ball

क्षेत्ररक्षण – एक कला 

८ मार्च १९९२, स्थळ – ब्रिस्बेन क्रिकेट ग्राउंड (गॅबा), ऑस्ट्रेलिया. सामना सुरु होता १९९२ विश्वचषक स्पर्धेतला, दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान. ह्याच सामन्यात ‘तो’ क्षण आला. ग्राऊंडवरील, ऑस्ट्रेलियातील – नव्हे जगभरातील क्रिकेट रसिकांनी ‘जॉन्टी ऱ्होड्स’ नावाचा चमत्कार पाहिला. पॉइंटवर उभ्या असलेल्या जॉन्टीने अप्रतिम फिल्डिंग करत काही सेकंदातच इंझमामचा बळी मिळवला. त्याने मारलेली ती उडी, आणि त्या वेळी केलेलं ते क्षेत्ररक्षण आजही क्रिकेट रसिकांच्या मनात आहे. त्या एका बळीनंतर एकूणच क्रिकेटमधील क्षेत्रक्षणाचे मापदंडच बदलून गेले. त्या विश्वचषकानंतर सर्वच संघांमध्ये फलंदाज आणि गोलंदाजांइतकंच क्षेत्ररक्षकांना देखील खूप महत्व प्राप्त झालं. त्यावेळी एकदिवसीय क्रिकेट जोरात होतं. एकदिवसीय सामन्यात केवळ बळी मिळवणेच नाही, पण धावा वाचवणे देखील महत्वाचं झालं होतं. आणि मग सर्वच संघांकडून उत्तमोत्तम क्षेत्ररक्षक आपल्याला दिसू लागले, खास करून एकदिवसीय क्रिकेटमध्ये. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे संघ ह्या बाबतीत आघाडीवर असत. एकदिवसीय क्रिकेटने जसं फलंदाजी आणि गोलंदाजीची परिमाणं बदलली तशीच क्षेत्ररक्षणाची देखील.

जॉन्टी ऱ्होड्स, हर्स्चेल गिब्स, रिकी पॉन्टिंग, मायकल बेव्हन सारखे खेळाडू आता फक्त फलंदाज किंवा गोलंदाज म्हणून नव्हते, तर त्यांचा समावेश उत्तम क्षेत्ररक्षक म्हणून देखील होऊ लागला. भारताकडूनही युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ जोडीने आपले ‘फिल्डिंग स्टँडर्ड्स’ बदलायला सुरुवात केली. आणि मग पुढे सुरेश रैना, विराट कोहली, रवींद्र जडेजा सारख्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेटमध्ये ही कला अजून पुढे नेली.

पण मग त्या आधी क्रिकेटमध्ये उत्तम क्षेत्ररक्षक नव्हते का? तर असं नाहीये. त्या आधी सुद्धा अनेक उत्तमोत्तम क्षेत्ररक्षक क्रिकेट जगताने पहिले. दक्षिण आफ्रिकेचा कॉलिन ब्लँड हा क्रिकेट जगतातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक समजला जातो. अगदी जॉन्टी ऱ्होड्सच्या देखील आधी त्याचं नाव घेतलं जाईल. तो एक चांगला, उपयुक्त फलंदाज असला तरीदेखील, आजमितीला त्याची गणना जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशीच होते. वेस्टइंडिजचा जो सोलोमन हा असाच एक खेळाडू. किंवा सर गॅरी सोबर्स हे देखील उत्तम क्षेत्ररक्षक म्हणून गणले गेले. एवढंच कशाला आपला एकनाथ सोलकर हा त्याच्या काळातील सर्वोत्तम फिल्डर होता. आपल्या ग्रेट स्पिन बॉलर्सनी (बेदी, वेंकट, प्रसन्ना, चंद्रा) जे काही बळी घेतले, त्यामध्ये सोलकरच्या कॅचेसचा वाटा सिंहाचा होता. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड सारख्या संघांमध्ये देखील कायमच उत्तम क्षेत्ररक्षक असत. पण कदाचित जगाला क्षेत्ररक्षणाची खरी गरज त्या १९९२ च्या सामन्यानंतर उमगली. त्या दशकात आफ्रिकाच नव्हे तर झिम्बाब्वे किंवा श्रीलंकेसारख्या छोट्या संघांमध्ये देखील चांगले क्षेत्ररक्षक होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकेका धावेला महत्व येऊ लागलं होतं. अनेक सामन्यांचे निकाल अतिशय कमी फरकाने लागत असत, आणि त्याचमुळे प्रत्येक धाव वाचवणं महत्वाचं ठरू लागलं. ‘कॅचेस विन मॅचेस’ ही फक्त उक्ती राहिली नाही तर ती मैदानावर प्रत्यक्षात राबवली जाऊ लागली.

२००२-०३ च्या सुमारास टी२० क्रिकेट आलं आणि मग तर क्रिकेटचा खेळ पूर्णच बदलला. अनेक क्रिकेट रसिकांना टी२० क्रिकेट अजिबातच आवडत नाही. जुन्या आणि खऱ्या क्रिकेटची मजात त्यात नाही असाही काहीसा प्रवाद आहे. टी२० हा फलंदाजांचा खेळ झाला आहे हेही मत व्यक्त केलं जातं. तरीदेखील टी२० क्रिकेटमुळे क्षेत्ररक्षणाचा सर्व अंदाज पूर्णपणे बदलून गेला आहे ह्यात काही वाद नाही. आज खेळाडूंची बॅटिंग किंवा बॉलिंग कशीही असेल, पण त्याची फिल्डिंग ही चांगलीच असावी लागते. आयपीएल आणि इतर लीग्समुळे जगभरातले खेळाडू एका संघातून खेळू लागले.. क्रिकेट प्रसाराच्या दृष्टीने ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आज आयपीएलमध्ये खेळत असलेल्या न्यूझीलंडच्या केन विलियम्सनची फिल्डिंग बघून भारताचा राहुल त्रिपाठी दोन धडे गिरवतो, आणि भारताच्या विराट कोहलीचं क्षेत्ररक्षण पाहून श्रीलंकेचा हसरंगा त्याचा कित्ता गिरवण्याचा प्रयत्न करतो. एकूणच क्षेत्ररक्षण ही क्रिकेटच्या दुनियेतली एक क्रांती आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.

क्षेत्ररक्षण म्हणजे फक्त ग्राउंड फिल्डिंग नाही. मैदानावर फलंदाजाने मारलेले फटके अडवणे, त्याला धावा काढण्यापासून परावृत्त करणे जितके महत्वाचे आहे तितकेच महत्वाचे म्हणजे झेल पकडणे आणि धावबाद करणे. आजचे खेळाडू ह्या दोन्ही कलांमध्ये पारंगत आहेत. आज ते मैदानावर येतानाच १०० नाही तर २०० टक्के तयारीने आलेले असतात. आजच्या घडीला कोणताही खेळाडू अगदी मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यातून थेट यष्टी उडवण्याच्या कलेत माहीर असतो. धावबाद – रन आऊट, ही कला खऱ्या अर्थाने विकसीत झाली आहे ती एकदिवसीय आणि त्यांनंतर आलेल्या टी२० क्रिकेटमुळे. आजच्या क्रिकेट कोचिंगमध्ये धावबाद करण्याचे स्पेशल स्किल्स शिकवले जातात, वेगळ्या प्रकारचे फिल्डिंग ड्रिल्स घेतले जातात. आणि अगदी लहान वयातच खेळाडूला उत्तर क्षेत्ररक्षक होण्याच्या दृष्टीने तयार केले जाते. झेल (कॅचेस) पकडणे ही कला देखील अशीच नावारूपाला आली आहे. फलंदाजाच्या जवळचे झेल असो अथवा मैदानावर उंच उडालेले झेल असो, सर्वच प्रकारचे झेल पाहण्याची रंजकता क्रिकेटला जिवंत ठेवते. फलंदाजाच्या जवळचे क्षेत्ररक्षक – स्लीप, सिली पॉईंट, फॉरवर्ड शॉर्ट लेग – आणि त्यांनी घेतलेले झेल हाच एक मोठा चर्चेचा विषय ठरावा. आता प्रत्येक संघात ह्या जागांवर फिल्डिंग करणारे ‘स्किल्ड फिल्डर्स’ असतात. फलंदाजाच्या बॅटवर लागलेला तो चेंडू हवेतच पकडण्याचं हे शास्त्र खरोखरच प्रेक्षणीय आहे. मैदानावर उडालेले अथवा सीमारेषेवर पकडलेले झेल ही अशीच एक वेगळी कॅटेगरी. हे झेल बघण्याची रंजकता भन्नाट आहे. त्याचबरोबर डोळ्याचं पातं लवतं न लवतं, फलंदाजाला यष्टिचीत (स्टंपिंग) करणे हे शास्त्रदेखील प्रसंगी भाव खाऊन जातं. आपला महेंद्रसिंग धोनी म्हणजे ह्या कलेचा जणू राजाच. धोनीने केलेले असे असंख्य यष्टिचीतचे बळी पाहणं हे क्रिकेट रसिकासाठी म्हणजे पंच-पक्वानाने भरलेलं ताट आहे.

एकूणच आजच्या ह्या क्रिकेटच्या जगात फिल्डिंग आणि कॅचेस ह्यांचं महत्व खूपच मोठं आहे. बहुतेक सर्वच संघांना हे महत्व नक्कीच पटलेलं आहे. बहुतेक प्रशिक्षक देखील अगदी लहान वयातच खेळाडूंना चांगले क्षेत्ररक्षक व्हावे म्हणून प्रयत्न करत असतात. जरी पूर्वीच्या काळी देखील काही चांगले क्षेत्ररक्षक होते, तरी क्षेत्ररक्षण ही वेगळी कला मानली गेली नाही. त्यावर संघांचा फारसा भर नसे. पण आता गेल्या काही वर्षात परिस्थिती निश्चितच बदलली आहे. आणि ह्या सर्वाचं श्रेय जातं ते जॉन्टी ऱ्होड्स, त्याचा पाकिस्तान विरुद्धचा तो सामना आणि त्याने धावबाद करून मिळवलेला इंझमामचा तो बळी. जोपर्यंत क्रिकेट आहे, तो पर्यंत त्या उडीची चर्चा होत राहणार, आणि पर्यायाने क्षेत्ररक्षण कलेची देखील.

कौस्तुभ चाटे

सचिन … ५० नॉट आऊट 

सचिन तेंडुलकर आज वयाची पन्नास वर्षे पूर्ण करतो आहे. आज असंख्य क्रिकेट रसिकांसाठी हा खूप मोठा क्षण आहे. जणू आपल्याच घरातील एखाद्याचा वाढदिवस असावा अशा आनंदात, उत्साहात हा वाढदिवस साजरा होतो आहे. खरोखर सचिन हा आपलाच आहे. कोणाला तो आपला सखा वाटतो, कोणासाठी आपला मुलगा असतो, कोणासाठी भाऊ तर कोणासाठी सगळ्यात मोठा आदर्श. सचिन रमेश तेंडुलकर या नावाचं गारुड आपल्या भारतीयांच्या मनावर गेली काही वर्षे कायम आहे, आणि ते उतरावं असंही वाटत नाही. “सचिन … सचिन” या आरोळीत ज्या भावना आहेत, जे प्रेम आहे त्याचं वर्णन करणं अशक्य आहे. ही भावना फक्त समजून घ्यावी लागते. ही आरोळी दिल्यानंतर जे वाटतं त्याचं वर्णन जगातल्या कोणत्याही भाषेत होऊ शकत नाही. मुंबईपासून मेलबर्नपर्यंत आणि डर्बनपासून लंडनपर्यंत, सगळ्याच क्रिकेट मैदानांनी हा अनुभव घेतला आहे. आज ‘आपल्या’ सचिनचा पन्नासावा वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा !! 


सचिन शालेय वयापासूनच क्रिकेटचं मैदान गाजवतो आहे. शालेय क्रिकेटपासून सुरु झालेला त्याचा हा प्रवास आपण सगळ्यांनीच अनुभवला आहे. शारदाश्रम साठी त्याने केलेल्या खेळ्या, आचरेकर सरांनी त्याच्यावर घेतलेली मेहनत, विनोद कांबळी बरोबर झालेली ती अप्रतिम भागीदारी… जणू दंतकथाच. त्यानंतर रणजी, दुलीप आणि इराणी ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यात केलेली शतकं. १९८९ साली पाकिस्तानच्या दौऱ्यावर इम्रान, वासिम आणि वकार समोर कसोटी क्रिकेटमध्ये ठेवलेलं पाऊल, त्याच दौऱ्यात पेशावरला अब्दुल कादिरला मारलेले षटकार… एक ना अनेक गोष्टी. कोणत्याही पिढीतल्या मुलांसाठी मोठं होताना त्यांना एक सुपरहिरो लागतो, मग तो ‘सुपरमॅन’ असेल किंवा ‘स्पायडरमॅन’. आम्हा ९०च्या दशकात मोठ्या झालेल्या मुलांसाठी आमचा सुपरहिरो होता तो म्हणजे सचिन तेंडुलकर. तो मैदानावर उभा आहे हेच आमच्यासाठी खूप होतं. एक-दोन नाही तब्बल २२-२४ वर्षे या माणसाने आमच्यावर राज्य केलं. आणि आम्हीदेखील अतिशय प्रेमाने या राजाला आपलंस केलं. तो आमच्यासाठी मोठा भाऊ होता, मित्र होता, कायमच आदर्श होता. 

सचिनच्या बॅटिंगबद्दल लिहायचं तर रकानेच्या रकाने अपुरे पडतील. सामान्य माणसाला त्याच्या बॅटिंग टेक्निक्स बद्दल फारसं काही बोलता येत नसेल  कदाचित,पण त्याच्या त्या फलंदाजीमुळे वेळोवेळी त्याच सामान्य माणसाला जो आनंद मिळाला आहे त्याचं वर्णन करणे अशक्य आहे. सचिनची बॅटिंग म्हटलं तर कोणाला त्याची १९९१ ची पर्थची खेळी आठवेल, कोणी दक्षिण आफ्रिकेतील शतकाचा फॅन असेल, कोणासाठी शारजातल्या ‘डेझर्ट स्टॉर्म’ महत्वाचं असेल, कोणासाठी १९९९ साली चेन्नईमध्ये पाकिस्तान विरुद्ध केलेलं शतक महत्वाचं असेल, कोणी २००३ च्या विश्वचषकातील त्या झंझावाती ९८ धावांची तारीफ करेल, कोणी २००४च्या सिडनी कसोटीतील त्या संयमी खेळीविषयी बोलेल, कोणासाठी एकदिवसीय सामन्यातील ते द्विशतक जास्त जवळचं असेल तर कोणासाठी आणखी काही. सचिनच्या प्रत्येक खेळीने आम्हा सामान्य क्रिकेट रसिकांना भरभरून आनंद दिला आहे. 
मला वाटतं सचिनचा सगळ्यात मोठा गुण आहे तो म्हणजे त्याचा साधेपणा. विचार करा, वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षांपासून तो एका ‘ग्लॅमर’च्या दुनियेत आहे. तो काय खातो, किती सराव करतो, कुठे जातो याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. या वयात हे ग्लॅमर एखाद्याला मिळत असेल तर भलेभले बिघडतात. पण गेल्या पस्तीस वर्षात हा मनुष्य तसाच आहे. आणि या सगळ्याचं श्रेय जातं ते तेंडुलकर कुटुंबाला. अतिशय सुसंस्कृत परिवारात वाढलेल्या सचिनवर संस्कार पण तसेच झाले. सचिनचे आई-वडील, ज्या काकांकडे राहून तो शिवाजी पार्कला खेळायला गेला ते काका-काकू, दोन भाऊ – नितीन आणि अजित, बहीण सविता… हे कुटुंबच अगदी साधं आहे. आज सचिनने जे कमावलं आहे त्याकडे बघता तेंडुलकर कुटुंबाच्या जागी इतर कोणीही असतं तरी त्याचा किती वेगवेगळ्या प्रकारे फायदा करून घेतला असता याचा नुसता विचार करून बघा. सचिन कीर्तीच्या यशोशिखरावर असताना देखील या कुटुंबातील प्रत्येक सदस्य कायमच जमिनीवर आहे. अजून एका व्यक्तीबद्दल सांगणे आवश्यक आहे ते म्हणजे सचिनची सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्वाची पार्टनर – सौ. अंजली तेंडुलकर. सचिनच्या प्रत्येक सुखदुःखात तिची मोलाची साथ आहे. सचिनची पत्नी म्हणून तिने तिच्या जबाबदाऱ्या सचिन इतक्याच समर्थपणे पेलल्या आहेत. सचिनची दोन्ही मुलं – सारा आणि अर्जुन – त्यांनाही लहान वयातच ग्लॅमर मिळतंय, पण त्या वयात देखील ते ग्लॅमर कसं उत्तम सांभाळायचं हे त्यांना माहित आहे, हेच त्या संपूर्ण कुटुंबाच्या सुसंस्कृतपणाचं उत्तम उदाहरण आहे. बघा ना, परवा मुंबई इंडियन्स साठी अर्जुनने पदार्पण केलं, उत्तम गोलंदाजी करून फलंदाजांना बाद केलं… मनापासून सांगा, आपल्याच घरातला एक मुलगा खेळतोय ही भावना होती ना मनात? 
आपल्याला सचिन इतका भावला यामागे खरं तर काही रॉकेट सायन्स नाही. एका सध्या घरातला, तुमच्या आमच्या सारखा मुलगा क्रिकेट जगतावर राज्य करतो ही भावनाच आपल्यासाठी मोठी होती. ६ वर्षांच्या बंड्यापासून ९० वर्षांच्या आज्जीपर्यंत प्रत्येकालाच तो आपला वाटला. आज बाहेरच्या जगात प्रत्येकासमोर काही ना काही अडचणी आहेत. वैयक्तिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक सगळ्याच समस्यांना तोंड देत आपला समाज कायमच वावरत असतो. अशावेळी या समाजाला एक हिरो हवा असतो. ९०च्या दशकात आपल्या देशाने कात टाकली असे म्हटले जाते. त्यावेळी पेरलेल्या बीजांची फळे आपण आत्ता उपभोगत आहोत, पुढची अनेक वर्षे त्यांचा आनंद घेऊ. त्याच सुमारास उदयाला आलेल्या या सचिनमध्ये आपल्याला एक हिरो सापडला. आपल्या सामान्य घरातला हिरो. आणि या सचिनमध्ये आम्ही आमची स्वप्ने बघितली. सचिन आणि आम्ही हे नातं फक्त मैदानावरचं नाही, ती एक भावना आहे, तो आमचा श्वास आहे. सचिन रमेश तेंडुलकर … बस नामही काफी हैं !! 
Happy Birthday Sachin !! 
– कौस्तुभ चाटे        

दोन ‘अद्वितीय’ खेळी 

सचिन रमेश तेंडुलकर. भारतीय क्रिकेटला पडलेलं स्वप्न. दोन-पाच नाही तर तब्बल २४ वर्षे हा माणूस भारतीय क्रिकेटची धुरा स्वतःच्या खांद्यावर वाहत होता. ज्या देशात क्रिकेट सारख्या खेळाला धर्म मानलं जातं, तिथे सचिनला देवाची उपाधी मिळणारच होती. तो खेळला, लढला, धडपडला, पुन्हा उभा राहिला. तो पुन्हा एकदा लढला, कधी दुखापतींशी, कधी खराब फॉर्मशी तर बहुतेकवेळा ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्टइंडीज सारख्या प्रतिस्पर्ध्यांशी. सचिन आणि भारतीय क्रिकेट रसिक यांचं वेगळं नातं आहे. कदाचित आयपीएलला सर्वस्व मानणाऱ्या या नवीन युगाच्या रसिकांना ते समजणार नाही पण आम्हा ९०च्या दशकात मोठ्या झालेल्यांसाठी सचिन तेंडुलकर हे सर्वस्व होतं. सचिनसाठी आम्ही शाळा, कॉलेज अगदी परीक्षा सुद्धा बुडवल्या आहेत.  उद्या, २४ एप्रिल रोजी सचिन वयाची पन्नास वर्षे पूर्ण करतोय.  सचिन त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण २०० कसोटी सामने, ४६३ एकदिवसीय सामने आणि १ टी-२० सामना खेळला. या एकूण ६६४ सामन्यात तो ७८२ वेळा फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. अर्थातच ही आकडेवारी मोठी प्रचंड आहे. पण सचिनच्या मोठेपणाचे कौतुक या आकडेवारीत नाही तर त्याच्या खेळण्यात आहे. ज्या पद्धतीने तो २३-२४ वर्षे क्रिकेट खेळत असे, आणि ज्या पद्धतीने काहीशे कोटी भारतीयांची जबाबदारी तो खांद्यावर पेलून खेळत असे त्यापुढे ही आकडेवारी नगण्य आहे. सचिनच्या या अनेक खेळींपैकी २ खेळी माझ्या स्वतःच्या अत्यंत जवळच्या आहेत. या लेखात याच दोन खेळींचा केलेला हा उहापोह. 

१. २४१ नाबाद विरुद्ध ऑस्ट्रेलिया
    मैदान – सिडनी क्रिकेट ग्राउंड  
  

कदाचित सचिनची ही कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळी मानता येईल. सचिन आणि सिडनी क्रिकेट ग्राउंड हे समीकरण काही वेगळंच आहे. आपला १९९९-२००० चा दौरा वगळता, प्रत्येक ऑस्ट्रेलिया मालिकेत सचिनने या मैदानावर अप्रतिम कामगिरी केली आहे. ९ इंनिंगमध्ये ४ वेळा नाबाद राहून सचिनने सिडनीच्या मैदानावर तब्बल ७८५ धावांची बरसात केली आहे. २००३-०४ च्या दौऱ्यात सचिनची बॅट त्याच्यावर काहीशी रुसली होती. त्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या. त्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला एक वेगळी भावनिक किनार आहे. आपण अनेक वर्षांनी ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना जिंकलो होतो. ऍडलेडच्या मैदानावर राहुल द्रविड आणि लक्ष्मणने आपल्याला तो ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. आधीच्या ब्रिस्बेनच्या सामन्यात कर्णधार सौरव गांगुलीने एक जोरदार शतक झळकावले होते, तर मेलबर्नच्या तिसऱ्या कसोटीत सेहवागने केलेल्या शतकाची चर्चा होत होती. सर्वच प्रमुख भारतीय फलंदाजांनी या दौऱ्यावर धावा केल्या होत्या, पण सचिनची बॅट मात्र मौन धारण करून होती. गेली अनेक वर्षे बेफाम खेळी करणारे ते शस्त्र त्या दौऱ्यावर मात्र म्यान झाले होते. ‘सचिन संपला’ अशी चर्चा सर्वत्र होत होती. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी सचिनला त्याच्या आवडत्या कव्हर ड्राइव्हचा बळी बनवला होता. ऑफ स्टम्पच्या बाहेरच्या चेंडूवर कव्हर ड्राइव्ह करताना सचिन बाद होत होता. शतकी भागीदारी झाल्यानंतर पुढे भारतीय सलामीचे फलंदाज पाठोपाठ बाद झाले आणि २ बाद १२८ या धावसंख्येवर ‘तो’ मैदानावर उतरला.

त्या दिवशी सचिन त्याच्या स्वाभिमानासाठी लढत होता. हळूहळू त्याने मैदानावर जम बसवायला सुरुवात केली. सचिन त्या खेळीत तब्बल ६१३ मिनिटे मैदानावर होता, त्याने ४३६ चेंडूंचा सामना केला. या दहा तासांच्या मॅरेथॉन खेळीत या कर्मयोग्याने एकही कव्हर ड्राइव्हचा फटका मारला नाही. केवढा तो संयम, काय ती जिद्द !! ज्या फटक्याने सचिन ओळखला जात असे, तो फटका खेळताना चूक होते आहे तर त्या फटक्याकडे दुर्लक्ष करून पुढे मार्गक्रमण करायचे हाच विचार कदाचित त्याच्या मनात असेल. त्याने ऑफ स्टंपच्या बाहेरचे सगळेच चेंडू सोडून द्यायला सुरुवात केली. Test cricket is a game of patience असे म्हटले जाते. त्या दिवशी पेशन्स काय असतो ते या माणसाने दाखवले. त्या खेळीत सचिनने तब्बल ३३ चौकार मारले, पण त्यातील फक्त ३ चौकार ऑफ साईडला होते. आणि त्यातही कव्हर मध्ये मारलेला एकही चौकार नव्हता. ती २४१ ची खेळी क्रिकेट इतिहासात अमर आहे. सचिन किती महान फलंदाज होता हे दर्शवणारी ही खेळी आहे. एखाद्या प्रसंगी, त्या वेळेची गरज ओळखून  तुम्ही तुमची आवडती गोष्ट न करण्यासाठी स्वतःला कसे थांबवता हे दर्शवणारी ती खेळी होती. त्या दौऱ्यावर अगदी सहज बाद होणारा सचिन सिडनीच्या त्या खेळीत बाद झालाच नाही, एवढेच नाही तर दुसऱ्या डावात देखील त्याने नाबाद ६० धावांची एक सुंदर खेळी केली. खरोखर सचिनची ती खेळी म्हणजे क्रिकेटच्या सम्राटाने आपल्या आवडत्या खेळाला पेश केलेला अप्रतिम नजराणा होता.        

२. ९८ विरुद्ध पाकिस्तान  
  मैदान – सेंच्युरियन, दक्षिण आफ्रिका  


सचिन आणि एकदिवसीय सामने ही क्रिकेट रसिकांसाठी मेजवानीच होती. आणि त्यातही विश्वचषकात पाकिस्तानसमोर खेळणारा सचिन काही वेगळाच असायचा. २००३ च्या विश्वचषकात देखील आपल्याला ‘तो’ सचिन बघायला मिळाला. सेंच्युरियन मैदानावर पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान समोरासमोर उभे ठाकले होते. पहिल्यांदा फलंदाजी करताना सईद अन्वरच्या शतकाच्या जोरावर पाकिस्तानने २७३ धावा केल्या होत्या. त्याकाळात ५० षटकात २७४ धावांचा पाठलाग करणे हे खरोखर आव्हान असे. आणि खास करून समोरच्या संघात वासिम अक्रम, वकार युनूस, शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी आणि अब्दुल रझाक सारखे गोलंदाज असतील तर काही बोलायलाच नको. अशावेळी त्या धावांचा पाठलाग सचिनच्या त्या खेळीने अगदी सोपा केला होता. प्रश्न विजयाचा नव्हता, तर अप्रोचचा होता. ज्या पद्धतीने सचिन त्या सामन्याला सामोरा गेला, ते बघता त्या खेळीची दृष्टच काढली पाहिजे. 

नेहमी नॉन-स्ट्रायकर उभा असणाऱ्या सचिनने त्या दिवशी फलंदाजीची सुरुवात केली. पहिल्याच षटकात आक्रमला एक मस्त चौकार मारून त्याने आपले इरादे दाखवून दिले होते. आणि मग दुसऱ्या षटकात जगातला सर्वात वेगवान गोलंदाज – शोएबच्या गोलंदाजीवर मारलेला तो अपर कटचा फटका. क्रिकेट रसिकांच्या २ पिढ्या त्या फटक्यावर अजूनही मरतात. तो षटकार अनेक भारतीयांच्या मनात घर करून आहे. त्या दिवशी सचिनने कोणालाही सोडलं नाही. वासिम, शोएब आणि वकार…जगातले तीन सर्वोत्कृष्ट गोलंदाज या बादशाहला जणू कुर्निसात करत होते. कव्हर ड्राइव्ह, स्ट्रेट ड्राइव्ह, कट्स, लेग साईडला मारलेले फटके… सचिनने मैदानावरील एकही कोपरा शिल्लक ठेवला नव्हता. त्या मैदानाने अशी आतिषबाजी कदाचित पहिल्यांदाच बघितली असेल. भारत-पाकिस्तान सामना म्हणजे जणू विश्वयुद्धच, त्यात हा सेनापती भात्यातल्या सगळ्या फटक्यांनींशी सामोरा गेला, आणि त्या खेळीने ते युद्ध जिंकून आला. ७५ चेंडूत ९८ धावा, त्यात १२ चौकार आणि एक षटकार. सचिनने उभारलेल्या त्या पायावर भारताने विजयाची इमारत सहज बांधली. भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयांपैकी हा विजय अनेक क्रिकेट रसिकांना अधिक जवळचा आहे, त्याचे कारण म्हणजे सचिनची ती खेळी. दुर्दैवाने सचिन आपले शतक पूर्ण करू शकला नाही, पण त्या पायाचे आणि विजयाचे मोल कितीतरी पटींनी अधिक आहे. 

सचिन तेंडुलकरने त्याच्या असंख्य खेळींनी क्रिकेट रसिकांची मने जिंकली आहेत. या २ खेळी म्हणजे त्याच्या प्रातिनिधिक खेळी म्हणता येतील. हा ‘आपला सचिन’ वयाची पन्नाशी पूर्ण करतो आहे, त्याला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!! 

– कौस्तुभ चाटे 

..प्रवास . लिजंड होण्याचा..

रविचंद्रन अश्विन आता लिजंड प्लेअर होईल असे निश्चित वाटत आहे. अहमदाबादची पाटा खेळपट्टी ते आधीच्या भिंगरी आणि सैल मातीच्या विकेटवर फक्त अश्विन एक “पंडीत” गोलंदाज वाटत होता. ऑफ स्पिनर ही जमात नाहीशी होईल असे म्हणणारे प्रकांडपंडित आज गुहेत लपले असतील. मनगटी गोलंदाज राहतील आणि फिंगर स्पिनर जातील असे ही काही जण खाजगीत बोलत असतात.

मुळात अश्विन बुध्दीमान गोलंदाज आहे आणि कसबी कलाकार पण..

आफ्रिकेत कमी चालला एवढे ठळक अपयश सोडले तर ज्युनियर क्रिकेटची सुरुवात बॅटर  म्हणून करताना तो एवढा मोठा स्पिनर होईल असे वाटले नव्हते.

हरभजन कडे “दुसरा ” होता .पण त्याची सवय झाली आणि तो रोजचाच वाटू लागला आणि भज्जीचा डंख गेला.
आश्विन कडे फ्लोटर, कॅरम बॉल,ड्रीफ्टर ,फ्लिपर खूप अस्त्रे आहेत. अर्जुना सारखी …

समोर जडेजा असा आहे की चेंडू वळवत नाही पण टप्पा आणि वेग अचूक अगदी मशीनसारखी गोलंदाजी करतो.सोपे नाहीये…. फिरकी जोडी चालेल असे पीच कोणालाच नको असते. दोन्ही बाजुला चांगले स्पिनर म्हणजे बॅटिंगचे वांधेच..
या दौऱ्यात भरत ऐवजी दुसरा कीपर असता तर अश्विन च्या बॉलिंग ची जादू अजून दिसली असती. या टेस्ट मधली नाथन लिऑन ची विकेट बघा…सुरेख फ्लोट झालाय चेंडू…

आता रोहितला हात जोडून विनंती आहे की जून च्या फायनल मध्ये इंग्लंडला.. अकरा निवडताना फर्स्ट चॉईस अश्विन ठेव.. ना की जडेजा.. तीन फास्ट बॉलर्स खेळणार अकरामध्ये हे नक्की. तिथे उन्ह सुरू होते तो काळ आहे आणि डावखुऱ्या फलंदाजांच्या पायात बेडी घालायचे सामर्थ्य अश्विनमध्येच आहे. आलेक्स कॅरीची या टेस्ट मधली विकेट पहा. आम्ही मुम्बईत खेळताना बेचकी ग्रिप म्हणायचो त्या रिलिज ला. हवेत चेंडु टांगतो तरंगतो अक्षरशः .. असो.

लांब झाली कहाणी.. थांबतो आता..
लेख आवडला तर कळवा..
आपलाच शैलेश..

सावधान आयपीएल विस्तारतंय…

विराट कोहली ने  बॉर्डर – गावस्कर मालिकेतील शेवटच्या कसोटीत 186 धावांची खेळी केली आणि तिकडे वेलींगटन मध्ये केन विल्यम्सन ने पाठोपाठ शतके ठोकून भारत- ऑस्ट्रेलिया WTC फायनल वर शिक्कामोर्तब केल्यानंतर सगळ्या क्रिकेट प्रेमींचा फोकस भारतात खेळवल्या गेलेल्या पहिल्यावहिल्या WPL कडे वळल्या आणि अपेक्षेप्रमाणे BCCI चा हा जुगार ही अगदी सुपरहिट ठरला… सुरुवातीपासून सुसाट सुटलेली मुंबई इंडियन्स शेवटच्या काही सामन्यात धक्के खात RCB आणि UPW ला काही दिवसांसाठी आशेचा किरण दाखवून अखेर अंतिम सामन्यात MI विजयी झालीच आणि WPL जिंकणारी पहिली कर्णधार म्हणून हरमनप्रीत कौर ची इतिहासात नोंद झाली.. पहिले विजेते कायम लक्षात राहतात..हा सगळा खेळ 26 मार्च 2023 ला संपला आणि पुन्हा लक्ष IPL च्या सोळाव्या हंगामा कडे वळलं..या वेळच्या हंगामात काही आमूलाग्र बदल झालेत त्याचा थोडा आढावा घेऊया..
१. टॉस नंतर प्लेइंग 11
यंदा पहिल्यांदाच अस होणार आहे की कर्णधाराने टॉस जिंकल्यानंतर आपल्या प्लेइंग 11 त्याला ठरवता येणार आहे.. टॉस होईपर्यंत कर्णधाराला खेळपट्टी, दव आणि प्रतिस्पर्धी संघाची संघरचना याचा अंदाज आल्यावर प्लेइंग 11 घोषित करताना कदाचित यातून टॉस चं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केल्याचं जाणवतंय अन्यथा भारतात अनेक असे स्टेडियम आहेत जिथे टॉस जिंकला की मॅच 70-75% जिंकल्यात जमा असते…
२. इम्पॅक्ट प्लेयर: आयपीएल च्या इतिहासात पहिल्यांदाच हा प्रयोग होणार आहे जिथे टॉस च्या वेळेला कर्णधाराला प्लेइंग 11 बरोबरच 5 इम्पॅक्ट प्लेयर सुचवायचे आहेत.. या पाच प्लेयर पैकी एक खेळाडू मॅच च्या कुठल्याही क्षणी प्लेइंग 11 मधील खेळाडूला बदली म्हणून खेळवला जाऊ शकतो.. उदा. एखादा खेळाडू फक्त बॉलिंग च्या कामाचा आहे तर त्याची 4 ओव्हर बॉलिंग झाल्यावर त्याच्या बदली एक पूर्ण बॅटर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळवला जाऊ शकतो..
३. वाईड साठी तिसऱ्या अंपायर चा रिव्ह्यू आतापर्यंत एलबीडब्ल्यू, कॅच, यासाठी प्रामुख्याने डी आर एस खेळाडूंकडून वापरला जायचा आता मात्र या हंगामापासून मैदानावरील अंपायर दिलेला वाईड बॉल ही तिसऱ्या अंपायर कडे रिव्ह्यू साठी पाठवला जाऊ शकतो पण, असे करताना एकूण रिव्ह्यू ची संख्या प्रति इनिंग 2 इतकीच ठेवली आहे… मोक्याच्या क्षणी हा रिव्ह्यू मॅच ची उत्कंठा वाढवणार आहे…
४. टीव्ही आणि डिजिटल ब्रॉडकास्टर वेगवेगळे: गेले पाच वर्षे टीव्ही तसेच डिजिटल प्रसारणाचे हक्क स्टार इंडिया आणि डिस्ने प्लस हॉटस्टार कडे होते मात्र 2023- 27 च्या कालावधी साठी आता ते वेगवेगळ्या स्टार (टीव्ही) आणि जिओ सिनेमा (डिजिटल) कंपन्यांकडे गेल्यामुळे त्या कंपन्यांमध्ये शीतयुद्ध सुरू झालंय.. स्टार ने कोहली ला टीव्ही वरच आयपीएल पाहणे किती सुखद आहे हे पटवण्यासाठी उतरवलंय तर तिकडे जिओ सिनेमा ने धोनी आणि सचिन ला मैदानात डिजिटल प्रचारासाठी उतरवलंय…
५. प्रादेशिक भाषेतील समालोचन: साधारण 2007-08 च्या सुमारास निम्बस भारताच्या आंतरराष्ट्रीय सामान्यांसाठी पूर्ण वेळ हिंदी (फक्त भारतासाठी)आणि इंग्रजी (जागतिक) असे समालोचन सुरू केल्यापासून त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून तीच परंपरा पुढे स्टार ने सुरू ठेवली हळू हळू ती कानडी, तमिळ, तेलगू आणि बांगला भाषेपर्यंत वाढवली पण हे करत असताना त्यांना टीव्ही चॅनेल्स वाढवावे लागले आणि परिणामी मुख्य चॅनेल चा टीआरपी कमी झाला…आता स्टार आणि जिओ हे टीव्ही आणि डिजिटल वेगवेगळे प्रसारण झाल्यामुळे प्रादेशिक प्रक्षेपण साठी जिओ ने तगडी फौज उतरवली आहे..पारंपरिक दक्षिण भारतीय तमीळ, तेलगू, कानडी, बांगला याला जोड पंजाबी, मराठी आणि भोजपुरी ची दिली आहे कारणाने प्रादेशिक भाषेतील प्रक्षेपण चा विस्तार झाला आहे…मराठीत पूर्वी भावे, कुणाल, दाते, विनोद कांबळी तर भोजपुरीत रवी किशन सुरुवातीच्या काही सामन्यात अतिशय धुमाकूळ घालत आहेत…सुपला शॉट, वावरच्या बाहेर, या शब्दांची समाज माध्यमांमध्ये हवा आहे…
पण म्हणतात ना सोळावं वरीस धोक्याचं रं सोळावं वरीस धोक्याचं…तसेच काही धोके या आयपीएल च्या विस्तारमध्ये देखील आहेत…
१. वाढती सामन्यांची संख्या:
10 संघ असूनही या हंगामात एकूण सामन्यांची संख्या BCCI ने कशीतरी करून 74 वर ठेवली आहे 2024 पासून एकूण सामन्यांची सांख्य 94 हो हो 94 पर्यंत जाणार आहे…म्हणजे किमान दोन ते अडीच महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट ला सुट्टी. आधीच ICC चे FTP भरगच्च असताना IPL साठी दोन अडीच महिने कुठून काढायचे हा यक्ष प्रश्न आहे आणि ICC चे एकूण उत्पन्न च्या 80 % उत्पन्न भारत आणि परिणामी BCCI कडून जात असल्याने तो दोन अडीच महिन्याचा कालावधी काढवाच लागणार आहे अन्यथा ICC नावाची व्यवस्था कोलमडेल..
२. खेळाडूंच्या दुखापती: आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामात दुखापत ग्रस्त असणारे खेळाडू आयपीएल ला बरोबर तंदुरुस्त होतात आणि आयपीएल मध्ये दुखापत होऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट ला मुकतात त्याला एकमेव कारण पैसा.. क्रिकेट बोर्डाच्या कॉन्ट्रॅक्ट प्राप्त खेळाडूंपेक्षा कित्येक पटीने जास्त पैसा आयपीएल च्या कॉन्ट्रॅक्ट मधून मिळत असल्याने खेळाडू अपसूक आयपीएल कडे वळतात आणि राष्ट्रीय कर्तव्याला मुकतात..
३. सार्वत्रिक निवडणूकांशी ताळमेळ: 2024 हे भारतात सार्वत्रिक निवडणुकीचे वर्ष आहे.. कितीही झालं तरी आयपीएल मार्च च्या आधी सुरू होऊ शकत नाही आणि जून च्या आधी संपू शकत नाही…प्रस्तावित सार्वत्रिक निवडणुका या देखील एप्रिल मे मध्येच आहेत अश्या वेळी व्यवस्था आणि नियोजन यावरील ताण हे तारेवरची कसरत BCCI आणि भारत सरकार या दोघांसाठी असणार आहे..याआधी 2009 च्या निवडणुकीवेळी दक्षिण आफ्रिका 2014 साली संयुक्त अरब अमिराती मध्ये आयपीएल खेळवली गेली होती. 2019 साली मात्र ती भारतातच झाली…

एकूणच आयपीएल विस्तारतंय आणि यौवनाच्या उंबरठ्यावर आहे…

आयपीएलचा ‘इम्पॅक्ट’ 


इंडियन प्रीमियर लीग….. आयपीएल आता सोळा वर्षांची झाली आहे. आयपीएल हा आता एक मोठा ब्रँड झाला आहे. आयपीएल नंतर जगभर अनेक लीग्स सुरु झाल्या, आणि क्रिकेटचा एकूणच चेहरा मोहरा बदलून गेला हे नाकारून चालणार नाही. खेळाच्या या सर्वात नवीन फॉरमॅट – टी-२० मुळे क्रिकेट बऱ्यापैकी बदललं आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बरेचदा कसोटी क्रिकेट ‘बोरिंग’ होत होतं, निकाल लागत नव्हते, सामने अनिर्णित राहत असत हे सगळं बदललं. अजूनही आयसीसी स्पर्धांमधले तसेच दोन देशांमधील खेळाचे नियम तसेच ठेवण्यात आयसीसी यशस्वी ठरली आहे. पण या वेगवेगळ्या लीग्समध्ये खेळाचे मूलभूत नियम सारखे असले तरीदेखील, इतर अनेक नियम बदलले जातात. ते नियम त्या त्या लीगपुरते मर्यादित असले तरीदेखील आयपीएल सारख्या मोठ्या स्पर्धांचे नियम हेच प्रमाण मानणे सहज शक्य आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर ‘स्ट्रॅटेजिक टाइम आऊट’ चे देता येईल. हा स्ट्रॅटेजिक टाइम आऊट काही वर्षांपूर्वी आयपीएल मध्ये पहिल्यांदा सुरु केला गेला, आणि आता तो या स्पर्धेचा महत्वाचा भाग झाला आहे. या टाइम आऊटचा प्रत्यक्ष संघाना किती फायदा होतो माहित नाही पण खेळाशी निगडित इतर अनेक जाहिरातदारांना याचा नक्कीच फायदा होतो. असा हा टाइम आऊट आयसीसी विश्वचषकात नसतो, त्यामुळे त्याच्या उपयुक्ततेवर नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण होते. असो, मुळात एखाद्या स्पर्धेसाठी काही नियम बदलले जातात आणि त्याचा मोठा ‘इम्पॅक्ट’ या स्पर्धेवर होतो. 

या ‘इम्पॅक्ट’ नेच या वर्षीची आयपीएल व्यापून टाकली आहे. ‘इम्पॅक्ट प्लेअर’ हा नियम या वर्षी आयपीएल मध्ये सुरु करण्यात आला आहे. साधारणतः क्रिकेटच्या संघात ११ खेळाडू असतात. या वर्षीपासून सामन्यासाठी संघ निवडताना कप्तानाला ११ ऐवजी १५ खेळाडूंची यादी द्यायची आहे. मैदानावर असलेल्या ११ व्यतिरिक्त इतर खेळाडूंमध्येच हा ‘इम्पॅक्ट प्लेअर’ असेल. सामन्यातील कोणत्याही प्रसंगी संघ मैदानावर असलेल्या ११ मधील एका खेळाडूला बसवून या इम्पॅक्ट प्लेअरला खेळण्याची संधी देऊ शकते. हा इम्पॅक्ट प्लेअर राखीव खेळाडू नसेल, तर संघातील इतर खेळाडूंप्रमाणेच तो बॅटिंग अथवा बॉलिंग देखील करू शकेल. एखाद्या खेळाडूचे स्पेशल स्किल्स (फलंदाजी अथवा गोलंदाजी मधील) वापरण्याची संधी या निमित्ताने संघाला आणि कर्णधाराला मिळेल. उदाहरणार्थ स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करत असताना अंबाती रायुडूला संघात स्थान दिले, पण गोलंदाजी करण्याची वेळ आल्यानंतर त्याला बाहेर बसवून वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेला संधी दिली. म्हणजेच चेन्नईच्या संघात गोलंदाजीच्या वेळी एक गोलंदाज वाढला ज्याचा त्या संघाला उपयोग होऊ शकतो. अर्थात कोणत्याही प्रसंगी मैदानावर केवळ ११ खेळाडू असतील हे नक्की आहे. 


हा नियम काही अंशी बिग बॅश लीग मध्ये देखील वापरला गेला. आधी म्हटल्याप्रमाणे, जरी हा नियम त्या त्या स्पर्धेपुरता असला तरीदेखील अशा मोठ्या स्पर्धांमुळे असा नियम क्रिकेटचा भाग बनून जातो. अर्थात हा नियम आयसीसीला तसा नवीन नाही. काही वर्षांपूर्वी (२००५-०६ च्या सुमारास) आयसीसीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ‘सुपर सब’ हा नियम आणला होता. तो काही अंशी असाच होता. पण हा नियम फारसा चालला नाही, आणि पुढे एक दोन वर्षातच आयसीसीला तो मागे घ्यावा लागला. आता हा नियम कोणाच्या लक्षात असेल का याबद्दलही शंका आहे. एका अर्थाने या ‘इम्पॅक्ट प्लेअर’ मुळे क्रिकेट देखील बऱ्यापैकी बदलणार आहे. आता कर्णधारांना ११ ऐवजी १५-१६ खेळाडूंसाठी स्ट्रॅटेजी बनवावी लागेल. प्रतिस्पर्धी संघातील कोणता खेळाडू ‘इम्पॅक्ट प्लेअर’ होऊ शकतो याचा विचार करून संघ उभारणी करावी लागेल. क्रिकेट हा आता बऱ्यापैकी मैदानाबाहेर खेळला जातो. प्रत्येक संघात असलेले विविध प्रकारचे कोच, सल्लागार, मेंटॉर या सर्वांमुळे क्रिकेट बऱ्यापैकी बदलत गेलं आहे. हा नियम कितपत योग्य आहे हे येणारा काळच सांगेल. 

या वर्षांपासून सुरु झालेला असाच आणखी एक नियम म्हणजे संघांची घोषणा. पूर्वी टॉसच्या आधी दोन्ही कप्तान आपल्या संघाची घोषणा करीत असत. या वर्षीपासून हा नियम देखील बदलण्यात आला आहे. आता संघाची घोषणा टॉस नंतर केली जाते. याचाच अर्थ टॉसच्या वेळी कप्तान दोन वेगवेगळ्या संघांचे कागद (टीम शीट्स) घेऊन टॉसला जातो. प्रथम फलंदाजी आल्यास एक संघ आणि प्रथम गोलंदाजी आल्यास दुसरा संघ अशी संघनिवड केली जाते. अर्थात दोन्ही संघात एखादाच खेळाडू बदललेला असतो, पण कप्तानाला टॉसच्या वेळी या सगळ्याचा विचार करावा लागतो हे नक्की आहे. इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमाप्रमाणेच हा नियम देखील कितपत बरोबर आहे हे येणारा काळच ठरवेल.   


टी-२० हा हाणामारीचा फॉरमॅट आहे. या क्रिकेटमध्ये क्रिकेट स्किल्स पेक्षा इतर गोष्टी जास्त महत्वाच्या ठरतात. हे क्रिकेट आणि त्याचे नियम एकप्रकारे गोलंदाजांच्या मुळावर घात घालणारे आहे. याचे फायदे किती, तोटे किती हा वेगळा विषय, पण एकूणच फलंदाजांना धार्जिणे असलेल्या या फॉरमॅट मध्ये खेळलं जाणारं क्रिकेट अनेक रसिकांना न आवडणारं आहे. अर्थात हा फॉरमॅट क्रिकेटचं भविष्य आहे हे देखील नाकारून चालणार नाही. आयपीएल सारख्या स्पर्धेत खेळाचा वेगळा विचार करायला लावणारे हे दोन्ही नियम महत्वाचे ठरतात. 

आयपीएलच्या निमित्ताने अजून एका गोष्टीबद्दल बोलावसं वाटतं. आयपीएलमध्ये जाहिरातदार येणार, पैसे लावणार आणि त्याचा खेळाला उपयोग होणार हे निश्चित आहे. हे असे पैसे मिळवूनच लीग मोठी होणार आहे या बद्दलही दुमत नाही. पण खास करून या वर्षी टीव्हीवर दिसणाऱ्या जाहिरातींविषयी बोलावसं वाटलं. आयपीएल सामन्यांच्या वेळी दाखवल्या जाणाऱ्या बहुसंख्य जाहिराती या ऑनलाईन खेळांच्या तरी आहेत अथवा पण मसाल्यांच्या तरी. आयपीएल हा ‘फॅमिली फॉरमॅट’ असेल तर या अशा जाहिरातींचा विचार व्हायला हवा का? घरातील लहान थोरांपासून सगळेच हा सामना टीव्हीवर बघणार असतील – त्यांनी बघावे असे वाटत असेल तर त्या जाहिरातींचा घरातील प्रत्येकावर काय परिणाम होतो आहे हे कोण तपासायचे? की प्रत्येकाने आपल्यापुरते योग्य काय, आणि आपली सीमारेषा कोणती आहे ते ठरवून मगच क्रिकेटचा आनंद घ्यावा? पैशांपुढे, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, पण चुकीच्या गोष्टींचे कुटुंबावर, आणि पर्यायाने समाजावर परिणाम होणार आहेत हे देखील नक्की. 
एकूणच २०२३ च्या आयपीएलचा मोठा ‘इम्पॅक्ट’ दिसणार आहे यात काही नवल नाही. 

–  कौस्तुभ चाटे       

कसोटी पाहणारी एकदिवसीय मालिका (दैनिक ऐक्य)

एकदिवसीय मालिका संपली. तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने आपल्याला २-१ अशा फरकाने हरवलं. मालिका हरल्याचं वाईट नाही वाटत पण ज्या पद्धतीने आपण शेवटचे दोन्ही सामने हरलो त्याचं नक्कीच वाईट वाटतंय. एकदिवसीय विश्वचषक काही महिन्यांवर आला आहे. अशावेळी आपल्याला जे काही सामने खेळायला मिळणार आहेत, त्यातील प्रत्येक सामना महत्वाचा आहे. आपण कितीही म्हणत असलो तरीदेखील आपली या विश्वचषकासाठी तयारी झालेली दिसत नाही. येणार विश्वचषक आपल्याच देशात खेळवला जाणार आहे, अशावेळी चांगली कामगिरी होणे अपरिहार्य आहे. भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेत, घरच्या मैदानावर कशी कामगिरी करतो याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष असेल. ही झालेली मालिका बघता भारतीय संघाला अजून मोठा टप्पा गाठायचा आहे असेच म्हणावे लागेल. 

दुसऱ्या सामन्यात तर आपल्या संघाची अवस्था अधिकच वाईट होती. मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीपुढे आपल्या फलंदाजांनी अक्षरशः लोटांगण घातलं. स्टार्कच्या पहिल्या षटकापासून आपली जी पडझड सुरु झाली त्यामधून आपला संघ सावरलाच नाही. खरं तर या संघात रोहित शर्माचं पुनरागमन झालं होतं, पण तो देखील अपयशी ठरला. एक विराटने ३१ धावा आणि अक्षर पटेलच्या २९ धावा सोडल्या तर बाकी फलंदाजांनी केवळ आपली हजेरी लावली. या सामन्यात आपण केवळ २६ षटके फलंदाजी केली. खरं म्हणजे हा आपल्या संघाने केलेला मोठा गुन्हा म्हटलं पाहिजे. आपण जर एकदिवसीय सामन्यात ५० षटके फलंदाजी करू शकणार नसलो तर आजच्या जमान्यात हा गुन्हाच आहे. बरं विशाखापट्टणमचं हे मैदान तसं फलंदाजीला अनुकूल आहे. या मैदानावर अनेकदा भारतीय फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. पण मिशेल स्टार्कच्या माऱ्यासमोर आपण तलवार म्यान केली. खेळपट्टीवर एकही फलंदाज तग धरून उभा राहिला नाही. या खेळपट्टीवर धावा होत्या हे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी सिद्ध केलं. ११८ धावांचं लक्ष्य काही मोठं नव्हतं, पण ट्रॅव्हिस हेड आणि मिशेल मार्श या सलामीच्या फलंदाजांनी केवळ ११ षटकात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. दोघांनीही कडक फलंदाजी केली आणि आपली आपली अर्धशतके झळकावली. एकही भारतीय गोलंदाजाला आपला प्रभाव टाकता आला नाही. ज्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज (स्टार्क, अबॉट आणि एलिस) १० बळी घेतात, स्टार्क अप्रतिम गोलंदाजीने ५ भारतीय फलंदाजांना बाद करतो, तिथे भारतीय गोलंदाज विकेट घेण्यासाठी झगडत होते. ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचे शिल्पकार ठरले स्टार्क, हेड आणि मार्श. 

तिसरा आणि शेवटचा सामना चेन्नई मध्ये खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना चांगल्या २६९ धावा केल्या. कप्तान स्टीव्ह स्मिथ सोडल्यास सगळ्याच खेळाडूंनी या धावसंख्येत आपला खारीचा वाटा उचलला. एकही फलंदाज अर्धशतक गाठू शकला नाही तरी स्मिथ वगळता इतर दहाही फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. भारताकडून सिराज आणि अक्षरने प्रत्येकी दोन तर हार्दिक आणि कुलदीपने तीन बळी घेतले. खास करून कुलदीप यादवने चांगली गोलंदाजी केली. तसे पाहता आज २७० धावांचा पाठलाग करणे फारसे अवघड नाही, पण भारतीय फलंदाजी गरज असताना  ढेपाळली. रोहित आणि गीलने सुरुवात चांगली केली होती, पाठोपाठ आलेला विराट देखील मैदानावर उभा होता, पण तिघांपैकी एकाने शेवटपर्यंत उभे राहणे आवश्यक होते. या सामन्यात तेच घडले नाही. हे तिघे आणि राहुल, हार्दिकच्या बॅटमधून धावा तर निघाल्या पण पेशन्स ठेवून, खेळपट्टीवर उभे राहत संघाला विजयी मार्गावर नेने आवश्यक होते, ती जबाबदारी कोणी घेतली नाही. अखेरीस २१ धावांनी ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आणि मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. 

ऑस्ट्रेलियाचा विचार करता त्यांचा कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या बॅटमधून धावा निघाल्या नसल्या तरी खास करून या मालिकेत त्याच्या नेतृत्वाखाली संघाने चांगली कामगिरी केली. स्टार्क, मार्श आणि इतर खेळाडू देखील या मालिकेत चमकले. स्टार्कने विशाखापट्टणमला गेलेली गोलंदाजी भेदक होती. डावखुरे गोलंदाज आपल्यासाठी कायमच डोकेदुखी ठरले आहेत, स्टार्कने देखील निराश केले नाही. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत एक कणखर निर्णय घेतला. डेव्हिड वॉर्नरला पहिल्या दोन सामन्यात वगळले होते, आणि तिसऱ्या सामन्यात त्याला सलामीला न पाठवता मधल्या फळीत फलंदाजीला पाठवले. हे असे निर्णय घेणे अवघड असते, पण हा वेगळा विचार होणेदेखील आवश्यक असते. भारतीय संघात हा विचार झालाच नाही. ईशान किशन सारखा तडाखेबंद यष्टीरक्षक-फलंदाज संघात असताना, आपण के एल राहुलकडेच ही दुहेरी जबाबदारी सोपवतो आहोत. राहुलच्या फलंदाजीबद्दल निश्चितच शंका नाहीये, पण त्याचा फॉर्म अजूनही त्याला साथ देत नाहीये. वास्तविक ईशान-शुभमन हे दोघेही सलामीची जोडी म्हणून जास्त चांगली कामगिरी करू शकतील, पण संघ व्यवस्थापनाने त्यांच्यावर जबाबदारी टाकणे, विश्वास ठेवणे आवश्यक आहे. रोहित आणि विराटचे वय आता जाणवू लागले आहे, खास करून रोहितचे. कदाचित २०२३ हे वर्ष दोघांच्या करियरसाठी सगळ्यात जास्त महत्वाचे असेल. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सूर्यकुमार यादवने या मालिकेतील अपयश. तो तीनही सामन्यात पहिल्या चेंडूवर बाद झाला. प्रश्न अपयशाचा नाहीये, हे अपयश अनेकांनी अनुभवले आहे. या अपयशातून तो स्वतः आणि भारतीय संघ किती लवकर शहाणे होतात हे पाहणे महत्वाचे आहे. सूर्याच्या फलंदाजी क्षमतेबद्दल शंका नक्कीच नाही, पण या घडलेल्या ‘अपघाताचा’ विचार त्यानेच करणे आवश्यक आहे. या अनुभवातून तो योग्य गोष्टी लवकर शिकेल अशी आशा करूया. 

एकूणच ही मालिका आपलीच कसोटी पाहणारी ठरली. आता पुढे ३-४ महिने आपण एकदिवसीय सामने खेळणार नाही आहोत. आता सगळं फोकस आयपीएल आणि नंतर सुरु होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपवर असेल. विश्वचषक स्पर्धा जिंकायची असेल तर वेगळा विचार करणे आवश्यक आहे. घोडामैदान दूर नाहीये, गरज आहे ते योग्य पावले उचलण्याची. 

– कौस्तुभ चाटे            

अचूक आणि भेदक – जेम्स अँडरसन (दैनिक केसरी) 

त्याने खेळायला सुरुवात केली तेव्हा स्टीव्ह वॉ च्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ विश्वचषक विजेता होता, लगोलग त्यांनी परत एकदा – सलग दुसऱ्यांदा, विश्वचषक जिंकला. त्याने खेळायला सुरुवात केली तेव्हा टी-२० क्रिकेट हा शब्द देखील क्रिकेटच्या शब्दकोशात नव्हता. त्याने खेळायला सुरुवात केली तेव्हा जॉर्ज डब्ल्यू बुश अमेरिकेचे अध्यक्ष होते, टोनी ब्लेअर ब्रिटनचे पंतप्रधान होते आणि अटल बिहारी वाजपेयी भारताचे, आणि दोनच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती, तेव्हा मायकल शूमाकर फेरारी कडून फॉर्मुला वन च्या स्पर्धेत भाग घेत होता, रॉजर फेडररने पहिल्यांदाच विम्बल्डन चॅम्पियनशीप जिंकली होती, लान्स आर्मस्ट्राँग आणि टायगर वूड्स अजूनही त्यांच्या त्यांच्या खेळात अग्रणी होते. इतकंच काय संपूर्ण जगात ३G ची नुकतीच सुरुवात झाली होती. आयफोन आणि अँड्रॉइड हे शब्द देखील लोकांना माहित नव्हते… आज या सगळ्याच गोष्टी खूप जुन्या वाटतात. पण २०-२१ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलेला ‘तो’ मात्र चिरतरुण आहे. वयाच्या चाळिशीतही नवोदित गोलंदाजाला लाजवणारा जेम्स मायकल अँडरसन आधुनिक क्रिकेटमधला एक मोठा चमत्कारच म्हटला पाहिजे. 


अँडरसनने २००३ मध्ये इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, आणि एक वर्ष आधी तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये आला होता. इंग्लिश क्रिकेटने दर्जेदार खेळाडू दिले आहेत, पण गोलंदाजांच्या यादीत कायमच जेम्स अँडरसन हे नाव प्रथम स्थानावर असेल. एका वेगवान गोलंदाजासाठी २०-२२ वर्षे उच्च दर्जाचं क्रिकेट खेळणं, सर्वात जास्त बळी घेण्याच्या यादीत असणं आणि अनेक वर्षे वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर आपली सर्वोत्तम कामगिरी करत राहणं नक्कीच सोपं नाही. जेम्स अँडरसन म्हणजे स्विंग गोलंदाजीचा बाद्शाहच म्हटला पाहिजे. इंग्लिश वातावरणात, इंग्लडमधील गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवर त्याची गोलंदाजी अधिकच बहरत गेली. अचूकता आणि सुसंगतता या दोन गुणांमुळे अँडरसनची गोलंदाजी अधिकच भेदक वाटत गेली. अर्थात त्यामागे त्याचे कष्टही आहेतच. एका वेगवान गोलंदाजासाठी परिपूर्ण शरीरयष्टी आणि उत्तम बॉलिंग एक्शन असलेला अँडरसन त्याच्या सायंकाळी फलंदाजांची कायमच डोकेदुखी होता. तो खेळत असतानाच तेंडुलकर, द्रविड, इंझमाम, पॉन्टिंग, लारा, अमला सारखे उत्तमोत्तम फलंदाज बहरात होते, पण इंग्लिश परिस्थितीत अँडरसन कायमच त्यांच्यावर कुरघोडी करताना दिसत असे. त्या २२ यार्डांच्या खेळपट्टीवर अँडरसनची गोलंदाजी खेळणे, त्याच्या गोलंदाजीवर धावा करणे हे कोणत्याही फलंदाजासाठी नक्कीच एक आव्हान होते. 

लँकेशायर काउंटी कडून क्रिकेट खेळणारा अँडरसन २००२-०३ च्या सुमारास इंग्लंड संघात दाखल झाला. त्याच सुमारास इंग्लंडमध्ये टी-२० चे वारे वाहू लागले होते. प्रेक्षकांना एकदिवसीय क्रिकेट आता अळणी वाटू लागलं होतं, त्यात कसोटी क्रिकेटची देखील वाताहत व्हायला सुरुवात झाली होती. इंग्लिश संघ देखील एका वेगळ्या संक्रमणातून जात होता. अशा वेळी अँडरसनने इंग्लिश गोलंदाजीवर आपला प्रभाव टाकायला सुरुवात केली. प्रामुख्याने स्टुअर्ट ब्रॉडला हाताशी धरून तो इंग्लिश संघाला पुढे घेऊन जात होता. २००३ साली कसोटी सामन्यात पदार्पण करतानाच त्याने ५ बळी घेतले होते. त्याच वर्षी त्याने पाकिस्तान विरुद्ध एकदिवसीय क्रिकेट मध्ये हॅट्ट्रिक देखील घेतली. त्याच वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत अँडरसन प्रभावी ठरला. एकूणच त्या वर्षात जेम्स अँडरसन नावाचं वादळ क्रिकेटच्या मैदानावर घोंघावू लागलं होतं. त्याने इंग्लंडमध्ये तर चांगली कामगिरी केलीच पण परदेशात, खास करून दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे आणि काही प्रमाणात भारतीय उपखंडात देखील त्याचा मारा अचूक होता. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या वेगवान गोलंदाजीला प्रोत्साहन देणाऱ्या परिस्थितीत तो उत्तम कामगिरी न करतो तेच नवल. जगातील सर्व प्रमुख क्रिकेट संघांविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये ५० बळी घेणारा तो पहिला वेगवान गोलंदाज आहे, मला वाटतं ही एकच गोष्ट त्याच्या वेगवान आणि स्विंग गोलंदाजीची व्याख्या करण्यासाठी पुरेशी आहे. 

जेम्स अँडरसन हे रसायनच थोडं वेगळं आहे. इंग्लिश क्रिकेटर्स आणि त्यांचे वाद, प्रॉब्लेम्स या विषयावर खरं तर प्रबंध लिहू शकतो. पण इतकी वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असूनही जेम्स अँडरसन कधी फारशा वादात अडकलेला दिसला नाही. आपण बरं आणि आपलं काम बरं या विचारात खेळणारा अँडरसन नेहेमीच त्याच्या गोलंदाजीने बोलून दाखवायचा. आजही तो तसाच आहे. इंग्लिश संघ खास करून कसोटी क्रिकेटमध्ये नवनवीन ऊंची गाठत आहे त्यामागे जेम्स अँडरसनची गोलंदाजी हे एक प्रमुख कारण आहे हे नक्की. इंग्लिश क्रिकेटर्स साठी प्राणप्रिय असलेल्या ऍशेस मालिकांमध्ये देखील त्याने नेहेमीच चांगला खेळ केला आहे. शांतपणे गोलंदाजी करून डावात ५ किंवा अधिक बळी मिळवणारा अँडरसनच्या चेहऱ्यावरचं हास्य बरंच काही सांगून जातं. जेम्स अँडरसन त्याच्या पिढीचा एक सर्वश्रेष्ठ गोलंदाज आहे हे नक्की. हे अचूकता आणि भेदकता यांचं मिश्रण क्रिकेटला बरंच काही देऊन गेलं आहे. 

– कौस्तुभ चाटे  

केन ‘सुपर कूल’ विलियम्सन (दैनिक ऐक्य)

गोष्ट आहे २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकाची. अंतिम सामन्यात त्याचा संघ खेळत होता. तो संघाचा कर्णधार होता. त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. सामन्याच्या शेवटी त्यांची आणि इंग्लिश संघाची धावसंख्या समान झाली होती. मग सुपर ओव्हर खेळवली गेली. तिथे देखील दोन्ही संघ समसमान होते. शेवटी ज्या संघाने जास्त चौकार मारले त्या संघाला विजेते म्हणून घोषित केलं गेलं. सगळं क्रिकेट जग हळहळलं. पण तो शांत होता. पुढे दोन वर्षांनी त्याच्याच नेतृत्वाखाली त्याचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळत होता. त्या सामन्यात त्यांनी भारतीय संघावर सहज विजय मिळवला. गेल्या जवळजवळ २५-२७ वर्षांमध्ये त्याच्या संघाने पहिल्यांदाच आयसीसीची स्पर्धा जिंकली होती. पण तरीही तो शांत होता. दोन्ही प्रसंगात संपूर्ण क्रिकेट जगताने त्याचा संयम बघितला, तो होता न्यूझीलंडचा कप्तान केन विलियम्सन. खऱ्या अर्थाने सध्याच्या क्रिकेट मधला ‘ सुपर कूल’ केन विलियम्सन. 


न्यूझीलंड क्रिकेटला तसं पाहता ग्लॅमर नाही. पण हा किवी संघ वेळोवेळी (खास करून आयसीसी स्पर्धांमध्ये) उत्तम कामगिरी करून क्रिकेट जगतावर आपली छाप सोडत असतो. या संघाने नेहेमीच काही खास स्टार्स दिले आहेत. आणि याच स्टार्स मधलं एक महत्वाचं नाव म्हणजे केन विलियम्सन. केन विलियम्सन म्हणजे खऱ्या अर्थाने क्रिकेटचा कर्मयोगी म्हटला पाहिजे. मैदानावर अतिशय शांत असलेला हा केन, हातात बॅट आली की पूर्णपणे बदलतो. संघासाठी खेळणं, आपलं योग्य प्रकारे योगदान देणं एवढंच माहित असलेला केन संघासाठी सर्वस्व देत असतो. संघाची परिस्थिती गंभीर असो किंवा विजय अगदी समोर दृष्टीपथात असो, केन इथे देखील कर्मयोग्याच्या अविर्भावात आपली जबाबदारी पार पाडतो. वयाच्या १६-१७ व्या वर्षीपासून त्याने चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळायला सुरुवात केली. न्यूझीलंडच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ‘नॉर्थन डिस्ट्रिक्टस’ संघाकडून पदार्पण केलेल्या केन विलियम्सनने १७ व्या वर्षीच न्यूझीलंडच्या १९ वर्षाखालील संघाचं कर्णधारपद भूषवलं होतं. त्या वयात देखील त्याचे नेतृत्वगुण दिसू लागले होते. उत्तम फलंदाज बनण्याच्या शाळेत तर त्याने आधीच नाव नोंदणी केली होती, पण किवी संघाचं कर्णधारपद देखील त्याला खुणावत होतं. २०१० साली भारताविरुद्ध अहमदाबादला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करतानाच त्याने शतक झळकावलं होतं. बहुतेक संघांविरुद्ध तो अप्रतिमच खेळला आहे, पण खास करून ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारताविरुद्ध त्याचा खेळ जास्त खुलत गेला. एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट मध्ये देखील त्याने वेळोवेळी त्याची चुणूक दाखवली. अगदी आयपीएल मध्ये सनरायझर्स हैदराबाद साठी खेळताना सुद्धा तो त्वेषाने खेळला. कधी सलामीच्या फलंदाजांना साथीला घेऊन तर कधी तळाच्या फलंदाजांबरोबर खेळत तो कायमच संघाला पुढे नेत गेला. मैदानाबाहेर अगदी मित्रासारखा वागणारा केन, मैदानावर मात्र एकदम ‘प्रोफेशनल’ असतो. स्वतःच्या फलंदाजीवर फोकस व्हावा म्हणून कर्णधारपद सोडणारा केन निराळाच. 


केन विलियम्सनचा सर्वात मोठा गुण म्हणजे त्याचा शांतपणा. हा मनुष्य मैदानावर कमालीचा शांत असतो. २०१९ च्या विश्वचषकात अंतिम फेरीत त्याच्या संघाबरोबर जे घडलं ते खरं तर कोणत्याही कर्णधाराला वेदना देणारं होतं. पण त्या परिस्थितीत तो शांत होता. त्या पराभवाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर उचलून तो पुढे खेळत राहीला. पुन्हा नव्याने शून्यातून प्रवास सुरु करणारे खूप कमी असतात. या ‘कमी’ लोकांमधलाच तो आहे. पराभव असो अथवा विजय, तो कायमच एक मस्त स्माईलने त्या गोष्टीचा आनंद घेतो. म्हणूनच तो २०१९ विश्वचषकातील पराभवाने खचला नाही, आणि पहिलीच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकल्यानंतर हुरळून गेला नाही. त्याच्या नेतृत्वाखाली किवी संघाने अनेक विजय बघितले. त्याच्या फलंदाजीचा आनंद घेत अनेक क्रिकेट रसिक सुखावत गेले, पण बर्फासारखा हा ‘कॅप्टन कूल’ कायम तसाच होता. इंग्लिश काउंटी क्रिकेट असेल किंवा आयपीएल, तिथेही तो कायमच १००% योगदान देताना दिसतो. २०१५ च्या विश्वचषकात तो ‘प्लेयर ऑफ द सिरीज’ होता. त्या विश्वचषक स्पर्धेत, शेवटच्या सामन्यातला पराभव सोडला तर किवी संघाने कमाल केली होती, आणि त्यात प्रमुख वाटा होता विलियम्सनच्या १० सामन्यात केलेल्या ५७८ धावांचा. 

क्रिकेट जगतात अजातशत्रू असलेले खूप कमी खेळाडू असतील. केन विलियम्सन हे त्यातील एक प्रमुख नाव. केनचे चाहते जगभर पसरले आहेत, आणि खास करून भारतात. त्याचा संयत चेहरा, शांत डोळे, चेहऱ्यावर कायमच असलेलं ते स्माईल आणि सतत विचार करत असणारा तो मेंदू… क्रिकेट रसिकांसाठी केन विलियम्सन म्हणजे एक आदर्श खेळाडू आहे नक्की. हाच केन वेळोवेळी त्याच्यामधल्या माणुसकीचं देखील दर्शन घडवतो. ख्राईस्टचर्च मध्ये झालेला गोळीबार असो, किंवा पेशावर मधील शाळेत लहान मुलांवर झालेला गोळीबार, तो कायमच त्या पीडित व्यक्तींसाठी पुढे आला आहे. पेशावर मधल्या त्या पीडितांसाठी तर त्याने पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेची संपूर्ण मॅच फी दान केली होती. 

न्यूझीलंडला क्रिकेटचा मोठा इतिहास आहे. त्यांचे अनेक खेळाडू आता खऱ्या अर्थाने ‘प्रोफेशनल’ आहेत असे म्हणता येईल. अगदी आत्ता आत्ता पर्यंत असंख्य किवी खेळाडू क्रिकेट सोडून इतर वेळात नौकरी करताना दिसत होतेच. कदाचित आता पुढे ते चित्र बदललं असेल. त्या अर्थाने हे खेळाडू ‘प्रोफेशनल क्रिकेटर्स’ असू शकतील. पण किवी क्रिकेटच्या इतिहासात ज्या काही प्रमुख खेळाडूंचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल त्यात एक प्रमुख नाव असेल ते विलियम्सनचं. न्यूझीलंडचा संघ कायम एक सज्जन संघ म्हणून ओळखला गेला आहे. आणि तीच ओळख पुढे नेणारा केन विलियम्सन क्रिकेट इतिहासात नेहेमीच लक्षात राहील तो सुपर कूल विलियम्सन म्हणूनच. शांत आणि सज्जन खेळाडू म्हणून केन विलियम्सन हे क्रिकेटमधील मूर्तिमंत उदाहरण आहे, आणि ते कायम राहील यात काही शंका नाही. 

– कौस्तुभ चाटे 

विकेटमुळे चर्चेत राहिलेली मालिका (दैनिक केसरी)

अहमदाबाद कसोटी अनिर्णित राहिली. दोन्ही संघातील खेळाडूंनी फलंदाजीचा सर्व करून घेतला. पहिल्या तीन कसोटींमध्ये त्यांना संधीच मिळाली नव्हती, त्याची परतफेड त्यांनी या कसोटीत केली. पाहुण्यांकडून उस्मान ख्वाजा आणि कॅमरून ग्रीनची शतकं आणि भारतातर्फे शुभमन गील आणि विराट कोहली. त्याच जोडीला  भारताच्या पहिल्या डावात अक्षर पटेलचं आणि ऑस्ट्रेलियासाठी दुसऱ्या डावात ट्रेव्हिस हेड आणि मार्नस लाबूशेनची अर्धशतकं महत्वाची ठरली. ऑस्ट्रेलियाचा हा दौरा सुरु झाल्यापासूनच विकेट्सची एवढी चर्चा सुरु होती की विचारात सोया नाही. पहिल्या तीनही कसोटींमध्ये खेळपट्टी म्हणजे मातीचा आखाडा होता. अगदी पहिल्या दिवसापासून चेंडू वळण्याची पूर्ण सोय केली गेली होती. इंदोरच्या तिसऱ्या कसोटीमध्ये तर खासच. पण तीच खेळपट्टी आपल्यावर उलटली, आणि कांगारूंनी आपल्याच खेळीमध्ये आपल्याला हरवल्यानंतर मात्र शेवटच्या अहमदाबाद कसोटीसाठी वेगळीच खेळपट्टी तयार केली गेली. अर्थात तोपर्यंत आपण ही बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खिशात घातली होती. भरीस भर म्हणून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात जवळजवळ प्रवेश केला होताच. आता एक धक्का, आणि आपण अंतिम फेरीत एवढंच बाकी होतं. त्यामुळे या कसोटीसाठी ‘आखाड्याला’ सूट दिली गेली आणि दोन्ही संघातील फलंदाजांनी धावा केल्या. 


आपला WTC अंतिम फेरीतील प्रवेश न्यूझीलंड-श्रीलंका सामन्यावर अवलंबून होता. श्रीलंकेने न्यूझीलंडला २-० असे हरवले असते तरच आपण अंतिम फेरीत पोहोचू शकलो नसतो. श्रीलंकेने न्यूझीलंडला २-० हरवणे ही गोष्ट काही सोपी नव्हती. अर्थात पहिल्या सामन्यात त्यांनी प्रयत्न नक्की केले, पण किवी संघाने त्यांना दाद दिली नाही. न्यूझीलंडने ख्राईस्टचर्च मध्ये लंकेचा पराभव केला आणि इकडे भारताचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित झाला. आता सलग दुसऱ्यांदा भारतीय संघ WTCच्या अंतिम सामन्यात खेळेल. त्या सामन्याला अजून वेळ आहे, पण आत्ता संपलेल्या या भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचा उहापोह करणे तर आवश्यक आहे ना.    

भारताने गेल्या काही वर्षात ऑस्ट्रेलियन संघावर कसोटी क्रिकेटमध्ये नक्कीच वर्चस्व गाजवलं आहे. पण ज्या पद्धतीने आपण ही मालिका जिंकण्याचा अट्टहास केला तो आवश्यक होता का? नागपूर, दिल्ली आणि इंदोर तिन्ही कसोटी फक्त अडीच-तीन दिवसात संपल्या. मान्य आहे की आपल्याला घरी खेळण्याचा फायदा नक्की मिळाला पाहिजे होता, पण इतकाही नाही की कसोटी सामना चौथ्या दिवसाच्या आधीच संपावा? बरं, हा ऑस्ट्रेलियाचा संघ आजवर भारताच्या दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघातील सर्वात कमकुवत संघ होता. तरीदेखील आपल्या क्रिकेट बोर्डाला अशा खेळपट्ट्या बनवायची गरज भासली. या विकेट्सवर अश्विन-जडेजाने कमाल केली. दोघेही ठरवून ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद करत होते. तिकडे ऑस्ट्रेलियाकडे देखील नॅथन लायन सारखा विख्यात गोलंदाज होताच. त्याने देखील या मालिकेवर आपली छाप सोडली. जोडीला नवीन आलेले मर्फी आणि कुहनमन यांनी देखील वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. नाही म्हणायला अधून मधून फलंदाजांनी वेगवान गोलंदाजांना काही विकेट्स दिल्या (त्यांना अगदीच एकटं वाटू नये म्हणून असेल कदाचित.) पहिल्या तीनही कसोटी आणि अहमदाबादची कसोटी यामध्ये जमीन अस्मानाचा फरक होता. इंदोरमध्ये कांगारूंनी वेगवान गोलंदाजाच्या ऐवजी चक्क स्पिनर खेळवला. ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासात हे असं कधी झालं नसेल. बराच काळ – शेन वॉर्न खेळत असताना तो स्पिन गोलंदाजीचा तंबू एकहाती लढवत असे. पुढेही कांगारूंनी हीच परंपरा कायम ठेवली होती. इंदोरच्या सामन्यात तर तीन फिरकी गोलंदाज खेळलेच, पण पुढे अहमदाबाद मध्ये देखील त्यांनी तोच कित्ता गिरवला. आता यापुढे परत कधी ऑस्ट्रेलियन संघ तीन फिरकी गोलंदाज खेळावेत का हे बघणे देखील महत्वाचे असेल. 


अहमदाबाद कसोटीत २ ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी केलेली कामगिरी खरोखरच कमाल होती. उस्मान ख्वाजा ज्या सहजतेने खेळत होता, त्याचे फटके, त्याचा पेशन्स सगळंच बघण्यासारखं होतं. कॅमरून ग्रीनचं शतक देखील बघण्यासारखं होतं. क्रिकेटच्या तीनही प्रकारात चमकण्याची कुवत त्याच्याकडे आहे. कांगारूंनी दोन दिवस सहजपणे फलंदाजी केल्यानंतर भारतीय फलंदाज त्या खेळपट्टीवर कोलमडले असते तर नवल होतं. या सामन्यात एक वेगळा विराट दिसला. सामन्याच्या आधी तो सचिनची २००४ ची सिडनीची खेळी बघून आला होता का असा प्रश्न पडावा. अतिशय संयमाने त्याने त्याची खेळी उभारली. कोणताही विचित्र फटका न मारता तो एक एक धाव जोडत गेला. त्याला उत्तम साथ दिली ती शुभमन गीलने. त्याची खेळी देखील निर्दोष होती. विराट-रोहित नंतर भारतीय फलंदाजीची धुरा वाहण्यासाठी गील तयार होत आहे का हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. अक्षर पटेल या मालिकेत गोलंदाज म्हणून न चमकता फलंदाज म्हणून चमकला. महत्वाच्या क्षणी त्याने धावा केल्या. राहुल, सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरचं अपयश जरा त्रास देऊन गेलंच. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत के एस भरतने यष्टिरक्षण केलं खरं पण तो भारतातील सध्याचा सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक असेल तर अवघड आहे.   

 
असो, आता २ महिने आयपीएल झाली की WTC चा अंतिम सामना इंग्लंडमध्ये होणार आहे. त्यावेळी आपल्याला सर्वोत्तम खेळ करून दाखवावा लागेल. त्यावेळी परिस्थिती वेगळी असणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ पूर्ण जोशात असेल, कारण ते त्या परिस्थितीशी जास्त चांगले जुळवून घेतात. आपल्या खेळाडूंना (आणि बोर्डाला) आपला वर्कलोड व्यवस्थित हाताळावा लागेल, नाहीतर जून महिन्याच्या सुरुवातीला इंग्लंडमधील हवामान आणि त्या खेळपट्टीवर आपली खऱ्या अर्थाने कसोटी असेल. दोन्ही संघातील खेळाडूंना इंग्लंड मध्ये खेळण्याचा अनुभव नक्कीच आहे. प्रश्न आहे की त्यावेळेचं प्रेशर कोण जास्त चांगल्या प्रकारे हाताळू शकेल. आपल्या खेळाडूंना मागच्या WTC अंतिम सामन्याचा अनुभव आहे. कुठेही वाहवत न जाता, जर चिकाटीने खेळू शकलो तर आपण या सामन्यात चांगली कामगिरी करू शकू. कसोटी क्रिकेटमध्ये ३-४ संघच उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. आपण त्या पायरीवर उभे आहोत, गरज आहे ते आत्ताची कामगिरी परत करण्याची, वेगळ्या खेळपट्टीवर, वेगळ्या हवामानात. 


– कौस्तुभ चाटे   

To know more about Crickatha