ball

अचूक आणि भेदक – जेम्स अँडरसन (दैनिक केसरी) 

by

त्याने खेळायला सुरुवात केली तेव्हा स्टीव्ह वॉ च्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ विश्वचषक विजेता होता, लगोलग त्यांनी परत एकदा – सलग दुसऱ्यांदा, विश्वचषक जिंकला. त्याने खेळायला सुरुवात केली तेव्हा टी-२० क्रिकेट हा शब्द देखील क्रिकेटच्या शब्दकोशात नव्हता. त्याने खेळायला सुरुवात केली तेव्हा जॉर्ज डब्ल्यू बुश अमेरिकेचे अध्यक्ष होते, टोनी ब्लेअर ब्रिटनचे पंतप्रधान होते आणि अटल बिहारी वाजपेयी भारताचे, आणि दोनच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती, तेव्हा मायकल शूमाकर फेरारी कडून फॉर्मुला वन च्या स्पर्धेत भाग घेत होता, रॉजर फेडररने पहिल्यांदाच विम्बल्डन चॅम्पियनशीप जिंकली होती, लान्स आर्मस्ट्राँग आणि टायगर वूड्स अजूनही त्यांच्या त्यांच्या खेळात अग्रणी होते. इतकंच काय संपूर्ण जगात ३G ची नुकतीच सुरुवात झाली होती. आयफोन आणि अँड्रॉइड हे शब्द देखील लोकांना माहित नव्हते… आज या सगळ्याच गोष्टी खूप जुन्या वाटतात. पण २०-२१ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलेला ‘तो’ मात्र चिरतरुण आहे. वयाच्या चाळिशीतही नवोदित गोलंदाजाला लाजवणारा जेम्स मायकल अँडरसन आधुनिक क्रिकेटमधला एक मोठा चमत्कारच म्हटला पाहिजे. 


अँडरसनने २००३ मध्ये इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, आणि एक वर्ष आधी तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये आला होता. इंग्लिश क्रिकेटने दर्जेदार खेळाडू दिले आहेत, पण गोलंदाजांच्या यादीत कायमच जेम्स अँडरसन हे नाव प्रथम स्थानावर असेल. एका वेगवान गोलंदाजासाठी २०-२२ वर्षे उच्च दर्जाचं क्रिकेट खेळणं, सर्वात जास्त बळी घेण्याच्या यादीत असणं आणि अनेक वर्षे वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर आपली सर्वोत्तम कामगिरी करत राहणं नक्कीच सोपं नाही. जेम्स अँडरसन म्हणजे स्विंग गोलंदाजीचा बाद्शाहच म्हटला पाहिजे. इंग्लिश वातावरणात, इंग्लडमधील गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवर त्याची गोलंदाजी अधिकच बहरत गेली. अचूकता आणि सुसंगतता या दोन गुणांमुळे अँडरसनची गोलंदाजी अधिकच भेदक वाटत गेली. अर्थात त्यामागे त्याचे कष्टही आहेतच. एका वेगवान गोलंदाजासाठी परिपूर्ण शरीरयष्टी आणि उत्तम बॉलिंग एक्शन असलेला अँडरसन त्याच्या सायंकाळी फलंदाजांची कायमच डोकेदुखी होता. तो खेळत असतानाच तेंडुलकर, द्रविड, इंझमाम, पॉन्टिंग, लारा, अमला सारखे उत्तमोत्तम फलंदाज बहरात होते, पण इंग्लिश परिस्थितीत अँडरसन कायमच त्यांच्यावर कुरघोडी करताना दिसत असे. त्या २२ यार्डांच्या खेळपट्टीवर अँडरसनची गोलंदाजी खेळणे, त्याच्या गोलंदाजीवर धावा करणे हे कोणत्याही फलंदाजासाठी नक्कीच एक आव्हान होते. 

लँकेशायर काउंटी कडून क्रिकेट खेळणारा अँडरसन २००२-०३ च्या सुमारास इंग्लंड संघात दाखल झाला. त्याच सुमारास इंग्लंडमध्ये टी-२० चे वारे वाहू लागले होते. प्रेक्षकांना एकदिवसीय क्रिकेट आता अळणी वाटू लागलं होतं, त्यात कसोटी क्रिकेटची देखील वाताहत व्हायला सुरुवात झाली होती. इंग्लिश संघ देखील एका वेगळ्या संक्रमणातून जात होता. अशा वेळी अँडरसनने इंग्लिश गोलंदाजीवर आपला प्रभाव टाकायला सुरुवात केली. प्रामुख्याने स्टुअर्ट ब्रॉडला हाताशी धरून तो इंग्लिश संघाला पुढे घेऊन जात होता. २००३ साली कसोटी सामन्यात पदार्पण करतानाच त्याने ५ बळी घेतले होते. त्याच वर्षी त्याने पाकिस्तान विरुद्ध एकदिवसीय क्रिकेट मध्ये हॅट्ट्रिक देखील घेतली. त्याच वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत अँडरसन प्रभावी ठरला. एकूणच त्या वर्षात जेम्स अँडरसन नावाचं वादळ क्रिकेटच्या मैदानावर घोंघावू लागलं होतं. त्याने इंग्लंडमध्ये तर चांगली कामगिरी केलीच पण परदेशात, खास करून दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे आणि काही प्रमाणात भारतीय उपखंडात देखील त्याचा मारा अचूक होता. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या वेगवान गोलंदाजीला प्रोत्साहन देणाऱ्या परिस्थितीत तो उत्तम कामगिरी न करतो तेच नवल. जगातील सर्व प्रमुख क्रिकेट संघांविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये ५० बळी घेणारा तो पहिला वेगवान गोलंदाज आहे, मला वाटतं ही एकच गोष्ट त्याच्या वेगवान आणि स्विंग गोलंदाजीची व्याख्या करण्यासाठी पुरेशी आहे. 

जेम्स अँडरसन हे रसायनच थोडं वेगळं आहे. इंग्लिश क्रिकेटर्स आणि त्यांचे वाद, प्रॉब्लेम्स या विषयावर खरं तर प्रबंध लिहू शकतो. पण इतकी वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असूनही जेम्स अँडरसन कधी फारशा वादात अडकलेला दिसला नाही. आपण बरं आणि आपलं काम बरं या विचारात खेळणारा अँडरसन नेहेमीच त्याच्या गोलंदाजीने बोलून दाखवायचा. आजही तो तसाच आहे. इंग्लिश संघ खास करून कसोटी क्रिकेटमध्ये नवनवीन ऊंची गाठत आहे त्यामागे जेम्स अँडरसनची गोलंदाजी हे एक प्रमुख कारण आहे हे नक्की. इंग्लिश क्रिकेटर्स साठी प्राणप्रिय असलेल्या ऍशेस मालिकांमध्ये देखील त्याने नेहेमीच चांगला खेळ केला आहे. शांतपणे गोलंदाजी करून डावात ५ किंवा अधिक बळी मिळवणारा अँडरसनच्या चेहऱ्यावरचं हास्य बरंच काही सांगून जातं. जेम्स अँडरसन त्याच्या पिढीचा एक सर्वश्रेष्ठ गोलंदाज आहे हे नक्की. हे अचूकता आणि भेदकता यांचं मिश्रण क्रिकेटला बरंच काही देऊन गेलं आहे. 

– कौस्तुभ चाटे  

To know more about Crickatha