ball

इतिहास ओव्हलचा

by कौस्तुभ चाटे

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या ओव्हल मैदानाला एक वेगळा इतिहास आहे, आणि इंग्लंडमधील इतर मैदानांसारखाच साहेबाने तो जपून ठेवला आहे. क्रिकेटच्या दुनियेत ओव्हल मैदान एक जुने मैदान म्हणून गणले जाते. दक्षिण लंडन मधील सरे परगण्यातील केनिंगटन भागात उभारल्या गेलेल्या या मैदानाचे मूळ नाव ‘केनिंगटन ओव्हल’. अर्थातच व्यावसायिक कारणांमुळे मैदानाचे नाव बदलले गेले, तरी जुने जाणते क्रिकेट रसिक या मैदानाला ‘केनिंगटन ओव्हल’ म्हणूनच ओळखतात. हे मैदान क्रिकेटच्या अनेक घटनांचे साक्षीदार आहे. या मैदानावर १८८० मध्ये इंग्लंड मधील पहिला कसोटी सामना खेळला गेला, तसेच १८७० साली इंग्लंडचा स्कॉटलंड विरुद्धचा फुटबॉल सामना देखील याच मैदानावर खेळवला गेला. काही तज्ज्ञांच्या मते, दोन देशांमध्ये खेळवला गेलेला हा पहिला फुटबॉल सामना होता. १८८२ साली ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ७ धावांनी पराभव केला, त्यावेळी ‘द स्पोर्टींग टाइम्स’ या क्रीडाविषयक साप्ताहिकाने एक मृत्युलेख प्रसिद्ध केला होता. त्यातूनच पुढे ‘ऍशेस’ मालिकेची सुरुवात झाली. गेली सुमारे १५० वर्षे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशात ही ऍशेस मालिका अव्याहतपणे खेळवली जात आहे. ओव्हल मैदान हे सरे काउंटीचे मुख्य मैदान आहे, आणि प्रामुख्याने इंग्लिश उन्हाळ्यातील शेवटचा कसोटी सामना या मैदानावर खेळवला जातो. १८४५ साली वसवल्या गेलेल्या या मैदानाची आसनक्षमता साधारण २५००० इतकी आहे. या मैदानावर आजपर्यंत १०४ कसोटी सामने, ७५ एकदिवसीय सामने आणि १६ आंतरराष्ट्रीय दर्जाचे टी-२० सामने खेळवले गेले आहेत. 


सर्वसाधारणपणे इंग्लिश मैदान म्हटले की त्याला इंग्लंडच्या लहरी हवामानाचा फटका बसतोच. क्षणात पडणारा पाऊस, आणि लगेचच येणारे ऊन या दोन्ही गोष्टी इंग्लिश मैदानांना नवीन नाहीत. इतर मैदानांप्रमाणेच ओव्हल वरील सामन्यांना देखील या लहरी हवामानाचा फटका निश्चितच बसला आहे. या मैदानावरील खेळपट्टी प्रामुख्याने फलंदाजांना साथ देते असे म्हणतात. इथे होणार सामना उन्हाळ्याच्या शेवटी खेळवला जात असल्यामुळे कदाचित ही खेळपट्टी फलंदाज धार्जिणी झाली असावी. या मैदानावरील सर्वोत्तम धावसंख्या इंग्लंडने १९३८ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना उभारली आहे. त्यावेळी इंग्लिश संघाने ७ गड्यांच्या मोबदल्यात तब्बल ९०३ धावा केल्या होत्या. या सामन्यात सर लेन हटन यांनी ३६४ धावांची खेळी केली होती. ही या मैदानावरील सर्वोत्कृष्ट वैयक्तिक खेळी आहे. इंग्लिश गोलंदाजां डेव्हॉन माल्कम याने १९९४ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५७ धावा देऊन ९ बळी घेतले होते.

पाहुण्या संघाचा विचार करायचा झाल्यास, श्रीलंकेचा जगविख्यात फिरकी गोलंदाज मुथैया मुरलीधरन याने १९९८ साली एका कसोटी सामन्यात १६ बळी घेतले होते, पैकी ९ बळी त्याने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात घेतले. या मैदानावर इंग्लंडच्या हर्बर्ट सटक्लिफ याने तब्बल ५ शतके मारली आहेत, खालोखाल लेन हटन, वॉली हॅमंड, डेव्हिड गावर आणि केविन पीटरसन (प्रत्येकी ४ शतके) व अलिस्टर कूक आणि जेफ बॉयकॉट (प्रत्येकी ३ शतके) यांचा समावेश होतो. गोलंदाजांचा विचार करता इयान बोथमने या मैदानावर ११ सामन्यात ५२ बळी मिळवले आहेत. खालोखाल जेम्स अँडरसन (१५ सामन्यात ४९ बळी) आणि स्टुअर्ट ब्रॉड (१३ सामन्यात ४१ बळी) यांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. येत्या ऍशेस मालिकेत या दोन्ही गोलंदाजांना बोथमच्या बळींचा विक्रम मोडण्याची निश्चितच संधी आहे. या मैदानावर फिरकी गोलंदाजांना देखील योग्य संधी मिळाली आहे. जिम लेकर, टोनी लॉक, डेरेक अंडरवूड, ग्रॅहम स्वान सारख्या इंग्लिश फिरकी गोलंदाजांनी इथे उत्तम कामगिरी केलीच आहे, पण त्याचबरोबर शेन वॉर्न सारख्या दिग्गजाने देखील केवळ ४ कसोटी सामन्यात ३२ बळी मिळवले आहेत. 


भारतीय संघ या मैदानावर १४ कसोटी सामने खेळला आहे. अर्थातच हे सर्व सामने इंग्लंडच्या विरुद्ध खेळले गेले आहेत. या १४ पैकी २ सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे, ५ सामन्यात आपण पराभूत झालो आहोत तर ७ सामने अनिर्णित झाले आहेत. १९७१ सालचा आपला इंग्लंडवरील ऐतिहासिक विजय याच मैदानावरचा. चंद्रा, वेंकट आणि बिशनसिंग बेदीच्या फिरकीच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लिश भूमीवर आपला पहिलावहिला विजय मिळवला होता. तसेच आपल्या मागच्या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाने इंग्लिश संघाला तब्बल १५७ धावांनी हरवले होते. त्यावेळी आपला सध्याचा कर्णधार रोहित शर्माने एक तडाखेबंद शतक केले होते, तर शार्दूल ठाकूरने आपल्या दोन्ही डावात अर्धशतके झळकावली होती. भारतातर्फे या मैदानावर २ खेळाडूंनी द्विशतक केले आहे. १९७९ मध्ये सुनील गावसकरने केलेल्या २२१ धावा आणि २००२ साली राहुल द्रविडच्या २१७ धावा भारतीय क्रिकेट रसिकांसाठी कायमच लक्षात राहतील. इतर खेळाडूंचा विचार करता १९७६ मध्ये रिचर्डसने या मैदानावर इंग्लंड विरुद्ध केलेल्या २९१ धावा म्हणजे क्रिकेट इतिहासातील एक अजरामर खेळी आहे. तसेच डॉन ब्रॅडमनच्या १९३४ साली केलेल्या २४४ धावांचा उल्लेख देखील महत्वाचा आहे.  गोलंदाजांचा विचार करता, भारतातर्फे केवळ ४ गोलंदाजांना या मैदानावर एका इनिंगमध्ये ५ किंवा जास्त बळी मिळवता आले आहेत. भागवत चंद्रशेखर (१९७१ साली ६ बळी), सुरेंद्रनाथ (१९५९ साली ५ बळी), हरभजनसिंग (२००२ साली ५ बळी) आणि मोहम्मद निसार (१९३६ साली ५ बळी) हे ते चार गोलंदाज.  जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियासाठी देखील हे मैदान तितकेसे भावले नाहीये. ऑस्ट्रेलियन संघाने या मैदानावर ३८ कसोटी सामने खेळले आहेत, पैकी फक्त ७ सामन्यात विजय मिळवला आहे. गेल्या २० वर्षांमध्ये तर या संघाला फक्त एका कसोटीमध्ये विजय मिळवता आला आहे.  

इंग्लिश क्रिकेटच्या इतिहासात ओव्हल मैदान नक्कीच महत्वाचे आहे. या मैदानावर जागतिक कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणे हा एका अर्थाने कसोटी क्रिकेटचा बहुमान आहे हे निश्चित. ओव्हल मैदान जगातील सर्वोत्कृष्ट मैदानांपैकी एक समजले जाते, आणि या मैदानावरच खऱ्या अर्थाने ‘ऍशेस’ मालिकेची सुरुवात झाली, त्यामुळे हा सामना खेळवून आयसीसीने एका अर्थाने वर्तुळ पूर्ण केले असे नक्कीच म्हणता येईल. 

To know more about Crickatha