ball

नजर जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्याकडे 

by कौस्तुभ चाटे

आयपीएल संपली आणि आता वेध लागले आहेत ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे. ७ जून पासून सुरु होणाऱ्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि भारत एकमेकांशी लढतील. लंडनमधील ओव्हल मैदानावर हा सामना होणार आहे. कसोटी क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी आयसीसीने सुरु केलेल्या या स्पर्धेला कसोटी चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. २०२१ ते २०२३ हा या स्पर्धेचा दुसरा मौसम. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या मोजक्या देशांमध्ये चालणारी ही स्पर्धा सर्वच देशांसाठी महत्वाची आहे. सलग दुसऱ्यांदा भारताने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. मागील स्पर्धेत आपल्याला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या वर्षी त्यांचाच शेजारी, आणि क्रिकेटमधील महत्वाचा संघ – ऑस्ट्रेलियाला आपण भिडणार आहोत. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघात होणाऱ्या लढती, खास करून कसोटी सामने कायमच रंगतात. त्याच पार्श्वभूमीवर हा सामना देखील अतिशय उत्साहाने रंगेल अशीच क्रिकेटप्रेमींची अपेक्षा आहे. 

या संघाचे नेतृत्व पॅट कमिन्स करेल, जोडीला स्टीव्ह स्मिथ उप-कर्णधार म्हणून उभा असेल. फलंदाजीचा विचार करता डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लाबूशेन, उस्मान ख्वाजा, ट्रेव्हिस हेड सारख्या खेळाडूंवर त्यांची भिस्त असेल. स्मिथ, लाबूशेन, ख्वाजा आणि वॉर्नर ही फलंदाजी जगातील कोणत्याही गोलंदाजांसमोर धडकी भरवणारी आहे. हे खेळाडू रंगात आले तर काय कमाल करू शकतात हे सर्वानाच माहित आहे. ऑस्ट्रेलियन संघाची गोलंदाजी देखील (नेहेमीप्रमाणेच) मस्त आहे. कप्तान कमिन्स, मिशेल स्टार्क, जोश हेझलवूड, स्कॉट बोलँड आणि नॅथन लायन हे गोलंदाज संघासाठी आपली छाप सोडायला उत्सुक असतील. जोडीला कॅमरून ग्रीन, मिशेल मार्श सारखे अष्टपैलू आणि अलेक्स कॅरी सारखा उत्तम यष्टीरक्षक देखील आहेच. एकूणच विचार करता हा ऑस्ट्रेलियन संघ नक्कीच बलवान आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे वॉर्नर, मार्श आणि ग्रीन सारखे खेळाडू जरी आयपीएल मध्ये व्यस्त होते तरी इतर खेळाडू गेल्या काही आठवड्यांपासून इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये खेळत आहेत. इंग्लिश वातावरणाचा आणि हवामानाचा त्यांना फायदा झाला तर नवल वाटायला नको.     

भारतीय संघाचा विचार करता अगदी आत्तापर्यंत आपले बहुतेक सर्वच खेळाडू आयपीएल खेळत होते. टी-२० आणि कसोटी क्रिकेट हे दोन्ही फॉरमॅट्स खेळणारे आपले खेळाडू, इंग्लंड मध्ये किती लवकर स्थिरावतात त्यावर आपल्या संघाची कामगिरी अवलंबून असेल. कर्णधार रोहित, विराट, अजिंक्य आणि काउंटी क्रिकेटमध्ये खेळत असलेला चेतेश्वर पुजारा या प्रमुख खेळाडूंवर आपण बऱ्यापैकी अवलंबून असू. त्याचबरोबर शुभमन गिल या सामन्यात कशी कामगिरी करतो याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष असेल. गिलने नुकत्याच संपलेल्या आयपीएल मध्ये तुफान कामगिरी केली आहे. स्पर्धेच्या उत्तरार्धात त्याने केलेल्या तीन शतके त्याचा सध्याचा फॉर्म दर्शवतात. तो हाच फॉर्म घेऊन इंग्लंडला जाईल आणि चमकदार खेळ करेल अशीच अपेक्षा. या सामन्यात कदाचित ईशान किशन भारतासाठी पदार्पण करू शकेल. रिषभ पंतला झालेल्या दुखापतीनंतर भारतीय संघ यष्टिरक्षकाचा शोध घेतोय. श्रीकर भरतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मागच्या मालिकेत भारताचे प्रतिनिधित्व केले असले तरी देखील तो म्हणावी तशी कामगिरी करू शकला नाही. गोलंदाजी विभागात शमी, सिराज यांचे स्थान पक्के असेल. इतर वेगवान गोलंदाजांपैकी शार्दूल ठाकूरची वर्णी लागण्याची शक्यता आहे. अश्विन आणि जडेजापैकी एकालाच खेळावयाचे की दोघांनाही हा प्रश्न महत्वाचा असेल. वैयक्तिक मत विचारात घेता, या सामन्यासाठी (केवळ कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना आहे म्हणून) हार्दिक पंड्या आणि रिद्धिमान सहा यांचा विचार करायला हवा होता. त्या खेळाडूंनी देखील इतर सर्व गोष्टी बाजूला ठेवून या सामन्यासाठी संघाची साथ द्यायला हवी होती. पण क्रिकेटमध्ये जर-तर ला काही अर्थ नसतो. आहे त्या संघात आपल्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करावी अशीच आपली अपेक्षा असेल. 

आपल्या बहुतेक खेळाडूंना या स्पर्धेच्या पहिल्या अंतिम सामन्याचा अनुभव आहेच. तो सामना देखील इंग्लंडमध्येच खेळवला गेला होता. त्या वेलची परिस्थिती, मैदान, प्रतिस्पर्धी संघ वेगळे असले तरी त्या अंतिम सामन्याचा दबाव आणि अनुभव आपल्या खेळाडूंना उपयोगी पडेल. या सामन्यात खास करून रोहित, विराट, पुजारा आणि अजिंक्य सारखे आपले वरिष्ठ खेळाडू कशी कामगिरी करतात ते बघणे महत्वाचे ठरेल. हे चारही खेळाडू आता वयाच्या पस्तिशीच्या आसपास आहेत. कदाचित वर्ष-सहा महिन्यात ते निवृत्त देखील होतील. निवृत्तीच्या आधी ही ट्रॉफी आपल्याकडे असावी यासाठी ते नक्कीच प्रयत्न करतील. तसेही गेल्या १० वर्षात भारताने आयसीसीच्या एकही स्पर्धेत विजेतेपद मिळवलेले नाही. ती एक भळभळणारी जखम आपल्या क्रिकेट रसिकांना नेहमीच त्रास देते. अशावेळी या सामन्यात उत्तम कामगिरी करून विजेतेपद मिळवणे आपल्या खेळाडूंच्या हाती आहे. ऑस्ट्रेलियन संघासाठी देखील हा सामना महत्वाचा आहेच. दोन्ही संघ कसोटी क्रिकेटमध्ये दादा संघ समजले जातात. याच ‘दादागिरी’ वर शिक्कामोर्तब करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. 

दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा असेल, आणि दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील यात काही वाद नाही. या सामन्यात अनेक क्रिकेटपटूंच्या कौशल्यांचा कस लागणार आहे. त्या ५ दिवसात जो संघ चांगली कामगिरी करेल, तो या स्पर्धेची गदा उंचावेल. एकूणच उत्तम खेळ व्हावा (आणि भारताने विजय मिळवावा), हीच अपेक्षा !!

To know more about Crickatha