ball

सचिन … ५० नॉट आऊट 

by Kaustubh Chate

सचिन तेंडुलकर आज वयाची पन्नास वर्षे पूर्ण करतो आहे. आज असंख्य क्रिकेट रसिकांसाठी हा खूप मोठा क्षण आहे. जणू आपल्याच घरातील एखाद्याचा वाढदिवस असावा अशा आनंदात, उत्साहात हा वाढदिवस साजरा होतो आहे. खरोखर सचिन हा आपलाच आहे. कोणाला तो आपला सखा वाटतो, कोणासाठी आपला मुलगा असतो, कोणासाठी भाऊ तर कोणासाठी सगळ्यात मोठा आदर्श. सचिन रमेश तेंडुलकर या नावाचं गारुड आपल्या भारतीयांच्या मनावर गेली काही वर्षे कायम आहे, आणि ते उतरावं असंही वाटत नाही. “सचिन … सचिन” या आरोळीत ज्या भावना आहेत, जे प्रेम आहे त्याचं वर्णन करणं अशक्य आहे. ही भावना फक्त समजून घ्यावी लागते. ही आरोळी दिल्यानंतर जे वाटतं त्याचं वर्णन जगातल्या कोणत्याही भाषेत होऊ शकत नाही. मुंबईपासून मेलबर्नपर्यंत आणि डर्बनपासून लंडनपर्यंत, सगळ्याच क्रिकेट मैदानांनी हा अनुभव घेतला आहे. आज ‘आपल्या’ सचिनचा पन्नासावा वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा !! 


सचिन शालेय वयापासूनच क्रिकेटचं मैदान गाजवतो आहे. शालेय क्रिकेटपासून सुरु झालेला त्याचा हा प्रवास आपण सगळ्यांनीच अनुभवला आहे. शारदाश्रम साठी त्याने केलेल्या खेळ्या, आचरेकर सरांनी त्याच्यावर घेतलेली मेहनत, विनोद कांबळी बरोबर झालेली ती अप्रतिम भागीदारी… जणू दंतकथाच. त्यानंतर रणजी, दुलीप आणि इराणी ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यात केलेली शतकं. १९८९ साली पाकिस्तानच्या दौऱ्यावर इम्रान, वासिम आणि वकार समोर कसोटी क्रिकेटमध्ये ठेवलेलं पाऊल, त्याच दौऱ्यात पेशावरला अब्दुल कादिरला मारलेले षटकार… एक ना अनेक गोष्टी. कोणत्याही पिढीतल्या मुलांसाठी मोठं होताना त्यांना एक सुपरहिरो लागतो, मग तो ‘सुपरमॅन’ असेल किंवा ‘स्पायडरमॅन’. आम्हा ९०च्या दशकात मोठ्या झालेल्या मुलांसाठी आमचा सुपरहिरो होता तो म्हणजे सचिन तेंडुलकर. तो मैदानावर उभा आहे हेच आमच्यासाठी खूप होतं. एक-दोन नाही तब्बल २२-२४ वर्षे या माणसाने आमच्यावर राज्य केलं. आणि आम्हीदेखील अतिशय प्रेमाने या राजाला आपलंस केलं. तो आमच्यासाठी मोठा भाऊ होता, मित्र होता, कायमच आदर्श होता. 

सचिनच्या बॅटिंगबद्दल लिहायचं तर रकानेच्या रकाने अपुरे पडतील. सामान्य माणसाला त्याच्या बॅटिंग टेक्निक्स बद्दल फारसं काही बोलता येत नसेल  कदाचित,पण त्याच्या त्या फलंदाजीमुळे वेळोवेळी त्याच सामान्य माणसाला जो आनंद मिळाला आहे त्याचं वर्णन करणे अशक्य आहे. सचिनची बॅटिंग म्हटलं तर कोणाला त्याची १९९१ ची पर्थची खेळी आठवेल, कोणी दक्षिण आफ्रिकेतील शतकाचा फॅन असेल, कोणासाठी शारजातल्या ‘डेझर्ट स्टॉर्म’ महत्वाचं असेल, कोणासाठी १९९९ साली चेन्नईमध्ये पाकिस्तान विरुद्ध केलेलं शतक महत्वाचं असेल, कोणी २००३ च्या विश्वचषकातील त्या झंझावाती ९८ धावांची तारीफ करेल, कोणी २००४च्या सिडनी कसोटीतील त्या संयमी खेळीविषयी बोलेल, कोणासाठी एकदिवसीय सामन्यातील ते द्विशतक जास्त जवळचं असेल तर कोणासाठी आणखी काही. सचिनच्या प्रत्येक खेळीने आम्हा सामान्य क्रिकेट रसिकांना भरभरून आनंद दिला आहे. 
मला वाटतं सचिनचा सगळ्यात मोठा गुण आहे तो म्हणजे त्याचा साधेपणा. विचार करा, वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षांपासून तो एका ‘ग्लॅमर’च्या दुनियेत आहे. तो काय खातो, किती सराव करतो, कुठे जातो याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. या वयात हे ग्लॅमर एखाद्याला मिळत असेल तर भलेभले बिघडतात. पण गेल्या पस्तीस वर्षात हा मनुष्य तसाच आहे. आणि या सगळ्याचं श्रेय जातं ते तेंडुलकर कुटुंबाला. अतिशय सुसंस्कृत परिवारात वाढलेल्या सचिनवर संस्कार पण तसेच झाले. सचिनचे आई-वडील, ज्या काकांकडे राहून तो शिवाजी पार्कला खेळायला गेला ते काका-काकू, दोन भाऊ – नितीन आणि अजित, बहीण सविता… हे कुटुंबच अगदी साधं आहे. आज सचिनने जे कमावलं आहे त्याकडे बघता तेंडुलकर कुटुंबाच्या जागी इतर कोणीही असतं तरी त्याचा किती वेगवेगळ्या प्रकारे फायदा करून घेतला असता याचा नुसता विचार करून बघा. सचिन कीर्तीच्या यशोशिखरावर असताना देखील या कुटुंबातील प्रत्येक सदस्य कायमच जमिनीवर आहे. अजून एका व्यक्तीबद्दल सांगणे आवश्यक आहे ते म्हणजे सचिनची सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्वाची पार्टनर – सौ. अंजली तेंडुलकर. सचिनच्या प्रत्येक सुखदुःखात तिची मोलाची साथ आहे. सचिनची पत्नी म्हणून तिने तिच्या जबाबदाऱ्या सचिन इतक्याच समर्थपणे पेलल्या आहेत. सचिनची दोन्ही मुलं – सारा आणि अर्जुन – त्यांनाही लहान वयातच ग्लॅमर मिळतंय, पण त्या वयात देखील ते ग्लॅमर कसं उत्तम सांभाळायचं हे त्यांना माहित आहे, हेच त्या संपूर्ण कुटुंबाच्या सुसंस्कृतपणाचं उत्तम उदाहरण आहे. बघा ना, परवा मुंबई इंडियन्स साठी अर्जुनने पदार्पण केलं, उत्तम गोलंदाजी करून फलंदाजांना बाद केलं… मनापासून सांगा, आपल्याच घरातला एक मुलगा खेळतोय ही भावना होती ना मनात? 
आपल्याला सचिन इतका भावला यामागे खरं तर काही रॉकेट सायन्स नाही. एका सध्या घरातला, तुमच्या आमच्या सारखा मुलगा क्रिकेट जगतावर राज्य करतो ही भावनाच आपल्यासाठी मोठी होती. ६ वर्षांच्या बंड्यापासून ९० वर्षांच्या आज्जीपर्यंत प्रत्येकालाच तो आपला वाटला. आज बाहेरच्या जगात प्रत्येकासमोर काही ना काही अडचणी आहेत. वैयक्तिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक सगळ्याच समस्यांना तोंड देत आपला समाज कायमच वावरत असतो. अशावेळी या समाजाला एक हिरो हवा असतो. ९०च्या दशकात आपल्या देशाने कात टाकली असे म्हटले जाते. त्यावेळी पेरलेल्या बीजांची फळे आपण आत्ता उपभोगत आहोत, पुढची अनेक वर्षे त्यांचा आनंद घेऊ. त्याच सुमारास उदयाला आलेल्या या सचिनमध्ये आपल्याला एक हिरो सापडला. आपल्या सामान्य घरातला हिरो. आणि या सचिनमध्ये आम्ही आमची स्वप्ने बघितली. सचिन आणि आम्ही हे नातं फक्त मैदानावरचं नाही, ती एक भावना आहे, तो आमचा श्वास आहे. सचिन रमेश तेंडुलकर … बस नामही काफी हैं !! 
Happy Birthday Sachin !! 
– कौस्तुभ चाटे        

To know more about Crickatha