ball

वन टेस्ट वंडर्स (दैनिक ऐक्य, सातारा)

by

‘वन टेस्ट वंडर’ या तीन शब्दांना क्रिकेट इतिहासात एक वेगळंच वलय आहे. १५० वर्षांच्या टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक खेळाडू होऊन गेले की ज्यांना त्यांच्या देशाकडून फक्त एकच कसोटी सामना खेळता आला. काही ना काही कारणांमुळे त्यांच्या नशिबी दुसरी कसोटी खेळण्याचं भाग्य लाभलं नाही. बहुतेकवेळा पहिल्या कसोटी सामन्यातील खराब कामगिरी हे कारण असलं तरी इतरही काही गोष्टी नक्कीच आहेत की ज्यामुळे ते दुसरा कसोटी सामना खेळू शकले नाहीत. एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटच्या उदयानंतर अनेक खेळाडू क्रिकेटच्या त्या फॉरमॅट्स मध्ये खेळले, आपल्या देशांसाठी त्यांनी चांगली कामगिरी देखील केली, पण त्यांना दुसरा कसोटी सामना लाभला नाही. आजच्या घडीला १२ देशांना कसोटी क्रिकेटचा टिळा लागला आहे, आणि सध्याची एकूणच कसोटी क्रिकेटची अवस्था बघता, आता या यादीत नवीन देशांचा समावेश होईल असे वाटत नाही. या १२ देशांमधून अनेक खेळाडू असे आहेत की त्यांनी दुसरा कसोटी सामना बघितला नाही. अर्थातच या प्रत्येक खेळाडूची माहिती देणे शक्य नाही, पण काही प्रमुख खेळाडूंची माहिती या लेखात देण्याचा प्रयत्न करीत आहे. हे एका अर्थाने प्रमुख ‘वन टेस्ट वंडर्स’ आहेत असे म्हणता येईल. 

१. अँडी गँटम : हा वेस्टइंडीजचा फलंदाज. त्रिनिदाद कडून खेळणाऱ्या अँडी गँटमने १९४६ साली इंग्लंड विरुद्ध पोर्ट ऑफ स्पेन येथे कसोटी मध्ये पदार्पण केले. गँटमने खरे म्हणजे त्या कसोटी मध्ये शतक ठोकले होते. वेस्ट इंडिजसाठी डावाची सुरुवात करताना त्याने ११२ धावा केल्या. पण त्याच्या खेळीवर टीका केली गेली. उपस्थित पत्रकारांनी त्याच्यावर अतिशय संथपणे खेळण्याचा आरोप लावला. (जो काही अंशी खरा होता.) पहिलाच सामना खेळत असलेला गँटम शतकाच्या जवळ आल्यानंतर अजूनच सावकाश फलंदाजी करू लागला. त्याने शतक पूर्ण केले खरे, पण चौथ्या डावात वेस्ट इंडिजला तो सामना जिंकण्याची संधी होती, ती मात्र पूर्ण झाली नाही. अखेरीस तो सामना अनिर्णित राहिला. तो सामना न जिंकण्याचे खापर गँटम याच्यावर फोडण्यात आले. त्या कसोटी सामन्यानंतर अँडी गँटमला पुढे कधीही कसोटीसाठी निवडले गेले नाही. केवळ एका डावात ११२ धावा या कारणाने अँडी गँटम या फलंदाजाच्या नावे सर्वोच्च सरासरीचा विक्रम आहे. 

२. रॉडनी रेडमंड : न्यूझीलंडच्या रेडमंड याने देखील त्याच्या पहिल्या – आणि एकमेव कसोटी सामन्यात शतक ठोकले आहे. १९७३ साली पाकिस्तानविरुद्ध रावळपिंडी येथे खेळताना त्याने दोन्ही डावात मिळून १६३ धावा केल्या. पहिल्या डावात १०७ आणि दुसऱ्या डावात ५६ अशी त्याची कामगिरी होती. तो मालिकेतील शेवटचा सामना होता, आणि पुढे काही महिन्यांनी न्यूझीलंडचा संघ इंग्लंडचा दौरा करणार होते. त्या दौऱ्यासाठी रेडमंड याची निवड पक्की होती, परंतु मधल्या काळात त्याचा फॉर्म ढासळला. त्याच्या बॅटमधून धावा निघेनाश्या झाल्या. भरीस भर म्हणून तो जे नवीन ‘कॉन्टॅक्ट लेन्स’ वापरत होता, त्या लेन्सबरोबर जमवून घेणे (ऍड्जस्ट करणे) त्याला शक्य झाले नाही. आणि इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची निवड झाली नाही. तो पुढे कधीही न्यूझीलंड साठी कसोटी क्रिकेट खेळू शकला नाही. अर्थात त्या १९७३ च्या इंग्लंड दौऱ्यातच त्याने २ एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले. 

३. मिक मलोन : मिक मलोन हा ऑस्ट्रेलियाकडून खेळणारा जलदगती गोलंदाज. १९७७ साली त्याने इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा कसोटी मध्ये पदार्पण केले. ओव्हल वर झालेल्या त्या सामन्यात त्याने पहिल्या डावात ५ बळी घेतले होते, तसेच फलंदाजी करताना ४६ धावा देखील केल्या. एकूणच त्याचे ऑस्ट्रेलियासाठी चांगले पदार्पण झाले असे म्हणता येईल. परंतु त्यावेळी ऑस्ट्रेलियामध्ये ‘पॅकर सर्कस’ चे होते. मलोनने देखील केरी पॅकर यांच्या वर्ल्ड सिरीज क्रिकेटची वाट धरली, आणि त्या कारणाने त्याचे ऑस्ट्रेलियन संघासाठीचे दरवाजे बंद झाले. तो परत कधीही ऑस्ट्रेलियासाठी खेळू शकला नाही. 

४. साबा करीम : साबा करीम हा १९९९-२००० च्या सुमारासचा भारताचा चांगला यष्टीरक्षक म्हणून ओळखला जात असे. १९९७ साली त्याने भारतासाठी एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले तो भारतासाठी ३४ एकदिवसीय सामने खेळला आहे. बांगलादेश विरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी २००० साली त्याला खेळवण्यात आले. त्या सामन्यात त्याची कामगिरी बरी होती. पुढे एका सामन्यात यष्टिरक्षण करत असताना अनिल कुंबळेचा एक चेंडू उसळून त्याच्या डोळ्याला लागला आणि त्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर तो कधीही भारतासाठी खेळू शकला नाही. 

५. एड जॉयस : एड जॉयस हा आयर्लंडचा खेळाडू. तो सुरुवातीला काही काळ इंग्लंडसाठी देखील खेळला. इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. पण इंग्लंड कडून कसोटी खेळणे त्याच्या नशिबात नव्हते. आयर्लंडच्या पहिल्या कसोटी सामन्यात २०१८ साली पाकिस्तान विरुद्ध त्याला खेळण्याची संधी मिळाली. त्या सामन्यात त्याने दोन्ही डावात मिळून ४७ धावा केल्या. त्यानंतर तो आयर्लंडसाठी अनेक एकदिवसीय तसेच टी-२० सामने देखील खेळला, पण पुन्हा कसोटी क्रिकेट खेळण्याचे भाग्य त्याला लाभले नाही. 

६. रॉबिन सिंग : १९९० च्या दशकात रॉबिन सिंग भारतीय एकदिवसीय संघाचा प्रमुख खेळाडू होता. त्याची डावखुरी फलंदाजी, मध्यमगती गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर त्याने अनेक क्रिकेट रसिकांची मने जिंकली. त्रिनिदादमध्ये जन्मलेला – रवींद्र रामनारायण सिंग पुढे भारतात स्थायिक झाला आणि रॉबिन सिंग या नावाने प्रसिद्ध झाला. १३६ एकदिवसीय सामन्यात तो भारताकडून खेळला असला तरी त्याला केवळ एका कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. १९९८ साली हरारे येथे झिम्बाब्वे विरुद्ध खेळताना त्याने दोन्ही डावात मिळून २७ धावा केल्या, आणि गोलंदाजी करताना त्याला बळी मिळाला नाही. त्याचे कसोटी पदार्पण फारसे चांगले झाले नाही, आणि नंतर तो भारतासाठी पुढे कसोटी खेळला नाही. 

गमतीची गोष्ट म्हणजे रॉबिन सिंग नावाचा अजून एक खेळाडू भारतासाठी कसोटी खेळला आहे. (हा रॉबिन सिंग कोणाच्या फारसा लक्षात असण्याची शक्यता नाही.) हा दिल्लीचा वेगवान गोलंदाज होता, आणि १९९९ साली तो भारताकडून त्याचा पहिला (आणि एकमेव) कसोटी सामना खेळला. न्यूझीलंड विरुद्ध हॅमिल्टन येथे झालेल्या या सामन्यात त्याने ३ बळी देखील मिळवले. परंतु तो परत कधीही भारतासाठी क्रिकेट (कसोटी अथवा एकदिवसीय सामना) खेळला नाही. 

वर उल्लेखलेली ही नावे अगदीच प्रातिनिधिक आहेत. ‘वन टेस्ट वंडर्स’ चा विचार करता अनेक खेळाडू या यादीत येऊ शकतात. फक्त भारतीय खेळाडूंचाच विचार करायचा झाल्यास अरविंद आपटे, मधू रेगे, बाळ दाणी, सदाशिव पाटील, चंद्रकांत पाटणकर, रमेश सक्सेना, के. जयंतीलाल, योगराज सिंग (युवराज सिंगचे वडील), अजय शर्मा, सलील अंकोला, विजय यादव, इक्बाल सिद्दीकी, निखिल चोप्रा, विनय  कुमार,नमन ओझा, कर्ण शर्मा अशी अनेक नावे घेता येतील. 

– कौस्तुभ चाटे         

To know more about Crickatha