WTC फायनल ची अग्निपरीक्षा
आयपीएल चा धामधूम संपला.. आडवे बॅटीचे फटके संपले.. आता क्रिकेट इन व्हाईट्स चा सिझन इंग्लंड मधून सुरू होणार.. त्याचा श्रीगणेशा WTC च्या फायनल ने होईल.. याच WTC फायनल चे केलेले पूर्वावलोकन…
फायनल ची पार्श्वभूमी: रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, महंमद शमी, स्टीव्ह स्मिथ, डेव्हीड वॉर्नर या साऱ्यांची ही कदाचित शेवटची WTC फायनल असेल या पुढची WTC फायनल 2025 ला संपते तोपर्यंत या दिग्गजांमधले किती जणं खेळत असतील याबाबत माझ्या मनात शंका आहे.. हे सगळे दिग्गज आपल्या कारकिर्दीच्या उताराकडे झुकले आहेत..त्यामुळे यातील प्रत्येक जण आपल्या कौशल्याची पराकाष्ठा करून ही WTC जिंकण्याचा प्रयत्न करेल..
दोन्ही संघांची तयारी: WTC च्या फायनल ला पोहोचताना दोन्ही भारत आणि ऑस्ट्रेलिया ने साखळी स्पर्धेत उत्तम कामगिरी केली ऑस्ट्रेलिया ने घरच्या मैदानावरील तिन्ही मालिका जिंकल्याच त्याशिवाय पाकिस्तान, भारतात ही कसोटी विजय मिळवले..भारताने इंग्लंड, बांगलादेश, आणि दक्षिण आफ्रिकेत कसोटी विजय मिळवले पण बांगलादेश वगळता इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत मालिका विजय दूर राहिला.. घरच्या मैदानावरील श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड विरुद्ध च्या मालिका जिंकल्या..
इंग्लंड चे हवामान: WTC फायनल होत असलेल्या इंग्लंड मधील हवामान लहरी असते.. क्षणात पाऊस, क्षणात ऊन असे हवामान असल्याने एक एक सेशन मध्ये सामन्याचा कल बदलू शकतो..WTC फायनल च्या दिवसात पावसाची शक्यता सध्या जरी दिसत नसली.. तरी इंग्लंड मध्ये मेघ नभांवर कधीही आक्रमण करतात.. त्यामुळे खेळपट्टी ताजी राहिली तर बॉल हवेत आणि पिच दोन्ही वर हलतो.. फायनल होत असलेल्या ओव्हल चा स्क्वेअर मोठा आहे त्यामुळे मैदान मोठं असले तरी बॉल लवकर सीमेपार जाऊ शकतो.. सामन्यासाठी ICC ने राखीव दिवस ठेवला आहे, पण सामना सहाव्या दिवसापर्यंत जाईल असे वाटत नाही..
संभावित प्लेइंग ११*:ऑस्ट्रेलिया: पॅटकमिन्स, डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाब्युशेन, स्टीव्ह स्मिथ, अलेक्स केरी(यष्टीरक्षक), कॅमेरून ग्रीन, मिचेल स्टार्क, स्कॉट बोलन्ड, जोश हेझलवूड, नॅथन लायन.
भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के एस भरत(यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, महंमद शमी, महंमद सिराज, उमेश यादव..* दुखापत वगळता
मेक ओर ब्रेक संधी: शुभमन गिल ने पदार्पण केल्यापासून फारसे निराश केलेले नाही.. पण कसोटी क्रिकेट मध्ये दोन- तीन नर्व्हस नाईनटीज मध्ये बाद झाल्यानंतर आता शतके करू लागला आहे.. करियर च्या सुरुवातीला इतकी चांगली संधी मागून मिळत नाही. WTC सारख्या मोठ्या स्पर्धेत चमकदार कामगिरी कायम स्मरणात राहते..फर्स्ट चॉईस रिषभ पंत जायबंदी झाल्यापासून आणि आणखी एक दीड वर्ष तो मैदानावर येणार नसल्याने किमान कसोटी संघात जागा पक्की करण्याची सुवर्ण संधी के एस भरत आणि ईशान किशन साठी चालून आली आहे.. WTC सारख्या मोठ्या व्यासपीठावर जर हे दोघे चमकले तर या दोघांची नावे भारतीय क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरली जातील.. उलटपक्षी कामगिरी न झाल्यास बाजूला पडलेला साहा, एव्हर वेटिंग सॅमसन सारख्याना पुन्हा संघाचे दरवाजे उघडले जातील…
बॅटल विदिन बॅटल: गिल, पुजारा, कोहली, रहाणे हे फॉर्मात असले तरी काळजीचे कारण कर्णधार रोहित शर्मा होऊ शकतो.. त्याचा फॉर्म आणि फिटनेस दोन्ही किमान ते सहा दिवस नीट राहणं भारतासाठी अत्यंत गरजेचे आहे.. लोवर बॅटिंग ऑर्डर मध्ये जडेजा, ठाकूर यांच्याकडून 50-60 धावांची भर पडेल अशी आशा करायला हरकत नाही.. बॉलिंग मध्ये मुख्य मदार शमी- सिराज या जोडीवर राहील त्यांना साथ द्यायला यादव-ठाकूर-जडेजा या त्रिकुट असतील..ऑस्ट्रेलियात वॉर्नर, ख्वाजा, स्मिथ, लाब्युशेन ही चौकडी दोन्ही डावात लवकर बाद करणे भारताच्या दृष्टीने उत्तम राहील.. बॉलिंग मध्ये दोन्ही डावात हेझलवूड, स्टार्क, कमिन्स, बोलन्ड यांना लवकर विकेट न फेकणे अतिशय महत्त्वाचे राहील.. दोन्ही डावात दोन्ही संघात ओपनर ची भूमिका कळीची राहील कारण, दोन्ही संघांचा बॉलिंग अटॅक बॅलन्स वाटतो.
दशकाची प्रतीक्षा: भारताने शेवटची ICC ट्रॉफी जिंकली ती इंग्लंड मध्येच 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी!! त्याला जवळ जवळ दशक उलटलं.. त्यावेळी 4G नव्हतं, मोदी राष्ट्रीय स्तरावर आले नव्हते, काँग्रेस सत्तेत होती, सोशल मिडिया आजच्या इतका फोफावला नव्हता.. बराच काळ लोटून गेला..इंतेहा हो गयी.. मधल्या काळात रोहित शर्मा जगातील सर्वोत्तम ओपनर झाला.. शिखर धवन चं करियर सुरू होऊन जवळजवळ संपलं… या वर्षी ही दशकाची प्रतीक्षा संपेल अशी प्रत्येक क्रिकेट प्रेमीची आशा असेल..