ball

बिगुल वाजलं 

by कौस्तुभ चाटे

आयपीएल सारखी स्पर्धा मध्यावर आली असताना दोन देशांच्या क्रिकेट बोर्डांना आता हळूहळू जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे वेध लागले आहेत. ७ जून २०२३ रोजी सुरु होणाऱ्या या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ भिडतील. लंडनमधील ओव्हल मैदानावर होणाऱ्या या सामन्याकडे सर्वच क्रिकेट रसिकांचे लक्ष असेल. याच आठवड्यात दोन्ही देशांनी आपापल्या संघांची घोषणा केली आहे. दोन्ही संघांसाठी हा अंतिम सामना महत्वपूर्ण आहे. २०२१ मध्ये झालेल्या पहिल्या स्पर्धेत न्यूझीलंडने भारताचा पराभव करून ही स्पर्धा जिंकली होती. आयसीसीची ही सगळ्यात नवी स्पर्धा कसोटी क्रिकेटसाठी खरंच महत्वाची आहे. कसोटी क्रिकेटला एकप्रकारे संजीवनी देण्याचं काम या स्पर्धेमुळे होत आहे. ही स्पर्धा नवीन आहे, अजूनही काही गोष्टी वेगळ्या, चांगल्या पद्धतीने करता येतीलही कदाचित, पण कसोटी अजिंक्यपदासाठी सुरु केलेल्या या स्पर्धेमुळे एकूणच कसोटी क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे हे खरे. भारत सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणार आहे. पहिल्या स्पर्धेत न्यूझीलंड कडून पराभूत झाल्यानंतरआपला सामना ऑस्ट्रेलियाशी होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये गेल्या काही वर्षात काही चांगले कसोटी सामने झाले आहेत, त्याचीच पुनरावृत्ती या सामन्यात होते का हे बघणे देखील महत्वाचे असेल. 


काहीच दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाने या अंतिम सामन्यासाठी आपल्या संघाची घोषणा केली. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ चांगला तगडा वाटतो आहे, आणि ते या सामन्यासाठी पूर्ण जोशाने मैदानात उतरतील यात काही वाद नाही. नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील बहुतेक खेळाडू या सामन्यात भाग घेतील. कप्तान कमिन्स या मालिकेत पूर्ण वेळ नेतृत्व करू शकला नव्हता, पण तो या अंतिम सामन्यासाठी उपलब्ध असेल. उप-कप्तान आणि संघातील महत्वाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथच्या कामगिरीकडे देखील सर्वांचे लक्ष असेल. डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबूशेन, ट्रॅव्हिस हेड ही फलंदाजांची फळी कोणत्याही संघाला धडकी भरवणारी आहे. कॅमरून ग्रीन आणि मिशेल मार्श सारखे अष्टपैलू खेळाडू देखील या सामन्यात चांगला खेळ करण्यासाठी उत्सुक असतील. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज कायमच प्रतिस्पर्धी संघासाठी डोकेदुखी ठरतात. या सामन्यात देखील कमिन्स, हेझलवूड, स्टार्क आणि बोलँड सारखे गोलंदाज चांगला खेळ करतील अशी अपेक्षा आहे. जोडीला नॅथन लायन आणि टॉड मर्फी हे फिरकी गोलंदाज आहेतच. आणि अर्थातच अलेक्स केरी सारखा उत्कृष्ट यष्टीरक्षक देखील ऑस्ट्रेलियन संघासाठी उपयुक्त ठरू शकतो. एकूणच विचार करता, हा ऑस्ट्रेलियन संघ अंतिम सामन्यासाठी सज्ज झाल्यासारखा वाटतो आहे. 

पाठोपाठ भारतीय संघाची देखील घोषणा करण्यात आली. आपला संघ देखील ऑस्ट्रेलियन संघाच्या तोडीस तोड आहे हे नक्की. रोहित, विराट, पुजारा, गिल या फलंदाजांकडे सगळ्यांचं लक्ष असेल. निवड समितीने या सामन्यासाठी अजिंक्य रहाणेची निवड करून आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. भारतीय गोलंदाजी देखील समतोल वाटते आहे. शमी, सिराज, उमेश, अश्विन, जडेजा, शार्दूल सारखे गोलंदाज या सामन्यावर प्रभाव टाकू शकतात. काही गोष्टी खटकणाऱ्या आहेत, पण भारतीय संघ चांगला खेळ करू शकेल असा विश्वास वाटतो. या संघात के एल राहूल, भरत आणि अक्षर पटेलची निवड थोडी खटकते आहे. हे चांगले खेळाडू आहेत नक्की, पण या सामन्यापुरते काही वेगळे पर्याय बघायला हरकत नव्हती. के एस भरतच्या ऐवजी रिद्धिमान साहाचा विचार करायला हवा होता. साहाचे भारतीय बोर्डाबरोबर वाजले आहे नक्की, पण ही महत्वाची स्पर्धा आहे, आणि एका सामन्यासाठी सगळ्यांनीच आपले वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवले असते तर… साहा प्रमाणेच राहुलच्या ऐवजी हनुमा विहारीचा विचार करता आला असता का? राहूल गेल्या काही महिन्यांपासून स्वतःच्या फॉर्मशी झगडतो आहे. अशावेळी विहारीसारखा खेळाडू संघात येऊ शकला असता. त्याला इंग्लिश खेळपट्ट्यांचा अनुभव देखील आहे. त्याचबरोबर संघातील अष्टपैलूच्या जागेसाठी हार्दिक पंड्याचा विचार का केला गेला नाही? की हार्दिकने आता फक्त एकदिवसीय आणि टी-२० सामन्यातच खेळायचे ठरवले आहे? आणि ठरवले असले तरी एका महत्वाच्या सामन्यासाठी त्याने हा नियम मोडायला हरकत नव्हती. इंग्लिश खेळपट्टीवर आणि हवामानात त्याच्यासारखा खेळाडू महत्वाचा ठरला असता. तो जर जाणून बुजून या सामन्यापासून दूर जात असेल तर ते नक्कीच योग्य नाही.

आता या स्पर्धेकडे येऊ. सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये होत आहे. यामागे काय कारण आहे माहित नाही, पण अंतिम सामना खेळणाऱ्या दोन देशांपैकी एका देशात हा सामना व्हायला पाहिजे, किंवा जर त्रयस्थ ठिकाणीच खेळवला जाणार असेल तर दुबई, शारजा सारख्या ठिकाणी हा सामना खेळवला गेला पाहिजे. दर वर्षी हा अंतिम सामना इंग्लंडमध्येच खेळवला जावा हे योग्य नाही. कदाचित पुढील स्पर्धेची तयारी करताना आयसीसी या गोष्टीचा विचार नक्की करेल. क्रिकेटच्या वार्षिक कॅलेंडरमध्ये हा अंतिम सामना कधी आणि कसा बसवायचा हे देखील मोठे चॅलेंज असू शकेल. पण कसोटी क्रिकेटची गरज लक्षात घेता, आयसीसीने दर दोन वर्षांनी येणाऱ्या या अंतिम सामन्यासाठी हे चॅलेंज स्वीकारणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अजून एक सूचना करावीशी वाटते ती म्हणजे केवळ एक अंतिम सामना न घेता, ३ सामन्यांची एक मालिका खेळवता आली तर क्रिकेटच्या दृष्टीने ते मोठे पाऊल असेल. 

असो, या वर्षीचा हा अंतिम सामना इंग्लंडमध्ये खेळवला जाईल. इंग्लिश हवामान आणि खेळपट्टी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची जास्त अनुकूल असेल. भारताने ओव्हल मैदानावर चांगले विजय मिळवले आहेत. पण इथे होणार कसोटी सामना मुख्यतः उन्हाळ्याच्या शेवटी खेळवला जातो. त्यावेळी आपण चांगली कामगिरी केली आहे. या वर्षीचा हा सामना जून महिन्याच्या सुरुवातीला असणार आहे, त्यामुळे हवामान आणि खेळपट्टी, या दोन्ही गोष्टी भारतासाठी आव्हान ठरू शकतात. त्यातच आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर लगेचच भारतीय संघाला या सामन्यासाठी प्रयाण करावे लागेल. आयपीएल सारख्या मोठ्या आणि दीर्घकाळ चालणाऱ्या स्पर्धेनंतर लगेचच खेळाच्या वेगळ्या फॉरमॅट मध्ये चांगली कामगिरी करणे हे देखील आव्हान असणार आहे. पण ही लढाई प्रतिष्ठेची आहे. २ वर्षांपूर्वी भारतीय संघाला अंतिम फेरीत न्यूझीलंड कडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता परत ही विजेतेपदाची संधी आपल्यासमोर आली आहे. भारतीय संघासाठी गेली काही वर्षे आयसीसी विजेतेपदापासून दूर आहे. या अंतिम सामन्याच्या निमित्ताने हा दुष्काळ आपण संपवणार का हा महत्वाचा प्रश्न आहे. सलग दुसऱ्यांना या अंतिम सामन्यात खेळण्याचा मान आपल्याला मिळतो आहे. गेल्या काही वर्षात आपण ऑस्ट्रेलियाला आपल्या घरी आणि त्यांच्या देशात देखील चांगली टक्कर दिली आहे, आता त्रयस्थ ठिकाणी, वेगळ्या वातावरणात या मिळालेल्या संधीचे सोने करावे हीच अपेक्षा. 

– कौस्तुभ चाटे             

To know more about Crickatha