच्यावर प्रचंड टीका झाली. ‘Bad Performance’ या गोंडस नावाखाली २०१३मध्ये त्याचं नाव ICC च्या खास यादीतून वगळलंही गेलं. पुढं २०१५ च्या विश्वचषकातही त्याला संधी मिळाली. असले चढ उतार प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक माणसावर येतात, त्यात नवीन काय, असे प्रश्न आपल्याला पडू शकतातच. पण समुद्राची खाडी पोहत ओलांडून जाणं; आणि शार्क, देवमासे आणि असंख्य ज्ञात-अज्ञात भयंकर जलचरांचा नेहमीचा वावर असलेल्या खाडीतून पोहून जाणं, यात फरक आहे. बिलीच्या बाबतीत या जलचरांची भूमिका त्याच्या संधिवातानं निभावली. स्वतःच्या या रोगाबद्दल आज बिली ऋणीही आहे आणि त्याला खंतही आहे. तो सांगतो, “संधिवातानं माझी कसोटी पाहिली. तो माझ्यासाठी जन्मभराची वेदना घेऊन आला. माझ्यापुढं दोनच पर्याय होते. काहीही न करता बसून राहणं आणि नशिबाला आलंय ते स्वीकारून पुढचा मार्ग शोधणं. मी दुसरा पर्याय निवडला. पण संधिवात होता, म्हणून तर इतकी वर्षं खेळासाठी मी जगभर जाऊ शकलो. त्यानं मला माझ्या आवडत्या गोष्टी करण्यापासून कधीही थांबवलं नाही. अगदी पूर्णपणे नसेल कदाचित, पण तुम्ही ती गोष्ट करू शकता हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे.काहीही करण्यासाठी मनाची तयारी असली की पुरे!!”    असे वेडे जन्म घेतात, म्हणून इतिहासाच्या कोऱ्या पानांना संजीवनी मिळते.

बिलीबद्दल बोललं गेलं, त्यात अतिशयोक्तीच जास्त होती. फलंदाजाला बाद देताना वर गेलेलं त्याचं वाकडं बोट, षटकाराचा इशारा करताना क्रमाक्रमानं तीन टप्प्यांत वर जाणारे त्याचे हात, चौकार देताना ३६० अंशातलं पूर्ण वर्तुळ फिरून हात हलवतानाच एखाद्या बॅले कलाकारासारखी होणारी त्याच्या पायांची हालचाल, आणि लेगबायसाठी एक पाय उचलून मांडीवर हलकेच थोपटून नंतर पाय हलवणं आणि थर्ड अम्पायरकडं मदत मागताना एखाद्या सुंदर युवतीच्या कमनीय बांध्यासारखा इशारा करणं, हे सगळं क्रिकेटच्या पुस्तकाबाहेरचं असलं, तरी प्रेक्षकांना, आणि खेळाडूंना भावलं. दुसरीकडं “Problem with the umpire Billy Bowden is that he thinks he is part of an entertainment” या आणि अशा अनेक समांतर आशयाच्या शब्दांत टीकाकारांनी त्याच्यावर तोंडसुखही घेतलं. लेकिन बिलीने किसी की एक नहीं सुनी!! त्या टीकेमुळं त्याला जास्तच प्रसिद्धी मिळाली; नरेंद्र मोदींना ‘चायवाला’ या विशेषणामुळं मिळाली तशीच!! बिलीच्या प्रत्येक हालचालीवर सगळ्याच क्रिकेटरसिकांची नजर गेली. त्याच्यावर लिहिलं, बोललं जाऊ लागलं.  कोणी त्याला Trapez Artist म्हटलं, त्याच्या चौकाराच्या इशाऱ्याला ‘fit for a walk on top at the opera house’ असं नावाजलं गेलं.एकदा नॅटवेस्ट मालिकेत त्यानं आपल्याच शैलीतला लेगबायचा इशारा केला, तेव्हा कोणीतरी बोलून गेलं, “He taps his leg and shakes it. If it was butter it would be milk by now!!” मैदानातला त्याचा उत्साही, हसरा वावर ‘like a butterfly with bounce’ असा संबोधला गेला. हा झाला त्याचा मुखवट्याचा चेहरा!!     त्यानं वेदना ‘लपवल्या’, त्याला त्या झाल्याच नाहीत असं नव्हे. आखडलेली बोटं सैल करण्यासाठी त्याला सामन्याआधी ती गरम पाण्यात बुडवून ठेवायला लागायची. त्याचे चित्रविचित्र इशारे हे वरवर मनोरंजक आणि विदूषकी वाटले, तरी तो त्याच्या उपचारांचा एक भाग होता. स्नायूनस्नायू बधीर होऊ नये, आणि शरीर लवचिक राहावं, यासाठी सततच्या, प्रसंगी टोकाच्या वाटाव्यात, अशा हालचाली करणं त्याला भाग पडलं. जीवनरक्षक म्हणून त्याला त्याचा उपयोगही झाला.

एकदा स्क्वेअर लेगवर उभा असताना गॅरेंट जोन्सनं उसळत्या चेंडूवर मारलेला एक वेगवान फटका निमिषार्धात चुकवत बिली खाली वाकला नसता, तर त्याचं डोकं फुटलं असतं. एवढं असूनही स्वतःच्या या रोगाचा बाऊ त्यानं केलाच नाही, उलट ती संधी मानून आपल्या अंपायरिंगला त्यानं विनोदाची चटपटीत फोडणी दिली. गंमत म्हणून का होईना, पण क्रिकेटमध्ये ‘रेड कार्ड’ आणणारा बिली पहिलाच. एका चेंडूत ४५ धावा असं अशक्यप्राय आव्हान असताना ग्लेन मॅकग्रा शेवटचा चेंडू सरपटी टाकण्यासाठी म्हणून विकेटजवळ आला, तेव्हा कुठूनतरी पैदा केलेलं रेड कार्ड खिशातून काढून आधी ग्लेनला दाखवत बिलीनं नंतर ते मैदानातल्या सगळ्या प्रेक्षकांना दिसेल असं बोटांत पकडून नाचवलं!! देशोदेशी आपला चाहतावर्ग निर्माण करत तो आपलं काम इमानेइतबारे करत राहिला. कधी त्यानं चुका केल्या, कधी अचूक निर्णय दिले!!     १६ वर्षांचा काळ थोडाथोडका नाही, विशेषतः भागीदारीत Rheumatoid Arthritis असताना!! कसोटी क्रिकेटमध्ये अकराव्या खेळाडूबरोबर खेळताना एक एक चेंडू खेळून काढावा, तशी या संधिवाताबरोबर त्यानं छोटी छोटी ध्येयं ठेवली असावीत!! काही चेंडू तो ‘बीट’ झाला असेल, काहीवेळा धावबाद होता होता वाचला असेल, पण धडधाकट माणसांच्या गर्दीत अगदी अपंग नव्हे, पण थोडंसं व्यंग असलेला हा माणूस वेदनेचा उत्सव करत कायमच उठून दिसला, एवढं खरं!!

 तो वेडा कुंभार!!

मॅचफिक्सिंगच्या काळ्या झाकोळात भारतीय क्रिकेट चाचपडत असतानाच त्याचा उदय कर्णधार म्हणून झाला होता. बुडत्या क्रिकेटची नैया पार करण्यासाठी त्याच्यापेक्षा दुसरा लायक माणूस निदान १९९७-२००० सालांत तरी शोधून सापडला नसता. २२ जून १९९६ ला चक्क लॉर्ड्सवर पदार्पणातच त्यानं केलेलं शतक हा त्याच्या बहुरंगी कारकिर्दीचा श्रीगणेशा होता.     तसं त्याआधी सी. के. नायडू ते विनू मंकड, विजय हजारे ते कपिल देव, गावसकर ते वेंगसरकर असं भारताचं क्रिकेट अनेक चांगल्या वाईट स्थित्यंतरांतून गेलं, तरी त्याचा मूळ चेहरा थोडाही बदलला नव्हता. कर्णधार या व्यक्तीला म्हणावं तितकं महत्व नव्हतं. ‘जिंकण्याची सवय’ किंवा ‘विजयाचा भस्म्या’ औषधालाही नव्हता. एकाच वेळी अनेक दिग्गज संघात असतानाही केवळ बोटचेप्या धोरणांमुळं, ‘चलता है’ स्वभावामुळं एक वेळ अशी होती की, सचिन तेंडुलकरनं कर्णधारपद सोडल्यानंतर आता पुढे काय, हा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती. नेमका याच वेळी कंसाच्या काळकोठडीत श्रीकृष्णानं जन्म घ्यावा, तसा सौरव गांगुली क्रिकेटच्या क्षितिजावर एक ठाम नेता म्हणून खडा झाला, आणि जादूची कांडी फिरावी तसं घडलं.

क्रिकेट नाही, पण ते खेळण्याची पद्धत तरी बदलली. संघभावना, समर्पण, ईर्षा हे सगळेच गुणविशेष मैदानावर बघायला मिळू लागले. संघात जुन्याजाणत्यांबरोबर नव्या चेहऱ्यांचाही वावर वाढला. एका संधीसाठी धडपडणाऱ्या सेहवाग, आशिष नेहरा, युवराज सिंग, हरभजनसिंग, झहीर खान आणि अशा अनेकांचे ग्रह चांगल्या अर्थानं फिरले आणि ‘बेभरवशाचा’ अशा शब्दात हिणवला गेलेला भारतीय संघ या ‘दादा’ माणसाच्या नेतृत्त्वात परदेशी संघांसमोर दादा संघ म्हणून उभा राहू लागला.    त्याआधी भारतीयांकडून आक्रमकता मोजून मापून वापरली जायची. स्लेजिंग वगैरे दूरचीच बात, पण कुजक्या प्रश्नालाही प्रत्युत्तर दिलं जात नसे. एका महान खेळाडूनं विनाकारण डिवचल्यानंतर प्रत्यक्ष गॅरी सोबर्सला “हे ब्लडी, यू प्ले युअर गेम, आय प्ले माय गेम” असं ठणकावणारा एकनाथ सोलकर एखादाच. या पार्श्वभूमीवर प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूनं कुरापत काढल्यावर ‘अरे’ला गर्वोन्नत मानेनं ‘का रे?’ विचारणारा हा पहिला भारतीय कप्तान सामान्य क्रिकेटरसिकांपासून ते निवड समितीपर्यंत सगळ्यांनाच भावला. ‘वाकड्यात गेलेल्यांना सरळ करायचं, तर सरळ माणसांना आधी वाकड्यात शिरता आलं पाहिजे’ ही त्याची धारणा. मैत्रीसारखंच वैरही त्यानं काटेकोरपणे निभावलं.     मुंबईच्या वानखेडेवर भारत-इंग्लंड मालिका ३-३ बरोबरीत सोडवल्यानंतर फ्रेडी फ्लिंटॉफ शर्ट काढून मैदानभर गरागरा फिरला. चारच महिन्यांत या उद्दामपणाची परतफेड म्हणून नॅटवेस्ट मालिका जिंकून क्रिकेटची मक्का समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या गॅलरीत सौरवनंही शर्ट उतरवून हवेत बेफामपणे फिरवला. ‘प्रत्यक्ष लॉर्ड्सवर तू असं करायला नको होतंस’ असं एकानं त्याला छेडलं, तेव्हा फ्लिंटॉफचा संदर्भ देत तो म्हणाला, ‘लॉर्ड्स इंग्लंडची मक्का असेल, तर वानखेडेही भारताची मक्काच आहे’. बऱ्याच वर्षांनंतर या घटनेवर बोलताना सौरवचा सहकारी लक्ष्मण म्हणाला, “It was not just a reaction, it was a statement that we are no less than anyone”.    

ऑस्ट्रेलियन आपल्या उद्दामपणासाठी जगभर विख्यात आहेत. एकदा ऑस्ट्रेलियाचे चार खेळाडू बाद होऊन प्रत्यक्ष स्टीव्ह वॉ खेळायला उतरला, तेव्हा आपल्या संघाला प्रोत्साहन देत सौरव ओरडला, “Come on boys, Australian Tail has begun”. आश्चर्य आणि उद्वेगानं स्टीव्हचा आ वासला नसता, तरच नवल. श्रीलंकेच्या रसेल अरनॉल्डलाही एकदा सौरवचा झटका बसलेला होता.     झगड्यात उस्ताद असलेला हा माणूस फलंदाजीतले काही थोडे कच्चे दुवे सोडले, तर प्रतिस्पर्ध्याला धोकादायक ठरायचा. शॉर्ट बॉलसमोर कच्चा असलेला सौरव कव्हर ड्राईव्ह आणि स्क्वेअर कटचा राजा होता. “Most dangerous square cuts and most elegant cover drive” असं त्याच्या फटक्यांचं वर्णन केलं जायचं. ऑफ साईडशी असलेल्या त्याच्या या नात्याबद्दल राहुल द्रविड सांगतो, “On the off side, first there is god, then Sourav Ganguly”. फिरकी गोलंदाजीवर पुढे सरसावत बॉल स्वतःच्या टप्प्यात घेऊन मारलेले षटकार, नेत्रदीपक कव्हर ड्राईव्ह, लेग ग्लान्स, स्क्वेअर ड्राईव्ह आणि लेगस्टंप जवळची जागा सोडून पॉइंटवरून मारलेले कट…बस्स बघत राहावं. याच पद्धतीनं त्यानं चक्क ग्लेन मॅकग्रा आणि वसीम अक्रमलाही माती चारली होती. झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना एकदा सलग ३ चेंडू स्टेडियमबाहेर फेकून देऊन त्यानं विक्रम केलाय. १९९९ च्या विश्वचषकात इंग्लंडमध्ये टाँटनला सौरव आणि राहुलनं केलेली ३१८ धावांची भागीदारी भारतीय क्रिकेटच्या शिरपेचातला एक हिरा म्हणून नावाजली जाते. सौरवच्या १८३ वैयक्तिक धावांच्या वादळात श्रीलंकेचं जहाज त्या दिवशी खडकावर आपटून फुटलं होतं.    

चांगला फलंदाज चांगला कर्णधार होईलच असं नाही, आणि हे प्रत्यक्ष सचिन तेंडुलकरच्या बाबतीत खरं ठरलं होतं. सौरव मात्र नेतृत्त्वगुण उपजत घेऊन आल्यासारखा नैसर्गिक कप्तान ठरला. २००० ते २००५ अशी उणीपुरी पाच वर्षं तो कर्णधार होता, पण या पाच वर्षांच्या खाणकामात त्यानं एकेक नामी रत्नं शोधून भारतीय क्रिकेटच्या मुकुटात जडवली. आशिष नेहराच्या म्हणण्याप्रमाणं सौरवनं आपली माणसं हेरून ठेवलेली होती. त्याला कसोटी अनिर्णित राखणाऱ्या नव्हे, तर जिंकून देणाऱ्या खेळाडूंची अपेक्षा होती. याच एका धोरणामुळं परदेशातला संघाच्या कामगिरीचा ग्राफ उंच उंच जात राहिला. सेहवागला सलामीला खेळवणं हा सौरवच्या कारकिर्दीतला एक क्रांतिकारी निर्णय होता. हरभजन सिंगला संघात घेण्यासाठी तो अहोरात्र झगडला. दिनेश कार्तिक आणि धोनीमध्ये चुरस असताना “Lets try Dhoni” या त्याच्या वाक्याचा परिणाम पुढची १५ वर्षं दिसला. २००२ साली इंग्लंडमध्ये लॉर्ड्सवर नॅटवेस्ट जिंकल्यानंतर २००३ च्या विश्वचषकातही त्याच्या नेतृत्वात भारताची कामगिरी छानच झालेली होती. आपल्या खेळाडूंच्या पाठीशी ठाम उभं राहताना प्रसंगी त्यानं क्रिकेट मंडळाशी वाकडं घ्यायलाही कमी केलं नाही.     त्याच्या कर्णधार असण्यानं काय फरक पडला, त्याचा साधारण अंदाज ब्रायन लाराच्या एक वाक्यातून मिळतो.. “Whatevar be the complex situations, the Indian team under Ganguly has moved to great heights, the fact of the matter is that Ganguly is determined to stay focused”.      कुमार संगकारानं त्याला ‘Master at the art of gamesmanship’ असं नावाजलं.    कुणाही नव्या खेळाडूचं कौतुक करण्यात कंजुषी करणाऱ्या जेफ्री बॉयकॉटलाही सौरवनं भुरळ घातली होती. तो म्हणतो, ” Two of his special qualities are his intelligence and articulation, which helped him immensely in the world of contemporary cricket.”     पुढे प्रशिक्षक म्हणून जॉन राईटची मुदत संपल्यानंतर सौरवच्याच आग्रहामुळं बोलावलेल्या ग्रेग चॅपेलशी त्याचं ग्रेगच्या दुराग्रही स्वभावामुळं बिनसलं आणि त्याला संघाबाहेरचा रस्ताही दाखवण्यात आला. तरीही जिद्दीनं तो परतला. कमबॅकच्या पहिल्याच सामन्यात त्यानं ९८ धावा करून रणशिंग फुंकलं. पुढे ग्रेग चॅपेलवरून छेडलं असता कॅमेऱ्यासमोरच त्यानं उत्तर दिलं, “He will call Dravid, he will call Sachin, but he will not dare to call Ganguly”.     अशा शेरदिल हिंंमतीच्या माणसानं कधीकाळी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं, ही भाग्याची गोष्ट. प्रत्यक्ष स्टीव्ह वॉनं त्याला एक प्रशंसेची पावती दिलीय, ती अशी: “Ganguly was the first captain that changed the perception of the way India play cricket. Now there is not much difference between Indian & Australian team!!”     त्याच्या काळात त्यानं कुंभाराचं चाक फिरवलं, आणि भारतीय क्रिकेटचं मडकं घडवलं…आजही BCCI चा अध्यक्ष म्हणून तो तेच करतोय. त्याच्यावर टीकाही होतेय. पण तो बधणारा नाही. त्याच्याच शब्दांत बोलायचं तर..”People throw stones at you..It is you who convert them into milestones!”     सौरव गांगुली..खरा ‘दादा’ माणूस!!

श्रीलंकेचा गारुडी..!!

 परीक्षेआधी एकदाही न उघडलेल्या अत्यंत अवघड विषयाच्या पुस्तकासारखा होता तो! निव्वळ मोहिनी…त्याची गोलंदाजी फक्त मोहिनी घालायची!! त्याचं नाव उच्चारताना जितकी जीभ वळणार नाही, तितकी चेंडू हातात असताना त्याची बोटं वळायची आणि वळवळायचीसुद्धा!! तज्ञांची, फलंदाजांची भलीमोठी फौज त्याच्यासमोर उभी ठाकली, आणि थकली, तरीही तो नेमकं काय टाकायचा, हे कधीही कोणालाही अचूक सांगता आलं नाही. एकवेळ ब्राह्मी, नागर किंवा कलिंगासारख्या प्राचीन लिपीमध्ये लिहिलेल्या अगम्य शिलालेखांचं वाचन करता येईल, पण श्रीलंकेचा सर्वोत्तम गोलंदाज म्हणून श्रीलंकन क्रिकेटदरबारी मानाचं पान पटकावणाऱ्या मुथय्या मुरलीधरनची गोलंदाजी वाचणं आणि समजून घेऊन ती खेळणं अवघड होतं. मनगटाचा जास्तीत जास्त वापर करणारा तो ‘ऑफ-ब्रेक फिरकी गोलंदाज’ होता, हे विशेष उल्लेखानं सांगावं लागतं, इतकी त्याची शैली विचित्र होती खरी, पण टप्पा, दिशा, उसळी, उंची आणि फिरकी या पाचही घटकांवर त्याचं अफाट प्रभुत्व होतं, इतकं की पिचवर एखाद्या विशिष्ट ठिकाणी नाणं ठेवून चेंडू बरोबर त्या नाण्यावरच टाकणं, हा त्याच्या डाव्या हातचा मळ होता. मॅकग्राचं सातत्य आणि अचूकता, कुंबळेची उंची आणि दिशा, वॉर्नची फिरकी एकत्र केली, की मुरलीधरनचा जन्म होतो!!   

२०१० साली श्रीलंकेच्या गॉल स्टेडियमवर त्यानं आपल्या तेजस्वी कारकीर्दीला विराम देण्याचं ठरवलं, तेव्हा कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं एकूण ७९२ बळी आपल्या नावावर केले होते!! शेवटच्या सामन्यात ८००चा टप्पा गाठला, तर सोन्याहून पिवळं; आणि हा मैलाचा दगड नाही गाठता आला, तरीही फारसं काही बिघडत नाही, या अलिप्त भावानं पण आत्मविश्वासानं मुरलीनं ती ‘टेस्ट’ दिली!! नशीबसुद्धा शूरांची सोबत करतं, तसं त्या सामन्यात त्याची बोटं त्याची गुलाम झाली, पिचही त्याला अंकित झालं आणि भारताच्या प्रग्यान ओझाचा बळी घेऊन त्यानं तो जादुई आकडा गाठलाच!! मैदान त्याच्या नावे गर्जत होतं, जागोजाग उभी केलेली त्याची पोस्टर्स लक्ष वेधत होती, ‘Spin Wizard’ म्हणजे ‘फिरकीचा जादूगार’ असे फलक अभिमानानं झळकत होते, श्रीलंकेनं जणू विश्वचषक जिंकला की काय, असा भास होत होता!!   

कुठल्याही भव्यदिव्य गोष्टीची सुरुवात छोटी छोटी पावलं टाकत होते; पण त्याचा पूर्ण प्रवास छोट्या छोट्या पावलांवरच झाला. पिचच्या थोड्याशा तिरक्या असलेल्या दिशेत सहा-सात एका लयीत पडलेल्या पावलांचा नाजूक रनअप, बोटांत चेंडू खेळवत हात खांद्यातून पूर्ण फिरवत हाताचा पंजा आडवा ठेवत मनगटाला झटका देत भिर्रर्रर्र करत सुटलेला चेंडू, तो सोडताना अक्षरशः बटाट्यासारखे झालेले त्याचे डोळे आणि एकाच पावलाच्या ‘फॉलोथ्रू’ पाठोपाठ मोरपीस तरंगत यावं, तितक्या सफाईदारपणे खाली आलेला त्याचा उजवा हात!! त्याच्या प्रत्येक हालचालीतलं नाट्य टिपायला प्रतिभा कालिदासाची हवी, आणि नजाकत चितारायला हात पिकासोचे!! हे नाटक कमी पडायची भीती त्याच्या कौशल्याला वाटली असेल म्हणून की काय, स्पायडरमॅन जाळं पसरवतो, तसा झपकन सोडलेला चेंडू आईच्या हातात न सापडता बेभान धावणाऱ्या अवखळ पोरासारखा फलंदाजाला चुकवत स्टंपकडं धावायचा!! हातहातभर वळायचा!! अगदी सिमेंटच्या पिचवरसुद्धा!!     स्वतः मुरलीधरनच्या मते, अचूकता सर्वांत महत्त्वाची. त्यापाठोपाठ फिरकी! एकदा ही दोन लक्ष्यं साध्य झाली की गोलंदाज नवे प्रयोग करायला मोकळा असतो, आणि त्यामुळं गोलंदाजीत वैविध्य आणणं तुलनेनं सोपं ठरतं. स्वतः मुरली याच क्रमानं शिडीची एकेक पायरी चढला! आधी त्याला मंदगती गोलंदाजी करायची होती, ते जमेना म्हणून त्यानं लेगब्रेकची कला अवगत करायचा प्रयत्न केला!! त्यातही समाधान न झाल्यानं तो ऑफब्रेककडं वळला! आधी त्यानं आपला टप्पा घोटवून घेतला, मग चेंडूला उंची देऊन टप्प्याबरोबरच दिशा दिली, त्यात सातत्य आणत चेंडूला असामान्य फिरकी देण्याचा त्याचा परिपाठ चालूच होता. लेगब्रेक गोलंदाजीची सुप्त इच्छा अपुरी राहिल्यानं असेल कदाचित, ऑफब्रेकमध्येही त्यानं मनगटाचा यथेच्छ वापर केला!! असं करणारा तो पहिलाच अपारंपरिक गोलंदाज ठरला. ‘unusual use of wrist’ असं त्याच्या शैलीचं वर्णन केलं गेलं. वर्षं उलटता उलटता ऑफब्रेकबरोबरच टॉपस्पिनवर त्यानं हुकूमत प्रस्थापित केली. त्याच्या गोलंदाजीचा पिकायला आलेला हापूस आंबा जरा कुठं फलंदाजांच्या लक्षात यायला लागला होता, तेवढ्यात ऑफब्रेकच्या हापूसच्या झाडावर त्यानं ‘दूसरा’ किंवा इंग्रजीत ज्याला ‘other one’ म्हणतात, त्याचं कलम केलं; आणि मग तो सुटलाच!! दृश्य बदल न करता टाकलेला हा ‘दूसरा’ आणि टप्पा पडून वेगानं सरळ जाणारा टॉपस्पिनर. दोन्ही बाजूंनी त्याच्या गोलंदाजीला धार चढली. नियंत्रित गोलंदाजी करण्यावर भर दिलेला, आणि नवेच धोकादायक चेंडू आत्मसात केलेला हा गिळगिळीत मासा,  फलंदाजांना कधीही गिळता आला नाही!! अनेकांनी चिकाटीनं मुरलीची गोलंदाजी अभ्यासली, आणि मत दिलं, “त्याच्या हाताचा पंजा आडवा असेल, तर ऑफब्रेक आणि पंजा थोडासा तिरका असेल, तर तो दूसरा” बस्स!! यापलीकडं चिकित्सा होऊच शकली नसती!!    डोईजड झाल्या मुरलीधरनला रोखण्यासाठी म्हणून प्रस्थापितांनी मग वेगळी शक्कल लढवली!! त्याच्या शैलीवरच ‘तो चेंडू फेकतो’ असे आरोप झाले. अर्थातच त्याची सुरुवात ऑस्ट्रेलियातून झाली. मानसिक खच्चीकरण करण्यासाठी आगाऊपणे त्याला त्याच्या वर्णावरूनही डिवचलं गेलं. एकदा त्याचे सलग ३ चेंडू ‘फेकले’ या सबबीखाली नो बॉल दिले गेले. त्याची गोलंदाजी बंद करण्याचा प्रकारही झाला. शांतपणे तो सगळ्याला सामोरा गेला. त्याच्या अंगावर नाना तऱ्हेच्या वायर्स, सेन्सर्स चिकटवून अक्षरशः वाहनांच्या टेस्टिंग मध्ये डमी असतात, तशी वागणूक त्याला देत ICCनं अनेक विद्यापीठांच्या मदतीनं अनेकदा गोलंदाजीच्या त्याच्या शैलीचं biomechanical analysis केलं. कुठलीही लाच न देता, काहीही manipulate न करता मुरली निर्दोष सुटला! त्याची शैली जगन्मान्य झाली. श्रीलंकेचा किल्ला शाबूत ठेवणारी त्याची फिरकीची तोफ आग बरसवतच राहिली.    त्या वेळची समीकरणं साधारण भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका अशी असायची. श्रीलंकेच्या बाबतीत निदान कसोटीत तरी हे समीकरण मुरलीधरन विरुद्ध प्रतिस्पर्धी संघ असं असायचं!! समोरचा संघ त्याला खेळू शकतो की नाही, यावर सामन्याचा निकाल ठरायचा.. हे सगळं कधी, तर संघात अट्टापटू, जयसूर्या, जयवर्धने, संगकारा आणि चमिंडा वास असताना!!     वेगवान गोलंदाजांना पोषक असणाऱ्या इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या खेळपट्ट्यांवरही मुरलीचा प्रभाव तसूभरही कमी झाला नाही! ऑस्ट्रेलियासाठी तर तो सैतान होता. एकदा ऑफस्टंप बाहेर जवळ जवळ २ फूट लांब अंतरावर पडलेल्या त्याच्या चेंडूनं टॉम मूडीची लेगस्टंप उडवली होती!! एकदा पायाची नस दुखावल्यानं त्यानं एकाच पायावर जागच्याजागी उभं राहून गोलंदाजी करताना शेन वॉटसनचा बळी घेतला!!     त्याची शैली समजणं अवघड होतं, ही जॅक कॅलिसची कबुली.
    “मुरलीविरुद्ध खेळणं म्हणजे बुद्धिबळ, त्यापेक्षाही डोकेदुखीच”, डॅमियन मार्टिनचं पांढरं निशाण!!    “त्याला तोंड देणं आम्हा ऑस्ट्रेलियन्सना सगळ्यात अवघड गेलं” मिस्टर क्रिकेट ही उपाधी असलेल्या माईक हसीनं मुरलीला दिलेलं हे प्रशस्तीपत्र. ते देताना त्याच्या भयंकर डोळ्यांचा उल्लेख करायला माईक विसरलेला नाही. त्याच्या हातून सुटलेल्या हवा चिरत जाणाऱ्या चेंडूचा ‘भिर्रर्रर्रर्र’ असा आवाजही त्यानं काढून दाखवलाय!!    “आधीच्या पिढीतल्या श्रेष्ठांना धक्के देत, आणि समकालीन गोलंदाजांबरोबर अटीतटीची स्पर्धा करत तो सर्वोत्तम ठरला. शेन वॉर्नच्याही वरचं स्थान मी त्याला देईन”, सकलेन मुश्ताकनं एका मुलाखतीत सांगितलं.     मुरलीचं कोडं कोणालाही सुटलं नाही, अगदी ऍलन बोर्डरलासुद्धा. कमेंटरी बॉक्समध्ये बसून तो एकदा त्याला चक्क ‘लेगस्पिनर’ संबोधता झाला.    “तो वाईट चेंडू टाकतच नाही आणि इथंच फलंदाजांवर वरचढ ठरतो. सतत उत्तम चेंडू खेळून वैतागलेले फलंदाज आक्रमक फटक्यांच्या नादात त्याच्या वेदीवर आपला बळी देतात”, इति गॅरी कर्स्टन. 


    “Shrilankan Cricket would not have gone on the maps without him!” विस्डेनचा एके काळचा संपादक लॉरेन्स ब्रूथ मुरलीबद्दल हे सांगतो. त्याच्याही पुढं जाऊन तो म्हणतो, “In fact the game would have been poorer without him!”    खरंय, क्रिकेट खरोखर त्याच्या नसण्यानं गरीब झालं असतं. कसोटी क्रिकेटमध्ये ८०० आणि वनडे मध्ये ५३४ बळी, हे फक्त शुष्क आकडे दिसले, तरी त्यावरचा वलयाचा रेशीमपडदा बाजूला करून बघितला कि कळतं, त्यानं प्रतिस्पर्ध्यांना किती सतावलं, ते!!    प्रतिस्पर्ध्यांचं जाऊ द्या.. शेकोटीची ऊब घेणाऱ्याला कधीतरी चटकाही बसतो, तसेच चटके मुरलीधरनसाठी यष्टीरक्षण करणाऱ्या रोमेश कालुवितरणा आणि कुमार संगकारालाही बसले!!कुमार संगकारानं विक्रम साठेला दिल्या मुलाखतीत हे किस्से उलगडून सांगितले!!    काही केल्या मुरलीचा ‘दूसरा’ ओळखता येत नसल्यानं वैतागलेल्या कालुवितरणाला ‘पुढची किमान सहा षटकं दूसरा टाकणार नाही’, असं आश्वस्त करून मुरलीनं ऐनवेळी आपला बेत बदलला, आणि लगेचच दूसराच टाकला!!    एकदा ऑस्ट्रेलियात खेळत असताना जिमी मायर फलंदाजी करत होता. मुरलीचा दूसरा आपण ओळखला असा वाटून चेंडू अडवण्यासाठी विकेटमागं असलेला कुमार संगकारा आपल्या उजव्या बाजूला दोन पावलं जातो न जातो, तोच चेंडू बरोबर विरुद्ध दिशेला वळला. चूक लक्षात येताच शेवटचा प्रयत्न म्हणून कुमारनं आपला डावा हात लांबवला, आणि आपसूक पंजामध्ये अडकलेला चेंडू १८० अंशात मागे वळून स्टंपवर फेकला. क्रीज सोडून पाच पावलं पुढं गेलेल्या मायरला जीवदान मिळण्याचा प्रश्नच नव्हता!! मुरलीच्या या बळीचं पूर्ण श्रेय कुमारला दिलं गेलं असलं, तरीही तो चेंडू ओळखण्यात आपली चूक झाली, आणि जे घडलं, ते केवळ अपघाती होतं, ही प्रांजळ कबुली त्यानं दिली.    जवळच्या, संघातल्या माणसालासुद्धा आपल्या गोलंदाजीचा थांग न लागू देणारा श्रीकृष्णासारख्या निष्णात राजकारण्याच्याच वंशातला हा मुथय्या मुरलीधरन!! कुमार संगकाराच त्याची व्याख्या करतो, “Murali is an example of dedication, hard work, commitment, passion and enthusiasm!!”    तो कौशल्यात आणि आकड्यांच्या दृष्टीतही सर्वश्रेष्ठ ठरला, हे निर्विवाद!! त्याला विक्रम नको होते असं नाही, पण संघाच्या ध्येयाआड त्यानं ते कधीही येऊ दिले नाहीत. त्याच्या काळात त्याची मुरली उत्कटपणे वाजली, तिचा रसाळपणा सिद्ध करायला त्याचे आकडे पाहावेत जरूर, पण  एखाद्या भाबड्या प्रेक्षकावर त्याच्या गोलंदाजीनं केलेलं गारूड त्या प्रेक्षकाकडूनच ऐकावं. ती मुरली जास्त सुरेल की ही आकड्यांची, त्याची मात्र काही कल्पना नाही!!

‘झूलन’ युग

2022 वर्षातील सप्टेंबर महिना हा खेळाडुंच्या प्रदीर्घ कारकीर्दीचा अंत म्हणून ओळखला जाईल. सेरेना विल्यम्स, रॉजर फेडरर आणि या यादीत आणखी एक नाव जोडलं गेलंय ते म्हणजे भारतीय महिला क्रिकेट टीमची फास्ट बॉलर झुलन गोस्वामी. भारताकडून झुलन 12 टेस्ट, 204 वनडे, 68 T20 खेळली आहे. 2002 साली तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. जवळपास दोन दशकांनतरही  ती टेस्ट आणि वनडे क्रिकेटमध्ये महत्वाची खेळाडू होती. 
वयाच्या चाळीसासाव्या वर्षी देखील वेगवान गोलंदाजींचं नेतृत्व ती करत होती. भारतातात जिथे फिरकीपटुंना पोषक वातावरण असतं, इतकंच नव्हे तर स्पिन बॉलर्सदेखील खोऱ्याने भरती होतात तिथे फास्ट बॉलर म्हणून एवढी प्रदीर्घ कारकीर्द घडवणं हे कौतुकास पात्रच आहे. झुलनने महिला प्रतिस्पर्धी खेळाडूच्या मनात तिच्या बेस्ट इयर्समध्ये भीती निर्माण केली होती. तिच्या बॉलिंग स्पीडने आणि इनस्विंगमूळे अनेक नावाजलेल्या खेळाडुंची भंबेरी उडायची. तिच्या पेस बॉलिंगमूळे क्रिकेट विश्वात ‘चखदा एक्स्प्रेस’ या टोपणनावाने ती प्रसिद्ध झाली. फेसबुक, इन्स्टाग्राम अस्तित्वात नव्हते. सचिन तेंडुलकरच्या कसोटीत १०,००० धावा नव्हत्या. इंटरनॅशनल क्रिकेट न खेळल्यामुळे महेंद्रसिंग धोनी, जेम्स अँडरसन किरकोळ लोकांनाच ठाऊक होते. अटलबिहारी वाजपेयी त्यावेळी पंतप्रधान होते. पोस्ट ग्रॅज्युएट होणं म्हणजे आभाळालाच हात टेकल्यासारखं वाटायचं. मोबाईल प्रकरण फार कमी लोकांकडे होतं. पत्र लिहण्यातला स्पार्क बऱ्यापैकी टिकून होता त्या काळात 5 फुट 11 इंच उंची असलेल्या झूलनने क्रिकेट कारकीर्दीला सुरुवात केली होती. 


भारतात (विशेषतः महिलांमध्ये) क्रीडासंस्कृती रुजवण्यात सायना नेहवाल, सानिया मिर्झा, अंजली भागवत, पी.व्ही सिंधु  तसेच झुलनची संघ सहकारी मिताली राज यांची नावं आदराने घेतली जातात. यात चूक नाहीच आहे, त्यांचं त्यांच्या खेळात खूप मोठं योगदान आहेच, पण झूलन गोस्वामी हे नाव त्या पंक्तीत असावं असं कायम वाटत आलंय. महिलादिनी क्रीडा क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या  महिला खेळाडूंच्या फ्लेक्स बॅनरवर झूलन अभावानेच दिसते.
रसगुल्ला किंवा फुटबॉल न आवडणारा बंगाली विरळाच. झूलनदेखील याला अपवाद नव्हती. परंतु १९९२ चा वर्ल्डकप पाहिल्यानंतर तिची क्रिकेटमधली रुची अधिकच वाढली. १९९७ साली वयाच्या पंधराव्या वर्षी ऑस्ट्रेलिया महिला संघ इडन गार्डन्सवर वर्ल्डकप जिंकला त्या सामन्यात झूलन बॉल गर्लच्या भूमिकेत होती. बेलिंडा क्लार्क, कॅथरिन फिट्झपॅट्रिक सारख्या तत्कालीन ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडुंचा खेळ पाहुन झूलन प्रभावित झाली होती. फुटबॉल प्रेमी कुटुंब, त्या काळी महिला क्रिकेटचं स्थान आणि इतर बाबी बघता घरुन विरोध होणं स्वाभाविकच होते. घरच्यांचा विरोध पत्करून, नजीकच्या परिसरातील राहणाऱ्या लोकांचे टोमणे सहन करत तिने सराव चालूच ठेवला. चखदा सारख्या छोट्या गावातुन येणाऱ्या झुलनसाठी क्रिकेट कारकीर्द घडवणं तसं कठीणच होतं. तिला जाऊन येऊन पाच तासांचा प्रवास करावा लागायचा. तिच्या या प्रवासात, नेटाने सराव चालू राहण्यात झुलनचा आजीच्या पाठिंब्याचा फार मोठा आधार होता.
चखदा ते लंडन( लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंड)  हा प्रवास सोपा निश्चितच नव्हता. अनेक चढ उतारांचा सामना झुलनला या प्रवासात करावा लागला. हा प्रवास एक दोन वर्षांचा नाही तर तब्बल दोन दशकांचा प्रवास आहे. 2002 मध्ये इंग्लंडविरूध्द कारकीर्दीचा श्रीगणेशा करणारी झुलन इंग्लंडविरूध्दच आपल्या आंतरराष्ट्रीय करियरमधील शेवटची मॅच खेळली. 2002 साली त्या सिरीजमध्ये भारतीय टीमने इंग्लंडला व्हाईटवॉश दिला होता आणि यावर्षी देखील व्हाईटवॉश दिला. झुलनचा कारकीर्दचं एक वर्तुळा पुर्ण झालं. त्यापेक्षाही शेवट गोड झाला ही बाब झुलनसह साऱ्या क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची गोष्ट आहे. या सिरीजमध्ये तिच्यासोबत बॉलिंग अटॅकमध्ये साथ देणारी रेणुका सिंह ही देखील 2016 टी20 वर्ल्डकपमध्ये बॉल गर्ल होती. वेगवान गोलंदाजीचं बॅटन एकार्थाने झुलनने रेणुका सिंगकडे दिलेलं आहे. 
भारत विरूद्ध इंग्लंड वनडे सिरीजमध्ये पहिल्यांदा झुलन मितालीच्या अनुपस्थित मैदानात उतरली. याच सिरीजमधील तिसऱ्या वनडेत झुलनने 10,000 बॉल्स टाकण्याचा रेकॉर्ड केला आहे. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतल्या शेवटच्या दोन्ही ओव्हर तिने मेडन टाकल्या होत्या. वनडेमध्ये (255) तसेच सर्व फॉर्मेट मिळून (355) सर्वाधिक विकेट्स झुलनच्याच नावावर आहे. वर्ल्डकपच्या इतिहासात देखील झुलननेच सर्वाधिक विकेट्स स्वतः च्या नावावर केल्या आहेत. 
2008 मध्ये मिताली राजकडून तिच्याकडे कर्णधारपद आलं. तीन वर्ष तिने भारतीय टीमचं नेतृत्व केलं. 2009 वर्ल्डकपला भारत तिच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला होता. 2005, 2009, 2013, 2017, 2022 या पाच वर्ल्डकप मध्ये झुलनने भारतीय टीमचं प्रतिनिधित्व केलं त्यापैकी एकही वर्ल्डकपमध्ये तिला विजेतेपदाचं मेडल गळ्यात पडलं नाही. 2017 मध्ये झुलन (आणि मिताली) जेतेपदाच्या जवळ पोहोचली होती पण इंग्लंडची फास्ट बॉलर श्रुबसोलचा ‘त्या’ स्पेलमुळे भारत लॉर्ड्सवर हरला होता. सेमी फायनल आणि फायनलमधे झुलनने अप्रतिम बॉलिंग केली होती. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरूध्द तिने अनुक्रमे 2 आणि 3 विकेट घेतल्या होत्या. तर 2022 वर्ल्डकपला आफ्रिकेविरूध्दचा करो या मरो सामन्यात दुखापतीमुळे तिला बाहेर बसावे लागले होते.


मध्यमगती गोलंदाज ही तिची मुख्य ओळख असली तरी फलंदाजीतही तिने संघासाठी योगदान दिलं आहे. भारताकडून वनडेमध्ये 1000 रन आणि 100 विकेट घेणारी झुलन एकमेव आहे. 2006 झाली इंग्लंडविरूद्ध झालेल्या टेस्टमध्ये मिताली राज सोबत अर्धशतकीय भागीदारी करून मॅच ड्रॉ करण्यात महत्वाची भूमिका पार पाडली. तर दुसऱ्या टेस्टमध्ये नेहमीप्रमाणे बॉलिंगने करामत करत दहा विकेट घेत टेस्टमध्ये भारत इंग्लिश टीमविरूध्द कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवू शकला. त्या स्पेलमुळे दहा विकेट घेणारी सर्वात कमी वयाची खेळाडू ठरली होती. तिच्या या कामगिरीमुळे तिला 2007 सालचा आयसीआयसी प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार मिळवणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटर आहे. 2021 साली ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे सिरीजमध्ये आपल्या शेवटच्या ओव्हरमध्ये महत्वपूर्ण चौकार मारत ऑस्ट्रेलियाची सलग 26 विजयाची मालिका खंडित केली होती. तर त्या मॅचचा पहिल्या इनिंगमध्ये 3 विकेट देखील तिने घेतल्या होत्या.
आज वुमन्स क्रिकेट जी उंची गाठतंंय तेवढी दहा-वीस वर्षापुर्वी एवढ्या प्रमाणात या क्रिकेटची चर्चा होत नसत. ग्राऊंड्स/ किट्स योग्य स्टॅंडर्डनूसार उपलब्ध नसायचे. ना ब्रॉडकास्टर, ना स्पॉन्सर, आणि मिळालेच तरी प्रेक्षकांच्या सोईनुसार सामन्याचं (पुनः)प्रेक्षपण होत नसायचे. आता परिस्थिती बरीच बदलत आहे. भारतीय महिला क्रिकेटर्स देश विदेशातील लीग्समध्ये आपल्या परफॉर्मन्सने छाप पाडत आहेत.  या साऱ्या स्थित्यंतराची झुलन गोस्वामी साक्षीदार आहे. महिला क्रिकेटला (विशेषतः भारतीय महिला क्रिकेटला) जे अच्छे दिन आले आहेत त्यात झुलन गोस्वामी आणि तिची सहकारी व माजी भारतीय महिला टीमची कॅप्टन मिताली राजचा मोठा वाटा आहे.
झुलन हे महिला क्रिकेटचं पर्व नव्हे तर युग होतं. तेंडुलकर जसं त्याच्या करियरचा अंतिम टप्प्यात अनेक युवा खेळाडुंना मोलाचं मार्गदर्शन करायचा त्याचप्रमाणे झुलन देखील शिखा पांडे, मानसी जोशी, पूजा वस्त्रकार यासारख्या नव्या खेळाडूंची मार्गदर्शक झाली. तेंडुलकर प्रमाणेच फिटनेस वयाचा आड येणार नाही याकडे तिचं कायम लक्ष असायचं. सिनीयर खेळाडू असूनही तो एक प्रकारचा तोरा मिरवताना ती कधीही दिसली नाही. तिचा हाच सच्चेपणा तिला इतर वरिष्ठ खेळाडुंपेक्षा वेगळं करतो. तिच्या या साधेपणामुळेच, निगर्वी स्वभावामुळेच ती टीममधील सहकारी खेळाडुंची ‘झु दीदी’ झाली. 


आज भारतातील लहानग्या लेकींना जर फास्ट बॉलर बनावे वाटतं असेल तर त्याचं प्रेरणा स्त्रोत झूलन गोस्वामीच आहे. राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस लक्ष्मण, झहीर खान, विरेंद्र सेहवाग, मिताली राज यांच्यासारखा भारतीय अनेक दिग्गज खेळाडूंना फेअरवेल मॅच मिळु शकली नाही. क्रिकेटच्या मैदानावर निवृत्त होण्याचं त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं. झुलनला या हिशोबाने नशीबवानच म्हणलं पाहिजे. झुलनला फेअरवेल मिळणं हा तिचाच नव्हे तर संपूर्ण भारतीय महिला क्रिकेटचा गौरव आहे. भारत सरकारने देखील 2010 आणि 2012 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. ‘तु स्लो बॉलिंग करते, फक्त बॅटिंग कर” अशी टिप्पणी केलेल्या लोकांना, टीकाकारांना झुलनने आपल्या अपार कष्टाने, खेळाप्रती प्रेमाने आणि दैदिप्यमान कामगिरीने सणसणीत चपराक लगावली आहे.
– वरद सहस्रबुद्धे

भारताच्या गौरवशाली क्रिकेट इतिहासातील एक सोनेरी पान- २००७ टी२० वर्ल्ड कप

१९८३ चा क्रिकेट विश्वचषक जिंकून कपिल देवच्या भारतीय संघाने भारतातील अनेक तरुणांना क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरणा दिली. नव्वदीच्या दशकाअखेरीस भारतीय क्रिकेटला मॅच फिक्सिंग चे ग्रहण लागले होते. अनेक क्रिकेट चाहत्यांनी क्रिकेट कडे पाठ फिरवली होती. त्याच दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कर्णधारपदाची भिस्त सौरव गांगुलीच्या खांद्यावर ठेवली.  नवीन संघबांधणीसोबतच , भारतीय क्रिकेट फॅन्सला परत क्रिकेट कडे खेचून आणायची मुख्य जबाबदारी दादाकडे होती.

दादाने त्याचे मॅच-विनर खेळाडू आधीच हेरून ठेवले होते ज्यामध्ये द्रविड, लक्ष्मण , सचिन , कुंबळे यांच्याबरोबर हरभजन ,युवराज,सेहवाग ,झहीर खान ,कैफ ,आशिष नेहरा अश्या नवख्या खेळाडूंचा समावेश होता. २००३ एकदिवसीय विश्वचषकात दादाच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने चांगला खेळ केला पण अंतिम सामन्यात कांगरूनसमोर त्यांचा निभाव लागला नाही. २००७ मध्ये एकदिवस विश्वचषकात पुन्हा निराशाच भारताच्या पदरी पडली. भारत ग्रुप स्टेज मधूनच स्पर्धेच्या बाहेर गेला. त्याच वर्षी लगेचच सप्टेंबर महिन्यात पहिल्यावहिल्या टी-२० वर्ल्ड कप चे आयोजन साऊथ आफ्रिकेत करण्यात आले होते.

क्रिकेटचा नवीन आणि झटपट प्रकार असल्यामुळे सचिन,  गांगुली, द्रविड, लक्ष्मण या सिनिअर खेळाडूंनी टीम मध्ये भाग नाही घ्यायचा ठरवले आणि भारताचा नवखा संघ या विश्वचषकासाठी पाठवण्यात आला. कर्णधारपदाची जबाबदारी महेंद्रसिंह धोनीकडे देण्यात आली होती. एकदिवसीय विश्वचषकात आलेली निराशा झटकून पुन्हा नव्या जोमाने खेळायचे आव्हान भारतीय संघासमोर होते.

भारताने त्या वर्ल्डकप स्पर्धेआधी फक्त एकदा टी-२० चा सामना दक्षिण आफ्रकेविरुद्ध खेळला होता. क्रिकेटचा हा नवीन प्रकार काय रंग दाखवणार याची कुणालाही कल्पना नव्हती. मुळात टी-२० हा प्रकारच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी तयार करण्यात आला. एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट वेळ खाऊ असल्यामुळे, प्रेक्षकांच्या सोयीसाठी टी-२० चा उदय झाला.

भारताचा स्कॉटलंड विरुद्धचा पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. दुसरा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध असल्यामुळे सर्व क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण होते.   प्रथम फलंदाजी करताना रॉबिन उथप्पा ने केलेल्या एकमेव अर्धशतकी खेळीमुळे भारताने १४१ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली. मिसबाह ने पाकिस्तानकडून खेळताना शेवटपर्यंत एकहाती सुंझ लढवली. सामना शेवटच्या षटकात नाट्यमय वळणावर आला होता.

 शेवटच्या षटकात १२ धावांची आवश्यकता असताना मिसबाह ने श्रीसंत ला दुसऱ्या आणि चौथ्या बॉलवर चौकार मारून सामन्याचे पारडे पाकिस्तानच्या बाजूने झुकवले. २ बॉल मध्ये १ धाव गरजेची असताना श्रीसंत ने पुनरागमन करत तो चेंडू डॉट घालवला. शेवटच्या चेंडूत १ धाव गरजेची असताना मिसबाह ने कव्हर च्या दिशेने मारलेला चेंडू युवराजने अडवून त्याला रन- आऊट केले. सामना टाय झाला. पण सामन्याच्या विजेता ठरवण्यासाठी बोल- आऊट ठेवण्यात आले होते. भारताकडून सेहवाग, हरभजन, रॉबिन उथप्पा यांनी अचूक स्टम्पला हिट केल्यामुळे भारताने तो सामना जिंकला त्याउलट पाकिस्तानकडून एकही गोलंदाजाला स्टम्पला हिट करता आले नाही.

पुढच्या सामन्यात भारताला कीवी संघाकडून धोबीपछाड मिळाला. किवी संघाने दिलेले १९१ धावांचे आव्हान पार करण्यात भारतीय संघाला अपयश आले. इंग्लंडविरुद्धच्या सामना खऱ्या अर्थाने लक्षात राहिला तो फक्त युवराज साठी. अँड्र्यू फ्लिन्टॉफ ने युवराजला डिवचून त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक केली.

नंतर युवराज आणि फ्लिन्टॉफ मध्ये बाचाबाची झाली आणि युवीने या सगळ्या गोष्टीचा राग नवख्या स्टुअर्ट ब्रॉड वर काढलं. ब्रॉड ला ६ बॉल मध्ये ६ षटकार ठोकून एक नवा विक्रम युवीने बनवला. तसेच, १२ बॉल मध्ये ५० धावा करून टी-२० मध्ये सगळ्यात वेगवान अर्धशतक करून क्रिकेट जगतात एकच हाहाकार माजवला. नंतरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला मात देत भारत उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला.

कांगरून विरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्याचा हीरो पुन्हा एकदा युवराज सिंग ठरला. त्याने ३० बॉल्स मध्ये केलेल्या ७० धावांच्या खेळीमुळे आणि नंतर इरफान, हरभजन, श्रीसंत , जोगिंदर शर्मा यांनी टिच्चून केलेल्या गोलंदाजीच्या जोरावर भारतीय टीम ने दिमाखात फायनल ला प्रवेश केला. फायनल ला पुन्हा पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने होते.

सेहवागला दुखापत झाल्यामुळे युसुफ पठाण च्या कारकिर्दीची सुरुवात या सामन्यातून झाली. प्रथम फलंदाजी करताना भारताकडून गौतम गभीरसोबत युसुफ सलामीला आला. गौतमने ५४ बॉल्स मध्ये अफलातून ७५ धावा करत भारतीय संघाला १५७ च्या धावफलक उभा करून दिला. फायनल सामन्यातील दबावाचा विचार करता ही धावसंख्या नक्कीच आव्हानात्मक होती. पुन्हा एकदा पाकिस्तान संघाची भिस्त मिसबाह च्या खांद्यावर होती. शेवटच्या षटकात ६ बॉल्स मध्ये १२ धावांची गरज असताना धोनीने चेंडू जोगिंदर शर्माच्या हाती सोपवला.

विशेष म्हणजे हरभजन सिंगची त्यावेळी एक ओव्हर शिल्लक होती त्यामुळे धोनीचा हा निर्णय सर्वांना आश्चर्य जनक वाटला. जोगिंदर शर्माच्या दुसऱ्याच चेंडूवर मिसबाहने षटकार खेचला आणि समीकरण ४ बॉल मध्ये ६ धावा असे केले. सामना भारताच्या हातातून गेला असे वाटत होते. पण, पुढचा चेंडू स्कूप करण्याच्या प्रयत्नात मिसबाहने मिस टाईम केलेला शॉट फाइन लेग ला उभ्या असलेल्या श्रीसंत ने पकडला आणि भारत पहिल्यांदा टी-२० विश्वचषक विजेता झाला.

धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा सुवर्णकाळ चालू झाला आणि पुढे जाऊन भारताने २०११ चा एकदिवसीय विश्वचषक तसेच २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी वर आपले नाव कोरले.

To know more about Crickatha