ball

क्षेत्ररक्षण – एक कला 

by कौस्तुभ चाटे

८ मार्च १९९२, स्थळ – ब्रिस्बेन क्रिकेट ग्राउंड (गॅबा), ऑस्ट्रेलिया. सामना सुरु होता १९९२ विश्वचषक स्पर्धेतला, दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान. ह्याच सामन्यात ‘तो’ क्षण आला. ग्राऊंडवरील, ऑस्ट्रेलियातील – नव्हे जगभरातील क्रिकेट रसिकांनी ‘जॉन्टी ऱ्होड्स’ नावाचा चमत्कार पाहिला. पॉइंटवर उभ्या असलेल्या जॉन्टीने अप्रतिम फिल्डिंग करत काही सेकंदातच इंझमामचा बळी मिळवला. त्याने मारलेली ती उडी, आणि त्या वेळी केलेलं ते क्षेत्ररक्षण आजही क्रिकेट रसिकांच्या मनात आहे. त्या एका बळीनंतर एकूणच क्रिकेटमधील क्षेत्रक्षणाचे मापदंडच बदलून गेले. त्या विश्वचषकानंतर सर्वच संघांमध्ये फलंदाज आणि गोलंदाजांइतकंच क्षेत्ररक्षकांना देखील खूप महत्व प्राप्त झालं. त्यावेळी एकदिवसीय क्रिकेट जोरात होतं. एकदिवसीय सामन्यात केवळ बळी मिळवणेच नाही, पण धावा वाचवणे देखील महत्वाचं झालं होतं. आणि मग सर्वच संघांकडून उत्तमोत्तम क्षेत्ररक्षक आपल्याला दिसू लागले, खास करून एकदिवसीय क्रिकेटमध्ये. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे संघ ह्या बाबतीत आघाडीवर असत. एकदिवसीय क्रिकेटने जसं फलंदाजी आणि गोलंदाजीची परिमाणं बदलली तशीच क्षेत्ररक्षणाची देखील.

जॉन्टी ऱ्होड्स, हर्स्चेल गिब्स, रिकी पॉन्टिंग, मायकल बेव्हन सारखे खेळाडू आता फक्त फलंदाज किंवा गोलंदाज म्हणून नव्हते, तर त्यांचा समावेश उत्तम क्षेत्ररक्षक म्हणून देखील होऊ लागला. भारताकडूनही युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ जोडीने आपले ‘फिल्डिंग स्टँडर्ड्स’ बदलायला सुरुवात केली. आणि मग पुढे सुरेश रैना, विराट कोहली, रवींद्र जडेजा सारख्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेटमध्ये ही कला अजून पुढे नेली.

पण मग त्या आधी क्रिकेटमध्ये उत्तम क्षेत्ररक्षक नव्हते का? तर असं नाहीये. त्या आधी सुद्धा अनेक उत्तमोत्तम क्षेत्ररक्षक क्रिकेट जगताने पहिले. दक्षिण आफ्रिकेचा कॉलिन ब्लँड हा क्रिकेट जगतातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक समजला जातो. अगदी जॉन्टी ऱ्होड्सच्या देखील आधी त्याचं नाव घेतलं जाईल. तो एक चांगला, उपयुक्त फलंदाज असला तरीदेखील, आजमितीला त्याची गणना जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशीच होते. वेस्टइंडिजचा जो सोलोमन हा असाच एक खेळाडू. किंवा सर गॅरी सोबर्स हे देखील उत्तम क्षेत्ररक्षक म्हणून गणले गेले. एवढंच कशाला आपला एकनाथ सोलकर हा त्याच्या काळातील सर्वोत्तम फिल्डर होता. आपल्या ग्रेट स्पिन बॉलर्सनी (बेदी, वेंकट, प्रसन्ना, चंद्रा) जे काही बळी घेतले, त्यामध्ये सोलकरच्या कॅचेसचा वाटा सिंहाचा होता. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड सारख्या संघांमध्ये देखील कायमच उत्तम क्षेत्ररक्षक असत. पण कदाचित जगाला क्षेत्ररक्षणाची खरी गरज त्या १९९२ च्या सामन्यानंतर उमगली. त्या दशकात आफ्रिकाच नव्हे तर झिम्बाब्वे किंवा श्रीलंकेसारख्या छोट्या संघांमध्ये देखील चांगले क्षेत्ररक्षक होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकेका धावेला महत्व येऊ लागलं होतं. अनेक सामन्यांचे निकाल अतिशय कमी फरकाने लागत असत, आणि त्याचमुळे प्रत्येक धाव वाचवणं महत्वाचं ठरू लागलं. ‘कॅचेस विन मॅचेस’ ही फक्त उक्ती राहिली नाही तर ती मैदानावर प्रत्यक्षात राबवली जाऊ लागली.

२००२-०३ च्या सुमारास टी२० क्रिकेट आलं आणि मग तर क्रिकेटचा खेळ पूर्णच बदलला. अनेक क्रिकेट रसिकांना टी२० क्रिकेट अजिबातच आवडत नाही. जुन्या आणि खऱ्या क्रिकेटची मजात त्यात नाही असाही काहीसा प्रवाद आहे. टी२० हा फलंदाजांचा खेळ झाला आहे हेही मत व्यक्त केलं जातं. तरीदेखील टी२० क्रिकेटमुळे क्षेत्ररक्षणाचा सर्व अंदाज पूर्णपणे बदलून गेला आहे ह्यात काही वाद नाही. आज खेळाडूंची बॅटिंग किंवा बॉलिंग कशीही असेल, पण त्याची फिल्डिंग ही चांगलीच असावी लागते. आयपीएल आणि इतर लीग्समुळे जगभरातले खेळाडू एका संघातून खेळू लागले.. क्रिकेट प्रसाराच्या दृष्टीने ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आज आयपीएलमध्ये खेळत असलेल्या न्यूझीलंडच्या केन विलियम्सनची फिल्डिंग बघून भारताचा राहुल त्रिपाठी दोन धडे गिरवतो, आणि भारताच्या विराट कोहलीचं क्षेत्ररक्षण पाहून श्रीलंकेचा हसरंगा त्याचा कित्ता गिरवण्याचा प्रयत्न करतो. एकूणच क्षेत्ररक्षण ही क्रिकेटच्या दुनियेतली एक क्रांती आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.

क्षेत्ररक्षण म्हणजे फक्त ग्राउंड फिल्डिंग नाही. मैदानावर फलंदाजाने मारलेले फटके अडवणे, त्याला धावा काढण्यापासून परावृत्त करणे जितके महत्वाचे आहे तितकेच महत्वाचे म्हणजे झेल पकडणे आणि धावबाद करणे. आजचे खेळाडू ह्या दोन्ही कलांमध्ये पारंगत आहेत. आज ते मैदानावर येतानाच १०० नाही तर २०० टक्के तयारीने आलेले असतात. आजच्या घडीला कोणताही खेळाडू अगदी मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यातून थेट यष्टी उडवण्याच्या कलेत माहीर असतो. धावबाद – रन आऊट, ही कला खऱ्या अर्थाने विकसीत झाली आहे ती एकदिवसीय आणि त्यांनंतर आलेल्या टी२० क्रिकेटमुळे. आजच्या क्रिकेट कोचिंगमध्ये धावबाद करण्याचे स्पेशल स्किल्स शिकवले जातात, वेगळ्या प्रकारचे फिल्डिंग ड्रिल्स घेतले जातात. आणि अगदी लहान वयातच खेळाडूला उत्तर क्षेत्ररक्षक होण्याच्या दृष्टीने तयार केले जाते. झेल (कॅचेस) पकडणे ही कला देखील अशीच नावारूपाला आली आहे. फलंदाजाच्या जवळचे झेल असो अथवा मैदानावर उंच उडालेले झेल असो, सर्वच प्रकारचे झेल पाहण्याची रंजकता क्रिकेटला जिवंत ठेवते. फलंदाजाच्या जवळचे क्षेत्ररक्षक – स्लीप, सिली पॉईंट, फॉरवर्ड शॉर्ट लेग – आणि त्यांनी घेतलेले झेल हाच एक मोठा चर्चेचा विषय ठरावा. आता प्रत्येक संघात ह्या जागांवर फिल्डिंग करणारे ‘स्किल्ड फिल्डर्स’ असतात. फलंदाजाच्या बॅटवर लागलेला तो चेंडू हवेतच पकडण्याचं हे शास्त्र खरोखरच प्रेक्षणीय आहे. मैदानावर उडालेले अथवा सीमारेषेवर पकडलेले झेल ही अशीच एक वेगळी कॅटेगरी. हे झेल बघण्याची रंजकता भन्नाट आहे. त्याचबरोबर डोळ्याचं पातं लवतं न लवतं, फलंदाजाला यष्टिचीत (स्टंपिंग) करणे हे शास्त्रदेखील प्रसंगी भाव खाऊन जातं. आपला महेंद्रसिंग धोनी म्हणजे ह्या कलेचा जणू राजाच. धोनीने केलेले असे असंख्य यष्टिचीतचे बळी पाहणं हे क्रिकेट रसिकासाठी म्हणजे पंच-पक्वानाने भरलेलं ताट आहे.

एकूणच आजच्या ह्या क्रिकेटच्या जगात फिल्डिंग आणि कॅचेस ह्यांचं महत्व खूपच मोठं आहे. बहुतेक सर्वच संघांना हे महत्व नक्कीच पटलेलं आहे. बहुतेक प्रशिक्षक देखील अगदी लहान वयातच खेळाडूंना चांगले क्षेत्ररक्षक व्हावे म्हणून प्रयत्न करत असतात. जरी पूर्वीच्या काळी देखील काही चांगले क्षेत्ररक्षक होते, तरी क्षेत्ररक्षण ही वेगळी कला मानली गेली नाही. त्यावर संघांचा फारसा भर नसे. पण आता गेल्या काही वर्षात परिस्थिती निश्चितच बदलली आहे. आणि ह्या सर्वाचं श्रेय जातं ते जॉन्टी ऱ्होड्स, त्याचा पाकिस्तान विरुद्धचा तो सामना आणि त्याने धावबाद करून मिळवलेला इंझमामचा तो बळी. जोपर्यंत क्रिकेट आहे, तो पर्यंत त्या उडीची चर्चा होत राहणार, आणि पर्यायाने क्षेत्ररक्षण कलेची देखील.

कौस्तुभ चाटे

To know more about Crickatha