ball

२००५: एशेस चं प्लॅटिनम स्टॅंडर्ड

उद्या शुक्रवार 16 जून 2023 पासून या सहस्त्रकातील इंग्लंड मधली सहावी एशेस मालिका सुरू होईल. कसोटी इतिहासातील सर्वात जुनी किंवा आद्य म्हटली तरी चालेल अशी एशेस ची ख्याती आहे. ही मालिका इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दर दोन वर्षांनी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात खेळवली जाते. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया च्या खेळाडूंना सर्वात प्रतिष्ठेची कुठली मालिका असेल तर ती एशेस आहे.. अशीच एक मालिका इंग्लंड मध्ये २००५ साली खेळली गेली होती.. त्या संबंधी च्या आठवणी नव्या एशेस च्या पूर्वसंध्येला जागवूया…


पार्श्वभूमी: २००५ चा ऑस्ट्रेलियन संघ हा तत्कालीन क्रिकेट चा अनभिषिक्त सम्राट होता.. त्या संघात अकरा खेळाडू नव्हे तर अकरा मॅच विनर खेळायचे.. प्रत्येक जण आपल्या दिवशी एक हाती मॅच जिंकवायचा. या संघाने स्टीव्ह वॉ ने ठरवलेले भारतीय भूमीवरचे फायनल फ्रँटियर नुकतंच ऑक्टोबर २००४ मध्ये काबीज केलं होतं. समोर येईल त्या संघाला नामोहरम करायचं हा एक कलमी कार्यक्रम या संघाने राबवला होता… स्टीव्ह वॉ कडून कसोटीची सुत्र रिकी पॉंटिंग कडे आली होती. हेडन, लँगर, पॉंटिंग, क्लार्क, मार्टिन, गिलख्रिस्ट, कासप्रॉव्हिच, वॉर्न, ब्रेट ली, माकग्रा, गिलेसपी हे अकरा जण सहज मॅच जिंकायचे.. कधी कॅटीच अधून मधून खेळायचा..इंग्लंड दुसऱ्या बाजूला उर्जितावस्था गाठत होती.. हुसेन,  रामप्रकाश, आलेक स्टुअर्ट, कॅडिक ही पिढी जाऊन आता कमान मायकल वॉन कडे आली होती..सायमन जोन्स, मॅथ्यू होगार्ड, स्टीव्ह हार्मीसन, फ्लिन्टऑफ यांच्या जोडीला एकटा आश्ले जाईल्स स्पिनर… इंग्लंड ची बॅटिंग मुख्यत्वे करून ट्रेसकोथिक, स्ट्रोस, इयन बेल, मायकल वॉन, पिटरसन, फ्लिन्टऑफ यांच्यावर होती..

लोर्ड्स ची शरणागती:  मालिकेतील पहिला सामना सुरू झाला क्रिकेटची पंढरी लोर्ड्स वर.. इंग्लंड च्या माध्यमांनी ऑस्ट्रेलिया वर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली.. पण पहिल्या दिवशी चहापानानंतर इंग्लंड चा पहिला डाव आटोपला आणि ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातून पलटवार केला..पहिल्याच दिवशी माकग्रा ने कसोटीत ५०० बळी पूर्ण केले आणि संपूर्ण मालिकेत आपलेच वर्चस्व राहील याची नोंद इंग्लंड ला घ्यायला लावली..

एजबस्टन पुराण: सध्याच्या काळात एकही कसोटी क्रिकेट प्रेमी नसेल ज्याला एजबस्टन २००५ म्हटलं की अंगावर काटे येणार नाहीत.. सामनाच तसा झाला होता.. कसोटीच्या नाणेफेकी आधी माकग्रा दुखापती मुळे बाहेर झाला आणि ऑस्ट्रेलिया ची बॉलिंग काहीशी कमकुवत झाली.. त्याचा फायदा घेत इंग्लंड ने पहिल्या डावात 407 धावा केल्या ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात 99 धावांनी पिछाडी वर पडला आणि इंग्लंड च्या दुसऱ्या डावात संपूर्ण इंग्लंड चा संघ ब्रेट ली (४ बळी)आणि शेन वॉर्न (६ बळी) ने वाटून खाल्ला.. सामना इथे संपत नाही.कसोटी क्रिकेटची खरी झिंग इथून सुरू होते.. चौथ्या दिवसाच्या चहापाना आधी ऑस्ट्रेलिया चा दुसरा डाव सूरु होतो.. विजयासाठी २८२ धावा हव्या असतात.. उपलब्ध वेळ, फलंदाजी ची खोली पाहून सगळ्यांना खात्री असते की ऑस्ट्रेलिया ही मॅच सहज जिंकणार.. चहापाना नंतर नाट्यमय घडामोडी घडतात.. हेडन, लँगर,  पॉंटिंग, मार्टिन, गिलख्रिस्ट एका पाठोपाठ एक बाद होत जातात.. दिवसाची शेवटची ओव्हर टाकायला हारमिसन आलेला असतो स्ट्राईक ला मायकेल क्लार्क.. नॉन स्ट्राईक ला शेन वॉर्न.. हारमिसन च्या हातून अलगद बॉल सुटतो क्लार्क चकतो.. आणि बोल अलगद जाऊन स्टंप वर आदळतो… संपूर्ण इंग्लंड जल्लोष करत असतं.. कारण त्यांना माहीत होतं की उद्या फक्त शेवटचे फलंदाज बाद केले की मालिकेत बरोबरी साधता येईल आणि १७-१८ वर्षांनी घरच्या मैदानावर एशेस मालिका जिंकण्याचं स्वप्न जीवंत राहील.. रात्र सरते आता फक्त शेन वॉर्न, ब्रेट ली, कासप्रॉव्हिच राहिले…शेवटचा दिवसाचा खेळ सूरु होतो.. ब्रेट ली आणि शेन वॉर्न खिंड लढवत राहतात.. वॉर्न कधी नव्हे ते त्वेषाने खेळत दिसेल तो बॉल मारत सुटतो.. हा त्याचा जुगार ऑस्ट्रेलिया विजया पासून १२ धावा दूर असताना संपतो.. कासप्रॉव्हिच ब्रेट ली ला साथ द्यायला येतो.. ब्रेट ली दोन खणखणीत चौकार मारतो विजय ४ धावा दूर असतो.. पुढच्या ओव्हर ला स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यासाठी ब्रेट ली एक धाव घेतो आणि कासप्रॉव्हिच स्ट्राईक ला येतो.. विजय ३ धावा दूर.. स्टीव्ह हार्मीसन चा  पुन्हा एक उसळता बॉल कासप्रॉव्हिच च्या खांद्याकडे जातो.. बॉल ग्लोव्हज ची किनार घेऊन किपर गेरायन्त जोन्स च्या ग्लोव्हज मध्ये विसावतो आणि पाच दिवस सूरु असलेली तुंबळ लढाई अखेर दोन धावांचा अंतराने इंग्लंड च्या पदरी पडते.. It’s coming home चा जल्लोष सुरू होतो.. आणि मालिका ओल्ड ट्राफर्ड कडे सरकते..

ओल्ड ट्राफर्ड ची समेट: एजबस्टन च्या झिंगातून ना इंग्लंड सावरलेले असते ना क्रिकेट प्रेमी तो ज्वर ती नशा अजूनही लोकांच्या डोक्यात असते.. मँचेस्टर च्या ओल्ड ट्राफर्ड वर हाय स्कोरिंग ड्रॉ खेळला जातो.. मायकेल वॉन, अँड्र्यू स्ट्रोस, रिकी पॉंटिंग शतके करतात.. मॅच ड्रॉ होते… मालिका ट्रेंटब्रिज ला पोहोचते..

ट्रेंटब्रिज ची आघाडी: एजबस्टन चा विजय, ओल्ड ट्राफर्ड ची समेट झाल्यानंतर शेवटच्या दोन कसोटीत आघाडी कोण घेणार यासाठी ट्रेंटब्रिज ची कसोटी महत्त्वाची ठरणार होती.. पहिल्या डावात इंग्लंड ४४४, ऑस्ट्रेलिया २१८. मायकेल वॉन ने ऑस्ट्रेलिया ला फॉलो ऑन दिला.. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया ३८७ धावा करते आणि इंग्लंड ला शेवटच्या डावात मालिकेत आघाडी घेण्यासाठी हव्या असतात फक्त १२९ धावा.. ऑस्ट्रेलिया त्या १२९ धावातील प्रत्येक धाव मिळवणे कठीण करते.. शेवटच्या दिवसाच्या खेळपट्टीवर शेन वॉर्न खेळणे केवळ अशक्य होतो…३२ धावा असताना वॉर्न ट्रेसकोथिक ला माघारी धाडतो.. ३६ ला वॉन, ५७ ला , ५७ ला इयन बेल.. ३२/० वरून ५७/४ इंग्लंड च्या छाताडत धडकी भरते.. समोर ती एशेस ची कुपी दिसत असते पण हाताला अजून लागत नाही.. केविन पिटरसन ५७ चा स्कोर १०३ पर्यंत नेतो आणि ब्रेट ली ची शिकार होतो.. फ्लिन्टऑफ चा अडसर ब्रेट ली दूर करतो इंग्लंड साठी अजूनही विजय १८ धावा दूर असतो.. गेरायन्त जोन्स एक दोन फटके मारून अंतर कमी करतो असाच एक फटका मारताना तो वॉर्न च्या आमिषाला बळी पडतो.. विजय अजूनही १२ धावा दूर.. मैदानात आता फक्त जाईल्स आणि होगार्ड..ब्रेट ली च्या पायात स्प्रिंग असल्यासारखा तो धावत सुटतो एक बॉल त्याच्या कडून फुल टॉस सुटतो होगार्ड नावाला जोरात येणाऱ्या बॉल ला मध्ये बॅट घालून दिशा देतो आणि बॉल गॅप मधून सीमेपार.. दुसरा बॉल पुन्हा ब्रेट ली भरकटतो.. लेग साईड वरून बॉल सीमे कडे जातो.. जिंकण्यासाठी आता फक्त ४ धावा पाहिजे असतात.. स्ट्राईक ला जाईल्स.. वॉर्न बॉलिंग करत असताना त्या ओव्हर मध्ये जाईल्स दोन चकतो.. दुसऱ्या वेळी कॅमेरा गॅलरीत बसलेल्या मायकल वॉन कडे जातो.. त्याच्या हृदयाचे ठोके वाढलेले असतात.. इलेक्ट्रॉनिक स्कोर बोर्ड वेळोवेळी ४ धावा दाखवत राहतो.. शेन वॉर्न च्या ओव्हर चा शेवटचा बॉल फुल टॉस जातो.. जाईल्स ऑन साईड ला बॉल ढकलत विजयला गवसणी घालतो.. सबंध इंग्लंड जल्लोषात नहातं.. दशकानंतर इंग्लंड ने एशेस मालिकेत पहिल्यांदाच आघाडी घेतली असते… आता एशेस वाचवायचा म्हणजे ऑस्ट्रेलिया ला ओव्हल वर विजय अनिवार्य असतो…

ओव्हल ची औपचारिकता: चार सामन्यात घमासान तुंबळ लढाई झाल्यानंतर मालिका ओव्हल वर पोहोचते.. दोन्ही संघांचे उद्दिष्ट स्पष्ट असतात.. ऑस्ट्रेलिया ला जिंकायचंच आहे.. इंग्लंड ला अनिर्णित राहणे पुरेसे आहे.. इंग्लंड ३७३, ३३५ ऑस्ट्रेलिया ३६७, ४/० मालिका जिंकण्याची संधी समोर दिसत असताना दुसऱ्या डावात केविन पीटरसन ऑस्ट्रेलिया वर तुटून पडतो.. शेवटच्या दिवशी शेवटच्या तासात इंग्लंड चा डाव संपून हेडन- लँगर ही जोडी खेळायला येऊन ४/० असताना दोन्ही संघात हस्तांदोलन होते आणि सामना अनिर्णित राहतो आणि इंग्लंड चे एशेस जिंकण्याचे स्वप्न साकार होते… It’s coming home चं आता It has come home.. होतं.. हा विजय इंग्लंड जवळ जवळ महिनाभर साजरा करत  राहतं…ऑस्ट्रेलिया मात्र वाट पाहत असते ती २००६/०७ च्या एशेस मालिकेची…

कसोटी क्रिकेट म्हणजे काय रे भाऊ? 

चला, परत एका स्वप्नाचा चक्काचूर झाला. पुन्हा एकदा आपल्या संघाने निराशा केली. पुन्हा एकदा तो आयसीसी ट्रॉफीचा सन्मान आपल्याला हुलकावणी देऊन गेला. खरं सांगायचं तर याची आता सवयच झाली आहे. गेल्या १० वर्षात आपण एकही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलो नाहीये. गेल्या कसोटी स्पर्धेत न्यूझीलंडने आपल्याला हरवले, तर या वर्षी ऑस्ट्रेलियाने. आता परत २०२५ ची वाट पाहायची. त्यावेळी आपण कशी कामगिरी करू देवच जाणे. अशा संधी परत परत मिळत नाहीत, आणि त्यामुळेच विजेतेपद देखील कायमच दूर असते. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड सारखे संघ ज्या योजना आखतात, त्या शेवटपर्यंत तडीस नेतात आणि विजयाच्या दृष्टीनेच प्रयत्न करतात. आपण यातलं काहीच केलं नाही. अगदी इंग्लंडला जाण्याच्या दिवसापर्यंत आपण आयपीएल खेळत बसलो, आणि त्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा आपण कधी विचारच केला नाही. योजना आखणे, त्याची अंमलबजावणी करणे अशा काही गोष्टी जणू आपल्याला ठाऊकच नाहीत. असो, ही स्पर्धा संपली. आता या यशापशाची कारणे शोधण्याचा प्रयत्न सगळेच करतील. पण गेली अनेक वर्षे भारतीय क्रिकेट बघत असल्याने खात्रीने सांगता येईल की कुठेही काहीही होणार नाही. आपण परत एकदा टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटकडे लक्ष देऊ, आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघांना पाठिंबा देऊ..आणि येणाऱ्या काही वर्षात कसोटी क्रिकेटचा अंत झालेला देखील पाहू. 


मुळात टी-२० किंवा आयपीएल वाईट आहे असे अजिबातच नाही. कदाचित ती काळाची गरज असेल, पण त्या नादाला लागून आपण कसोटी क्रिकेट नावाच्या एका सुंदर खेळाचा विनाश करतो आहोत हे आपल्या का लक्षात येत नाही? टी-२० आणि कसोटी क्रिकेट हे दोन सर्वस्वी वेगळे खेळ आहेत. या दोन्ही खेळांची सांगड घालणे हाच एक मोठा गुन्हा आहे. जर एखाद्याला फक्त आयपीएल खेळायचे असेल तर त्याला तेवढेच खेळू द्या, पण आपण भारत या देशाचे देखील प्रतिनिधित्व करतो आहोत याचे देखील भान ठेवा. आज आपण ठराविक खेळाडू क्रिकेटच्या तीनही फॉरमॅट्स मध्ये अक्षरशः कोलूला जुंपल्यासारखे खेळवतो आहोत. आज या क्रिकेट खेळाडूंची घराणी तयार झाली आहेत. सध्याच्या घडीला स्पॉन्सर्स, वेगवेगळे आयपीएल संघमालक, त्यांना सपोर्ट करणारे इतर व्यावसायिक, राजकारणी, चित्रपट अभिनेते आणि अशी तमाम घराणी भारतातला हा क्रिकेटचा गाडा हाकताहेत. क्रिकेटमध्ये आलेला पैसा (जो कित्येक कोटींच्या घरात आहे) आता खेळापेक्षा कैक पटीने मोठा झाला आहे. या पैशाने आणि अति क्रिकेटने खेळाची जी हानी केली आहे त्याची कुठे गणनाच नाही. कसोटी क्रिकेट हा क्रिकेटचा सर्वोच्च प्रकार आहे, आणि तो शाबूत राहिला तरच क्रिकेट जगेल. कदाचित कसोटी क्रिकेटला मोठं मानणारी माझी शेवटची पिढी असावी. पण यापुढचे दिवस ३ तासांच्या क्रिकेटचेच उरणार आहेत. 

कालच्या या पराभवाची अनेक कारणे सांगता येतील. पण आपल्यासाठी कसोटी क्रिकेटला प्राथमिकता न देणे हेच सर्वात मोठे कारण आहे. सुमारे २ महिन्यांपूर्वी जेंव्हा आपला संघ जाहीर झाला, तेंव्हाच जणू या पराभवाचा पाय रचला गेला होता. त्यावेळी बहुतेक सर्वच खेळाडू आयपीएल मध्ये खेळत होते. २ महिने टी-२० क्रिकेट खेळून लगेचच आपण इंग्लंडला गेलो. एक फॉरमॅट सोडून दुसऱ्या प्रकाराशी जुळवून घेणे सोपे नसते. त्यात आपण आता सराव सामने खेळत नाही. आपण त्या हवामानाशी, खेळपट्टीशी जुळवून घेण्यासाठी काही विशेष प्रयत्न देखील करत नाही. यावेळी देखील आपण हेच केलं. ७ तारखेला आपण कसोटी सामन्यासाठी उभे राहिलो ते केवळ नेट प्रॅक्टिसच्या जोरावर. इंग्लंडला गेलेले १५ खेळाडू देखील या सामन्यासाठी संघ म्हणून योग्य होते का? मी आधीच्या लेखात लिहिल्याप्रमाणे हार्दिक पंड्या आणि रिद्धिमान साहा या दोघांचा विचार केलाच गेला नाही. मी फक्त अमुकच क्रिकेट खेळणार, तमुक क्रिकेटमध्ये भाग घेणार नाही हा माज क्रिकेट रसिक म्हणून आपण तरी का सहन करतो. क्रिकेट बोर्डाला एखाद्या खेळाडूला खेळण्यासाठी सक्ती नाही करता येत? त्या क्रिकेट बोर्डाचं आणि साहाचं असेल भांडण, पण आजच्या घडीला तो देशातील सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे. एका महत्वाच्या सामन्यासाठी, देशासाठी तुम्ही आपापसातील हेवेदावे बाजूला नाही ठेवू शकत? या घडीला सगळ्याच गोष्टी चुकल्या आहेत. आकाशच फाटलंय, तुम्ही ठिगळं लावून काय करणार? 

रोहितने नाणेफेक जिंकली, पण संघात अंतिम ११ खेळाडू कोणत्या आधारावर निवडले? जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज तुमच्या ११ खेळाडूंमध्ये नसतो? ५०-१०० कसोटी खेळल्यानंतरही तुम्हाला खेळपट्टीचे रंग ओळखता येत नाहीत? ऑस्ट्रेलियन संघाला उजेडाचा एक कवडसा जरी दिसला तरी ते संपूर्ण खिडकी उघडून मोकळे होतात. प्रोफेशनलिझम म्हणजे काय हे त्या खेळाडूंकडून शिकावे. व्यावसायिकता अंगी भिनलेले ते खेळाडू संधी मिळताच त्याचं सोनं करणारच होते. त्यांनी पहिल्या डावात केलेल्या धावांचा पाठलाग करताना आपले कागदी वाघ कमीच पडणार होते. इंग्लंडमध्ये चेंडू फिरायला लागला तसे आपले फलंदाज तंबूत परतू लागले. अजिंक्य आणि शार्दुलने थोडाफार प्रतिकार केला नसता तर आपण २०० च्या आधीच बाद होतो. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १७३ धावांची आघाडी घेतली तिथेच आपला पराभव निश्चित होता. या कसोटीत आपण अधून मधून बरा खेळ केला, पण तो तेवढ्यापुरताच. चौथ्या दिवशी विराट आणि अजिंक्यने दुसऱ्या डावात थोडी लाज राखण्याचा प्रयत्न केला, पण पाचव्या दिवशी सकाळीच ऑस्ट्रेलियाच्या कसलेल्या गोलंदाजांनी विजयश्री खेचून आणली. कोणत्याही चांगल्या फलंदाजाने कसोटीमध्ये ३०-५० धावा करून संघ चांगली धावसंख्या नाही उभारू शकत. आपले फलंदाज वेळोवेळी कोलमडले, आणि आपल्या पराभवासाठी तेच महत्वाचे कारण आहे. 

कसोटी संपली. टेस्ट चॅम्पियनशीप गेली, पुढे काय? कसोटी स्पर्धेचा पुढचा सिझन लगेचच सुरु होईल. त्यावेळी अंतिम सामना २०२५ मध्ये असेल. त्याचा विचार करायचा असेल तर कसोटी खेळण्यासाठी इच्छूक नसलेल्या खेळाडूंनी आत्ताच सन्मानाने निवृत्त व्हावं हे उत्तम. कसोटी संघ बांधायला अनेक दिवस जातात. अनेक उत्तमोत्तम खेळाडू रांगेत उभे आहेत. क्रिकेट बोर्डाने आता भविष्याचा विचार करणे आवश्यक आहे. इंज्युरी मॅनेजमेंट हा एक वेगळाच विषय आहे. बोर्डाने त्यासंदर्भात काही ठोस उपाय करणे आवश्यक आहे. आपण कायमच मूर्तिपूजक आहोत. आपण क्रिकेट खेळाडूंची पूजा करत गेलो, पण खेळाला मात्र विसरलो. कुठेतरी क्रिकेट रसिक म्हणून आपणही या पराभवाला जबाबदार आहोत. हे देखील बदलणे आवश्यक आहे का? मुळात आपल्याला आता कसोटी क्रिकेटमध्येच रस आहे का हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. नसेल तर बोर्डाने स्पष्ट करावे, क्रिकेटप्रेमी ऍशेस सारख्या मालिका बघून आपली कसोटी क्रिकेटची तहान भागवतील. आपल्याला जर मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आदी संघांमध्येच रस असेल तर तेच करू, कसोटी क्रिकेट खेळण्याची गरज आहे का? १८८२ साली याच ओव्हल मैदानावर इंग्लिश संघाच्या पराभवानंतर ‘English cricket, resting in peace’ असा लेख प्रसिद्ध झाला होता, आणि त्यानंतर ऍशेस मालिकेचा जन्म झाला. कालच्या पराभवानंतर खचितच म्हणावसं वाटतंय – भारतीय कसोटी क्रिकेटचा देखील अंत झाला आहे, येत्या काही वर्षात त्यावर नक्की शिक्कामोर्तब होईल. 

इतिहास ओव्हलचा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या ओव्हल मैदानाला एक वेगळा इतिहास आहे, आणि इंग्लंडमधील इतर मैदानांसारखाच साहेबाने तो जपून ठेवला आहे. क्रिकेटच्या दुनियेत ओव्हल मैदान एक जुने मैदान म्हणून गणले जाते. दक्षिण लंडन मधील सरे परगण्यातील केनिंगटन भागात उभारल्या गेलेल्या या मैदानाचे मूळ नाव ‘केनिंगटन ओव्हल’. अर्थातच व्यावसायिक कारणांमुळे मैदानाचे नाव बदलले गेले, तरी जुने जाणते क्रिकेट रसिक या मैदानाला ‘केनिंगटन ओव्हल’ म्हणूनच ओळखतात. हे मैदान क्रिकेटच्या अनेक घटनांचे साक्षीदार आहे. या मैदानावर १८८० मध्ये इंग्लंड मधील पहिला कसोटी सामना खेळला गेला, तसेच १८७० साली इंग्लंडचा स्कॉटलंड विरुद्धचा फुटबॉल सामना देखील याच मैदानावर खेळवला गेला. काही तज्ज्ञांच्या मते, दोन देशांमध्ये खेळवला गेलेला हा पहिला फुटबॉल सामना होता. १८८२ साली ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ७ धावांनी पराभव केला, त्यावेळी ‘द स्पोर्टींग टाइम्स’ या क्रीडाविषयक साप्ताहिकाने एक मृत्युलेख प्रसिद्ध केला होता. त्यातूनच पुढे ‘ऍशेस’ मालिकेची सुरुवात झाली. गेली सुमारे १५० वर्षे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशात ही ऍशेस मालिका अव्याहतपणे खेळवली जात आहे. ओव्हल मैदान हे सरे काउंटीचे मुख्य मैदान आहे, आणि प्रामुख्याने इंग्लिश उन्हाळ्यातील शेवटचा कसोटी सामना या मैदानावर खेळवला जातो. १८४५ साली वसवल्या गेलेल्या या मैदानाची आसनक्षमता साधारण २५००० इतकी आहे. या मैदानावर आजपर्यंत १०४ कसोटी सामने, ७५ एकदिवसीय सामने आणि १६ आंतरराष्ट्रीय दर्जाचे टी-२० सामने खेळवले गेले आहेत. 


सर्वसाधारणपणे इंग्लिश मैदान म्हटले की त्याला इंग्लंडच्या लहरी हवामानाचा फटका बसतोच. क्षणात पडणारा पाऊस, आणि लगेचच येणारे ऊन या दोन्ही गोष्टी इंग्लिश मैदानांना नवीन नाहीत. इतर मैदानांप्रमाणेच ओव्हल वरील सामन्यांना देखील या लहरी हवामानाचा फटका निश्चितच बसला आहे. या मैदानावरील खेळपट्टी प्रामुख्याने फलंदाजांना साथ देते असे म्हणतात. इथे होणार सामना उन्हाळ्याच्या शेवटी खेळवला जात असल्यामुळे कदाचित ही खेळपट्टी फलंदाज धार्जिणी झाली असावी. या मैदानावरील सर्वोत्तम धावसंख्या इंग्लंडने १९३८ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना उभारली आहे. त्यावेळी इंग्लिश संघाने ७ गड्यांच्या मोबदल्यात तब्बल ९०३ धावा केल्या होत्या. या सामन्यात सर लेन हटन यांनी ३६४ धावांची खेळी केली होती. ही या मैदानावरील सर्वोत्कृष्ट वैयक्तिक खेळी आहे. इंग्लिश गोलंदाजां डेव्हॉन माल्कम याने १९९४ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५७ धावा देऊन ९ बळी घेतले होते.

पाहुण्या संघाचा विचार करायचा झाल्यास, श्रीलंकेचा जगविख्यात फिरकी गोलंदाज मुथैया मुरलीधरन याने १९९८ साली एका कसोटी सामन्यात १६ बळी घेतले होते, पैकी ९ बळी त्याने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात घेतले. या मैदानावर इंग्लंडच्या हर्बर्ट सटक्लिफ याने तब्बल ५ शतके मारली आहेत, खालोखाल लेन हटन, वॉली हॅमंड, डेव्हिड गावर आणि केविन पीटरसन (प्रत्येकी ४ शतके) व अलिस्टर कूक आणि जेफ बॉयकॉट (प्रत्येकी ३ शतके) यांचा समावेश होतो. गोलंदाजांचा विचार करता इयान बोथमने या मैदानावर ११ सामन्यात ५२ बळी मिळवले आहेत. खालोखाल जेम्स अँडरसन (१५ सामन्यात ४९ बळी) आणि स्टुअर्ट ब्रॉड (१३ सामन्यात ४१ बळी) यांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. येत्या ऍशेस मालिकेत या दोन्ही गोलंदाजांना बोथमच्या बळींचा विक्रम मोडण्याची निश्चितच संधी आहे. या मैदानावर फिरकी गोलंदाजांना देखील योग्य संधी मिळाली आहे. जिम लेकर, टोनी लॉक, डेरेक अंडरवूड, ग्रॅहम स्वान सारख्या इंग्लिश फिरकी गोलंदाजांनी इथे उत्तम कामगिरी केलीच आहे, पण त्याचबरोबर शेन वॉर्न सारख्या दिग्गजाने देखील केवळ ४ कसोटी सामन्यात ३२ बळी मिळवले आहेत. 


भारतीय संघ या मैदानावर १४ कसोटी सामने खेळला आहे. अर्थातच हे सर्व सामने इंग्लंडच्या विरुद्ध खेळले गेले आहेत. या १४ पैकी २ सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे, ५ सामन्यात आपण पराभूत झालो आहोत तर ७ सामने अनिर्णित झाले आहेत. १९७१ सालचा आपला इंग्लंडवरील ऐतिहासिक विजय याच मैदानावरचा. चंद्रा, वेंकट आणि बिशनसिंग बेदीच्या फिरकीच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लिश भूमीवर आपला पहिलावहिला विजय मिळवला होता. तसेच आपल्या मागच्या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाने इंग्लिश संघाला तब्बल १५७ धावांनी हरवले होते. त्यावेळी आपला सध्याचा कर्णधार रोहित शर्माने एक तडाखेबंद शतक केले होते, तर शार्दूल ठाकूरने आपल्या दोन्ही डावात अर्धशतके झळकावली होती. भारतातर्फे या मैदानावर २ खेळाडूंनी द्विशतक केले आहे. १९७९ मध्ये सुनील गावसकरने केलेल्या २२१ धावा आणि २००२ साली राहुल द्रविडच्या २१७ धावा भारतीय क्रिकेट रसिकांसाठी कायमच लक्षात राहतील. इतर खेळाडूंचा विचार करता १९७६ मध्ये रिचर्डसने या मैदानावर इंग्लंड विरुद्ध केलेल्या २९१ धावा म्हणजे क्रिकेट इतिहासातील एक अजरामर खेळी आहे. तसेच डॉन ब्रॅडमनच्या १९३४ साली केलेल्या २४४ धावांचा उल्लेख देखील महत्वाचा आहे.  गोलंदाजांचा विचार करता, भारतातर्फे केवळ ४ गोलंदाजांना या मैदानावर एका इनिंगमध्ये ५ किंवा जास्त बळी मिळवता आले आहेत. भागवत चंद्रशेखर (१९७१ साली ६ बळी), सुरेंद्रनाथ (१९५९ साली ५ बळी), हरभजनसिंग (२००२ साली ५ बळी) आणि मोहम्मद निसार (१९३६ साली ५ बळी) हे ते चार गोलंदाज.  जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियासाठी देखील हे मैदान तितकेसे भावले नाहीये. ऑस्ट्रेलियन संघाने या मैदानावर ३८ कसोटी सामने खेळले आहेत, पैकी फक्त ७ सामन्यात विजय मिळवला आहे. गेल्या २० वर्षांमध्ये तर या संघाला फक्त एका कसोटीमध्ये विजय मिळवता आला आहे.  

इंग्लिश क्रिकेटच्या इतिहासात ओव्हल मैदान नक्कीच महत्वाचे आहे. या मैदानावर जागतिक कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणे हा एका अर्थाने कसोटी क्रिकेटचा बहुमान आहे हे निश्चित. ओव्हल मैदान जगातील सर्वोत्कृष्ट मैदानांपैकी एक समजले जाते, आणि या मैदानावरच खऱ्या अर्थाने ‘ऍशेस’ मालिकेची सुरुवात झाली, त्यामुळे हा सामना खेळवून आयसीसीने एका अर्थाने वर्तुळ पूर्ण केले असे नक्कीच म्हणता येईल. 

नजर जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्याकडे 

आयपीएल संपली आणि आता वेध लागले आहेत ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे. ७ जून पासून सुरु होणाऱ्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि भारत एकमेकांशी लढतील. लंडनमधील ओव्हल मैदानावर हा सामना होणार आहे. कसोटी क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी आयसीसीने सुरु केलेल्या या स्पर्धेला कसोटी चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. २०२१ ते २०२३ हा या स्पर्धेचा दुसरा मौसम. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या मोजक्या देशांमध्ये चालणारी ही स्पर्धा सर्वच देशांसाठी महत्वाची आहे. सलग दुसऱ्यांदा भारताने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. मागील स्पर्धेत आपल्याला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या वर्षी त्यांचाच शेजारी, आणि क्रिकेटमधील महत्वाचा संघ – ऑस्ट्रेलियाला आपण भिडणार आहोत. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघात होणाऱ्या लढती, खास करून कसोटी सामने कायमच रंगतात. त्याच पार्श्वभूमीवर हा सामना देखील अतिशय उत्साहाने रंगेल अशीच क्रिकेटप्रेमींची अपेक्षा आहे. 

या संघाचे नेतृत्व पॅट कमिन्स करेल, जोडीला स्टीव्ह स्मिथ उप-कर्णधार म्हणून उभा असेल. फलंदाजीचा विचार करता डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लाबूशेन, उस्मान ख्वाजा, ट्रेव्हिस हेड सारख्या खेळाडूंवर त्यांची भिस्त असेल. स्मिथ, लाबूशेन, ख्वाजा आणि वॉर्नर ही फलंदाजी जगातील कोणत्याही गोलंदाजांसमोर धडकी भरवणारी आहे. हे खेळाडू रंगात आले तर काय कमाल करू शकतात हे सर्वानाच माहित आहे. ऑस्ट्रेलियन संघाची गोलंदाजी देखील (नेहेमीप्रमाणेच) मस्त आहे. कप्तान कमिन्स, मिशेल स्टार्क, जोश हेझलवूड, स्कॉट बोलँड आणि नॅथन लायन हे गोलंदाज संघासाठी आपली छाप सोडायला उत्सुक असतील. जोडीला कॅमरून ग्रीन, मिशेल मार्श सारखे अष्टपैलू आणि अलेक्स कॅरी सारखा उत्तम यष्टीरक्षक देखील आहेच. एकूणच विचार करता हा ऑस्ट्रेलियन संघ नक्कीच बलवान आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे वॉर्नर, मार्श आणि ग्रीन सारखे खेळाडू जरी आयपीएल मध्ये व्यस्त होते तरी इतर खेळाडू गेल्या काही आठवड्यांपासून इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये खेळत आहेत. इंग्लिश वातावरणाचा आणि हवामानाचा त्यांना फायदा झाला तर नवल वाटायला नको.     

भारतीय संघाचा विचार करता अगदी आत्तापर्यंत आपले बहुतेक सर्वच खेळाडू आयपीएल खेळत होते. टी-२० आणि कसोटी क्रिकेट हे दोन्ही फॉरमॅट्स खेळणारे आपले खेळाडू, इंग्लंड मध्ये किती लवकर स्थिरावतात त्यावर आपल्या संघाची कामगिरी अवलंबून असेल. कर्णधार रोहित, विराट, अजिंक्य आणि काउंटी क्रिकेटमध्ये खेळत असलेला चेतेश्वर पुजारा या प्रमुख खेळाडूंवर आपण बऱ्यापैकी अवलंबून असू. त्याचबरोबर शुभमन गिल या सामन्यात कशी कामगिरी करतो याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष असेल. गिलने नुकत्याच संपलेल्या आयपीएल मध्ये तुफान कामगिरी केली आहे. स्पर्धेच्या उत्तरार्धात त्याने केलेल्या तीन शतके त्याचा सध्याचा फॉर्म दर्शवतात. तो हाच फॉर्म घेऊन इंग्लंडला जाईल आणि चमकदार खेळ करेल अशीच अपेक्षा. या सामन्यात कदाचित ईशान किशन भारतासाठी पदार्पण करू शकेल. रिषभ पंतला झालेल्या दुखापतीनंतर भारतीय संघ यष्टिरक्षकाचा शोध घेतोय. श्रीकर भरतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मागच्या मालिकेत भारताचे प्रतिनिधित्व केले असले तरी देखील तो म्हणावी तशी कामगिरी करू शकला नाही. गोलंदाजी विभागात शमी, सिराज यांचे स्थान पक्के असेल. इतर वेगवान गोलंदाजांपैकी शार्दूल ठाकूरची वर्णी लागण्याची शक्यता आहे. अश्विन आणि जडेजापैकी एकालाच खेळावयाचे की दोघांनाही हा प्रश्न महत्वाचा असेल. वैयक्तिक मत विचारात घेता, या सामन्यासाठी (केवळ कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना आहे म्हणून) हार्दिक पंड्या आणि रिद्धिमान सहा यांचा विचार करायला हवा होता. त्या खेळाडूंनी देखील इतर सर्व गोष्टी बाजूला ठेवून या सामन्यासाठी संघाची साथ द्यायला हवी होती. पण क्रिकेटमध्ये जर-तर ला काही अर्थ नसतो. आहे त्या संघात आपल्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करावी अशीच आपली अपेक्षा असेल. 

आपल्या बहुतेक खेळाडूंना या स्पर्धेच्या पहिल्या अंतिम सामन्याचा अनुभव आहेच. तो सामना देखील इंग्लंडमध्येच खेळवला गेला होता. त्या वेलची परिस्थिती, मैदान, प्रतिस्पर्धी संघ वेगळे असले तरी त्या अंतिम सामन्याचा दबाव आणि अनुभव आपल्या खेळाडूंना उपयोगी पडेल. या सामन्यात खास करून रोहित, विराट, पुजारा आणि अजिंक्य सारखे आपले वरिष्ठ खेळाडू कशी कामगिरी करतात ते बघणे महत्वाचे ठरेल. हे चारही खेळाडू आता वयाच्या पस्तिशीच्या आसपास आहेत. कदाचित वर्ष-सहा महिन्यात ते निवृत्त देखील होतील. निवृत्तीच्या आधी ही ट्रॉफी आपल्याकडे असावी यासाठी ते नक्कीच प्रयत्न करतील. तसेही गेल्या १० वर्षात भारताने आयसीसीच्या एकही स्पर्धेत विजेतेपद मिळवलेले नाही. ती एक भळभळणारी जखम आपल्या क्रिकेट रसिकांना नेहमीच त्रास देते. अशावेळी या सामन्यात उत्तम कामगिरी करून विजेतेपद मिळवणे आपल्या खेळाडूंच्या हाती आहे. ऑस्ट्रेलियन संघासाठी देखील हा सामना महत्वाचा आहेच. दोन्ही संघ कसोटी क्रिकेटमध्ये दादा संघ समजले जातात. याच ‘दादागिरी’ वर शिक्कामोर्तब करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. 

दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा असेल, आणि दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील यात काही वाद नाही. या सामन्यात अनेक क्रिकेटपटूंच्या कौशल्यांचा कस लागणार आहे. त्या ५ दिवसात जो संघ चांगली कामगिरी करेल, तो या स्पर्धेची गदा उंचावेल. एकूणच उत्तम खेळ व्हावा (आणि भारताने विजय मिळवावा), हीच अपेक्षा !!

WTC फायनल ची अग्निपरीक्षा

आयपीएल चा धामधूम संपला.. आडवे बॅटीचे फटके संपले.. आता क्रिकेट इन व्हाईट्स चा सिझन इंग्लंड मधून सुरू होणार.. त्याचा श्रीगणेशा WTC च्या फायनल ने होईल.. याच WTC फायनल चे केलेले पूर्वावलोकन…


फायनल ची पार्श्वभूमी: रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, महंमद शमी, स्टीव्ह स्मिथ, डेव्हीड वॉर्नर या साऱ्यांची ही कदाचित शेवटची WTC फायनल असेल या पुढची WTC फायनल 2025 ला संपते तोपर्यंत या दिग्गजांमधले किती जणं खेळत असतील याबाबत माझ्या मनात शंका आहे.. हे सगळे दिग्गज आपल्या कारकिर्दीच्या उताराकडे झुकले आहेत..त्यामुळे यातील प्रत्येक जण आपल्या कौशल्याची पराकाष्ठा करून ही WTC जिंकण्याचा प्रयत्न करेल..

दोन्ही संघांची तयारी: WTC च्या फायनल ला पोहोचताना दोन्ही भारत आणि ऑस्ट्रेलिया ने साखळी स्पर्धेत उत्तम कामगिरी केली ऑस्ट्रेलिया ने घरच्या मैदानावरील तिन्ही मालिका जिंकल्याच त्याशिवाय पाकिस्तान, भारतात ही कसोटी विजय मिळवले..भारताने इंग्लंड, बांगलादेश, आणि दक्षिण आफ्रिकेत कसोटी विजय मिळवले पण बांगलादेश वगळता इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत मालिका विजय दूर राहिला.. घरच्या मैदानावरील श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड विरुद्ध च्या मालिका जिंकल्या..

इंग्लंड चे हवामान: WTC फायनल होत असलेल्या इंग्लंड मधील हवामान लहरी असते.. क्षणात पाऊस, क्षणात ऊन असे हवामान असल्याने एक एक सेशन मध्ये सामन्याचा कल बदलू शकतो..WTC फायनल च्या दिवसात पावसाची शक्यता सध्या जरी दिसत नसली.. तरी इंग्लंड मध्ये मेघ नभांवर कधीही आक्रमण करतात.. त्यामुळे खेळपट्टी ताजी राहिली तर बॉल हवेत आणि पिच दोन्ही वर हलतो.. फायनल होत असलेल्या ओव्हल चा स्क्वेअर मोठा आहे त्यामुळे मैदान मोठं असले तरी बॉल लवकर सीमेपार जाऊ शकतो.. सामन्यासाठी ICC ने राखीव दिवस ठेवला आहे, पण सामना सहाव्या दिवसापर्यंत जाईल असे वाटत नाही..

संभावित प्लेइंग ११*:ऑस्ट्रेलिया: पॅटकमिन्स, डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाब्युशेन, स्टीव्ह स्मिथ, अलेक्स केरी(यष्टीरक्षक), कॅमेरून ग्रीन, मिचेल स्टार्क,  स्कॉट बोलन्ड,  जोश हेझलवूड, नॅथन लायन.
भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के एस भरत(यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, महंमद शमी, महंमद सिराज, उमेश यादव..* दुखापत वगळता

मेक ओर ब्रेक संधी: शुभमन गिल ने पदार्पण केल्यापासून फारसे निराश केलेले नाही.. पण कसोटी क्रिकेट मध्ये दोन- तीन नर्व्हस नाईनटीज मध्ये बाद झाल्यानंतर आता शतके करू लागला आहे.. करियर च्या सुरुवातीला इतकी चांगली संधी मागून मिळत नाही.  WTC सारख्या मोठ्या स्पर्धेत चमकदार कामगिरी कायम स्मरणात राहते..फर्स्ट चॉईस रिषभ पंत जायबंदी झाल्यापासून आणि आणखी एक दीड वर्ष तो मैदानावर येणार नसल्याने किमान कसोटी संघात जागा पक्की करण्याची सुवर्ण संधी के एस भरत आणि ईशान किशन साठी चालून आली आहे.. WTC सारख्या मोठ्या व्यासपीठावर जर हे दोघे चमकले तर या दोघांची नावे भारतीय क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरली जातील.. उलटपक्षी कामगिरी न झाल्यास बाजूला पडलेला साहा, एव्हर वेटिंग सॅमसन सारख्याना पुन्हा संघाचे दरवाजे उघडले जातील…

बॅटल विदिन बॅटल: गिल, पुजारा, कोहली, रहाणे हे फॉर्मात असले तरी काळजीचे कारण कर्णधार रोहित शर्मा होऊ शकतो.. त्याचा फॉर्म आणि फिटनेस दोन्ही किमान ते सहा दिवस नीट राहणं भारतासाठी अत्यंत गरजेचे आहे.. लोवर बॅटिंग ऑर्डर मध्ये जडेजा, ठाकूर यांच्याकडून 50-60 धावांची भर पडेल अशी आशा करायला हरकत नाही.. बॉलिंग मध्ये मुख्य मदार शमी- सिराज या  जोडीवर राहील त्यांना साथ  द्यायला यादव-ठाकूर-जडेजा या त्रिकुट असतील..ऑस्ट्रेलियात वॉर्नर, ख्वाजा, स्मिथ, लाब्युशेन ही चौकडी दोन्ही डावात लवकर बाद करणे भारताच्या दृष्टीने उत्तम राहील.. बॉलिंग मध्ये दोन्ही डावात हेझलवूड, स्टार्क, कमिन्स, बोलन्ड यांना लवकर विकेट न फेकणे अतिशय महत्त्वाचे राहील.. दोन्ही डावात दोन्ही संघात ओपनर ची भूमिका कळीची राहील कारण, दोन्ही संघांचा बॉलिंग अटॅक बॅलन्स वाटतो.

दशकाची प्रतीक्षा: भारताने शेवटची ICC ट्रॉफी जिंकली ती इंग्लंड मध्येच 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी!! त्याला जवळ जवळ दशक उलटलं.. त्यावेळी 4G नव्हतं, मोदी राष्ट्रीय स्तरावर आले नव्हते, काँग्रेस सत्तेत होती, सोशल मिडिया आजच्या इतका फोफावला नव्हता.. बराच काळ लोटून गेला..इंतेहा हो गयी.. मधल्या काळात रोहित शर्मा जगातील सर्वोत्तम ओपनर झाला.. शिखर धवन चं करियर सुरू होऊन जवळजवळ संपलं… या वर्षी ही दशकाची प्रतीक्षा संपेल अशी प्रत्येक क्रिकेट प्रेमीची आशा असेल..

सीएसके ची फॅक्टरी..

2007 साली भारतीय क्रिकेट संघाने टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतात बीसीसीआय ने आयपीएल ची टी 20 स्पर्धा सुरू केली आज त्या गोष्टीला 15 वर्ष झाली.. गेल्या सोळा मोसमात वर्षानुवर्षे जी गोष्ट कायम राहिली ती म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज  चे स्पर्धेतील सातत्य.. 14 हंगाम, 12 प्लेऑफ आणि 10 फायनल्स अस घवघवीत यश जी एक टीम मिळवते ती चेन्नई सुपर किंग्ज अर्थात अनेकांची आवडती “सीएसके”.


जी स्पर्धाच मुळात बेभरवश्याची आहे. जिथे एखाद्या षटकात सामना फिरतो गेले काही वर्षे काही च्या काही स्कोर चेस होतात अश्या अतिशय अटीतटी च्या स्पर्धेत इतकं सातत्य राखणे हे फ्ल्यूक किंवा मटका नक्कीच नाही…
काय आहेत सीएसके च्या यशाची कारण ती पाहुयात..

१. परफेक्ट नियोजन: प्रत्येक हंगामाच्या आधी मिनी ऑक्शन होते त्यावेळी आपल्या खेळला टीम कल्चर ला आणि आपल्या गरजा पूर्ण करू शकतील असे खेळाडू सीएसके चे मॅनेजमेंट पिन पॉईंट करून घेते त्यात स्टीफन फ्लेमिंग, लक्ष्मीपती बालाजी असे काही वर्षानुवर्षे सीएसके चा भाग असलेले लोक पडद्यामागे काम करत असतात.. टॅलेंट हंट मधून एखादा मोहरा सापडतो का याची चाचपणी केली जाते TNPL मधून लोकल टॅलेंट हातासरशी उपलब्ध होतं..
. लो प्रोफाइल, हाय इम्पॅक्ट प्लेयर चा शोध: आंतराष्ट्रीय खेळाडुं चे शोध आणि ऑक्शन संपले की भारतात ल्या कोणाचेही लक्ष जाणार नाही असे खेळाडू हेरायचे त्यांना विश्वास द्यायचा आणि त्यांच्या कडून उत्कृष्ट आउटपुट काढून घ्यायचे हे वर्षानुवर्षे सीएसके करत आली आहे.. पहिल्या हंगामातील मनप्रित गोनी, शादाब जकाती, जोगिंदर शर्मा, पुढे रायुडू, के एम असिफ, जगदिसन, पवन नेगी, मोहित शर्मा, शार्दूल ठाकूर, रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, तुषार देशपांडे, दीपक चहर  अशी एक ना अनेक खेळाडू कधीतरी सीएसके चा भाग होती, आहेत आणि वेळोवेळी मॅच काढून देतात
३. कोअर खेळाडू टिकवून ठेवणे: सीएसके ने अनेक वर्षे धोनी, रैना, ब्रावो, जडेजा या चौघांचा कोअर ग्रुप अतिशय ताकदीने सांभाळला त्यातून सीएसके ने एक कल्चर तयार केलं ज्यात येणारा नवीन खेळाडू या चौघांच्या सानिध्यात सीएसके चा होऊन जायचा.. किती तरी सिझन पार पडले पण हे चार जवळ जवळ गेला दशक भर सीएसके बरोबर आहेत…
४. चेपॉक चा बालेकिल्ला: आयपीएल चा फॉरमॅट असा आहे की प्रत्येक संघ प्रत्येक संघविरुद्ध होम आणि अवे मॅच खेळतो आणि असे 14 सामन्यांपैकी 8 सामने जिंकले की प्लेऑफ निश्चित समजतात.. सीएसके ने संघ बांधणी करताना चेपॉक च्या खेळपट्टी चा वातावरणाचा सखोल अभ्यास करून त्या खेळपट्टीला साजेशी गोलंदाजी जमवली आणि चेपॉकहा जवळजवळ बालेकिल्ला केला विशेषतः आयपीएल उत्तरार्धात मे महिन्यात खेळपट्टी शुष्क होते आणि फिरकी ला पोषक होते अश्या खेळपट्टी वर मग जडेजा, मोईन अली, थिक्षणा, आधी च्या काळी अश्विन, चावला घातक ठरायचे…
५. फॅन फॉलोविंग: दक्षिण भारतात कोणतीही गोष्ट अतिशय मनापासून स्वीकारली किंवा झिडकारली जाते.. पहिल्या सिझन पासून सीएसके ने एक जबरदस्त फॅन बेस तयार केलाय आणि भारतात कुठल्याही मैदानावर सामना असो त्यांचे समर्थक विरोधी समर्थकांना पुरून उरतात आता 2023 चा सिझन पाहिला तरी ही गोष्ट अधोरेखित होते… मधल्या काळात दोन वर्षे टीम वर बंदी असताना देखील यांचा सपोर्ट कमी झाला नाही उलट आणखी जोमाने मैदाने भरू लागली..


६. एम  एस धोनी नावाचा शिल्पकार: या सगळ्यामध्ये वेगळाआणि तितकाच महत्त्वपूर्ण ठरतो तो एम एस धोनी पहिल्या सिझन ला आयकॉन प्लेयर केले होते. मुंबईत सचिन, बंगलोर ला द्रविड, कुंबळे, हैद्राबाद ला लक्ष्मण , दिल्ली ला सेहवाग, पंजाब ला युवराज, कलकत्ता चा सौरव गांगुली, फक्त महेंद्रसिंग धोनी असा एकच खेळाडू होता जो आयकॉन प्लेयर असून त्याला होम टीम नव्हती त्यावेळी मुंबई आणि चेन्नई मध्ये ऑक्शन च्या वेळी जबरदस्त ऑक्शन झाले आणि शेवटच्या क्षणी महेंद्रसिंग धोनी चेन्नई च्या पदरी पडला…चेन्नई कडून खेळायला लागल्या पासून गेली 15 वर्ष तो च कॅप्टन आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त होऊन 3 वर्ष झाली तरी तो आयपीएल खेळतोय उपलब्ध साधनातून बेस्ट बाहेर काढण्याचे जे कौशल्य धोनी कडे आहे ते खचितच कोणाकडे असेल.. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे 2023 च्या सिझन मधील क्वालिफायर 1 मधील राशीद खान ची विकेट. बॉलर ला प्लॅन आखून देणे आणि बॉलर ने डोकं फारसं न चालवता सांगितलेले काम चोख पार पाडले की यशाची हमी धोनी घेतो…

हा लेख प्रकाशीत होत असताना कदाचित चेन्नई ने पाचवे विजेतेपद जिंकले असेल…

– हर्षद मोहन चाफळकर

भविष्यातले सितारे 

इंडियन प्रिमीयर लीग, अर्थात आयपीएल  विश्वातील एक महत्वाची स्पर्धा आहे यात काही वाद नाही. या स्पर्धेचे आणि एकूणच टी-२० क्रिकेटचे चाहते जगभर आहेत. अनेक क्रिकेट प्रेमींना टी-२० हे क्रिकेट वाटत नाही हे खरे असले तरीदेखील टी-२० कडे क्रिकेटचे भविष्य म्हणून बघितले जात आहे. क्रिकेट हा खेळ जगभर न्यायचा असेल, त्याला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवून द्यायचे असेल तर टी-२० ला पर्याय नाही हे देखील खरे आहे. आज जगभर अनेक देशांमध्ये टी-२० क्रिकेट खेळले जाते, आणि याचे मोठे श्रेय आयपीएलला दिलेच पाहिजे. गेली १६ वर्षे आयपीएल अव्याहतपणे सुरु आहे. भारतात निवडणुका असतील, अथवा इतर काही अडचणी असतील तरी देखील आयोजकांनी आयपीएलसाठी विशेष प्रयत्न करून ही स्पर्धा खेळण्याकडे  प्राधान्य दिले आहे. अगदी कोरोना काळात देखील आयपीएल खेळवली गेली आहे. त्यामागे कारणे काहीही असो, पण ही स्पर्धा एकूणच क्रिकेटसाठी  किती महत्वाची आहे हे लक्षात येते. गेली १५-१६ वर्षे या स्पर्धेने अनेक उत्तमोत्तम खेळाडू दिले आहेत. केवळ भारतीयच नाही, तर इतर देशांमधील खेळाडूंना देखील एक उत्तम प्लॅटफॉर्म या स्पर्धेने दिला आहे.  आज भारतीय संघाकडून खेळणारे बहुतेक सर्वच खेळाडू आयपीएल मधून तावून सुलाखून बाहेर पडले आहेत असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, युझवेन्द्र चहल, ईशान किशन ही त्यातील काही प्रमुख उदाहरणे म्हणता येतील. दरवर्षी आयपीएल मधून आपल्याला अशीच काही रत्ने गवसत जातात. 


२०२३ ची आयपीएल स्पर्धा आज संपेल. जवळजवळ दोन महिने चाललेल्या या स्पर्धेत अनेक क्रिकेटपटूंचा कस लागला. अनेक सामने अगदी शेवटच्या षटकापर्यंत – शेवटच्या चेंडूपर्यंत रंगले, फलंदाजी आणि गोलंदाजी मधील एक द्वंद्व बघायला मिळाले. या लेखात यंदाच्या आयपीएलमध्ये प्रभावी कामगिरी केलेल्या काही अनकॅप्ड (आंतरराष्ट्रीय सामने न खेळलेल्या) खेळाडूंबद्दल थोडेसे. 

१. यशस्वी जयस्वाल – यशस्वीची कहाणी एखाद्या बॉलिवूड चित्रपटाप्रमाणे आहे. उत्तरप्रदेशच्या भदोई मधून एक १० वर्षांचा मुलगा मुंबईमध्ये क्रिकेट शिकायला येतो, अगदी चित्रपटातील नायकाप्रमाणे मैदानावर तंबू ठोकून राहतो. प्रसंगी पाणीपुरीच्या गाडीवर काम करतो. क्रिकेटच्या सरावात हळूहळू प्रगती करून एक दिवस ‘यशस्वी’ क्रिकेटर होतो. कदाचित हे जास्तच फिल्मी आहे, पण हे सत्य आहे. यशस्वीने क्रिकेट साठी घेतलेले कष्ट एक उदाहरण आहे. २०२०च्या १९ वर्षांखालील ‘युवा’ विश्वचषक स्पर्धेत त्याने कमाल केली, आणि क्रिकेट रसिकांची नजर त्याच्याकडे वळली. लवकरच त्याने मुंबई संघात देखील स्थान मिळवले. देशांतर्गत स्पर्धेत उत्तम कामगिरी केलेल्या यशस्वीने यावर्षी राजस्थान रॉयल्स कडून आयपीएल खेळताना जगभरातील क्रिकेट रसिकांचे लक्ष  वेधून घेतले. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने १४ सामन्यात ४८ धावांच्या सरासरीने ६२५ धावा केल्या आहेत. यामध्ये ५ अर्धशतके आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध झळकावलेले एक तडाखेबंद शतक आहे. यशस्वीने आपल्या खेळणे क्रिकेट रसिकांसह समीक्षकांनाही आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे. यावर्षीच्या अनेक सामन्यांत यशस्वीने तंत्रशुद्ध फटकेबाजी करत वेळोवेळी आपल्या संघाला चांगली धावसंख्या उभारण्यास हातभार लावला आहे. कदाचित पुढच्या १-२ वर्षात आपल्याला यशस्वी जयस्वाल हे नाव भारतीय संघात दिसले तर आश्चर्य वाटू नये. या मुलाचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे, आणि यंदाच्या आयपीएलने त्यावर जणू शिक्कामोर्तब केले आहे. 

२. रिंकू सिंग – कोलकाता संघाला गुजरात विरुद्ध शेवटच्या षटकात जिंकायला २९ धावांची गरज होती तेंव्हा तो सामना जणू ते हरल्यात जमा होते. पण एका डावखुऱ्या फलंदाजाने त्या षटकात सलग पाच षटकार मारून संघाला अशक्यप्राय विजय मिळवून दिला आणि रिंकू सिंग हे नाव जगभर पसरले. यशस्वी प्रमाणेच रिंकूची गोष्ट देखील प्रेरणादायी आहे. एका मोठ्या कुटुंबात वाढलेला मुलगा, घरात खायची भ्रांत, रिंकूच्या खेळण्याला वडिलांचा विरोध, रिंकूने काहीतरी कामधंदा करून घराला आर्थिक मदत करावी अशी असलेली अपॆक्षा, आईने वडिलांची नजर चुकवून रिंकूच्या खेळण्यासाठी कसेतरी थोडेसे पैसे उभे करणे  अश्या एक ना अनेक अडचणी. पण या वर्षीच्या आयपीएल मध्ये रिंकूने जे कमावले त्याबद्दल त्याच्या पालकांनाही त्याचा अभिमान वाटावा. रिंकूने कोलकाताच्या संघाला अशक्यप्राय विजय मिळवून दिले. गुजरात विरुद्ध त्याने केली तशी कामगिरी त्याने पंजाब विरुद्ध देखील केली.  शेवटच्या साखळी सामन्यात लखनौ विरुद्ध देखील तो शेवटपर्यंत उभा राहिला. कोलकाता तो सामना हरले तरी रिंकूच्या फलंदाजीची वाहवा सगळीकडे झाली. भारताला कदाचित पुढील काही दिवसात एक चांगला ‘फिनिशर’ मिळू शकेल. रिंकू सिंगचे नाव फारसे कोणाला ठाऊक नव्हते, पण यंदाच्या आयपीएल नंतर त्याच्याकडे भविष्यातील सुपरस्टार म्हणून बघितले जात आहे. 

३. तुषार देशपांडे –  २ वर्षांपूर्वी तुषार देशपांडे दिल्लीच्या संघाकडून आयपीएल खेळला तेंव्हा तो तसा साधारण वेगवान गोलंदाज वाटला होता. अर्थात त्याच्या वेगावर आणि एकूणच गोलंदाजीवर प्रश्न निर्माण करण्याचे काहीही कारण नव्हते. पण या वर्षी महेंद्र सिंग धोनी नामक पारख्याची नजर त्याच्यावर पडली आणि ही आयपीएल स्पर्धा त्याच्या कारकिर्दीसाठी एक वेगळीच कलाटणी देणार आहे. धोनीने तुषारची पारख केली, त्याला योग्य संधी दिली आणि आज त्याची फळं चेन्नईचा संघ चाखतो आहे. देशांतर्गत क्रिकेट मुंबईकडून खेळणाऱ्या तुषारने या स्पर्धेत आतापर्यंत १५ सामन्यात २१ बळी मिळवून प्रभावी कामगिरी केली आहे. सुरुवातीचे षटक असो, मधल्या ओव्हर्स अथवा अंतिम षटकांची मारामारी, तुषारने कायमच टिच्चून गोलंदाजी केली. कदाचित त्याला या स्पर्धेत फलंदाजांकडून फटके पडत असतीलही, पण योग्य वेळी बळी मिळवण्याचं त्याचं तंत्र चेन्नई संघासाठी कायमच उपयुक्त ठरलं आहे. आज चेन्नई संघ विजेतेपदाचा मोठा दावेदार आहे, आणि त्यामागे तुषारच्या गोलंदाजीचं मोठं योगदान आहे. गेल्या काही वर्षात भारतीय वेगवान गोलंदाजांनी चांगलं नाव कमावलं आहे, त्याच गोलंदाजांच्या यादीत आता तुषार उभा ठाकला आहे. या वर्षी चेन्नई साठी त्याने सर्वाधिक बळी घेतले आहेत. चेन्नई संघात पूर्वी असलेली ब्रावोची जागा आता काही प्रमाणात, गोलंदाजीत तरी, तुषार कडे आली आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. 

४. सुयश शर्मा – ६ एप्रिल २०२३ रोजी जेव्हा तो ईडन गार्डनवर गोलंदाजी करायला आला तेव्हा तो फारसा कोणाला ठाऊक नव्हता. बंगलोर विरुद्धच्या सामन्यात त्याने ३ बळी घेतले आणि अचानक सर्वांची नजर त्याच्यावर पडली. तो त्याचा पहिलाच सामना होता, आयपीएल मधलाच नाही तरी एकूणच कारकिर्दीतला. अजून त्याचे फर्स्ट क्लास क्रिकेट मध्ये पदार्पण देखील झाले नाहीये, पण सुयश शर्मा हे नाव मात्र क्रिकेट रसिकांमध्ये लोकप्रिय होत आहे हे नक्की. सुयशची ही पहिलीच स्पर्धा, आणि कोलकाता सारख्या संघातून खेळताना एक वेगळीच जबाबदारी असणार, पण २० वर्षांच्या या गोलंदाजाने ही जबाबदारी ओळखून संधीचं सोनं केलं आहे. चेंडूला उत्तम ऊंची (flight) देत सुयश चांगल्या प्रकारे लेगस्पिन गोलंदाजी करतो. या स्पर्धेत त्याने भल्याभल्या फलंदाजांना पाणी पाजलं आहे असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. त्याने बाद केलेल्या फलंदाजांच्या यादीत फाफ डू प्लेसी, रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, दिनेश कार्तिक, टिळक वर्मा सारखे मोठे फलंदाज आहेत. त्याच्याकडे अनुभवाची थोडी कमतरता असली तरी उद्याचा स्टार म्हणून तो नक्कीच पुढे येऊ शकतो. 

कौस्तुभ चाटे             

कहाणी षटकारांची  

क्रिकेटच्या इतिहासात एका षटकात सहा षटकार मारणे ही काही सोपी गोष्ट नाही. केवळ आकड्यांच्या आणि शक्यतेच्या भाषेत बोलायचे झाले तर हे सहज शक्य आहे, पण हे गणित नाही. क्रिकेट हा खेळ आहे, आणि प्रत्येक चेंडूवर षटकार मारणे हे खरोखरच अवघड आहे. अर्थात हे घडलं नाहीये असं देखील नाही. क्रिकेटच्या जवळजवळ सव्वाशे-दीडशे वर्षांच्या इतिहासात ही गोष्ट आतापर्यंत केवळ ११ वेळा घडली आहे, पैकी ४ वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (२ वेळा एकदिवसीय क्रिकेटमध्ये आणि २ वेळा आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यात), २ वेळा फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये आणि बाकी वेळा टी-२० अथवा लिस्ट ए सामन्यात ही घटना घडली आहे. पूर्वीच्या काळी फलंदाजाला चेंडू हवेतून मारू नये असे शिकवले जात असे. चेंडू हवेत गेला तर फलंदाज बाद होण्याची शक्यता अधिक, त्यामुळेच कदाचित चेंडू जमिनीलगत मारण्याचे जास्त प्रयत्न होताना दिसत. 

सर डॉन ब्रॅडमन क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फलंदाज समजले गेले. कसोटी क्रिकेट मधील त्यांची सरासरी कदाचित कोणीही फलंदाज ओलांडू शकणार नाही. आपल्या तंत्रशुद्ध पण तरीही आक्रमक फलंदाजीच्या जोरावर त्यांनी क्रिकेट गाजवले. १९२७-२८ ते १९४७-४८ अशी जवळजवळ २०-२१ वर्षे त्यांनी क्रिकेट गाजवले. (यातच युद्धामुळे त्यांची साधारण ७-८ वर्षे वाया गेली हे देखील लक्षात घेतले पाहिजे.) त्यांची फलंदाजी म्हणजे जमिनीलगत फटक्यांची मेजवानी असे. पण या संपूर्ण कालावधीत त्यांनी कसोटी क्रिकेट मध्ये ६०० पेक्षा जास्त चौकार मारले असले तरी, फक्त ६ षटकार लगावले. संपूर्ण २० वर्षांच्या कारकिर्दीत, साधारण १०० च्या सरासरीने सुमारे ७००० कसोटी धावा करताना त्यांनी फक्त ६ षटकार मारले असतील हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. अजून एक गमतीची गोष्ट म्हणजे हे सर्व षटकार त्यांनी डावखुऱ्या गोलंदाजांना मारले आहेत. यापैकी पहिला षटकार त्यांनी इंग्लंडचा गोलंदाज हेडली वेरिटीला लगावला. १९३२ साली ऍडलेड मैदानावर त्यांनी पहिला षटकार मारला. त्यानंतर १९३४ सालच्या इंग्लंड मालिकेत त्यांनी अजून ४ षटकार लगावले. पैकी दोन षटकार हेडींग्ले मैदानावर (गोलंदाज: हेडली वेरिटी आणि लेन हॉपवूड) आणि दोन ओव्हल मैदानावर (गोलंदाज: हेडली वेरिटी आणि नोबी क्लार्क) होते. ब्रॅडमन यांनी शेवटचा षटकार १९४८ साली भारताच्या विनू मंकड यांच्या गोलंदाजीवर मारला. खरोखर इतक्या मोठ्या फलंदाजाने त्याच्या
कारकिर्दीत फक्त ६ षटकार मारणे हे आजच्या क्रिकेटकडे पाहता आश्चर्यकारकच म्हटले गेले पाहिजे. 


एका षटकात सहा षटकार मारण्याचा पहिला मान जातो सर गॅरी सोबर्स यांच्याकडे. ३१ ऑगस्ट १९६८ रोजी इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये नॉटिंगहॅमशायर कडून खेळताना त्यांनी ग्लॅमॉर्गनचा गोलंदाज माल्कम नॅश याच्या गोलंदाजीवर हा विक्रम केला. लागोपाठ ५ षटकार मारल्यानंतर सोबर्स यांनी जेंव्हा सहावा चेंडू सीमारेषेपलीकडे मारायचा प्रयत्न केला, तेंव्हा सीमारेषेजवळ असलेला क्षेत्ररक्षक – रॉजर डेव्हिस याने तो झेल घेतला खरा, पण झेल घेण्याच्या नादात तो सीमारेषेपलीकडे गेला आणि अशा पद्धतीने सोबर्स हे एका षटकात सहा षटकार मारणारे पहिले फलंदाज ठरले. यापुढची कहाणी देखील मनोरंजक आहे. त्याकाळी क्रिकेटपटूंना क्रिकेटमधून फारसे पैसे मिळत नसत. ऑगस्ट १९६८ नंतर माल्कम नॅश, ज्यांच्या गोलंदाजीवर सहा षटकार मारले गेले होते, त्यांनी इंग्लंडमधील पब्स मध्ये त्या षटकारांची कहाणी रंगवून सांगण्यास सुरुवात केली. आणि त्यामधून त्यांनी बरेच पैसे कमावले. अजून एक गमतीची गोष्ट म्हणजे कधीकधी खुद्द सर गॅरी सोबर्स त्यांच्याबरोबर हा कार्यक्रम करत असत. अशा पद्धतीने सोबर्स आणि नॅश यांनी पुढे अनेक वर्षे ती सहा षटकारांची गोष्ट जिवंत ठेवली. 


त्यानंतर १९८५ मध्ये वानखेडे स्टेडियमवर रणजी ट्रॉफी सामन्यात रवी शास्त्रीने या विक्रमाची बरोबरी केली. त्यावेळी त्याने बडोद्याकडून खेळणाऱ्या तिलक राज याच्या गोलंदाजीवर सहा षटकार मारले होते. २००७ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या हर्स्चेल गिब्स याने नेदर्लंड्सच्या डॅन वान बुंगा याच्या गोलंदाजीवर षटकारांची आतषबाजी केली. तर त्यानंतर काहीच महिन्यात दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत युवराज सिंगने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला षटकार मारून त्याची पुनरावृत्ती केली. हे षटकार कदाचित आपल्या जास्त जवळचे आहेत. २००७ चा तो विश्वचषक म्हटलं की युवराजला चिथावणारा अँड्र्यू फ्लिंटॉफ आणि त्यानंतर त्याने मारलेले ते सहा षटकार नक्की लक्षात राहतात. २००७-०८ नंतर झालेल्या टी-२० क्रिकेटच्या उदयानंतर फलंदाजीचे तंत्रज्ञान एकदमच बदललं. आता कोणताही फलंदाज मिळालेल्या संधीचा फायदा करून घेत, गोलंदाजांवर वर्चस्व गाजवू लागला. त्याच नादात गेल्या काही वर्षात एका षटकात ६ षटकार मारण्याचे प्रमाण देखील वाढले. २०१७ मध्ये वार्विकशायर कडून खेळणारा रॉस व्हिटली, तसेच २०१८ अफगाणिस्तान प्रीमियर लीग मध्ये हझरतुल्ला झझाई यांनी हा पराक्रम केला. पाठोपाठ २०२० मध्ये न्यूझीलंडच्या टी-२० स्पर्धेत केंटरबरी संघाकडून खेळताना लिओ कार्टर याने त्यांचा कित्ता गिरवला. 


२०२१ मध्ये ही कामगिरी तीन वेळा घडली. श्रीलंकेच्या टी-२० स्पर्धेत थिसारा परेरा याने ‘श्रीलंका आर्मी’ संघाकडून खेळताना कोलंबो येथे एका सामन्यात सहा षटकारांचा विक्रम केला. त्याने त्या सामन्यात केवळ १३ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. पण ही खेळी वाया गेली असेच म्हणावे लागेल, कारण पुढे पावसामुळे तो सामना पूर्ण होऊ शकला नाही आणि शेवटी तो रद्द करावा लागला. २०२१ याच वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही घटना २ वेळा घडली. ४ मार्च २०२१ रोजी अँटिगा येथे टी-२० सामना खेळत असताना वेस्ट इंडिजच्या कायरॉन पोलार्ड याने श्रीलंकेच्या अकिला धनंजयाच्या गोलंदाजीवर हल्ला चढवत ६ षटकारांची आतषबाजी केली. आधीच्याच षटकात धनंजयाने त्याच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर हॅट्ट्रिक घेतली होती. त्या षटकात त्याने तीन बळी तर घेतलेच पण केवळ २ धावा दिल्या होत्या. पण पुढच्या षटकात मात्र पोलार्डच्या फटक्यांपुढे त्याची गोलंदाजी निष्प्रभ वाटू लागली. याच वर्षी ९ सप्टेंबर रोजी भारतात जन्मलेल्या पण अमेरिकेकडून खेळणाऱ्या जसकरण मल्होत्रा याने ओमान येथील मैदानावर पापुआ न्यू गिनी या देशाकडून खेळणाऱ्या गौदी टोका याच्या षटकात ६ षटकार मारले. आता अमेरिका आणि पापुआ न्यू गिनी हे दोन्ही संघ क्रिकेट जगतात अगदी बच्चे असले तरी मल्होत्राची ही कामगिरी क्रिकेट विश्वात नक्कीच महत्वाची ठरते. 

या यादीतील शेवटचे नाव आहे ते म्हणजे महाराष्ट्राचा खेळाडू ऋतुराज गायकवाड याचे. ऋतुराजने मागच्या वर्षी (२०२२ मध्ये) एकदिवसीय क्रिकेटमध्ये उत्तरप्रदेशविरुद्ध खेळताना अहमदाबाद येथे एक भन्नाट विक्रम आपल्या नावावर नोंदवला. शिवा सिंग या फिरकी गोलंदाजाच्या गोलंदाजीवर त्याने एकाच षटकात ७ षटकार मारले. शिवा सिंगने त्या षटकात एक अवैध चेंडू (नो बॉल) देखील टाकला, आणि ऋतुराजने त्या चेंडूवर देखील षटकाराची नोंद केली. अशापद्धतीने एकाच षटकात ४३ धावा करण्याचा (७ षटकार आणि १ नो बॉल) विक्रम ऋतुराजच्या नावावर आहे. 


आजच्या वेगवान आणि फटकेबाजीला प्रोत्साहन देणाऱ्या क्रिकेटमध्ये षटकार मारणे हे फारसे अवघड वाटत नाही. पण तरीही एका षटकात सहा षटकार मारणे नक्कीच सोपे नाही. सोबर्स पासून सुरु झालेला हा प्रवास आत्ताच्या घडीला ऋतुराजपाशी येऊन थांबला आहे. अर्थातच क्रिकेटमध्ये हा विक्रम परत परत घडणार यात काही शंका नाही. 

– कौस्तुभ चाटे      

या सम हा ! 

दिवस होता ६ जून १९९४. इंग्लिश काउंटी क्रिकेट मध्ये एजबॅस्टन मैदानावर खेळताना वॉर्विकशायरचा एक फलंदाज चांगलाच फॉर्मात होता. आज त्या पट्ठ्याच्या मनात काही वेगळंच होतं. डरहम विरुद्धच्या या सामन्यात आज त्याची बॅट बोलत होती. बघता बघता या फलंदाजाने ५०० धावांचा टप्पा गाठला होता. अशी खेळी करणारा जागतिक क्रिकेटमधील हा पहिलाच फलंदाज होता. वेस्टइंडिज कडून खेळणारा हा खेळाडू काही वेगळाच होता. दीड महिन्यापूर्वीच (१८ एप्रिल १९९४) याच फलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध ३७५ धावांची खेळी केली होती. अर्थातच त्या खेळाडूचं नाव म्हणजे ब्रायन चार्ल्स लारा. फर्स्ट क्लास क्रिकेट मधला त्याचा ५०१ धावांचा विक्रम अबाधित आहे. ३७५ धावांचा विक्रम मोडला गेला खरा, पण पुढे काही महिन्यातच लाराने परत एकदा त्याच इंग्लंड विरुद्ध, त्याच अँटिगा रिक्रिएअशन ग्राउंड वर ४०० धावा करून तो विक्रम स्वतःच्या नावावर केला. फर्स्ट क्लास क्रिकेटमधील ५०१ आणि कसोटी क्रिकेटमधील ४०० धावा या आजमितीला फलंदाजाने केलेल्या सर्वोच्च धावा आहेत. हा विक्रम कोणी मोडेल अशी शक्यता देखील नाही.  वेस्ट इंडिज क्रिकेट म्हटलं की आपल्याला १९७०-८० चा सुवर्णकाळ आठवतो, ते महान गोलंदाज आठवतात, क्लाइव्ह लॉइडचा तो संघ आठवतो, अष्टपैलू गॅरी सोबर्स आठवतो, किंग रिचर्ड्स आठवतो… त्याच जोडीला ब्रायन लारा या माणसाने वेस्टइंडीजच्या सरत्या काळात केलेली फलंदाजी, वेळोवेळी संघासाठी केलेली खेळी आणि क्रिकेट मधलं त्याचं योगदान देखील आठवतं. वेस्टइंडीज, आणि क्रिकेटच्या इतिहासात ब्रायन लाराचं स्थान ध्रूवताऱ्या सारखं आहे. क्रिकेट प्रेमींना निखळ आनंद देण्याचं काम ब्रायन लाराने केलं. 


लाराचा जन्म सांताक्रूझ, त्रिनिदादचा, २ मे १९६९. वयाच्या सहाव्या वर्षी लहानग्या ब्रायनचे वडील त्याला हाताला धरून क्रिकेट शिकायला घेऊन गेले. तिथून हा प्रवास सुरु झाला. वयाच्या चौदाव्या वर्षी त्याने फातिमा कॉलेज मध्ये प्रवेश घेतला आणि इथे खऱ्या अर्थाने त्याच्या क्रिकेटला गती मिळाली. बघता बघता त्याने त्रिनिदादचं शालेय क्रिकेट गाजवायला सुरुवात केली. त्याच वर्षी त्याची त्रिनिदाद युवा संघासाठी निवड झाली आणि पुढच्या वर्षी (वयाच्या १५ व्या वर्षी) तो वेस्टइंडीजच्या १९ वर्षांखालील संघाचा भाग होता. पुढे त्रिनिदाद कडून फर्स्ट क्लास क्रिकेट मधलं पदार्पण देखील गाजलं. आपल्या दुसऱ्याच सामन्यात त्याने बार्बाडोसच्या गोलंदाजांची धुलाई केली होती. बार्बाडोसच्या त्या संघात जोएल गार्नर आणि माल्कम मार्शल होते, ते देखील पूर्ण भरात असलेले. इथेच वेस्टइंडिज क्रिकेटमध्ये लाराचा उदय झाला होता. हा खेळाडू काही विलक्षण आहे याची जाणीव झाली होती. २ वर्षानंतर, म्हणजे १९९० साली त्याने पाकिस्तान विरुद्ध एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुरुवातीला थोडा जम बसल्यानंतर त्याने आपले  दाखवायला सुरुवात केली. आपल्या पाचव्याच कसोटीत, १९९३ मध्ये,  बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध त्याने सिडनीला २७७ धावांची रास रचली. हे त्याचं कसोटी क्रिकेटमधील पहिलं शतक. कदाचित त्याच्या अगदी जवळचं (म्हणूनच त्याने मुलीचं नाव देखील सिडनी ठेवलं.) तो खेळत गेला, धावा करत गेला. डावखुऱ्या फलंदाजांकडे नैसर्गिकच एक नजाकत असते. लाराकडे ती ठासून भरलेली होती. मैदानाच्या चारी दिशांना अप्रतिम फटके मारण्याची त्याची कला फार कमी फलंदाजांना जमली. बटरच्या लादीतून अलगदपणे सूरी फिरवावी इतक्या नजाकतीने तो त्याची बॅट फिरवत असे. अर्थात, त्याच्या बॅटने केलेले घणाघाती घाव देखील गोलंदाजांना कायम लक्षात राहावेत असे असत. 

ब्रायन लारा चांगली १६-१७ वर्षे अप्रतिम क्रिकेट खेळला. वेस्टइंडीज क्रिकेटला वरदान आहे ते गुणवत्तेचं. या बेटांवरून आलेल्या खेळाडूंनी क्रिकेटला भरभरून दिलं आहे. पण त्याचबरोबर इतर काही खेळांच्या प्रभावामुळे हे क्रिकेट हळूहळू संपत चाललं आहे. आता तर टी-२० च्या जमान्यात वेस्टइंडीजचा संघ कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट जणू विसरलाच आहे. त्याच बरोबर वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या देशांमधील आपापसातले वाद, त्यात होणारं राजकारण हा देखील एक एक महत्वाचा भाग. त्यातच कमी मिळणाऱ्या पैशांमुळे खेळाडू इंग्लिश काउंटीला (आणि आता फ्रँचाइज क्रिकेटला) प्राधान्य देत असत. हे पैशांचे निखारे कायमच पेटते असतात, पण या अशा निखाऱ्यातूनच लारासारखे क्रिकेटपटू वर येतात. लारा भरात असताना जागतिक क्रिकेटमध्ये काही महान गोलंदाज होते. अक्रम, वकार, मॅकग्रा, वॉर्न, कुंबळे, डोनाल्ड, पोलॉक, मुरली ही त्यातली काही प्रमुख नावं. लाराने या प्रत्येका विरुद्ध धावा केल्या. १९९९ मध्ये त्याने बार्बाडोसला ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १५३ धावा करताना आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. आजही ती खेळी महान खेळींपैकी एक म्हणून गणली जाते. लाराने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण ३४ शतकं केली आहेत, पैकी १९ वेळा त्याने १५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. हे आकडेच त्याचा फलंदाज म्हणून कसा आणि किती प्रभाव होता हे सांगायला पुरेसे आहेत. १२ एप्रिल २००४ हा दिवस लारासाठी आणि क्रिकेटसाठी देखील खास. याच दिवशी लाराने कसोटी क्रिकेटमध्ये ४०० धावांची खेळी केली होती. जवळपास १३ तास तो मैदानावर उभा होता. सुरुवातीला इंग्लिश गोलंदाजांचे घाव झेलत त्याने आपल्या संघाला एक चांगली धावसंख्या उभारायला मदत केली. ४३ चौकार आणि ४ षटकारांनी नटलेली ती खेळी क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी म्हटली पाहिजे. 

ब्रायन लाराचं कौतुक हे मैदानावरील आकड्यांनी नाही होणार. त्याने क्रिकेट रसिकांना दिलेला आनंद असा आकड्यात नाही मोजता येणार. त्याने क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक संघाविरुद्ध धावा केल्या, प्रत्येक देशात केल्या. तो मैदानावर आहे इथेच क्रिकेट रसिक सुखावत असे. वेस्टइंडीज बेटांवर क्रिकेटच्या मोसमात मैदानावरचा जल्लोष बघण्यासारखा असे. अशावेळी मद्याच्या आणि संगीताच्या तालावर नाचणाऱ्या त्या कॅरेबियन प्रेक्षकांना खरी झिंग चढत असे ती लाराच्या फलंदाजीची. त्याच्या बॅटचा संवाद सुरु झाला की हा प्रेक्षक बेभान होऊन नाचत असे. सोबर्स, लॉइड आणि रिचर्ड्सच्या जमान्यातलं क्रिकेट १९९० च्या दशकात कुठेतरी हरवत चाललं होतं. त्या हरवलेल्या क्रिकेटला परत एकदा मैदानाकडे आणण्याचं काम लाराने केलं. एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटला योग्य तो आदर देत ब्रायन लारा मैदानावर त्याची कामगिरी करत गेला. खंत एकच, त्याच्या समकालीन महान खेळाडूंप्रमाणे (अक्रम, मुरली, सचिन, पॉन्टिंग इ.) विश्वचषकाचा टिळा त्याच्या भाळी नाही लागला. पण प्रेक्षकांनी आणि क्रिकेट रसिकांनी दिलेलं प्रेम त्याच्यासाठी कदाचित जास्तच मोठं असेल. 

ब्रायन चार्ल्स लारा – त्याने वयाची ५४ वर्षे नुकतीच पूर्ण केली आहेत. क्रिकेटच्या या महान फलंदाजाने रसिकांना भरभरून दिलं आहे. लाराची ही कारकीर्द बघताना एवढंच म्हणावसं वाटतं … ‘झाले बहू, होतीलही बहू, परी या सम हा’. 

– कौस्तुभ चाटे           

बिगुल वाजलं 

आयपीएल सारखी स्पर्धा मध्यावर आली असताना दोन देशांच्या क्रिकेट बोर्डांना आता हळूहळू जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे वेध लागले आहेत. ७ जून २०२३ रोजी सुरु होणाऱ्या या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ भिडतील. लंडनमधील ओव्हल मैदानावर होणाऱ्या या सामन्याकडे सर्वच क्रिकेट रसिकांचे लक्ष असेल. याच आठवड्यात दोन्ही देशांनी आपापल्या संघांची घोषणा केली आहे. दोन्ही संघांसाठी हा अंतिम सामना महत्वपूर्ण आहे. २०२१ मध्ये झालेल्या पहिल्या स्पर्धेत न्यूझीलंडने भारताचा पराभव करून ही स्पर्धा जिंकली होती. आयसीसीची ही सगळ्यात नवी स्पर्धा कसोटी क्रिकेटसाठी खरंच महत्वाची आहे. कसोटी क्रिकेटला एकप्रकारे संजीवनी देण्याचं काम या स्पर्धेमुळे होत आहे. ही स्पर्धा नवीन आहे, अजूनही काही गोष्टी वेगळ्या, चांगल्या पद्धतीने करता येतीलही कदाचित, पण कसोटी अजिंक्यपदासाठी सुरु केलेल्या या स्पर्धेमुळे एकूणच कसोटी क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे हे खरे. भारत सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणार आहे. पहिल्या स्पर्धेत न्यूझीलंड कडून पराभूत झाल्यानंतरआपला सामना ऑस्ट्रेलियाशी होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये गेल्या काही वर्षात काही चांगले कसोटी सामने झाले आहेत, त्याचीच पुनरावृत्ती या सामन्यात होते का हे बघणे देखील महत्वाचे असेल. 


काहीच दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाने या अंतिम सामन्यासाठी आपल्या संघाची घोषणा केली. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ चांगला तगडा वाटतो आहे, आणि ते या सामन्यासाठी पूर्ण जोशाने मैदानात उतरतील यात काही वाद नाही. नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील बहुतेक खेळाडू या सामन्यात भाग घेतील. कप्तान कमिन्स या मालिकेत पूर्ण वेळ नेतृत्व करू शकला नव्हता, पण तो या अंतिम सामन्यासाठी उपलब्ध असेल. उप-कप्तान आणि संघातील महत्वाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथच्या कामगिरीकडे देखील सर्वांचे लक्ष असेल. डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबूशेन, ट्रॅव्हिस हेड ही फलंदाजांची फळी कोणत्याही संघाला धडकी भरवणारी आहे. कॅमरून ग्रीन आणि मिशेल मार्श सारखे अष्टपैलू खेळाडू देखील या सामन्यात चांगला खेळ करण्यासाठी उत्सुक असतील. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज कायमच प्रतिस्पर्धी संघासाठी डोकेदुखी ठरतात. या सामन्यात देखील कमिन्स, हेझलवूड, स्टार्क आणि बोलँड सारखे गोलंदाज चांगला खेळ करतील अशी अपेक्षा आहे. जोडीला नॅथन लायन आणि टॉड मर्फी हे फिरकी गोलंदाज आहेतच. आणि अर्थातच अलेक्स केरी सारखा उत्कृष्ट यष्टीरक्षक देखील ऑस्ट्रेलियन संघासाठी उपयुक्त ठरू शकतो. एकूणच विचार करता, हा ऑस्ट्रेलियन संघ अंतिम सामन्यासाठी सज्ज झाल्यासारखा वाटतो आहे. 

पाठोपाठ भारतीय संघाची देखील घोषणा करण्यात आली. आपला संघ देखील ऑस्ट्रेलियन संघाच्या तोडीस तोड आहे हे नक्की. रोहित, विराट, पुजारा, गिल या फलंदाजांकडे सगळ्यांचं लक्ष असेल. निवड समितीने या सामन्यासाठी अजिंक्य रहाणेची निवड करून आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. भारतीय गोलंदाजी देखील समतोल वाटते आहे. शमी, सिराज, उमेश, अश्विन, जडेजा, शार्दूल सारखे गोलंदाज या सामन्यावर प्रभाव टाकू शकतात. काही गोष्टी खटकणाऱ्या आहेत, पण भारतीय संघ चांगला खेळ करू शकेल असा विश्वास वाटतो. या संघात के एल राहूल, भरत आणि अक्षर पटेलची निवड थोडी खटकते आहे. हे चांगले खेळाडू आहेत नक्की, पण या सामन्यापुरते काही वेगळे पर्याय बघायला हरकत नव्हती. के एस भरतच्या ऐवजी रिद्धिमान साहाचा विचार करायला हवा होता. साहाचे भारतीय बोर्डाबरोबर वाजले आहे नक्की, पण ही महत्वाची स्पर्धा आहे, आणि एका सामन्यासाठी सगळ्यांनीच आपले वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवले असते तर… साहा प्रमाणेच राहुलच्या ऐवजी हनुमा विहारीचा विचार करता आला असता का? राहूल गेल्या काही महिन्यांपासून स्वतःच्या फॉर्मशी झगडतो आहे. अशावेळी विहारीसारखा खेळाडू संघात येऊ शकला असता. त्याला इंग्लिश खेळपट्ट्यांचा अनुभव देखील आहे. त्याचबरोबर संघातील अष्टपैलूच्या जागेसाठी हार्दिक पंड्याचा विचार का केला गेला नाही? की हार्दिकने आता फक्त एकदिवसीय आणि टी-२० सामन्यातच खेळायचे ठरवले आहे? आणि ठरवले असले तरी एका महत्वाच्या सामन्यासाठी त्याने हा नियम मोडायला हरकत नव्हती. इंग्लिश खेळपट्टीवर आणि हवामानात त्याच्यासारखा खेळाडू महत्वाचा ठरला असता. तो जर जाणून बुजून या सामन्यापासून दूर जात असेल तर ते नक्कीच योग्य नाही.

आता या स्पर्धेकडे येऊ. सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये होत आहे. यामागे काय कारण आहे माहित नाही, पण अंतिम सामना खेळणाऱ्या दोन देशांपैकी एका देशात हा सामना व्हायला पाहिजे, किंवा जर त्रयस्थ ठिकाणीच खेळवला जाणार असेल तर दुबई, शारजा सारख्या ठिकाणी हा सामना खेळवला गेला पाहिजे. दर वर्षी हा अंतिम सामना इंग्लंडमध्येच खेळवला जावा हे योग्य नाही. कदाचित पुढील स्पर्धेची तयारी करताना आयसीसी या गोष्टीचा विचार नक्की करेल. क्रिकेटच्या वार्षिक कॅलेंडरमध्ये हा अंतिम सामना कधी आणि कसा बसवायचा हे देखील मोठे चॅलेंज असू शकेल. पण कसोटी क्रिकेटची गरज लक्षात घेता, आयसीसीने दर दोन वर्षांनी येणाऱ्या या अंतिम सामन्यासाठी हे चॅलेंज स्वीकारणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अजून एक सूचना करावीशी वाटते ती म्हणजे केवळ एक अंतिम सामना न घेता, ३ सामन्यांची एक मालिका खेळवता आली तर क्रिकेटच्या दृष्टीने ते मोठे पाऊल असेल. 

असो, या वर्षीचा हा अंतिम सामना इंग्लंडमध्ये खेळवला जाईल. इंग्लिश हवामान आणि खेळपट्टी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची जास्त अनुकूल असेल. भारताने ओव्हल मैदानावर चांगले विजय मिळवले आहेत. पण इथे होणार कसोटी सामना मुख्यतः उन्हाळ्याच्या शेवटी खेळवला जातो. त्यावेळी आपण चांगली कामगिरी केली आहे. या वर्षीचा हा सामना जून महिन्याच्या सुरुवातीला असणार आहे, त्यामुळे हवामान आणि खेळपट्टी, या दोन्ही गोष्टी भारतासाठी आव्हान ठरू शकतात. त्यातच आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर लगेचच भारतीय संघाला या सामन्यासाठी प्रयाण करावे लागेल. आयपीएल सारख्या मोठ्या आणि दीर्घकाळ चालणाऱ्या स्पर्धेनंतर लगेचच खेळाच्या वेगळ्या फॉरमॅट मध्ये चांगली कामगिरी करणे हे देखील आव्हान असणार आहे. पण ही लढाई प्रतिष्ठेची आहे. २ वर्षांपूर्वी भारतीय संघाला अंतिम फेरीत न्यूझीलंड कडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता परत ही विजेतेपदाची संधी आपल्यासमोर आली आहे. भारतीय संघासाठी गेली काही वर्षे आयसीसी विजेतेपदापासून दूर आहे. या अंतिम सामन्याच्या निमित्ताने हा दुष्काळ आपण संपवणार का हा महत्वाचा प्रश्न आहे. सलग दुसऱ्यांना या अंतिम सामन्यात खेळण्याचा मान आपल्याला मिळतो आहे. गेल्या काही वर्षात आपण ऑस्ट्रेलियाला आपल्या घरी आणि त्यांच्या देशात देखील चांगली टक्कर दिली आहे, आता त्रयस्थ ठिकाणी, वेगळ्या वातावरणात या मिळालेल्या संधीचे सोने करावे हीच अपेक्षा. 

– कौस्तुभ चाटे             

To know more about Crickatha