ball

पडद्यामागचा कलाकार – क्रिकेट अंपायर 

by विनीत कुलकर्णी 

माझ्या समोरच्या माणसाला जेव्हा समजतं की मी क्रिकेट क्षेत्रात पंच किंवा Umpire म्हणून काम करतो, त्यानंतरची पुढची काही सेकंद विलक्षण असतात.क्रिकेट चा चाहता असेल तर त्याच्या डोळ्यात प्रचंड कुतूहल आणि कौतुक दिसू लागतं आणि चेहऱ्यावर डझनभर प्रश्नांची नांदी दिसू लागते. क्रिकेट फारसं आवडतं नसणारी लोक, अर्रे वाह, अच्छा …. असं तोंडदेखलं म्हणतात पण चेहऱ्यावरचा प्रश्न हा अंतू बर्वा मधल्या बापू हेगिष्ट्याला पडला होता तोच असतो. “हा माणूस उपजीविकेसाठी नक्की काय काम करतो?”
अगदी कसलेले मुरब्बी पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर सुद्धा, किती पैसे मिळतात हा प्रश्न विचारल्याशिवाय राहात नाहीत. त्यात BCCI म्हणजे रग्गड पैसा मिळत असेल हा एक ठराविक समज असतोच. आमच्या क्षेत्रातील नवखे लोक या प्रश्नांच्या चक्रव्यूहात निष्कारण स्वतःचा अभिमन्यू करून घेतात. आम्ही मात्र आता या प्रश्नांना आता सरावलो आहोत आणि समोरच्या व्यक्तीला त्याच्या पद्धतीत समाधानकारक उत्तर द्यायला शिकलो आहोत. तसं पाहिलं तर समोरचा व्यक्ती काय काम करत असेल याचा अंदाज बांधताना तो क्रिकेट मध्ये पंच असेल हे उत्तर पहिल्या पाच अनपेक्षित उत्तरांमध्ये असू शकतं. त्यामुळेच क्रिकेट मध्ये पंच म्हणून काम करतो म्हणजे नक्की ह्याचं काम काय, आणि यांच्या क्षेत्रात यांच्या आयुष्याचं चित्र नक्की कसं दिसत असेल  हे जाणून घ्यायला लोकं फार उत्सुक असतात.

याच काही प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी हा लेखप्रपंच. क्रिकेट पंच म्हणजे आपल्याला मॅचदरम्यान टीव्ही वर दिसणारा, मध्येच काही हातवारे करणारा, खेळाडूंना बाद नाबाद ठरवणारा तोच तो.
त्यानंतरचा सर्वसाधारण प्रश्न असतो तो म्हणजे, तुम्ही तर सगळ्या मोठ्या खेळाडूंना भेटत असाल ना? या प्रश्नाचं प्राथमिक उत्तर हो असं असलं तरी एक पंच आणि खेळाडूंचं नातं एवढ्याच तपशिलात संपत नाही.
 
खरं कसं असतं मैदानावरील पंचाचं आणि खेळाडूंचं नातं ?
मैदानावरच्या नात्यापेक्षाही मैदानाबाहेर हे नातं कसं असतं?
या लेखात या प्रश्नांवर थोडा प्रकाश टाकायचा प्रयत्न मी करणार आहे.
Mutual professional respect हा या नात्याचा मूलभूत आधार असतो.


 कोणत्याही पंचाला हे लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे की क्रिकेट हा खेळ खेळ हा मूलतः खेळाडूंसाठी आहे. आम्ही फक्त पडद्यामागचे कलाकार  (backstage artist) आहोत. आमचं काम म्हणजे प्रयोग निर्विघ्न पार पडेल एवढंच पाहायचं असतं. हा कलाकार रंगमंचावर आला तर चाक रुळावरून घसरतंय हे लगेच समजतं. तसंच पंच प्रकाशझोतात आले तर फक्त त्यांच्या चुकांमुळे किंवा सामन्याची गाडी रुळावरून घसरल्यामुळेच येतात. मी कायम म्हणतो क्रिकेट मैदानावर पंचाने गाडीच्या shock absorber चं काम करायचं असतं. मूळ इंजिन हे खेळाडूच असतात.
खेळाडू आणि पंच यांच्या दरम्यानच्या नात्याला बऱ्याच व्यावसायिक मर्यादा आहेत. त्या उल्लंघून चालत नाहीत. मैदानावर, खेळाडूंशी अति जवळीक असणे योग्य मानलं जात नाही. अर्थात हसत खेळत एकत्र राहण, हलकी फुलकी चेष्टा मस्करी होणं कधीही चांगलंच पण एका मर्यादेपलीकडं ते वाईट दिसतं. ह्याच खेळाडूंसाठी मैदानावर निर्णय घेणाऱ्याची भूमिका आम्हाला  पार पाडायची असते. त्यांच्याबरोबर गळ्यात किंवा खांद्यावर  हात टाकून उभं राहणं, सतत एखाद्या ठराविक खेळाडूंबरोबर गप्पा गोष्टी करणं, आम्ही कटाक्षाने टाळतो. जे खेळाडू समजूतदार असतात ते सुद्धा या गोष्टीचा आदर करून तसंच वागून सहकार्य करतात.
पण पाचही बोटं सारखी कशी असतील? वर्गात समजूतदार मुलांसारखी व्रात्य मुलंही असतात, चापलूस असतात, काही चाणाक्ष, काही बेरकी तर काही निव्वळ ढ असतात. मैदानावरील खेळाडूही असेच असतात. पण शेवटी हे सगळे एकाच वर्गात असल्यामुळे यांना समान न्याय आम्ही देत असतो. पंच आणि पक्षपात हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. सर्वांना न्याय समान असला तरी प्रत्येकाशी सामान वागून चालत नाही.

Player management चा पहिला मूलमंत्र हाच असतो की आपल्या समोरच्या खेळाडूचा स्वभाव समजून घ्या. समजूतदार विद्यार्थी हाताळणं जसे शिक्षकांसाठी सोपे असते तसेच आमच्यासाठीही. बाकी प्रकारच्या खेळाडूंना हाताळताना मात्र बुद्धी, हजरजबाबीपणा, विनोदबुद्धी, संयम, तंत्र, युक्ती, अनुभव आणि वेळेला शासनही वापरावं लागतं. सर्व काही सुरळीत चालू असताना खेळाडूंशी होणारे संवाद हे गप्पा, विचारपूस, मजा, विनोद या प्रकारांमध्ये मोडतात. पण एखाद्या अवघड प्रसंगाची गाठ सोडवताना काळजी घ्यावी लागते. समोरचा खेळाडू चिडलेला, बिथरलेला असू शकतो. त्यामुळे पहिले त्याचं म्हणणं ऐकून घेऊन कुकर मधली वाफ काढण्याचं तंत्र आम्ही वापरतो. त्यानंतरच आपलं म्हणणं मांडलं तर ते समोर नीट पोचतं. नाहीतर शब्दाने शब्द वाढून प्रश्न विकोपाला जातो. बोलण्यातला, शब्दप्रयोगातला आणि देहबोलीतला (body language) संयम अतिशय महत्वाचा. 

संघ बदलतात तश्या भाषा बोलण्या वागण्याच्या पद्धतीही बदलतात. मी प्रत्येक भाषेतले काही मूलभूत शब्द शिकून घेतो. ‘नाही’, ‘नको’, ‘हो’, ‘पुरे’, ‘छान’, ‘पाणी’, ‘जेवण’ असे काही शब्द प्रत्येक भाषेत लक्षात ठेवतो. त्या खेळाडूंशी बोलताना त्यांच्या भाषेतले शब्द वापरले की थोडी आपुलकी वाढून सुरुवात चांगली होते. मैदानावर खेळाडूंना त्यांच्या पहिल्या नावाने हाक मारलेलं त्यांना आवडतं. ह्यात दक्षिण भारतात थोडा गोंधळ होतो.मला आठवतं तामिळनाडूच्या माझ्या पहिल्या सामन्यात मी पहिले काही वेळा  मुरली विजय ला सवयीप्रमाणे “मुरली” असं हाक मारत होतो. शेवटी त्याने येऊन सांगितलं की माझं नाव “विजय” आहे. माझ्या वडिलांचं नाव मुरली आहे. थोडा हशा पिकला. पण नंतर जेव्हा मी तोच नियम अभिनव मुकुंद ला लावला तर तो म्हणाला माझं नाव “अभिनव” वडिलांचं नाव मुकुंद. मला चक्कर यायचं बाकी होतं. ह्या दक्षिण भारतीय लोकांना नावं एकाच पद्धतीत सोपी सुटसुटीत का ठेवता येत नाहीत देव जाणे. शेवटी दिनेश कार्तिक समोर आल्यावर DK अशी हाक मारून मी माझ्यापुरता तोडगा काढला.
 
मैदानाबाहेर खेळाडू आणि पंच यांचं नातं कसं असावं याबाबतही काही मर्यादा आहेत. समोरचा खेळाडू अगदी तुमचा लहानपणीचा मित्र असला तरी कामाच्या ठिकाणी चारचौघात उघड मैत्री दाखवता येत नाही. नमस्कार, हाय, हॅलो झाल्यावर संवाद साधायला, गप्पा मारायला किंवा विचारांची देवाणघेवाण करायला काहीच हरकत नसते. एखाद्यावेळेस हॉटेल मध्ये , मॉल्स, सिनेमा हॉल मध्ये भेट झाल्यास गप्पा मारत एकत्र वेळ घालवायला सुद्धा बंदी नसते. पण खेळाडूंबरोबर सामन्याच्या वेळेदरम्यान असे कार्यक्रम ठरवून आखणे मात्र अयोग्य ठरतं. खेळाडूंबरोबर वारंवार एकत्र दिसणं हे व्यवस्थापनाचा रोष देखील ओढवून घेऊ शकतं. खेळाडू आणि पंच या दोघांनी ही आपल्या व्यावसायिक मर्यादांचा आदर ठेवला की हे नातं अजून दृढ होत जातं.

वर्षानुवर्षे खेळाडूंबरोबर एकत्रं काम करून हे नातं नीट जपलं की त्यातून पुढची पायरी असते एकमेकांबद्दल विश्वास निर्माण होणं. हा एकमेकांवरील विश्वास जेव्हा घट्ट असतो तेव्हा मैदानावर कुठल्याही समस्येला तोंड देण्याचं सामर्थ्य मिळतं. एका रणजी सामन्यात मला आठवतं एका मोठ्या खेळाडूविरुद्ध झेलबाद असल्याचं अपील झालं होतं. मी थोडा साशंक होतो आणि नाबाद ठरवणार एवढ्यात तो फलंदाज स्वतःहून परत जाऊ लागला. नंतर मैदानावर आल्यावर मी त्याच्याकडे बघत असताना त्याने माझ्या नजरेतला प्रश्न ओळखला आणि म्हणाला, “मी थांबलो असतो तर तुझा निर्णय चुकला असता. ते मला नको होतं आणि मी बाद होतोच. म्हणून गेलो स्वतःहून. जास्त विचार नको करुस. तुम्ही लोक मन लावून एकाग्रतेने काम करता. एखाद्यावेळेस नाही दिसलं तर चालतं. आमचा प्रत्येक शॉट बॅट च्या मध्यभागी बसतो का? तसंच आहे हे. We should do what the game expects us to do.” त्यानंतर ह्या खेळाडूबद्दलचा माझा विश्वास आणि आदर कित्येकपटीने वाढला. मला नेहेमी वाटतं. खेळाडूंचं मैदानावरील आणि मैदानाबाहेरील वागणं हे त्याच्यावर झालेल्या संस्कारांचं प्रतिबिंब असतं.
 
पंच हा देखील शेवटी माणूसच आहे. त्याच्याही हातून कधी ना कधी चूक ही होणारच. या गोष्टीचा आदर ठेवून जो खेळाडू मर्यादांचं भान राखतो तो खेळाडू मोठं नाव कमावतो याची भरपूर उदाहरणं आहेत. सचिन तेंडुलकर पासून अजिंक्य राहणे, हाशिम आमला, केन विलियम्सन ते पूर्वीच्या काळचे अनेक दिग्गज हे केवळ उत्तम खेळाडू म्हणून नाही तर उत्तम माणूस म्हणूनही नाव कमावून गेले आहेत. खेळाडूंची वागणूक ही आता पूर्वीइतकी मोठी समस्या उरली नाही आहे. मैदानावरील प्रत्येक हालचाल टिपणाऱ्या कॅमेऱ्यांमुळे असो, किंवा IPL सारख्या स्पर्धांमुळे असो, खेळाडूंच्या वागणुकीमध्ये अत्यंत सकारात्मक बदल गेल्या काही वर्षात बघायला मिळतो आहे. काही अपवाद वगळता खेळाडूंना सामनाधिकाऱ्यांकडून शासन होण्याचे प्रमाण देखील कमी झालं आहे. पंच आणि खेळाडू एकाच ध्येयाने एकत्र काम करताना दिसतात. खेळाडू सामन्यादरम्यान उत्तम सहकार्य करून सामना सुरळीत पार पडायला मदतही करतात. एक प्रकारचा मोळकेपणा आला आहे जो ‘पंच आणि खेळाडू’ या नात्यासाठी अत्यंत स्वागताहार्य आहे.

२०१३ साली मी ऑस्ट्रेलिया मध्ये MCG वर व्हिक्टोरिया विरुद्ध वेस्टर्न ऑस्ट्रेलिया या सामन्यात काम करत होतो. या सामन्यात दोन्ही संघात आंतरराष्ट्रीय खेळाडू भरपूर होते व पुढील आठवड्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध च्या कसोटीसाठी तयारी करत होते. मी पाहिलं की मिचेल जॉन्सन माईक हसी ला बॉल टाकल्यानंतर उगाचच डिवचत होता. खूप जवळ जाऊन त्याला चिडवायचे प्रयत्न करत होता. थोडं आक्षेपार्हच वागत होता. मी त्याला थोडं हटकलं आणि शांत राहायला सांगितलं. तो काही बोलला नाही. त्यानंतर हसी मला म्हणाला, “विनीत, त्याला थांबवू नका. मी मुद्दाम त्याला असं वागायला सांगतोय. पुढच्या आठवड्यातला कसोटीमध्ये मला बोथट मिचेल जॉन्सन नकोय. तो माझी एकाग्रता घालवतोय आणि मी तरीही फोकस करायचा प्रयत्न करतोय. दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज हेच करणार आहेत. आम्ही दोघंही तयारी करतोय. आम्ही मर्यादा ओलांडणार नाही. काळजी नको.” ही क्रीडा संस्कृती माझ्यासाठी वेगळी होती. 
 
याच सामन्यात माझा सहकारी पंच पॉल विल्सन याने ख्रिस रॉजर्स ला दोन्ही डावात lbw बाद दिले आणि दोन्ही वेळेस फलंदाजाला निर्णय पटला नव्हता. सामना संपल्यावर आमच्या खोलीचा दरवाजा वाजला.
ख्रिस हातात ७-८ बिअरच्या बाटल्या घेऊन आला होता. त्याने खोलीतील सर्वांना देऊ केली आणि पॉलला म्हणाला, “मला तुझी ५ मिनिटे हवी आहेत. दोन्ही lbw निर्णयांबद्दल तुझ्याशी बोलायचे आहे” दोघेही टेबलाच्या विरुद्ध बाजूस बसून आपली बाजू मांडू लागले. यात कुठेही राग, संताप किंवा अनादर नव्हता. मला बिअर वर्ज्य असल्यामुळे मी मूक प्रेक्षक बनून हे  बघत होतो. ५ मिनिटांच्या वैचारिक देवाणघेवाणीनंतर दोघांनाही एकमेकांचे म्हणणे पटले नव्हते. पण विषय तिथेच संपवल्याचे समाधान होते. हे सगळं बघून, आपल्या इथेसुद्धा अश्या सकारात्मक वृत्ती तयार झाल्या तर किती बरं होईल असं मला वाटलं होतं.

आज २०२२ मध्ये मला सांगताना खूप आनंद होतो की आता आपल्या इथेही बहुतांशी खेळाडू इतक्याच सकारात्मक वृत्त्तीने खेळतात आणि वागतात.खेळाडू आणि पंचांचं, आदर आणि विश्वासाचं नातं उत्तरोत्तर दृढ होत जाणार यात मला थोडी सुद्धा शंका नाही.
 
तर हा लेख वाचल्यावर, “तुम्ही तर सगळ्या खेळाडूंसोबत फोटो काढले असतील ना”? “तुम्ही तर सारखे सगळ्या खेळाडूंबरोबर रहात असाल ना “? हे प्रश्न तुम्हाला पडू नयेत एवढीच इच्छा व्यक्त करतो, आणि यावेळेसपूर्ती आपली रजा घेतो.  

To know more about Crickatha