मॅचफिक्सिंगच्या काळ्या झाकोळात भारतीय क्रिकेट चाचपडत असतानाच त्याचा उदय कर्णधार म्हणून झाला होता. बुडत्या क्रिकेटची नैया पार करण्यासाठी त्याच्यापेक्षा दुसरा लायक माणूस निदान १९९७-२००० सालांत तरी शोधून सापडला नसता. २२ जून १९९६ ला चक्क लॉर्ड्सवर पदार्पणातच त्यानं केलेलं शतक हा त्याच्या बहुरंगी कारकिर्दीचा श्रीगणेशा होता. तसं त्याआधी सी. के. नायडू ते विनू मंकड, विजय हजारे ते कपिल देव, गावसकर ते वेंगसरकर असं भारताचं क्रिकेट अनेक चांगल्या वाईट स्थित्यंतरांतून गेलं, तरी त्याचा मूळ चेहरा थोडाही बदलला नव्हता. कर्णधार या व्यक्तीला म्हणावं तितकं महत्व नव्हतं. ‘जिंकण्याची सवय’ किंवा ‘विजयाचा भस्म्या’ औषधालाही नव्हता. एकाच वेळी अनेक दिग्गज संघात असतानाही केवळ बोटचेप्या धोरणांमुळं, ‘चलता है’ स्वभावामुळं एक वेळ अशी होती की, सचिन तेंडुलकरनं कर्णधारपद सोडल्यानंतर आता पुढे काय, हा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती. नेमका याच वेळी कंसाच्या काळकोठडीत श्रीकृष्णानं जन्म घ्यावा, तसा सौरव गांगुली क्रिकेटच्या क्षितिजावर एक ठाम नेता म्हणून खडा झाला, आणि जादूची कांडी फिरावी तसं घडलं.
क्रिकेट नाही, पण ते खेळण्याची पद्धत तरी बदलली. संघभावना, समर्पण, ईर्षा हे सगळेच गुणविशेष मैदानावर बघायला मिळू लागले. संघात जुन्याजाणत्यांबरोबर नव्या चेहऱ्यांचाही वावर वाढला. एका संधीसाठी धडपडणाऱ्या सेहवाग, आशिष नेहरा, युवराज सिंग, हरभजनसिंग, झहीर खान आणि अशा अनेकांचे ग्रह चांगल्या अर्थानं फिरले आणि ‘बेभरवशाचा’ अशा शब्दात हिणवला गेलेला भारतीय संघ या ‘दादा’ माणसाच्या नेतृत्त्वात परदेशी संघांसमोर दादा संघ म्हणून उभा राहू लागला. त्याआधी भारतीयांकडून आक्रमकता मोजून मापून वापरली जायची. स्लेजिंग वगैरे दूरचीच बात, पण कुजक्या प्रश्नालाही प्रत्युत्तर दिलं जात नसे. एका महान खेळाडूनं विनाकारण डिवचल्यानंतर प्रत्यक्ष गॅरी सोबर्सला “हे ब्लडी, यू प्ले युअर गेम, आय प्ले माय गेम” असं ठणकावणारा एकनाथ सोलकर एखादाच. या पार्श्वभूमीवर प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूनं कुरापत काढल्यावर ‘अरे’ला गर्वोन्नत मानेनं ‘का रे?’ विचारणारा हा पहिला भारतीय कप्तान सामान्य क्रिकेटरसिकांपासून ते निवड समितीपर्यंत सगळ्यांनाच भावला. ‘वाकड्यात गेलेल्यांना सरळ करायचं, तर सरळ माणसांना आधी वाकड्यात शिरता आलं पाहिजे’ ही त्याची धारणा. मैत्रीसारखंच वैरही त्यानं काटेकोरपणे निभावलं. मुंबईच्या वानखेडेवर भारत-इंग्लंड मालिका ३-३ बरोबरीत सोडवल्यानंतर फ्रेडी फ्लिंटॉफ शर्ट काढून मैदानभर गरागरा फिरला. चारच महिन्यांत या उद्दामपणाची परतफेड म्हणून नॅटवेस्ट मालिका जिंकून क्रिकेटची मक्का समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या गॅलरीत सौरवनंही शर्ट उतरवून हवेत बेफामपणे फिरवला. ‘प्रत्यक्ष लॉर्ड्सवर तू असं करायला नको होतंस’ असं एकानं त्याला छेडलं, तेव्हा फ्लिंटॉफचा संदर्भ देत तो म्हणाला, ‘लॉर्ड्स इंग्लंडची मक्का असेल, तर वानखेडेही भारताची मक्काच आहे’. बऱ्याच वर्षांनंतर या घटनेवर बोलताना सौरवचा सहकारी लक्ष्मण म्हणाला, “It was not just a reaction, it was a statement that we are no less than anyone”.
ऑस्ट्रेलियन आपल्या उद्दामपणासाठी जगभर विख्यात आहेत. एकदा ऑस्ट्रेलियाचे चार खेळाडू बाद होऊन प्रत्यक्ष स्टीव्ह वॉ खेळायला उतरला, तेव्हा आपल्या संघाला प्रोत्साहन देत सौरव ओरडला, “Come on boys, Australian Tail has begun”. आश्चर्य आणि उद्वेगानं स्टीव्हचा आ वासला नसता, तरच नवल. श्रीलंकेच्या रसेल अरनॉल्डलाही एकदा सौरवचा झटका बसलेला होता. झगड्यात उस्ताद असलेला हा माणूस फलंदाजीतले काही थोडे कच्चे दुवे सोडले, तर प्रतिस्पर्ध्याला धोकादायक ठरायचा. शॉर्ट बॉलसमोर कच्चा असलेला सौरव कव्हर ड्राईव्ह आणि स्क्वेअर कटचा राजा होता. “Most dangerous square cuts and most elegant cover drive” असं त्याच्या फटक्यांचं वर्णन केलं जायचं. ऑफ साईडशी असलेल्या त्याच्या या नात्याबद्दल राहुल द्रविड सांगतो, “On the off side, first there is god, then Sourav Ganguly”. फिरकी गोलंदाजीवर पुढे सरसावत बॉल स्वतःच्या टप्प्यात घेऊन मारलेले षटकार, नेत्रदीपक कव्हर ड्राईव्ह, लेग ग्लान्स, स्क्वेअर ड्राईव्ह आणि लेगस्टंप जवळची जागा सोडून पॉइंटवरून मारलेले कट…बस्स बघत राहावं. याच पद्धतीनं त्यानं चक्क ग्लेन मॅकग्रा आणि वसीम अक्रमलाही माती चारली होती. झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना एकदा सलग ३ चेंडू स्टेडियमबाहेर फेकून देऊन त्यानं विक्रम केलाय. १९९९ च्या विश्वचषकात इंग्लंडमध्ये टाँटनला सौरव आणि राहुलनं केलेली ३१८ धावांची भागीदारी भारतीय क्रिकेटच्या शिरपेचातला एक हिरा म्हणून नावाजली जाते. सौरवच्या १८३ वैयक्तिक धावांच्या वादळात श्रीलंकेचं जहाज त्या दिवशी खडकावर आपटून फुटलं होतं.
चांगला फलंदाज चांगला कर्णधार होईलच असं नाही, आणि हे प्रत्यक्ष सचिन तेंडुलकरच्या बाबतीत खरं ठरलं होतं. सौरव मात्र नेतृत्त्वगुण उपजत घेऊन आल्यासारखा नैसर्गिक कप्तान ठरला. २००० ते २००५ अशी उणीपुरी पाच वर्षं तो कर्णधार होता, पण या पाच वर्षांच्या खाणकामात त्यानं एकेक नामी रत्नं शोधून भारतीय क्रिकेटच्या मुकुटात जडवली. आशिष नेहराच्या म्हणण्याप्रमाणं सौरवनं आपली माणसं हेरून ठेवलेली होती. त्याला कसोटी अनिर्णित राखणाऱ्या नव्हे, तर जिंकून देणाऱ्या खेळाडूंची अपेक्षा होती. याच एका धोरणामुळं परदेशातला संघाच्या कामगिरीचा ग्राफ उंच उंच जात राहिला. सेहवागला सलामीला खेळवणं हा सौरवच्या कारकिर्दीतला एक क्रांतिकारी निर्णय होता. हरभजन सिंगला संघात घेण्यासाठी तो अहोरात्र झगडला. दिनेश कार्तिक आणि धोनीमध्ये चुरस असताना “Lets try Dhoni” या त्याच्या वाक्याचा परिणाम पुढची १५ वर्षं दिसला. २००२ साली इंग्लंडमध्ये लॉर्ड्सवर नॅटवेस्ट जिंकल्यानंतर २००३ च्या विश्वचषकातही त्याच्या नेतृत्वात भारताची कामगिरी छानच झालेली होती. आपल्या खेळाडूंच्या पाठीशी ठाम उभं राहताना प्रसंगी त्यानं क्रिकेट मंडळाशी वाकडं घ्यायलाही कमी केलं नाही. त्याच्या कर्णधार असण्यानं काय फरक पडला, त्याचा साधारण अंदाज ब्रायन लाराच्या एक वाक्यातून मिळतो.. “Whatevar be the complex situations, the Indian team under Ganguly has moved to great heights, the fact of the matter is that Ganguly is determined to stay focused”. कुमार संगकारानं त्याला ‘Master at the art of gamesmanship’ असं नावाजलं. कुणाही नव्या खेळाडूचं कौतुक करण्यात कंजुषी करणाऱ्या जेफ्री बॉयकॉटलाही सौरवनं भुरळ घातली होती. तो म्हणतो, ” Two of his special qualities are his intelligence and articulation, which helped him immensely in the world of contemporary cricket.” पुढे प्रशिक्षक म्हणून जॉन राईटची मुदत संपल्यानंतर सौरवच्याच आग्रहामुळं बोलावलेल्या ग्रेग चॅपेलशी त्याचं ग्रेगच्या दुराग्रही स्वभावामुळं बिनसलं आणि त्याला संघाबाहेरचा रस्ताही दाखवण्यात आला. तरीही जिद्दीनं तो परतला. कमबॅकच्या पहिल्याच सामन्यात त्यानं ९८ धावा करून रणशिंग फुंकलं. पुढे ग्रेग चॅपेलवरून छेडलं असता कॅमेऱ्यासमोरच त्यानं उत्तर दिलं, “He will call Dravid, he will call Sachin, but he will not dare to call Ganguly”. अशा शेरदिल हिंंमतीच्या माणसानं कधीकाळी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं, ही भाग्याची गोष्ट. प्रत्यक्ष स्टीव्ह वॉनं त्याला एक प्रशंसेची पावती दिलीय, ती अशी: “Ganguly was the first captain that changed the perception of the way India play cricket. Now there is not much difference between Indian & Australian team!!” त्याच्या काळात त्यानं कुंभाराचं चाक फिरवलं, आणि भारतीय क्रिकेटचं मडकं घडवलं…आजही BCCI चा अध्यक्ष म्हणून तो तेच करतोय. त्याच्यावर टीकाही होतेय. पण तो बधणारा नाही. त्याच्याच शब्दांत बोलायचं तर..”People throw stones at you..It is you who convert them into milestones!” सौरव गांगुली..खरा ‘दादा’ माणूस!!