ball

कसोटी क्रिकेट म्हणजे काय रे भाऊ? 

by कौस्तुभ चाटे

चला, परत एका स्वप्नाचा चक्काचूर झाला. पुन्हा एकदा आपल्या संघाने निराशा केली. पुन्हा एकदा तो आयसीसी ट्रॉफीचा सन्मान आपल्याला हुलकावणी देऊन गेला. खरं सांगायचं तर याची आता सवयच झाली आहे. गेल्या १० वर्षात आपण एकही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलो नाहीये. गेल्या कसोटी स्पर्धेत न्यूझीलंडने आपल्याला हरवले, तर या वर्षी ऑस्ट्रेलियाने. आता परत २०२५ ची वाट पाहायची. त्यावेळी आपण कशी कामगिरी करू देवच जाणे. अशा संधी परत परत मिळत नाहीत, आणि त्यामुळेच विजेतेपद देखील कायमच दूर असते. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड सारखे संघ ज्या योजना आखतात, त्या शेवटपर्यंत तडीस नेतात आणि विजयाच्या दृष्टीनेच प्रयत्न करतात. आपण यातलं काहीच केलं नाही. अगदी इंग्लंडला जाण्याच्या दिवसापर्यंत आपण आयपीएल खेळत बसलो, आणि त्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा आपण कधी विचारच केला नाही. योजना आखणे, त्याची अंमलबजावणी करणे अशा काही गोष्टी जणू आपल्याला ठाऊकच नाहीत. असो, ही स्पर्धा संपली. आता या यशापशाची कारणे शोधण्याचा प्रयत्न सगळेच करतील. पण गेली अनेक वर्षे भारतीय क्रिकेट बघत असल्याने खात्रीने सांगता येईल की कुठेही काहीही होणार नाही. आपण परत एकदा टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटकडे लक्ष देऊ, आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघांना पाठिंबा देऊ..आणि येणाऱ्या काही वर्षात कसोटी क्रिकेटचा अंत झालेला देखील पाहू. 


मुळात टी-२० किंवा आयपीएल वाईट आहे असे अजिबातच नाही. कदाचित ती काळाची गरज असेल, पण त्या नादाला लागून आपण कसोटी क्रिकेट नावाच्या एका सुंदर खेळाचा विनाश करतो आहोत हे आपल्या का लक्षात येत नाही? टी-२० आणि कसोटी क्रिकेट हे दोन सर्वस्वी वेगळे खेळ आहेत. या दोन्ही खेळांची सांगड घालणे हाच एक मोठा गुन्हा आहे. जर एखाद्याला फक्त आयपीएल खेळायचे असेल तर त्याला तेवढेच खेळू द्या, पण आपण भारत या देशाचे देखील प्रतिनिधित्व करतो आहोत याचे देखील भान ठेवा. आज आपण ठराविक खेळाडू क्रिकेटच्या तीनही फॉरमॅट्स मध्ये अक्षरशः कोलूला जुंपल्यासारखे खेळवतो आहोत. आज या क्रिकेट खेळाडूंची घराणी तयार झाली आहेत. सध्याच्या घडीला स्पॉन्सर्स, वेगवेगळे आयपीएल संघमालक, त्यांना सपोर्ट करणारे इतर व्यावसायिक, राजकारणी, चित्रपट अभिनेते आणि अशी तमाम घराणी भारतातला हा क्रिकेटचा गाडा हाकताहेत. क्रिकेटमध्ये आलेला पैसा (जो कित्येक कोटींच्या घरात आहे) आता खेळापेक्षा कैक पटीने मोठा झाला आहे. या पैशाने आणि अति क्रिकेटने खेळाची जी हानी केली आहे त्याची कुठे गणनाच नाही. कसोटी क्रिकेट हा क्रिकेटचा सर्वोच्च प्रकार आहे, आणि तो शाबूत राहिला तरच क्रिकेट जगेल. कदाचित कसोटी क्रिकेटला मोठं मानणारी माझी शेवटची पिढी असावी. पण यापुढचे दिवस ३ तासांच्या क्रिकेटचेच उरणार आहेत. 

कालच्या या पराभवाची अनेक कारणे सांगता येतील. पण आपल्यासाठी कसोटी क्रिकेटला प्राथमिकता न देणे हेच सर्वात मोठे कारण आहे. सुमारे २ महिन्यांपूर्वी जेंव्हा आपला संघ जाहीर झाला, तेंव्हाच जणू या पराभवाचा पाय रचला गेला होता. त्यावेळी बहुतेक सर्वच खेळाडू आयपीएल मध्ये खेळत होते. २ महिने टी-२० क्रिकेट खेळून लगेचच आपण इंग्लंडला गेलो. एक फॉरमॅट सोडून दुसऱ्या प्रकाराशी जुळवून घेणे सोपे नसते. त्यात आपण आता सराव सामने खेळत नाही. आपण त्या हवामानाशी, खेळपट्टीशी जुळवून घेण्यासाठी काही विशेष प्रयत्न देखील करत नाही. यावेळी देखील आपण हेच केलं. ७ तारखेला आपण कसोटी सामन्यासाठी उभे राहिलो ते केवळ नेट प्रॅक्टिसच्या जोरावर. इंग्लंडला गेलेले १५ खेळाडू देखील या सामन्यासाठी संघ म्हणून योग्य होते का? मी आधीच्या लेखात लिहिल्याप्रमाणे हार्दिक पंड्या आणि रिद्धिमान साहा या दोघांचा विचार केलाच गेला नाही. मी फक्त अमुकच क्रिकेट खेळणार, तमुक क्रिकेटमध्ये भाग घेणार नाही हा माज क्रिकेट रसिक म्हणून आपण तरी का सहन करतो. क्रिकेट बोर्डाला एखाद्या खेळाडूला खेळण्यासाठी सक्ती नाही करता येत? त्या क्रिकेट बोर्डाचं आणि साहाचं असेल भांडण, पण आजच्या घडीला तो देशातील सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे. एका महत्वाच्या सामन्यासाठी, देशासाठी तुम्ही आपापसातील हेवेदावे बाजूला नाही ठेवू शकत? या घडीला सगळ्याच गोष्टी चुकल्या आहेत. आकाशच फाटलंय, तुम्ही ठिगळं लावून काय करणार? 

रोहितने नाणेफेक जिंकली, पण संघात अंतिम ११ खेळाडू कोणत्या आधारावर निवडले? जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज तुमच्या ११ खेळाडूंमध्ये नसतो? ५०-१०० कसोटी खेळल्यानंतरही तुम्हाला खेळपट्टीचे रंग ओळखता येत नाहीत? ऑस्ट्रेलियन संघाला उजेडाचा एक कवडसा जरी दिसला तरी ते संपूर्ण खिडकी उघडून मोकळे होतात. प्रोफेशनलिझम म्हणजे काय हे त्या खेळाडूंकडून शिकावे. व्यावसायिकता अंगी भिनलेले ते खेळाडू संधी मिळताच त्याचं सोनं करणारच होते. त्यांनी पहिल्या डावात केलेल्या धावांचा पाठलाग करताना आपले कागदी वाघ कमीच पडणार होते. इंग्लंडमध्ये चेंडू फिरायला लागला तसे आपले फलंदाज तंबूत परतू लागले. अजिंक्य आणि शार्दुलने थोडाफार प्रतिकार केला नसता तर आपण २०० च्या आधीच बाद होतो. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १७३ धावांची आघाडी घेतली तिथेच आपला पराभव निश्चित होता. या कसोटीत आपण अधून मधून बरा खेळ केला, पण तो तेवढ्यापुरताच. चौथ्या दिवशी विराट आणि अजिंक्यने दुसऱ्या डावात थोडी लाज राखण्याचा प्रयत्न केला, पण पाचव्या दिवशी सकाळीच ऑस्ट्रेलियाच्या कसलेल्या गोलंदाजांनी विजयश्री खेचून आणली. कोणत्याही चांगल्या फलंदाजाने कसोटीमध्ये ३०-५० धावा करून संघ चांगली धावसंख्या नाही उभारू शकत. आपले फलंदाज वेळोवेळी कोलमडले, आणि आपल्या पराभवासाठी तेच महत्वाचे कारण आहे. 

कसोटी संपली. टेस्ट चॅम्पियनशीप गेली, पुढे काय? कसोटी स्पर्धेचा पुढचा सिझन लगेचच सुरु होईल. त्यावेळी अंतिम सामना २०२५ मध्ये असेल. त्याचा विचार करायचा असेल तर कसोटी खेळण्यासाठी इच्छूक नसलेल्या खेळाडूंनी आत्ताच सन्मानाने निवृत्त व्हावं हे उत्तम. कसोटी संघ बांधायला अनेक दिवस जातात. अनेक उत्तमोत्तम खेळाडू रांगेत उभे आहेत. क्रिकेट बोर्डाने आता भविष्याचा विचार करणे आवश्यक आहे. इंज्युरी मॅनेजमेंट हा एक वेगळाच विषय आहे. बोर्डाने त्यासंदर्भात काही ठोस उपाय करणे आवश्यक आहे. आपण कायमच मूर्तिपूजक आहोत. आपण क्रिकेट खेळाडूंची पूजा करत गेलो, पण खेळाला मात्र विसरलो. कुठेतरी क्रिकेट रसिक म्हणून आपणही या पराभवाला जबाबदार आहोत. हे देखील बदलणे आवश्यक आहे का? मुळात आपल्याला आता कसोटी क्रिकेटमध्येच रस आहे का हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. नसेल तर बोर्डाने स्पष्ट करावे, क्रिकेटप्रेमी ऍशेस सारख्या मालिका बघून आपली कसोटी क्रिकेटची तहान भागवतील. आपल्याला जर मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आदी संघांमध्येच रस असेल तर तेच करू, कसोटी क्रिकेट खेळण्याची गरज आहे का? १८८२ साली याच ओव्हल मैदानावर इंग्लिश संघाच्या पराभवानंतर ‘English cricket, resting in peace’ असा लेख प्रसिद्ध झाला होता, आणि त्यानंतर ऍशेस मालिकेचा जन्म झाला. कालच्या पराभवानंतर खचितच म्हणावसं वाटतंय – भारतीय कसोटी क्रिकेटचा देखील अंत झाला आहे, येत्या काही वर्षात त्यावर नक्की शिक्कामोर्तब होईल. 

To know more about Crickatha