ball

धुव्वा (दैनिक ऐक्य, सातारा)

by

धुव्वा…. नागपूर कसोटी सामना संपल्यानंतर त्या सामन्याचं वर्णन केवळ एका शब्दात करता येईल. भारतीय खेळाडूंनी कांगारूंना पहिल्याच कसोटी सामन्यात गुढगे टेकायला लावले आणि हा सामना केवळ ३ दिवसात जिंकला. ऑस्ट्रेलियन संघाचा इतका दारुण पराभव आधी कधी झाला नसेल. या संघाकडे बघून खरंच हा ऑस्ट्रेलियन संघ आहे का याची शंका यावी इतकं वाईट हा संघ खेळला. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही कसोटी मालिका खरं सांगायचं तर क्रिकेट जगतातील सगळ्यात मोठी मालिका म्हटली पाहिजे. गेल्या काही वर्षात या द्वंद्वाने पुढची पायरी गाठली आहे. आपण ऑस्ट्रेलियात गेलो काय किंवा ते आपल्याकडे खेळायला आले काय, दोन्ही ठिकाणी कसोटी मालिका चुरशीचीच होते. दोन्ही संघ प्राणाची बाजी लावून खेळतात. या मालिकेसाठी दोन्ही संघांची तयारी मोठ्या प्रमाणावर सुरु होती. अगदी ऑस्ट्रेलियाने सिडनीमध्ये देखील भारतीय पीचेस तयार करून या मालिकेसाठी कंबर कसली होती. पण पहिल्या कसोटी नंतर कांगारूंच्या तयारीबद्दल खरोखर शंका यायला लागली आहे. भारतीय संघाने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने, ठरवल्या प्रमाणे खेळ करून ऑस्ट्रेलियाला पराभूत केले, आणि म्हणूनच या विजयाचे वर्णन ‘धुव्वा’ या एकाच शब्दात करता येईल. 


ऑस्ट्रेलिया म्हणजे शेवटपर्यंत लढणारा, हार न मानणारा संघ म्हणून क्रिकेट जगताला परिचित आहे. इथे भारतात त्यांना फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्या मिळणार याची देखील त्यांना कल्पना होतीच. ते त्या तयारीनेच भारतात उतरले होते. बरं, आता दोन्ही देशातील खेळाडू अनेकदा एकमेकांविरुद्ध खेळत असतात. टेक्नोलॉजी मुळे असेल किंवा इतर काही कारणे असतील, प्रत्येक खेळाडूची बलस्थाने सगळ्यांनाच माहीत असतात. कोणता खेळाडू काय प्रकारे खेळू शकतो, कुठे कमी पडतो हे काही आता लपवता येत नाही. खरे सांगायचे तर या दोन देशांमधील सामने हे मानसिक द्वंद्व आहे. जर तुम्ही या लढाईत मागे पडलात तर समोरचा प्रतिस्पर्धी लगेचच तुमच्यावर झडप घालायला टपून बसला आहे. या सामन्याची सुरुवात देखील अशीच झाली. डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा हे दोघेही सलामीवीर कसोटी सामन्यासाठी अजिबात तयार नव्हते असंच वाटत होतं. त्यात शमी आणि सिराजच्या गोलंदाजीवर दोघांनीही लगेचच तलवार म्यान केली. ज्या पद्धतीने डेव्हिड वॉर्नरचा पहिल्या डावात त्रिफळा उडाला ते बघता हा ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज आहे यावर विश्वास ठेवणे अशक्य होते. उस्मान ख्वाजा बद्दल काय लिहावं? त्याने भारतात येत आहे याची जाहिरातच मोठी केली. त्यामानाने पहिल्या कसोटीत त्याचा प्रभाव शून्य होता. स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लाबूशेन हे सध्याचे चांगले फलंदाज म्हणून ओळखले जातात. पहिल्या डावात हे दोघे आणि नंतर काही प्रमाणात अलेक्स कॅरीने थोडीफार चांगली फलंदाजी केली पण ती पुरेशी नव्हती. ऑस्ट्रेलियन संघ केवळ १७७ मध्ये संपला होता. ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अश्विन आणि जडेजाची गोलंदाजी अजिबात समजत नव्हती. ऑस्ट्रेलियाने ‘प्रति-अश्विन’ शोधला खरा, पण सोन्याची झळाळी साध्या धातूला कशी येणार? 

ऑस्ट्रेलियन मीडियाने मालिका सुरु होण्याच्या आधीच भारतीय खेळपट्ट्यांवर ताशेरे ओढायला सुरुवात केली होती. ज्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन संघ अगदी सहज बाद झाला, त्याच खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी कमाल केली. रोहितचं शतक अगदी दृष्ट काढण्यासारखं होतं. रोहितने यापेक्षा मोठी शतके नक्की केली आहेत पण त्याची ही खेळी त्याच्या ‘टॉप ५’ मध्ये नक्की म्हणता येईल. आपले प्रमुख फलंदाज थोडे कमी पडले पण त्याच खेळपट्टीवर रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या दोन गुजराती अष्टपैलू खेळाडूंनी अप्रतिम फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या पाच फलंदाजांनी केवळ १५ धावा जोडल्या तर आपण २३२. इथेच दोन्ही संघातील फरक दिसून आला. दुसऱ्या डावात देखील ऑस्ट्रेलियाचे खेळाडू पराभूत मनोवृत्तीनेच खेळताना दिसले. एकही खेळाडू खेळताना स्थिरावल्या सारखा दिसला नाही. या सगळ्या गोष्टीनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ डावाने पराभूत झाला असेल तर त्यात नवल नाही. ऑस्ट्रेलियाची संघनिवड देखील चर्चेचा विषय ठरावा. दुखापतीमुळे स्टार्क, हेझलवूड आणि कॅमरून ग्रीन संघात नव्हते, पण ट्रॅव्हिस हेडला संघाबाहेर ठेवणे न उमगणारे होते. पहिला सामना खेळणारा टॉड मर्फी सोडला तर एकही खेळाडू प्रभाव पाडू शकला नाही. अगदी कॅप्टन पॅट कमिन्स आणि नॅथन लायन सारखे प्रमुख गोलंदाज सुद्धा निष्प्रभ होते. टॉड मर्फीने मात्र कमाल केली. एकदा खेळपट्टीचा अंदाज आल्यानंतर त्याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून तब्बल सात बळी घेतले. त्याला खेळताना बघून जेसन क्रेजाची आठवण झाली. मर्फीची कारकीर्द क्रेजासारखी भटकू नये हीच प्रार्थना. 

अर्थात आपल्याला ठाऊक असलेला ऑस्ट्रेलियन संघ हा पराभवानंतरही राखेतून उठून येणारा आहे. हा पहिला सामना संपला आहे, अजूनही तीन कसोटी सामने शिल्लक आहेत. या सामन्यांत ऑस्ट्रेलियन संघाने कमबॅक करणे अपेक्षित आहे. संघात निश्चितच चॅम्पियन खेळाडू आहेत. पुढील सामन्यात स्टार्क, ग्रीन आणि हेड सारखे खेळाडू संघात आले की ऑस्ट्रेलिया अधिक ताकदीने वार करू शकतो. किंबहुना त्यांनी तसा खेळ करणे हेच ऑस्ट्रेलियन स्पिरिटला धरून आहे. ऑस्ट्रेलिया साठी भारताचा दौरा कायमच ‘फायनल फ्रंटीयर’ राहिला आहे. भारतात जिंकणे त्याच्यासाठी (किंवा कोणत्याही इतर संघासाठी) कायमच महत्वाचे आहे. पुढील सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ चांगली कामगिरी करेल अशीच क्रिकेटप्रेमींची अपेक्षा आहे. या मालिकेचे महत्व काय आहे हे दोन्ही संघांना माहीत आहे. ही मालिका जिंकून पुढे चार महिन्यातच होणाऱ्या तेश चॅम्पियनशीप च्या अंतिम सामान्याकडे भारतीय संघाचे लक्ष आहेच, पण ऑस्ट्रेलियाला देखील ही मालिका जिंकणे आवश्यक आहे. एकूणच क्रिकेट जगतातील दोन सर्वात प्रभावी संघ पुढील तीन कसोटी सामने कसे खेळतात हे बघणे महत्वाचे  आहे. आज भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव केला आहे, आणि भारतीय क्रिकेट रसिक म्हणून हा ‘धुव्वा’ एन्जॉय करणे एवढेच आपल्या हातात आहे. 

– कौस्तुभ चाटे   

To know more about Crickatha