जगात क्रिकेट खेळणारे, म्हणजे कसोटी क्रिकेट खेळणारे जेवढे देश आहेत त्यातील तीनचार देशांची मिळून जितकी लोकसंख्या असेल तितकी एकट्या भारताची आहे. त्यात परत तो आपला राष्ट्रीय खेळ नसला तरी बहुसंख्य लोक क्रिकेट बघत असतात, किंवा त्यांना त्यात रुची असते. बऱ्याच लोकांना आपल्याला क्रिकेट कळतं असंही वाटतं. त्यांच्या अज्ञानाची वारुळं फोडणं कठीण आहे. ही अज्ञानाची वारुळं जगभर आहेत. अगदी क्रिकेटची जननी असलेल्या इंग्लंडमध्येसुद्धा लॉर्ड्सच्या संग्रहालयात विख्यात गोलंदाज अमीर इलाही हा ऑफ स्पिनर आहे असं त्याच्या फोटोच्या खाली लिहिलं होतं, आणि तो बिचारा आयुष्यभर लेगस्पिन टाकत राहिला. असो! आजचा विषय आपल्या भारतापुरता आहे. आपल्या देशात १९३२ सालापासून जवळपास तीनशेच्या आसपास खेळाडू कसोटी क्रिकेट खेळले आहेत. एक कसोटी खेळणारे (असे बरेच लोक आहेत. ही यादी लांबलचक होईल म्हणून दिली नाहीये) ते दोनशे कसोटी खेळणारा सचिन तेंडुलकर, अनेक खेळाडूंनी भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यातले काही खेळाडू, खरं तर बरेच खेळाडू असे आहेत, जे दुसऱ्या एखाद्या देशात जन्मले असते तर बरेच कसोटी सामने खेळले असते. ह्या ना त्या कारणाने त्यांना कसोटीचा टिळा लागला नाही. कधी विभागीय राजकारण आड आलं, कधी कसोटी सामन्यांमध्ये असलेल्या दीर्घ कालावधीमुळे त्यांचा चांगला फॉर्म खराब झालेला असायचा. (पूर्वी असं व्हायचं. आता एखादा खेळाडू पाचदहा वर्षांत ५० कसोटी सामने सहज खेळतो.) काही काही खेळाडू देशांतर्गत सामन्यात पोत्याने धावा करीत किंवा खोऱ्याने बळी मिळवत असत, पण निवड समितीची मेहेरनजर त्यांना कधी लाभली नाही. दोन ऑफ-स्पिनर एका वेळी खेळायचे पण दोन डावखुरे स्पिनर्स चालत नसत. त्यामुळे बऱ्याच डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांना त्यांची जादू आंतरराष्ट्रीय पातळीवर दाखवता आली नाही. राजिंदर सिंग हंस (७८ सामन्यात ३४० बळी), मुमताज हुसेन (६६ सामन्यात २१४ बळी), उत्पल चॅटर्जी (१२९ सामन्यात ५४० बळी) हे काही दुर्दैवी खेळाडू. उदय जोशी हा ऑफस्पिनर (१८६ सामन्यात ५५७ बळी) भारताकडून संधी मिळणार नाही हे उमजून पुढे इंग्लंडमध्ये जाऊन ससेक्सच्या संघातून बरीच वर्षे खेळला. आपल्याकडे वेगावर गोलंदाज तर नव्हतेच, पण जे थोडेफार होते, त्यांना भारतात उत्तम फिरकी गोलंदाज आहेत म्हणून कधी संधीच मिळाली नाही. बरून बर्मन (५४ सामन्यात १४६ बळी), रणदेब बोस (९० सामन्यात ३१७ बळी – ह्याने एकंदर १०,७०८ चेंडू टाकले, पण त्यात एकही नो बॉलची नोंद नाही.) आणि इतरही अनेक वेगवान गोलंदाज आहेत. आपला सुरू नायक (६८ सामन्यात १३२ बळी) – सुनील गावसकरच्या मैत्रीचा टिळा लागल्याने – इंग्लंडचा विस्मरणीय (दुसरं काय म्हणणार?) असा दौरा करून आला. (कसोटी कारकीर्द – २ सामने, १९ धावा, २३१ धावा देऊन १ बळी).
आजही जेव्हा संघाची निवड होते, तेव्हा काही काही खेळाडूंची नावे बघून ‘का?’ असा प्रश्न उभा राहतो. चला, आज आपण अशा काही खेळाडूंचा संघ तयार करू, जे खरोखर गुणवान खेळाडू होते, पण त्यांना कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून खेळायची संधी नाही मिळाली. हां, आणि मुख्य गोष्ट म्हणजे हा संघ एका आदर्श कसोटी संघाचे सर्व निकष काटेकोरपणे लावून केलेला असेल. ह्या संघाबद्दल अनेकांची वेगळी मतं असू शकतात, मतभेद असू शकतात. काही क्रिकेटप्रेमींना तो पटेलही. तुम्ही एखाद्या खेळाडूबद्दल, तो गुणवान आहे, संधी मिळाली नाही अशी काही कारणं सांगूही शकाल, पण शेवटी त्या खेळाडूची आकडेवारी महत्त्वाची ठरते. गुणवत्ता अफाट असू दे, पण शेवटी धावा अथवा बळींची संख्या किती ह्यावर त्याचं स्थान ठरणार आहे. एक अगदी साधं उदाहरण घेऊ. सौरव गांगुली आणि विनोद कांबळी, दोघेही डावखुरे आक्रमक फलंदाज. कांबळी संघात असता तर गांगुली दिसलाच नसता , जगासमोर आलाच नसता असं म्हणणारे अनेकजण आहेत. (बहुतेक करून मुंबईकर – ज्यांना पद्माकर शिवलकर बिशनसिंग बेदीपेक्षा चांगला गोलंदाज होता असं वाटतं.) पण प्रत्यक्षात काय आहे? गांगुली खेळत राहिला, उत्तम कप्तान झाला, २००३च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत संघाला घेऊन गेला. कारकिर्दीचा कालावधी आणि आकडेवारी हेच सांगते की गांगुली निःसंशयपणे डावखुरा असून गुणात्मकदृष्ट्या उजवा होता. त्यामुळे माझ्या ह्या संघाची निवड करताना आकडेवारी आणि कारकिर्दीची वर्षे महत्त्वाची असणार आहेत. कदाचित कसोटी निवडीच्या वेळी त्यांचा फॉर्म हरवला असेल, पण एकूणच देशांतर्गत सामन्यांत त्यांनी वर्षानुवर्षे उत्तम कामगिरी केली असेल, नव्हे केली आहे. असो, आता आपण हा दुर्दैवी पण गुणवान भारतीय संघ कोणता आहे ते बघू.
संघ निवडताना काही निकष इथे पाळले गेले आहेत. आघाडीच्या जोडीमध्ये एक डावरा आणि दुसरा उजवा फलंदाज आहे, ज्यामुळे प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना दिशा, स्विंग आणि टप्पा ह्याबाबत वारंवार बदल करावा लागेल, आणि त्यांना लय सापडणे अवघड जाईल. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा खेळाडू आक्रमक आणि प्रसंगी संयमी फलंदाजी करणारा असावा. त्यात तो अगदी माफक प्रमाणात गोलंदाज असेल तर सोन्याहून पिवळे. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर खेळणारे फलंदाज बचावात भक्कम असले पाहिजेत.शिवाय ते मोठी खेळी करणारे आणि संघ अडचणीत असेल तर खेळपट्टीवर वेळ काढून धावफलक हलता ठेवणारे असावेत. त्यांच्याकडे गुणवत्तेबरोबरच कणखरपणा असणे आवश्यक आहे. सहाव्या क्रमांकावर विकेट-कीपर असावा. त्याच्यावर एखाद-दुसरा झेल सोडण्याची आणि अर्धशतक काढण्याची जबाबदारी नसावी. पुढे सातव्या क्रमांकावर अष्टपैलू खेळाडू असावा (म्हणजे वेंकटराघवन नाही. त्याला अष्टपैलू समजण्याचा मूर्खपणा अनेक वर्षे चालू होता.) आणि सातव्या क्रमांकावर खेळणारा जर फिरकी अष्टपैलू असेल तर पुढे दोन किंवा तीन वेगवान गोलंदाज असावेत. तर असा असेल आपला दुर्दैवी परंतु गुणवान खेळाडूंचा संघ. ह्या संघातील कोणीही खेळाडू केवळ २-५ वर्षे खेळलेला नाहीये, तर अनेक वर्षे खेळून भरपूर धावा किंवा असंख्य बळी घेतलेला खेळाडू आहे. ह्या संघातील प्रत्येक फलंदाजाने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये किमान १४-१५ शतके ठोकलेली आहेत, आणि गोलंदाजांनी २००पेक्षा जास्त बळी घेतले आहेत. तर असा आहे हा संघ…
१. गगन खोडा – उजव्या हाताने फलंदाजी करणारा सलामीचा फलंदाज |
|
फर्स्ट क्लास रेकॉर्ड
सामने – १३२
धावा – ८५१६
सरासरी – ३९.०६
शतके – २० |
२. अमेय खुरासिया – डावखुरा आक्रमक सलामीचा फलंदाज. |
|
फर्स्ट क्लास रेकॉर्ड
सामने – ११९
धावा – ७३०४
सरासरी – ४०.८०
शतके – २१ |
३. श्रीधरन श्रीराम – भरपूर धावा आणि अनेक बळी असे ह्याचे वैशिष्ट्य म्हणता येईल. सध्याच्या ऑस्ट्रेलियन
संघाचा फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक |
|
फर्स्ट क्लास रेकॉर्ड
सामने – १३३
धावा – ८५३९ सरासरी – ५२.९९
शतके – ३२
बळी – ११५ |
४. अमोल मुजुमदार (कप्तान) – संघाचा कणा म्हणावा लागेल. प्रदीर्घ काळ खेळपट्टीवर टिकून राहण्याची क्षमता. |
|
फर्स्ट क्लास रेकॉर्ड
सामने – १७१
धावा – १११६७
सरासरी – ४८.१३
शतके – ३० |
५. भास्कर पिल्ले / मिलिंद गुंजाळ – संघाचे महत्वाचे फलंदाज. दोघांपैकी कोणीही संघात असावा (किंवा दोघेही) |
|
फर्स्ट क्लास रेकॉर्ड
सामने – ९५
धावा – ५४४३
सरासरी – ५२.८४
शतके – १८ |
|
फर्स्ट क्लास रेकॉर्ड
सामने – ८८
धावा – ५४२७
सरासरी – ४७.१९
शतके – १४ |
६. दलजित सिंग / पंकज धर्मानी (यष्टीरक्षक) – चांगले यष्टीरक्षक. दोघेही बरीच वर्षे चांगलं क्रिकेट खेळले आहेत. |
|
फर्स्ट क्लास रेकॉर्ड
सामने – ८७
धावा – ३९६४
सरासरी – ३२.७६
शतके – ७
झेल – १५७
यष्टिचीत – ६८/td>
|
|
फर्स्ट क्लास रेकॉर्ड
सामने – १४७
धावा – ९३१२
सरासरी – ५०.०६
शतके – २६
झेल – २६९
यष्टिचीत – २१ |
७. आशिष विन्स्टन झैदी – त्याच्या काळचा अत्यंत चांगला गोलंदाज. कमकुवत संघाकडून खेळल्यामुळे वाट्याला
फारसे सामने आले नाहीत. |
|
फर्स्ट क्लास रेकॉर्ड
सामने – ११०
बळी – ३७८
सरासरी – २७.७९
स्ट्राईक रेट – ५७.६० |
८. पांडुरंग साळगांवकर – खरं तर कोणत्याही संघात समावेश होईल असा खराखुरा वेगवान गोलंदाज. |
|
फर्स्ट क्लास रेकॉर्ड
सामने – ६४
बळी – २१४
सरासरी – २६.७० |
९. राजिंदर गोयल – डावखुरा फिरकी गोलंदाज. प्रदीर्घ कारकीर्द, आणि भरपूर बळी. वारंवार योग्यता सिद्ध
करूनही निवड नाही. मी पद्माकर शिवलकरपेक्षा गोयलला पसंती देईन कारण शिवलकर कायम बलवान संघाकडून
खेळले, आणि गोयल तुलनेने कमकुवत संघाकडून. |
|
फर्स्ट क्लास रेकॉर्ड
सामने – १५७
बळी – ७५०
सरासरी – १८.५८
स्ट्राईक रेट – ५३.०० |
१०. सरकार तलवार – एक चांगला ऑफ स्पिनर. हरयाणाकडून जवळजवळ २० वर्षे खेळला. |
|
फर्स्ट क्लास रेकॉर्ड
सामने – १०६
बळी – ३५७
सरासरी – २४.८८
स्ट्राईक रेट – ५७.६० |
११. अनंतपद्मनाभन – उत्कृष्ट लेगब्रेक गोलंदाज. चंद्रशेखर सारखा लेगब्रेक बॉलर, आणि इतर स्पिनर असताना
त्याला संधी मिळू शकली नाही. |
|
फर्स्ट क्लास रेकॉर्ड
सामने – १०५
बळी – ३४४
सरासरी – २७.५४
स्ट्राईक रेट – ६२.६० |
१२. सुनील वॉल्सन – एक चांगला डावखुरा वेगवान गोलंदाज. १९८३च्या विश्वचषक संघात होता, तेव्हाही
संघातून फिरला, कदाचित ह्या संघातदेखील फिरस्ता असेल. |
|
फर्स्ट क्लास रेकॉर्ड
सामने – ७५
बळी – २१२
सरासरी – २५.३५
स्ट्राईक रेट – ४६.९० |
ह्याशिवाय ह्या संघात अजून काही खेळाडूंची वर्णी लागू शकते. प्रामुख्याने त्यात रमेश नागदेव (आघाडीचा डावखुरा आक्रमक फलंदाज, पुढे तो परदेशात निघून गेला), कंवलजीत सिंग (हैद्राबादचा ऑफ ब्रेक बोलर – ह्याने वयाच्या ४० आणि ४१व्या वर्षी स्थानिक क्रिकेटमध्ये प्रत्येकी १०० बळी मिळवले होते), देवेंद्र बुंदेला (मध्य प्रदेशचा अष्टपैलू खेळाडू – ह्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १००००पेक्षा जास्त धावा केल्या आहेत), सीतांशू कोटक (सौराष्ट्रकडून खेळणारा, आणि गोलंदाजांचा अंत पाहण्यासाठी प्रसिद्ध असलेला फलंदाज) ह्यांचा विचार केला जाऊ शकतो. तर असा हा दुर्दैवी परंतु गुणवान क्रिकेटपटूंचा संघ. ह्यातील प्रत्येक खेळाडू दुसऱ्या एखाद्या देशात जन्माला आला असता, तरीदेखील नक्की कसोटी सामने खेळला असता. ह्या यादीत काही नावे राहून गेली असण्याची शक्यता आहे. तबीयतदार तज्ज्ञ लोकांनी ती भरून काढावी.