फेब्रुवारी – मार्च २००३ चा काळ.. बारावी बोर्डाची परीक्षा आणि क्रिकेटचा वर्ल्ड कप या दोन्हींचा मुहूर्त त्या वर्षी एकच होता.. १ मार्चला पुण्याच्या एसपी कॉलेजच्या मुलींच्या होस्टेलची टीव्ही रूम खचाखच भरलेली होती. कुणी टीव्हीत डोळे घालून बसलंय… कुणी जपमाळ ओढतंय… कुणी अथर्वशीर्षाची आवर्तनं करतंय.. कुणी आपल्या कुलदेवतेचा धावा करतंय… कुणी स्टॅच्यू पोझिशन घेतलेय. एक-एक बॉल पडून सामना जसा पुढे सरकत होता तसं वातावरणातल्या टेन्शनचा पारा कधी वर कधी खाली अशा कन्फ्यूजन मोडमध्ये होता. आता असं जेव्हा वातावरण असेल तेव्हा वेगळा अंदाज बांधायलाच नको. भारत पाकिस्तान सामना सुरू होता.. अट्ठाविसावी ओव्हर.. शोएबचा वेगवान बॉल हलकेच प्लेस करत सचिननं एक धाव काढली आणि ९८ गाठले .. आणि त्याच्या मांडीचा स्नायू दुखावला… तिकडे मैदानात सचिन कळवळत होता. इथे आमच्या होस्टेलच्या टीव्ही रूममध्ये टेन्शनचा पारा उकळत होतं.. बारावीची परीक्षा असूनही मीसुद्धा तिथेच ठाण मांडून बसले होते. स्कोअर बोर्डवर सचिनच्या नावापुढे ९८ चा आकडा होता.. आता हव्या फक्त दोन धावा की धम्माल… सगळेच श्वास रोखून, डोळे विस्फारून टीव्हीकडे पाहत होते. अठ्ठाविसाव्या ओव्हरचा तिसरा बॉल, शोएब अख्तरनं धावायला सुरुवात केली श्वास रोखून आम्ही सगळ्याजणी जणू टीव्हीतच घुसलो होतो. आणि हाय रे कर्मा, शोएबच्या त्या उसळत्या बॉलनं घात केला आणि युनिस खाननं झेपावत झेल घेतला. सचिन शतकापासून अवघ्या दोन धावा दूर राहिला. तिथून पुढे मॅचचं काय झालं हे जगजाहीर आहे. आणि माझ्या बारावीच्या निकालाचा इतिहास उगाळण्यात अर्थ नाही. इथे मांडायचा महत्वाचा मुद्दा म्हणजे क्रिकेट या खेळावर असलेलं वेडं प्रेम, त्यातल्या खेळाडूंवर दाखवलेली देवासारखी श्रद्धा, धर्मयुद्धासारख्या क्रिकेटवरून झालेल्या चर्चा, आणि सामना जिंकल्यानंतर ऐन् उन्हाळ्यातही साजरी झालेली दिवाळी.. आहा काय दिवस होते ते..
तसा माझा आणि क्रिकेटचा संबंध अगदी फार जुना आहे. लिटल मास्टर सुनील गावस्कर यांना “छोनील गावश्कल” म्हणण्याएवढी मी ‘लिटल’होते तेव्हापासून क्रिकेट पाहत आले आहे. बालपण लहान गावात होतं. त्या काळी ९० च्या दशकात टीव्हीचा फार प्रसार नव्हता. माझ्या जन्मानंतर काही दिवसांनी बाबांनी आमच्या घरी सोनीचा टीव्ही घेतला होता. आमच्या पंचक्रोशीतला हा पहिला टीव्ही, त्यामुळे त्याचं अप्रूपही मोठं होतं. दर रविवारचं रामायण-महाभारत आणि क्रिकेटचे सामने असले की आमच्या घरच्या ओटीवर मुंगी शिरायलाही जागा नसायची. पंचक्रोशीतली माणसं टीव्ही पाहायला आमच्या घरी असायची. क्रिकेटचे सामने असले की आमच्या गावासह आजूबाजूच्या चार-पाच गावच्या शाळांचे मास्तर बरेचदा शाळा लवकर सोडून घरी क्रिकेट पाहायला हजर असायचे. मग जसा सामना रंगायचा तसा आरडा-ओरडा, ललकाऱ्यांनी घर दणाणून निघायचं. आजचं चित्र काहीसं वेगळं दिसतं. माझ्या आठवणीत मी गेले कित्येक वर्षात अशा वेडात बुडून जाऊन क्रिकेटचा सामना बघितल्याचं आठवतच नाही. माझ्यासारखी भावना कदाचित अनेकांची असेल. माझ्या नजरेत याची तीन प्रमुख कारणं आहेत. पहिलं म्हणजे क्रिकेटमध्ये झालेले मॅच फिक्सिंगचे आरोप, दुसरं कारण म्हणजे आयपीएलसारखा फॉरमॅट, आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं कारण अतीपरिचयात अवज्ञा.
२००० साली दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोनियेवर भारताविरुद्धच्या सामन्यात मॅच फिक्सिंगचा आरोप झाला. आणि त्यानंतर आपला कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आणि अजय जडेजा यांचं नाव त्यात आलं. याचा विसर पडत होताच, पण आयपीएलमध्ये हे मॅच फिक्सिंगचं भूत पुन्हा बाटलीतून बाहेर आलं. दुर्दैवानं स्वतःला क्रिकेट चाहते म्हणवणारे काही उथळ लोक प्रत्येक हरलेल्या मॅचचा संबंध मॅच फिक्सिंगशी जोडायला लागले. तथ्य असेल-नसेल पुढची गोष्ट पण क्रिकेटप्रेमींच्या मनात याचा किंतू कायमचा पाचर ठोकल्यासारखा राहिला. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे क्रिकेटचा बदललेला फॉरमॅट… क्रिकेट हा खेळ यापूर्वीही व्यावसायिक पातळीवर खेळला जात होता. पण बरीच वर्ष त्यातही देशांच्या सीमा अबाधित राहिल्या होत्या. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानात कायम एक देश विरुद्ध दुसरा देश पाहायला मिळत असे. त्यामुळे तो सामना पाहताना क्रिकेटप्रेमासोबत देशप्रेमही उचंबळून यायला वेळ लागायचा नाही. आता आयपीएलसारख्या फॉरमॅटमध्ये सर्वच देशाचे खेळाडू मांडीला मांडी लावून एका संघात बसलेले दिसतात. त्यामुळे त्या मैदानात उत्तम सुरू असलेलं क्रिकेट चाहत्यांच्या मनात फक्त मनोरंजनापुरतं मर्यादित राहिलेलं दिसतं.
तिसरं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अतीपरिचयात अवज्ञा. असं म्हटल्यानं मी कदाचित तुम्हाला थोडीशी ‘ओल्ड स्कूल टाईप्स’ वगैरे वाटेन, पण हे वास्तव आहे. पूर्वी क्रिकेटचे सामने फार नसत. त्यातही ते पाहण्यासाठी द्राविडी प्राणायाम घालावा लागत असे. ९० च्या दशकात टीव्ही फार तळागाळात पोहोचले नव्हते. त्यावेळी पंचक्रोशीतल्या एखात्या टीव्हीवर क्रिकेटप्रेमीची मदार असायची. शहरातल्या मध्यमवर्गातही अशीच स्थिती. त्यामुळे कधीतरी पाहायला मिळणाऱ्या क्रिकेटची गोडी होती. त्यानंतर टीव्ही प्रत्येक घरी आले. क्रिकेटचे सामने वाढले. रंगीत टीव्हीवर क्रिकेट बघण्याची मजा आणखीनच जास्त होती. अनेकांनी क्रिकेट मॅच गेट-टुगेदर्सही केली असतील. क्रिकेटला आयुष्यातल्या आठवणींच्या डायरीत कोरून ठेवणारा असा तो काळ होता. आता प्रत्येकाच्या हातातल्या मोबाईलवर क्रिकेट पाहता येतं. बसमध्ये, ट्रेनमध्ये, माळरानावर, घराच्या कोनाड्यात, चौकातल्या पारावर, अंथरुणात झोपून, मध्यरात्री, पहाटे, दुपारी, दिवसातल्या कोणत्याही प्रहरी आणि नेटवर्क असलेल्या कोणत्याही ठिकाणी क्रिकेट पाहता येतं. इतक्या सहज सोनं जरी मिळालं तरी त्याची गोडी राहत नाही. दुर्दैवानं क्रिकेटच्या बाबतीत तेच होतंय.
आमच्या आयुष्यात क्रिकेटचं जे स्थान आहे. ते आजच्या मिलेनियल किड्सच्या मनात कधी आणि कसं बनेल हा मला पडलेला एक भाबडा प्रश्न आहे. क्रिकेटचे मैदानातले किस्से ऐकणं ही जशी पर्वणी असते. तसे क्रिकेटचे मैदानाबाहेरचे आपल्या आयुष्यात घडलेले किस्सेही सुरस असतात. भारत-पाक सामना बघण्यासााठी शाळेत मारलेला मास बंक, वर्ल्डकपची मॅच पाहण्यासाठी बोर्डाचा पेपर लवकर देऊन काढलेला पळ, मैत्रिणीच्या घरी ६५ इंचाच्या एलईडी टीव्हीवर पाहिलेले क्रिकेटचे सामने आणि गप्पांची मैफल, ऑफिसमधून निघायला उशीर झाल्यानं रस्त्यावर टीव्हीच्या शोरूमसमोर घोळक्यात उभी राहून पाहिलेली मॅच असे हजारो किस्से माझ्या आठवणींच्या डायरीत साठलेले आहे. आज हातातल्या मोबाईलमध्ये क्रिकेट पाहणाऱ्यांना त्याची गोडी काय कळेल? कारण प्रेम, धर्म, देश, धाकधूक या सर्व भावनांना सारून आजच्या पिढीसाठी क्रिकेट उरलं आहे केवळ एन्टरटेन्मेंट. एन्टरटेन्मेंट. एन्टरटेन्मेंट.
माझ्या समोरच्या माणसाला जेव्हा समजतं की मी क्रिकेट क्षेत्रात पंच किंवा Umpire म्हणून काम करतो, त्यानंतरची पुढची काही सेकंद विलक्षण असतात.क्रिकेट चा चाहता असेल तर त्याच्या डोळ्यात प्रचंड कुतूहल आणि कौतुक दिसू लागतं आणि चेहऱ्यावर डझनभर प्रश्नांची नांदी दिसू लागते. क्रिकेट फारसं आवडतं नसणारी लोक, अर्रे वाह, अच्छा …. असं तोंडदेखलं म्हणतात पण चेहऱ्यावरचा प्रश्न हा अंतू बर्वा मधल्या बापू हेगिष्ट्याला पडला होता तोच असतो. “हा माणूस उपजीविकेसाठी नक्की काय काम करतो?” अगदी कसलेले मुरब्बी पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर सुद्धा, किती पैसे मिळतात हा प्रश्न विचारल्याशिवाय राहात नाहीत. त्यात BCCI म्हणजे रग्गड पैसा मिळत असेल हा एक ठराविक समज असतोच. आमच्या क्षेत्रातील नवखे लोक या प्रश्नांच्या चक्रव्यूहात निष्कारण स्वतःचा अभिमन्यू करून घेतात. आम्ही मात्र आता या प्रश्नांना आता सरावलो आहोत आणि समोरच्या व्यक्तीला त्याच्या पद्धतीत समाधानकारक उत्तर द्यायला शिकलो आहोत. तसं पाहिलं तर समोरचा व्यक्ती काय काम करत असेल याचा अंदाज बांधताना तो क्रिकेट मध्ये पंच असेल हे उत्तर पहिल्या पाच अनपेक्षित उत्तरांमध्ये असू शकतं. त्यामुळेच क्रिकेट मध्ये पंच म्हणून काम करतो म्हणजे नक्की ह्याचं काम काय, आणि यांच्या क्षेत्रात यांच्या आयुष्याचं चित्र नक्की कसं दिसत असेल हे जाणून घ्यायला लोकं फार उत्सुक असतात.
याच काही प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी हा लेखप्रपंच. क्रिकेट पंच म्हणजे आपल्याला मॅचदरम्यान टीव्ही वर दिसणारा, मध्येच काही हातवारे करणारा, खेळाडूंना बाद नाबाद ठरवणारा तोच तो. त्यानंतरचा सर्वसाधारण प्रश्न असतो तो म्हणजे, तुम्ही तर सगळ्या मोठ्या खेळाडूंना भेटत असाल ना? या प्रश्नाचं प्राथमिक उत्तर हो असं असलं तरी एक पंच आणि खेळाडूंचं नातं एवढ्याच तपशिलात संपत नाही.
खरं कसं असतं मैदानावरील पंचाचं आणि खेळाडूंचं नातं ? मैदानावरच्या नात्यापेक्षाही मैदानाबाहेर हे नातं कसं असतं? या लेखात या प्रश्नांवर थोडा प्रकाश टाकायचा प्रयत्न मी करणार आहे. Mutual professional respect हा या नात्याचा मूलभूत आधार असतो.
कोणत्याही पंचाला हे लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे की क्रिकेट हा खेळ खेळ हा मूलतः खेळाडूंसाठी आहे. आम्ही फक्त पडद्यामागचे कलाकार (backstage artist) आहोत. आमचं काम म्हणजे प्रयोग निर्विघ्न पार पडेल एवढंच पाहायचं असतं. हा कलाकार रंगमंचावर आला तर चाक रुळावरून घसरतंय हे लगेच समजतं. तसंच पंच प्रकाशझोतात आले तर फक्त त्यांच्या चुकांमुळे किंवा सामन्याची गाडी रुळावरून घसरल्यामुळेच येतात. मी कायम म्हणतो क्रिकेट मैदानावर पंचाने गाडीच्या shock absorber चं काम करायचं असतं. मूळ इंजिन हे खेळाडूच असतात. खेळाडू आणि पंच यांच्या दरम्यानच्या नात्याला बऱ्याच व्यावसायिक मर्यादा आहेत. त्या उल्लंघून चालत नाहीत. मैदानावर, खेळाडूंशी अति जवळीक असणे योग्य मानलं जात नाही. अर्थात हसत खेळत एकत्र राहण, हलकी फुलकी चेष्टा मस्करी होणं कधीही चांगलंच पण एका मर्यादेपलीकडं ते वाईट दिसतं. ह्याच खेळाडूंसाठी मैदानावर निर्णय घेणाऱ्याची भूमिका आम्हाला पार पाडायची असते. त्यांच्याबरोबर गळ्यात किंवा खांद्यावर हात टाकून उभं राहणं, सतत एखाद्या ठराविक खेळाडूंबरोबर गप्पा गोष्टी करणं, आम्ही कटाक्षाने टाळतो. जे खेळाडू समजूतदार असतात ते सुद्धा या गोष्टीचा आदर करून तसंच वागून सहकार्य करतात. पण पाचही बोटं सारखी कशी असतील? वर्गात समजूतदार मुलांसारखी व्रात्य मुलंही असतात, चापलूस असतात, काही चाणाक्ष, काही बेरकी तर काही निव्वळ ढ असतात. मैदानावरील खेळाडूही असेच असतात. पण शेवटी हे सगळे एकाच वर्गात असल्यामुळे यांना समान न्याय आम्ही देत असतो. पंच आणि पक्षपात हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. सर्वांना न्याय समान असला तरी प्रत्येकाशी सामान वागून चालत नाही.
Player management चा पहिला मूलमंत्र हाच असतो की आपल्या समोरच्या खेळाडूचा स्वभाव समजून घ्या. समजूतदार विद्यार्थी हाताळणं जसे शिक्षकांसाठी सोपे असते तसेच आमच्यासाठीही. बाकी प्रकारच्या खेळाडूंना हाताळताना मात्र बुद्धी, हजरजबाबीपणा, विनोदबुद्धी, संयम, तंत्र, युक्ती, अनुभव आणि वेळेला शासनही वापरावं लागतं. सर्व काही सुरळीत चालू असताना खेळाडूंशी होणारे संवाद हे गप्पा, विचारपूस, मजा, विनोद या प्रकारांमध्ये मोडतात. पण एखाद्या अवघड प्रसंगाची गाठ सोडवताना काळजी घ्यावी लागते. समोरचा खेळाडू चिडलेला, बिथरलेला असू शकतो. त्यामुळे पहिले त्याचं म्हणणं ऐकून घेऊन कुकर मधली वाफ काढण्याचं तंत्र आम्ही वापरतो. त्यानंतरच आपलं म्हणणं मांडलं तर ते समोर नीट पोचतं. नाहीतर शब्दाने शब्द वाढून प्रश्न विकोपाला जातो. बोलण्यातला, शब्दप्रयोगातला आणि देहबोलीतला (body language) संयम अतिशय महत्वाचा.
संघ बदलतात तश्या भाषा बोलण्या वागण्याच्या पद्धतीही बदलतात. मी प्रत्येक भाषेतले काही मूलभूत शब्द शिकून घेतो. ‘नाही’, ‘नको’, ‘हो’, ‘पुरे’, ‘छान’, ‘पाणी’, ‘जेवण’ असे काही शब्द प्रत्येक भाषेत लक्षात ठेवतो. त्या खेळाडूंशी बोलताना त्यांच्या भाषेतले शब्द वापरले की थोडी आपुलकी वाढून सुरुवात चांगली होते. मैदानावर खेळाडूंना त्यांच्या पहिल्या नावाने हाक मारलेलं त्यांना आवडतं. ह्यात दक्षिण भारतात थोडा गोंधळ होतो.मला आठवतं तामिळनाडूच्या माझ्या पहिल्या सामन्यात मी पहिले काही वेळा मुरली विजय ला सवयीप्रमाणे “मुरली” असं हाक मारत होतो. शेवटी त्याने येऊन सांगितलं की माझं नाव “विजय” आहे. माझ्या वडिलांचं नाव मुरली आहे. थोडा हशा पिकला. पण नंतर जेव्हा मी तोच नियम अभिनव मुकुंद ला लावला तर तो म्हणाला माझं नाव “अभिनव” वडिलांचं नाव मुकुंद. मला चक्कर यायचं बाकी होतं. ह्या दक्षिण भारतीय लोकांना नावं एकाच पद्धतीत सोपी सुटसुटीत का ठेवता येत नाहीत देव जाणे. शेवटी दिनेश कार्तिक समोर आल्यावर DK अशी हाक मारून मी माझ्यापुरता तोडगा काढला.
मैदानाबाहेर खेळाडू आणि पंच यांचं नातं कसं असावं याबाबतही काही मर्यादा आहेत. समोरचा खेळाडू अगदी तुमचा लहानपणीचा मित्र असला तरी कामाच्या ठिकाणी चारचौघात उघड मैत्री दाखवता येत नाही. नमस्कार, हाय, हॅलो झाल्यावर संवाद साधायला, गप्पा मारायला किंवा विचारांची देवाणघेवाण करायला काहीच हरकत नसते. एखाद्यावेळेस हॉटेल मध्ये , मॉल्स, सिनेमा हॉल मध्ये भेट झाल्यास गप्पा मारत एकत्र वेळ घालवायला सुद्धा बंदी नसते. पण खेळाडूंबरोबर सामन्याच्या वेळेदरम्यान असे कार्यक्रम ठरवून आखणे मात्र अयोग्य ठरतं. खेळाडूंबरोबर वारंवार एकत्र दिसणं हे व्यवस्थापनाचा रोष देखील ओढवून घेऊ शकतं. खेळाडू आणि पंच या दोघांनी ही आपल्या व्यावसायिक मर्यादांचा आदर ठेवला की हे नातं अजून दृढ होत जातं.
वर्षानुवर्षे खेळाडूंबरोबर एकत्रं काम करून हे नातं नीट जपलं की त्यातून पुढची पायरी असते एकमेकांबद्दल विश्वास निर्माण होणं. हा एकमेकांवरील विश्वास जेव्हा घट्ट असतो तेव्हा मैदानावर कुठल्याही समस्येला तोंड देण्याचं सामर्थ्य मिळतं. एका रणजी सामन्यात मला आठवतं एका मोठ्या खेळाडूविरुद्ध झेलबाद असल्याचं अपील झालं होतं. मी थोडा साशंक होतो आणि नाबाद ठरवणार एवढ्यात तो फलंदाज स्वतःहून परत जाऊ लागला. नंतर मैदानावर आल्यावर मी त्याच्याकडे बघत असताना त्याने माझ्या नजरेतला प्रश्न ओळखला आणि म्हणाला, “मी थांबलो असतो तर तुझा निर्णय चुकला असता. ते मला नको होतं आणि मी बाद होतोच. म्हणून गेलो स्वतःहून. जास्त विचार नको करुस. तुम्ही लोक मन लावून एकाग्रतेने काम करता. एखाद्यावेळेस नाही दिसलं तर चालतं. आमचा प्रत्येक शॉट बॅट च्या मध्यभागी बसतो का? तसंच आहे हे. We should do what the game expects us to do.” त्यानंतर ह्या खेळाडूबद्दलचा माझा विश्वास आणि आदर कित्येकपटीने वाढला. मला नेहेमी वाटतं. खेळाडूंचं मैदानावरील आणि मैदानाबाहेरील वागणं हे त्याच्यावर झालेल्या संस्कारांचं प्रतिबिंब असतं.
पंच हा देखील शेवटी माणूसच आहे. त्याच्याही हातून कधी ना कधी चूक ही होणारच. या गोष्टीचा आदर ठेवून जो खेळाडू मर्यादांचं भान राखतो तो खेळाडू मोठं नाव कमावतो याची भरपूर उदाहरणं आहेत. सचिन तेंडुलकर पासून अजिंक्य राहणे, हाशिम आमला, केन विलियम्सन ते पूर्वीच्या काळचे अनेक दिग्गज हे केवळ उत्तम खेळाडू म्हणून नाही तर उत्तम माणूस म्हणूनही नाव कमावून गेले आहेत. खेळाडूंची वागणूक ही आता पूर्वीइतकी मोठी समस्या उरली नाही आहे. मैदानावरील प्रत्येक हालचाल टिपणाऱ्या कॅमेऱ्यांमुळे असो, किंवा IPL सारख्या स्पर्धांमुळे असो, खेळाडूंच्या वागणुकीमध्ये अत्यंत सकारात्मक बदल गेल्या काही वर्षात बघायला मिळतो आहे. काही अपवाद वगळता खेळाडूंना सामनाधिकाऱ्यांकडून शासन होण्याचे प्रमाण देखील कमी झालं आहे. पंच आणि खेळाडू एकाच ध्येयाने एकत्र काम करताना दिसतात. खेळाडू सामन्यादरम्यान उत्तम सहकार्य करून सामना सुरळीत पार पडायला मदतही करतात. एक प्रकारचा मोळकेपणा आला आहे जो ‘पंच आणि खेळाडू’ या नात्यासाठी अत्यंत स्वागताहार्य आहे.
२०१३ साली मी ऑस्ट्रेलिया मध्ये MCG वर व्हिक्टोरिया विरुद्ध वेस्टर्न ऑस्ट्रेलिया या सामन्यात काम करत होतो. या सामन्यात दोन्ही संघात आंतरराष्ट्रीय खेळाडू भरपूर होते व पुढील आठवड्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध च्या कसोटीसाठी तयारी करत होते. मी पाहिलं की मिचेल जॉन्सन माईक हसी ला बॉल टाकल्यानंतर उगाचच डिवचत होता. खूप जवळ जाऊन त्याला चिडवायचे प्रयत्न करत होता. थोडं आक्षेपार्हच वागत होता. मी त्याला थोडं हटकलं आणि शांत राहायला सांगितलं. तो काही बोलला नाही. त्यानंतर हसी मला म्हणाला, “विनीत, त्याला थांबवू नका. मी मुद्दाम त्याला असं वागायला सांगतोय. पुढच्या आठवड्यातला कसोटीमध्ये मला बोथट मिचेल जॉन्सन नकोय. तो माझी एकाग्रता घालवतोय आणि मी तरीही फोकस करायचा प्रयत्न करतोय. दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज हेच करणार आहेत. आम्ही दोघंही तयारी करतोय. आम्ही मर्यादा ओलांडणार नाही. काळजी नको.” ही क्रीडा संस्कृती माझ्यासाठी वेगळी होती.
याच सामन्यात माझा सहकारी पंच पॉल विल्सन याने ख्रिस रॉजर्स ला दोन्ही डावात lbw बाद दिले आणि दोन्ही वेळेस फलंदाजाला निर्णय पटला नव्हता. सामना संपल्यावर आमच्या खोलीचा दरवाजा वाजला. ख्रिस हातात ७-८ बिअरच्या बाटल्या घेऊन आला होता. त्याने खोलीतील सर्वांना देऊ केली आणि पॉलला म्हणाला, “मला तुझी ५ मिनिटे हवी आहेत. दोन्ही lbw निर्णयांबद्दल तुझ्याशी बोलायचे आहे” दोघेही टेबलाच्या विरुद्ध बाजूस बसून आपली बाजू मांडू लागले. यात कुठेही राग, संताप किंवा अनादर नव्हता. मला बिअर वर्ज्य असल्यामुळे मी मूक प्रेक्षक बनून हे बघत होतो. ५ मिनिटांच्या वैचारिक देवाणघेवाणीनंतर दोघांनाही एकमेकांचे म्हणणे पटले नव्हते. पण विषय तिथेच संपवल्याचे समाधान होते. हे सगळं बघून, आपल्या इथेसुद्धा अश्या सकारात्मक वृत्ती तयार झाल्या तर किती बरं होईल असं मला वाटलं होतं.
आज २०२२ मध्ये मला सांगताना खूप आनंद होतो की आता आपल्या इथेही बहुतांशी खेळाडू इतक्याच सकारात्मक वृत्त्तीने खेळतात आणि वागतात.खेळाडू आणि पंचांचं, आदर आणि विश्वासाचं नातं उत्तरोत्तर दृढ होत जाणार यात मला थोडी सुद्धा शंका नाही.
तर हा लेख वाचल्यावर, “तुम्ही तर सगळ्या खेळाडूंसोबत फोटो काढले असतील ना”? “तुम्ही तर सारखे सगळ्या खेळाडूंबरोबर रहात असाल ना “? हे प्रश्न तुम्हाला पडू नयेत एवढीच इच्छा व्यक्त करतो, आणि यावेळेसपूर्ती आपली रजा घेतो.
मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की मी क्रिकेट सारख्या खेळात काही नाव कमावू शकलो. क्रिकेट ह्या खेळाने मला बरंच काही दिलंय. माझ्या वयाची ८-१० वर्षे मी महाराष्ट्रासाठी क्रिकेट खेळलो. पण जेंव्हा मी डोमेस्टिक क्रिकेट खेळताना रणजी ट्रॉफी किंवा इतर काही सामने खेळायचो तेव्हा सामनाधिकारी (मॅच रेफरी ) ह्या माणसाशी फारसा संबंध कधी आला नाही. त्यावेळी हे पद म्हणजे फक्त निरीक्षकाची भूमिका बजावणारी एक व्यक्ती बसवली आहे अशीच ओळख असायची. गेला काही काळ मी बीसीसीआय साठी सामानाधिकारी म्हणून काम करतो आहे. अश्यावेळी खऱ्या अर्थाने मला ह्या पदाची जाणीव होत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
मला वाटतं भारतीय क्रिकेटमध्ये सामनाधिकारी ह्या पदाकडे पाहण्याचा दृष्टिकोन साधारणपणे २०१० साला नंतर बदलला असे म्हणायला हरकत नाही. भारतामधून अनेक पंच आयसीसी (इंटरनॅशनल क्रिकेट काउंसिल) च्या पॅनल वर पाठवण्यास सुरुवात झालीच होती. आणि त्याच सुमारास सामनाधिकारी म्हणून आयसीसी (इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल) च्या नियमावलीनुसार पार पाडावी लागणारी जबाबदारी आणि त्या नियमावलींशी संलग्नता साधायची प्रक्रिया आपल्या इथेही सुरु झाली. ह्या संपूर्ण प्रक्रियेसाठी सायमन टॉफेल सारख्या नामांकित आंतरराष्ट्रीय पंचाची सल्लागार पदी नेमणूक केली गेली होती. त्याच सुमारास भारतीय क्रिकेटमध्ये तांत्रिकदृष्ट्या अनेक महत्वाचे बदल पाहायला मिळत होते. भारतामधील अंतर्गत सामन्यांमधील पंचांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी सामन्यानंतर व्हिडिओ पाहण्याची सोय उपलब्ध होऊ लागली. तांत्रिकदृष्ट्या इतरही काही बदल घडवण्यामध्ये स्टॅन्ली सलढाना (महाराष्ट्राचे माजी रणजीपटू) ह्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी बनवलेल्या ‘मॅच ऍनालिसिस सॉफ्टवेअर’ चा वापर अंतर्गत क्रिकेट सामन्यांमध्ये सुरु झाला. मैदानावर कॅमेरे लागण्यास सुरुवात झाली. यामुळे पंचांच्या कामगिरीचे मूल्यांकन अधिक चांगल्या पद्धतीने होऊ लागले.
२०१४ पर्यंत आपल्या अंतर्गत सामन्यांमधे ‘स्टेट असोसिएशन; मुख्यतः माजी खेळाडूंची सामनाधिकारी किंवा निरीक्षक म्हणून निवड करीत असत. सायमन टॉफेल ह्यांनी सामनाधिकारी निवड प्रक्रियेमध्ये एक आमूलाग्र बदल घडवून आणला. त्यांनी तत्कालीन सामनाधिकारी आणि नवीन होतकरू सामनाधिकारी यांच्यासाठी एका परीक्षेचे आयोजन केले होते. तब्बल २ तास चालणाऱ्या या परीक्षेची प्रमुख अट म्हणजे ती व्यक्ती माजी रणजी खेळाडू हवी. त्या व्यक्तीने किमान २५ रणजी सामने खेळलेले असायला हवेत आणि निवृत्त होऊन ५ वर्षे झालेली असावीत. या परीक्षेसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ने माझे नाव सुचवले आणि मी परीक्षा आणि त्यासाठी आयोजित केलेले वर्कशॉप (कार्यशाळा) ह्यामध्ये सहभागी झालो. त्या वातावरणात पाय ठेवल्यापासूनच आम्हा सर्वांचे मूल्यांकन होण्यास सुरुवात झाली. गमतीची गोष्ट म्हणजे हे आम्हाला नंतर समजलं. आमच्या छोट्या छोट्या गोष्टींवर बारीक नजर ठेवली जायची. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा एखाद्याचा दृष्टीकोण कसा आहे, अवघड परिस्थिती हाताळायची क्षमता कशी आहे. कोण काय पद्धतीने इतरांशी संवाद साधत आहे (सामनाधिकारी म्हणून संवाद कौशल्य हा अतिशय महत्वाचा गुण आहे.) परीक्षार्थीला नियमांची माहिती आहे का. अशा अनेक गोष्टींकडे लक्ष ठेवले जायचे.
खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर ही गोष्ट करावी असा फारसा विचार केला नव्हता कारण त्याकाळी पंचांना जास्त महत्व असे. तुम्हाला जर सर्वोच्च स्तरावर हे पद मिळवायचे असेल तर त्यासाठी तुम्ही आंतरराष्ट्रीय सामने खेळले असणे गरजेचे आहे. त्यामुळे त्या पदावर पोचणे अतिशय जिकिरीचे काम आहे. पण जेव्हा एमसीए ने माझे नाव सुचवले तेव्हा सुनील गुदगे, श्याम ओक, नीलिमा जोगळेकर यांच्यासारख्या अनुभवी लोकांचे लाभलेले मार्गदर्शन माझ्यासाठी नक्कीच फायद्याचे ठरले. ह्यामध्ये माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे ज्या खेळावर आपले प्रेम आहे त्या खेळाशी निगडीत असलेले काम करायला मिळणे आणि दुधात साखर म्हणजे मान असलेले पद मिळणे. आपण ज्या खेळासाठी इतकी मेहनत घेतली आहे त्याचे फळ चाखण्याचा आनंद काही औरच. जसे प्रत्येक क्षेत्रामध्ये आव्हाने असतात तसेच सामनाधिकारी ही भूमिका देखील कठीणच. इथेही सातत्याने आमचे मूल्यमापन होत असते. सामान्य क्रिकेटप्रेमींच्या नजरेतला सामनाधिकारी म्हणजे मैदानावरच्या घडामोडींवर लक्ष ठेवणारा आणि नाणेफेकी च्या वेळी हजेरी लावणारा माणूस… ! पण प्रत्यक्षात सामानाधिकारी म्हणजे सामना सुरु होण्याआधी आणि सामना संपल्यानंतर मैदानाबाहेर घडणाऱ्या गोष्टींचे व्यवस्थापन करणारी व्यक्ती. उदाहरणच द्यायचे झाले तर, पंचांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे आहे का? सर्व सुविधा बीसीसीआयने नमूद केलेल्या नियमांना धरून आहेत का? स्टेट असोसिएशनने दिलेल्या त्यांच्या संघाच्या खेळाडूंच्या यादीची पडताळणी करणे, स्टेट असोसिएशनने खेळाडूंना पुरवलेल्या सुविधांवर देखरेख ठेऊन त्यावर रिपोर्ट बनवणे. असे प्रत्येक सामन्यागणिक आम्हाला तब्बल आठ-नऊ वेगवेगळे रिपोर्ट्स बनवावे लागतात. त्याचबरोबर खेळपट्टी कशा प्रकारची होती? बाउन्स किती होता? आऊटफिल्डचा दर्जा कसा होता? खेळाडूंना दिले जाणारे जेवण, संघाला दिली जाणारी ट्रान्सपोर्टची सुविधा, महिला खेळाडूंना मिळत असलेल्या सुविधा ह्या सर्व गोष्टी बीसीसीआयच्या मापदंडाला धरून आहेत का? यामध्ये काही कमतरता आढळली तर सामनाधिकारी म्हणून स्टेट असोसिएशनच्या सचिवांबरोबर चर्चा करून प्रश्न सोडवावे लागतात. हल्ली खेळामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधी नियम खूप कडक आहेत. ते सर्व नियम पाळले जात आहेत ना याची देखील चाचपणी करण्याची जबाबदारी नेमून दिलेल्या भ्रष्टाचारविरोधी अधिकाऱ्याची असते खरी, पण या सर्व गोष्टींचा अहवाल हा शेवटी सामनाधिकाऱ्याकडेच येत असतो. छडी नसलेला हेडमास्तरच म्हणा हवं तर!!
सामानाधिकारी म्हणून आमची खरी धावपळ म्हणाल तर ती सुरु होते सामना सुरु होण्याचा दोन दिवस आधी. ह्या वेळी सामन्याचे पंच, सामनाधिकारी, भ्रष्टाचारविरोधी अधिकारी आणि दोन्ही संघाचे कप्तान ह्यांच्यामध्ये एक मिटिंग होते. ह्या मिटिंगचा उद्देश एवढाच की संघ कप्तानांना आणि इतर अधिकाऱ्यांना सामन्यासाठी काय काय सुविधा उपलब्ध आहेत याची माहिती पुरवणे हा असतो . दोन्ही संघानी ‘स्पिरिट ऑफ द गेम’ ह्या संकल्पनेला धरून खेळण्यासाठी प्रेरणा देणे महत्वाचे असते. विशेषतः ही मिटिंग म्हणजे सामानाधिकाऱ्यासाठी दोन्ही संघांच्या कप्तानांशी संवाद साधण्याची आणि चांगले संबंध प्रस्थापित करण्याची नामी संधी असते. आणि इथे आमचे संवादकौशल्य अतिशय महत्वाचे ठरते. इथे एक अभिमानाची गोष्ट सांगायची म्हणजे आपले क्रिकेट बोर्ड हे जगातील एकमेव बोर्ड आहे ज्यांनी अंतर्गत सामन्यांसाठी सुद्धा मैदानावर ६-६ कॅमेरे बसवले आहेत. व्हिडीओ अनॅलिस्टच्या मदतीने सर्व कॅमेरे योग्य त्या जागी आणि योग्य त्या कोनात (अँगल्स) मध्ये बसवले आहेत किंवा नाही ह्याची खात्री करावी लागते. ह्या कॅमेऱ्यांचा उपयोग सामन्याच्या प्रत्येक महत्वाच्या क्षणांचे विश्लेषण करताना होतो. थोडक्यात सांगायचे तर अनेक कलाकार एक सामना पार पाडण्यासाठी अथक श्रम घेत असतात आणि ते कलाकार त्यांची कामे चोख बजावत आहेत ना ह्याची जबाबदारी येते सामानाधिकाऱ्याकडे असते. बरेचदा सामन्याचे ठिकाण, तिथले हवामान इत्यादी गोष्टी विचारात घेऊन सुद्धा काही निर्णय घ्यावे लागतात. उदाहरणार्थ, भारताच्या पूर्व भागात हिवाळ्यात सामना असेल तर तिथे सूर्यास्त लवकर होत असल्याने सामना थोडा लवकर सुरु करावा लागतो. उद्दिष्ठ एकच, “खेळ सुरळीत पार पाडणे, खेळ आणि खेळाडूंना जास्तीत जास्त वेळ मिळून सामन्याचा निकाल लागणे”.
बरं सामनाधिकाऱ्याला एवढ्याच गोष्टींकडे लक्ष्य द्यावे लागते का? तर नाही !! खरी कसरत असते ती म्हणजे सामना ‘कोड ऑफ कंडक्ट’ ला अनुसरून सुरु आहे ना ह्यावर नजर ठेवणे. पण स्पर्धात्मक खेळ म्हणल्यावर खेळाडूंचे गैरवर्तन, वादविवाद अश्या अनेक गोष्टी घडत असतात. ह्याला “आपण हिट ऑफ द मोमेन्ट” म्हणतो. तसेच षटकांची कमी गती, जोरदार अपील करणे (Excessive Appealing), मैदानावरील अतिआक्रमकता अश्या प्रकारच्या अनेक नियमबाह्य कृती घडतात आणि सामनाधिकारी म्हणून नियमानुसार खेळाडू आणि कप्तान ह्यांच्याकडून दंड आकारावे लागतात. असे निर्णय घेताना खेळाडूंबद्दल असलेली माहिती खूप महत्वाची असते. काही खेळाडू जात्याच खट्याळ असतात, त्यांना नीट हाताळावे लागते. अश्यावेळी आपल्या गाठीशी असलेला क्रिकेटचा अनुभव प्रचंड कामी येतो. एखाद्या खेळाडूने काही नियमबाह्य कृती केली असेल तर खेळाडूच्या गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार किती दंड भरावा लागेल ह्याची माहिती खेळाडूला द्यावी लागते. खेळाडूने चूक कबूल केली तर उत्तमच पण बरेचदा खेळाडू आपण केलेली कृती ही चुकीची आहे हे मान्य करत नाहीत. खेळाडू स्वतःची बाजू मांडतो, सामनाधिकारी त्याच्याकडे उपलब्ध असलेले व्हिडिओ पुरावे म्हणून सादर करतो आणि जणू काही कोर्टात खटला भरला आहे असे वातावरण निर्माण होते. म्हणूनच मघाशी म्हणल्याप्रमाणे खेळाडूंशीच जर आपण चांगले संबंध प्रस्थापित केले तर खेळाडू सुद्धा पंचांना आणि अधिकाऱ्यांना मान देतात. अशावेळी मैदानावरील आणि बाहेरील अनेक सहज सुटतात आणि ह्या सगळ्यांचीच मदत सामना सुरळीत पार पडण्यास नक्कीच होते. एक खेळाडू, खेळ प्रेमी आणि सामानाधिकारी म्हणून एकमेकांबद्दल आणि खेळाप्रती आदर निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे.
सामना संपला म्हणजे जबाबदारी संपली असे होते का? तर नाही. बरेचदा खुपश्या गोष्टी मैदानावर न ताणता मिटवल्या जातात आणि त्यात पंचांचाही सिंहाचा वाटा असतो. पण कधी कधी एखादा खेळाडू मैदानाबाहेर (ऑफ द फिल्ड) काही वादग्रस्त वक्तव्य करतो तेव्हा सुद्धा आम्हाला त्या खेळाडूवर नियमानुसार कारवाई करावी लागते. आजकाल सोशल मीडिया वर अनेक गोष्टी सांगितल्या जातात आणि त्यात जर एखाद्या खेळाडूने वादास तोंड फुटेल असे काही वक्तव्य केले असेल तर तिथे सुद्धा आम्हाला मध्यस्थी करावी लागते. खूप छोटे छोटे नियम असतात आणि मैदानावर किंवा मैदानाबाहेर होणाऱ्या प्रत्येक घटनेवर आम्हाला करडी नजर ठेवावी लागते. खूप छोट्या गोष्टींकडे बारकाईने पाहावे लागते. कधी एखाद्या सामन्याच्या वेळी तिसरा अंपायर नसेल तर तो रोल सुद्धा आम्हालाच पार पाडावा लागतो.
आता तुम्ही विचाराल की ह्या सगळ्या गोंधळात पंचांचे मूल्यमापन कसे होते? ह्यामध्येही प्रचंड स्पर्धा आहे.आम्हाला पंचांबद्दल सुद्धा एक रिपोर्ट बनवावा लागतो. त्यात बारीक सारीक तपशील लिहावे लागतात कोणत्या क्षणी पंचाने कोणता निर्णय घेतला? तो निर्णय कसा घेतला? त्या क्षणाचे व्हिडीओ जोडावे लागतात. विद्यार्थ्यांना शाळेत जसे परीक्षेत गुण दिले जातात त्याप्रमाणे वेगवेगळ्या मापदंडानुसार पंचांना सुद्धा ग्रेड्स दिल्या जातात. त्यानुसार कोणत्या पंचाला बढती द्यायची हे प्रत्येक सिझनच्या शेवटी ठरवले जाते. एवढेच नाही तर सामानाधिकाऱ्याच्या कामाचे देखील मूल्यांकन केले जाते. आमच्याबद्दलचे रिपोर्ट्स आणि इतर अधिकाऱ्यांनी (पंच, अनॅलिस्ट इत्यादी) दिलेला फीडबॅक आमचे गुण ठरवतो. सामनाधिकारी म्हणून सॉफ्ट स्किल्स आणि आचरणाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्याच धर्तीवर बरेचदा स्टेट असोसिएशनचे सदस्य आमचा परफॉर्मन्स रिपोर्ट बीसीसीआयकडे पाठवतात. दर वर्षी आमच्यासाठी एक कार्यशाळा (वर्कशॉप) आयोजित केले जाते. इथे आम्हाला नियमांमधले बदल सांगितले जातात. वेगवेगळ्या गोष्टी, त्या त्या वेळेची परिस्थिती कश्या प्रकारे हाताळावी ह्याबद्दल प्रशिक्षण दिले जाते. आपल्या देशात आत्ताच्या घडीला साधारणपणे ७०-७२ सामनाधिकारी कार्यरत असतील. प्रत्येकाला वेगवेगळ्या स्तरावरील क्रिकेट सामन्यात भूमिका पार पाडावी लागते. अगदी १६ वर्षांखालील क्रिकेट सामन्यांपासून ते देशातील सर्वोच्च, म्हणजेच रणजी ट्रॉफी सामान्यांपर्यंत वेगवेगळ्या स्तरांवर सामानाधिकारी म्हणून काम करावे लागते. बीसीसीआय मार्फत पार पाडली जाणारी ही प्रोसेस अतिशय प्रोफेशनल आहे.
आता थोडेसे वेगळ्या विषयावर बोलायचे झाले तर सामनाधिकारी म्हणून सात वर्षाच्या माझ्या कारकिर्दीमध्ये वेगवेगळे अनुभव आले. तसे पाहायला गेलो तर वाईट अनुभव नाहीच असे म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे उत्तम व्यवस्थापन. पण काही आव्हाने नक्कीच उभी राहतात. विशेषतः जर एखादा सामना जर छोट्या जिल्ह्यात किंवा शहरात आयोजित केला असेल तर ती आव्हाने अधिक जाणवतात. कारण तिथल्या व्यवस्थापनाला नियम, मापदंड याची फारशी माहिती नसते पण त्यांची खेळाप्रती असलेली भावना आणि आवड नक्कीच वाखाणण्याजोगी असते. त्यांच्या छोट्या गावात सामना आयोजित झाला आहे हीच त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची बाब असते. प्रेक्षकांची संख्याही तुफान असते. त्यामुळे सर्व लोक जीव ओतून परिश्रम करत असतात.
असाच एक गमतीशीर आणि कायम लक्षात राहणारा किस्सा मला आठवतोय. ओडिसा मध्ये बोलांगिर नावाचा एक छोटा जिल्हा आहे. तिथे एकदा एक सामना आयोजित करण्यात आला होता. आपल्याकडे देशांतर्गत क्रिकेटमध्ये अशी पद्धत आहे की खेळाडूंना मॅच फी म्हणून रोख रक्कम दिली जाते जेणेकरून त्यांना ते पैसे लगेच वापरता यावेत. पण सामन्याचा दिवस अगदी तोंडावर आला असताना आपल्या देशात नोटबंदी (डिमॉनिटायझेशन) घोषित झाली. आता झाली का पंचाईत !! खेळाडूंना रोख रक्कम कशी द्यायची हा यक्षप्रश्न उभा राहिला. पण तिथल्या असोसिएशनचे प्रमुख हे अतिशय उत्साही आणि जिद्दी व्यक्तिमत्व. त्यांनी धडपड करून कलेक्टरला भेटून नवीन चलनी नोटा मिळवल्या आणि सामना सुरळीत पार पाडला.
असेच एकदा गुवाहाटीला एक सामना होता आणि नेमके त्याचवेळी तिथे दंगली उसळल्या. अशा प्रसंगी सामना सुरळीत पार पडणे हे मोठे आव्हान असते. त्यासाठी बरीच धावपळ करावी लागली. खेळाडूंची सुरक्षितता लक्षात घेऊन स्टेट असोशिअन, बीसीसीआय, स्थानिक पोलीस यांच्यामध्ये सातत्याने समन्वय साधून सामना निर्विघ्नपणे आणि कोणत्याही प्रकारची सनसनाटी बातमी होऊ न देता पार पाडला गेला.
हल्ली अंतर्गत स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये बरेचदा आयपीएल खेळलेले आणि स्वतःचे स्थान निर्माण केलेले खेळाडू भेटतात. त्यांची देहबोली,वागणे-बोलणे, त्यांचा दर्जा, त्यांचे वेगळेपण, त्यांची आक्रमकता पाहताना अनेक गोष्टी शिकायला मिळतात. तरुण खेळाडूंमध्ये आणि पर्यायाने क्रिकेटमध्ये सुद्धा होत असलेले बदल जवळून अनुभवता येतात. सामानाधिकार्यासाठी अजून एक गोष्ट खूप महत्वाची असते मैदानावर असलेल्या खेळाडूंमधील प्रतिभा ओळखणे, आणि बीसीसीआयकडे त्याचा योग्य रिपोर्ट देणे. मला देखील अश्याच काही गुणी खेळाडूंबद्दल रिपोर्ट देण्याची संधी मिळाली, पुढे असे खेळाडू मोठ्या स्तरांवर चमकतात तेंव्हा मनाला नक्कीच समाधान वाटते. अश्यावेळी स्वतः क्रिकेट खेळण्याचा अनुभव अत्यंत उपयोगी पडतो.
अजून मनाला समाधान देणारी गोष्ट म्हणजे महिला क्रिकेटला आता दिला जाणारा मान आणि प्राधान्य. आज जगभर महिला क्रिकेट ज्या पद्धतीने खेळले जाते, त्यामध्ये सर्वच क्रिकेट असोसिएशनचा महत्वाचा वाटा आहे. नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ खेळांमध्ये क्रिकेट सामन्यात सामनाधिकारी म्हणून महिलांनीच महत्वाची भूमिका पार पाडली. महिला क्रिकेटच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची आणि अभिनमानाची गोष्ट आहे.
कधी कधी मला माझे क्रिकेट खेळायचे दिवस आठवतात. मी १९९६ साली महाराष्ट्रासाठी खेळायला सुरु केले. तेव्हाचे क्रिकेट आणि आत्ताचे क्रिकेट ह्यात जमीन आस्मानाचा फरक आहे. तेव्हा माझा क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टीकोण फक्त खेळाडू म्हणून होता. जसे खेळाचे अनेक भाग आहेत तसेच पंच आणि सामनाधिकारी सुद्धा एक भागच आहेत एवढाच माझा विचार असायचा. बरेचदा आपण आपल्या धुंदीत जमिनीवर चालत असतो आणि आपल्याला सभोवतालच्या गोष्टी नीट दिसत नाही किंवा आपण त्याकडे नकळत दुर्लक्ष करतो. पण आकाशात गवसणी घालणारा गरुड जमिनीवरची छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा आपल्या डोळ्याने अचूक टिपतो. अगदी साध्या शब्दात सांगायचे तर सामानाधिकारी ह्या पदाने मला क्रिकेटकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोण दिला, अगदी Birds eye view. मी जेंव्हा खेळाडू म्हणून मैदानावर असे तेंव्हा खेळताना काही सुविधा उपलब्ध नसतील तर अगदी सहजतेने त्या गोष्टीची तक्रार करीत असे, पण त्या सुविधा उपलब्ध करून देण्यामागे किती बारीक गोष्टींचा विचार आणि परिश्रम आहेत याची जाणीव ह्या पदामुळे झाली. एका सामन्यामागे किती वेगवेगळ्या व्यक्ती झटत असतात तेही लक्षात आले. कदाचित त्यामुळेच सामन्यासाठी आलेल्या सर्वच घटकांना सर्व सुविधा मिळाव्यात ह्यासाठी मी दक्ष राहून दुप्पट प्रयत्न करतो. आधी खेळाडू म्हणून पंचांबद्दल आदर तर होताच पण सामनाधिकारी या पदावरून त्यांचे काम आणि मेहनत पाहून त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित झाला आहे. पंच, व्हिडीओ ऍनालिस्ट, बीसीसीआयचे सिनियर आणि ज्युनियर ऍनालिस्ट आणि पडद्यामागचे इतर अनेक कलाकार यांचे योगदान किती अमूल्य आहे हे प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे ह्या सर्वांबरोबर काम करताना माझा मनात नेहमी संघभावना असते.
आमचे एक ज्येष्ठ सामनाधिकारी नेहमी सांगतात – If you are not noticed by people and nobody is talking about you, then, as a match referee you are doing a fantastic job!! मला वाटतं सामनाधिकारी म्हणजे काय आहे हे सांगण्यासाठी एवढी एकाच ओळ पुरेशी आहे.