ball

भविष्यातले सितारे 

by कौस्तुभ चाटे             

इंडियन प्रिमीयर लीग, अर्थात आयपीएल  विश्वातील एक महत्वाची स्पर्धा आहे यात काही वाद नाही. या स्पर्धेचे आणि एकूणच टी-२० क्रिकेटचे चाहते जगभर आहेत. अनेक क्रिकेट प्रेमींना टी-२० हे क्रिकेट वाटत नाही हे खरे असले तरीदेखील टी-२० कडे क्रिकेटचे भविष्य म्हणून बघितले जात आहे. क्रिकेट हा खेळ जगभर न्यायचा असेल, त्याला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवून द्यायचे असेल तर टी-२० ला पर्याय नाही हे देखील खरे आहे. आज जगभर अनेक देशांमध्ये टी-२० क्रिकेट खेळले जाते, आणि याचे मोठे श्रेय आयपीएलला दिलेच पाहिजे. गेली १६ वर्षे आयपीएल अव्याहतपणे सुरु आहे. भारतात निवडणुका असतील, अथवा इतर काही अडचणी असतील तरी देखील आयोजकांनी आयपीएलसाठी विशेष प्रयत्न करून ही स्पर्धा खेळण्याकडे  प्राधान्य दिले आहे. अगदी कोरोना काळात देखील आयपीएल खेळवली गेली आहे. त्यामागे कारणे काहीही असो, पण ही स्पर्धा एकूणच क्रिकेटसाठी  किती महत्वाची आहे हे लक्षात येते. गेली १५-१६ वर्षे या स्पर्धेने अनेक उत्तमोत्तम खेळाडू दिले आहेत. केवळ भारतीयच नाही, तर इतर देशांमधील खेळाडूंना देखील एक उत्तम प्लॅटफॉर्म या स्पर्धेने दिला आहे.  आज भारतीय संघाकडून खेळणारे बहुतेक सर्वच खेळाडू आयपीएल मधून तावून सुलाखून बाहेर पडले आहेत असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, युझवेन्द्र चहल, ईशान किशन ही त्यातील काही प्रमुख उदाहरणे म्हणता येतील. दरवर्षी आयपीएल मधून आपल्याला अशीच काही रत्ने गवसत जातात. 


२०२३ ची आयपीएल स्पर्धा आज संपेल. जवळजवळ दोन महिने चाललेल्या या स्पर्धेत अनेक क्रिकेटपटूंचा कस लागला. अनेक सामने अगदी शेवटच्या षटकापर्यंत – शेवटच्या चेंडूपर्यंत रंगले, फलंदाजी आणि गोलंदाजी मधील एक द्वंद्व बघायला मिळाले. या लेखात यंदाच्या आयपीएलमध्ये प्रभावी कामगिरी केलेल्या काही अनकॅप्ड (आंतरराष्ट्रीय सामने न खेळलेल्या) खेळाडूंबद्दल थोडेसे. 

१. यशस्वी जयस्वाल – यशस्वीची कहाणी एखाद्या बॉलिवूड चित्रपटाप्रमाणे आहे. उत्तरप्रदेशच्या भदोई मधून एक १० वर्षांचा मुलगा मुंबईमध्ये क्रिकेट शिकायला येतो, अगदी चित्रपटातील नायकाप्रमाणे मैदानावर तंबू ठोकून राहतो. प्रसंगी पाणीपुरीच्या गाडीवर काम करतो. क्रिकेटच्या सरावात हळूहळू प्रगती करून एक दिवस ‘यशस्वी’ क्रिकेटर होतो. कदाचित हे जास्तच फिल्मी आहे, पण हे सत्य आहे. यशस्वीने क्रिकेट साठी घेतलेले कष्ट एक उदाहरण आहे. २०२०च्या १९ वर्षांखालील ‘युवा’ विश्वचषक स्पर्धेत त्याने कमाल केली, आणि क्रिकेट रसिकांची नजर त्याच्याकडे वळली. लवकरच त्याने मुंबई संघात देखील स्थान मिळवले. देशांतर्गत स्पर्धेत उत्तम कामगिरी केलेल्या यशस्वीने यावर्षी राजस्थान रॉयल्स कडून आयपीएल खेळताना जगभरातील क्रिकेट रसिकांचे लक्ष  वेधून घेतले. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने १४ सामन्यात ४८ धावांच्या सरासरीने ६२५ धावा केल्या आहेत. यामध्ये ५ अर्धशतके आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध झळकावलेले एक तडाखेबंद शतक आहे. यशस्वीने आपल्या खेळणे क्रिकेट रसिकांसह समीक्षकांनाही आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे. यावर्षीच्या अनेक सामन्यांत यशस्वीने तंत्रशुद्ध फटकेबाजी करत वेळोवेळी आपल्या संघाला चांगली धावसंख्या उभारण्यास हातभार लावला आहे. कदाचित पुढच्या १-२ वर्षात आपल्याला यशस्वी जयस्वाल हे नाव भारतीय संघात दिसले तर आश्चर्य वाटू नये. या मुलाचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे, आणि यंदाच्या आयपीएलने त्यावर जणू शिक्कामोर्तब केले आहे. 

२. रिंकू सिंग – कोलकाता संघाला गुजरात विरुद्ध शेवटच्या षटकात जिंकायला २९ धावांची गरज होती तेंव्हा तो सामना जणू ते हरल्यात जमा होते. पण एका डावखुऱ्या फलंदाजाने त्या षटकात सलग पाच षटकार मारून संघाला अशक्यप्राय विजय मिळवून दिला आणि रिंकू सिंग हे नाव जगभर पसरले. यशस्वी प्रमाणेच रिंकूची गोष्ट देखील प्रेरणादायी आहे. एका मोठ्या कुटुंबात वाढलेला मुलगा, घरात खायची भ्रांत, रिंकूच्या खेळण्याला वडिलांचा विरोध, रिंकूने काहीतरी कामधंदा करून घराला आर्थिक मदत करावी अशी असलेली अपॆक्षा, आईने वडिलांची नजर चुकवून रिंकूच्या खेळण्यासाठी कसेतरी थोडेसे पैसे उभे करणे  अश्या एक ना अनेक अडचणी. पण या वर्षीच्या आयपीएल मध्ये रिंकूने जे कमावले त्याबद्दल त्याच्या पालकांनाही त्याचा अभिमान वाटावा. रिंकूने कोलकाताच्या संघाला अशक्यप्राय विजय मिळवून दिले. गुजरात विरुद्ध त्याने केली तशी कामगिरी त्याने पंजाब विरुद्ध देखील केली.  शेवटच्या साखळी सामन्यात लखनौ विरुद्ध देखील तो शेवटपर्यंत उभा राहिला. कोलकाता तो सामना हरले तरी रिंकूच्या फलंदाजीची वाहवा सगळीकडे झाली. भारताला कदाचित पुढील काही दिवसात एक चांगला ‘फिनिशर’ मिळू शकेल. रिंकू सिंगचे नाव फारसे कोणाला ठाऊक नव्हते, पण यंदाच्या आयपीएल नंतर त्याच्याकडे भविष्यातील सुपरस्टार म्हणून बघितले जात आहे. 

३. तुषार देशपांडे –  २ वर्षांपूर्वी तुषार देशपांडे दिल्लीच्या संघाकडून आयपीएल खेळला तेंव्हा तो तसा साधारण वेगवान गोलंदाज वाटला होता. अर्थात त्याच्या वेगावर आणि एकूणच गोलंदाजीवर प्रश्न निर्माण करण्याचे काहीही कारण नव्हते. पण या वर्षी महेंद्र सिंग धोनी नामक पारख्याची नजर त्याच्यावर पडली आणि ही आयपीएल स्पर्धा त्याच्या कारकिर्दीसाठी एक वेगळीच कलाटणी देणार आहे. धोनीने तुषारची पारख केली, त्याला योग्य संधी दिली आणि आज त्याची फळं चेन्नईचा संघ चाखतो आहे. देशांतर्गत क्रिकेट मुंबईकडून खेळणाऱ्या तुषारने या स्पर्धेत आतापर्यंत १५ सामन्यात २१ बळी मिळवून प्रभावी कामगिरी केली आहे. सुरुवातीचे षटक असो, मधल्या ओव्हर्स अथवा अंतिम षटकांची मारामारी, तुषारने कायमच टिच्चून गोलंदाजी केली. कदाचित त्याला या स्पर्धेत फलंदाजांकडून फटके पडत असतीलही, पण योग्य वेळी बळी मिळवण्याचं त्याचं तंत्र चेन्नई संघासाठी कायमच उपयुक्त ठरलं आहे. आज चेन्नई संघ विजेतेपदाचा मोठा दावेदार आहे, आणि त्यामागे तुषारच्या गोलंदाजीचं मोठं योगदान आहे. गेल्या काही वर्षात भारतीय वेगवान गोलंदाजांनी चांगलं नाव कमावलं आहे, त्याच गोलंदाजांच्या यादीत आता तुषार उभा ठाकला आहे. या वर्षी चेन्नई साठी त्याने सर्वाधिक बळी घेतले आहेत. चेन्नई संघात पूर्वी असलेली ब्रावोची जागा आता काही प्रमाणात, गोलंदाजीत तरी, तुषार कडे आली आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. 

४. सुयश शर्मा – ६ एप्रिल २०२३ रोजी जेव्हा तो ईडन गार्डनवर गोलंदाजी करायला आला तेव्हा तो फारसा कोणाला ठाऊक नव्हता. बंगलोर विरुद्धच्या सामन्यात त्याने ३ बळी घेतले आणि अचानक सर्वांची नजर त्याच्यावर पडली. तो त्याचा पहिलाच सामना होता, आयपीएल मधलाच नाही तरी एकूणच कारकिर्दीतला. अजून त्याचे फर्स्ट क्लास क्रिकेट मध्ये पदार्पण देखील झाले नाहीये, पण सुयश शर्मा हे नाव मात्र क्रिकेट रसिकांमध्ये लोकप्रिय होत आहे हे नक्की. सुयशची ही पहिलीच स्पर्धा, आणि कोलकाता सारख्या संघातून खेळताना एक वेगळीच जबाबदारी असणार, पण २० वर्षांच्या या गोलंदाजाने ही जबाबदारी ओळखून संधीचं सोनं केलं आहे. चेंडूला उत्तम ऊंची (flight) देत सुयश चांगल्या प्रकारे लेगस्पिन गोलंदाजी करतो. या स्पर्धेत त्याने भल्याभल्या फलंदाजांना पाणी पाजलं आहे असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. त्याने बाद केलेल्या फलंदाजांच्या यादीत फाफ डू प्लेसी, रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, दिनेश कार्तिक, टिळक वर्मा सारखे मोठे फलंदाज आहेत. त्याच्याकडे अनुभवाची थोडी कमतरता असली तरी उद्याचा स्टार म्हणून तो नक्कीच पुढे येऊ शकतो. 

कौस्तुभ चाटे             

To know more about Crickatha