ball

तयारी मोहिमेची 

by कौस्तुभ चाटे

२०२३ च्या विश्वचषक स्पर्धेला आता खरं तर दोन महिन्यांपेक्षाही कमी काळ आहे. ५ ऑक्टोबरला अहमदाबादच्या मैदानावर विश्वचषकाचा पहिला सामना खेळला जाईल. तो पर्यंत संपूर्ण देश क्रिकेटच्या रंगात रंगायला सुरुवात झाली असेल. भारताची पहिली लढाई ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध चेन्नई येथे असणार आहे. क्रिकेट जगताच्या नजरा या विश्वचषक स्पर्धेवर नक्कीच आहेत. एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेला मोठा इतिहास आहे, आणि क्रिकेटप्रेमी त्या स्पर्धेकडे लक्ष ठेवून असतात. यावर्षी ही स्पर्धा प्रथमतः पूर्णपणे भारतात होणार आहे. याआधीच्या स्पर्धा भारतीय उपखंडात झाल्या होत्या. आता १२ वर्षांनी होत असलेली ही स्पर्धा आपल्यासाठी जास्तच महत्वाची आहे. २०११ मध्ये भारतात झालेल्या स्पर्धेत आपण विजेतेपद मिळवलं होतं. पण त्यानंतरच्या दोन्ही स्पर्धांमध्ये आपण उपांत्य फेरीतून बाहेर पडलो. आपल्या घरच्या मैदानांवर आपण कशी कामगिरी करतो याकडे भारतीयच नाही, इतरही क्रिकेट रसिकांचं लक्ष असेल. आपलीही त्या दृष्टीने तयारी सुरु आहेच, पण … आणि हा पण जास्त महत्वाचा आहे. 


२०११ मध्ये आपण स्पर्धा जिंकली तेंव्हा अजूनही एकदिवसीय क्रिकेट हे चलनी नाणं होतं. ज्या टी-२० क्रिकेटने त्यावेळी बाळसं धरलं होतं, तेच टी-२० क्रिकेट, आणि खास करून आयपीएल सारखी स्पर्धा आता तारुण्यावस्थेत आली आहे. आता येणारा नवीन क्रिकेटपटू त्या २० षटकांच्या क्रिकेटचा जास्त विचार करताना दिसतो. देश सोडून आयपीएल संघाची धुरा वाहताना जास्त दिसतो. अशावेळी देशासाठी, ते देखील ५० षटकांच्या क्रिकेटकडे कोण लक्ष देणार हा प्रश्न पडू लागला आहे. गेल्या काही महिन्यांचा आढावा घेतला तर आपल्याला तेच दिसून येईल. आपण आजकाल बारा महिने तेरा त्रिकाळ क्रिकेट खेळत असतो. त्यामुळे आता तर आपले २०-२५ खेळाडू एकाचवेळी कुठे ना कुठे खेळताना दिसतात. आपले दोन संघ एकाचवेळी क्रिकेट खेळताना दिसू शकतील असं काही वर्षांपूर्वी म्हटलं जात असे, ते आता खरं होताना दिसतंय. या विश्वचषकाबरोबरच, त्याच सुमारास आपला एक संघ आशियाई खेळांमध्ये भाग घेईल, आणि मुख्य संघ विश्वचषक खेळत असेल. 

या विश्वचषक संघाची निवड हा महत्वाचा प्रश्न आहे. हळूहळू सर्वच संघ आपले १५-१८ खेळाडू जाहीर करतील. ऑस्ट्रेलियाने याच आठवड्यात आपला १८ खेळाडूंचा संभाव्य संघ जाहीर केला आहे. (ऑस्ट्रेलियन्स या बाबतीत कायमच पुढे असतात.) आपल्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या काही महिन्यात सदोष संघनिवड, खेळाडूंचा योग्य वेळी फॉर्म हरपणे आणि काही प्रमुख खेळाडूंच्या दुखापती या महत्वाच्या गोष्टीं समोर येतात. जून २०२३ नंतरचा विचार केल्यास (या वर्षीची आयपीएल स्पर्धा संपल्यानंतरचा) आपण वेस्टइंडीज विरुद्ध ३ एकदिवसीय सामने, आशिया कप आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध घरच्या मैदानावर ३ सामने अशा मालिका खेळणार आहोत. पैकी वेस्टइंडीज विरुद्ध आपण अनेक प्रयोग करून बघितले. रोहित-विराटला संघाबाहेर ठेवून तरुण संघाची निवड केली. त्या संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे होतं. हा प्रयोग चांगला होता, पण त्याची वेळ चुकली का? बरं, ३ पैकी २ सामने आपण जिंकले पण त्यातही आपली धावपळ झालीच ना. वेस्टइंडीजचा संघ विश्वचषकाच्या पात्रता फेरीतूनच बाद झाला आहे. अशा संघाविरुद्ध आपण कमजोर ठरलो. आयपीएल मध्ये नेतृत्व करणे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेतृत्व करणे यात जमीन आस्मानाचा फरक आहे हे देखील हार्दिकला समजले असेल. हार्दिककडे भविष्यातील कप्तान म्हणून बघत असलो तरी या विश्वचषकाच्या आधी रोहितकडेच नेतृत्व ठेवणे आवश्यक होते. आता पुढे येणाऱ्या आशिया कप आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत तरी तोच कप्तान असेल अशी आशा करूया. 

वेस्टइंडीज विरुद्धच्या मालिकेने आपल्या संघातील एक कमजोर बाजू अजूनच उघड केली. गेल्या विश्वचषकात आपली ‘कमजोर कडी’ होती ते म्हणजे चौथ्या क्रमांकावर खेळायला कोण येणार. आज चार वर्षांनंतरही आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलो नाहीये. टी-२० मधल्या कामगिरी नंतर सूर्यकुमार यादववर आपण विसंबून होतो. वाटलं सूर्या आपल्याला नक्की तारून नेईल, पण तोच सूर्या एकदिवसीय सामन्यात संपूर्णपणे अपयशी ठरला. गेल्या काही महिन्यात त्याचा, खास करून एकदिवसीय सामान्यातला, फॉर्म पूर्णपणे बिघडला आहे. जी गत सूर्याची तीच गीलची. शुभमन गील कडे भविष्यातला तीनही फॉरमॅट मधला खेळाडू म्हणून बघितलं गेलं, पण तोही फॉर्मसाठी झगडतोय. नाही म्हणायला ईशान किशन तशी बरी कामगिरी करतो आहे. पण इतर खेळाडूंची खात्री देणे अवघड आहे. रोहित आणि विराट तर पूर्वपुण्याईवर संघात येणार हे नक्की आहे. अर्थात त्यांनी फॉर्म मध्ये येऊन चांगला खेळ करणे आपल्यासाठी महत्वाचे आहे, आणि दोघांनीही टॉप गिअर टाकला तर त्यांना थांबवणे अवघड असते. इतर फलंदाजांपैकी श्रेयस अय्यर आणि के एल राहुल अजूनही दुखापतग्रस्त आहेत. ते विश्वचषकाआधी तंदुरुस्त होतील अशी आशा आहे. पण त्यांचा फॉर्म कसा असेल हा एक चर्चेचाच विषय. संघाच्या आजच्या सेटअप मध्ये अजिंक्य सारख्या खेळाडूला स्थान नाही हे देखील निश्चित आहे. 

आपल्याकडे आधीपासूनच अष्टपैलू खेळाडूंची वानवा आहे. हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि काही प्रमाणात अश्विन या अष्टपैलूंना घेऊन आपण खेळू. मुळात हार्दिकच्या तंदुरुस्तीची चिंता आपल्याला कायमच असेल. आणि देव न करो, पण तो जायबंदी झाला तर त्याऐवजी कोण हा प्रश्न असेलच. आपण त्याचा बदली खेळाडू (रिप्लेसमेंट) तयार केलाच नाहीये. जडेजा आणि अश्विनमुळे आपल्याकडे फिरकी अष्टपैलू आहेत असे म्हणू शकतो. जडेजा संघात असल्याने क्षेत्ररक्षणाचा प्रश्न देखील बऱ्यापैकी सुटतो. पण त्याच बरोबर युझवेन्द्र चहल किंवा कुलदीप यादव पैकी कोणाला संघात घ्यायचं का, की दोघांनाही बाहेरच ठेवायचं हा प्रश्न निवडसमिती समोर असेल. वेगवान गोलंदाजांचा विचार करता शमी, सिराज आणि काही प्रमाणात शार्दूल ठाकूर यांनी आपली जागा पक्की केली आहे. जी गत पांड्याची तीच जसप्रीत बुमराहची. गेले अनेक दिवस तो देखील दुखापतींशी लढतो आहे. आयर्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याला आपला फिटनेस सिद्ध करण्याची संधी आहे. पण वेगवान गोलंदाज म्हटलं की तो दुखापतग्रस्त असणारच, आणि त्यातच बुमराह त्याच्या बॉलिंग ऍक्शन मुले कायमच त्या दुखापतग्रस्त क्षेत्रात सापडतो. तो नसल्यास अजून एक वेगवान गोलंदाज संघात आणावा की फिरकी गोलंदाजीवरच भर द्यावा हा देखील एक महत्वाचा प्रश्न असेल. 

एकूणच अजूनही आपला १५-१८ लोकांचा संघ तयार दिसत नाहीये. ज्यांच्यावर भरवसा आहे, त्यांची नीट खेळण्याची खात्री नाही. जे बरे खेळतात, ते दुखापतीने ग्रस्त आहेत. ज्यांच्यावर खेळाची मदार आहे, ते खेळाडू फॉर्ममध्ये नाहीत अशी विचित्र अवस्था आपली झाली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणारी ही स्पर्धा दिवाळी नंतर काही दिवसांनी संपेल. त्यावेळी परत एकदा आपण दिवाळी साजरी करायची असेल तर योग्य संघनिवड करणे महत्वाचे ठरणार आहे. घोडामैदान आता दूर नाहीये. थोडेच दिवसात आपला संघ जाहीर होईल, मग खऱ्या अर्थाने आपल्या विश्वचषक मोहिमेला सुरुवात होईल आणि क्रिकेटप्रेमींच्या नजरा परत एकदा त्या स्पर्धेकडे वळतील. 

To know more about Crickatha