ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने पुन्हा एकदा टी-२० विश्वचषकावर स्वतःचे नाव कोरले. खरं सांगायचं तर ही बातमी होऊच शकत नाही. ऑस्ट्रेलियाचा हा महिला क्रिकेट संघ अतिशय बलाढ्य आहे, आणि क्रिकेटच्या तीनही फॉरमॅट्स मध्ये त्यांनी स्वतःला वेळोवेळी सिद्ध केले आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघाने टी-२० विश्वचषक एकदा-दोनदा नव्हे तर तब्बल सहा वेळा जिंकला आहे. २००९ मध्ये या विश्वचषक स्पर्धेची सुरुवात झाली, तेंव्हापासून २ वर्षे वगळता (२००९ आणि २०१६) ही ट्रॉफी ऑस्ट्रेलियाकडेच आहे. मागच्या रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा १९ धावांनी पराभव करून ही विजयश्री खेचून आणली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १५६ धावा केल्या. त्यामध्ये त्यांची प्रमुख फलंदाज बेथ मूनी हिच्या अर्धशतकाचा समावेश होता. मूनीने केवळ ५३ चेंडूत ७४ धावा केल्या. इतर फलंदाजांनी देखील तिला साथ दिली. दक्षिण आफ्रिका १५७ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरली तेंव्हा ते आव्हान पुरेसे वाटत होते. आजकाल १५०-१६० या धावसंख्येचा पाठलाग करणे हे मोठे आव्हान वाटत नाही. त्यामुळे या वर्षी आपल्याला नवीन विजेता बघायला मिळेल अशी आशा होती. पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी ते घडू दिले नाही. त्यांनी आफ्रिकेला २० षटकात १३७ च्या धावसंख्येवर रोखले. आफ्रिकेकडून त्यांची सलामीची फलंदाज लॉरा व्हॉल्वर्ड हिने चांगली खेळी केली, पण ती पुरेशी ठरली नाही. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी टिच्चून मारा करत संघाला विजय मिळवून दिला. बेथ मूनीला सामनाविराचा पुरस्कार देण्यात आला तर ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू अशले गार्डनर हिने मालिकावीराचा पुरस्कार पटकावला.
या स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच (नेहेमीप्रमाणे) ऑस्ट्रेलियाकडे संभाव्य विजेते म्हणून बघितले जात होते. ज्या संघात मूनी,अलिसा हिली, मेग लॅनिंग, एलिस पेरी, ताहलिया मॅकग्रा, गार्डनर सारख्या खेळाडू आहेत, तो संघ किती मजबूत असेल याची आपण कल्पनाच करू शकतो. ऑस्ट्रेलिया कायमच आयसीसी ट्रॉफी स्पर्धेत आपली छाप सोडत आली आहे. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट आणि इतर देशांमधील महिला क्रिकेट यामध्ये खूप मोठी तफावत आहे. इंग्लंड, न्यूझीलंड किंवा भारतासारखे संघ या संघाला कधीकधी आव्हान देतात खरे, पण ऑस्ट्रेलियन संघ या सर्वच संघांच्या कायमच पुढे आहे. केवळ तुलनेसाठी एक उदाहरण द्यायचे झाले तर, भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये झालेल्या गेल्या २० सामन्यांकडे बघूया. या २० पैकी १९ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत, तर भारताला केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. आणि हा विजय देखील भारताला ‘सुपर ओव्हर’ मध्ये मिळाला आहे. याचाच अर्थ ऑस्ट्रेलियाने कायमच भारतीय संघावर वर्चस्व मिळवले आहे. जी गत भारताची, तीच कमी जास्त प्रमाणात इतर संघांची देखील आहे. या विजयाचे विश्लेषण करायचे झाले तर ऑस्ट्रेलियाचे क्रीडा धोरण, प्रत्येक गोष्टीकडे व्यावसायिक दृष्ट्या बघण्याची पद्धत (professionalism), क्रिकेट सारख्या खेळाबरोबर खेळाडू इतरही खेळ खेळतात, ट्रेनिंग आणि आहार याची योग्य सांगड, अद्ययावत सुविधा आणि इतरही काही कारणे सांगता येतील. मुळातच या संघाकडे असलेली विजिगिषु वृत्ती, आणि मैदानावर १०० टक्के झोकून देण्याची तयारी यामुळे हा विजय मिळवणे त्यांना सहज शक्य होते. ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही, आणि प्रत्येक सामन्यात सहजपणे विजय मिळवला. अपवाद भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्याचा. तिथे एका क्षणी भारतीय संघ विजयाच्या मार्गावर होता, पण एक छोटासा कवडसा दिसताच ऑस्ट्रेलियन संघाने चांगला खेळ करत विजयाचे दार ठोठावले.
दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे देखील कौतुक केले पाहिजे. आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत त्यांनी प्रथमच अंतिम फेरी गाठली. गेल्या काही वर्षात आफ्रिकेचा महिला संघ चांगल्या प्रकारे मार्गक्रमण करत आहे. घराच्या मैदानावर खेळताना त्यांना काही सामन्यांमध्ये अडथळे आले खरे, पण नेटाने प्रयत्न करत त्यांनी अंतिम फेरी गाठली. आफ्रिकेच्या फलंदाज लॉरा व्हॉल्वर्ड आणि ताजमिन ब्रिट्स यांनी चांगली कामगिरी केली तर गोलंदाजीमध्ये मारिझेन कॅप आणि शबनीम इस्माईल चमकल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी त्यांचा उपांत्य फेरीचा सामना महत्वाचा ठरला. उपांत्य फेरीत त्यांनी बलाढ्य इंग्लिश संघाला नमवलं. त्या सामन्यात व्हॉल्वर्ड आणि ब्रिट्स यांनी अर्धशतकी खेळी केल्या तर मारिझेन कॅपने देखील चांगली फलंदाजी केली. इंग्लिश संघासमोर त्यांनी १६५ धावांचे लक्ष्य ठेवले होते, पण दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडला १५८ धावा करता आल्या. आफ्रिकेतर्फे इस्माईलने ३ तर आयबंगा खाका हिने ४ बळी घेतले. त्यांच्या खेळाडू हीच कामगिरी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर करू शकल्या नाहीत, अन्यथा क्रिकेट विश्वाला एक नवीन विजेता संघ बघायला मिळाला असता. भारताचा विचार करता, आपण उपांत्य फेरी गाठली खरी, पण तिथे मात्र आपण ढेपाळलो. हातात असलेला सामना आपण छोट्या छोट्या चुकांमुळे ऑस्ट्रेलियाच्या हवाली केला. एकूणच या स्पर्धेत आपली सांघिक कामगिरी चांगली झाली नाही, ना आपली कोणी खेळाडू स्पर्धेत चमकली. याचाच परिणाम म्हणजे रिचा घोष वगळता एकही भारतीय खेळाडू आयसीसीच्या संघात स्थान पटकावू शकली नाही.
आता या स्पर्धेनंतर लगेचच WPLची सुरुवात होईल. ही स्पर्धा भारतीयच नव्हे तर इतर खेळाडूंसाठी देखील महत्वाची असेल. ऑस्ट्रेलियातील WBBL किंवा इंग्लंड मधील Women’s Hundred सारखीच ही स्पर्धा यशस्वी होईल यात काही शंका नाही. अनेक भारतीय खेळाडू इतर देशातील खेळाडूंसह एकाच संघात खेळतील, ज्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल. IPL प्रमाणेच ही लीग देखील महिला क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेईल पण या लीगचा फायदा जसा भारतीय क्रिकेटपटूंना होणार आहे, तसाच इतरही खेळाडूंना होणार आहे. ज्या खेळाडूंना भारतात खेळणे आव्हानात्मक असते, भारतीय विकेट्स आणि हवामान याच्याशी जुळवून घेणे अवघड ठरते, अश्या खेळाडूंसाठी ही लीग पर्वणीच असेल. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज मधील अनेक खेळाडू या लीग मध्ये भाग घेत आहेत. प्रोफेशनली क्रिकेट खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडू या संधीचा नक्कीच लाभ उठवतील. गेली अनेक वर्षे त्या क्रिकेटवर अधिराज्य गाजवत आहेत. आता भारतात सलग क्रिकेट खेळण्याचा अनुभव त्यांना अजूनच खंबीर बनवेल. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट बलवान आहेच, आता या क्रिकेटपटू आणखी ताकदीने क्रिकेट खेळतील. ऑस्ट्रेलियन संघ जगज्जेता आहेच, पण येणारी अजून काही वर्षे देखील त्यांचीच असतील यात शंका नाही.
– कौस्तुभ चाटे