ball

आशियाई खेळात भारतीय क्रिकेट संघ

by कौस्तुभ चाटे

 क्रिकेट आणि ऑलिंपिक्स हे अजून तरी एक स्वप्नच आहे. ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश व्हावा अशी अनेक क्रिकेट रसिकांची इच्छा आहे. ती कधी पूर्ण होईल हे सांगणे अवघड आहे पण गेल्या काही वर्षांमध्ये आशियाई खेळांमध्ये मात्र क्रिकेटची वर्णी लागल्याचे दिसून येते. आशियाई देशांमध्ये, खास करून भारतीय उपखंडात क्रिकेटची लोकप्रियता इतर कोणत्याही खेळापेक्षा काहीशी अधिक आहे हे नक्की. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि नवीनच दाखल झालेला अफगाणिस्तान हे सगळेच देश क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळताना दिसतात. त्याचबरोबर नेपाळ. युएई, ओमान, हॉंगकॉंग सारख्या देशांनी देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली नोंद केली आहे. महिला क्रिकेटचा विचार करता थायलंड, जपान सारख्या देशांमध्ये देखील क्रिकेटचा प्रचार आणि प्रसार होताना दिसतो. तरीदेखील एशियन खेळांमध्ये क्रिकेटची सुरुवात व्हायला अनेक वर्षे गेली. सगळ्यात प्रथम २०१० च्या खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश केला गेला, नंतर २०१४ मध्ये देखील क्रिकेट एशियाडचा भाग होते. पण २०१८ मध्ये मात्र क्रिकेटला वगळले गेले. आता सप्टेंबर महिन्यात चीन मध्ये होणाऱ्या आशियाई खेळांमध्ये पुन्हा एकदा क्रिकेट दिसेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या वर्षीच्या खेळांमध्ये भारताचे पुरुष आणि महिला असे दोन्ही संघ या स्पर्धेत भाग घेताना दिसतील. अर्थातच ही गोष्ट भारतीय खेळाडू, रसिकांबरोबरच आशियाई खेळ आणि क्रिकेटसाठी देखील महत्वाची आहे. 

मागच्याच आठवड्यात बीसीसीआयने या स्पर्धेसाठी आपल्या दोन्ही संघांची घोषणा केली. पुरुष संघ ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली भाग घेईल तर महिला संघाची कर्णधार असेल हरमनप्रीत कौर. महिला संघ जरी पूर्ण ताकदीने या स्पर्धेत भाग घेत असला तरीदेखील पुरुषांची ‘बी’ टीम या स्पर्धेत उतरते आहे असेच म्हणावे लागेल. आशियाई स्पर्धा सप्टेंबरच्या शेवटी शेवटी सुरु होणार आहेत, आणि क्रिकेटचे सामने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालतील. तोपर्यंत क्रिकेट विश्वचषकाची सुरुवात झाली असेल. त्यामुळे बीसीसीआय आपला प्रमुख संघ आशियाई खेळांसाठी पाठवेल याची शक्यता नव्हतीच. या वर्षी आशियाई स्पर्धांमध्ये टी-२० क्रिकेट असणार आहे, त्यामुळे या संघनिवडीकडे बारकाईने बघितले असता त्यावर आयपीएलचा मोठा पगडा दिसतो, आणि ते साहजिकही आहे. गेल्या काही आयपीएल स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केलेले ऋतुराज, रिंकू सिंग, तिलक वर्मा, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे, जितेश शर्मा, प्रभसिम्रन सिंग, रवी बिष्णोई असे अनेक खेळाडू या संघाचा भाग असतील. महिला संघामध्ये हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राजेश्वरी गायकवाड, रिचा घोष सारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेल्या खेळाडू असतील. दोन्ही संघ नक्कीच तुल्यबळ आहेत, आणि या संघांकडून आपण पदकाची अपेक्षा नक्की करू शकतो. 

आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय क्रिकेट संघ प्रथमच भाग घेत आहेत. यापूर्वी झालेल्या स्पर्धांमध्ये बीसीसीआयच्या आडमुठ्या धोरणांमुळे भारतीय संघाने भाग घेतला नाही. खेळाडूंच्या व्यग्रतेचे तसेच आंतरराष्ट्रीय बांधिलकी (commitment) चे कारण देत आपण नेहेमीच या स्पर्धांपासून दूर राहिलो. अर्थात यापूर्वीच्या स्पर्धांमध्ये इतर देशांनी आपले संघ पाठवले असले तरी ते मुख्य संघ होतेच असे नाही. पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका सारख्या संघांनी आपले मुख्य संघ स्पर्धांपासून लांबच ठेवले. यावर्षी देखील तसेच काहीसे घडेल कारण आशियाई खेळांपाठोपाठच भारतामध्ये क्रिकेट विश्वचषक देखील खेळला जाणार आहे. २०१० मध्ये झालेल्या स्पर्धेत, पुरुष क्रिकेट स्पर्धेत बांगलादेश (सुवर्ण), अफगाणिस्तान (रौप्य) आणि पाकिस्तान (कांस्य) हे संघ पदकांचे मानकरी ठरले होते. तर २०१४ मध्ये हा मान अनुक्रमे श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांना मिळाला. महिलांच्या क्रिकेटमध्ये मात्र पाकिस्तानने दोन्ही वर्षी सुवर्ण आणि बांगलादेश रौप्य पदकाचे मानकरी ठरले. २०१० मध्ये कांस्य पदक जपानने मिळवले तर २०१४ मध्ये श्रीलंकेने. या दोन्ही स्पर्धांमध्ये ‘दादा’ आशियाई संघांबरोबरच जपान, चीन, हॉंगकॉंग, नेपाळ, मालदीव मलेशिया, थायलंड सारख्या संघांनी भाग घेतला होता. आता या वर्षी भारतीय संघाच्या समावेशाने हे पदकांचे गणित काहीसे बदलेल अशी आशा करायला हरकत नाही.   

क्रिकेटचा ऑलिम्पिक किंवा आशियाई खेळांमध्ये समावेश न करण्यामागे एक प्रमुख कारण आहे म्हणजे क्रिकेटचा पारंपारीक फॉरमॅट. कसोटी क्रिकेटचा या खेळांमध्ये समावेश करणे अवघडच होते. गेल्या काही वर्षात सुरु झालेले टी-२० क्रिकेट या स्पर्धांसाठी योग्य होते, आणि हळूहळू त्याचा समावेश होतंच गेला. जगातील सर्वात श्रीमंत बोर्डाच्या कृपेने आपले भारतीय क्रिकेटपटू सर्वोत्तम सोयी सुविधांचा वापर करताना दिसतात. त्यांना मिळणारे मानधन, त्यांना असणारं फॅन फॉलोइंग, मीडियाने दिलेलं महत्व या सर्वच गोष्टी कल्पनेपलीकडील आहेत, त्या इतर खेळांना कमी मिळतात. अर्थात इथे तुलना करायची नाहीये, पण क्रिकेट इतकेच इतर खेळांना देखील योग्य महत्व मिळावे अशीच प्रामाणिक इच्छा आहे. आशियाई किंवा ऑलिम्पिक खेळ म्हणजे त्या त्या विभागाचा उत्सव असतो. इथे सर्वच खेळाडूंना सारखीच वागणूक मिळते. एशियन व्हिलेज (किंवा ऑलिम्पिक व्हिलेज) हे एक वेगळंच प्रकरण असतं. अनेक खेळाडू तिथे एकत्र राहतात, सराव करतात, एकत्र खातात.. जणू सगळे एकत्रच जगतात. या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या क्रिकेटपटूंना त्या वातावरणाची सवय होईल. कदाचित काही हवेत असलेली विमाने जमिनीवर तरी येतील. सर्वात मुख्य म्हणजे एखाद्या खेळातले पदक (सुवर्ण, रौप्य अथवा कांस्य) मिळवण्याचा आनंद, त्यासाठी केले जाणारे परिश्रम याची जाणीव त्यांना होईल, निदान व्हावी ही अपेक्षा आहे. 

पुणेकर ऋतुराजच्या नेतृत्वाखाली आपला संघ या स्पर्धेत खेळेल. ऋतुराजकडे आता तिन्ही फॉरमॅटचा खेळाडू म्हणून बघितलं जात आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे ही एक मोठी संधी असेल. हे सर्व खेळाडू आशियाई स्पर्धेत खेळणार आहेत, याचा अर्थ विश्वचषकासाठी त्यांची निवड होण्याची शक्यता कमी आहे. विश्वचषक जिंकणे हे कोणत्याही क्रिकेटपटूचे स्वप्न असते. कदाचित या सर्वांची ही संधी या वर्षी हुकेल, पण पहिल्यांदाच भारतीय संघ आशियाई स्पर्धेत क्रिकेटमध्ये भाग घेणार आहे, त्या स्पर्धेत विजेतेपद मिळवण्याची, आणि अर्थातच सुवर्णपदक मिळवण्याची संधी या सर्वांकडे आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १९८३ मध्ये मिळवलेला ‘कपिल’ चा संघ असेल, किंवा २००७ मध्ये टी-२० विजेतेपद मिळवलेला ‘धोनी’ चा संघ असेल… त्यांचा उल्लेख कायमच ‘पहिल्या’ विजेतेपदाचा केला जातो. ती भावना देखील वेगळीच असते, आणि क्रिकेट रसिक देखील ते अनंत काळ लक्षात ठेवतात. ऋतुराजसमोर हीच संधी आहे. या पहिल्या सुवर्णपदकाचे मोल काहीसे वेगळेच असेल. आपल्या मराठमोळ्या ऋतुराजने या संधीचा फायदा घेऊन आपल्या सांघिक कामगिरीने भारताला सुवर्णपदक मिळवून द्यावे हेच स्वप्न भारतीय क्रिकेटरसिक करत असेल. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात क्रिकेट विश्वचषक सुरु होईल, आणि त्याच सुमारास आपला दुसरा संघ चीनमध्ये झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत असेल हे स्वप्न खरोखरच अद्भुत आहे.      
 

To know more about Crickatha