ball

आठवणींच्या डायरीतलं क्रिकेट हरवतंय !

by नम्रता वागळे 

फेब्रुवारी – मार्च २००३ चा काळ.. बारावी बोर्डाची परीक्षा आणि क्रिकेटचा वर्ल्ड कप या दोन्हींचा मुहूर्त त्या वर्षी एकच होता.. १ मार्चला पुण्याच्या एसपी कॉलेजच्या मुलींच्या होस्टेलची टीव्ही रूम खचाखच भरलेली होती. कुणी टीव्हीत डोळे घालून बसलंय… कुणी जपमाळ ओढतंय… कुणी अथर्वशीर्षाची आवर्तनं करतंय.. कुणी आपल्या कुलदेवतेचा धावा करतंय… कुणी स्टॅच्यू पोझिशन घेतलेय. एक-एक बॉल पडून सामना जसा पुढे सरकत होता तसं वातावरणातल्या टेन्शनचा पारा कधी वर कधी खाली अशा कन्फ्यूजन मोडमध्ये होता. आता असं जेव्हा वातावरण असेल तेव्हा वेगळा अंदाज बांधायलाच नको. भारत पाकिस्तान सामना सुरू होता.. अट्ठाविसावी ओव्हर.. शोएबचा वेगवान बॉल हलकेच प्लेस करत सचिननं एक धाव काढली आणि ९८ गाठले .. आणि त्याच्या मांडीचा स्नायू दुखावला… तिकडे मैदानात सचिन कळवळत होता. इथे आमच्या होस्टेलच्या टीव्ही रूममध्ये टेन्शनचा पारा उकळत होतं.. बारावीची परीक्षा असूनही मीसुद्धा तिथेच ठाण मांडून बसले होते. स्कोअर बोर्डवर सचिनच्या नावापुढे ९८ चा आकडा होता.. आता हव्या फक्त दोन धावा की धम्माल… सगळेच श्वास रोखून, डोळे विस्फारून टीव्हीकडे पाहत होते. अठ्ठाविसाव्या ओव्हरचा तिसरा बॉल, शोएब अख्तरनं धावायला सुरुवात केली श्वास रोखून आम्ही सगळ्याजणी जणू टीव्हीतच घुसलो होतो. आणि हाय रे कर्मा, शोएबच्या त्या उसळत्या बॉलनं घात केला आणि युनिस खाननं झेपावत झेल घेतला. सचिन शतकापासून अवघ्या दोन धावा दूर राहिला. तिथून पुढे मॅचचं काय झालं हे जगजाहीर आहे. आणि माझ्या बारावीच्या निकालाचा इतिहास उगाळण्यात अर्थ नाही. इथे मांडायचा महत्वाचा मुद्दा म्हणजे क्रिकेट या खेळावर असलेलं वेडं प्रेम, त्यातल्या खेळाडूंवर दाखवलेली देवासारखी श्रद्धा, धर्मयुद्धासारख्या क्रिकेटवरून झालेल्या चर्चा, आणि सामना जिंकल्यानंतर ऐन् उन्हाळ्यातही साजरी झालेली दिवाळी.. आहा काय दिवस होते ते..


तसा माझा आणि क्रिकेटचा संबंध अगदी फार जुना आहे. लिटल मास्टर सुनील गावस्कर यांना “छोनील गावश्कल” म्हणण्याएवढी मी ‘लिटल’होते तेव्हापासून क्रिकेट पाहत आले आहे. बालपण लहान गावात होतं. त्या काळी ९० च्या दशकात टीव्हीचा फार प्रसार नव्हता. माझ्या जन्मानंतर काही दिवसांनी बाबांनी आमच्या घरी सोनीचा टीव्ही घेतला होता. आमच्या पंचक्रोशीतला हा पहिला टीव्ही, त्यामुळे त्याचं अप्रूपही मोठं होतं. दर रविवारचं रामायण-महाभारत आणि क्रिकेटचे सामने असले की आमच्या घरच्या ओटीवर मुंगी शिरायलाही जागा नसायची. पंचक्रोशीतली माणसं टीव्ही पाहायला आमच्या घरी असायची. क्रिकेटचे सामने असले की आमच्या गावासह आजूबाजूच्या चार-पाच गावच्या शाळांचे मास्तर बरेचदा शाळा लवकर सोडून घरी क्रिकेट पाहायला हजर असायचे. मग जसा सामना रंगायचा तसा आरडा-ओरडा, ललकाऱ्यांनी घर दणाणून निघायचं. आजचं चित्र काहीसं वेगळं दिसतं. माझ्या आठवणीत मी गेले कित्येक वर्षात अशा वेडात बुडून जाऊन क्रिकेटचा सामना बघितल्याचं आठवतच नाही. माझ्यासारखी भावना कदाचित अनेकांची असेल. माझ्या नजरेत याची तीन प्रमुख कारणं आहेत. पहिलं म्हणजे क्रिकेटमध्ये झालेले मॅच फिक्सिंगचे आरोप, दुसरं कारण म्हणजे आयपीएलसारखा फॉरमॅट, आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं कारण अतीपरिचयात अवज्ञा.


२००० साली दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोनियेवर भारताविरुद्धच्या सामन्यात मॅच फिक्सिंगचा आरोप झाला. आणि त्यानंतर आपला कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आणि अजय जडेजा यांचं नाव त्यात आलं. याचा विसर पडत होताच, पण आयपीएलमध्ये हे मॅच फिक्सिंगचं भूत पुन्हा बाटलीतून बाहेर आलं. दुर्दैवानं स्वतःला क्रिकेट चाहते म्हणवणारे काही उथळ लोक प्रत्येक हरलेल्या मॅचचा संबंध मॅच फिक्सिंगशी जोडायला लागले. तथ्य असेल-नसेल पुढची गोष्ट पण क्रिकेटप्रेमींच्या मनात याचा किंतू कायमचा पाचर ठोकल्यासारखा राहिला. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे क्रिकेटचा बदललेला फॉरमॅट… क्रिकेट हा खेळ यापूर्वीही व्यावसायिक पातळीवर खेळला जात होता. पण बरीच वर्ष त्यातही देशांच्या सीमा अबाधित राहिल्या होत्या. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानात कायम एक देश विरुद्ध दुसरा देश पाहायला मिळत असे. त्यामुळे तो सामना पाहताना क्रिकेटप्रेमासोबत देशप्रेमही उचंबळून यायला वेळ लागायचा नाही. आता आयपीएलसारख्या फॉरमॅटमध्ये सर्वच देशाचे खेळाडू मांडीला मांडी लावून एका संघात बसलेले दिसतात. त्यामुळे त्या मैदानात उत्तम सुरू असलेलं क्रिकेट चाहत्यांच्या मनात फक्त मनोरंजनापुरतं मर्यादित राहिलेलं दिसतं.


तिसरं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अतीपरिचयात अवज्ञा. असं म्हटल्यानं मी कदाचित तुम्हाला थोडीशी ‘ओल्ड स्कूल टाईप्स’ वगैरे वाटेन, पण हे वास्तव आहे. पूर्वी क्रिकेटचे सामने फार नसत. त्यातही ते पाहण्यासाठी द्राविडी प्राणायाम घालावा लागत असे. ९० च्या दशकात टीव्ही फार तळागाळात पोहोचले नव्हते. त्यावेळी पंचक्रोशीतल्या एखात्या टीव्हीवर क्रिकेटप्रेमीची मदार असायची. शहरातल्या मध्यमवर्गातही अशीच स्थिती. त्यामुळे कधीतरी पाहायला मिळणाऱ्या क्रिकेटची गोडी होती. त्यानंतर टीव्ही प्रत्येक घरी आले. क्रिकेटचे सामने वाढले. रंगीत टीव्हीवर क्रिकेट बघण्याची मजा आणखीनच जास्त होती. अनेकांनी क्रिकेट मॅच गेट-टुगेदर्सही केली असतील. क्रिकेटला आयुष्यातल्या आठवणींच्या डायरीत कोरून ठेवणारा असा तो काळ होता. आता प्रत्येकाच्या हातातल्या मोबाईलवर क्रिकेट पाहता येतं. बसमध्ये, ट्रेनमध्ये, माळरानावर, घराच्या कोनाड्यात, चौकातल्या पारावर, अंथरुणात झोपून, मध्यरात्री, पहाटे, दुपारी, दिवसातल्या कोणत्याही प्रहरी आणि नेटवर्क असलेल्या कोणत्याही ठिकाणी क्रिकेट पाहता येतं. इतक्या सहज सोनं जरी मिळालं तरी त्याची गोडी राहत नाही. दुर्दैवानं क्रिकेटच्या बाबतीत तेच होतंय.


आमच्या आयुष्यात क्रिकेटचं जे स्थान आहे. ते आजच्या मिलेनियल किड्सच्या मनात कधी आणि कसं बनेल हा मला पडलेला एक भाबडा प्रश्न आहे. क्रिकेटचे मैदानातले किस्से ऐकणं ही जशी पर्वणी असते. तसे क्रिकेटचे मैदानाबाहेरचे आपल्या आयुष्यात घडलेले किस्सेही सुरस असतात. भारत-पाक सामना बघण्यासााठी शाळेत मारलेला मास बंक, वर्ल्डकपची मॅच पाहण्यासाठी बोर्डाचा पेपर लवकर देऊन काढलेला पळ, मैत्रिणीच्या घरी ६५ इंचाच्या एलईडी टीव्हीवर पाहिलेले क्रिकेटचे सामने आणि गप्पांची मैफल, ऑफिसमधून निघायला उशीर झाल्यानं रस्त्यावर टीव्हीच्या शोरूमसमोर घोळक्यात उभी राहून पाहिलेली मॅच असे हजारो किस्से माझ्या आठवणींच्या डायरीत साठलेले आहे. आज हातातल्या मोबाईलमध्ये क्रिकेट पाहणाऱ्यांना त्याची गोडी काय कळेल? कारण प्रेम, धर्म, देश, धाकधूक या सर्व भावनांना सारून आजच्या पिढीसाठी क्रिकेट उरलं आहे केवळ एन्टरटेन्मेंट. एन्टरटेन्मेंट. एन्टरटेन्मेंट.

To know more about Crickatha