ball

हार्दिक, तुम्हारा चुक्याच !! 

by कौस्तुभ चाटे

मागच्या आठवड्यात वेस्टइंडीज आणि भारत यामधील तिसरा टी-२० सामना गयानामधील प्रॉव्हिडन्स येथे खेळला गेला. हा सामना भारताने सहज जिंकला, आणि मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवले. त्या सामन्यानंतर भारतीय कर्णधार हार्दिक पंड्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाला. सोशल मीडिया हे असं हत्यार आहे की जिथे भल्याभल्यांना ट्रोल केलं जातं. राजकारण, सिनेमा आणि क्रिकेट हे विषय आपल्या देशात असे आहेत की तुम्ही काहीही करा, या सोशल मीडियावर ट्रोल होताच. सेलिब्रीटी असण्याचे जितके फायदे खऱ्या दुनियेत दिसतात, तितकेच तोटे या आभासी दुनियेत प्रकर्षाने जाणवतात. अर्थात हे ट्रोलिंग किती प्रमाणात मनावर घ्यायचं हे प्रत्येकावर अवलंबून असतं. अनेकदा या ट्रोल्सच्या माध्यमातूनच सामान्य जनता आपल्या मुद्द्यांना वाचा फोडते. काही वेळा हे ट्रोलिंग अगदीच चुकीचं असतं असं नाही. ही अशीच वेळ परवा हार्दिकवर येऊन गेली. ती घटना आणि त्यानंतर झालेलं ट्रोलिंग बघता पटकन मनात विचार येऊन गेला… अरे हार्दिक, तुम्हारा चुक्याच !!


त्या सामन्यात असं नक्की काय घडलं की भारतीय कर्णधाराला इतकं ट्रोल केलं गेलं. या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ वेस्टइंडीजच्या १५९ धावांचा पाठलाग करायला उतरला. आपले सलामीवीर – (पहिलाच टी-२० सामना खेळत असलेला यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गील) स्वस्तात बाद झाले. नंतर सूर्यकुमार यादव आणि आपली पहिलीच मालिका खेळणारा तिलक वर्मा यांनी आपला डाव सावरला. दोघांनी एक चांगली भागीदारी केली आणि संघाला विजयाच्या मार्गावर नेऊन ठेवलं. १२१ च्या धावसंख्येवर सूर्यकुमार यादव बाद झाला तेव्हा भारतीय संघ चांगला सुस्थितीत होता. तिलक वर्मा देखील चांगला खेळत होता. त्याने आधीच्या दोन सामन्यात देखील चांगली कामगिरी केली होती. एका सामन्यात तर अर्धशतक देखील केले होते. अशावेळी त्याची साथ द्यायला कर्णधार हार्दिक पंड्या मैदानावर आला. हार्दिकने मैदानावर येताच त्याच्या पद्धतीने वेस्टइंडीजची गोलंदाजी धुवायला सुरुवात केली आणि पुढे काही वेळातच दोघांनी मिळून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. १८ व्या षटकात हार्दिकने विजयी षटकार मारला तेव्हा तिलक ४९ या वैयक्तिक धावसंख्येवर नाबाद राहिला. आणि अर्थातच भारताचा विजय झाला असल्यामुळे, त्याला आपले सलग दुसरे अर्धशतक करणे शक्य झाले नाही. हेच कारण हार्दिकच्या ट्रोलिंग साठी पुरेसे ठरले. हार्दिकने तिलकला अर्धशतक पूर्ण करू देण्यास संधी द्यायला हवी होती असे या ट्रोलर्सचे मत. याच विषयावरून हार्दिकच्या कप्तानीबद्दल देखील प्रश्न उठवले गेले. परत एकदा सोशल मीडियाचा आधार घेऊन सामान्य क्रिकेट रसिक प्रेक्षक व्यक्त झाले. 

प्रश्न पडतो की खरंच हार्दिकची चूक झाली का. त्याने विजयी फटका मारण्याच्या आनंदात तिलकला अर्धशतकापासून दूर ठेवले का? मुळात क्रिकेट हा ‘सांघिक’ खेळ आहे, त्यामुळे त्या ‘वैयक्तिक’ अर्धशतकाला किती महत्व द्यायला हवे हा देखील मुद्दा आहेच. कर्णधार म्हणून हार्दिकने तो विजयी षटकार मारणे चूक आहे का? एका षटकाराने अनेक प्रश्न निर्माण केले. 
आता खरं सांगायचं तर प्रश्न षटकाराचा नाहीये, किंवा हार्दिकने विजयी फटका मारल्याचा पण नाहीये. पण हार्दिकने संघातील नवीन खेळाडूला अर्धशतक करू द्यायला पाहिजे होते हे मात्र नक्की. तिलक वर्माने आधीच्याच सामन्यात अर्धशतक केले होते. आपल्या पहिल्याच आतंरराष्ट्रीय मालिकेत त्याला अजून एक अर्धशतक करण्याची संधी मिळत असताना, भारतीय कर्णधाराने आपला ‘वैयक्तिक’ आनंद थोडा बाजूला ठेवला असता तरी चाललं असतं. बरं आपल्या डावात अजूनही २ षटके बाकी होती. २ चेंडू शांतपणे टोलवत हार्दिकने तिलकला अर्धशतकाची, आणि पर्यायाने विजयी फटका मारण्याची संधी दिली असती तर कदाचित त्याचेच कौतुक झाले असते. तिलकची भारतासाठी ही पहिलीच मालिका. अशावेळी या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आज भारतीय संघात प्रत्येक जागेसाठी मागे किमान ५-१० खेळाडू तयार आहेत. आज संघात असलेल्या प्रत्येकाने प्रचंड मेहनत घेत, चांगली कामगिरी करत संघातील आपले स्थान मिळवले / टिकवले आहे. अशावेळी हे ‘वैयक्तिक’ रेकॉर्डस् खूप महत्वाचे ठरतात. संघातील नवीन खेळाडूसाठी या अशा छोट्या छोट्या गोष्टी नक्कीच महत्वाच्या असतात. आणि कर्णधार म्हणून तर हार्दिकने या नवीन खेळाडूसाठी हा त्याग करणे आवश्यक होतेच. 

हार्दिक पंड्या आयपीएल मध्ये गुजरातच्या संघाचं नेतृत्व करतो. गेल्या २ सिझन मध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली, एकदा तर विजेतेपद देखील मिळवले. त्याच जोरावर हार्दिककडे भारतीय संघाचा भविष्यातील कर्णधार म्हणून बघितले जात आहे. गेल्या २-३ वर्षात त्याने काही वेळा ‘बदली कर्णधार’ म्हणून संघाचे नेतृत्व केले देखील आहे. एखादा खेळाडू संघात असणे आणि त्याने कर्णधारपद भूषवणे यामध्ये जमीन अस्मानाचे अंतर आहे. कर्णधार म्हणून खेळत असताना खेळाडूला संघातील इतर १० खेळाडूंचा आणि एकूणच सांघिक कामगिरीचा काही अंशी जास्त विचार करावा लागतो. आपल्या संघातील प्रत्येक खेळाडूकडून योग्यप्रकारे कामगिरी करून घ्यावी लागते. हार्दिक स्वतः एक चांगला खेळाडू आहे, तो एक उत्तम अष्टपैलू आहे यात काही वाद नाही. कपिल नंतरचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील अनेकदा त्याचा उल्लेख केला गेला. यात किती खरं किती खोटं याचा विचार प्रत्येकाने करावा, पण करोडो भारतीय क्रिकेट रसिकांच्या त्याच्याकडून अपेक्षा आहेत हे नक्की. त्यात तो जर स्वतःला धोनीच्या शाळेचा विद्यार्थी समजत असेल तर हार्दिकने कर्णधाराच्या भूमिकेकडे वेगळ्या नजरेने बघणे आवश्यक आहे. 
महेंद्रसिंग धोनी हे एक वेगळंच प्रकरण होतं (किंवा आहे असं म्हणूया.). तो सर्वोत्कृष्ट कर्णधार आहे असं नाही म्हणणार, पण तो कर्णधार म्हणून निश्चितच वेगळा होता. तो काहीवेळा निर्णय घेताना चुकला देखील असेल, पण ते निर्णय घेण्याची धमक त्याच्याकडे होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो स्वतःच्या कामगिरी आधी संघाचा आणि संघातील इतर खेळाडूंचा विचार करत असे.

हार्दिक पंड्या जर धोनीला आपला आदर्श मानत असेल तर त्याने धोनीचे हे गूण अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. धोनीने बहुतेक सर्वच मालिका विजयाच्या ट्रॉफी घेताना तीच ट्रॉफी संघातील नवोदित खेळाडूकडे दिली आहे. आजही धोनीच्या काळातील त्या विजयाचे फोटो बघितले तर संघातील सगळ्यात नवीन खेळाडूच्या हातात विजयी ट्रॉफी, आणि स्वतः धोनी मात्र कुठेतरी कोपऱ्यात असेच चित्र दिसेल. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर एखादा खेळाडू काही महत्वाचा ‘माईलस्टोन’ (शतक, अर्धशतक किंवा विजयी फटका) पार करणार असेल तर धोनीने वैयक्तिक आनंद बाजूला ठेवून कायमच त्या खेळाडूला त्या माईलस्टोनचा आनंद घेऊ दिला आहे. अर्थात हे सर्व संघाचा विचार आधी करूनच. एकीकडे हार्दिक धोनीच्या कर्णधारपदाची पायरी चढायचा प्रयत्न करतो आहे, तर त्याने धोनीचे हे गूण देखील कुठेतरी जोपासणे आवश्यक ठरते. 
कोणत्याही भारतीय कर्णधारासाठी कर्णधारपद हा काटेरी मुकुट आहे. हार्दिक देखील त्याला अपवाद नाही. सध्याच्या जमान्यात आपला संघ १२ महिना क्रिकेट खेळत असतो. अशावेळी कुठेतरी कमी-जास्त होणार हे देखील तितकेच खरे, पण निदान अशा प्रसंगी तर हार्दिकने संघातील नवोदित खेळाडूला प्राधान्य देणे आवश्यक आहे. खेळाच्या छोट्या फॉरमॅटमध्ये हार्दिक आपल्यासाठी महत्वाचा खेळाडू आहे. आणि जर निवडसमिती त्याच्याकडे कर्णधार म्हणून बघत असेल तर काही गोष्टींचा विचार त्याने कर्णधार म्हणूनच करणे आवश्यक आहे. या प्रसंगातून हार्दिकसारख्या खेळाडूने स्वतःसाठी काही गोष्टी शिको आणि त्याचा योग्य वेळी, योग्य ठिकाणी वापर करो, भारतीय संघासाठी हेच जास्त महत्वाचं आहे. 

To know more about Crickatha