ball

सर्वोत्तम प्रेक्षकाचा चेहरा..!! 

by व्यंकटेश घुगरे

 “प्रेक्षकांत बसून क्रिकेट बघणं”, हे करिअर असू शकतं का? बँक बॅलन्सची चक्रवाढ जाऊ द्या, पण क्रिकेटच्या इतिहासात नाव अजरामर करण्याचा हा पर्याय असू शकतो का? दोन्ही प्रश्नांची उत्तरं होकारार्थी आहेत. सोशल मीडियाचं प्राबल्य असलेल्या आजच्या जमान्यात सर्वांगावर तिरंग्याबरोबरच सचिन तेंडुलकरचं नाव गोंदवून प्रत्येक मॅचला उपस्थिती लावणारा सुधीर कुमार चौधरी हा भारताच्या क्रिकेट प्रेक्षकांचा प्रातिनिधिक चेहरा म्हणून सगळीकडं ओळखला जातो. त्याचाच आडनाव बंधू असलेला अब्दुल जलील नावाचा पाकिस्तानी क्रिकेट चाहताही पंधरा एक वर्षांपूर्वी चांगलाच प्रसिद्ध होता.    देशीदेशींच्या अशा हौशी क्रिकेटरसिकांचा शिरोमणी म्हणा, पूर्वज म्हणा, किंवा आणखी काही; कोणे एके काळी, म्हणजे झाली आता त्यालाही शंभरेक वर्षं, ऑस्ट्रेलियात मशहूर होता. गोष्ट त्या काळातली आहे, जेव्हा प्रेक्षकांसाठी खास बसण्याची, खाण्यापिण्याची राजेशाही व्यवस्था क्रिकेटच्या स्टेडियममध्ये नव्हती; किंबहुना त्या मैदानाला स्टेडियम म्हणणंही योग्य ठरलं नसतं. मध्ये क्रिकेटचं मैदान, आणि आजूबाजूला नैसर्गिकरीत्या तयार झालेले ओबडधोबड उतार, टेकड्या, आणि परिस्थिती थोडी चांगली असेलच, तर तिथं लाकडी खुर्च्या किंवा बाकडी टाकलेली!!    मूळ मुद्दा, उपजीविकेसाठी गावभर फिरून ससे विकणारा एक इरसाल मनुष्य सिडने शहराचा रहिवासी होता. सिडनेमधला एकही क्रिकेटचा सामना न चुकवणारा माणूस म्हणून त्याची ख्याती होती. सिडने मैदानाच्या एका ठराविक टेकडीवजा कोपऱ्यात, ज्याला आजही Hill Stand म्हटलं जातं, स्कोअरबोर्डच्या खाली बिअरच्या बाटल्या आणि दिवसभराचं खाणं सोबत घेऊन त्याचा वावर असायचा. क्रिकेटचे सामने शांत राहून बघण्याची बाकी लोकांची सवय त्यानंच मोडली असावी, असं म्हणायला आज वाव आहे. अगदी हुल्लडबाजी नाही करायचा तो, पण पुलंच्या अंतू बर्व्याचा अंतर्बाह्य खवचटपणा मात्र त्याच्यात ठासून भरलेला होता. जोडीला प्रेक्षकांत फार दुर्मिळ असणारं क्रिकेटचं बारीकसारीक ज्ञानही त्याच्याकडं  पुरेपूर होतं. बिनाखर्चाच्या याच बौद्धिक भांडवलावर त्यानं खेळाडूंइतकीच मैदानं गाजवली.     ‘यब्बा’…ऑस्ट्रेलियन भाषेत या शब्दाचा अर्थ ‘अति बडबड्या’ असा होतो.

स्टीफन हॅरॉल्ड गॅसकॉइनला यब्बा हे टोपणनाव चिकटलं ते त्याच्या बडबड्या स्वभावामुळं. पुढं पुढं तर सापानं कात टाकावी, तसं त्याचं मूळ नावच विस्मरणात गेलं, आणि क्रिकेटच्या सुवर्णयुगातल्या पानापानांवर ध्रुवतारा होऊन अढळपद मिळण्याचा मान एका प्रेक्षकाला मिळाला!! त्या अढळपदाची पावतीच बघायची, तर १९३३-३४ ची कुप्रसिद्ध ‘बॉडीलाईन’ ऍशेस कसोटी मालिका चित्रपटरूपानं १९८४ साली प्रदर्शित झाली, त्यात डॉन ब्रॅडमन, डग्लस जार्डीन, आर्ची जॅक्सन, बिल पॉन्सफोर्ड, बर्ट ओल्डफील्ड अशा कसोटीवीरांच्या बरोबरीनं यब्बाचं पात्रही रंगवलं गेलं होतं!!     इसवी सन १९११. सिडनेतल्या पहिल्या ऍशेस कसोटी सामन्यात टिबी कॉटरच्या चेंडूवर इंग्लंडच्या सर जॅक हॉब्जचा झेल विकेटमागं असलेल्या हॅन्सन ऊर्फ सॅमी कार्टरनं घेतला. हा कार्टर पोट भरण्यासाठी शववाहिकेचा ड्रायव्हर म्हणून काम करायचा, आणि कित्येकदा मैदानावर येताना ती वाहिका स्वतः चालवत घेऊन यायचा. जॅक हॉब्ज परत फिरल्यानंतर कार्टरची ही पार्श्वभूमी नेमकी लक्षात ठेवत यब्बा ओरडला, “You can take that body away now, Hanson(तू हे प्रेत आता बाजूला करू शकतोस, हॅन्सन)!!” हा हजरजबाबी म्हणा, टोकेरी म्हणा, खवचट म्हणा, टोमणा चांगलाच लोकप्रिय झाला, आणि त्यानंतर  यब्बाही. सतरा वर्षांचा काळ लोटल्यानंतर १९२८ साली सर जॅक हॉब्ज सिडनेतला त्याचा शेवटचा कसोटी सामना खेळला. सामन्यातल्या मधल्या विश्रांतीच्या काळात त्यानं मैदानाला एक फेरी मारली आणि यब्बा जिथं बसायचा, तिथं जाऊन यब्बाशी त्यानं आवर्जून हस्तांदोलन केलं!!    यब्बाच्या काळात प्रेक्षकांना मैदानात मिळणारं मुक्तद्वार, कॉमेंटरीची न झालेली सुरुवात, आणि टेनिस सारखी मॅच शांतपणे बघण्याची पद्धत, याच गोष्टी त्याच्या पथ्यावर पडल्या असाव्यात!! त्यानं ओरडून बोललेलं सगळ्या मैदानभर ऐकू जायचं.

क्रिकेटबरोबरच आजुबाजूच्या सामाजिक परिस्थितीचं भान ठेवून त्याबरहुकूम उत्स्फूर्तपणे त्याच्या तोंडून बाहेर पडणारं एखादंच वाक्य ही प्रेक्षक आणि खेळाडूंनाही पर्वणी होती. सिडनेत त्या काळात झालेल्या प्रत्येक सामन्यानं ही पर्वणी अनुभवली. तो जे बोलला, त्यात जड जड शब्दांचा भरणा कधीच नव्हता, तरीही जे सांगायचं, ते त्याच्या विनोदबुद्धीतून जन्माला आल्या साध्याच पण खोचक टोमण्यांनी जगाला सांगितलंच.    एवढं असूनही त्यानं क्रिकेटचा हात कधी सोडला नाही, बोलताना क्रिकेटशी संबंध न सांगणारं एकही वाक्य त्याच्या तोंडून गेलं नाही. क्रिकेटबद्दलची त्याची आत्मीयता आणि ज्ञान एका किश्श्यातून अधोरेखित होतं. एका सामन्यात कीथ मिलर हा वेगवान गोलंदाज गोलंदाजी करत होता. सिडनेची संथ विकेट आपल्या वेगाला योग्य होईल की नाही, याची शंका वाटून त्यानं आपल्या नेहमीच्या वेगाला यावर घातला, आणि थोडी मंदगती गोलंदाजी करणं पसंत केलं. यब्बा हे पाहात होताच. काय घडतंय, ते त्यानं अचूक हेरलं, आणि मिलरनं चेंडू टाकल्या टाकल्या तो ओरडला, “वेल बोल्ड ग्रिमेट!!” त्याचवेळी ऑस्ट्रेलियाकडे क्लॅरी ग्रिमेट हा मंदगती गोलंदाज होता, त्याचा आणि कीथ मिलरच्या कमी केलेल्या वेगाचा संदर्भ देत, मिलरला ग्रिमेट ठरवून यब्बा मोकळा झाला.     आणखी एका सामन्यात एका वाईट गोलंदाजालाच त्याचा टप्पा आणि दिशा दोन्ही चुकताहेत हे सांगण्यासाठी तो एकच वाक्य बोलला, “Your Length is lousy, but you bowl a good width!!”    एक चिवट फलंदाज बाद होत नव्हता, तेव्हाची गोष्ट. ऑस्ट्रेलियात तेव्हा गर्भपात अवैध होता. नर्स मिशेल ते काम गुपचूप करायची. हीच गोष्ट आठवून  यब्बा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला म्हणाला, “I think you boys better call nurse Mitchell to get that bastard out.”    एक फलंदाज सारखा बीट होत होता. ते बघून यब्बा उद्वेगानं बोलता झाला, “Send him a grand piano, lets see if he can play that instead.”    अशाच एका संथ फलंदाजाला तो म्हणाला होता,”I wish you were a statue and I were a pigeon!”    १९३३-३४ ची बॉडीलाईन कसोटी मालिका ऐन भरात होती, ऑस्ट्रेलियात वातावरण इंग्लंडविरोधी होतं. इंग्लिश कर्णधार डग्लस जार्डीन सभोवतालच्या माशा उडवताना यब्बानं पाहिला, आणि पुढच्याच क्षणी तो ओरडला, “leave those flies alone, Jardine, those are the only friends you’ve got here!!”    वर उल्लेखलेल्या सगळ्या किश्श्यांवर कडी करणारा आणखी एक किस्सा क्रिकेटच्या इतिहासात नोंद आहे, कुठल्याही सेन्सर बोर्डानं त्यावर अजून आक्षेप घेतलेला नाही, कदाचित त्यामुळंच!! पुढचं वाचण्यापूर्वी एक वैधानिक इशारा, अश्लील या प्रकारात मोडणारा हा टोमणा वाचण्यापूर्वी, स्वतःला बांधून ठेवणारी तथाकथित संस्कृतीची जळमटं बाजूला करा, आणि मगच वाचा!!     एक फलंदाज अत्यंत वाईट फलंदाजी करत होता, अनेकविध प्रत्नानंतरही चेंडूपर्यंत न पोचणारी त्याची बॅट प्रेक्षकांना अस्वस्थ करत होती. त्याचं दैवही असं, कि तो बादही होत नव्हता. अशातच त्या फलंदाजाला काय लहर आली देव जाणे, पण आपला बॉक्स किंवा ज्याला साध्या भाषेत सेंट्रल गार्ड, किंवा ऍबडॉमिनल गार्ड म्हणतात, ते त्यानं हातानं नीट केलं आणि पुन्हा बसवलं. यब्बाची बारीक नजर त्याच्यावर खिळून होतीच. प्रेक्षकांच्या कानांवर एक वाक्य उकळतं तेल सोडावं तसं घुसलं, “Those are the only balls you’ve touched all day!!” काय अफाट विनोदबुद्धी असेल, याची कल्पना आज येणं शक्य नाही!!   

१८७८साली जन्म घेऊन १९४२ साली ८ जानेवारीला वयाच्या ६४ व्या वर्षी त्यानं डोळे मिटले, नव्हे, ओठ मिटले ते कायमचेच!! त्याची तिखट जीभ कायमची थंड झाली, पण सिडने मैदानातल्या त्याच्या त्याच Hill Stand मध्ये यब्बाचा कांस्यपुतळा क्रिकेट ऑस्ट्रेलियानं बसवला, आणि त्याला कायमची संजीवनी दिली!! आजही सिडनेत कुठलीही मॅच बघताना तो तिथं असतोच.     रे रॉबिन्सन हा ऑस्ट्रेलियन पत्रकार त्याच्याबद्दल लिहितो, “He stepped forward from the ranks of chorus!!” खरंय, सगळ्यांचा असूनही तो त्यांच्यातला एक कधीच नव्हता…निश्चितपणे वेगळाच होता तो. स्टीफन हॅरॉल्ड गॅसकॉइन ऊर्फ यब्बा… सर्वोत्तम प्रेक्षकाचा चेहरा!!

To know more about Crickatha