ball

कसोटी पाहणारी एकदिवसीय मालिका (दैनिक ऐक्य)

एकदिवसीय मालिका संपली. तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने आपल्याला २-१ अशा फरकाने हरवलं. मालिका हरल्याचं वाईट नाही वाटत पण ज्या पद्धतीने आपण शेवटचे दोन्ही सामने हरलो त्याचं नक्कीच वाईट वाटतंय. एकदिवसीय विश्वचषक काही महिन्यांवर आला आहे. अशावेळी आपल्याला जे काही सामने खेळायला मिळणार आहेत, त्यातील प्रत्येक सामना महत्वाचा आहे. आपण कितीही म्हणत असलो तरीदेखील आपली या विश्वचषकासाठी तयारी झालेली दिसत नाही. येणार विश्वचषक आपल्याच देशात खेळवला जाणार आहे, अशावेळी चांगली कामगिरी होणे अपरिहार्य आहे. भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेत, घरच्या मैदानावर कशी कामगिरी करतो याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष असेल. ही झालेली मालिका बघता भारतीय संघाला अजून मोठा टप्पा गाठायचा आहे असेच म्हणावे लागेल. 

दुसऱ्या सामन्यात तर आपल्या संघाची अवस्था अधिकच वाईट होती. मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीपुढे आपल्या फलंदाजांनी अक्षरशः लोटांगण घातलं. स्टार्कच्या पहिल्या षटकापासून आपली जी पडझड सुरु झाली त्यामधून आपला संघ सावरलाच नाही. खरं तर या संघात रोहित शर्माचं पुनरागमन झालं होतं, पण तो देखील अपयशी ठरला. एक विराटने ३१ धावा आणि अक्षर पटेलच्या २९ धावा सोडल्या तर बाकी फलंदाजांनी केवळ आपली हजेरी लावली. या सामन्यात आपण केवळ २६ षटके फलंदाजी केली. खरं म्हणजे हा आपल्या संघाने केलेला मोठा गुन्हा म्हटलं पाहिजे. आपण जर एकदिवसीय सामन्यात ५० षटके फलंदाजी करू शकणार नसलो तर आजच्या जमान्यात हा गुन्हाच आहे. बरं विशाखापट्टणमचं हे मैदान तसं फलंदाजीला अनुकूल आहे. या मैदानावर अनेकदा भारतीय फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. पण मिशेल स्टार्कच्या माऱ्यासमोर आपण तलवार म्यान केली. खेळपट्टीवर एकही फलंदाज तग धरून उभा राहिला नाही. या खेळपट्टीवर धावा होत्या हे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी सिद्ध केलं. ११८ धावांचं लक्ष्य काही मोठं नव्हतं, पण ट्रॅव्हिस हेड आणि मिशेल मार्श या सलामीच्या फलंदाजांनी केवळ ११ षटकात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. दोघांनीही कडक फलंदाजी केली आणि आपली आपली अर्धशतके झळकावली. एकही भारतीय गोलंदाजाला आपला प्रभाव टाकता आला नाही. ज्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज (स्टार्क, अबॉट आणि एलिस) १० बळी घेतात, स्टार्क अप्रतिम गोलंदाजीने ५ भारतीय फलंदाजांना बाद करतो, तिथे भारतीय गोलंदाज विकेट घेण्यासाठी झगडत होते. ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचे शिल्पकार ठरले स्टार्क, हेड आणि मार्श. 

तिसरा आणि शेवटचा सामना चेन्नई मध्ये खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना चांगल्या २६९ धावा केल्या. कप्तान स्टीव्ह स्मिथ सोडल्यास सगळ्याच खेळाडूंनी या धावसंख्येत आपला खारीचा वाटा उचलला. एकही फलंदाज अर्धशतक गाठू शकला नाही तरी स्मिथ वगळता इतर दहाही फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. भारताकडून सिराज आणि अक्षरने प्रत्येकी दोन तर हार्दिक आणि कुलदीपने तीन बळी घेतले. खास करून कुलदीप यादवने चांगली गोलंदाजी केली. तसे पाहता आज २७० धावांचा पाठलाग करणे फारसे अवघड नाही, पण भारतीय फलंदाजी गरज असताना  ढेपाळली. रोहित आणि गीलने सुरुवात चांगली केली होती, पाठोपाठ आलेला विराट देखील मैदानावर उभा होता, पण तिघांपैकी एकाने शेवटपर्यंत उभे राहणे आवश्यक होते. या सामन्यात तेच घडले नाही. हे तिघे आणि राहुल, हार्दिकच्या बॅटमधून धावा तर निघाल्या पण पेशन्स ठेवून, खेळपट्टीवर उभे राहत संघाला विजयी मार्गावर नेने आवश्यक होते, ती जबाबदारी कोणी घेतली नाही. अखेरीस २१ धावांनी ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आणि मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. 

ऑस्ट्रेलियाचा विचार करता त्यांचा कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या बॅटमधून धावा निघाल्या नसल्या तरी खास करून या मालिकेत त्याच्या नेतृत्वाखाली संघाने चांगली कामगिरी केली. स्टार्क, मार्श आणि इतर खेळाडू देखील या मालिकेत चमकले. स्टार्कने विशाखापट्टणमला गेलेली गोलंदाजी भेदक होती. डावखुरे गोलंदाज आपल्यासाठी कायमच डोकेदुखी ठरले आहेत, स्टार्कने देखील निराश केले नाही. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत एक कणखर निर्णय घेतला. डेव्हिड वॉर्नरला पहिल्या दोन सामन्यात वगळले होते, आणि तिसऱ्या सामन्यात त्याला सलामीला न पाठवता मधल्या फळीत फलंदाजीला पाठवले. हे असे निर्णय घेणे अवघड असते, पण हा वेगळा विचार होणेदेखील आवश्यक असते. भारतीय संघात हा विचार झालाच नाही. ईशान किशन सारखा तडाखेबंद यष्टीरक्षक-फलंदाज संघात असताना, आपण के एल राहुलकडेच ही दुहेरी जबाबदारी सोपवतो आहोत. राहुलच्या फलंदाजीबद्दल निश्चितच शंका नाहीये, पण त्याचा फॉर्म अजूनही त्याला साथ देत नाहीये. वास्तविक ईशान-शुभमन हे दोघेही सलामीची जोडी म्हणून जास्त चांगली कामगिरी करू शकतील, पण संघ व्यवस्थापनाने त्यांच्यावर जबाबदारी टाकणे, विश्वास ठेवणे आवश्यक आहे. रोहित आणि विराटचे वय आता जाणवू लागले आहे, खास करून रोहितचे. कदाचित २०२३ हे वर्ष दोघांच्या करियरसाठी सगळ्यात जास्त महत्वाचे असेल. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सूर्यकुमार यादवने या मालिकेतील अपयश. तो तीनही सामन्यात पहिल्या चेंडूवर बाद झाला. प्रश्न अपयशाचा नाहीये, हे अपयश अनेकांनी अनुभवले आहे. या अपयशातून तो स्वतः आणि भारतीय संघ किती लवकर शहाणे होतात हे पाहणे महत्वाचे आहे. सूर्याच्या फलंदाजी क्षमतेबद्दल शंका नक्कीच नाही, पण या घडलेल्या ‘अपघाताचा’ विचार त्यानेच करणे आवश्यक आहे. या अनुभवातून तो योग्य गोष्टी लवकर शिकेल अशी आशा करूया. 

एकूणच ही मालिका आपलीच कसोटी पाहणारी ठरली. आता पुढे ३-४ महिने आपण एकदिवसीय सामने खेळणार नाही आहोत. आता सगळं फोकस आयपीएल आणि नंतर सुरु होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपवर असेल. विश्वचषक स्पर्धा जिंकायची असेल तर वेगळा विचार करणे आवश्यक आहे. घोडामैदान दूर नाहीये, गरज आहे ते योग्य पावले उचलण्याची. 

– कौस्तुभ चाटे            

अचूक आणि भेदक – जेम्स अँडरसन (दैनिक केसरी) 

त्याने खेळायला सुरुवात केली तेव्हा स्टीव्ह वॉ च्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ विश्वचषक विजेता होता, लगोलग त्यांनी परत एकदा – सलग दुसऱ्यांदा, विश्वचषक जिंकला. त्याने खेळायला सुरुवात केली तेव्हा टी-२० क्रिकेट हा शब्द देखील क्रिकेटच्या शब्दकोशात नव्हता. त्याने खेळायला सुरुवात केली तेव्हा जॉर्ज डब्ल्यू बुश अमेरिकेचे अध्यक्ष होते, टोनी ब्लेअर ब्रिटनचे पंतप्रधान होते आणि अटल बिहारी वाजपेयी भारताचे, आणि दोनच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती, तेव्हा मायकल शूमाकर फेरारी कडून फॉर्मुला वन च्या स्पर्धेत भाग घेत होता, रॉजर फेडररने पहिल्यांदाच विम्बल्डन चॅम्पियनशीप जिंकली होती, लान्स आर्मस्ट्राँग आणि टायगर वूड्स अजूनही त्यांच्या त्यांच्या खेळात अग्रणी होते. इतकंच काय संपूर्ण जगात ३G ची नुकतीच सुरुवात झाली होती. आयफोन आणि अँड्रॉइड हे शब्द देखील लोकांना माहित नव्हते… आज या सगळ्याच गोष्टी खूप जुन्या वाटतात. पण २०-२१ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलेला ‘तो’ मात्र चिरतरुण आहे. वयाच्या चाळिशीतही नवोदित गोलंदाजाला लाजवणारा जेम्स मायकल अँडरसन आधुनिक क्रिकेटमधला एक मोठा चमत्कारच म्हटला पाहिजे. 


अँडरसनने २००३ मध्ये इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, आणि एक वर्ष आधी तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये आला होता. इंग्लिश क्रिकेटने दर्जेदार खेळाडू दिले आहेत, पण गोलंदाजांच्या यादीत कायमच जेम्स अँडरसन हे नाव प्रथम स्थानावर असेल. एका वेगवान गोलंदाजासाठी २०-२२ वर्षे उच्च दर्जाचं क्रिकेट खेळणं, सर्वात जास्त बळी घेण्याच्या यादीत असणं आणि अनेक वर्षे वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर आपली सर्वोत्तम कामगिरी करत राहणं नक्कीच सोपं नाही. जेम्स अँडरसन म्हणजे स्विंग गोलंदाजीचा बाद्शाहच म्हटला पाहिजे. इंग्लिश वातावरणात, इंग्लडमधील गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवर त्याची गोलंदाजी अधिकच बहरत गेली. अचूकता आणि सुसंगतता या दोन गुणांमुळे अँडरसनची गोलंदाजी अधिकच भेदक वाटत गेली. अर्थात त्यामागे त्याचे कष्टही आहेतच. एका वेगवान गोलंदाजासाठी परिपूर्ण शरीरयष्टी आणि उत्तम बॉलिंग एक्शन असलेला अँडरसन त्याच्या सायंकाळी फलंदाजांची कायमच डोकेदुखी होता. तो खेळत असतानाच तेंडुलकर, द्रविड, इंझमाम, पॉन्टिंग, लारा, अमला सारखे उत्तमोत्तम फलंदाज बहरात होते, पण इंग्लिश परिस्थितीत अँडरसन कायमच त्यांच्यावर कुरघोडी करताना दिसत असे. त्या २२ यार्डांच्या खेळपट्टीवर अँडरसनची गोलंदाजी खेळणे, त्याच्या गोलंदाजीवर धावा करणे हे कोणत्याही फलंदाजासाठी नक्कीच एक आव्हान होते. 

लँकेशायर काउंटी कडून क्रिकेट खेळणारा अँडरसन २००२-०३ च्या सुमारास इंग्लंड संघात दाखल झाला. त्याच सुमारास इंग्लंडमध्ये टी-२० चे वारे वाहू लागले होते. प्रेक्षकांना एकदिवसीय क्रिकेट आता अळणी वाटू लागलं होतं, त्यात कसोटी क्रिकेटची देखील वाताहत व्हायला सुरुवात झाली होती. इंग्लिश संघ देखील एका वेगळ्या संक्रमणातून जात होता. अशा वेळी अँडरसनने इंग्लिश गोलंदाजीवर आपला प्रभाव टाकायला सुरुवात केली. प्रामुख्याने स्टुअर्ट ब्रॉडला हाताशी धरून तो इंग्लिश संघाला पुढे घेऊन जात होता. २००३ साली कसोटी सामन्यात पदार्पण करतानाच त्याने ५ बळी घेतले होते. त्याच वर्षी त्याने पाकिस्तान विरुद्ध एकदिवसीय क्रिकेट मध्ये हॅट्ट्रिक देखील घेतली. त्याच वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत अँडरसन प्रभावी ठरला. एकूणच त्या वर्षात जेम्स अँडरसन नावाचं वादळ क्रिकेटच्या मैदानावर घोंघावू लागलं होतं. त्याने इंग्लंडमध्ये तर चांगली कामगिरी केलीच पण परदेशात, खास करून दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे आणि काही प्रमाणात भारतीय उपखंडात देखील त्याचा मारा अचूक होता. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या वेगवान गोलंदाजीला प्रोत्साहन देणाऱ्या परिस्थितीत तो उत्तम कामगिरी न करतो तेच नवल. जगातील सर्व प्रमुख क्रिकेट संघांविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये ५० बळी घेणारा तो पहिला वेगवान गोलंदाज आहे, मला वाटतं ही एकच गोष्ट त्याच्या वेगवान आणि स्विंग गोलंदाजीची व्याख्या करण्यासाठी पुरेशी आहे. 

जेम्स अँडरसन हे रसायनच थोडं वेगळं आहे. इंग्लिश क्रिकेटर्स आणि त्यांचे वाद, प्रॉब्लेम्स या विषयावर खरं तर प्रबंध लिहू शकतो. पण इतकी वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असूनही जेम्स अँडरसन कधी फारशा वादात अडकलेला दिसला नाही. आपण बरं आणि आपलं काम बरं या विचारात खेळणारा अँडरसन नेहेमीच त्याच्या गोलंदाजीने बोलून दाखवायचा. आजही तो तसाच आहे. इंग्लिश संघ खास करून कसोटी क्रिकेटमध्ये नवनवीन ऊंची गाठत आहे त्यामागे जेम्स अँडरसनची गोलंदाजी हे एक प्रमुख कारण आहे हे नक्की. इंग्लिश क्रिकेटर्स साठी प्राणप्रिय असलेल्या ऍशेस मालिकांमध्ये देखील त्याने नेहेमीच चांगला खेळ केला आहे. शांतपणे गोलंदाजी करून डावात ५ किंवा अधिक बळी मिळवणारा अँडरसनच्या चेहऱ्यावरचं हास्य बरंच काही सांगून जातं. जेम्स अँडरसन त्याच्या पिढीचा एक सर्वश्रेष्ठ गोलंदाज आहे हे नक्की. हे अचूकता आणि भेदकता यांचं मिश्रण क्रिकेटला बरंच काही देऊन गेलं आहे. 

– कौस्तुभ चाटे  

केन ‘सुपर कूल’ विलियम्सन (दैनिक ऐक्य)

गोष्ट आहे २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकाची. अंतिम सामन्यात त्याचा संघ खेळत होता. तो संघाचा कर्णधार होता. त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. सामन्याच्या शेवटी त्यांची आणि इंग्लिश संघाची धावसंख्या समान झाली होती. मग सुपर ओव्हर खेळवली गेली. तिथे देखील दोन्ही संघ समसमान होते. शेवटी ज्या संघाने जास्त चौकार मारले त्या संघाला विजेते म्हणून घोषित केलं गेलं. सगळं क्रिकेट जग हळहळलं. पण तो शांत होता. पुढे दोन वर्षांनी त्याच्याच नेतृत्वाखाली त्याचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळत होता. त्या सामन्यात त्यांनी भारतीय संघावर सहज विजय मिळवला. गेल्या जवळजवळ २५-२७ वर्षांमध्ये त्याच्या संघाने पहिल्यांदाच आयसीसीची स्पर्धा जिंकली होती. पण तरीही तो शांत होता. दोन्ही प्रसंगात संपूर्ण क्रिकेट जगताने त्याचा संयम बघितला, तो होता न्यूझीलंडचा कप्तान केन विलियम्सन. खऱ्या अर्थाने सध्याच्या क्रिकेट मधला ‘ सुपर कूल’ केन विलियम्सन. 


न्यूझीलंड क्रिकेटला तसं पाहता ग्लॅमर नाही. पण हा किवी संघ वेळोवेळी (खास करून आयसीसी स्पर्धांमध्ये) उत्तम कामगिरी करून क्रिकेट जगतावर आपली छाप सोडत असतो. या संघाने नेहेमीच काही खास स्टार्स दिले आहेत. आणि याच स्टार्स मधलं एक महत्वाचं नाव म्हणजे केन विलियम्सन. केन विलियम्सन म्हणजे खऱ्या अर्थाने क्रिकेटचा कर्मयोगी म्हटला पाहिजे. मैदानावर अतिशय शांत असलेला हा केन, हातात बॅट आली की पूर्णपणे बदलतो. संघासाठी खेळणं, आपलं योग्य प्रकारे योगदान देणं एवढंच माहित असलेला केन संघासाठी सर्वस्व देत असतो. संघाची परिस्थिती गंभीर असो किंवा विजय अगदी समोर दृष्टीपथात असो, केन इथे देखील कर्मयोग्याच्या अविर्भावात आपली जबाबदारी पार पाडतो. वयाच्या १६-१७ व्या वर्षीपासून त्याने चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळायला सुरुवात केली. न्यूझीलंडच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ‘नॉर्थन डिस्ट्रिक्टस’ संघाकडून पदार्पण केलेल्या केन विलियम्सनने १७ व्या वर्षीच न्यूझीलंडच्या १९ वर्षाखालील संघाचं कर्णधारपद भूषवलं होतं. त्या वयात देखील त्याचे नेतृत्वगुण दिसू लागले होते. उत्तम फलंदाज बनण्याच्या शाळेत तर त्याने आधीच नाव नोंदणी केली होती, पण किवी संघाचं कर्णधारपद देखील त्याला खुणावत होतं. २०१० साली भारताविरुद्ध अहमदाबादला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करतानाच त्याने शतक झळकावलं होतं. बहुतेक संघांविरुद्ध तो अप्रतिमच खेळला आहे, पण खास करून ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारताविरुद्ध त्याचा खेळ जास्त खुलत गेला. एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट मध्ये देखील त्याने वेळोवेळी त्याची चुणूक दाखवली. अगदी आयपीएल मध्ये सनरायझर्स हैदराबाद साठी खेळताना सुद्धा तो त्वेषाने खेळला. कधी सलामीच्या फलंदाजांना साथीला घेऊन तर कधी तळाच्या फलंदाजांबरोबर खेळत तो कायमच संघाला पुढे नेत गेला. मैदानाबाहेर अगदी मित्रासारखा वागणारा केन, मैदानावर मात्र एकदम ‘प्रोफेशनल’ असतो. स्वतःच्या फलंदाजीवर फोकस व्हावा म्हणून कर्णधारपद सोडणारा केन निराळाच. 


केन विलियम्सनचा सर्वात मोठा गुण म्हणजे त्याचा शांतपणा. हा मनुष्य मैदानावर कमालीचा शांत असतो. २०१९ च्या विश्वचषकात अंतिम फेरीत त्याच्या संघाबरोबर जे घडलं ते खरं तर कोणत्याही कर्णधाराला वेदना देणारं होतं. पण त्या परिस्थितीत तो शांत होता. त्या पराभवाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर उचलून तो पुढे खेळत राहीला. पुन्हा नव्याने शून्यातून प्रवास सुरु करणारे खूप कमी असतात. या ‘कमी’ लोकांमधलाच तो आहे. पराभव असो अथवा विजय, तो कायमच एक मस्त स्माईलने त्या गोष्टीचा आनंद घेतो. म्हणूनच तो २०१९ विश्वचषकातील पराभवाने खचला नाही, आणि पहिलीच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकल्यानंतर हुरळून गेला नाही. त्याच्या नेतृत्वाखाली किवी संघाने अनेक विजय बघितले. त्याच्या फलंदाजीचा आनंद घेत अनेक क्रिकेट रसिक सुखावत गेले, पण बर्फासारखा हा ‘कॅप्टन कूल’ कायम तसाच होता. इंग्लिश काउंटी क्रिकेट असेल किंवा आयपीएल, तिथेही तो कायमच १००% योगदान देताना दिसतो. २०१५ च्या विश्वचषकात तो ‘प्लेयर ऑफ द सिरीज’ होता. त्या विश्वचषक स्पर्धेत, शेवटच्या सामन्यातला पराभव सोडला तर किवी संघाने कमाल केली होती, आणि त्यात प्रमुख वाटा होता विलियम्सनच्या १० सामन्यात केलेल्या ५७८ धावांचा. 

क्रिकेट जगतात अजातशत्रू असलेले खूप कमी खेळाडू असतील. केन विलियम्सन हे त्यातील एक प्रमुख नाव. केनचे चाहते जगभर पसरले आहेत, आणि खास करून भारतात. त्याचा संयत चेहरा, शांत डोळे, चेहऱ्यावर कायमच असलेलं ते स्माईल आणि सतत विचार करत असणारा तो मेंदू… क्रिकेट रसिकांसाठी केन विलियम्सन म्हणजे एक आदर्श खेळाडू आहे नक्की. हाच केन वेळोवेळी त्याच्यामधल्या माणुसकीचं देखील दर्शन घडवतो. ख्राईस्टचर्च मध्ये झालेला गोळीबार असो, किंवा पेशावर मधील शाळेत लहान मुलांवर झालेला गोळीबार, तो कायमच त्या पीडित व्यक्तींसाठी पुढे आला आहे. पेशावर मधल्या त्या पीडितांसाठी तर त्याने पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेची संपूर्ण मॅच फी दान केली होती. 

न्यूझीलंडला क्रिकेटचा मोठा इतिहास आहे. त्यांचे अनेक खेळाडू आता खऱ्या अर्थाने ‘प्रोफेशनल’ आहेत असे म्हणता येईल. अगदी आत्ता आत्ता पर्यंत असंख्य किवी खेळाडू क्रिकेट सोडून इतर वेळात नौकरी करताना दिसत होतेच. कदाचित आता पुढे ते चित्र बदललं असेल. त्या अर्थाने हे खेळाडू ‘प्रोफेशनल क्रिकेटर्स’ असू शकतील. पण किवी क्रिकेटच्या इतिहासात ज्या काही प्रमुख खेळाडूंचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल त्यात एक प्रमुख नाव असेल ते विलियम्सनचं. न्यूझीलंडचा संघ कायम एक सज्जन संघ म्हणून ओळखला गेला आहे. आणि तीच ओळख पुढे नेणारा केन विलियम्सन क्रिकेट इतिहासात नेहेमीच लक्षात राहील तो सुपर कूल विलियम्सन म्हणूनच. शांत आणि सज्जन खेळाडू म्हणून केन विलियम्सन हे क्रिकेटमधील मूर्तिमंत उदाहरण आहे, आणि ते कायम राहील यात काही शंका नाही. 

– कौस्तुभ चाटे 

विकेटमुळे चर्चेत राहिलेली मालिका (दैनिक केसरी)

अहमदाबाद कसोटी अनिर्णित राहिली. दोन्ही संघातील खेळाडूंनी फलंदाजीचा सर्व करून घेतला. पहिल्या तीन कसोटींमध्ये त्यांना संधीच मिळाली नव्हती, त्याची परतफेड त्यांनी या कसोटीत केली. पाहुण्यांकडून उस्मान ख्वाजा आणि कॅमरून ग्रीनची शतकं आणि भारतातर्फे शुभमन गील आणि विराट कोहली. त्याच जोडीला  भारताच्या पहिल्या डावात अक्षर पटेलचं आणि ऑस्ट्रेलियासाठी दुसऱ्या डावात ट्रेव्हिस हेड आणि मार्नस लाबूशेनची अर्धशतकं महत्वाची ठरली. ऑस्ट्रेलियाचा हा दौरा सुरु झाल्यापासूनच विकेट्सची एवढी चर्चा सुरु होती की विचारात सोया नाही. पहिल्या तीनही कसोटींमध्ये खेळपट्टी म्हणजे मातीचा आखाडा होता. अगदी पहिल्या दिवसापासून चेंडू वळण्याची पूर्ण सोय केली गेली होती. इंदोरच्या तिसऱ्या कसोटीमध्ये तर खासच. पण तीच खेळपट्टी आपल्यावर उलटली, आणि कांगारूंनी आपल्याच खेळीमध्ये आपल्याला हरवल्यानंतर मात्र शेवटच्या अहमदाबाद कसोटीसाठी वेगळीच खेळपट्टी तयार केली गेली. अर्थात तोपर्यंत आपण ही बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खिशात घातली होती. भरीस भर म्हणून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात जवळजवळ प्रवेश केला होताच. आता एक धक्का, आणि आपण अंतिम फेरीत एवढंच बाकी होतं. त्यामुळे या कसोटीसाठी ‘आखाड्याला’ सूट दिली गेली आणि दोन्ही संघातील फलंदाजांनी धावा केल्या. 


आपला WTC अंतिम फेरीतील प्रवेश न्यूझीलंड-श्रीलंका सामन्यावर अवलंबून होता. श्रीलंकेने न्यूझीलंडला २-० असे हरवले असते तरच आपण अंतिम फेरीत पोहोचू शकलो नसतो. श्रीलंकेने न्यूझीलंडला २-० हरवणे ही गोष्ट काही सोपी नव्हती. अर्थात पहिल्या सामन्यात त्यांनी प्रयत्न नक्की केले, पण किवी संघाने त्यांना दाद दिली नाही. न्यूझीलंडने ख्राईस्टचर्च मध्ये लंकेचा पराभव केला आणि इकडे भारताचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित झाला. आता सलग दुसऱ्यांदा भारतीय संघ WTCच्या अंतिम सामन्यात खेळेल. त्या सामन्याला अजून वेळ आहे, पण आत्ता संपलेल्या या भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचा उहापोह करणे तर आवश्यक आहे ना.    

भारताने गेल्या काही वर्षात ऑस्ट्रेलियन संघावर कसोटी क्रिकेटमध्ये नक्कीच वर्चस्व गाजवलं आहे. पण ज्या पद्धतीने आपण ही मालिका जिंकण्याचा अट्टहास केला तो आवश्यक होता का? नागपूर, दिल्ली आणि इंदोर तिन्ही कसोटी फक्त अडीच-तीन दिवसात संपल्या. मान्य आहे की आपल्याला घरी खेळण्याचा फायदा नक्की मिळाला पाहिजे होता, पण इतकाही नाही की कसोटी सामना चौथ्या दिवसाच्या आधीच संपावा? बरं, हा ऑस्ट्रेलियाचा संघ आजवर भारताच्या दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघातील सर्वात कमकुवत संघ होता. तरीदेखील आपल्या क्रिकेट बोर्डाला अशा खेळपट्ट्या बनवायची गरज भासली. या विकेट्सवर अश्विन-जडेजाने कमाल केली. दोघेही ठरवून ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद करत होते. तिकडे ऑस्ट्रेलियाकडे देखील नॅथन लायन सारखा विख्यात गोलंदाज होताच. त्याने देखील या मालिकेवर आपली छाप सोडली. जोडीला नवीन आलेले मर्फी आणि कुहनमन यांनी देखील वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. नाही म्हणायला अधून मधून फलंदाजांनी वेगवान गोलंदाजांना काही विकेट्स दिल्या (त्यांना अगदीच एकटं वाटू नये म्हणून असेल कदाचित.) पहिल्या तीनही कसोटी आणि अहमदाबादची कसोटी यामध्ये जमीन अस्मानाचा फरक होता. इंदोरमध्ये कांगारूंनी वेगवान गोलंदाजाच्या ऐवजी चक्क स्पिनर खेळवला. ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासात हे असं कधी झालं नसेल. बराच काळ – शेन वॉर्न खेळत असताना तो स्पिन गोलंदाजीचा तंबू एकहाती लढवत असे. पुढेही कांगारूंनी हीच परंपरा कायम ठेवली होती. इंदोरच्या सामन्यात तर तीन फिरकी गोलंदाज खेळलेच, पण पुढे अहमदाबाद मध्ये देखील त्यांनी तोच कित्ता गिरवला. आता यापुढे परत कधी ऑस्ट्रेलियन संघ तीन फिरकी गोलंदाज खेळावेत का हे बघणे देखील महत्वाचे असेल. 


अहमदाबाद कसोटीत २ ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी केलेली कामगिरी खरोखरच कमाल होती. उस्मान ख्वाजा ज्या सहजतेने खेळत होता, त्याचे फटके, त्याचा पेशन्स सगळंच बघण्यासारखं होतं. कॅमरून ग्रीनचं शतक देखील बघण्यासारखं होतं. क्रिकेटच्या तीनही प्रकारात चमकण्याची कुवत त्याच्याकडे आहे. कांगारूंनी दोन दिवस सहजपणे फलंदाजी केल्यानंतर भारतीय फलंदाज त्या खेळपट्टीवर कोलमडले असते तर नवल होतं. या सामन्यात एक वेगळा विराट दिसला. सामन्याच्या आधी तो सचिनची २००४ ची सिडनीची खेळी बघून आला होता का असा प्रश्न पडावा. अतिशय संयमाने त्याने त्याची खेळी उभारली. कोणताही विचित्र फटका न मारता तो एक एक धाव जोडत गेला. त्याला उत्तम साथ दिली ती शुभमन गीलने. त्याची खेळी देखील निर्दोष होती. विराट-रोहित नंतर भारतीय फलंदाजीची धुरा वाहण्यासाठी गील तयार होत आहे का हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. अक्षर पटेल या मालिकेत गोलंदाज म्हणून न चमकता फलंदाज म्हणून चमकला. महत्वाच्या क्षणी त्याने धावा केल्या. राहुल, सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरचं अपयश जरा त्रास देऊन गेलंच. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत के एस भरतने यष्टिरक्षण केलं खरं पण तो भारतातील सध्याचा सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक असेल तर अवघड आहे.   

 
असो, आता २ महिने आयपीएल झाली की WTC चा अंतिम सामना इंग्लंडमध्ये होणार आहे. त्यावेळी आपल्याला सर्वोत्तम खेळ करून दाखवावा लागेल. त्यावेळी परिस्थिती वेगळी असणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ पूर्ण जोशात असेल, कारण ते त्या परिस्थितीशी जास्त चांगले जुळवून घेतात. आपल्या खेळाडूंना (आणि बोर्डाला) आपला वर्कलोड व्यवस्थित हाताळावा लागेल, नाहीतर जून महिन्याच्या सुरुवातीला इंग्लंडमधील हवामान आणि त्या खेळपट्टीवर आपली खऱ्या अर्थाने कसोटी असेल. दोन्ही संघातील खेळाडूंना इंग्लंड मध्ये खेळण्याचा अनुभव नक्कीच आहे. प्रश्न आहे की त्यावेळेचं प्रेशर कोण जास्त चांगल्या प्रकारे हाताळू शकेल. आपल्या खेळाडूंना मागच्या WTC अंतिम सामन्याचा अनुभव आहे. कुठेही वाहवत न जाता, जर चिकाटीने खेळू शकलो तर आपण या सामन्यात चांगली कामगिरी करू शकू. कसोटी क्रिकेटमध्ये ३-४ संघच उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. आपण त्या पायरीवर उभे आहोत, गरज आहे ते आत्ताची कामगिरी परत करण्याची, वेगळ्या खेळपट्टीवर, वेगळ्या हवामानात. 


– कौस्तुभ चाटे   

वन टेस्ट वंडर्स (दैनिक ऐक्य, सातारा)

‘वन टेस्ट वंडर’ या तीन शब्दांना क्रिकेट इतिहासात एक वेगळंच वलय आहे. १५० वर्षांच्या टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक खेळाडू होऊन गेले की ज्यांना त्यांच्या देशाकडून फक्त एकच कसोटी सामना खेळता आला. काही ना काही कारणांमुळे त्यांच्या नशिबी दुसरी कसोटी खेळण्याचं भाग्य लाभलं नाही. बहुतेकवेळा पहिल्या कसोटी सामन्यातील खराब कामगिरी हे कारण असलं तरी इतरही काही गोष्टी नक्कीच आहेत की ज्यामुळे ते दुसरा कसोटी सामना खेळू शकले नाहीत. एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटच्या उदयानंतर अनेक खेळाडू क्रिकेटच्या त्या फॉरमॅट्स मध्ये खेळले, आपल्या देशांसाठी त्यांनी चांगली कामगिरी देखील केली, पण त्यांना दुसरा कसोटी सामना लाभला नाही. आजच्या घडीला १२ देशांना कसोटी क्रिकेटचा टिळा लागला आहे, आणि सध्याची एकूणच कसोटी क्रिकेटची अवस्था बघता, आता या यादीत नवीन देशांचा समावेश होईल असे वाटत नाही. या १२ देशांमधून अनेक खेळाडू असे आहेत की त्यांनी दुसरा कसोटी सामना बघितला नाही. अर्थातच या प्रत्येक खेळाडूची माहिती देणे शक्य नाही, पण काही प्रमुख खेळाडूंची माहिती या लेखात देण्याचा प्रयत्न करीत आहे. हे एका अर्थाने प्रमुख ‘वन टेस्ट वंडर्स’ आहेत असे म्हणता येईल. 

१. अँडी गँटम : हा वेस्टइंडीजचा फलंदाज. त्रिनिदाद कडून खेळणाऱ्या अँडी गँटमने १९४६ साली इंग्लंड विरुद्ध पोर्ट ऑफ स्पेन येथे कसोटी मध्ये पदार्पण केले. गँटमने खरे म्हणजे त्या कसोटी मध्ये शतक ठोकले होते. वेस्ट इंडिजसाठी डावाची सुरुवात करताना त्याने ११२ धावा केल्या. पण त्याच्या खेळीवर टीका केली गेली. उपस्थित पत्रकारांनी त्याच्यावर अतिशय संथपणे खेळण्याचा आरोप लावला. (जो काही अंशी खरा होता.) पहिलाच सामना खेळत असलेला गँटम शतकाच्या जवळ आल्यानंतर अजूनच सावकाश फलंदाजी करू लागला. त्याने शतक पूर्ण केले खरे, पण चौथ्या डावात वेस्ट इंडिजला तो सामना जिंकण्याची संधी होती, ती मात्र पूर्ण झाली नाही. अखेरीस तो सामना अनिर्णित राहिला. तो सामना न जिंकण्याचे खापर गँटम याच्यावर फोडण्यात आले. त्या कसोटी सामन्यानंतर अँडी गँटमला पुढे कधीही कसोटीसाठी निवडले गेले नाही. केवळ एका डावात ११२ धावा या कारणाने अँडी गँटम या फलंदाजाच्या नावे सर्वोच्च सरासरीचा विक्रम आहे. 

२. रॉडनी रेडमंड : न्यूझीलंडच्या रेडमंड याने देखील त्याच्या पहिल्या – आणि एकमेव कसोटी सामन्यात शतक ठोकले आहे. १९७३ साली पाकिस्तानविरुद्ध रावळपिंडी येथे खेळताना त्याने दोन्ही डावात मिळून १६३ धावा केल्या. पहिल्या डावात १०७ आणि दुसऱ्या डावात ५६ अशी त्याची कामगिरी होती. तो मालिकेतील शेवटचा सामना होता, आणि पुढे काही महिन्यांनी न्यूझीलंडचा संघ इंग्लंडचा दौरा करणार होते. त्या दौऱ्यासाठी रेडमंड याची निवड पक्की होती, परंतु मधल्या काळात त्याचा फॉर्म ढासळला. त्याच्या बॅटमधून धावा निघेनाश्या झाल्या. भरीस भर म्हणून तो जे नवीन ‘कॉन्टॅक्ट लेन्स’ वापरत होता, त्या लेन्सबरोबर जमवून घेणे (ऍड्जस्ट करणे) त्याला शक्य झाले नाही. आणि इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची निवड झाली नाही. तो पुढे कधीही न्यूझीलंड साठी कसोटी क्रिकेट खेळू शकला नाही. अर्थात त्या १९७३ च्या इंग्लंड दौऱ्यातच त्याने २ एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले. 

३. मिक मलोन : मिक मलोन हा ऑस्ट्रेलियाकडून खेळणारा जलदगती गोलंदाज. १९७७ साली त्याने इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा कसोटी मध्ये पदार्पण केले. ओव्हल वर झालेल्या त्या सामन्यात त्याने पहिल्या डावात ५ बळी घेतले होते, तसेच फलंदाजी करताना ४६ धावा देखील केल्या. एकूणच त्याचे ऑस्ट्रेलियासाठी चांगले पदार्पण झाले असे म्हणता येईल. परंतु त्यावेळी ऑस्ट्रेलियामध्ये ‘पॅकर सर्कस’ चे होते. मलोनने देखील केरी पॅकर यांच्या वर्ल्ड सिरीज क्रिकेटची वाट धरली, आणि त्या कारणाने त्याचे ऑस्ट्रेलियन संघासाठीचे दरवाजे बंद झाले. तो परत कधीही ऑस्ट्रेलियासाठी खेळू शकला नाही. 

४. साबा करीम : साबा करीम हा १९९९-२००० च्या सुमारासचा भारताचा चांगला यष्टीरक्षक म्हणून ओळखला जात असे. १९९७ साली त्याने भारतासाठी एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले तो भारतासाठी ३४ एकदिवसीय सामने खेळला आहे. बांगलादेश विरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी २००० साली त्याला खेळवण्यात आले. त्या सामन्यात त्याची कामगिरी बरी होती. पुढे एका सामन्यात यष्टिरक्षण करत असताना अनिल कुंबळेचा एक चेंडू उसळून त्याच्या डोळ्याला लागला आणि त्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर तो कधीही भारतासाठी खेळू शकला नाही. 

५. एड जॉयस : एड जॉयस हा आयर्लंडचा खेळाडू. तो सुरुवातीला काही काळ इंग्लंडसाठी देखील खेळला. इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. पण इंग्लंड कडून कसोटी खेळणे त्याच्या नशिबात नव्हते. आयर्लंडच्या पहिल्या कसोटी सामन्यात २०१८ साली पाकिस्तान विरुद्ध त्याला खेळण्याची संधी मिळाली. त्या सामन्यात त्याने दोन्ही डावात मिळून ४७ धावा केल्या. त्यानंतर तो आयर्लंडसाठी अनेक एकदिवसीय तसेच टी-२० सामने देखील खेळला, पण पुन्हा कसोटी क्रिकेट खेळण्याचे भाग्य त्याला लाभले नाही. 

६. रॉबिन सिंग : १९९० च्या दशकात रॉबिन सिंग भारतीय एकदिवसीय संघाचा प्रमुख खेळाडू होता. त्याची डावखुरी फलंदाजी, मध्यमगती गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर त्याने अनेक क्रिकेट रसिकांची मने जिंकली. त्रिनिदादमध्ये जन्मलेला – रवींद्र रामनारायण सिंग पुढे भारतात स्थायिक झाला आणि रॉबिन सिंग या नावाने प्रसिद्ध झाला. १३६ एकदिवसीय सामन्यात तो भारताकडून खेळला असला तरी त्याला केवळ एका कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. १९९८ साली हरारे येथे झिम्बाब्वे विरुद्ध खेळताना त्याने दोन्ही डावात मिळून २७ धावा केल्या, आणि गोलंदाजी करताना त्याला बळी मिळाला नाही. त्याचे कसोटी पदार्पण फारसे चांगले झाले नाही, आणि नंतर तो भारतासाठी पुढे कसोटी खेळला नाही. 

गमतीची गोष्ट म्हणजे रॉबिन सिंग नावाचा अजून एक खेळाडू भारतासाठी कसोटी खेळला आहे. (हा रॉबिन सिंग कोणाच्या फारसा लक्षात असण्याची शक्यता नाही.) हा दिल्लीचा वेगवान गोलंदाज होता, आणि १९९९ साली तो भारताकडून त्याचा पहिला (आणि एकमेव) कसोटी सामना खेळला. न्यूझीलंड विरुद्ध हॅमिल्टन येथे झालेल्या या सामन्यात त्याने ३ बळी देखील मिळवले. परंतु तो परत कधीही भारतासाठी क्रिकेट (कसोटी अथवा एकदिवसीय सामना) खेळला नाही. 

वर उल्लेखलेली ही नावे अगदीच प्रातिनिधिक आहेत. ‘वन टेस्ट वंडर्स’ चा विचार करता अनेक खेळाडू या यादीत येऊ शकतात. फक्त भारतीय खेळाडूंचाच विचार करायचा झाल्यास अरविंद आपटे, मधू रेगे, बाळ दाणी, सदाशिव पाटील, चंद्रकांत पाटणकर, रमेश सक्सेना, के. जयंतीलाल, योगराज सिंग (युवराज सिंगचे वडील), अजय शर्मा, सलील अंकोला, विजय यादव, इक्बाल सिद्दीकी, निखिल चोप्रा, विनय  कुमार,नमन ओझा, कर्ण शर्मा अशी अनेक नावे घेता येतील. 

– कौस्तुभ चाटे         

या सम हा (दैनिक केसरी, पुणे)  

ही गोष्ट आहे १९७६ ची. लंडनमध्ये ओव्हल मैदानावर कसोटी सामना सुरु होता, इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज. वेस्ट इंडिजचा संघ त्या दौऱ्यात प्रचंड फॉर्म मध्ये होता. एक वेगळाच जोश घेऊन ते खेळत होते. अशातच एका तरुण तडफदार खेळाडूने त्या सामन्यात फलंदाजीची धुरा सांभाळली. तसं त्याला वेस्ट इंडिज संघात येऊन २ वर्षे झाली होती. त्याच्या नावावर अनेक उत्तम खेळी होत्या, शतके होती. पण त्या मालिकेत आणि खास करून त्या सामन्यात त्याचा खेळ जास्तच बहारदार होत होता. १ बाद ५ या धावसंख्येवर खेळायला आलेल्या या खेळाडूने त्या दिवशी मैदान गाजवून सोडलं. ३८ चौकारांच्या साहाय्याने त्या सामन्यात त्याने तब्बल २९१ धावा केल्या. टोनी ग्रेगच्या गोलंदाजीवर त्याचा त्रिफळा उडाला नसता तर त्या दिवशी त्याचं त्रिशतक नक्की होतं. त्या नंतरही त्याने अनेक अप्रतीम खेळी केल्या. पण १९७६ ची त्याची ती ओव्हल मैदानावरील खेळी कदाचित त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी आणि परिपूर्ण खेळी म्हणता येईल. त्या फलंदाजाचं नाव होतं ‘सर आयझॅक व्हिव्हियन अलेक्झांडर रिचर्ड्स’ उर्फ व्हिव रिचर्ड्स. ‘किंग’ या टोपण नावाने तो ओळखला जायचा. आणि त्याचं मैदानावर चालणं, धावणं आणि एकूणच वावरणं हे राजा सारखंच असायचं.  व्हिव्हियन रिचर्ड्स या माणसाने १९७४-७५ ते १९९२-९३ हा काळ नुसता गाजवला नाही, तर क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. आपण अनेकदा वेस्टइंडीजच्या त्या तुफानी माऱ्याबद्दल बोलतो. आपल्या बोलण्यात कायम होल्डिंग, मार्शल आणि गार्नर असतात. पण १९७५ ते १९९५ या काळात जेंव्हा वेस्टइंडीज क्रिकेटचे सर्वोत्तम प्रदर्शन करत होते, तेंव्हा त्यांची फलंदाजी याच माणसाच्या खांदयावर उभी होती. 


रिचर्ड्सचा जन्म अँटिगाचा (७ मार्च १९५२). आधी अँटिगा, मग लिव्हर्ड आयलंड, कंबाइंड आयलंड आणि मग वेस्ट इंडिज असा प्रवास साधारण ४-५ वर्षांचा. १९७४ साली त्याने भारताविरुद्ध कसोटी क्रिकेट मध्ये पदार्पण केलं, आणि दुसऱ्याच कसोटीत – दिल्ली मध्ये त्याने नाबाद १९२ धावांची खेळी केली होती. त्या मालिकेत त्याने ५ कसोटी सामन्यात ३५३ धावा केल्या होत्या. तिथून रिचर्ड्स नावाचं वादळ सुरु झालं ते कधी शमलंच नाही. १२१ कसोटीमध्ये ५० च्या सरासरीने ८५४० धावा, त्यामध्ये २४ शतकं आणि ४५ अर्धशतकं. १८७ एकदिवसीय सामन्यात ४७ च्या सरासरीने ६७०० धावा, त्यामध्ये ११ शतकं आणि ४५ अर्धशतकं ही रिचर्ड्सची क्रिकेट मधली आकडेवारी. आणि हे आकडे अत्यंत खुजे वाटावे असं मैदानावरील व्यक्तिमत्व. तो मैदानात फलंदाजीला यायचा तोच राजाच्या आविर्भावात. छाती बाहेर काडून त्याची ती चाल, शर्टची वरची बटणं सोडलेली, हातात बॅट आणि नजरेत जरब, तोंडात च्युईंग गम… त्याचा मैदानावरील आवेश कायमच राजासारखा असायचा. हा माणूस ३० वर्षे नंतर जन्माला आला असता तर कदाचित टी-२० क्रिकेट त्याने गाजवून सोडलं असतं. त्याची बॅट मैदानावर बरसायला लागली की भल्याभल्यांची भंबेरी उडायची. वेस्ट इंडिज, इंग्लंड, भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड… कोणताही देश, कोणतंही मैदान त्याला व्यर्ज नव्हतं. तो खेळत असताना अनेक उत्तमोत्तम फलंदाज क्रिकेट जगतात होते, पण व्हिव रिचर्ड्स या माणसाची दहशत अजूनही क्रिकेट जगतावर आहे. ‘तो आला, त्याने पाहिलं… त्याने जिंकलं’ ही उक्ती रिचर्ड्सच्या बाबतीत तंतोतंत लागू होते. तो मैदानावर यायचा, गार्ड घ्यायचा. पुढे विकेटवर जाऊन एक दोन वेळा पाहणी करायचा, मैदानाकडे चौफेर पाहायचा आणि मग फलंदाजी सुरु करायचा. कदाचित तो क्षण प्रतिस्पर्धी संघासाठी सगळ्यात महत्वाचा असायचा, कारण त्यांच्यापुढे काय वाढून ठेवलं आहे ते हा ‘किंग’च ठरवायचा. तो लवकर बाद झाला तर ठीक, अन्यथा गोलंदाजी करणाऱ्या संघाचा दिवस संपलेला असायचा. त्याचे फटके, खास करून हूक आणि पूल खास बघण्यासारखे असायचे.   


रिचर्ड्स जगभर खेळला. कौंटी क्रिकेट मध्ये तो सॉमरसेट कडून जवळजवळ १२-१३ वर्षे खेळला. पुढे २-३ वर्षे ग्लॅमॉर्गन कडून देखील तो खेळत असे. तो ऑस्ट्रेलियन क्रिकेट मध्ये क्वीन्सलँड कडून खेळला. वेस्ट इंडिज साठी तर जगभर खेळत होताच. १९८३-८४ मध्ये तो कारकिर्दीच्या शिखरावर असताना त्याला दक्षिण आफ्रिकेत खेळण्याची ऑफर मिळाली होती. त्या काळात वर्णद्वेषी धोरणांमुळे सर्वच देशांनी आफ्रिकेवर बहिष्कार टाकला होता. जगभरातील क्रिकेट संघ (आणि इतरही खेळ, खेळाडू) आफ्रिकेत जात नसत. अशावेळी अनेक देशातील क्रिकेटपटूंना मोठमोठे पैसे देऊन आफ्रिकेत खेळण्यासाठी बोलावत असत. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडीज संघातील अनेक खेळाडू पैशांच्या मोबदल्यात आफ्रिकेत खेळायला जात असत. या मालिकांना ‘रेबेल टूर्स’ अर्थात ‘बंडखोर मालिका’ म्हणत असत. या अशा पैसेवाल्यांची नजर रिचर्डसकडे गेली नसती तरच नवल. ८० च्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा वेस्ट इंडिजचा संघ २ वेळा आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला, त्यावेळी रिचर्ड्सच्या समोर कोरा चेक ठेवण्यात आला होता. रिचर्ड्सने फक्त रक्कम सांगायची होती. पण हा किंग रिचर्ड्स बधला नाही. दक्षिण आफ्रिकेच्या वर्णद्वेषी धोरणांच्या विरोधात त्याने एक प्रकारे केलेलं बंडच होतं. ज्या समाजाने काळ्या लोकांना, खेळाडूंना मान्यता दिली नाही, त्या समाजात सर व्हिव रिचर्ड्सने पाऊल ठेवलं नाही. आफ्रिकेने ती धोरणे झुगारायला, आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पुनरागमन करायला १९९१ साल उजाडलं. पण तरीही पुढे अनेक वर्षे तो दक्षिण आफ्रिकेत गेला नाही. फक्त पैशांचा विचार न करता आपल्या तत्त्वांशीही प्रामाणिक असलेला तो क्रिकेटपटू होता. 


रिचर्ड्स बद्दल लिहावं तितकं थोडं आहे. वेस्टइंडीजच्या गोलंदाजांसारखंच त्यानेही कधी स्लेजिंग नाही केलं. त्याची बॅट, त्याचे हावभाव आणि मुख्य म्हणजे त्याचे डोळेच प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम करण्यासाठी पुरेसे असायचे. प्रतिस्पर्धी संघांनीही त्याला फारसं डिवचल्याचं लक्षात नाही. एकच किस्सा सांगतो. कौंटी क्रिकेटमध्ये टॉन्टन मैदानावर एक सामना सुरु होता. त्या सामन्यात रिचर्ड्स फलंदाजी करत होता. खरं तर त्यावेळी तो अजिबात फॉर्म मध्ये नव्हता. गोलंदाजांची आणि त्याची झटपट सुरु होती. कसाबसा तो आपली विकेट वाचवण्याचे प्रयत्न करत होता. अशावेळी गोलंदाजाने टाकलेला एक बाउन्सर त्याला चकवून विकेटकीपर कडे गेला. गोलंदाजाला वाटलं आता आपण रिचर्ड्सला डिवचलं की मिळालीच विकेट. तो रिचर्ड्सला म्हणाला. “तो चेंडू ना लाल रंगाचा आहे, गोल आहे, लेदरचा आहे आणि आता तुला त्याचा वास पण आला असेल ना.” रिचर्ड्सने ते ऐकलं फक्त. गोलंदाज पुढचा चेंडू टाकायला आला, आणि त्याने टाकलेला तो चेंडू परत एकदा बाउन्सर होता. तो रिचर्ड्सच्या डोळ्यासमोर आला, तेंव्हा रिचर्ड्सने बॅट फिरवली, हूक केला, आणि चेंडू मैदानाबाहेर असलेल्या नदीत पडला. आता ‘किंग’ गोलंदाजाकडे येऊन म्हणाला “तो चेंडू कसा दिसतो हे तू मगाशीच सांगितलंस. जा, बाहेर गेलेला तो चेंडू घेऊन ये.” तो राजा होता. 

आज विव्ह रिचर्ड्सने वयाची ७१ वर्षे पार केली आहेत. त्याने क्रिकेट खेळणे बंद करून देखील ३० वर्षे झाली आहेत. पण तो अजूनही क्रिकेट रसिकांच्या मनात कायम आहे. या ‘किंग व्हिव’ कडे बघून एकंच गोष्ट मनात येते. झाले बहू, होतीलही बहू… परी या सम हा !! 

– कौस्तुभ चाटे           

अशक्यप्राय विजय (दैनिक ऐक्य)

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम सामना कोणता असं जर विचारलं तर प्रत्येक क्रिकेटप्रेमी वेगवेगळं उत्तर देईल. आता क्रिकेट हा नुसता खेळ राहिलेला नसून एक व्यवसाय झाला आहे. त्यामुळे प्रत्येक लीग मधील प्रत्येक सामना चुरशीचा होत असतो. त्यात भरीस भर म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहेच. एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटचे चाहते देखील जगभर आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे सर्वोत्तम सामना बदलत राहणारच आहे. चला, तात्पुरता  कसोटी सामन्यांचा विचार करूया. गेल्या सुमारे १५० वर्षात साधारण २५०० कसोटी सामने खेळले गेले आहेत. (खरं म्हणजे लवकरच २५०० वा कसोटी सामना खेळला जाईल.) या सगळ्याचा विचार करता २ टाय टेस्ट मॅचचा उल्लेख बहुतेक सगळेच करतील. १९६०-६१ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज असा ब्रिस्बेन येथे झालेला सामना खऱ्या अर्थाने चुरशीचा झाला. दोन्ही संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचून देखील विजयी होऊ शकले नाहीत. दोन्ही संघांनी विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सामन्याची स्थिती सतत बदलत होती, आणि सामन्याचा शेवट मात्र ‘टाय’ म्हणजेच बरोबरीत झाला. तीच गत १९८६ च्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टाय टेस्टची. मद्रास इथे झालेला हा सामना देखील चांगलाच रंगला, पण एकही संघ विजयी ठरू शकला नाही, ना पराभूत झाला ना सामना अनिर्णित राहिला. या २ टाय टेस्ट वगळता अनेक सामने अत्यंत चुरशीने खेळले गेले. भारतीय रसिकांसाठी २००१ चा कोलकाताची भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट आणि २०२० चा ब्रिस्बेन कसोटी सामना कदाचित सर्वात जास्त संस्मरणीय असेल. पण इतर संघांनीही असेच काही संस्मरणीय आणि महत्वाचे सामने खेळले आहेत. 


क्रिकेट रसिकांना २०१८ ची अबूधाबीची कसोटी आठवत असेल, जेंव्हा न्यूझीलंडने पाकिस्तानला फक्त ४ धावांनी हरवले होते. किंवा १९९४ साली दक्षिण आफ्रिकेने फॅनी डी व्हिलर्स च्या गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला सिडनी कसोटी मध्ये मात दिली होती. २०१९ मध्ये श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेचा डर्बनमध्ये १ विकेटने पराभव केला होता. १९८७ साली सुनील गावसकरने बंगलोरमध्ये आणि १९९९ साली सचिन तेंडुलकरने चेन्नईमध्ये अप्रतिम फलंदाजी करून सुद्धा पाकिस्तानने दोन्ही सामन्यात भारताला अतिशय कमी फरकाने हरवले होते. अशा एक ना अनेक सामन्यांचा दाखला आपण देऊ शकतो. क्रिकेटची आणि खास करून कसोटी क्रिकेटची मजा या अटीतटीच्या सामन्यांमध्येच आहे. १९९३ साली असाच एक सामना ऍडलेड मध्ये खेळला गेला, जिथे वेस्टइंडीजने ऑस्ट्रेलियाला फक्त एका धावेने हरवले होते. विजयासाठी केवळ १८४ धावांची गरज असताना कर्टली अँब्रोज आणि कोर्टनी वॉल्शच्या गोलंदाजीच्या जोरावर वेस्टइंडीजने चमत्कार घडवला होता. आजही खरा क्रिकेट रसिक त्या सामन्याची आणि अँब्रोज-वॉल्श जोडीची आठवण प्रेमाने काढतो. २००५ साली बर्मिंगहॅमला असाच एक सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मध्ये खेळवला गेला. ऍशेस मालिकेचे महत्व दोन्ही संघांसाठी काय आहे ते वेगळे सांगायला नकोच. त्या सामन्यात विजयासाठी २८२ धावांची गरज असताना ऑस्ट्रेलियाचा संघ २७९ मध्ये सर्वबाद झाला होता. इंनिंग मधली शेवटची कॅस्प्रोविक्सची पडलेली विकेट, त्या नंतर चेहरे पडलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू, जल्लोष करणारे इंग्लिश खेळाडू आणि त्याचबरोबर मैदानावरील दोन्ही फलंदाजांचे सांत्वन करणारे खेळाडू देखील जगाने बघितले. काही वर्षांपूर्वी शेवटच्या फलंदाजाबरोबर भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला हरवणारा बेन स्टोक्स देखील आपण बघितला. अशी एक ना अनेक सामन्यांची उदाहरणे देता येतील हे नक्की. आज या सगळ्याच सामन्यांची आठवण काढायचे कारण म्हणजे काहीच दिवसांपूर्वी संपलेली न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड कसोटी. अतिशय चुरशीने खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा केवळ १ धावेने पराभव गेला. २५८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ फक्त २५६ धावा करू शकला. ही कसोटी देखील ‘ऑल टाइम फेव्हरेट’ मध्ये नक्की गणली जाईल. 

सध्या इंग्लंडचा कसोटी संघ वेगळ्याच फॉर्ममध्ये आहे. मागच्या वर्षी न्यूझीलंडचा माजी खेळाडू ब्रॅंडन मॅक्युलमने या संघाची धुरा हाताशी घेतल्यानंतर कसोटी क्रिकेटचे निकषच बदलून टाकले. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये एक वेगळीच आक्रमकता आणली. ‘बाझबॉल’ या नावाने ओळखली जाणारी ही आक्रमकता सध्याच्या घडीला कसोटी क्रिकेटमधील सर्वात चर्चिली जाणारी गोष्ट आहे. या आक्रमकतेला साथ लाभली ती इंग्लिश खेळाडूंची. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली या संघाने आक्रमकता अंगीकारून मैदान गाजवायला सुरुवात केली. स्टोक्स पाठोपाठच झॅक क्रॉली, जोस बटलर, ओली पोप, जो रूट आणि नवीन आलेला हॅरी ब्रूक, या सर्वांनी आक्रमक फलंदाजी करायला सुरुवात केली. न्यूझीलंड विरुद्धच्या या कसोटी मालिकेतही वेगळे काही घडत नव्हते. पहिला कसोटी सामना जिंकून इंग्लिश संघ भलत्याच जोशात होता. वेलिंग्टनला खेळला जाणारा दुसरा सामना देखील पाहुण्यांनी जवळजवळ खिशात घातलाच होता. पहिल्या डावात २२६ धावांची आघाडी मिळाल्यानंतर त्यांनी किवीना फॉलो-ऑन दिला. दुसऱ्या डावात मात्र न्यूझीलंडचे खेळाडू चांगले खेळले. केन विलियम्सनच्या शतकाच्या जोरावर त्यांनी ४८३ धावा जमवल्या. त्याला इतर खेळाडूंची मोलाची साथ लाभली. इंग्लिश संघाला हा सामना जिंकण्यासाठी चौथ्या डावात २५८ धावांची गरज होती, आणि त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न सुरु केलेही होते. चौथ्या दिवशीचा खेळ संपला तेंव्हा इंग्लंडच्या दुसऱ्या डावात एक गाडी बाद ४८ धावा झाल्या होत्या, आणि सामना अजूनही त्यांच्या ताब्यात होता. 

पाचव्या दिवशी मात्र किवी गोलंदाजांनी सकाळपासूनच तिखट मारा सुरु केला, आणि त्यांना यश देखील मिळत गेलं. इंग्लिश फलंदाज बाद होत गेले, आणि एका वेळी त्यांची धावसंख्या ५ बाद ८० अशी होती. क्रॉली, डकेट, पोप.. इतकंच काय पण प्रचंड फॉर्म मध्ये असलेला हॅरी ब्रूक देखील लगेच बाद झाला. हा सामना न्यूझीलंड जिंकेल अशी लक्षणं असतानाच बेन स्टोक्स आणि जो रूटने डाव सावरला. पण परत एकदा किवी गोलंदाजांनी चांगली कामगिरी करून इंग्लिश फलंदाजांवर दबाव आणायला सुरुवात केली. जिंकण्यासाठी ७ धावांची गरज असताना इंग्लंडचा जेम्स अँडरसन फलंदाजीला आला. जोडीला इंग्लंडचा चष्मीश ऑफ स्पिन बॉलर जॅक लीच होता. दोघांनी ७ पैकी ५ धावा जमवल्या देखील. अँडरसनने एक चौकार मारून विजयाच्या दृष्टीने पाऊल देखील टाकले होते. पण न्यूझीलंडचे गोलंदाज – खास करून नील वॅग्नर हार मानणारे नव्हते. त्यांनी इंग्लिश फलंदाजांना चकवण्याचे सत्र सुरूच ठेवले होते. अशातच लेग स्टंपवर पडलेला एक चेंडू अँडरसन खेळला, चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन मागे गेला, आणि यष्टीरक्षक टॉम ब्लांडेलने उजवीकडे झेपावत कॅच घेतला आणि इंग्लंडचा डाव संपला. अतिशय चुरशीने खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडचा एक धावेने पराभव झाला. अर्थातच किवी खेळाडूंसाठी आणि समर्थकांसाठी हा सामना एक अजरामर सामना म्हणून कायमच लक्षात राहील. 

इकडे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका होत असताना, सामने ३ दिवसात संपत आहेत. स्पिन गोलंदाजीसाठी उपयुक्त असलेल्या विकेट्सवर ऑस्ट्रेलियन आणि भारतीय फलंदाज देखील काही खास करू शकले नाहीयेत, आणि त्यामुळे या सामन्यातील रंजकता देखील काहीशी कमी झाली आहे. त्यात हा असा (न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड) सामना रंगला की क्रिकेट रसिकांचे लक्ष हमखास तिकडे जाते. भारतातही अनेक रसिकांनी आपला कसोटी सामना बाजूला ठेवून या सामन्याचा आनंद घेतला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अनेक अजरामर सामने झाले आहेत, त्यातीलच हा एक सामना कायमच आपल्या लक्षात राहील. हीच कसोटी क्रिकेटची खरी गंमत आहे. हे असे अशक्यप्राय सामाणेच कसोटी क्रिकेट जिवंत ठेवतात. 

– कौस्तुभ चाटे     

जगज्जेते ऑस्ट्रेलिया (दैनिक केसरी) 

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने पुन्हा एकदा टी-२० विश्वचषकावर स्वतःचे नाव कोरले. खरं सांगायचं तर ही बातमी होऊच शकत नाही. ऑस्ट्रेलियाचा हा महिला क्रिकेट संघ अतिशय बलाढ्य आहे, आणि क्रिकेटच्या तीनही फॉरमॅट्स मध्ये त्यांनी स्वतःला वेळोवेळी सिद्ध केले आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघाने टी-२० विश्वचषक एकदा-दोनदा नव्हे तर तब्बल सहा वेळा जिंकला आहे. २००९ मध्ये या विश्वचषक स्पर्धेची सुरुवात झाली, तेंव्हापासून २ वर्षे वगळता (२००९ आणि २०१६) ही ट्रॉफी ऑस्ट्रेलियाकडेच आहे. मागच्या रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा १९ धावांनी पराभव करून ही विजयश्री खेचून आणली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १५६ धावा केल्या. त्यामध्ये त्यांची प्रमुख फलंदाज बेथ मूनी हिच्या अर्धशतकाचा समावेश होता. मूनीने केवळ ५३ चेंडूत ७४ धावा केल्या. इतर फलंदाजांनी देखील तिला साथ दिली. दक्षिण आफ्रिका १५७ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरली तेंव्हा ते आव्हान पुरेसे वाटत होते. आजकाल १५०-१६० या धावसंख्येचा पाठलाग करणे हे मोठे आव्हान वाटत नाही. त्यामुळे या वर्षी आपल्याला नवीन विजेता बघायला मिळेल अशी आशा होती. पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी ते घडू दिले नाही. त्यांनी आफ्रिकेला २० षटकात १३७ च्या धावसंख्येवर रोखले. आफ्रिकेकडून त्यांची सलामीची फलंदाज लॉरा व्हॉल्वर्ड हिने चांगली खेळी केली, पण ती पुरेशी ठरली नाही. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी टिच्चून मारा करत संघाला विजय मिळवून दिला. बेथ मूनीला सामनाविराचा पुरस्कार देण्यात आला तर ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू अशले गार्डनर हिने मालिकावीराचा पुरस्कार पटकावला. 


या स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच (नेहेमीप्रमाणे) ऑस्ट्रेलियाकडे संभाव्य विजेते म्हणून बघितले जात होते. ज्या संघात मूनी,अलिसा हिली, मेग लॅनिंग, एलिस पेरी, ताहलिया मॅकग्रा, गार्डनर सारख्या खेळाडू आहेत, तो संघ किती मजबूत असेल याची आपण कल्पनाच करू शकतो. ऑस्ट्रेलिया कायमच आयसीसी ट्रॉफी स्पर्धेत आपली छाप सोडत आली आहे. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट आणि इतर देशांमधील महिला क्रिकेट यामध्ये खूप मोठी तफावत आहे. इंग्लंड, न्यूझीलंड किंवा भारतासारखे संघ या संघाला कधीकधी आव्हान देतात खरे, पण ऑस्ट्रेलियन संघ या सर्वच संघांच्या कायमच पुढे आहे. केवळ तुलनेसाठी एक उदाहरण द्यायचे झाले तर, भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये झालेल्या गेल्या २० सामन्यांकडे बघूया. या २० पैकी १९ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत, तर भारताला केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. आणि हा विजय देखील भारताला ‘सुपर ओव्हर’ मध्ये मिळाला आहे. याचाच अर्थ ऑस्ट्रेलियाने कायमच भारतीय संघावर वर्चस्व मिळवले आहे. जी गत भारताची, तीच कमी जास्त प्रमाणात इतर संघांची देखील आहे. या विजयाचे विश्लेषण करायचे झाले तर ऑस्ट्रेलियाचे क्रीडा धोरण, प्रत्येक गोष्टीकडे व्यावसायिक दृष्ट्या बघण्याची पद्धत (professionalism), क्रिकेट सारख्या खेळाबरोबर खेळाडू इतरही खेळ खेळतात, ट्रेनिंग आणि आहार याची योग्य सांगड, अद्ययावत सुविधा आणि इतरही काही कारणे सांगता येतील. मुळातच या संघाकडे असलेली विजिगिषु वृत्ती, आणि मैदानावर १०० टक्के झोकून देण्याची तयारी यामुळे हा विजय मिळवणे त्यांना सहज शक्य होते. ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही, आणि प्रत्येक सामन्यात सहजपणे विजय मिळवला. अपवाद भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्याचा. तिथे एका क्षणी भारतीय संघ विजयाच्या मार्गावर होता, पण एक छोटासा कवडसा दिसताच ऑस्ट्रेलियन संघाने चांगला खेळ करत विजयाचे दार ठोठावले. 

दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे देखील कौतुक केले पाहिजे. आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत त्यांनी प्रथमच अंतिम फेरी गाठली. गेल्या काही वर्षात आफ्रिकेचा महिला संघ चांगल्या प्रकारे मार्गक्रमण करत आहे. घराच्या मैदानावर खेळताना त्यांना काही सामन्यांमध्ये अडथळे आले खरे, पण नेटाने प्रयत्न करत त्यांनी अंतिम फेरी गाठली. आफ्रिकेच्या फलंदाज लॉरा व्हॉल्वर्ड आणि ताजमिन ब्रिट्स यांनी चांगली कामगिरी केली तर गोलंदाजीमध्ये मारिझेन कॅप आणि शबनीम इस्माईल चमकल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी त्यांचा उपांत्य फेरीचा सामना महत्वाचा ठरला. उपांत्य फेरीत त्यांनी बलाढ्य इंग्लिश संघाला नमवलं. त्या सामन्यात व्हॉल्वर्ड आणि ब्रिट्स यांनी अर्धशतकी खेळी केल्या तर मारिझेन कॅपने देखील चांगली फलंदाजी केली. इंग्लिश संघासमोर त्यांनी १६५ धावांचे लक्ष्य ठेवले होते, पण दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडला १५८ धावा करता आल्या. आफ्रिकेतर्फे इस्माईलने ३ तर आयबंगा खाका हिने ४ बळी घेतले. त्यांच्या खेळाडू हीच कामगिरी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर करू शकल्या नाहीत, अन्यथा क्रिकेट विश्वाला एक नवीन विजेता संघ बघायला मिळाला असता. भारताचा विचार करता, आपण उपांत्य फेरी गाठली खरी, पण तिथे मात्र आपण ढेपाळलो. हातात असलेला सामना आपण छोट्या छोट्या चुकांमुळे ऑस्ट्रेलियाच्या हवाली केला. एकूणच या स्पर्धेत आपली सांघिक कामगिरी चांगली झाली नाही, ना आपली कोणी खेळाडू स्पर्धेत चमकली. याचाच परिणाम म्हणजे रिचा घोष वगळता एकही भारतीय खेळाडू आयसीसीच्या संघात स्थान पटकावू शकली नाही. 

आता या स्पर्धेनंतर लगेचच WPLची सुरुवात होईल. ही स्पर्धा भारतीयच नव्हे तर इतर खेळाडूंसाठी देखील महत्वाची असेल. ऑस्ट्रेलियातील WBBL किंवा इंग्लंड मधील Women’s Hundred सारखीच ही स्पर्धा यशस्वी होईल यात काही शंका नाही. अनेक भारतीय खेळाडू इतर देशातील खेळाडूंसह एकाच संघात खेळतील, ज्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल. IPL प्रमाणेच ही लीग देखील महिला क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेईल पण या लीगचा फायदा जसा भारतीय क्रिकेटपटूंना होणार आहे, तसाच इतरही खेळाडूंना होणार आहे. ज्या खेळाडूंना भारतात खेळणे आव्हानात्मक असते, भारतीय विकेट्स आणि हवामान याच्याशी जुळवून घेणे अवघड ठरते, अश्या खेळाडूंसाठी ही लीग पर्वणीच असेल. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज मधील अनेक खेळाडू या लीग मध्ये भाग घेत आहेत. प्रोफेशनली क्रिकेट खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडू या संधीचा नक्कीच लाभ उठवतील. गेली अनेक वर्षे त्या क्रिकेटवर अधिराज्य गाजवत आहेत. आता भारतात सलग क्रिकेट खेळण्याचा अनुभव त्यांना अजूनच खंबीर बनवेल. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट बलवान आहेच, आता या क्रिकेटपटू आणखी ताकदीने क्रिकेट खेळतील. ऑस्ट्रेलियन संघ जगज्जेता आहेच, पण येणारी अजून काही वर्षे देखील त्यांचीच असतील यात शंका नाही. 

– कौस्तुभ चाटे      

To know more about Crickatha