ball

दोन ‘अद्वितीय’ खेळी 

by Kaustubh Chate

सचिन रमेश तेंडुलकर. भारतीय क्रिकेटला पडलेलं स्वप्न. दोन-पाच नाही तर तब्बल २४ वर्षे हा माणूस भारतीय क्रिकेटची धुरा स्वतःच्या खांद्यावर वाहत होता. ज्या देशात क्रिकेट सारख्या खेळाला धर्म मानलं जातं, तिथे सचिनला देवाची उपाधी मिळणारच होती. तो खेळला, लढला, धडपडला, पुन्हा उभा राहिला. तो पुन्हा एकदा लढला, कधी दुखापतींशी, कधी खराब फॉर्मशी तर बहुतेकवेळा ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्टइंडीज सारख्या प्रतिस्पर्ध्यांशी. सचिन आणि भारतीय क्रिकेट रसिक यांचं वेगळं नातं आहे. कदाचित आयपीएलला सर्वस्व मानणाऱ्या या नवीन युगाच्या रसिकांना ते समजणार नाही पण आम्हा ९०च्या दशकात मोठ्या झालेल्यांसाठी सचिन तेंडुलकर हे सर्वस्व होतं. सचिनसाठी आम्ही शाळा, कॉलेज अगदी परीक्षा सुद्धा बुडवल्या आहेत.  उद्या, २४ एप्रिल रोजी सचिन वयाची पन्नास वर्षे पूर्ण करतोय.  सचिन त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण २०० कसोटी सामने, ४६३ एकदिवसीय सामने आणि १ टी-२० सामना खेळला. या एकूण ६६४ सामन्यात तो ७८२ वेळा फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. अर्थातच ही आकडेवारी मोठी प्रचंड आहे. पण सचिनच्या मोठेपणाचे कौतुक या आकडेवारीत नाही तर त्याच्या खेळण्यात आहे. ज्या पद्धतीने तो २३-२४ वर्षे क्रिकेट खेळत असे, आणि ज्या पद्धतीने काहीशे कोटी भारतीयांची जबाबदारी तो खांद्यावर पेलून खेळत असे त्यापुढे ही आकडेवारी नगण्य आहे. सचिनच्या या अनेक खेळींपैकी २ खेळी माझ्या स्वतःच्या अत्यंत जवळच्या आहेत. या लेखात याच दोन खेळींचा केलेला हा उहापोह. 

१. २४१ नाबाद विरुद्ध ऑस्ट्रेलिया
    मैदान – सिडनी क्रिकेट ग्राउंड  
  

कदाचित सचिनची ही कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळी मानता येईल. सचिन आणि सिडनी क्रिकेट ग्राउंड हे समीकरण काही वेगळंच आहे. आपला १९९९-२००० चा दौरा वगळता, प्रत्येक ऑस्ट्रेलिया मालिकेत सचिनने या मैदानावर अप्रतिम कामगिरी केली आहे. ९ इंनिंगमध्ये ४ वेळा नाबाद राहून सचिनने सिडनीच्या मैदानावर तब्बल ७८५ धावांची बरसात केली आहे. २००३-०४ च्या दौऱ्यात सचिनची बॅट त्याच्यावर काहीशी रुसली होती. त्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या. त्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला एक वेगळी भावनिक किनार आहे. आपण अनेक वर्षांनी ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना जिंकलो होतो. ऍडलेडच्या मैदानावर राहुल द्रविड आणि लक्ष्मणने आपल्याला तो ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. आधीच्या ब्रिस्बेनच्या सामन्यात कर्णधार सौरव गांगुलीने एक जोरदार शतक झळकावले होते, तर मेलबर्नच्या तिसऱ्या कसोटीत सेहवागने केलेल्या शतकाची चर्चा होत होती. सर्वच प्रमुख भारतीय फलंदाजांनी या दौऱ्यावर धावा केल्या होत्या, पण सचिनची बॅट मात्र मौन धारण करून होती. गेली अनेक वर्षे बेफाम खेळी करणारे ते शस्त्र त्या दौऱ्यावर मात्र म्यान झाले होते. ‘सचिन संपला’ अशी चर्चा सर्वत्र होत होती. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी सचिनला त्याच्या आवडत्या कव्हर ड्राइव्हचा बळी बनवला होता. ऑफ स्टम्पच्या बाहेरच्या चेंडूवर कव्हर ड्राइव्ह करताना सचिन बाद होत होता. शतकी भागीदारी झाल्यानंतर पुढे भारतीय सलामीचे फलंदाज पाठोपाठ बाद झाले आणि २ बाद १२८ या धावसंख्येवर ‘तो’ मैदानावर उतरला.

त्या दिवशी सचिन त्याच्या स्वाभिमानासाठी लढत होता. हळूहळू त्याने मैदानावर जम बसवायला सुरुवात केली. सचिन त्या खेळीत तब्बल ६१३ मिनिटे मैदानावर होता, त्याने ४३६ चेंडूंचा सामना केला. या दहा तासांच्या मॅरेथॉन खेळीत या कर्मयोग्याने एकही कव्हर ड्राइव्हचा फटका मारला नाही. केवढा तो संयम, काय ती जिद्द !! ज्या फटक्याने सचिन ओळखला जात असे, तो फटका खेळताना चूक होते आहे तर त्या फटक्याकडे दुर्लक्ष करून पुढे मार्गक्रमण करायचे हाच विचार कदाचित त्याच्या मनात असेल. त्याने ऑफ स्टंपच्या बाहेरचे सगळेच चेंडू सोडून द्यायला सुरुवात केली. Test cricket is a game of patience असे म्हटले जाते. त्या दिवशी पेशन्स काय असतो ते या माणसाने दाखवले. त्या खेळीत सचिनने तब्बल ३३ चौकार मारले, पण त्यातील फक्त ३ चौकार ऑफ साईडला होते. आणि त्यातही कव्हर मध्ये मारलेला एकही चौकार नव्हता. ती २४१ ची खेळी क्रिकेट इतिहासात अमर आहे. सचिन किती महान फलंदाज होता हे दर्शवणारी ही खेळी आहे. एखाद्या प्रसंगी, त्या वेळेची गरज ओळखून  तुम्ही तुमची आवडती गोष्ट न करण्यासाठी स्वतःला कसे थांबवता हे दर्शवणारी ती खेळी होती. त्या दौऱ्यावर अगदी सहज बाद होणारा सचिन सिडनीच्या त्या खेळीत बाद झालाच नाही, एवढेच नाही तर दुसऱ्या डावात देखील त्याने नाबाद ६० धावांची एक सुंदर खेळी केली. खरोखर सचिनची ती खेळी म्हणजे क्रिकेटच्या सम्राटाने आपल्या आवडत्या खेळाला पेश केलेला अप्रतिम नजराणा होता.        

२. ९८ विरुद्ध पाकिस्तान  
  मैदान – सेंच्युरियन, दक्षिण आफ्रिका  


सचिन आणि एकदिवसीय सामने ही क्रिकेट रसिकांसाठी मेजवानीच होती. आणि त्यातही विश्वचषकात पाकिस्तानसमोर खेळणारा सचिन काही वेगळाच असायचा. २००३ च्या विश्वचषकात देखील आपल्याला ‘तो’ सचिन बघायला मिळाला. सेंच्युरियन मैदानावर पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान समोरासमोर उभे ठाकले होते. पहिल्यांदा फलंदाजी करताना सईद अन्वरच्या शतकाच्या जोरावर पाकिस्तानने २७३ धावा केल्या होत्या. त्याकाळात ५० षटकात २७४ धावांचा पाठलाग करणे हे खरोखर आव्हान असे. आणि खास करून समोरच्या संघात वासिम अक्रम, वकार युनूस, शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी आणि अब्दुल रझाक सारखे गोलंदाज असतील तर काही बोलायलाच नको. अशावेळी त्या धावांचा पाठलाग सचिनच्या त्या खेळीने अगदी सोपा केला होता. प्रश्न विजयाचा नव्हता, तर अप्रोचचा होता. ज्या पद्धतीने सचिन त्या सामन्याला सामोरा गेला, ते बघता त्या खेळीची दृष्टच काढली पाहिजे. 

नेहमी नॉन-स्ट्रायकर उभा असणाऱ्या सचिनने त्या दिवशी फलंदाजीची सुरुवात केली. पहिल्याच षटकात आक्रमला एक मस्त चौकार मारून त्याने आपले इरादे दाखवून दिले होते. आणि मग दुसऱ्या षटकात जगातला सर्वात वेगवान गोलंदाज – शोएबच्या गोलंदाजीवर मारलेला तो अपर कटचा फटका. क्रिकेट रसिकांच्या २ पिढ्या त्या फटक्यावर अजूनही मरतात. तो षटकार अनेक भारतीयांच्या मनात घर करून आहे. त्या दिवशी सचिनने कोणालाही सोडलं नाही. वासिम, शोएब आणि वकार…जगातले तीन सर्वोत्कृष्ट गोलंदाज या बादशाहला जणू कुर्निसात करत होते. कव्हर ड्राइव्ह, स्ट्रेट ड्राइव्ह, कट्स, लेग साईडला मारलेले फटके… सचिनने मैदानावरील एकही कोपरा शिल्लक ठेवला नव्हता. त्या मैदानाने अशी आतिषबाजी कदाचित पहिल्यांदाच बघितली असेल. भारत-पाकिस्तान सामना म्हणजे जणू विश्वयुद्धच, त्यात हा सेनापती भात्यातल्या सगळ्या फटक्यांनींशी सामोरा गेला, आणि त्या खेळीने ते युद्ध जिंकून आला. ७५ चेंडूत ९८ धावा, त्यात १२ चौकार आणि एक षटकार. सचिनने उभारलेल्या त्या पायावर भारताने विजयाची इमारत सहज बांधली. भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयांपैकी हा विजय अनेक क्रिकेट रसिकांना अधिक जवळचा आहे, त्याचे कारण म्हणजे सचिनची ती खेळी. दुर्दैवाने सचिन आपले शतक पूर्ण करू शकला नाही, पण त्या पायाचे आणि विजयाचे मोल कितीतरी पटींनी अधिक आहे. 

सचिन तेंडुलकरने त्याच्या असंख्य खेळींनी क्रिकेट रसिकांची मने जिंकली आहेत. या २ खेळी म्हणजे त्याच्या प्रातिनिधिक खेळी म्हणता येतील. हा ‘आपला सचिन’ वयाची पन्नाशी पूर्ण करतो आहे, त्याला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!! 

– कौस्तुभ चाटे 

To know more about Crickatha