ball

श्रीलंकेचा गारुडी..!!

by व्यंकटेश घुगरे

 परीक्षेआधी एकदाही न उघडलेल्या अत्यंत अवघड विषयाच्या पुस्तकासारखा होता तो! निव्वळ मोहिनी…त्याची गोलंदाजी फक्त मोहिनी घालायची!! त्याचं नाव उच्चारताना जितकी जीभ वळणार नाही, तितकी चेंडू हातात असताना त्याची बोटं वळायची आणि वळवळायचीसुद्धा!! तज्ञांची, फलंदाजांची भलीमोठी फौज त्याच्यासमोर उभी ठाकली, आणि थकली, तरीही तो नेमकं काय टाकायचा, हे कधीही कोणालाही अचूक सांगता आलं नाही. एकवेळ ब्राह्मी, नागर किंवा कलिंगासारख्या प्राचीन लिपीमध्ये लिहिलेल्या अगम्य शिलालेखांचं वाचन करता येईल, पण श्रीलंकेचा सर्वोत्तम गोलंदाज म्हणून श्रीलंकन क्रिकेटदरबारी मानाचं पान पटकावणाऱ्या मुथय्या मुरलीधरनची गोलंदाजी वाचणं आणि समजून घेऊन ती खेळणं अवघड होतं. मनगटाचा जास्तीत जास्त वापर करणारा तो ‘ऑफ-ब्रेक फिरकी गोलंदाज’ होता, हे विशेष उल्लेखानं सांगावं लागतं, इतकी त्याची शैली विचित्र होती खरी, पण टप्पा, दिशा, उसळी, उंची आणि फिरकी या पाचही घटकांवर त्याचं अफाट प्रभुत्व होतं, इतकं की पिचवर एखाद्या विशिष्ट ठिकाणी नाणं ठेवून चेंडू बरोबर त्या नाण्यावरच टाकणं, हा त्याच्या डाव्या हातचा मळ होता. मॅकग्राचं सातत्य आणि अचूकता, कुंबळेची उंची आणि दिशा, वॉर्नची फिरकी एकत्र केली, की मुरलीधरनचा जन्म होतो!!   

२०१० साली श्रीलंकेच्या गॉल स्टेडियमवर त्यानं आपल्या तेजस्वी कारकीर्दीला विराम देण्याचं ठरवलं, तेव्हा कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं एकूण ७९२ बळी आपल्या नावावर केले होते!! शेवटच्या सामन्यात ८००चा टप्पा गाठला, तर सोन्याहून पिवळं; आणि हा मैलाचा दगड नाही गाठता आला, तरीही फारसं काही बिघडत नाही, या अलिप्त भावानं पण आत्मविश्वासानं मुरलीनं ती ‘टेस्ट’ दिली!! नशीबसुद्धा शूरांची सोबत करतं, तसं त्या सामन्यात त्याची बोटं त्याची गुलाम झाली, पिचही त्याला अंकित झालं आणि भारताच्या प्रग्यान ओझाचा बळी घेऊन त्यानं तो जादुई आकडा गाठलाच!! मैदान त्याच्या नावे गर्जत होतं, जागोजाग उभी केलेली त्याची पोस्टर्स लक्ष वेधत होती, ‘Spin Wizard’ म्हणजे ‘फिरकीचा जादूगार’ असे फलक अभिमानानं झळकत होते, श्रीलंकेनं जणू विश्वचषक जिंकला की काय, असा भास होत होता!!   

कुठल्याही भव्यदिव्य गोष्टीची सुरुवात छोटी छोटी पावलं टाकत होते; पण त्याचा पूर्ण प्रवास छोट्या छोट्या पावलांवरच झाला. पिचच्या थोड्याशा तिरक्या असलेल्या दिशेत सहा-सात एका लयीत पडलेल्या पावलांचा नाजूक रनअप, बोटांत चेंडू खेळवत हात खांद्यातून पूर्ण फिरवत हाताचा पंजा आडवा ठेवत मनगटाला झटका देत भिर्रर्रर्र करत सुटलेला चेंडू, तो सोडताना अक्षरशः बटाट्यासारखे झालेले त्याचे डोळे आणि एकाच पावलाच्या ‘फॉलोथ्रू’ पाठोपाठ मोरपीस तरंगत यावं, तितक्या सफाईदारपणे खाली आलेला त्याचा उजवा हात!! त्याच्या प्रत्येक हालचालीतलं नाट्य टिपायला प्रतिभा कालिदासाची हवी, आणि नजाकत चितारायला हात पिकासोचे!! हे नाटक कमी पडायची भीती त्याच्या कौशल्याला वाटली असेल म्हणून की काय, स्पायडरमॅन जाळं पसरवतो, तसा झपकन सोडलेला चेंडू आईच्या हातात न सापडता बेभान धावणाऱ्या अवखळ पोरासारखा फलंदाजाला चुकवत स्टंपकडं धावायचा!! हातहातभर वळायचा!! अगदी सिमेंटच्या पिचवरसुद्धा!!     स्वतः मुरलीधरनच्या मते, अचूकता सर्वांत महत्त्वाची. त्यापाठोपाठ फिरकी! एकदा ही दोन लक्ष्यं साध्य झाली की गोलंदाज नवे प्रयोग करायला मोकळा असतो, आणि त्यामुळं गोलंदाजीत वैविध्य आणणं तुलनेनं सोपं ठरतं. स्वतः मुरली याच क्रमानं शिडीची एकेक पायरी चढला! आधी त्याला मंदगती गोलंदाजी करायची होती, ते जमेना म्हणून त्यानं लेगब्रेकची कला अवगत करायचा प्रयत्न केला!! त्यातही समाधान न झाल्यानं तो ऑफब्रेककडं वळला! आधी त्यानं आपला टप्पा घोटवून घेतला, मग चेंडूला उंची देऊन टप्प्याबरोबरच दिशा दिली, त्यात सातत्य आणत चेंडूला असामान्य फिरकी देण्याचा त्याचा परिपाठ चालूच होता. लेगब्रेक गोलंदाजीची सुप्त इच्छा अपुरी राहिल्यानं असेल कदाचित, ऑफब्रेकमध्येही त्यानं मनगटाचा यथेच्छ वापर केला!! असं करणारा तो पहिलाच अपारंपरिक गोलंदाज ठरला. ‘unusual use of wrist’ असं त्याच्या शैलीचं वर्णन केलं गेलं. वर्षं उलटता उलटता ऑफब्रेकबरोबरच टॉपस्पिनवर त्यानं हुकूमत प्रस्थापित केली. त्याच्या गोलंदाजीचा पिकायला आलेला हापूस आंबा जरा कुठं फलंदाजांच्या लक्षात यायला लागला होता, तेवढ्यात ऑफब्रेकच्या हापूसच्या झाडावर त्यानं ‘दूसरा’ किंवा इंग्रजीत ज्याला ‘other one’ म्हणतात, त्याचं कलम केलं; आणि मग तो सुटलाच!! दृश्य बदल न करता टाकलेला हा ‘दूसरा’ आणि टप्पा पडून वेगानं सरळ जाणारा टॉपस्पिनर. दोन्ही बाजूंनी त्याच्या गोलंदाजीला धार चढली. नियंत्रित गोलंदाजी करण्यावर भर दिलेला, आणि नवेच धोकादायक चेंडू आत्मसात केलेला हा गिळगिळीत मासा,  फलंदाजांना कधीही गिळता आला नाही!! अनेकांनी चिकाटीनं मुरलीची गोलंदाजी अभ्यासली, आणि मत दिलं, “त्याच्या हाताचा पंजा आडवा असेल, तर ऑफब्रेक आणि पंजा थोडासा तिरका असेल, तर तो दूसरा” बस्स!! यापलीकडं चिकित्सा होऊच शकली नसती!!    डोईजड झाल्या मुरलीधरनला रोखण्यासाठी म्हणून प्रस्थापितांनी मग वेगळी शक्कल लढवली!! त्याच्या शैलीवरच ‘तो चेंडू फेकतो’ असे आरोप झाले. अर्थातच त्याची सुरुवात ऑस्ट्रेलियातून झाली. मानसिक खच्चीकरण करण्यासाठी आगाऊपणे त्याला त्याच्या वर्णावरूनही डिवचलं गेलं. एकदा त्याचे सलग ३ चेंडू ‘फेकले’ या सबबीखाली नो बॉल दिले गेले. त्याची गोलंदाजी बंद करण्याचा प्रकारही झाला. शांतपणे तो सगळ्याला सामोरा गेला. त्याच्या अंगावर नाना तऱ्हेच्या वायर्स, सेन्सर्स चिकटवून अक्षरशः वाहनांच्या टेस्टिंग मध्ये डमी असतात, तशी वागणूक त्याला देत ICCनं अनेक विद्यापीठांच्या मदतीनं अनेकदा गोलंदाजीच्या त्याच्या शैलीचं biomechanical analysis केलं. कुठलीही लाच न देता, काहीही manipulate न करता मुरली निर्दोष सुटला! त्याची शैली जगन्मान्य झाली. श्रीलंकेचा किल्ला शाबूत ठेवणारी त्याची फिरकीची तोफ आग बरसवतच राहिली.    त्या वेळची समीकरणं साधारण भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका अशी असायची. श्रीलंकेच्या बाबतीत निदान कसोटीत तरी हे समीकरण मुरलीधरन विरुद्ध प्रतिस्पर्धी संघ असं असायचं!! समोरचा संघ त्याला खेळू शकतो की नाही, यावर सामन्याचा निकाल ठरायचा.. हे सगळं कधी, तर संघात अट्टापटू, जयसूर्या, जयवर्धने, संगकारा आणि चमिंडा वास असताना!!     वेगवान गोलंदाजांना पोषक असणाऱ्या इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या खेळपट्ट्यांवरही मुरलीचा प्रभाव तसूभरही कमी झाला नाही! ऑस्ट्रेलियासाठी तर तो सैतान होता. एकदा ऑफस्टंप बाहेर जवळ जवळ २ फूट लांब अंतरावर पडलेल्या त्याच्या चेंडूनं टॉम मूडीची लेगस्टंप उडवली होती!! एकदा पायाची नस दुखावल्यानं त्यानं एकाच पायावर जागच्याजागी उभं राहून गोलंदाजी करताना शेन वॉटसनचा बळी घेतला!!     त्याची शैली समजणं अवघड होतं, ही जॅक कॅलिसची कबुली.
    “मुरलीविरुद्ध खेळणं म्हणजे बुद्धिबळ, त्यापेक्षाही डोकेदुखीच”, डॅमियन मार्टिनचं पांढरं निशाण!!    “त्याला तोंड देणं आम्हा ऑस्ट्रेलियन्सना सगळ्यात अवघड गेलं” मिस्टर क्रिकेट ही उपाधी असलेल्या माईक हसीनं मुरलीला दिलेलं हे प्रशस्तीपत्र. ते देताना त्याच्या भयंकर डोळ्यांचा उल्लेख करायला माईक विसरलेला नाही. त्याच्या हातून सुटलेल्या हवा चिरत जाणाऱ्या चेंडूचा ‘भिर्रर्रर्रर्र’ असा आवाजही त्यानं काढून दाखवलाय!!    “आधीच्या पिढीतल्या श्रेष्ठांना धक्के देत, आणि समकालीन गोलंदाजांबरोबर अटीतटीची स्पर्धा करत तो सर्वोत्तम ठरला. शेन वॉर्नच्याही वरचं स्थान मी त्याला देईन”, सकलेन मुश्ताकनं एका मुलाखतीत सांगितलं.     मुरलीचं कोडं कोणालाही सुटलं नाही, अगदी ऍलन बोर्डरलासुद्धा. कमेंटरी बॉक्समध्ये बसून तो एकदा त्याला चक्क ‘लेगस्पिनर’ संबोधता झाला.    “तो वाईट चेंडू टाकतच नाही आणि इथंच फलंदाजांवर वरचढ ठरतो. सतत उत्तम चेंडू खेळून वैतागलेले फलंदाज आक्रमक फटक्यांच्या नादात त्याच्या वेदीवर आपला बळी देतात”, इति गॅरी कर्स्टन. 


    “Shrilankan Cricket would not have gone on the maps without him!” विस्डेनचा एके काळचा संपादक लॉरेन्स ब्रूथ मुरलीबद्दल हे सांगतो. त्याच्याही पुढं जाऊन तो म्हणतो, “In fact the game would have been poorer without him!”    खरंय, क्रिकेट खरोखर त्याच्या नसण्यानं गरीब झालं असतं. कसोटी क्रिकेटमध्ये ८०० आणि वनडे मध्ये ५३४ बळी, हे फक्त शुष्क आकडे दिसले, तरी त्यावरचा वलयाचा रेशीमपडदा बाजूला करून बघितला कि कळतं, त्यानं प्रतिस्पर्ध्यांना किती सतावलं, ते!!    प्रतिस्पर्ध्यांचं जाऊ द्या.. शेकोटीची ऊब घेणाऱ्याला कधीतरी चटकाही बसतो, तसेच चटके मुरलीधरनसाठी यष्टीरक्षण करणाऱ्या रोमेश कालुवितरणा आणि कुमार संगकारालाही बसले!!कुमार संगकारानं विक्रम साठेला दिल्या मुलाखतीत हे किस्से उलगडून सांगितले!!    काही केल्या मुरलीचा ‘दूसरा’ ओळखता येत नसल्यानं वैतागलेल्या कालुवितरणाला ‘पुढची किमान सहा षटकं दूसरा टाकणार नाही’, असं आश्वस्त करून मुरलीनं ऐनवेळी आपला बेत बदलला, आणि लगेचच दूसराच टाकला!!    एकदा ऑस्ट्रेलियात खेळत असताना जिमी मायर फलंदाजी करत होता. मुरलीचा दूसरा आपण ओळखला असा वाटून चेंडू अडवण्यासाठी विकेटमागं असलेला कुमार संगकारा आपल्या उजव्या बाजूला दोन पावलं जातो न जातो, तोच चेंडू बरोबर विरुद्ध दिशेला वळला. चूक लक्षात येताच शेवटचा प्रयत्न म्हणून कुमारनं आपला डावा हात लांबवला, आणि आपसूक पंजामध्ये अडकलेला चेंडू १८० अंशात मागे वळून स्टंपवर फेकला. क्रीज सोडून पाच पावलं पुढं गेलेल्या मायरला जीवदान मिळण्याचा प्रश्नच नव्हता!! मुरलीच्या या बळीचं पूर्ण श्रेय कुमारला दिलं गेलं असलं, तरीही तो चेंडू ओळखण्यात आपली चूक झाली, आणि जे घडलं, ते केवळ अपघाती होतं, ही प्रांजळ कबुली त्यानं दिली.    जवळच्या, संघातल्या माणसालासुद्धा आपल्या गोलंदाजीचा थांग न लागू देणारा श्रीकृष्णासारख्या निष्णात राजकारण्याच्याच वंशातला हा मुथय्या मुरलीधरन!! कुमार संगकाराच त्याची व्याख्या करतो, “Murali is an example of dedication, hard work, commitment, passion and enthusiasm!!”    तो कौशल्यात आणि आकड्यांच्या दृष्टीतही सर्वश्रेष्ठ ठरला, हे निर्विवाद!! त्याला विक्रम नको होते असं नाही, पण संघाच्या ध्येयाआड त्यानं ते कधीही येऊ दिले नाहीत. त्याच्या काळात त्याची मुरली उत्कटपणे वाजली, तिचा रसाळपणा सिद्ध करायला त्याचे आकडे पाहावेत जरूर, पण  एखाद्या भाबड्या प्रेक्षकावर त्याच्या गोलंदाजीनं केलेलं गारूड त्या प्रेक्षकाकडूनच ऐकावं. ती मुरली जास्त सुरेल की ही आकड्यांची, त्याची मात्र काही कल्पना नाही!!

To know more about Crickatha