ball

‘झूलन’ युग

by वरद सहस्रबुद्धे

2022 वर्षातील सप्टेंबर महिना हा खेळाडुंच्या प्रदीर्घ कारकीर्दीचा अंत म्हणून ओळखला जाईल. सेरेना विल्यम्स, रॉजर फेडरर आणि या यादीत आणखी एक नाव जोडलं गेलंय ते म्हणजे भारतीय महिला क्रिकेट टीमची फास्ट बॉलर झुलन गोस्वामी. भारताकडून झुलन 12 टेस्ट, 204 वनडे, 68 T20 खेळली आहे. 2002 साली तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. जवळपास दोन दशकांनतरही  ती टेस्ट आणि वनडे क्रिकेटमध्ये महत्वाची खेळाडू होती. 
वयाच्या चाळीसासाव्या वर्षी देखील वेगवान गोलंदाजींचं नेतृत्व ती करत होती. भारतातात जिथे फिरकीपटुंना पोषक वातावरण असतं, इतकंच नव्हे तर स्पिन बॉलर्सदेखील खोऱ्याने भरती होतात तिथे फास्ट बॉलर म्हणून एवढी प्रदीर्घ कारकीर्द घडवणं हे कौतुकास पात्रच आहे. झुलनने महिला प्रतिस्पर्धी खेळाडूच्या मनात तिच्या बेस्ट इयर्समध्ये भीती निर्माण केली होती. तिच्या बॉलिंग स्पीडने आणि इनस्विंगमूळे अनेक नावाजलेल्या खेळाडुंची भंबेरी उडायची. तिच्या पेस बॉलिंगमूळे क्रिकेट विश्वात ‘चखदा एक्स्प्रेस’ या टोपणनावाने ती प्रसिद्ध झाली. फेसबुक, इन्स्टाग्राम अस्तित्वात नव्हते. सचिन तेंडुलकरच्या कसोटीत १०,००० धावा नव्हत्या. इंटरनॅशनल क्रिकेट न खेळल्यामुळे महेंद्रसिंग धोनी, जेम्स अँडरसन किरकोळ लोकांनाच ठाऊक होते. अटलबिहारी वाजपेयी त्यावेळी पंतप्रधान होते. पोस्ट ग्रॅज्युएट होणं म्हणजे आभाळालाच हात टेकल्यासारखं वाटायचं. मोबाईल प्रकरण फार कमी लोकांकडे होतं. पत्र लिहण्यातला स्पार्क बऱ्यापैकी टिकून होता त्या काळात 5 फुट 11 इंच उंची असलेल्या झूलनने क्रिकेट कारकीर्दीला सुरुवात केली होती. 


भारतात (विशेषतः महिलांमध्ये) क्रीडासंस्कृती रुजवण्यात सायना नेहवाल, सानिया मिर्झा, अंजली भागवत, पी.व्ही सिंधु  तसेच झुलनची संघ सहकारी मिताली राज यांची नावं आदराने घेतली जातात. यात चूक नाहीच आहे, त्यांचं त्यांच्या खेळात खूप मोठं योगदान आहेच, पण झूलन गोस्वामी हे नाव त्या पंक्तीत असावं असं कायम वाटत आलंय. महिलादिनी क्रीडा क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या  महिला खेळाडूंच्या फ्लेक्स बॅनरवर झूलन अभावानेच दिसते.
रसगुल्ला किंवा फुटबॉल न आवडणारा बंगाली विरळाच. झूलनदेखील याला अपवाद नव्हती. परंतु १९९२ चा वर्ल्डकप पाहिल्यानंतर तिची क्रिकेटमधली रुची अधिकच वाढली. १९९७ साली वयाच्या पंधराव्या वर्षी ऑस्ट्रेलिया महिला संघ इडन गार्डन्सवर वर्ल्डकप जिंकला त्या सामन्यात झूलन बॉल गर्लच्या भूमिकेत होती. बेलिंडा क्लार्क, कॅथरिन फिट्झपॅट्रिक सारख्या तत्कालीन ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडुंचा खेळ पाहुन झूलन प्रभावित झाली होती. फुटबॉल प्रेमी कुटुंब, त्या काळी महिला क्रिकेटचं स्थान आणि इतर बाबी बघता घरुन विरोध होणं स्वाभाविकच होते. घरच्यांचा विरोध पत्करून, नजीकच्या परिसरातील राहणाऱ्या लोकांचे टोमणे सहन करत तिने सराव चालूच ठेवला. चखदा सारख्या छोट्या गावातुन येणाऱ्या झुलनसाठी क्रिकेट कारकीर्द घडवणं तसं कठीणच होतं. तिला जाऊन येऊन पाच तासांचा प्रवास करावा लागायचा. तिच्या या प्रवासात, नेटाने सराव चालू राहण्यात झुलनचा आजीच्या पाठिंब्याचा फार मोठा आधार होता.
चखदा ते लंडन( लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंड)  हा प्रवास सोपा निश्चितच नव्हता. अनेक चढ उतारांचा सामना झुलनला या प्रवासात करावा लागला. हा प्रवास एक दोन वर्षांचा नाही तर तब्बल दोन दशकांचा प्रवास आहे. 2002 मध्ये इंग्लंडविरूध्द कारकीर्दीचा श्रीगणेशा करणारी झुलन इंग्लंडविरूध्दच आपल्या आंतरराष्ट्रीय करियरमधील शेवटची मॅच खेळली. 2002 साली त्या सिरीजमध्ये भारतीय टीमने इंग्लंडला व्हाईटवॉश दिला होता आणि यावर्षी देखील व्हाईटवॉश दिला. झुलनचा कारकीर्दचं एक वर्तुळा पुर्ण झालं. त्यापेक्षाही शेवट गोड झाला ही बाब झुलनसह साऱ्या क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची गोष्ट आहे. या सिरीजमध्ये तिच्यासोबत बॉलिंग अटॅकमध्ये साथ देणारी रेणुका सिंह ही देखील 2016 टी20 वर्ल्डकपमध्ये बॉल गर्ल होती. वेगवान गोलंदाजीचं बॅटन एकार्थाने झुलनने रेणुका सिंगकडे दिलेलं आहे. 
भारत विरूद्ध इंग्लंड वनडे सिरीजमध्ये पहिल्यांदा झुलन मितालीच्या अनुपस्थित मैदानात उतरली. याच सिरीजमधील तिसऱ्या वनडेत झुलनने 10,000 बॉल्स टाकण्याचा रेकॉर्ड केला आहे. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतल्या शेवटच्या दोन्ही ओव्हर तिने मेडन टाकल्या होत्या. वनडेमध्ये (255) तसेच सर्व फॉर्मेट मिळून (355) सर्वाधिक विकेट्स झुलनच्याच नावावर आहे. वर्ल्डकपच्या इतिहासात देखील झुलननेच सर्वाधिक विकेट्स स्वतः च्या नावावर केल्या आहेत. 
2008 मध्ये मिताली राजकडून तिच्याकडे कर्णधारपद आलं. तीन वर्ष तिने भारतीय टीमचं नेतृत्व केलं. 2009 वर्ल्डकपला भारत तिच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला होता. 2005, 2009, 2013, 2017, 2022 या पाच वर्ल्डकप मध्ये झुलनने भारतीय टीमचं प्रतिनिधित्व केलं त्यापैकी एकही वर्ल्डकपमध्ये तिला विजेतेपदाचं मेडल गळ्यात पडलं नाही. 2017 मध्ये झुलन (आणि मिताली) जेतेपदाच्या जवळ पोहोचली होती पण इंग्लंडची फास्ट बॉलर श्रुबसोलचा ‘त्या’ स्पेलमुळे भारत लॉर्ड्सवर हरला होता. सेमी फायनल आणि फायनलमधे झुलनने अप्रतिम बॉलिंग केली होती. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरूध्द तिने अनुक्रमे 2 आणि 3 विकेट घेतल्या होत्या. तर 2022 वर्ल्डकपला आफ्रिकेविरूध्दचा करो या मरो सामन्यात दुखापतीमुळे तिला बाहेर बसावे लागले होते.


मध्यमगती गोलंदाज ही तिची मुख्य ओळख असली तरी फलंदाजीतही तिने संघासाठी योगदान दिलं आहे. भारताकडून वनडेमध्ये 1000 रन आणि 100 विकेट घेणारी झुलन एकमेव आहे. 2006 झाली इंग्लंडविरूद्ध झालेल्या टेस्टमध्ये मिताली राज सोबत अर्धशतकीय भागीदारी करून मॅच ड्रॉ करण्यात महत्वाची भूमिका पार पाडली. तर दुसऱ्या टेस्टमध्ये नेहमीप्रमाणे बॉलिंगने करामत करत दहा विकेट घेत टेस्टमध्ये भारत इंग्लिश टीमविरूध्द कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवू शकला. त्या स्पेलमुळे दहा विकेट घेणारी सर्वात कमी वयाची खेळाडू ठरली होती. तिच्या या कामगिरीमुळे तिला 2007 सालचा आयसीआयसी प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार मिळवणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटर आहे. 2021 साली ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे सिरीजमध्ये आपल्या शेवटच्या ओव्हरमध्ये महत्वपूर्ण चौकार मारत ऑस्ट्रेलियाची सलग 26 विजयाची मालिका खंडित केली होती. तर त्या मॅचचा पहिल्या इनिंगमध्ये 3 विकेट देखील तिने घेतल्या होत्या.
आज वुमन्स क्रिकेट जी उंची गाठतंंय तेवढी दहा-वीस वर्षापुर्वी एवढ्या प्रमाणात या क्रिकेटची चर्चा होत नसत. ग्राऊंड्स/ किट्स योग्य स्टॅंडर्डनूसार उपलब्ध नसायचे. ना ब्रॉडकास्टर, ना स्पॉन्सर, आणि मिळालेच तरी प्रेक्षकांच्या सोईनुसार सामन्याचं (पुनः)प्रेक्षपण होत नसायचे. आता परिस्थिती बरीच बदलत आहे. भारतीय महिला क्रिकेटर्स देश विदेशातील लीग्समध्ये आपल्या परफॉर्मन्सने छाप पाडत आहेत.  या साऱ्या स्थित्यंतराची झुलन गोस्वामी साक्षीदार आहे. महिला क्रिकेटला (विशेषतः भारतीय महिला क्रिकेटला) जे अच्छे दिन आले आहेत त्यात झुलन गोस्वामी आणि तिची सहकारी व माजी भारतीय महिला टीमची कॅप्टन मिताली राजचा मोठा वाटा आहे.
झुलन हे महिला क्रिकेटचं पर्व नव्हे तर युग होतं. तेंडुलकर जसं त्याच्या करियरचा अंतिम टप्प्यात अनेक युवा खेळाडुंना मोलाचं मार्गदर्शन करायचा त्याचप्रमाणे झुलन देखील शिखा पांडे, मानसी जोशी, पूजा वस्त्रकार यासारख्या नव्या खेळाडूंची मार्गदर्शक झाली. तेंडुलकर प्रमाणेच फिटनेस वयाचा आड येणार नाही याकडे तिचं कायम लक्ष असायचं. सिनीयर खेळाडू असूनही तो एक प्रकारचा तोरा मिरवताना ती कधीही दिसली नाही. तिचा हाच सच्चेपणा तिला इतर वरिष्ठ खेळाडुंपेक्षा वेगळं करतो. तिच्या या साधेपणामुळेच, निगर्वी स्वभावामुळेच ती टीममधील सहकारी खेळाडुंची ‘झु दीदी’ झाली. 


आज भारतातील लहानग्या लेकींना जर फास्ट बॉलर बनावे वाटतं असेल तर त्याचं प्रेरणा स्त्रोत झूलन गोस्वामीच आहे. राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस लक्ष्मण, झहीर खान, विरेंद्र सेहवाग, मिताली राज यांच्यासारखा भारतीय अनेक दिग्गज खेळाडूंना फेअरवेल मॅच मिळु शकली नाही. क्रिकेटच्या मैदानावर निवृत्त होण्याचं त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं. झुलनला या हिशोबाने नशीबवानच म्हणलं पाहिजे. झुलनला फेअरवेल मिळणं हा तिचाच नव्हे तर संपूर्ण भारतीय महिला क्रिकेटचा गौरव आहे. भारत सरकारने देखील 2010 आणि 2012 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. ‘तु स्लो बॉलिंग करते, फक्त बॅटिंग कर” अशी टिप्पणी केलेल्या लोकांना, टीकाकारांना झुलनने आपल्या अपार कष्टाने, खेळाप्रती प्रेमाने आणि दैदिप्यमान कामगिरीने सणसणीत चपराक लगावली आहे.
– वरद सहस्रबुद्धे

To know more about Crickatha