ball

दिनेश लाड – मुंबईचे क्रिकेटवेडे गुरु

मुंबई क्रिकेट हे एक वेगळंच रसायन आहे. गेली अनेक वर्षे मुंबईने आपल्याला एकापेक्षा एक उत्तम खेळाडू दिले आहेत. आणि ह्या रत्नांना जोपासणारे, वाढवणारे, त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारे काही जवाहीर पण मुंबईचेच. आज भारतीय क्रिकेटमध्ये रमाकांत आचरेकर सरांचं नाव मोठा आदराने घेतलं जातं. सरांनी अनेक खेळाडू भारतासाठी दिले आहेत. त्यांचं खेळाडूंवरील प्रेम, त्यांच्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी, कायमच त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची मनोवृत्ती हे सगळंच आश्चर्यचकीत करणारं आहे. आचरेकर सरांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचाच एक शिष्य आज मुंबईसाठी आणि भारतासाठी देखील अनेक गुणवान खेळाडूंना मार्गदर्शन करतो आहे. आज त्यांची २ मुलं भारतीय संघाचा अविभाज्य भाग आहेत. ह्या दोन्ही खेळाडूंनी आपल्या कामगिरीच्या जोरावर भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. ही दोन मुलं म्हणजे रोहित शर्मा आणि शार्दूल ठाकूर, आणि त्यांच्या लहानपणी त्यांना घडवणारे, मोलाचं मार्गदर्शन करणारे त्यांचे गुरु म्हणजे श्री. दिनेश लाड. क्रिककथाच्या निमित्ताने दिनेश लाड सरांशी केलेली ही बातचीत. 

प्रश्न: सर, नमस्कार. आपण तुमच्या प्रशिक्षक म्हणून भूमिकेबद्दल बोलणारच आहोत. पण सगळ्यात आधी आम्हाला तुमच्याबद्दल काही जाणून घ्यायचं आहे. तुमचं बालपण, तुमचं खेळाडू म्हणून असलेलं योगदान ह्या बद्दल काही सांगा. 

उत्तर: मी मुंबईचा. माहीम मध्ये वाढलो. अगदी सध्या गरीब घरातला मुलगा. क्रिकेट खेळावं अशी परिस्थिती नव्हती, पण क्रिकेटची आवड मात्र खूप होती. साध्या टेनिस बॉल वर क्रिकेट खेळत असे. पण त्यामध्येही चमक होती. मी त्यावेळी मामा कडे राहत असे, मामाकडे लहानाचा मोठा झालो. माझ्या आईचा देखील माझ्या क्रिकेट खेळण्याला खूप पाठिंबा होता .. आज मी जे काय आहे ते केवळ आईमुळे त्याच सुमारास माझी भेट आचरेकर सरांशी झाली. ही गोष्ट आहे १९७७ च्या आसपासची. माझ्याच एका निकटवर्तीयाने मला सरांकडे नेलं होतं. सरांनी माझा खेळ पाहिला आणि दुसऱ्याच दिवशीपासून नेट्सला यायला सांगितलं. आता इथे खरी मजा होती. माझ्याकडे क्रिकेट खेळण्यासाठी योग्य असे कपडे पण नव्हते. आणि ह्याचं उत्तर पण सरांनीच दिलं. त्यांचे क्रिकेटचे कपडे मला दिले, ते अल्टर करून घ्यायला सांगितले. आणि असा माझा सरांकडे अभ्यास सुरु झाला. पुढे जवळ जवळ ४-५ वर्षे मी सरांकडे क्रिकेटचे धडे गिरवत होतो. क्लब लेव्हलच्या अनेक मॅचेस त्यावेळी गाजवल्या. पुढे १९८१-८२ च्या सुमारास भारतीय रेल्वेमध्ये नोकरीला लागलो. पण क्लब लेव्हलच्या पलिकडे खेळाडू म्हणून नाही जाऊ शकलो. एवढं टॅलेंट नक्की होतं की मुंबई रणजी टीम साठी नक्की खेळू शकलो असतो, पण परिस्थिती नव्हती. घरासाठी नौकरी करणं आवश्यक होतं. त्या थोड्या काळात पण आचरेकर सरांचे खूप संस्कार माझ्यावर आहेत. सरांचं इतकं प्रेम होतं, ते मला स्कूटरवर घ्यायला यायचे. मुंबईमध्ये अनेक ग्राऊंड्सवर घेऊन जायचे. खेळण्यासाठी कायम प्रोत्साहन द्यायचे. आज मी खेळाडू म्हणून नाही पण क्रिकेट कोच म्हणून ओळखला जातो आहे त्यामध्ये पण आचरेकर सरांचे संस्कार, त्यांचा मोठा हातभार आहे हे नक्की. 


प्रश्न: पण मग ह्या सगळ्यामध्ये क्रिकेट प्रशिक्षणाकडे कसे वळलात? 

उत्तर: निव्वळ अपघाताने. माझी रेल्वेमधली नौकरी सुरूच होती. एका बाजूला जमेल तसं क्रिकेट पण सुरु होतं. एकदा मला एका मित्राने – – नितीन परुळेकरने उन्हाळ्याच्या सुट्टीमधल्या क्रिकेट प्रशिक्षण वर्गासाठी विचारलं. गोरेगावच्या एका क्लबला उन्हाळी वर्गासाठी दीड महिना क्रिकेट प्रशिक्षक हवा होता. मी सुरुवातीला नाहीच म्हणालो होतो, पण नंतर वाटलं की करून बघू, एक-दीड महिन्याचा तर प्रश्न आहे. १९९२ ची गोष्ट आहे ही. त्या उन्हाळी सुट्टीमध्ये क्रिकेट प्रशिक्षण सुरु झालं, नंतर त्याच क्लबने प्रशिक्षणासाठी विचारलं, आणि क्रिकेट कोच म्हणून सुरुवात झाली. पुढे मला त्यात मजा पण येत होती आणि आनंद तर नक्कीच होता. सगळ्यात मुख्य म्हणजे माझी क्रिकेटची नाळ अजून घट्ट होत होती. नंतर ३-४ वर्षांनी बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल कडून विचारणा झाली. आणि तेंव्हापासून शाळेबरोबर क्रिकेट कोचिंग सुरूच आहे. शाळेसाठी प्रशिक्षण करणं हा पण चांगला अनुभव आहे. ह्या मुलांना घडवणं ह्यात मला जास्त आनंद मिळतो. शाळेचे मुख्य श्री. योगेश पटेल ह्यांनी पण खूप सहकार्य केलं. व्यक्तिशः माझ्यावर आचरेकर सर आणि मनोहर सुर्वे सरांचा खूप मोठा पगडा आहे. मी दोघांकडेही शिकलो आहे. आणि त्यांनी शिकवलेल्या अनेक गोष्टी मी माझ्या प्रशिक्षणात उतरवण्याचा प्रयत्न करतो.  मुंबईचं स्कूल क्रिकेट वेगळ्याच दर्जाचं आहे. आणि त्यात मुंबई उपनगरातून एक शाळा इतकी पुढे घेऊन जाणं…मला वाटतं ह्यात खूप काही आलं. 


प्रश्न: माझा प्रश्न तोच होता…. हे स्कूल क्रिकेट किती महत्वाचं आहे? 

उत्तर: स्कूल क्रिकेट नक्कीच महत्वाचं आहे. शालेय वयात होणारे संस्कार खूप महत्वाचे असतात, फक्त क्रिकेटच नाही, पण कोणत्याही क्षेत्रात. मी कायमच मुलांना क्रिकेटसाठी प्रोत्साहीत केलं. माझं क्रिकेटवेड होतं कदाचित, पण मी कायम अश्या गुणवान मुलांच्या शोधात असायचो. ह्या मुलांनी आपल्या शाळेसाठी खेळावं ह्या साठी मी कायम प्रयत्नशील असायचो. मला शाळेची एक खडूस टीम बनवायची होती. मुंबई क्रिकेटमध्ये खडूस शब्दाला खूप महत्व आहे. तेच मला शाळेसाठी करायचं होतं. आधी तर आमच्या शाळेत ग्राउंड पण नव्हतं. आम्ही तसाच सर्व करायचो. जमेल तशी बॅटिंग आणि बॉलिंग ची प्रॅक्टिस चालायची. मग हळू हळू एक सिमेंट विकेट आम्हाला मिळाली. छोटं का होईना पण ग्राउंड मिळालं आणि शालेय क्रिकेटचा प्रवास सुरु झाला. हो पण एक आहे, क्रिकेट खेळत असले तरी सगळ्या मुलांनी नीट अभ्यास केलाच पाहिजे ह्याकडे देखील माझं लक्ष असायचं. क्रिकेटमुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये हे पण महत्वाचं आहे. 


प्रश्न: आणि मग अशी शाळेसाठी मुलं शोधतानाच रोहित शर्मा भेटला का? 

उत्तर: हो. आम्ही बोरिवली मध्ये एक मॅच खेळत होतो आणि समोरच्या टीम मध्ये एक ऑफस्पिन टाकणारा लहान मुलगा दिसला. मला तो आवडला. त्याच्यामध्ये एक वेगळाच स्पार्क वाटला. त्याचे काका त्याच्याबरोबर होते. मी त्यांना विनंती केली की ह्याला आमच्या शाळेत घेऊन या. तिथे त्याची ऍडमिशन करू, तो शाळेसाठी क्रिकेट सुद्धा खेळेल. ते आले पण शाळेत. पण हे कुटुंब अगदीच गरीब होतं. शाळेची फी भरण्यासाठीचे पण पैसे नव्हते. मग मी पटेल सरांशी बोलून त्याची फी माफ करून घेतली. रोहित शाळेकडून खेळत होता. चांगला ऑफस्पिन टाकायचा. सुरुवातीला अनेक दिवस मी त्याला बॅटिंग करू दिली नाही, पण एकदा नेट्समध्ये त्याला बॅटिंग करताना पाहिलं. तो चांगले कनेक्ट करत होता. मग पुढे त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित केलं. मला वाटतं ही १९९९ ची गोष्ट असेल. पुढे रोहित स्कूल क्रिकेटमध्ये बॅटिंग करत होता. ती २-३ वर्षे त्याने चांगली गाजवली. त्याच काळात आम्ही हॅरिस शिल्ड मध्ये शारदाश्रमला हरवलं. त्यांना हरवणारा आमचा उपनगरातला पहिला संघ होता. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्या मॅचच्या वेळी आचरेकर सर माझ्या शेजारी होते, ते शारदाश्रमचे प्रशिक्षक होते. त्यांचा संघ तो सामना हरला खरा, पण सरांनी मला कौतुकाची थाप दिली. माझ्यासाठी ती खूपच महत्वाची गोष्ट होती. 


प्रश्न: शार्दुलचं काय? तो कुठे गवसला?

उत्तर: तोही असाच एका स्पर्धेत. आमच्या विरुद्ध संघातून खेळत होता. आणि त्याने जबरदस्त कामगिरी केली होती. तेंव्हाच त्याला विचारलं की आमच्या शाळेत येशील का. त्याच्या आई वडिलांचा विरोध होता, आणि ते साहजिकच आहे. शार्दूल पालघरचा. आमची शाळा बोरिवलीत. जवळजवळ ८० किलोमीटर अंतर होतं. रोजचे ५-६ तास फक्त रेल्वेच्या प्रवासात जाणार. शक्यच नव्हतं. पण मला हा मुलगा खूपच आवडला होता. त्याची इथे मुंबईमध्ये पण काही सोय होत नव्हती. शेवटी एकदा माझ्या पत्नीशी बोललो, आणि मग शार्दुलला आमच्याच घरी ठेवूया असा निर्णय घेतला. त्याच्या पालकांना थोडं समजवावं लागलं, पण तेही तयार झाले. पुढे शार्दूल आमच्या घरी राहिला. खूप लोकांनी विरोध केला ह्या गोष्टीला. माझा मुलगा-मुलगी दोघेही आता मोठे होते, शार्दुलच्याच वयाचे. पण मी ठाम होतो. शार्दूल जवळ जवळ एक दीड वर्ष आमच्या घरी होता. अगदी घरातल्या सारखं वावरला. सिद्धेश आणि त्याची चांगली दोस्ती झाली. 


प्रश्न: आणि रोहित? तो पण तुमच्या घरी राहायचा ना? 

उत्तर: नाही तो घरी नाही राहायचा पण जवळंच होता. त्याचे आई वडील डोंबिवली मध्ये होते.  तो आमच्याकडेच असायचा, हक्काने जेवायला घरी असायचा. तो पण कुटुंबाचा एक भाग झाला होता. अजूनही आम्ही भेटलो की त्या दिवसांची आठवण काढतो. खूप छान दिवस होते. पुढे त्याचं कुटुंब आमच्याच शेजारीच राहायला आले. त्याच्या घरी नॉन व्हेज काही चालत नसे, पण मग माझी पत्नी त्याच्यासाठी करून ठेवायची, आणि तो पण अगदी आवडीने खायचा. शार्दूल असतानाच अजून एक मुलगा – आतिफ अत्तरवाला, तो पण आमच्या घरी राहायला होता. तो आता मुंबई रणजी संघात आहे. माझी दोन मुलं, शार्दूल आणि आतिफ … अगदी भावंडांसारखी राहिली. धमाल, मजा मस्ती, क्रिकेट प्रशिक्षण आणि तेवढाच शाळेचा अभ्यास सुद्धा. त्यांचे लाड पण केले, आणि शिस्तसुद्धा होतीच.  


प्रश्न: सर, हे भन्नाट आहे. क्रिकेटसाठी इतकं? तुमच्या घरच्यांना, खास करून पत्नीला ह्या सगळ्याचं क्रेडिट दिलं पाहिजे. 

उत्तर: प्रश्नच नाही. ती होती म्हणून हे सगळं झालं. तिने कधीही तक्रार केली नाही. मुलांनी देखील नाही. ह्या सगळ्याच मुलांमध्ये एक स्पार्क होता, आणि त्यांचे प्रॉब्लेम्स पण मला कळत होते. आणि क्रिकेट हे माझ्यासाठी पॅशन आहे. मी कधीही त्याच्याकडे व्यवसाय म्हणून बघितलं नाही. ही मुलं माझ्याकडे राहिली, मी त्यांच्याकडून, त्यांच्या आई वडिलांकडून कधीही पैसे घेतले नाहीत. ना कधी शाळेकडून प्रशिक्षणाचे घेतले. आत्त्ता पण नाही घेत. देवकृपेने माझी नौकरी नीट सुरु होती, घर व्यवस्थीत होतं. कधीही ह्या गोष्टींकडे पैसे कमावण्याचं साधन म्हणून विचार पण केला नाही. आजही मुलं येतात, ती गरीब आहे की अब्जावधी वडिलांचं पोर आहे, ह्याचा कधीच विचार करत नाही. मुलात काही चांगले गुण असतील तर ते जोपासण्याचा, त्याचं कौशल्य सुधारण्याचा प्रयत्न करतो. कदाचित माझ्या गुरूंकडून मी हेच शिकलोय. 


प्रश्न: सर आज मुलांच्या आई वडिलांच्या पण अपेक्षा खूप वाढल्या आहेत. त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? 

उत्तर: खरंय. आता क्रिकेट हा व्यावसायिक खेळ झाला आहे. खेळात पैसे आले आहेत. एका अर्थाने चांगलं आहे हे, पण पालकांच्या अपेक्षा पण अवाजवी असतात. आपल्या मुलाने IPL खेळावा हीच अपेक्षा असते. त्यात चूक काही नाही, पण मुलाची तेवढी कुवत आहे का ते सुद्धा बघितलं पाहिजे. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक पालकाला मी हेच सांगतो, मग तो गर्भश्रीमंत असेल किंवा अगदी साध्या घरातला असेल. मी त्या मुलांच्या आर्थिक स्थितीकडे पाहत नाही. मला जर त्या मुळात गुणवत्ता दिसली तर मी त्याच्यासाठी काहीही करायला तयार आहे. पण अनेकदा पालक विनंती करतात, कि तुम्ही त्याला कोचिंग करा म्हणजे त्याचं क्रिकेट सुधारेल. मी अनेक मुलांना कोचिंग करायचं नाकारलं आहे, कारण मला त्या मुलांमध्ये तो स्पार्क दिसला नाही. कित्येक पालक मुलांसाठी प्रायव्हेट कोचिंग लावतात. मला ते पण नाही पटत. मुळात जर गुणवत्ता असेल ना तर तो नक्की चमकेल. ह्या प्रायव्हेट कोचिंग मध्ये कधी कधी पालक स्वतःचंच नुकसान करून घेतात. अजून एक गोष्ट म्हणजे मी पालकांना सांगेन की मुलाच्या प्रशिक्षणामध्ये फार ढवळाढवळ करू नका. प्रत्येक मूल हे नदीचं पाणी आहे, योग्य ठिकाणी ते वाहत जाणार. त्याचे प्रशिक्षक त्याला नक्की घडवतील,  आणि समजा मुलगा क्रिकेट मध्ये नाही प्रवीण झाला तरी तो दुसरीकडे कुठेतरी प्राविण्य मिळवेलच ना. कदाचित दुसऱ्या काही क्षेत्रात त्याचं यश असेल. आणि तुम्हाला मुलाला क्रिकेटपटूच बनवायचं असेल तर थोडा संयम असू द्या, मुलाला त्याचं त्याचं घडण्यासाठी वेळ द्या. त्याच्यासाठी हा एक मोठा अभ्यास आहे, त्या अभ्यासात व्यत्यय आणू नका. एखादा वयाच्या १७ व्या वर्षी चमकतो, एखादा २०व्या. त्यांना त्यांच्या गुणवत्तेवर काम करू द्या. मुलगा १४-१६ च्या वयोगटात पुढे नाही जाऊ शकला, किंवा चमकला नाही तर निराश होऊ नका. त्याच्या प्रशिक्षकाचा जर मुलावर विश्वास असेल, दोघांचीही मेहनत घ्यायची तयारी असेल तर तो मुलगा पुढे नक्की चमकेल. हे वय त्याच्या प्रशिक्षणाचं आहे, त्यावर भर द्या. आणि एक लक्षात घ्या, सचिन तेंडुलकर १०० वर्षात एकदाच होतो. तुमच्या मुलाची तुलना कोणाही बरोबर करू नका. 


प्रश्न: सर, पुढे काय? रोहित, शार्दूल आणि बाकी तुमच्या विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? 

उत्तर: अपेक्षा काही नाही. त्यांनी खेळत राहावं, खेळाचा आनंद घेत राहावा. मी सिद्धेशला पण हेच सांगतो. आज तो रणजी खेळतोय, IPL खेळला आहे. सतत स्वतःमध्ये सुधारणा करत राहणं महत्वाचं आहे. रोहित आणि शार्दुलची प्रतिभा जगणे बघितली आहे. आज ह्या सगळ्यांनीच खूप भरभरून आनंद दिला आहे. आणि मी पण मला जमेल तितका काळ क्रिकेट प्रशिक्षण करतंच राहीन. ह्या साध्या चेंडूफळीच्या खेळणे खूप काही दिलंय. मी त्याच्यासाठी इतकं तर नक्कीच करू शकतो. माझी अपेक्षा काय असेल तर ती सरकारकडून. मी आत्ता ज्या मैदानावर प्रशिक्षण घेतो ते मैदान खूप छोटं आहे. एक मोठं मैदान मिळावं ह्या साठी मी सरकार दरबारी दार ठोठावतो आहे. ह्या मोठ्या मैदानामुळे आमच्या मुलांचा खेळाचा, सामन्यांचा एक मोठा प्रश्न सुटणार आहे हे नक्की. आजवर माझी जवळजवळ ८० मुलं मुंबईसाठी वेगवेगळ्या वयोगटात खेळली आहेत. आणि मला खात्री आहे की मोठ्या मैदानामुळे ही संख्या अजूनच वाढेल. त्यामुळे मी सरकारला नम्र आवाहन करू इच्छितो की एक चांगले मोठे मैदान मला उपलब्ध करून द्यावे. आणि माझ्या हातून अशी क्रिकेट सेवा घडत राहावी.   


सर, तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे. तुमची सगळीच मुलं क्रिकेटमध्ये चमको आणि तुमचं नाव अजून आदराने घेतलं जावो एवढीच अपेक्षा करतो. आणि अर्थातच तुमची मोठ्या मैदानाची इच्छा देखील लवकर पूर्ण होऊ दे. धन्यवाद सर. 

दिनेश लाड … मुंबई क्रिकेट मध्ये  आणि आता भारतीय क्रिकेट मध्ये आदराने घेतलं जाणारं नाव. मोठी माणसं साधी असतात, ऐकून होतो, आज अनुभव पण घेतला.  

महिला क्रिकेट – काल आणि आज 

मला काही दिवसांपूर्वी विचारण्यात आले होते की जेव्हा मी ४५ वर्षांपूर्वी खेळत होते, त्याऐवजी सध्याच्या काळात क्रिकेट खेळणे मला अधिक आनंददायक वाटले असते का? माझी पहिली प्रतिक्रिया होती ‘हो’. महिला क्रिकेट सध्या छान सुरू आहे, आणि अजूनही पुढे जाणार आहे. पण मग मी विचार केला, एक मिनिट, माझे खेळाचे दिवस सर्वोत्तम होतेच पण या प्रश्नामुळे मला त्या काळातील आणि ह्या काळातील खेळाबद्दल सखोल विचार करायला लावला.

आज, महिला क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे आणि जगभरात हा खेळ वाढत आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये आता महिला क्रिकेटचा समावेश झाला आहे. मागच्या आशियाई खेळांमध्ये पण क्रिकेटचा समावेश होता. क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याबद्दल चर्चा सुरू आहेत आणि आयसीसी याबद्दल खूप उत्साहित आहे. मला खात्री आहे की खेळाडू अपेक्षेने वाट पाहत आहेत की क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट केले जाईल कारण जागतिक पातळीवर ऑलिम्पिक हे खेळांसाठी सर्वात मोठे व्यासपीठ मानले जाते.

गेल्या पाच वर्षांमध्ये महिला क्रिकेटचा झपाट्याने विकास झाला आहे. २०१७ साली प्रेक्षकांनी भरलेल्या लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला गेलेला महिला विश्वचषकाचा अंतिम सामना अभूतपूर्व होता. असा अनुभव आधी कधी आला नव्हता. इंग्लंड आणि भारताने अंतिम फेरी गाठली. फक्त अंतिम सामन्यातच नव्हे तर या संपूर्ण प्रवासामध्ये भारतीय संघाकडे सगळ्यांचे लक्ष होते. सोशल मीडियामुळे महिला क्रिकेटपटू घराघरात पोहोचल्या होत्या. पुरुष क्रिकेटपटूंनीदेखील महिला संघाच्या खेळाला प्रोत्साहन दिले, त्यांच्या कामगिरीवर भाष्य आणि कौतुक करून खेळाच्या कक्षा विस्तारल्या. 

महिला क्रिकेट पूर्वीच्या तुलनेत आता अधिक चांगले आहे. जेव्हा क्रिकेट हा पुरुषांचा खेळ समाजाला जायचा तेव्हा आम्ही महिला क्रिकेटच्या पायोनियर होतो. दिवसभर उन्हात उभे राहून खेळणे आणि लेदर चेंडूने खेळणे हे पुरुषांचे काम समजले जायचे. त्या वेळी आम्हाला क्वचितच कोणी प्रायोजक होते. आम्ही ज्या क्लब आणि कॉलेजच्या मैदानावर खेळायचो, ती मैदानेदेखील चांगल्या दर्जाची नव्हती. आम्ही रेल्वेच्या सेकंड क्लासनी प्रवास करायचो आणि तोदेखील बऱ्याचदा आरक्षणाशिवाय. आम्ही वसतिगृहांमध्ये राहिलो. संपूर्ण संघ एकाच खोलीत राहायचा आणि कॉमन टॉयलेट्स वापरायचा. आमच्या खेळण्याच्या दिवसात जेव्हा आम्ही परदेशी जात असू, तेव्हा बहुतेक वेळा आमचा प्रवास इकॉनॉमी क्लासने होत असे, अनेकदा आम्ही युथ होस्टेल्स आणि डॉर्मेटरीमध्ये राहिलो आहोत. सध्याच्या खेळाडूंसाठी हे सर्व बदलले आहे. आता महिला खेळाडू चांगल्या मैदानावर खेळतात. त्रितारांकित किंवा पंचतारांकित (3 Star-5 Star) हॉटेलमध्ये राहतात. त्यांना जेवणासाठी भत्ता मिळतो, बहुतेक सगळीकडे बिझनेस क्लासने प्रवास होतो. मुख्य म्हणजे त्यांच्याकडे आता मुख्य प्रशिक्षक, सहायक प्रशिक्षक, मॅनेजर, गोलंदाजी प्रशिक्षक, व्हिडिओ विश्लेषक, फिजिओ असे सगळे मदतीला आहेत. याचे खूप फायदे आहेत. त्यामुळे आपल्या संघाच्या कामगिरीचेच नव्हे तर दुसऱ्या संघाच्या कामगिरीचे विश्लेषण करून संघाचे धोरण ठरवता येते. खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीचे विश्लेषण करून खेळ उंचावण्यास मदत होते. 

तसेच T20 क्रिकेटच्या आगमनामुळे क्रिकेट वेगळ्या पद्धतीने खेळले जाते. बहुतेक सामन्यांचे टीव्ही प्रक्षेपण होत असल्यामुळे खेळाडूंना खूप काही शिकायला मिळते. आमच्या काळात अशा गोष्टी कधी कळत नव्हत्या. आमच्या काळातील खेळाडू आता त्या वेळेचे फोटो शोधण्याचा प्रयत्न करतात. सामन्याचे व्हिडीओ सापडणे तर दूरची गोष्ट. सर्वात मोठी गोष्ट आहे की जसे इतर देशांमधील खेळाडूंना करारबद्ध केले जाते तसे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारतीय महिला खेळाडूंना करारबद्ध केले आहे. जरी कराराची रक्कम पुरुष खेळाडूंच्या तुलनेत कमी असली तरी खेळाडू आता खेळावर लक्ष केंद्रित करू शकतात. खेळाडू स्वतःसाठी फिटनेस प्रशिक्षक, क्रिकेट प्रशिक्षक नेमून कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्याचा क्रिकेटला फायदा होतो. सध्याच्या संघाची फिटनेस पातळी अधिक चांगली दिसते. चांगल्या मैदानावर खेळल्यामुळे आणि फिटनेस पातळी उंचावल्याचे परिणाम खेळात दिसत आहेत. महिला T20 सामन्यांमुळे आणि पुरुषच्या IPL मुळे भारतीय महिला खेळाडूदेखील महिला IPL ची वाट पाहत आहेत.

सगळा विचार केल्यावर असं वाटतं की महिला क्रिकेट खेळण्यासाठी ही नक्कीच चांगली वेळ आहे. पण हे म्हणूनही आम्ही मैदानावर घालवलेल्या वेळाबद्दल मला खेद नक्की नाही. कारण माझ्या पिढीतील खेळाडू फक्त भारतातील खेळाचे प्रणेते नव्हते पण आज महिला क्रिकेट कुठे आहे याचा प्रत्यक्षात पाया आम्ही रचला. ते रोमांचक क्षण होते. हा पाया नक्कीच भक्कम होता अन्यथा खेळ आतापर्यंत टिकला नसता. माझ्या काळात महिलांनी चांगली कामगिरी केली नसती तर लोकांची आत्ताच्या खेळाबद्दल तेवढी आत्मीयता राहिली नसती. माझ्या वेळी भारतात अनेक दिग्गज खेळाडू होत्या. शांता रंगास्वामी, डायना एडलजी, सुधा शाह, नीलिमा बर्वे – जोगळेकर, उज्ज्वला निकम – पवार, कल्पना परोपकारी – तापीकर ह्या आणि अशा अनेक खेळाडूंमुळे भारतातील महिला क्रिकेट अधिक परिपक्व झालं. ह्या सर्वांनीच चांगला खेळ केला नसता तर कदाचित आज इतक्या वर्षांनीसुद्धा महिला क्रिकेटला ज्या प्रकारे समर्थन मिळत आहे, ते कदाचित मिळालं नसतं. ह्या सर्वच खेळाडू कौशल्य आणि तंत्राच्या बाबतीत कुठेच कमी नव्हत्या. परदेशी दौऱ्यांवरदेखील त्यांनी कायमच चांगली कामगिरी केली.

तसेच, मी खेळलेल्या दिवसांची मला कदर आहे कारण आम्हाला कितीही अडचणी आल्या तरी आम्ही मजेत खेळलो, आम्ही मित्र बनवण्याचा, एकमेकांना पाठिंबा देण्याचा आणि जे काही आहे त्याचा आनंद घेण्याचा मनापासून प्रयत्न केला. मला वाटतं तो एक अप्रतिम काळ होता. आम्हाला क्रिकेट खेळणे आणि आयोजित करणे आवडत होते. आमच्या घरांपासून काही दिवस लांब राहणे आणि एकत्र राहणे मजेदार होते. आम्ही तेव्हा नवीन होतो आणि प्रत्येकाबरोबर थट्टामस्करी करायचो. पण मैदानावर आम्ही तीव्र प्रतिस्पर्धी होतो. आमची त्या वेळेपासून झालेली मैत्री अजून आहे. फक्त भारतात नाही तर जगभरातील खेळाडूंशी मैत्री आहे. हा सर्व अनुभव आणि ते दिवस मी आयुष्यभर आठवणीत राहतील. 

महिला क्रिकेट हे आता एक वेगळं करिअर होऊ घातलं आहे. तुम्ही जर भारतासाठी खेळत असाल, तर तुम्हाला प्रायोजक मिळतील, जाहिरातीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. ह्यामध्ये मिळणारा पैसा आणि प्रसिद्धी हेसुद्धा तुम्हाला यशस्वी नक्कीच बनवतील. पण जरी तुम्ही अगदी भारतासाठी नाही खेळू शकलात, तरीदेखील इतर अनेक गोष्टींमध्ये तुम्ही तुमची कारकीर्द घडवू शकता. तुम्ही क्रिकेट समालोचन, क्रिकेट स्तंभलेखन करू शकता. प्रशिक्षक, क्रिकेट प्रशासक (administrator) बनू शकता. फिजिओ, ट्रेनर आणि अशा असंख्य संधी आजच्या मुलींना उपलब्ध आहेत. आणि कदाचित त्यामुळेच अनेक पालक आज मुलींना क्रीडा क्षेत्राकडे किंवा  प्रामुख्याने  क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी नक्कीच प्रोत्साहित करत आहेत. त्यामुळे जर आज कोणी विचारले की आजच्या काळात मला क्रिकेट खेळायला आवडलं असतं का, तर माझं उत्तर नक्कीच होकारार्थी आहे. पण मला अजून भर घालून सांगावेसे वाटेल की माझ्या काळात खेळलेलं क्रिकेट माझ्यासाठी जास्त जवळचं आहे, जास्त आनंद देणारं आहे.  

माझा सुनीलदादा

क्रिकेट ह्या खेळाविषयीचं माझं प्रेम खूप जुनं आहे. ना ते क्रिकेटच्या बदलत्या स्वरूपांशी निगडित आहे (उलट काही अंशी त्याने क्रिकेटचं नुकसानच केलंय असं मला वाटतं), ना ते कोणत्याही खेळाडूसाठी हपापलेल्या मीडियामुळे कमीजास्त होणार आहे. मी लहान असताना ‘इडियट बॉक्स’ नव्हता. आयुष्य त्या वेळी खूप सोपं होतं, खरं होतं आणि माणसंसुद्धा. ह्या इडियट बॉक्समुळे लोकप्रिय झालेल्या वेगवेगळ्या क्रिकेटच्या स्वरूपांना माझा विरोध नक्कीच नाही. पण कोणता खेळाडू सर्वात जास्त ताकदीने किंवा सर्वात लांब चेंडू मारू शकतो ह्याबद्दलच्या गप्पा मला व्यर्थ वाटतात. माझ्यासाठी क्रिकेट ह्या खेळाची सुरुवात तशी खूपच लवकर झाली, कदाचित मी माझ्या आईला ओळखायला लागलो त्याआधीच. ह्याला कारणीभूत आहे ते म्हणजे मी मुंबईत ज्या वातावरणात वाढलो, जिथे मोठा झालो, तिथली माणसं आणि त्यांचं क्रिकेटप्रेम. ह्या सर्वच माणसांचा माझ्या आयुष्यावर एक मोठा प्रभाव आहे. माझं बालपण मुंबईत ताडदेव भागात गेलं. माझ्या अवतीभवतीचा परिसर हा क्रिकेट, सिनेमा, साहित्य, संगीत ह्या सर्वच गोष्टींनी भारावलेला होता. ही साधारण १९६०च्या जवळपासची गोष्ट. त्या वेळी ह्या सर्वच गोष्टी निरर्थक समजल्या जायच्या. पण तरीही त्या परिसरातली माणसं काही वेगळीच होती. माझ्या घराच्या एक-दीड किलोमीटरच्या परिघात राहणाऱ्या लोकांच्या यादीत अनेक मोठे, नावाजलेले खेळाडू, साहित्यिक, शास्त्रीय गायक, कलाकार आणि असेच अनेक दिग्गज होते. ही सगळीच माणसं त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात ‘लीजण्ड’ होती. आमच्या घराच्या समोरच्याच बिल्डिंगमध्ये सुधीर नाईक होता (त्याला त्याचे मित्र जेम्स म्हणत). सुधीर आणि त्याचे मित्र शेजारीच असलेल्या कंपाउंडमध्ये काँक्रीटच्या खेळपट्टीवर टेनिस बॉलने क्रिकेट खेळत. पुढे सुधीर मुंबईसाठी आणि नंतर भारतासाठीदेखील खेळला. आमच्यासाठी ते कंपाउंड लॉर्ड्सपेक्षा कमी नव्हते, आणि सुधीर त्या लॉर्ड्सवरचा जणू राजाच. माझे दुसरे हिरो होते माझे मामा, द्वारकानाथ ‘बबन’ गावसकर. बबनमामा ग्रेट विनू मंकड ह्यांच्यासोबत क्रिकेट खेळले आहेत. रुईया स्पोर्ट्स क्लबमध्ये ते दोघे एकत्र खेळत. आणि माझा तिसरा हिरो होता… मी बोलणारच आहे त्याच्याबद्दल.

आमच्या घराच्या जवळच भागीरथीबाई बिल्डींग्स नावाच्या इमारती होत्या.  तिथे माझे दुसरे मामा राहायचे, मनोहर गावसकर. माझ्या आईचे थोरले बंधू. मी लहान असताना माझी आई डॉ. सुंदर केंकरे मला माझ्या मामामामींकडे – मनोहर गावसकर आणि मीनल गावसकर ह्यांच्याकडे सोडून तिच्या कामावर जात असे. मी त्या अर्थाने माझ्या मामामामींकडेच मोठा होत होतो. माझं सगळंच लहानपण चिखलवाडीतल्या त्या भागात माझ्या भावंडांबरोबर गेलं. माझी मोठी मामेबहीण नूतन आणि मामेभाऊ सुनील – ह्या कथेचा नायक. सुनील मनोहर गावसकर. माझे मनोहरमामा राहत ते चिखलवाडीमधलं घर तसं मोठं होतं. एक छानसं ३ बेडरूम्सचं ते घर, आणि त्याला लागूनच असलेला तो वऱ्हांडा अजूनही माझ्या नजरेसमोर आहे. आणि घराच्या मुख्य दरवाजाबाहेरच एक निमुळता पॅसेज होता, जिथे सुनीलदादाने त्याचे क्रिकेटचे पहिले धडे गिरवले, कदाचित तिथेच त्याने त्याचे क्रिकेट टेक्निक्स अधिक परिपक्व केले.

मी मोठा होत असताना दादाबरोबर मीदेखील माझी क्रिकेट प्रॅक्टिस करत असे. त्या छोट्याशा पॅसेजमध्ये दादा बॅटिंग करत असताना, पायऱ्यांवर उभा राहून त्याला सीझन बॉल टाकून प्रॅक्टिस देणं हे त्या वेळेचं माझं मुख्य काम होतं. अशा प्रकारे ‘बॉलिंग’ करत असताना अनेकदा माझा खांदा काळानिळा झाला आहे. पण त्याही परिस्थितीमध्ये मला ती क्रिकेट प्रॅक्टिस आवडत असे. कदाचित तिथेच ‘playing with a straight bat’ म्हणजे काय ते नकळतच माझ्या मनावर कोरलं गेलं. पुढे मनोहरमामा दादर पूर्व भागात राहायला गेले, पण ही straight bat ची जादू त्या घरातसुद्धा कायम होती. त्या घरातसुद्धा माझी क्रिकेट सराव करतानाची भूमिका कायम बॉलरची असे, आणि अर्थातच दादा त्याची बॅटिंग प्रॅक्टिस करून घेत असे. त्याही वेळी त्याचा सराव कायम Straight Drive चा असे. फ्लिक, पूल, कट्स आणि इतर फटक्यांना जणू त्या घरात जागाच नव्हती.  दादा तिथे केवळ स्ट्रेट ड्राइव्ह मारत असे, आणि पुढे तोच फटका त्याचा ट्रेडमार्क शॉट झाला. पुढे जेव्हा अनेक क्रिकेट रसिक आणि क्रिकेट पंडित दादाच्या त्या स्ट्रेट ड्राइव्हची तारीफ करत असत, तेव्हा दादाच्या त्या सरावात माझाही थोडा हातभार आहे ह्या विचारानेच माझ्या अंगावर मूठभर मांस चढत असे. माझ्या मामांच्या घरी अनेक पुस्तकांनी, मासिकांनी भरलेलं एक लाकडी कपाट होतं. ते कपाटदेखील मला अतिशय प्रिय होतं. त्या कपाटात अनेकविध पुस्तकं होती, आणि अर्थातच त्यातली अनेक पुस्तकं क्रिकेटला वाहिलेली होती. ह्याच सगळ्या खजिन्यात मला कधी डॉन ब्रॅडमन भेटले, कधी विजय मर्चंट, कधी रोहन कन्हाय तर कधी ५० आणि ६०च्या दशकातले इतर अनेक दिग्गज. मनोहरमामा आणि त्यांचे बंधू अनेक क्रिकेटपटूंच्या गोष्टी अतिशय रंजकतेने सांगत, आणि ह्याच सगळ्या गोष्टींनी माझ्याभोवती क्रिकेट ह्या खेळाचं जाळं विणलं गेलं, ते अजूनही कायम आहे. माझे दोन्ही मामा – सुनीलचे वडील, मनोहर आणि बबनमामा क्लब आणि ऑफिसमध्ये क्रिकेट खेळत. सुनीलचे मामा, माधव मंत्री तर भारतासाठीदेखील खेळले होते. दोन्ही घरांतून बालपणीच त्याला क्रिकेटचे डोस मिळाले होते. 

सुनीलदादाचं मी डोळे झाकून अनुसरण करत असे. तो माझा खऱ्या अर्थाने क्रिकेट हिरो होता. ‘विलक्षण’ ह्या एकाच शब्दात दादाचं वर्णन करता येईल. अनेकदा मी त्याला त्या वऱ्हांड्यामध्ये उभं राहून मॅचसाठी जाताना बघितलं आहे. त्याच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यात, ती छोटी किटबॅग घेऊन, एक बॅट हातात घेऊन बुटांवरची धूळ झटकत तो जायचा तेव्हाची भावना व्यक्त करणं केवळ अशक्य आहे. मला त्या काळी अगदी दादासारखंच बनायचं होतं. त्या काळी त्याने मुंबईचं शालेय आणि नंतर विद्यापीठ क्रिकेट गाजवून सोडलं होतं. त्या वेळी अनेकदा त्याचा फोटो पेपरमध्ये येत असे. माझे वडील तो फोटो दाखवत, तेव्हा अभिमानानं ऊर भरून येई. 

१९७१ साली दादाची निवड भारतीय संघात झाली, आणि २१-२२ वर्षांचा सुनील गावसकर वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेलादेखील. पुढे जे घडलं ते अविस्मरणीय आहे. ५० वर्षांपूर्वीच्या त्या दौऱ्यात आपण वेस्ट इंडीजला पहिल्यांदाच हरवलं आणि एक इतिहास रचला. त्या दौऱ्याची सुरुवात करताना दादा एक तरुण खेळाडू म्हणून गेला होता, पण परत आला तेव्हा तो लीजण्ड बनला होता. वेस्ट इंडीजचा संघ मालिका हरला होता, तरीदेखील अगदी त्रिनिदादपासून, जमैका आणि बार्बाडोसपर्यंत सगळ्याच प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं होतं. त्याच्यावर कहाण्या रचल्या जात होत्या, कॅलिप्सो गायल्या जात होत्या. दादाला त्या घरातल्या वऱ्हांड्यापासून सुरुवात करताना बघणारा मी एक होतो, आणि आता तोच दादा भारतीय रसिकांच्या गळ्यातला ताईत बनला होता. दादाचे अनेक जवळचे मित्र, मिलिंद रेगे, एकनाथ सोलकर किंवा अशोक मंकड आणि इतरही अनेक दिग्गज खेळाडू दादाच्या ह्या प्रवासाचे साथीदार आहेत. मिलिंद रेगे दादाबद्दल खूप छान सांगतो. तो म्हणतो की सुनील त्याच्या इतर साथीदारांपेक्षा वेगळाच होता. कदाचित इतर काही खेळाडूंमध्ये दादापेक्षा जास्त चांगली गुणवत्ता असेल, पण दादाकडे एक गोष्ट होती, जी त्याला ह्या सर्वांपेक्षा वेगळं ठरवायची, आणि ते म्हणजे दादाकडे असलेली तीव्र महत्त्वाकांक्षा. दादा त्याच्या बॅटिंगकडे वेगळ्याच दृष्टिकोनातून बघत असे. त्याची विकेट घेणं हे एव्हरेस्ट जिंकण्यापेक्षा कमी नव्हतं. त्याला बाद करण्यासाठी गोलंदाजाला भारी किंमत द्यावी लागत असे. कायमच. मीदेखील मुंबईमध्ये थोडंफार क्रिकेट खेळलो आहे. पुढे माझ्या कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकऱ्यांमुळे मी अनेक दिग्गज लोकांना भेटलो. त्यामध्ये सुनीलदादाचे मित्र होते, त्याचे पाठीराखे होते, सिनियर होतेच, आणि त्याचे काही हिरोदेखील होते. सुनीलचा असाच एक हिरो म्हणजे हैद्राबादचा स्टायलिश फलंदाज एम. एल. जयसिंहा. मी त्यांना जयकाका म्हणतो. जयकाकांकडून मला सुनीलदादाच्या अनेक गोष्टी समजल्या. १९७१च्या त्या दौऱ्यात जयसिंहा आणि दादा एकत्र होते. त्याच दौऱ्यात जयसिंहांनी सुनीलला मोठं होताना बघितलं. “त्याची क्रिकेटविषयी निष्ठा आणि प्रेम जगापलीकडे होतं,” जयकाका सांगत. “त्याच दौऱ्यात एका सामन्याआधी सुनीलचा दात दुखावला गेला होता. पण तरीदेखील त्या परिस्थितीतसुद्धा तो खेळला, संघासाठी उभा राहिला. हे सगळं केवळ अवर्णनीय आहे,” दादाचे हिरो सांगत होते. ५० वर्षांपूर्वीच्या त्या दौऱ्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. त्या रात्री जेव्हा अजित वाडेकरचा विजयी भारतीय संघ मुंबईत सांताक्रूझ विमानतळावर उतरला त्यानंतरच्या त्या आठवणी शब्दात सांगणं अवघड आहे. तिथे जमलेल्या गर्दीच्या आवाजात जणू त्या विमानांचे आवाज कमी पडत होते. शेवटी वेस्ट इंडीजला हरवून आपण भारतात परतलो होतो. विमानाच्या दरवाजात ती ट्रॉफी घेऊन उभा असलेला सुनील मनोहर गावसकर, अजूनही माझ्या डोळ्यांसमोर तसाच उभा आहे. 

१९७१पासून आजपर्यंत मी दादाच्या अनेक मित्रांना, सहकाऱ्यांना, सिनियर्सना भेटलो आहे. प्रत्येक माणसाने मला दादाचे नवनवीन पैलू उलगून दाखवले. १९८२ साली, मी क्रिकेट क्लब ऑफ इंडियातर्फे ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होतो. आणि मेलबर्नहून अॅडलेडला जाताना, चेक-इन करताना किरण आशर या मुंबईच्या जुन्या खेळाडूने एका खेळाडूशी माझी ओळख करून दिली. त्याच फ्लाईटमध्ये आमच्या बरोबर होते वेस्ट इंडीजचे दिग्गज खेळाडू – सर गारफील्ड सोबर्स. त्या प्रवासात सोबर्स ह्यांनी मला त्यांच्या शेजारी बसण्यास सांगितलं, आणि पुढे साधारण दीड तास ते माझ्याशी दादाविषयी बोलत होते.  त्यांनी १९७१च्या त्या दौऱ्याच्या अनेक आठवणी जागवल्या. सुनील आणि वेस्ट इंडीज प्रेक्षकांचं एक वेगळं नातं उलगडून दाखवलं. त्या वेळी सुनील चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता. त्याच्या धावा होत नव्हत्या. “काळजी नसावी. सुनीलचं तंत्र अचूक आहे. लवकरच तो फॉर्ममध्ये येईल, आणि खोऱ्याने धावा करेल,” सोबर्स सांगत होते. आणि पुढच्या दौऱ्यात तेच झालं. सोबर्स ह्यांची भविष्यवाणी खोटी ठरली नाही. अॅडलेडच्या विमानतळावर उतरल्यानंतर सोबर्स सरांनी विचारलं, “सुनील आर्मगार्ड का वापरतो आहे? त्याला सांग की तो खरं म्हणजे जास्त चांगला फलंदाज आहे, त्याला आर्मगार्डची गरजदेखील नाहीये.” मी काय बोलणार होतो, साहजिकच माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. मुंबईला परत आल्यावर मी सोबर्स सरांचा निरोप दादाला सांगितला. दादा नुसतंच हसला. “गॅरी असं म्हणाला! त्याच्यासाठी ठीक आहे रे. तो त्याची संपूर्ण करिअर थायपॅड (मांडीला लावण्यासाठी असलेलं पॅड) न लावता खेळला आहे, आणि तेसुद्धा जगातल्या सर्वोत्तम गोलंदाजांसमोर.” दादाच्या  त्या मिश्किल चेहऱ्यावर अजूनच खोडकर भाव होते.  

दादा त्याच्या आवडत्या गोष्टींप्रती, त्याच्या प्रोफेशनप्रती कायमच एकनिष्ठ आहे. तो त्याचं खासगी आणि व्यावसायिक आयुष्य अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळतो. काही वर्षांपूर्वी दादा एका कपड्यांच्या ब्रँडचा Ambassador होता. तो करार संपूनसुद्धा अनेक वर्षे लोटली होती. आत्ता काही दिवसांपूर्वी रोहन त्याला काही कपडे विकत घेण्यासाठी दुसऱ्या एका ब्रॅण्डच्या दुकानात घेऊन गेला. पण सुनीलने त्या ब्रँडचे कपडे विकत घेण्यास नकार दिला. एखाद्या ब्रॅण्डसाठी करार केल्यानंतर त्यांच्याच प्रतिस्पर्ध्यांचे कपडे वापरणे त्याच्या स्वभावात बसत नव्हते. त्याची त्या ब्रॅण्डशी असलेली निष्ठा तो करार संपल्यानंतरसुद्धा कायम होती. 

सुनीलदादाच्या सगळ्याच गोष्टी काही ना काही शिकवून जातात. तो कायमच दादर युनियनसाठी खेळत राहिला. कसोटी क्रिकेट खेळत असताना, आणि देशातला सर्वोत्तम खेळाडू असताना, तसेच निवृत्तीनंतरसुद्धा तो त्याच्या क्लबसाठी कायम तयार असे. त्याने क्लबच्या मॅनेजमेंटला सांगून ठेवले होते, की कधीही गरज असेल तेव्हा मी क्लबसाठी खेळायला येईन. आणि तो आलादेखील. 

१९८५ साली मी एका म्युझिकल कॉन्सर्टच्या निमित्ताने वेस्ट इंडीज बेटांवर होतो. त्या वेळी त्रिनिदादमध्ये असताना एका पार्टीत वेस्ट इंडीजचा सर्वोच्च फलंदाज कोण अशी एक चर्चा रंगात आली होती. सर व्हिव रिचर्ड्स आणि रोहन कन्हाय, दोघांचेही समर्थक तावातावाने वाद घालत होते. अशा वेळी, त्या पार्टीच्या आयोजकाने माझी ओळख करून दिली. मी मुंबईचा आहे, आणि सुनील गावसकर माझा भाऊ आहे हे कळल्यानंतर त्या पार्टीचा रंगच पालटला. रिचर्ड्स आणि कन्हाय समर्थकांचा तो वाद तिथेच मिटला. माझ्या त्या सर्व पार्टी मित्रांनी आपले मद्याचे प्याले उचलले, आणि एकसुरात त्या दिग्गजाला मानवंदना दिली. “Cheers to the Maastah!” ती मानवंदना होती सुनील मनोहर गावसकर ह्या माणसाला. सुमारे १३-१४ वर्षांपूर्वी त्याच वेस्ट इंडीजमध्ये मैदानं गाजवलेल्या त्या लीजण्डला. आणि अभिमानाने, डोळ्यात पाणी आणून ती मानवंदना स्वीकारणारा होता त्याचा आत्येभाऊ, मी. सुनील मनोहर गावसकर, माझा क्रिकेटमधला खरा हिरो!

To know more about Crickatha