ball

ऋतुराज गायकवाड – आईवडिलांच्या नजरेतून

ऋतुराज गायकवाड – कोणी म्हणतंय की तो भारतीय क्रिकेटचं भविष्य आहे. कोणाच्या लेखी त्याच्यासारखा तंत्रशुद्ध फलंदाज आजच्या घडीला भारतात विरळाच आहे. कोणाच्या हिशेबी तो लवकरच भारताच्या कसोटी संघात दिसेल, किंवा कोणाचं म्हणणं आहे की तो भारताच्या एकदिवसीय आणि T20 संघाचा आधारस्तंभ होऊ शकतो. अनेक लोकांची अनेक मतं आहेत. साधारण ३-४ वर्षांपूर्वी जेव्हा त्याने रणजीमध्ये पदार्पण केलं तेव्हापासून मी नकळतच त्याला फॉलो करतोय. सरळ साधं कारण, अरे हा आपल्या महाराष्ट्राचा खेळाडू आहे. अगदी विशीतला ऋतुराज बघता बघता पायऱ्या चढत गेला आणि आता तर तो एक मोठा स्टार होऊ पाहतोय. ऋतुराजच्या मुळांचा शोध घ्यावा, त्याच्या आईवडिलांशी बोलावं असं मनात होतं. आणि म्हणतात ना, तुम्ही ठरवलं की आपसूकच सगळ्या गोष्टी जमून येतात. ह्यावेळी देखील असंच झालं. माझ्या मदतीला ऋतुराजचे बालपणीचे कोच मोहन जाधव सर धावून आले, आणि त्यांनीच माझी भेट घडवली श्री. दशरथ आणि सौ. सविता गायकवाड ह्यांच्याशी. ऋतुराज गायकवाडचे आई-वडील. 

पुण्यातल्या सांगवी भागात आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. वेळ ठरली होती, पण घरी गेलो आणि घराला कुलूप. थोड्याच वेळात गायकवाड काका-काकू आले. सगळ्यात पहिल्यांदा त्यांना बघितल्यावर ह्यांचा मुलगा इतका मोठा क्रिकेट स्टार असेल ह्यावर विश्वास बसणं अशक्य होतं. दोघेही वागायला,  बोलायला अगदी साधे. खूप नम्रपणे त्यांनी आमचं स्वागत केलं, आणि काही वेळातच गायकवाड काका-काकूंनी मला जिंकून टाकलं होतं. काकू शाळेत नोकरी करतात, आणि काका आता शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत. काकूंनी सगळ्यांसाठी मस्तपैकी चहा केला, आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या. विषय साहजिकच ऋतुराज हाच होता. माझी भूमिका ऐकणाऱ्याची होती, आणि जे मिळेल ते साठवून घेण्याचा मी प्रयत्न करत होतो. 

३ खोल्यांचं अगदी साधं घर, पण त्या घरात काहीतरी जादू होती हे नक्की. त्या भिंती, ते छप्पर… सगळ्याच गोष्टी एक प्रकारच्या सकारात्मकतेने भरून गेलेल्या जाणवत होत्या. “ह्याच घरात ऋतुराज लहानाचा मोठा झाला,” काका सांगत होते. “ह्याच खोल्यांमध्ये, गच्चीवर, खाली गल्लीत त्याची मस्ती चालायची. क्रिकेटची आवड अगदी लहानपणापासून. आम्ही काही खेळात भाग घेणारे नाही. कधीतरी टीव्हीवर सामने बघणं इतकाच आमचा क्रिकेटशी संबंध होता. पण ऋतुराजने मात्र तो खेळ पटकन उचलला. मला वाटतं ८-९ वर्षांचा असेल तेव्हाच तो क्रिकेटशी अगदी एकरूप झाला होता असं म्हटलं तरी चालेल. त्याच सुमारास आम्ही त्याचं नाव व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमीमध्ये घातलं आणि पुढे काही वर्षांत सगळं चित्रच बदललं. अकॅडमीमध्ये सुरुवातीला गेलेला ऋतुराज आणि तिथे शिकून सुलाखून बाहेर पडलेला ऋतुराज ह्यात खूप फरक आहे. वेंगसरकर सरांचं मोलाचं मार्गदर्शन त्याला मिळालं. जाधव सरांनी आणि अकॅडमीमधल्या इतर शिक्षकांनी त्याच्यावर घेतलेली मेहनत आणि केलेले संस्कार ह्याचा खूप मोठा हातभार त्याच्या करियरवर आहे हे नक्की. अर्थात तो तसा खूपच फोकस्ड मुलगा होता, अगदी लहानपणापासून. आणि त्याची कष्ट करण्याची तयारी पहिल्यापासूनच होती. आणि मग क्रिकेट सुरू झाल्यानंतर त्या कष्टांना एक प्रकारे दिशा मिळाली. खूप लहानपणीच त्याने क्रिकेट खेळायचं स्वप्न बघितलं होतं, आणि आज ते स्वप्न सत्यात उतरलं आहे.” काकांच्या डोळ्यात मुलाविषयीचा अभिमान दिसत होता, त्यांच्या बोलण्यातून तो जाणवत होता. 

आता काकूही आमच्यामध्ये सामील झाल्या होत्या. “तो तसा लहानपणापासूनच खूप समजूतदार, शांत मुलगा होता. कधी कोणाच्या वाट्याला गेला नाही. आपण बरं, आपला अभ्यास, आपलं क्रिकेट बरं… एवढंच चालायचं त्याचं. कधी त्याने हट्ट केला नाही की कधी कोणाशी उद्धटपणे बोलला नाही. तसं त्याला कायमच घर प्यारं आहे. तो इथे पुण्यात असला की घरीच असतो अजूनही. वर गच्चीवर त्याने एक जिम तयार केली आहे, आणि बराच वेळ तो त्या जिममध्येच असतो. वर टेबल टेनिसचं एक टेबल आहे. कधी कधी तो आणि त्याचे बाबा टेबल टेनिससुद्धा खेळतात.” 

काकूंनंतर परत एकदा काकांनी बोलायला सुरुवात केली. “आमचं मूळ गाव इथेच सासवडजवळ आहे. पण आता मला पुण्यात येऊन अनेक वर्षे होऊन गेली. मी कॉलेजसाठी पुण्यात आलो. मग शिक्षण, नंतर नोकरी ह्या निमित्ताने पुण्यातच राहिलो. तशी घरची काही श्रीमंती नाही, पूर्ण वेळ नोकरी करत, कष्टाने दिवस काढलेत. गावी थोडी शेती आहे. ऋतुराज लहानपणापासून जमेल तेव्हा तिकडे जातो,  त्याला आवडतं तिकडे. पण ह्या इथे पुण्यात राहून त्याला त्याच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करता आलं. त्याला क्रिकेट खेळायचं होतं, चांगलं क्रिकेट खेळायचं होतं. आणि त्यासाठी एखादा चांगला क्लब पाहिजे, एखादी अकॅडमी पाहिजे हेसुद्धा आमच्या गावी नव्हतं. कोणीतरी व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमीबद्दल सांगितलं. वेंगसरकर सरांचं नाव ऐकून होतो. त्यांच्याबद्दल खूप वाचलं, ऐकलं होतं. तिथे आपल्याला कोण विचारणार ही एक भीती होती. पण तसं काही झालं नाही. तिकडे ऋतुराजने खेळायला सुरुवात केली आणि बघता बघता तो तिथे एकदम रुळला. मग तिथे क्रिकेटचा सराव, त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या वयोगटाचे सामने. कधी पुण्यात, कधी बाहेर असं सगळं सुरू झालं. आणि बघता बघता आमचा ऋतुराज कसा मोठा झाला, महाराष्ट्र, भारत अ संघ, चेन्नई सुपर किंग्ससारखा IPL चा संघ… सगळीकडे खेळू लागला, चमकू लागला. मात्र आम्ही कधीही त्याच्या प्रशिक्षणामध्ये ढवळाढवळ केली नाही. कधीही त्याच्या नेट्सच्या सरावाला उपस्थिती लावली नाही. मला वाटतं ते खूप महत्त्वाचं आहे. व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमी त्याच्यासाठी, आणि आमच्यासाठीसुद्धा एखाद्या विद्यापीठासारखी आहे. त्याच्यासाठी ते शिक्षण, ते शिक्षक महत्त्वाचे आहेत. आम्ही आईवडील म्हणून मुलाची प्रगती विचारायला, तो कसा खेळतो आहे ते बघायला, त्यांना काही सूचना करायला कधीही त्यांच्याकडे गेलो नाही. मला वाटतं की ही प्रशिक्षक मंडळी सगळी त्या क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी आहेत. त्यांना त्यांचं काम करू द्यावं. कोणताही खेळाडू घडत असताना ही खूप महत्त्वाची गोष्ट असते.”काकांच्या डोळ्यात मुलाबद्दल कौतुक झळकत होतं. 

“ऋतुराज शाळेत कसा होता?” माझा पुढचा प्रश्न आलाच. “तसा तो व्यवस्थित अभ्यासू आणि हुशार मुलगा होता.  चांगल्या मार्कांनी पास व्हायचा. मुख्य म्हणजे एकदा शिकवलेलं त्याच्या पटकन लक्षात राहतं. पण पुढे त्याने क्रिकेटवरच लक्ष केंद्रित केलं. क्रिकेटपटू व्हायचं आहे हे त्याने आधीच ठरवलं होतं. जणू काही त्याचा अभ्यास क्रिकेटच आहे, त्या सरावालाच त्याने वाहून घेतलं होतं. आणि आम्हाला पण खात्री होती की तो ह्यात नक्की पुढे जाईल. मला वाटतं तो आठवीत होता, इथेच खडकीत तो एका कॉन्व्हेंटमध्ये जात होता. पण शाळेत जाणं तसं कमी असायचं. त्याचे सामने सतत सुरू असायचे. मग एकदा शाळेतून बोलावणं आलं. आणि आम्ही शाळेत गेलो तेव्हा शाळेच्या फादरने तंबीच भरली. आम्ही त्यांना ऋतुराजच्या क्रिकेटविषयी सांगत होतो, पण त्यांना ऐकूनच घ्यायचं नव्हतं. त्यांच्या शाळेत क्रिकेटचा संघ नव्हता, आणि सगळं महत्त्व अभ्यासालाच होतं. त्यांनी ऋतुराजला दोन पैकी एकाची निवड करायला सांगितलं, आणि क्षणाचाही विलंब न लावता ऋतुराजने क्रिकेट महत्त्वाचं आहे असं सांगितलं. तो शाळा बदलायला तयार झाला पण त्याला क्रिकेट सोडायचं नव्हतं. आणि मग मनावर दगड ठेवून आम्ही त्याची शाळा बदलायचा निर्णय घेतला. शैक्षणिक वर्ष सुरु झालेलं होतं, त्यामुळे त्याला कुठे प्रवेश मिळणार का, याबद्दल शंकाच होती. काही ठिकाणी प्रयत्न करून बघितलं पण कुठेच काही होत नव्हतं. शेवटी इथे जवळच अगदी साध्या शाळेत प्रवेश घेतला.” काकांच्या डोळ्यात पाणी तरळत होतं. एकूणच सगळंच वातावरण एकदम शांत झालं होतं. “पण त्या प्रसंगातही ऋतुराज खूप संयमाने वागला. जे समोर आहे ते त्याला मान्य होतं. त्याला त्याच्या क्रिकेटवर लक्ष द्यायचं होतं. माझा मुलगा आहे म्हणून नाही सांगत, पण खरंच खूप गुणी आहे तो. आहे ती परिस्थिती अगदी धीराने सांभाळतो. मागच्या वर्षी IPL च्या आधी त्याला कोरोना झाला होता. त्याची तब्ब्येत खूपच खराब झाली होती. सुरुवातीला चेन्नईसाठी काही सामने तो खेळू शकला नाही. तेव्हा तो निराश झाला होता, पण शांत होता. त्याला संधी मिळाली, पहिले १-२ सामने तो चांगला खेळू शकला नाही. पण त्यानंतर त्याने लागोपाठ ३ अर्धशतकं ठोकली, आणि खऱ्या अर्थाने त्याचं नाव घेतलं जाऊ लागलं. मागच्या वर्षी चेन्नईचा संघ प्ले ऑफमध्ये नाही गेला. पण ह्या वर्षी त्यांच्या संघाने चांगली कामगिरी केली आहे, आणि त्यातही ऋतुराज चांगलाच चमकला आहे. आई-वडील म्हणून आम्हाला त्याचा नक्कीच अभिमान आहे. तो त्याला संघात दिलेली भूमिका पार पाडतो, संघासाठी खेळतो हे महत्त्वाचं.” 

“त्याचं घरातलं वागणं कसं आहे? खाण्याच्या आवडीनिवडी?” ऋतुराज घरी कसा वागत असेल ह्याची मला पण उत्सुकता होतीच. गायकवाड काकूंना मी हा प्रश्न विचारला होता. “साधा आहे तो. त्याला माझ्या हातचं घरचं जेवण आवडतं. खाण्यापिण्याचे काही नखरे नसतात. फक्त सध्या त्याचं डाएटचं खूप असतं. मग तो घरी असला की सांगतो की मला अमुक अमुक पदार्थ खायला दे. मग मी त्याच्यासाठी ते बनवते. आजकाल तो बाहेरच असतो ना, मग तिकडे सगळं बाहेरचं खाणं होतं. घरच्या जेवणासाठी वाट बघतो नक्की.” 

“तुम्ही त्याचं क्रिकेट बघता की नाही?” मी विचारलं. “नाही हो. मला नाही जमत ते. म्हणजे चुकून बाद झाला तर… असं वाटत राहतं. मी अजूनही त्याचा एकही सामना मैदानावर बसून पाहिला नाहीये. मग अगदी क्लबचा सामना असेल तरीसुद्धा मी कधी गेले नाही. आणि टीव्हीवर पण त्याच्या जरा बऱ्यापैकी धावा झाल्या की मी मॅच बघायला बसते,” काकू मनापासून सांगत होत्या. “क्रिकेटव्यतिरिक्त त्याला वेड एकच आहे, ते म्हणजे नीट राहायचं. त्याचे कपडे, बूट, त्याच्या गोष्टी त्याला एकदम नीट लागतात. त्याला असं टापटीप राहायला, साधेच पण चांगले कपडे घालायला आवडतं. त्याचे कपड्यांचे, बुटांचे ब्रँडसुद्धा ठरलेले आहेत. खास करून क्रिकेटचे कपडे – मग ते महाराष्ट्र संघाचे असो, चेन्नई सुपर किंग्सचे, भारतीय संघाचे असो किंवा अगदी क्लबचे असो, ते एकदम व्यवस्थित आहेत ह्याकडे त्याचा कटाक्ष असतो. अकॅडमीच्या ड्रेसबद्दलदेखील तो तेवढाच पझेसिव्ह आहे. तो चुकूनही मिरवणार नाही, पण नीट सगळ्या गोष्टी स्वतःला पाहिजे त्या पद्धतीने करून घेईल. इतकंच काय, पण त्याचं क्रिकेटचं साहित्य, बॅट्स, पॅड आणि बाकी सगळ्या गोष्टी पण त्याला ठरावीक ब्रँडच्याच हव्या असतात. त्याचं वाचन पण चांगलं आहे. तो क्रिकेटवरची बरीच पुस्तकं वाचतो. सचिन तेंडुलकर, धोनी हे त्याचे आवडते खेळाडू आहेत.” 

“ऋतुराजने आमच्यासाठी कार घेतली होती. आणि आम्हाला ते मोठं सरप्राईज होतं. आम्हाला काहीच कल्पना नव्हती. तो जाधव सरांना बोलला होता, आणि दोघे मिळून आम्हाला शोरूममध्ये घेऊन गेले. आणि तिथे गेल्यावर त्याने कारची किल्ली हातात ठेवली. खूप कौतुक वाटलं आम्हाला. आमच्याकडे बरीच वर्षं एक साधी कार होती. त्या कारने मी कितीतरी वेळा ऋतुराजला सगळीकडे मैदानांवर, अकॅडमीमध्ये घेऊन गेलोय. आता तो मोठा झाल्यावर त्याने आम्हाला सरप्राईज दिलं. खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी,” काका आपल्या लेकाबद्दल अभिमानाने सांगत होते. “आता सगळे म्हणतात की ऋतुराजचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. सगळ्या मोठ्या क्रिकेटपटूंनी त्याचं कौतुक केलं आहे. आज तो भारतासाठी फार खेळला नाहीये, पण लवकरच खेळेलसुद्धा. त्याने सर्व प्रकारचं क्रिकेट खेळावं अशीच आमची इच्छा आहे. तो IPL मध्ये चेन्नईकडून खेळतो. त्याच संघाने त्याला नाव दिलं आहे. पुढे तो अजून कोणत्या संघाकडून खेळेल काय माहीत, पण माझी मनापासून इच्छा आहे की त्याने भारतासाठी तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळावं आणि देशासाठी आपलं सर्वस्व द्यावं. त्यालाही देशाचा, भारतीय संघाचा अभिमान आहे. त्याने भारताकडून चांगली कामगिरी करावी एवढीच इच्छा आहे.” 

खरोखर ऋतुराजने भारतासाठी चमकदार कामगिरी करावी ही माझीही इच्छा आहे. ऋतुराज गायकवाड – खरं म्हणजे बस नामही काफी है! माणसाची श्रीमंती त्याच्या आचरणावरून, त्याच्या वागण्यावरून समजते असं म्हणतात. त्या दिवशी मी जगातले खूप श्रीमंत आईवडील बघितले, त्यांचे विचार खूप जवळून ऐकले. श्री. दशरथ आणि सौ. सविता गायकवाड, सलाम आहे तुम्हाला. 

– कौस्तुभ चाटे

दुर्दैवी पण गुणवान संघ

जगात क्रिकेट खेळणारे, म्हणजे कसोटी क्रिकेट खेळणारे जेवढे देश आहेत त्यातील तीनचार देशांची मिळून जितकी लोकसंख्या असेल तितकी एकट्या भारताची आहे. त्यात परत तो आपला राष्ट्रीय खेळ नसला तरी बहुसंख्य लोक क्रिकेट बघत असतात, किंवा त्यांना त्यात रुची असते. बऱ्याच लोकांना आपल्याला क्रिकेट कळतं असंही वाटतं. त्यांच्या अज्ञानाची वारुळं फोडणं कठीण आहे. ही अज्ञानाची वारुळं जगभर आहेत. अगदी क्रिकेटची जननी असलेल्या इंग्लंडमध्येसुद्धा लॉर्ड्सच्या संग्रहालयात विख्यात गोलंदाज अमीर इलाही हा ऑफ स्पिनर आहे असं त्याच्या फोटोच्या खाली लिहिलं होतं, आणि तो बिचारा आयुष्यभर लेगस्पिन टाकत राहिला. असो! आजचा विषय आपल्या भारतापुरता आहे. आपल्या देशात १९३२ सालापासून जवळपास तीनशेच्या आसपास खेळाडू कसोटी क्रिकेट खेळले आहेत. एक कसोटी खेळणारे (असे बरेच लोक आहेत. ही यादी लांबलचक होईल म्हणून दिली नाहीये) ते दोनशे कसोटी खेळणारा सचिन तेंडुलकर, अनेक खेळाडूंनी भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यातले काही खेळाडू, खरं तर बरेच खेळाडू असे आहेत, जे दुसऱ्या एखाद्या देशात जन्मले असते तर बरेच कसोटी सामने खेळले असते. ह्या ना त्या कारणाने त्यांना कसोटीचा टिळा लागला नाही. कधी विभागीय राजकारण आड आलं, कधी कसोटी सामन्यांमध्ये असलेल्या दीर्घ कालावधीमुळे त्यांचा चांगला फॉर्म खराब झालेला असायचा. (पूर्वी असं व्हायचं. आता एखादा खेळाडू पाचदहा वर्षांत ५० कसोटी सामने सहज खेळतो.) काही काही खेळाडू देशांतर्गत सामन्यात पोत्याने धावा करीत किंवा खोऱ्याने बळी मिळवत असत, पण निवड समितीची मेहेरनजर त्यांना कधी लाभली नाही. दोन ऑफ-स्पिनर एका वेळी खेळायचे पण दोन डावखुरे स्पिनर्स चालत नसत. त्यामुळे बऱ्याच डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांना त्यांची जादू आंतरराष्ट्रीय पातळीवर दाखवता आली नाही. राजिंदर सिंग हंस (७८ सामन्यात ३४० बळी), मुमताज हुसेन (६६ सामन्यात २१४ बळी), उत्पल चॅटर्जी (१२९ सामन्यात ५४० बळी) हे काही दुर्दैवी खेळाडू. उदय जोशी हा ऑफस्पिनर (१८६ सामन्यात ५५७ बळी) भारताकडून संधी मिळणार नाही हे उमजून पुढे इंग्लंडमध्ये जाऊन ससेक्सच्या संघातून बरीच वर्षे खेळला. आपल्याकडे वेगावर गोलंदाज तर नव्हतेच, पण जे थोडेफार होते, त्यांना भारतात उत्तम फिरकी गोलंदाज आहेत म्हणून कधी संधीच मिळाली नाही. बरून बर्मन (५४ सामन्यात १४६ बळी), रणदेब बोस (९० सामन्यात ३१७ बळी – ह्याने एकंदर १०,७०८ चेंडू टाकले, पण त्यात एकही नो बॉलची नोंद नाही.) आणि इतरही अनेक वेगवान गोलंदाज आहेत. आपला सुरू नायक (६८ सामन्यात १३२ बळी) – सुनील गावसकरच्या मैत्रीचा टिळा लागल्याने – इंग्लंडचा विस्मरणीय (दुसरं काय म्हणणार?) असा दौरा करून आला. (कसोटी कारकीर्द – २ सामने, १९ धावा, २३१ धावा देऊन १ बळी).

आजही जेव्हा संघाची निवड होते, तेव्हा काही काही खेळाडूंची नावे बघून ‘का?’ असा प्रश्न उभा राहतो. चला, आज आपण अशा काही खेळाडूंचा संघ तयार करू, जे खरोखर गुणवान खेळाडू होते, पण त्यांना कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून खेळायची संधी नाही मिळाली. हां, आणि मुख्य गोष्ट म्हणजे हा संघ एका आदर्श कसोटी संघाचे सर्व निकष काटेकोरपणे लावून केलेला असेल. ह्या संघाबद्दल अनेकांची वेगळी मतं असू शकतात, मतभेद असू शकतात. काही क्रिकेटप्रेमींना तो पटेलही. तुम्ही एखाद्या खेळाडूबद्दल, तो गुणवान आहे, संधी मिळाली नाही अशी काही कारणं सांगूही शकाल, पण शेवटी त्या खेळाडूची आकडेवारी महत्त्वाची ठरते. गुणवत्ता अफाट असू दे, पण शेवटी धावा अथवा बळींची संख्या किती ह्यावर त्याचं स्थान ठरणार आहे. एक अगदी साधं उदाहरण घेऊ. सौरव गांगुली आणि विनोद कांबळी, दोघेही डावखुरे आक्रमक फलंदाज. कांबळी संघात असता तर गांगुली दिसलाच नसता , जगासमोर आलाच नसता असं म्हणणारे अनेकजण आहेत. (बहुतेक करून मुंबईकर – ज्यांना पद्माकर शिवलकर बिशनसिंग बेदीपेक्षा चांगला गोलंदाज होता असं वाटतं.) पण प्रत्यक्षात काय आहे? गांगुली खेळत राहिला, उत्तम कप्तान झाला, २००३च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत संघाला घेऊन गेला. कारकिर्दीचा कालावधी आणि आकडेवारी हेच सांगते की गांगुली निःसंशयपणे डावखुरा असून गुणात्मकदृष्ट्या उजवा होता. त्यामुळे माझ्या ह्या संघाची निवड करताना आकडेवारी आणि कारकिर्दीची वर्षे महत्त्वाची असणार आहेत. कदाचित कसोटी निवडीच्या वेळी त्यांचा फॉर्म हरवला असेल, पण एकूणच देशांतर्गत सामन्यांत त्यांनी वर्षानुवर्षे उत्तम कामगिरी केली असेल, नव्हे केली आहे. असो, आता आपण हा दुर्दैवी पण गुणवान भारतीय संघ कोणता आहे ते बघू.

संघ निवडताना काही निकष इथे पाळले गेले आहेत. आघाडीच्या जोडीमध्ये एक डावरा आणि दुसरा उजवा फलंदाज आहे, ज्यामुळे प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना दिशा, स्विंग आणि टप्पा ह्याबाबत वारंवार बदल करावा  लागेल, आणि त्यांना लय सापडणे अवघड जाईल. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा खेळाडू आक्रमक आणि प्रसंगी संयमी फलंदाजी करणारा असावा. त्यात तो अगदी माफक प्रमाणात गोलंदाज असेल तर सोन्याहून पिवळे. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर खेळणारे फलंदाज बचावात भक्कम असले पाहिजेत.शिवाय ते मोठी खेळी करणारे आणि संघ अडचणीत असेल तर खेळपट्टीवर वेळ काढून धावफलक हलता ठेवणारे असावेत. त्यांच्याकडे गुणवत्तेबरोबरच कणखरपणा असणे आवश्यक आहे. सहाव्या क्रमांकावर विकेट-कीपर असावा. त्याच्यावर एखाद-दुसरा झेल सोडण्याची आणि अर्धशतक काढण्याची जबाबदारी नसावी. पुढे सातव्या क्रमांकावर अष्टपैलू खेळाडू असावा (म्हणजे वेंकटराघवन नाही. त्याला अष्टपैलू समजण्याचा मूर्खपणा अनेक वर्षे चालू होता.) आणि सातव्या क्रमांकावर खेळणारा जर फिरकी अष्टपैलू असेल तर पुढे दोन किंवा तीन वेगवान गोलंदाज असावेत. तर असा असेल आपला दुर्दैवी परंतु गुणवान खेळाडूंचा संघ. ह्या संघातील कोणीही खेळाडू केवळ २-५ वर्षे खेळलेला नाहीये, तर अनेक वर्षे खेळून भरपूर धावा किंवा असंख्य बळी घेतलेला खेळाडू आहे. ह्या संघातील प्रत्येक फलंदाजाने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये किमान १४-१५ शतके ठोकलेली आहेत, आणि गोलंदाजांनी २००पेक्षा जास्त बळी घेतले आहेत. तर असा आहे हा संघ…

१. गगन खोडा – उजव्या हाताने फलंदाजी करणारा सलामीचा फलंदाज
फर्स्ट क्लास रेकॉर्ड
सामने – १३२
धावा – ८५१६
सरासरी – ३९.०६
शतके – २०
२. अमेय खुरासिया – डावखुरा आक्रमक सलामीचा फलंदाज.
फर्स्ट क्लास रेकॉर्ड
सामने – ११९
धावा – ७३०४
सरासरी – ४०.८० 
शतके – २१
३. श्रीधरन श्रीराम – भरपूर धावा आणि अनेक बळी असे ह्याचे वैशिष्ट्य म्हणता येईल. सध्याच्या ऑस्ट्रेलियन संघाचा फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक
फर्स्ट क्लास रेकॉर्ड
सामने – १३३
धावा – ८५३९
सरासरी – ५२.९९ 
शतके – ३२ 
बळी – ११५
४. अमोल मुजुमदार (कप्तान) – संघाचा कणा म्हणावा लागेल. प्रदीर्घ काळ खेळपट्टीवर टिकून राहण्याची क्षमता.
फर्स्ट क्लास रेकॉर्ड
सामने – १७१
धावा – १११६७ 
सरासरी – ४८.१३ 
शतके – ३०
५. भास्कर पिल्ले / मिलिंद गुंजाळ – संघाचे महत्वाचे फलंदाज. दोघांपैकी कोणीही संघात असावा (किंवा दोघेही)
फर्स्ट क्लास रेकॉर्ड
सामने – ९५
धावा – ५४४३ 
सरासरी – ५२.८४ 
 शतके – १८
फर्स्ट क्लास रेकॉर्ड
सामने – ८८
धावा – ५४२७
सरासरी – ४७.१९
  शतके – १४
६. दलजित सिंग / पंकज धर्मानी (यष्टीरक्षक) – चांगले यष्टीरक्षक. दोघेही बरीच वर्षे चांगलं क्रिकेट खेळले आहेत.
फर्स्ट क्लास रेकॉर्ड
सामने – ८७
धावा – ३९६४
सरासरी – ३२.७६
शतके – ७
झेल – १५७
यष्टिचीत – ६८/td>
फर्स्ट क्लास रेकॉर्ड
सामने – १४७
धावा – ९३१२
सरासरी – ५०.०६ 
शतके – २६
झेल – २६९
यष्टिचीत – २१
७. आशिष विन्स्टन झैदी – त्याच्या काळचा अत्यंत चांगला गोलंदाज. कमकुवत संघाकडून खेळल्यामुळे वाट्याला फारसे सामने आले नाहीत.
फर्स्ट क्लास रेकॉर्ड
सामने – ११०
बळी – ३७८
सरासरी – २७.७९
स्ट्राईक रेट  – ५७.६०
८. पांडुरंग साळगांवकर – खरं तर कोणत्याही संघात समावेश होईल असा खराखुरा वेगवान गोलंदाज.
फर्स्ट क्लास रेकॉर्ड
सामने – ६४
बळी – २१४
सरासरी – २६.७०
९. राजिंदर गोयल – डावखुरा फिरकी गोलंदाज. प्रदीर्घ कारकीर्द, आणि भरपूर बळी. वारंवार योग्यता सिद्ध करूनही निवड नाही. मी पद्माकर शिवलकरपेक्षा गोयलला पसंती देईन कारण शिवलकर कायम बलवान संघाकडून खेळले, आणि गोयल तुलनेने कमकुवत संघाकडून.
फर्स्ट क्लास रेकॉर्ड
सामने – १५७
बळी – ७५०
सरासरी – १८.५८  
स्ट्राईक रेट  – ५३.००
१०. सरकार तलवार – एक चांगला ऑफ स्पिनर. हरयाणाकडून जवळजवळ २० वर्षे खेळला.
फर्स्ट क्लास रेकॉर्ड
सामने – १०६
बळी – ३५७
सरासरी – २४.८८  
स्ट्राईक रेट  – ५७.६०
११. अनंतपद्मनाभन – उत्कृष्ट लेगब्रेक गोलंदाज. चंद्रशेखर  सारखा लेगब्रेक बॉलर, आणि इतर स्पिनर असताना त्याला संधी  मिळू शकली नाही.
फर्स्ट क्लास रेकॉर्ड
सामने – १०५
बळी – ३४४
सरासरी – २७.५४
स्ट्राईक रेट  – ६२.६०
१२. सुनील वॉल्सन – एक चांगला डावखुरा वेगवान गोलंदाज. १९८३च्या विश्वचषक संघात होता, तेव्हाही संघातून फिरला, कदाचित ह्या संघातदेखील फिरस्ता असेल.
फर्स्ट क्लास रेकॉर्ड
सामने – ७५
बळी – २१२
सरासरी – २५.३५
स्ट्राईक रेट  – ४६.९०

ह्याशिवाय ह्या संघात अजून काही खेळाडूंची वर्णी लागू शकते. प्रामुख्याने त्यात रमेश नागदेव (आघाडीचा डावखुरा आक्रमक फलंदाज, पुढे तो परदेशात निघून गेला), कंवलजीत सिंग (हैद्राबादचा ऑफ ब्रेक बोलर – ह्याने वयाच्या ४० आणि ४१व्या वर्षी स्थानिक क्रिकेटमध्ये प्रत्येकी १०० बळी मिळवले होते), देवेंद्र बुंदेला (मध्य प्रदेशचा अष्टपैलू खेळाडू – ह्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १००००पेक्षा जास्त धावा केल्या आहेत), सीतांशू कोटक (सौराष्ट्रकडून खेळणारा, आणि गोलंदाजांचा अंत पाहण्यासाठी प्रसिद्ध असलेला फलंदाज) ह्यांचा विचार केला  जाऊ शकतो.  तर असा हा दुर्दैवी परंतु गुणवान क्रिकेटपटूंचा संघ. ह्यातील प्रत्येक खेळाडू दुसऱ्या एखाद्या देशात जन्माला आला असता, तरीदेखील नक्की कसोटी सामने खेळला असता. ह्या यादीत काही नावे राहून गेली असण्याची शक्यता आहे. तबीयतदार तज्ज्ञ लोकांनी ती भरून काढावी.

भारत आणि २०२३ चा विश्वचषक

भारत आणि २०२३ चा विश्वचषक २०२३ चा एक दिवसीय सामन्यांचा वर्ल्ड कप जवळ येतोय. त्याला क्रिकेटमधल्या सर्वात
मोठ्या उत्सवांपैकी एक असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही. तसं म्हटलं तर वन डेचा वर्ल्ड कप ही ओरिजनल आषाढी एकादशी आहे. बाकी स्पर्धा  ह्या महिन्याला इतर एकादशा येतात तशा. क्रिकेटचा रसिक आषाढीच्या वारीची वाट बघत असतो. २०२३ चा वर्ल्ड कप भारतात आहे. भारत प्रथमच इतर उपखंडातल्या देशांशिवाय एकटा स्वतःच्या जिवावर वर्ल्ड कप घेत आहे. भारतातली खेळाची अमाप लोकप्रियता, प्रायोजकांची मुबलकता, स्टेडियम आणि इतर पायाभूत सुविधांची झालेली प्रगती हे बघता वर्ल्ड कपचे आयोजन यशस्वी होणार ह्यात काही शंका नाही.

खरा महत्त्वाचा प्रश्न आहे तो भारतीय संघाची रचना काय असेल आणि त्याची कामगिरी कशी होईल हा. टेनिसप्रमाणे क्रिकेटसुद्धा युवकांचा खेळ होऊ लागलाय. २७-२८ वर्षांच्या प्लेअरवर ज्येष्ठ खेळाडूचा शिक्का बसतोय. T20 मुळे खेळ अजून तरुण झालाय. अशा परिस्थितीत भारतीय संघाचा न्यूक्लियस ओव्हर थर्टी (ओ.टी.) असण्याची शक्यता आहे. रोहित, कोहली, राहुल, जडेजा, शमी, धवन हे सगळे खेळाडू क्रिकेटच्या सध्याच्या स्टॅंडर्डप्रमाणे तिशी पार केलेले ज्येष्ठ असणार. वय वाढल्यावर गड चढताना दम लागतो पण वर पोहचल्यावर जगाकडे वेगळ्या दृष्टीने बघता येतं, असं म्हणतात. जुनी वाईन जास्त मजा देते, जुने व्हायोलिन छान वाजते तसे. पण क्रिकेटसारख्या व्यावसायिक खेळात सर्व संघातले खेळाडू कौशल्याच्या बाबतीत जवळजवळ समान असतात. अशा वेळेस खेळाडू वेगळा ठरतो तो मनाच्या कणखरतेवर. क्रिकेटमध्ये अती स्पर्धेमूळे मानसिक स्वास्थ्य हरवून बसलेल्यांची यादी मोठी आहे. विराट कोहली, जोनाथन ट्रॉट, मार्कस ट्रेस्कॉथिक, मायकेल यार्डी, ग्लेन मॅक्सवेल, बेन स्टोक्स हे त्यातले काही सर्वांना माहीत असलेले खेळाडू. अनेक खेळाडूंनी त्यांना झालेला त्रास जाहीर केलेला नाही. ह्या स्पर्धेतही भारताला ह्या अति क्रिकेटचा सामना करावा लागू शकतो. ओव्हर थर्टी असलेल्या भारताच्या खेळाडूंना कोणत्या घटकांवर जास्त काम करावे लागणार आहे ते बघू.

  1. आत्मविश्वास : आत्मविश्वास जास्त असणारे खेळाडू अधिक कष्ट करतात, लवकर उद्विग्न
    होत नाहीत, लवकर हार मानत नाहीत. सकारात्मक स्वसंवाद आत्मविश्वास वाढवतो.
    आत्मविश्वास वाढवण्याकरता स्वतःच्या सर्वोत्तम इनिंग्स, स्पेल आठवणं, आनंदाचे क्षण
    आठवणं उपयुक्त ठरेल. आपण संघात महत्त्वाचे घटक आहोत हे स्वतःला बजावलं तर
    आत्मविश्वास वाढून वयाचा विसर पडेल.
  1. एकाग्रता : क्रिकेटमध्ये एकाग्रता टिकवून ठेवणं वयोमानानुसार अवघड जातं. कारण
    क्रिकेट हा स्टॉप-स्टार्ट खेळ आहे. दोन ओव्हर्समध्ये वेळ जातो, ड्रिंक्स ब्रेक, इनिंग्स ब्रेक
    ह्या सगळ्याशी जुळवून घेणं हळूहळू अवघड होतं. स्लेजिंगला सामोरं जाताना
    वयानुसार उद्विग्न होण्याची शक्यता अधिक असते.
  2. भावनेवर नियंत्रण : स्थितप्रज्ञता आणणं महत्त्वाचं असतं. चेंडू खेळायचा हुकल्यावर तो
    विसरून नवीन चेंडूवर चित्त एकाग्र करावं लागतं. संघाबरोबर मनोचिकित्सक असेल तर
    अल्बर्ट एलिसच्या विवेकनिष्ठ वागणुकीच्या थिअरीचा सराव खेळाडूंकडून करून घेता
    येईल. संघाचा मूड आणि खेळाडूंचा स्वतःचा मूड ह्यात नातं असतं. त्यामुळे ज्येष्ठ
    खेळाडूंनी संघ मिटिंगमध्ये जास्त बोलणं, स्वतःच्या सक्सेस स्टोरीज सांगणं, खेळकर
    प्रसंग शेअर करणं महत्त्वाचं.
  3. कोहलीची जबाबदारी : कोहली २०२३ मध्ये कर्णधार म्हणून असेल तर विरुद्ध संघ त्याला टार्गेट करणार. कोहलीने स्वतःच्या कामगिरीबरोबर संघ भावना वाढवण्यास प्रयत्न करावा.
  4. मनावर ताण येणाऱ्या गोष्टीत करिअर आणि कुटुंब यांचं योग्य संतुलन ठेवता न येणं, मीडिया आणि प्रायोजकांच्या मागण्या पूर्ण करणं, हे करताना कामगिरीत सातत्य टिकवणं, हवामान, खेळपट्ट्या, पंचांचे निर्णय ह्या सर्व गोष्टींचा वयोमानाप्रमाणे जास्त ताण सहन करावा लागतो. ह्यावर मात करण्याकरता मनाचा कणखरपणा लागतो. अशा परिस्थितीत भारताच्या संघात ज्येष्ठ आणि तरुण खेळाडूंचं योग्य मिश्रण असेल असं वाटतं. सलामीला के. एल. राहुल निश्चित वाटतो. त्याच्या जोडीला रोहित शर्मा असेल. शिखर धवन, पृथ्वी शॉ, देवदत्त पाडीकल हेदेखील चांगले  पर्याय असतीलच. तीन नंबर पोजिशनला सूर्यकुमार यादव येईल असं वाटतं. चार नंबरला  कोहली, पाचला श्रेयस अय्यर आणि सहाला हार्दिक पंड्या फिक्स वाटतात. हार्दिकच्या तंदुरुस्तीचा प्रश्न तोपर्यंत सुटलेला असेल असं मानायला हरकत नाही. सात नंबरला रिषभ पंत जागा टिकवेल असं वाटतं. चार बोलर्स घेताना पुन्हा जडेजा आणि कृणाल पंड्या यांच्यात स्पर्धा असेल. दीपक चहार आणि शार्दूल ठाकूर तोपर्यंत फॉर्म चांगला ठेवतील असं वाटतं. बुमराह तर ध्रुवताऱ्यासारखा अढळ झाला आहे, त्याला तोड नाही. उमेश, सिराज, शमी यांच्यापैकी कुणाला संधी मिळते तसेच रहस्यमय स्पिनर वरुण चक्रवर्ती बारात स्थान मिळवतो का, हे पाहावे लागेल. IPL मधील विविध खेळाडूंची कामगिरी लक्षात घेतली जाईल तसेच तोपर्यंत होणाऱ्या एक दिवसीय सामन्यांमधली कामगिरीदेखील पाहिली जाईल. तोपर्यंत अचानक कुणी चमकून गेला तर एखाददुसरा नवीन चेहरासुद्धा समोर येईल. बॅटिंगपेक्षा बोलिंगमध्ये काही नवीन नावं पुढे येण्याची शक्यता वाटते. बॅटिंगमध्ये पुढील वर्ष दीड वर्षात मोठे बदल संभवत नाहीत असं वाटतं. संघ निश्चित संतुलित असेल हे सांगायला नकोच. सर्व ज्येष्ठ खेळाडूंना वर्ल्ड कप जिंकायचाच असेल. सर्व ज्येष्ठ खेळाडू तेजस्वी प्रतिभेचे धनी आहेत. आरती प्रभू म्हणतात त्याप्रमाणे प्रतिभेच्या कळ्या हातात असतात. त्याला मनाच्या कणखरतेने फुलांमध्ये रूपांतरित करावं लागतं. वय झालं असलं तरी भारतीय खेळाडू वयात आल्यासारखे खेळतील ही अपेक्षा करू या.

संघनायकांच्या शाळा

संघनायकांची अशी वेगळी शाळा असते का? म्हणजे कुठल्याही सांघिक खेळातल्या मुख्य क्षमतेची शिकवणी देणारे असंख्य वर्ग, शाळा, महाविद्यालये सगळ्यांना ठाऊक आहेत. मात्र संघनायकीची प्रचलित शाळा शोधून सापडणे अवघड आहे. संघनायक हा जन्मावा लागतो असं क्रिकेटचा इतिहास सांगतो. मग संघातला प्रमुख क्षमता सगळ्यात जास्त असलेला खेळाडू चांगला संघनायक होऊ शकतो का? वादाचा मुद्दा आहे. इतिहासाच्या पानांवर वेगळ्याच नोंदी आहेत. माईक ब्रियरली तर उघड उघड बंड पुकारेल या वाक्याच्या निषेधार्थ. क्रिकेटमध्ये कर्णधाराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. माईक ब्रियरली, बराचसा ली जर्मोन, थोडाफार ग्रॅहम स्मिथ यांसारखी अपवादात्मक उदाहरणे सोडली तर आतापर्यंत संघातला ज्येष्ठ खेळाडू, ज्याची जागा संघात पक्की आहे असा खेळाडू कर्णधार होण्याची जास्त परंपरा आहे. मग खरं काय? मी फार लांब जाणार नाही पण माझ्या लहानपणापासून जेवढे क्रिकेट पाहिले, जेवढे कर्णधार बघितले त्यातून मला त्यांच्या वेगवेगळ्या आभासी शाळा जाणवल्या. त्या शाळांचा आणि विद्यार्थ्यांचा लेखाजोखा बघू या.

सुरुवात माझ्या आवडत्या अर्जुना रणतुंगापासून. अर्जुनाची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय असल्याने कदाचित त्याचे कर्णधार होणे नैसर्गिक असावे. मात्र त्या वारशाबरोबर कर्णधार म्हणून त्याने पचवलेले अपमान, पराजय ह्यांनी त्याला कणखर कर्णधार केले हे निश्चित. रणतुंगाच्या कर्णधारपदाची शाळा ही धूर्त, डावपेच शिकवणारी, सहकाऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं शिकवणारी, मैदानात आणि मैदानाबाहेर दोन्हीकडे कर्णधाराचा कस पाहणारी. आपल्या संघाचे कच्चे आणि पक्के दुवे माहिती असणे, ते मान्य करून आखणी करणे, मैदानाबाहेर पक्के दुवे कच्चे करण्याचे प्रतिस्पर्ध्याचे प्रयत्न हाणून पाडणे या सगळ्यासाठी जबरदस्त नेतृत्व गुण लागतात. माझ्या मते अर्जुना ह्या सगळ्यात जास्त तरबेज असलेला कर्णधार होता. अॅलन बॉर्डर हा ह्या शाळेचा अजून एक हुशार विद्यार्थी. तळात गेलेला संघ आपल्या नेतृत्वगुणांनी वर काढणे हे ह्या शाळेचे ब्रीदवाक्य. मात्र बॉर्डर ज्या देशाचे प्रतिनिधित्व करतो तिथली माती क्रिकेटसाठी सुपीक आहे त्यामुळे अर्जुनाइतके सोसणे सुदैवाने त्याच्या नशिबात नव्हते. डावपेचांबाबत बोलायचे झाले तर १९९६चा वर्ल्ड कप अर्जुनाने त्याच्या मनात आधीच जिंकला होता. जयसूर्या, कालूने दिल्लीत भारताविरुद्ध जो धिंगाणा घातला त्यावरून पंधरा ओव्हर्समध्ये श्रीलंका काय करू शकते याकडे चाणाक्ष कर्णधारांचे लक्ष असणारच हे अर्जुना जाणून होता. त्याने तिसऱ्या क्रमांकावर असांका गुरुसिंघे आणि चौथ्यावर अरविंदा, पाचव्यावर कधी महानामा कधी स्वतः अशी अभेद्य रचना केली. एवढे करून जर सगळे पडले तर हसन तिलकरत्ने खालच्या धर्मसेना आणि वासला घेऊन किल्ला लढवेलच. उपखंडातल्या विश्वचषकात फिरकीसाठी मुरली हा हुकमी एक्का आहे, त्यामुळे धर्मसेना आणि वासच्या जोडीला सुरुवातीला धावा रोखणारा सजीवा डिसिल्वा अशा जोड्या त्याने तयार केल्या. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याने madmax अरविंदाचा मॅच विनर अरविंदा केला. कलकत्त्यात अरविंदा त्याच्या आयुष्यातील एक संस्मरणीय खेळी खेळून गेला पण अर्जुनाने जाणले होते की अंतिम सामन्यात गाठ त्याच्याच शाळेच्या मार्क टेलरशी आहे. मार्क टेलर हा माझ्या मते स्टीव्ह वाॅपेक्षा गुणवान कर्णधार होता. पुण्यात केनियाकडून अपमान झाल्यावर वेस्ट इंडीजने फिनिक्स बाणा दाखवत उपांत्य फेरी गाठली होती. १५/४ वरून स्टुअर्ट लाॅ आणि बेवन ऑस्ट्रेलियाला २०७पर्यंत घेऊन गेले. चंदरपॉल आणि लाराने सामना हातात आणून दिला होता. टेलरने लारा आणि चंदरपॉलसाठी लावलेले सापळे यशस्वी ठरल्यावर त्याच्या एक्क्याने एकहाती सामना फिरवला. वेस्ट इंडीज अंतिम फेरीत आले असते तर कदाचित अर्जुनाला अजून डोके वापरावे लागले असते कारण रिची रिचर्डसन आणि ब्रायन लारा पुण्यातल्या अपमानाने पेटून उठले होते. धूर्त टेलर विरुद्ध चाणाक्ष अर्जुना यांच्या झुंजीत अरविंदाने अप्रतिम शतकी खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग पूर्ण होईपर्यंत अर्जुना स्वतः अरविंदाबरोबर होता, मग अर्जुनाच्या हातात विश्वकप येणे अटळ होते. टेलर आणि रणतुंगा हे दोघेही धूर्त कर्णधार.

A person in a white suit

Description automatically generated with low confidence

धूर्त, चाणाक्ष, आत्मविश्वासाने ठासून भरलेला असा या गटातला पुढचा कर्णधार हॅन्सी क्रोनिए. मला कधी कधी प्रश्न पडतो की या माणसाला काय गरज होती त्या दुष्टचक्रात पडण्याची. त्याने मनात आणले असते तर तो द. आफ्रिकेचा पंतप्रधान झाला असता इतका प्रभावशाली कर्णधार, व्यक्ती होता हॅन्सी क्रोनिए. सचिन तेंडुलकर ज्या गोलंदाजांना वचकून खेळायचा त्यातला एक होता क्रोनिए. सचिनला त्याने बऱ्याच वेळा अडचणीत टाकणारे चेंडू टाकले आहेत. आफ्रिकेच्या पुनरागमनानंतर क्रोनिएने जुन्या -नव्यांना घेऊन संघबांधणी केली आणि आफ्रिकेच्या संघाला फार वर नेले. क्रोनिएचा त्या सगळ्या प्रकरणातला समावेश ही क्रिकेटमधली अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अन्यथा आज त्याच्या कर्णधारपदाचे गोडवे नक्कीच गेले असते. या यादीत अजून एक नाव घालायचे असेल तर मी मार्टिन क्रोचे घालेन. ९२चा विश्वकप हा क्रोच्या कल्पनांचा विश्वकप म्हणावा लागेल. छोटी मैदाने, ३० यार्ड सर्कल, मार्क ग्रेटबॅचची डावखुरी फलंदाजी आणि दीपक पटेलचा नव्या चेंडूवरचा ऑफस्पिन यावर बरेच जण फसले आणि न्यूझीलंड उपांत्य सामन्यात धडकली.

१९९२च्या अंतिम सामन्याचा दरवाजा न्यूझीलंडसाठी उघडत असताना शेवटच्या क्षणी धाडकन बंद झाला एका कर्णधारामुळेच. इम्रान खान हा स्वतः पुढे राहून आक्रमक धोरण शिकवणाऱ्या शाळेचा विद्यार्थी. प्रतिस्पर्ध्याच्या किनाऱ्यावर पाऊल टाकल्यावर आपल्या जहाजाचे दोर कापून टाकणे हा इम्रानच्या शाळेत शिकवला जाणारा पहिला धडा. कपिल देव, सौरव गांगुली, ब्रेंडन मॅकलम आणि थोडाफार विराट कोहली ही नावे ह्या शाळेच्या हजेरी पुस्तकात सापडतील. इम्रानने निवड समितीला न जुमानता इंझमाम नावाच्या एका वादळाला थेट गल्लीतून पाकिस्तानच्या संघात आणले होते. ते वादळ उपांत्य सामन्यात घोंघावलं आणि क्रोची स्वप्नं उद्ध्वस्त झाली. इम्रानने स्वतःच्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाने क्रिकेटच्या सगळ्यात सृजनशील कर्णधाराचा पराभव केला. हव्या त्या खेळाडूच्या मागे उभे राहणे, अडचणीच्या वेळी स्वतः पुढे येऊन संघाला विजयी करणे, वेळ पडल्यास प्रचलित पद्धती मोडून गुणवत्तेची पारख स्वतः करणे हे इम्रान, कपिल, सौरव ची शाळा शिकवते.

कपिल ने १९८३ च्या विश्वचषकात टर्नब्रिज वेल्सच्या त्या एका खेळीने आपण कुठूनही जिंकू शकतो हे दाखवून दिले. तीच गोष्ट १९९९ला वाॅने केली. मात्र स्टीव्ह वाॅला माझ्या मते नेहमीच चांगला संघ मिळाला त्यामुळे मला तो थोडा सुदैवी कर्णधार वाटतो. मात्र अडचणीच्या वेळी संघाला खड्ड्यातून बाहेर काढणे वाॅने जितक्या वेळेला केलंय तितक्या वेळा कुणीही केलं नसेल. मॅकलम हा तसा फार मोठा फलंदाज नव्हता पण कर्णधार असताना त्याने न्यूझीलंडला जिंकायला शिकवलं ते त्याच्या आक्रमक स्वभावामुळे आणि सहकाऱ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करण्याच्या विलक्षण हातोटीमुळे. सौरव गांगुलीने मैदानाबाहेरही कर्णधाराला बरीच मेहनत करावी लागते हे दाखवून दिले. २००३च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सौरवने कर्णधार म्हणून केलेली तयारी हा अभ्यासाचा विषय होऊ शकेल. ऑस्ट्रेलियात जायचे तर जिंकायलाच, मग तिथली मैदाने कशी आहेत हे बघण्यासाठी तो एक महिना आधीच तिथे पोचला. त्यानंतर हेडन, लँगर चारच्या धावगतीने धावा काढतात तशा आपल्याकडे कोण करू शकेल याचा विचार करता करता त्याला सेहवाग सापडला. ब्रिस्बेनला भारत अडचणीत असताना सौरवने शानदार शतक झळकवत ऑस्ट्रेलियाला आम्ही आलोयची वर्दी दिली. कुंबळेच्या निवडीसाठी त्याने हट्ट धरला आणि कुंबळेने सिडनीत पोत्याने विकेट्स काढल्या. झहीर, हरभजन, युवराज आणि वीरू ह्यांच्यामागे तो खंबीरपणे उभा राहिला.

Hansie Cronje

महेंद्रसिह पानसिंग धोनीने संघनायकांची एक वेगळी शाळा बांधली. ह्याचा बराचसा अभ्यासक्रम हा रणतुंगा आणि मार्क टेलरच्या शाळेशी संलग्न असणारा. एन्ड गेमचा प्रभावी वापर हे नवीन प्रकरण धोनीने ह्या अभ्यासक्रमात टाकले. मात्र हे फक्त पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटपुरतेच मर्यादित आहे. मर्यादित षटकातील क्रिकेटच्या मर्यादा ह्याच्याइतक्या कुणी ओळखल्या नसतील. आधी ५० षटके, मग २० षटके यांचा पट त्याने अनेक वेळा आपल्या तल्लख मेंदूत मांडला. त्यात बुद्धिबळाच्या चाली रचल्या. शत्रूच्या एका चालीसाठी ह्याने ३ प्लॅन्स तयार केले त्यातल्या तिसऱ्या चालीचा पत्ता कोणालाच नसायचा. जवळजवळ एक दशक तो हा बुद्धिबळाचा खेळ यशस्वी करत राहिला. यष्टींच्या पाठीमागे सतत वास्तव्य असल्यामुळे त्याने फिरकी गोलंदाजांना दिशा देण्याचे अजून एक महत्त्वाचे योगदान दिले. ह्याचा प्रभाव इतका होता की तो मागे नसेल तर फिरकी गोलंदाज अस्वस्थ व्हायला लागले. त्याच्या घरी बर्फाची फॅक्टरी असावी. प्रत्येक सामन्यात बर्फाची एक लादी हा डोक्यावर घेऊन खेळला. विजयाचा उन्माद नाही की पराभवात ऊर बडवणे नाही. विजय, पराजय हा खेळाचा भाग आहे आणि दोन्हीही तितक्याच साधेपणाने स्वीकारले पाहिजेत, हा धडा त्याच्या शाळेने शिकवला. निकालाचा विचार न करता ज्यावर नियंत्रण आहे त्यांवर नियंत्रण ठेवण्यावर भर देणे, हादेखील धोनीच्या शाळेच्या पुस्तकातला महत्त्वाचा धडा. एकदा योजना ठरवली की ती अमलात आणायची. सामना शेवटच्या षटकात गेला आणि तुम्ही गोलंदाज आहात तर जिथे चेंडू टाकायचे ठरले आहे तिथेच तो टाकण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे अर्धी जबाबदारी पूर्ण होते. हा साधासुधा विचार. भलेभले दडपणाखाली कोसळतात पण धोनीने अनेक वेळा सामान्य गोलंदाजांकडून यशस्वी कामगिरी करून घेतलीय ती ह्याच साध्या विचाराने.

Mahendra Singh Dhoni

विराट कोहली हा थोडाफार इम्रान, सौरवच्या शाळेचा विद्यार्थी आहे. मात्र मैदानावरची त्याची आक्रमकता ही कदाचित एकमेवाद्वितीय असावी. वैयक्तिक आयुष्यात एकदा आरशात पाहिल्यावर त्याला फिटनेसचे महत्त्व समजले. तिथून पुढे विराट कोहली अंतर्बाह्य बदलला आणि खेळाडू म्हणून एका वेगळ्या उंचीवर पोहोचला. ह्याच अनुभवाचा आधार घेत कर्णधार झाल्यावर त्याने फिटनेसचा मंत्र सगळ्या टीमला म्हणायला लावला आणि यो-यो चाचणीसारख्या कस पाहणाऱ्या चाचण्या त्याने सर्व खेळाडूंना उत्तीर्ण व्हायला लावल्या. भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणाच्या दर्जात आमूलाग्र बदल घडवण्याचे बरेचसे श्रेय विराटच्या या आग्रहाला जाते. सौरवने जसा फलंदाजी करताना धावगती वाढवण्याचा चंग बांधला तसा विराटने वेगवान गोलंदाजांना भक्कम पाठिंबा दिला. भारताच्या कसोटीतल्या परदेशी विजयाचा पाया ह्याच वेगवान गोलंदाजांनी पोत्याने घेतलेल्या बळींनी रचला ज्याचे बरेच श्रेय विराटला द्यायला हवे. पण जसा धोनी हा फक्त पांढऱ्या क्रिकेटचा राजा आहे तसा विराट हा कदाचित फक्त कसोटी क्रिकेटमधला यशस्वी कर्णधार आहे. त्याचा आक्रमकपणा त्याला जिथे शांत राहण्याची गरज असते तिथे मदत करत नाही म्हणून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधली अनिश्चितता जशी धोनी नियंत्रित करतो तशी कोहलीला करता येत नाही, हे कटू असले तरी सत्य आहे. कोहलीच्या नेतृत्वातील अजून एक महत्त्वाचा साईड इफेक्ट म्हणजे तो कायम अत्त्युच्च शिखरावर चढायची तयारी करतो. इतर सहकारी कदाचित छोट्या टेकड्याच मनात ठेवत असतात. त्यामुळे कोहलीच्या बरोबर धावताना इतरांना धाप लागते किंवा त्याची भीती वाटते. हीच गोष्ट सचिन यशस्वी कर्णधार न होण्यामागे असू शकेल. सगळ्या सहकाऱ्यांना त्यांच्या पातळीवर येऊन बरोबर घेऊन जायचा धडा शिकणेही संघनायकाला आवश्यक आहे. कोहली आणि सचिनसारखे कर्णधार सगळ्यांना स्वतःच्या मागे यायला लावतात आणि मग जरा गडबड होते.

A person holding a trophy

Description automatically generated with low confidence
Virat Kohli

कर्णधार म्हणून काहीच कौशल्ये न दाखवताही यशस्वी असा शिक्का बसलेले कोणी आहे का? पटकन एकच नाव समोर येते, ते म्हणजे मोहम्मद अझहरुद्दीन. १९९८ला अझहरने १०पैकी ७ चषक उचलले आणि त्या सातही चषकांत सचिनने धावांचा रतीब ओतला. अझहर फलंदाज म्हणून आणि क्षेत्ररक्षक म्हणून खूप वरच्या दर्जाच्या खेळाडू होता पण कर्णधार म्हणून त्याचा विशेष प्रभाव कधी जाणवला नाही. त्याच्या बहराच्या काळात स्वतः दिलेले फलंदाजीचे योगदान सोडले आणि स्लिपमधले ते अविस्मरणीय झेल सोडले तर अजून काही उल्लेखनीय स्मरत नाही. 

केवळ उत्तम नेतृत्वगुण हे कौशल्य तुम्हाला देशाचा कर्णधार करू शकते का? माईक ब्रियरली ‘हो’ म्हणेल. “द आर्ट ऑफ कॅप्टन्सी” या त्याच्या पुस्तकात तो याच गोष्टीचा सविस्तर ऊहापोह करतो. इंग्लंडमधल्या कौंटी क्रिकेटच्या रचनात्मक चौकटीत कर्णधाराचे अनन्यसाधारण महत्त्व तो विशद करतो. बॉब विलिसला एका ठरावीक एन्डकडून गोलंदाजी करायची होती पण त्या वेळी ते कॅप्टन म्हणून त्याला योग्य वाटले नाही मग त्याने तोच एन्ड चालू ठेवला आणि थोड्या वेळाने विलिसला लय आणि विकेट्स दोन्ही मिळाल्या. संघ निवडताना कनिष्ठ खेळाडू, ज्येष्ठ खेळाडू यांचे मिश्रण कसे असावे, कनिष्ठ खेळाडूंना पुढच्या मोसमात तयार करण्यासाठी नेमके काय करायला हवे, संघातील सर्व खेळाडूंची आर्थिक गरज क्लब कशी भागवतो आहे, अशा बारीकसारीक मुद्द्यांचा विचार माईकला महत्त्वाचा वाटतो. परिपूर्ण कर्णधार म्हणून इतिहासात ज्याची नोंद अग्रक्रमाने आहे असा माईक ब्रियरली, वेळप्रसंगी संघातल्या प्रमुख खेळाडूने ऐन वेळी बाहेरच्या तज्ज्ञाचे ऐकून आपल्या तंत्रात बदल करू नये, असेही मत आपल्या पुस्तकात आग्रहाने मांडतो. इयान बोथमसारखा हिरा अपयशी ठरणे आणि ब्रियरलीकडे पुन्हा इंग्लंडचे कर्णधारपद येणे ही ८०च्या दशकातली एक महत्त्वाची घटना ठरली ती ब्रियरलीच्या याच असाधारण कौशल्यामुळे. मानसशास्त्राचा अभ्यासक असणारा हा विरळा कर्णधार आजच्या T20 च्या काळातही संघनायकांच्या मूलभूत कौशल्यासाठी अभ्यासाचा विषय ठरू शकेल. ली जर्मोनची कर्णधार पदावरची निवड ही न्यूझीलंड क्रिकेटच्या हितासाठी केलेली योजना होती. कँटरबरीचा यशस्वी कर्णधार एवढाच शिक्का त्याला न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघाचे कर्णधारपद देऊन गेला. १९९६ विश्वचषकात त्याने चांगली फलंदाजीही केली. ब्रियरली आणि जर्मोन ह्या दोघांतले आणखी एक साम्य म्हणजे ते दोघेही यष्टिरक्षक होते. ह्या दोघांपेक्षा फलंदाज म्हणून अधिक गुणवान असणारा पण संघात इतर ज्येष्ठ खेळाडू असतानाही तरुणपणी कर्णधारपदाची माळ गळ्यात घालणारा एक यशस्वी कर्णधार म्हणजे द. आफ्रिकेचा ग्रॅहम स्मिथ. स्मिथने समकालीन खेळाडूंबरोबर ज्येष्ठांना योग्य तऱ्हेने हाताळले.

आक्रमकपणा, धूर्तपणा, राजकारणी असणे, हुकूमशाही स्वभाव असणे, मैदानावर प्रचंड ऊर्जेने वावर करणे, मैदानाबाहेर माध्यमात जोरदार पोपटपंची करणे अशी नेतृत्वाची वेगवेगळी कौशल्ये असणारी अनेक उदाहरणे आपण पाहिली. एक विद्यालय असेही आहे की ज्यात शिकलेले कर्णधार विलक्षण सज्जन खेळाडू आहेत. ते हरू नयेत असं त्यांच्या प्रतिस्पर्ध्यालाही वाटावे इतके सज्जन. काही नावे अग्रक्रमाने समोर येतात. पहिला केन विल्यमसन आणि दुसरा आपला अजिंक्य रहाणे. २०१९च्या उपांत्य फेरीत भारताला हरवल्यावर विल्यमसनने एक प्रेमळ आवाहन केले, ज्यात तो म्हणाला, “क्रिकेटवर सर्वात जास्त प्रेम करणाऱ्या भारतीयांनो, अंतिम सामन्यात माझ्या संघाला प्रोत्साहन द्या.” अंतिम सामन्यात न्यूझीलंड जिंकावे म्हणून अनेक कोटी भारतीयांनी देव पाण्यात ठेवले. अंतिम सामना ज्या पद्धतीने संपला तिथे दुसऱ्या कुठल्याही कर्णधाराची कल्पना करा, तुम्हाला वेगळाच चेहरा दिसला असता. केन मात्र तेच स्मितहास्य करत, “मी जिंकलोही नाही आणि हरलोही नाही, कमाल आहे!“ असं म्हणत होता. टीव्हीला चिकटलेले तमाम भारतीयच काय, जगभरातील सारेच क्रिकेटप्रेमी (ज्यात कदाचित थोडे इंग्रजही असतील) त्या दिवशी हळहळले. ३६वर ऑल आऊट झाल्यावर त्याने सूत्रे हातात घेतली तेव्हापासून ते टाळ्यांच्या कडकडाटात त्याच्या लेकीला कडेवर घेऊन त्याच्या सोसायटीतील भव्य स्वागत स्वीकारतानाही तो एखाद्या सज्जन माणसासारखा स्मितहास्य करत होता. अफगाणिस्तान भारताबरोबर पहिला कसोटी खेळला आणि हरला. जल्लोष चालू असताना याने अफगाणिस्तानच्या कर्णधारालाही फोटोत येण्यासाठी बोलावले. अजिंक्य रहाणे हा विल्यमसनच्या वर्गात असावा कदाचित. तिसरा विल्यमसनच्याच देशाचा स्टीफन फ्लेमिंग. अनेक वर्ष न्यूझीलंड क्रिकेटची धुरा सांभाळून कांगारूंना काँटे की टक्कर देणारा फ्लेमिंग हा असाच सज्जन कर्णधार. ह्यांच्या शाळेचा अजून एक विद्यार्थी आहे ज्याचे नाव घेतले नाही तर हा लेख पूर्ण होणार नाही.

पाकिस्तानसारख्या देशाचे कर्णधारपद म्हणजे काटेरी मुकुट. तिथे इम्रानसारखा आक्रमक कर्णधारच यशस्वी होऊ शकतो हा समज खोटा ठरवला इंझमाम उल हक या सज्जन खेळाडूने. अनेक वर्षं केवळ आपल्या बॅटने सगळ्या प्रश्नांना उत्तर देत, आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेत, शांत राहून इंझीने पाकिस्तानकडून चांगली कामगिरी करून घेतली. ह्या मंडळींचा प्रमुख भर हा अभ्यासावर, स्वतःच्या योगदानावर, खेळाडूंना विश्वासात घेऊन त्यांना सतत प्रोत्साहित करण्यावर, मैदानावर शांत राहून, कोणावरही न ओरडता प्रतिस्पर्ध्यावर दडपण कसे ठेवता येईल याकडे राहिला आहे. हे युद्ध नव्हे तर हा खेळ आहे. कोणीतरी हरतो म्हणून कोणीतरी जिंकतो असा मानवतावादी विचार कायम ठेवणारी यांची शाळा आहे. मात्र आपल्या जबाबदारीची पूर्ण जाणीव ठेवून, शंभर टक्के खेळावर फोकस करणे ते विसरत नाहीत. “क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ आहे,” ह्याचा पुरावा प्रत्येक पिढीत टिकून राहावा म्हणून कोणीतरी ह्या शाळेत प्रवेश घेतोच. ह्या प्रकारच्या कर्णधारांनाही यश वश होतं, हे सिद्ध झालंय त्यामुळे आता अभ्यासक्रमात तेच जुने धडे न देता हा नवीन धडाही शिकवायला हरकत नाही. त्यामुळे क्रिकेट समृद्ध व्हायला ह्या शाळेची नक्की मदत होईल.

– सांबप्रसाद कुवळेकर

क्रिकेट विश्वातील विविध करिअर संधी

एक काळ असा होता, की आमच्या लहानपणी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता. तो जमानाच तसा होता. टीव्ही हे मनोरंजनाचे एकमेव साधन होते. दूरदर्शनवर चालणाऱ्या मालिका, चित्रपट, गीते, साप्ताहिकी ह्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये एक आगळावेगळा कार्यक्रम, हवाहवासा असायचा, तो म्हणजे क्रिकेटचा सामना. क्रिकेटच्या मॅचेस बघताना अख्खा देश दिवसभर टीव्हीसमोर बसून असायचा. १९८३च्या विश्वचषकानंतर क्रिकेटची लोकप्रियता अजूनच वाढली. जणू संपूर्ण पिढीचे क्रिकेट, अगदी क्रिकेट प्रशिक्षणसुद्धा टीव्हीवरच झाले. सरता सरता १९९५-९६चा काळ आला. सर्वसाधारण क्रिकेट आता एकदम exclusive आणि professional व्हायला सुरुवात झाली होती. कपिल – सचिन – गांगुली – द्रविड – सेहवाग – धोनी – कोहली ह्या प्रत्येकाने तयार केलेल्या पिढीनुसार तंत्रज्ञानात, क्रिकेट कळण्यात आणि समजून घेण्यातसुद्धा आमूलाग्र बदल होत गेले.

A person pushing a wheelbarrow

Description automatically generated


“और ये हवा में गयी गेंद… और… और… और… छोड दिया कॅच!” हे असे काहीसे समालोचन (commentary) होत असे. त्या वेळी वाटायचं की मैदानावर बहुतेक खेळाडू, अम्पायर्स आणि समालोचक एवढीच माणसं काम करतात की काय. परदेशी चॅनेल्स आल्यानंतर मैदानावर आणि बाहेरपण ह्या क्षेत्राशी निगडित मंडळी काय काय कामे करतात, हे कळू लागले. मोठमोठाले पुरस्कर्ते, IPL सारख्या स्पर्धेतून पुढे येणाऱ्या मोठमोठ्या रकमा, कोटीच्या कोटी उड्डाणे हे सगळं ऐकून सर्व सामन्यांमध्ये क्रिकेटच्या खेळाव्यतिरिक्त एक वेगळं आर्थिक कुतूहल निर्माण झालं. त्यामुळे इथेसुद्धा काहीतरी वेगळं करिअर निवडता येईल हे आजच्या विद्यार्थ्यांच्या लक्षात येऊ लागलं आहे. आजचा विद्यार्थी स्वतःच्या अंगचे कलागुण आणि कौशल्याच्या अनुषंगाने ह्यात काही संधी निर्माण होत आहेत का हे शोधू पाहतोय. खरं सांगायचं तर, क्रिकेट ह्या प्रोफेशनमध्ये आता फक्त खेळाडू म्हणूनच नाही तर इतर अनेक प्रकारे संधी उपलब्ध आहेत.

ढोबळ मानाने ह्याचे वर्गीकरण क्रिकेट खेळणे आणि न खेळणे असे करता येईल. क्रिकेट खेळणारे खेळाडू आपल्या नजरेसमोर कायमच असतात. त्यांना अनेक प्रकारे मानधन, भत्ते, पुरस्कर्ते नक्की मिळतात. अगदी क्लब दर्जाच्या खेळाडूंपासून ते IPL किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडूदेखील आता बऱ्यापैकी सधन असतो. अर्थात ह्यासाठी तुम्ही चांगले क्रिकेट खेळणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही जोपर्यंत खेळाडू म्हणून कामगिरी करत असता तोपर्यंत हे सर्वच प्रायोजक तुमच्यासाठी झटत असतात. आता अगदी साध्या क्रिकेटपटूलादेखील विविध बँका, मल्टिनॅशनल कंपन्या, रेल्वे, एअर इंडिया आणि अशा अनेक ठिकाणी उत्तम नोकऱ्या आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. ह्याशिवाय खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर, स्वतः एखादा क्रिकेट क्लब सुरू करणे, अकॅडमी सुरू करणे, क्रिकेट प्रशिक्षण, स्तंभलेखन, समालोचन अशा अनेक वित्तीय संधी क्रिकेट हा खेळ आपल्यासाठी घेऊन येतो. अनेक नावाजलेले क्रिकेटपटू अम्पायर्स (पंच) म्हणून काम करतानासुद्धा आपल्याला पाहायला मिळतात.

A picture containing grass, outdoor

Description automatically generated

क्रिकेटमध्ये प्रत्यक्ष न खेळता इतर अनेक गोष्टींमध्ये करिअर करता येते. ह्यापैकी पुढील काही गोष्टींचा घेतलेला हा मागोवा.

१. ग्राऊंड्समन – ग्राऊंड्समन ही व्यक्ती खेळपट्टी आणि ग्राउंड खेळण्यासाठी योग्य आहे ना हे निश्चित करते. विशिष्ट माती, गवत ह्याची शास्त्रीय सांगड घालून खेळपट्टी आणि मैदान बनवले जाते. ही निश्चितच एक वेगळी कला आहे. पिच क्युरेटर किंवा ग्राऊंड्समन ह्या एक्सपर्ट्सना क्रिकेट क्षेत्रात नक्कीच खूप संधी आहे.

२. संख्याशास्त्रज्ञ (Statistician) – ह्या विद्यार्थ्यांची आकडेमोड चांगली आहे अशा मुलांसाठी हा चांगला पर्याय असू शकतो. क्रिकेट खेळाची माहिती, वाचन तसेच तपशिलांची माहिती असेल ही मंडळी क्रिकेटमध्ये संख्याशास्त्रज्ञ म्हणून नक्की काम करू शकतात. ही माहिती प्रत्येक संघाला तर हवीच असते, पण त्याचबरोबर टीव्ही प्रक्षेपणामध्येसुद्धा ही माहिती वापरली जाते. एकूणच ह्या मंडळींना क्रिकेट प्रक्षेपण क्षेत्रात नक्कीच मागणी आहे.

३. पंच (Umpires) – राज्य क्रिकेट संघटनेशी संपर्क साधून पंच परीक्षेसाठी अर्ज करता येतो. ह्या संघटनांतर्फे राज्य पातळीवर आणि BCCI तर्फे देश पातळीवर लेखी आणि प्रत्यक्ष (practical) परीक्षा घेतली जाते. वरच्या पातळीवर पंच म्हणून काम करणाऱ्यासाठी चांगले वेतनदेखील मिळते. ह्यासाठी क्रिकेटच्या नियमांचा अभ्यास असणे आवश्यक आहे. BCCI तर्फे Level १ आणि Level २ अशा परीक्षा घेतल्या जातात. पंच म्हणून काम करण्यासाठी खेळ खेळता यावा, अशी काही अट येथे असत नाही.

४. क्रिकेट पत्रकार – आता अनेक खेळांमध्ये, विशेषतः क्रिकेटमध्ये पत्रकारांना मोठे वलय प्राप्त झाले आहे. इंटरनेटच्या उगमापासून अनेकविध माध्यमांमधून नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असतात.

५. फिजिओ – ही मंडळी प्रामुख्याने खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर काम करतात.

६. न्यूट्रीशियन – ही मंडळी खेळाडूंचा आहार, त्यांना आवश्यक असणारे घटक, आणि त्यांच्या एकूणच आहार विषयक गोष्टींवर काम करतात.

७. क्रिकेट किट तयार करणे – क्रिकेट खेळाचे साहित्य बनवणे हा एक चांगला व्यापार असू शकतो. ह्याद्वारे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात.

८. ऑपरेशन मॅनेजमेंट – ही मंडळी क्रिकेट संघाचे किंवा स्पर्धांचे नियोजक असतात. लॉजिस्टिक्सपासून सुरक्षेपर्यंत सर्व गोष्टींची जबाबदारी त्यांचीच असते. खेळाडूंची हॉटेल व्यवस्था, प्रवासाची सोय, मनोरंजन, पत्रकार परिषद, बक्षीस वितरण, आदि सर्व गोष्टींसाठी ही मंडळी झटत असतात.

९. मुलाखतकार – क्रिकेटपटूंची टीव्ही / रेडिओ माध्यमातून खुसखुशीत मुलाखत घेणे व प्रक्षेपित करणे हे ह्यांचे काम असते. सध्याच्या मीडियाच्या जमान्यात हा एक चांगला पर्याय आहे.

१०. संगणक तज्ज्ञ – ही मंडळी क्रिकेट खेळातदेखील अनेक प्रकारे योगदान देऊ शकतात. सध्या ऑनलाईन खेळांची चलती आहे. ह्या ऑनलाईन दुनियेत काम करण्यासाठी अॅनिमेटर, सॉफ्टवेअर इंजिनियर, कोडर्स अशा सर्वच क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.

A picture containing computer, computer, person, working

Description automatically generated

ही वर असलेली यादी अगदीच प्रातिनिधिक आहे. एकूणच क्रिकेट ह्या क्षेत्रातदेखील रोजगाराच्या अनेक वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. क्रिकेटर म्हणून खेळणे हे प्रत्येकाचेच स्वप्न असू शकते, पण प्रत्येकजण ते पूर्ण करेलच असे नाही. परंतु ह्या वेगवेगळ्या पर्यायांची तपासणी आणि योग्य पर्यायाची निवड करून आपण नक्कीच क्रिकेटमध्ये आपले योगदान देऊ शकतो.
अॅडव्होकेट शैलेश कुलकर्णी
फोंडा, गोवा
दूरध्वनी – +९१ ७८७५४४५३९९

भारत आणि २०२३ चा विश्वचषक

२०२३ चा एक दिवसीय सामन्यांचा वर्ल्ड कप जवळ येतोय. त्याला क्रिकेटमधल्या सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही. तसं म्हटलं तर वन डेचा वर्ल्ड कप ही ओरिजनल आषाढी एकादशी आहे. बाकी स्पर्धा  ह्या महिन्याला इतर एकादशा येतात तशा. क्रिकेटचा रसिक आषाढीच्या वारीची वाट बघत असतो.

A person in a blue shirt

Description automatically generated with low confidence

२०२३ चा वर्ल्ड कप भारतात आहे. भारत प्रथमच इतर उपखंडातल्या देशांशिवाय एकटा स्वतःच्या जिवावर वर्ल्ड कप घेत आहे. भारतातली खेळाची अमाप लोकप्रियता, प्रायोजकांची मुबलकता, स्टेडियम आणि इतर पायाभूत सुविधांची झालेली प्रगती हे बघता वर्ल्ड कपचे आयोजन यशस्वी होणार ह्यात काही शंका नाही.

खरा महत्त्वाचा प्रश्न आहे तो भारतीय संघाची रचना काय असेल आणि त्याची कामगिरी कशी होईल हा. टेनिसप्रमाणे क्रिकेटसुद्धा युवकांचा खेळ होऊ लागलाय. २७-२८ वर्षांच्या प्लेअरवर ज्येष्ठ खेळाडूचा शिक्का बसतोय. T20 मुळे खेळ अजून तरुण झालाय. अशा परिस्थितीत भारतीय संघाचा न्यूक्लियस ओव्हर थर्टी (ओ.टी.) असण्याची शक्यता आहे. रोहित, कोहली, राहुल, जडेजा, शमी, धवन हे सगळे खेळाडू क्रिकेटच्या सध्याच्या स्टॅंडर्डप्रमाणे तिशी पार केलेले ज्येष्ठ असणार. वय वाढल्यावर गड चढताना दम लागतो पण वर पोहचल्यावर जगाकडे वेगळ्या दृष्टीने बघता येतं, असं म्हणतात. जुनी वाईन जास्त मजा देते, जुने व्हायोलिन छान वाजते तसे. पण क्रिकेटसारख्या व्यावसायिक खेळात सर्व संघातले खेळाडू कौशल्याच्या बाबतीत जवळजवळ समान असतात. अशा वेळेस खेळाडू वेगळा ठरतो तो मनाच्या कणखरतेवर. क्रिकेटमध्ये अती स्पर्धेमूळे मानसिक स्वास्थ्य हरवून बसलेल्यांची यादी मोठी आहे. विराट कोहली, जोनाथन ट्रॉट, मार्कस ट्रेस्कॉथिक, मायकेल यार्डी, ग्लेन मॅक्सवेल, बेन स्टोक्स हे त्यातले काही सर्वांना माहीत असलेले खेळाडू. अनेक खेळाडूंनी त्यांना झालेला त्रास जाहीर केलेला नाही. ह्या स्पर्धेतही भारताला ह्या अति क्रिकेटचा सामना करावा लागू शकतो. ओव्हर थर्टी असलेल्या भारताच्या खेळाडूंना कोणत्या घटकांवर जास्त काम करावे लागणार आहे ते बघू.

  1. आत्मविश्वास : आत्मविश्वास जास्त असणारे खेळाडू अधिक कष्ट करतात, लवकर उद्विग्न होत नाहीत, लवकर हार मानत नाहीत. सकारात्मक स्वसंवाद आत्मविश्वास वाढवतो. आत्मविश्वास वाढवण्याकरता स्वतःच्या सर्वोत्तम इनिंग्स, स्पेल आठवणं, आनंदाचे क्षण आठवणं उपयुक्त ठरेल. आपण संघात महत्त्वाचे घटक आहोत हे स्वतःला बजावलं तर आत्मविश्वास वाढून वयाचा विसर पडेल.
  2. एकाग्रता : क्रिकेटमध्ये एकाग्रता टिकवून ठेवणं वयोमानानुसार अवघड जातं. कारण क्रिकेट हा स्टॉप-स्टार्ट खेळ आहे. दोन ओव्हर्समध्ये वेळ जातो, ड्रिंक्स ब्रेक, इनिंग्स ब्रेक ह्या सगळ्याशी जुळवून घेणं हळूहळू अवघड होतं. स्लेजिंगला सामोरं जाताना वयानुसार उद्विग्न होण्याची शक्यता अधिक असते.
  3. भावनेवर नियंत्रण : स्थितप्रज्ञता आणणं महत्त्वाचं असतं. चेंडू खेळायचा हुकल्यावर तो विसरून नवीन चेंडूवर चित्त एकाग्र करावं लागतं. संघाबरोबर मनोचिकित्सक असेल तर अल्बर्ट एलिसच्या विवेकनिष्ठ वागणुकीच्या थिअरीचा सराव खेळाडूंकडून करून घेता येईल. संघाचा मूड आणि खेळाडूंचा स्वतःचा मूड ह्यात नातं असतं. त्यामुळे ज्येष्ठ खेळाडूंनी संघ मिटिंगमध्ये जास्त बोलणं, स्वतःच्या सक्सेस स्टोरीज सांगणं, खेळकर प्रसंग शेअर करणं महत्त्वाचं.

A person holding a bat

Description automatically generated with low confidence

  1. कोहलीची जबाबदारी : कोहली २०२३ मध्ये कर्णधार म्हणून असेल तर विरुद्ध संघ त्याला टार्गेट करणार. कोहलीने स्वतःच्या कामगिरीबरोबर संघ भावना वाढवण्यास प्रयत्न करावा.
  2. मनावर ताण येणाऱ्या गोष्टीत करिअर आणि कुटुंब यांचं योग्य संतुलन ठेवता न येणं, मीडिया आणि प्रायोजकांच्या मागण्या पूर्ण करणं, हे करताना कामगिरीत सातत्य टिकवणं, हवामान, खेळपट्ट्या, पंचांचे निर्णय ह्या सर्व गोष्टींचा वयोमानाप्रमाणे जास्त ताण सहन करावा लागतो. ह्यावर मात करण्याकरता मनाचा कणखरपणा लागतो.

अशा परिस्थितीत भारताच्या संघात ज्येष्ठ आणि तरुण खेळाडूंचं योग्य मिश्रण असेल असं वाटतं. सलामीला के. एल. राहुल निश्चित वाटतो. त्याच्या जोडीला रोहित शर्मा असेल. शिखर धवन, पृथ्वी शॉ, देवदत्त पाडीकल हेदेखील चांगले  पर्याय असतीलच. तीन नंबर पोजिशनला सूर्यकुमार यादव येईल असं वाटतं. चार नंबरला  कोहली, पाचला श्रेयस अय्यर आणि सहाला हार्दिक पंड्या फिक्स वाटतात. हार्दिकच्या तंदुरुस्तीचा प्रश्न तोपर्यंत सुटलेला असेल असं मानायला हरकत नाही. सात नंबरला रिषभ पंत जागा टिकवेल असं वाटतं. चार बोलर्स घेताना पुन्हा जडेजा आणि कृणाल पंड्या यांच्यात स्पर्धा असेल. दीपक चहार आणि शार्दूल ठाकूर तोपर्यंत फॉर्म चांगला ठेवतील असं वाटतं. बुमराह तर ध्रुवताऱ्यासारखा अढळ झाला आहे, त्याला तोड नाही. उमेश, सिराज, शमी यांच्यापैकी कुणाला संधी मिळते तसेच रहस्यमय स्पिनर वरुण चक्रवर्ती बारात स्थान मिळवतो का, हे पाहावे लागेल. IPL मधील विविध खेळाडूंची कामगिरी लक्षात घेतली जाईल तसेच तोपर्यंत होणाऱ्या एक दिवसीय सामन्यांमधली कामगिरीदेखील पाहिली जाईल. तोपर्यंत अचानक कुणी चमकून गेला तर एखाददुसरा नवीन चेहरासुद्धा समोर येईल. बॅटिंगपेक्षा बोलिंगमध्ये काही नवीन नावं पुढे येण्याची शक्यता वाटते. बॅटिंगमध्ये पुढील वर्ष दीड वर्षात मोठे बदल संभवत नाहीत असं वाटतं. संघ निश्चित संतुलित असेल हे सांगायला नकोच.

A picture containing person, outdoor, player, baseball

Description automatically generated

सर्व ज्येष्ठ खेळाडूंना वर्ल्ड कप जिंकायचाच असेल. सर्व ज्येष्ठ खेळाडू तेजस्वी प्रतिभेचे धनी आहेत. आरती प्रभू म्हणतात त्याप्रमाणे प्रतिभेच्या कळ्या हातात असतात. त्याला मनाच्या कणखरतेने फुलांमध्ये रूपांतरित करावं लागतं. वय झालं असलं तरी भारतीय खेळाडू वयात आल्यासारखे खेळतील ही अपेक्षा करूया.

– रवि पत्की.

बडा ख्याल

खेळ सुरू व्हायच्या आधीची हुरहूर. बघणाऱ्यांच्या आणि खेळणाऱ्यांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारची. अगदी काहीच वेळात सुरुवात होणार आहे. सगळं काही सज्ज आहे. गोलंदाज, फलंदाज, आणि क्षेत्ररक्षक ह्या सगळ्यांनी आपापल्या मनातला खेळ थांबवलाय आणि ते आता मैदानावर आहेत. जिंकण्यासाठी कसं काय काय करायचं ह्यावर केलेला विचार मैदानावर येऊन तपासायला ते तयार झालेत. हा खेळ आता एक नाही, दोन नाही, चांगला पाच दिवस चालणार आहे. विरोधी संघानं लावलेल्या सापळ्यांतून सहीसलामत निसटत नव्या सापळ्याच्या दिशेनं हळूहळू जात सामना आपल्याच बाजूनं कसा झुकलेला राहील ह्यासाठी खेळाडू प्रयत्नांचे डोंगर हलवून इकडून तिकडे करायला सिद्ध झालेत. हा क्रिकेटचा बडा ख्याल आहे. हा कसोटी सामना आहे!  

क्रिकेटच्या ह्या बडा ख्यालात आपला खेळाचा विचार शांतपणे, एखाद्या विद्वानासारखा मांडत मांडत शेवटाकडे नेणारे अगदी मोजके संघ. ह्यातल्याच दोन संघातल्या विचारपूर्वक मांडल्या गेलेल्या एका कसोटीची ही कहाणी आहे. ती कहाणी आपली आणि त्यांची, ती कहाणी भारताची आणि तितकीच ऑस्ट्रेलियाचीही. हे साल आहे २००१. बरोबर वीस वर्षं होऊन गेलेली आहेत. गोष्ट जरी भूतकाळातली असली तरी कसोटीच्या बाबतीत ती कायम वर्तमानातच असल्यासारखी आठवली गेली होती, आहे आणि असेल, कारण बडा ख्याल कधीही म्हातारा होत नाही! 

A picture containing grass, person, baseball, player

Description automatically generated

गेल्या काही दशकांत भारताचा संघ भारताच्या मैदानांवर जवळपास अजिंक्य असतो. ते वारवांर सिद्ध झालेलं आहे. त्या वेळी मात्र ह्या अनभिषिक्त साम्राज्याला आव्हान द्यायला ऑस्ट्रेलिया संघ आलेला होता. हे आव्हान तगडं होतं कारण त्या आधी ह्या संघानं सलग १५ कसोटी सामने जिंकलेले होते. वेस्ट इंडीजला ५-० असं हरवून १९८४पासून अबाधित असलेला सलग ११ कसोटी जिंकण्याचा त्यांचाच विक्रम त्यांनी मोडीत काढला होता. ऑस्ट्रेलियानं त्यांच्या खेळाचा ‘रियाज’ सिद्ध करून दाखवला होता आणि आपल्या काळजीत भर पडली. झालंसुद्धा तसंच. आल्या आल्या ऑस्ट्रेलियानं द तेंडुलकर, द द्रविड, द लक्ष्मण आणि द गांगुली असलेल्या भारतीय संघाला पहिल्या कसोटीत दहा गडी राखून सहज हरवलं. सलग जिंकलेल्या एकूण कसोट्यांची संख्या आता झाली तब्बल सोळा! हा म्हणजे भारताच्या घरच्या साम्राज्याला लागलेला मोठा सुरुंग होता. मालिकेच्या पराभवाचं गडद काळं सावट घेऊन कोलकत्याच्या ईडन गार्डन्समध्ये सुरू झाला दुसरा कसोटी सामना.

परिस्थिती सगळ्या बाजूनं आपल्यावर मात करायला टपून बसली आहे हे आधी आपल्याला कुठं माहीत असतं? तिच्या, परिस्थितीच्या कह्यात हळूहळू जायला लागलो की लक्षात येतं की, अरे असं आहे तर. मग त्यातून सुरक्षित बाहेर कसं पडायचं ह्याचा विचार सुरू होतो. त्यासाठी अधिष्ठान हवं, खेळाचा, जगण्याचा खरा विचार हवा. हा सगळा विचार कसाला लागावा, अशी परिस्थिती ऑस्ट्रेलिया संघानं भारतीय संघापुढे निर्माण करून ठेवली. जवळजवळ दोनशेच्या आसपास धावा कुटल्यानंतरही त्यांचा एकच खेळाडू बाद झाला होता. १ बाद १९३वर रुंद खांद्यांचा खंदा हेडन पाय गाडून उभा होता आणि चारही दिशांकडून धावा मिळवत होता. त्यानंतर मात्र भारताला संधीचं छोटंसं दार किलकिलं झालं आणि भारतानं आपला पाय त्या छोट्याशा फटीतून भक्कम आत सरकवला. पुढच्या चाळीसेक धावांत तीन गडी अंतराअंतरानं बाद झाले. फलंदाजांना नाचवणारा हरभजन ते दार धाडकन उघडून टाकण्यासाठी तयार झाला होता. धावसंख्या ४ बाद २५२ होती आणि पाँटिंग बाद झाला, त्यापाठोपाठ आलेला गिलख्रिस्ट पुढच्याच चेंडूवर एलबीडब्ल्यू झाला आणि त्याच्या पुढच्याच चेंडूला शेन वॉर्न! हरभजननं कसोटीत दुर्मिळ असलेली हॅटट्रिक साधली होती. ७ बाद २५२वर संधीचं दार सताड उघडं झालं होतं आणि आपल्याला चटकन त्यातून बाहेर पडायचं होतं. पण जगणं आणि खेळणं इतकं सोपं थोडंच असतं? दाराच्या पलीकडे त्यांचा एक खंदा सेनापती उभा होता. स्टीव वॉनं गिलेस्पी नावाच्या आपल्या चिवट पहारेकऱ्याला दारासमोर उभं केलं आणि आपल्या भक्कम बॅटनं ते उघडलेलं संधीचं दार पुन्हा आपल्या नाकासमोर लावून टाकलं. आपल्याच जखमा सहन करत शेवटी जेव्हा आपण ऑस्ट्रेलियाचे सगळे फलंदाज बाद केले झाले तेव्हा धावफलक ४४५ ही संख्या दाखवत होता. हरभजननं ७ मोहरे गारद केले होते पण ११० धावा करून स्टीव वॉनं करायचं ते नुकसान करून ठेवलं होतं. 

A picture containing text, person, person, athletic game

Description automatically generated

ही संख्या आपल्या दणकट असलेल्या मधल्या फळीला अगदीच अशक्य होती असं नाही. सलामीची जोडी किती चांगली सुरुवात करते ह्यावर सगळं अवलंबून होतं. आपल्याला कसलीही सुरुवात करताना असंच वाटतं की हे आपल्याला जमू शकतं. आशा ही एक मोठी भावना आहे, ती भल्याभल्यांना सुटत नाही. म्हणून रमेश आणि दास ह्या दोघांनाही आपण प्रत्येकी शंभरशंभर धावा करून निम्मी आघाडी तर आपल्याआपल्यातच संपवू असं वाटलं असायची शक्यता नाकारता येत नाही. ह्याचा अर्थ ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज सहिष्णू होते असा होत नाही. त्यांनी तोफखाना सुरू केला आणि रमेश शून्यावर उडाला! त्यानंतर थोड्या थोड्या अंतरानं फलंदाज येऊन हजेरी लावून जात होते. एका बाजूला लक्ष्मण शांतपणे त्याच्या लयीत खेळत होता, पण भारतीय संघाच्या नावेला भलं मोठं भोक पडलं होतं, पाणी आत शिरत होतं, सगळा हलकल्लोळ माजला होता. पराभवाच्या भोवऱ्याकडे हळूहळू सरकत निघालो होतो आपण. तो आपल्याला आता लगेच गिळणार की काही वेळानंतर, एवढाच प्रश्न शिल्लक राहिला होता. 

A picture containing person, grass, sport, person

Description automatically generated

लक्ष्मणनं बाकी उपाय संपल्यावर फटकेबाजी केली आणि ५९ धावा करून बाद झाला. अजिंक्य, बलाढ्य आणि चिरडून टाकणाऱ्या अमर्याद सत्तेचा सम्राट स्टीव वॉ एखाद्या राजाला शोभेल असा सावकाश पुढे आला आणि एक हात पुढे करून म्हणाला, ‘प्लीज फॉलो ऑन!’ सलग सतराव्या विजयाचे पडघम आधीच त्याच्या मनात वाजायला सुरुवात झाली होती. कितीही मोठे फलंदाज असले तरी तब्बल तीन दिवस, अगदी तीन नाही तरी किमान दोन दिवस पाय रोवून उभं रहाणं केवळ अशक्य होतं. 

त्या दुसऱ्या दिवसाच्या जे त्यांच्या आज्ञेचा मुकाट्याने स्वीकार करण्यापलीकडे आपल्याला काहीही करता येण्याजोगं नव्हतं. फॉलो ऑन मिळाला होता. आता ह्या वेळी काय वेगळं घडणार होतं? सगळ्यांच्या आशाआकांक्षा आपल्या मधल्या फळीवर रोखल्या गेल्या होत्या. ते काय करतील हाच एक प्रश्न. काही घडलं तर तिथंच. ‘किमान ड्रॉ, अनिर्णित तरी करा सामना’ अशी माफक अपेक्षा तमाम प्रेक्षकांच्या मनात. सगळीकडे पडझड होत असताना किडूकमिडूक तरी शिल्लक राहावं म्हणून आपण नाही का प्रयत्न करत? तसंच होतं ते. पराभव नको, कुठल्याही परिस्थितीत नको. नियतीच्या मनात असेल तेच होईल, म्हणून आपली दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. नाबाद ५२ धावा फलकावर लागल्या आणि तीन फलंदाज त्याच्या पुढच्या साधारण साठेक धावांत बाद झाले. धावफलक होता ३ बाद ११५. ज्यानं थांबावं, काहीतरी चमत्कार घडवून दाखवावा असा तेंडुलकरसुद्धा १० धावा करून परत पावली निघाला. मागच्याही डावात तेवढ्याच धावा! प्रेक्षकांची मनं ह्या उमद्या खेळाडूच्या खेळण्यावर अक्षरशः ओवाळून टाकली जायची. तोच आता मान खाली घालून परत निघालेला. 

ह्या वेळी लक्ष्मण वरच्या क्रमांकावर आला असल्यानं तो आधीपासून खेळपट्टीवर जमून होता. नव्यानं आलेला गांगुली त्याला साथ द्यायला लागला आणि तेंडुलकरचा धक्का जरा सावरल्यासारखा वाटला. ऑस्ट्रेलिया थांबायला तयार नाही आणि आपण त्यांच्या धारदार चढाईला पूर्ण शक्तीनिशी रोखत आहोत हे चित्र होतं. अखेर गांगुली ४८वर पडला आणि त्यानंतर आलेल्या द्रविडच्या साथीत खेळत लक्ष्मणनं एक चोरटी धाव घेऊन आपलं शतक पूर्ण केलं. आपल्या झुंजीला नवं बळ आलेलं. सामोरं जायचं असेल पराभवाला तर कडवी झुंज दिल्याशिवाय बॅट्स कशा टाकाव्यात? शक्य असेल ते सगळं करण्यासाठी पूर्ण झटायला हवं. झटूयात तर. एका वेळी एक चेंडू. फक्त पावलापुरता विचार. पुढचं पुढे. तिसरा दिवस ४ बाद २५२वर संपला. 

तिसऱ्या दिवसानंतरची रात्र मात्र इतक्या लवकर संपणार नव्हती. ती रात्र खरोखर वैऱ्याची होती! आपल्या शेवटच्या दोन भक्कम फलंदाजांना पेचात टाकून बाहेरचा रस्ता दाखवायला उत्सुक विरोधी संघ आपले पाश उद्या आवळणार, सापळे लावणार, डावपेच बदलणार हे नक्की. मग आपली भिंत खरंच खचणार का? माहीत नाही. चौथा दिवस लवकरात लवकर उगवावा. खेळ सुरू व्हावा आणि जे व्हायचं असेल ते होऊन जावं. कारण वाट पाहाणं सहन होत नाही.  रात्रीचा अंधार गडद आहे. त्याला प्रकाशाची एक किनार लाभावी आणि आणि सगळं उजळून जावं. 

आधी होऊन गेलेल्या साऱ्या अप्रतिम भारतीय कसोटी खेळाडूंची पुण्याई पाठीशी बांधून व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि राहुल द्रविड खेळपट्टीवर उतरले. त्यांच्या वर्षानुवर्षांच्या मेहनतीचा कस पाहणारा हा दिवस होता. त्यांना आता दुसरं काही दिसणं शक्य नव्हतं. त्यांना फक्त दिसत होता समोर टाकला जाणारा एक चेंडू. त्याव्यतिरिक्त काहीही नाही. मॅग्रा, गिलेस्पी, कॅस्प्रोविच आणि फिरकीसम्राट वॉर्न आपल्या गोलंदाजीची सगळी यादगारी ओतायला लागले. आलटून पालटून वार होऊ लागले. त्यांचा विचार असा की, दोन जणांच्या अभेद्य तटबंदीला एकच भगदाड पाडलं की विजय आपला! नंतर येणारे बाकीचे लवकरात लवकर गिळता येतील. फक्त ह्यातला एक जण पडायला हवा. पण आपले शिलेदार लढत राहिले. शांत डोक्यानं आपल्यावर असलेली आघाडी कमी करून शून्यावर आणली. आता नवीन सुरुवात. जणू पहिल्या धावेपासून सुरुवात. 

A group of men in white uniforms

Description automatically generated with low confidence

आईनस्टाईनच्या रिलेटीविटीच्या नियमानुसार दिवस पुढं सरकायला लागला. गिलेस्पीला एका पाठोपाठ चार चौके मारले गेले की वाटायचं वेळ पुढे पळतोय. ही काय दुपार होऊन आता काही वेळात संपतोय खेळ. एखादं पायचीतचं जोरदार अपील झालं की काळजाचा ठोका चुकायचा आणि पुढचा वेळ अजगरासारखा संथपणे पुढे जायला लागायचा. आता काय होणार? एखादा फटका मागे स्लिपमध्ये गेला की वाटायचं संपला खेळ! पण तसं काही झालं नाही. हा ३००चा टप्पा, हा ४००चा, असं करत गडी लढत राहिले. हरले नाहीत, थकले नाहीत, बसले नाहीत, फक्त लढत राहिले. 

अखेरीस लक्ष्मणनं आपल्या २०० धावा पूर्ण केल्या आणि सगळं स्टेडीयम आनंदानं उसळलं. विरोधी संघाचे खेळाडू थक्क होऊन लक्ष्मणचं टाळ्या वाजवत अभिनंदन करत असताना त्यानं नव्यानं गार्ड घेतलाही होता. अजून काहीही संपलेलं नव्हतं. ते खेळत राहिले आणि काही वेळानंतर द्रविडनंही आपलं शतक साजरं केलं. ह्या दोघांचा खेळ म्हणजे एकाग्रता, जिद्द आणि तंत्राचा एक आदर्श नमुना होता. खेळानं त्यांच्याकडे फेकलेलं आव्हान त्यांनी पेललं होतं. ऑस्ट्रेलिया संघ इतका नामोहरम झाला होता की त्यांनी अॅडम गिलख्रिस्ट आणि कप्तान स्टीव वॉ असे दोघं सोडून तब्बल नऊ गोलंदाज वापरले. गेला बाजार स्लेटर आणि लँगरसुद्धा येऊन एकदोन षटकं टाकून गेले पण काही फरक पडला नाही. लक्ष्मणनं गावसकरांचा २३६चा विक्रम पार केला आणि तो शांतपणे त्याच्या वाटेनं पुढं निघाला. लक्ष्मण आणि द्रविड हे बहाद्दर चक्क दोन दिवस खेळत राहिले आणि आघाडी एकेका धावेनं वाढवत राहिले! 

दिवस पाचवा आणि कुणीतरी येऊन वाचवा असा धावा ऑस्ट्रेलियाचा संघ करत होता कारण लक्ष्मण २८१वर, तर १६७वर द्रविड खेळत होता. धावसंख्या होती ४ बाद ६०८ आणि आपली आघाडी चांगली घसघशीत ३३४ची झाली होती. ऑस्ट्रेलियाच्या प्रार्थनेला फळ आलं आणि अखेर लक्ष्मण बाद झाला. थोड्याच वेळात १८० धावा करून द्रविडही धावबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाच्या जखमांवर मीठ चोळत त्या आणखी खोलवर जाव्यात म्हणून कप्तान गांगुलीनं डाव चालू ठेवण्याचा निर्णय घेतला! शेवटी काही अजून बळी देऊन ३८३ धावांची आघाडी असताना त्यानं ७ बाद ६५७वर डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाचं लक्ष्य होतं ३८४.

एका दिवसाहून कमी वेळात हे लक्ष्य गाठता येणं अशक्य होतं. ऑस्ट्रेलियाला सामना अनिर्णित ठेवण्यासाठी प्रयत्न करता आला असता. पण हे करण्यासाठी त्यांची मानसिकता कणखर असणं गरजेचं होतं. आपण फॉलो ऑन दिल्यावर एवढं प्रचंड लक्ष्य समोर येईल ह्याची अजिबात कल्पना नसलेला तो संघ गांगरून गेलेला स्पष्ट दिसत होता. कसोटीच्या त्या अनभिषिक्त सम्राटाला एक हादरा बसला होता. पाय लटपटायला लागले होते. आता फक्त एक धक्का आणि विजय आपला! 

A group of men in white uniforms

Description automatically generated with low confidence

हा धक्का द्यायला पुन्हा सरसावला हरभजन. पत्त्याचा बंगला कोसळावा तशी ऑस्ट्रेलियाची फलंदाजी धाडधाड कोसळली. हरभजननं सहा बळी घेतले आणि स्टेडीयम प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं! एकूण २१२ धावांत ऑस्ट्रेलिया संघाची फलंदाजी गुंडाळली गेली. एका साम्राज्याची सद्दी आपण आपल्या मातीत संपवली होती. बडा ख्यालातला हा द्रुतगतीचा टप्पा आपण एका उन्मनी अवस्थेत नेऊन संपवला होता. हा सामना कोट्यवधी क्रिकेट रसिक प्रेक्षकांच्या मनात कायमचा कोरला गेला होता. 

वीस वर्षं उलटली तरी ह्या सामन्यातलं काव्य काही संपत नाही. आणि गंमतीची गोष्ट बघा की, फलंदाजी करून त्यातही द्रविडचे कष्ट संपले नाहीत. २ बाद १०६ अशी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या असताना नयन मोंगियाला हरभजनचा उसळलेला चेंडू नाकावर लागला आणि त्यानं मैदान सोडलं. द्रविडनं पॅड्स बांधले आणि दिवसभर पुन्हा राबला! ह्याच वेळी अजून एक काव्यात्म न्याय घडत होता. दोन्ही डावांत दहा दहा धावा केलेला तेंडुलकर एखाददुसरं षटक टाकायचं म्हणून आला आणि चक्क तीन महत्त्वाचे बळी टिपून गेला! ह्या सामन्यानंतर ऑस्ट्रेलिया अजूनच गर्तेत गेला आणि मालिकाही गमावून बसला.

क्रिकेट खेळाचा पाच दिवसांचा हा डाव जगण्याच्या एका मिनिएचर मॉडेलसारखा आहे. प्रचंड भावनिक आणि शारीरिक चढउतार, आनंद, दुःख, पुन्हा आनंद, अखेरचा प्रयत्न आणि शेवट गोड, पण फक्त एकासाठी! जगण्याचा सारा संघर्ष फक्त ह्या एका सामन्यात एकवटलेला आहे असं नेहमी वाटून जावं इतका हा सामना हिरिरीनं, तीव्रतेनं खेळला गेला. आणि ज्या आखाड्यात १७१ धावांत ऑस्ट्रेलियानं आपल्याला धोबीपछाड देत पहिल्या डावात आपटलं नेमक्या तेवढ्याच १७१ धावांनी आपण त्यांना हरवलं! 

कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला एक अविस्मरणीय असा हा बडा ख्याल!

दिनेश लाड – मुंबईचे क्रिकेटवेडे गुरु

मुंबई क्रिकेट हे एक वेगळंच रसायन आहे. गेली अनेक वर्षे मुंबईने आपल्याला एकापेक्षा एक उत्तम खेळाडू दिले आहेत. आणि ह्या रत्नांना जोपासणारे, वाढवणारे, त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारे काही जवाहीर पण मुंबईचेच. आज भारतीय क्रिकेटमध्ये रमाकांत आचरेकर सरांचं नाव मोठा आदराने घेतलं जातं. सरांनी अनेक खेळाडू भारतासाठी दिले आहेत. त्यांचं खेळाडूंवरील प्रेम, त्यांच्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी, कायमच त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची मनोवृत्ती हे सगळंच आश्चर्यचकीत करणारं आहे. आचरेकर सरांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचाच एक शिष्य आज मुंबईसाठी आणि भारतासाठी देखील अनेक गुणवान खेळाडूंना मार्गदर्शन करतो आहे. आज त्यांची २ मुलं भारतीय संघाचा अविभाज्य भाग आहेत. ह्या दोन्ही खेळाडूंनी आपल्या कामगिरीच्या जोरावर भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. ही दोन मुलं म्हणजे रोहित शर्मा आणि शार्दूल ठाकूर, आणि त्यांच्या लहानपणी त्यांना घडवणारे, मोलाचं मार्गदर्शन करणारे त्यांचे गुरु म्हणजे श्री. दिनेश लाड. क्रिककथाच्या निमित्ताने दिनेश लाड सरांशी केलेली ही बातचीत. 

प्रश्न: सर, नमस्कार. आपण तुमच्या प्रशिक्षक म्हणून भूमिकेबद्दल बोलणारच आहोत. पण सगळ्यात आधी आम्हाला तुमच्याबद्दल काही जाणून घ्यायचं आहे. तुमचं बालपण, तुमचं खेळाडू म्हणून असलेलं योगदान ह्या बद्दल काही सांगा. 

उत्तर: मी मुंबईचा. माहीम मध्ये वाढलो. अगदी सध्या गरीब घरातला मुलगा. क्रिकेट खेळावं अशी परिस्थिती नव्हती, पण क्रिकेटची आवड मात्र खूप होती. साध्या टेनिस बॉल वर क्रिकेट खेळत असे. पण त्यामध्येही चमक होती. मी त्यावेळी मामा कडे राहत असे, मामाकडे लहानाचा मोठा झालो. माझ्या आईचा देखील माझ्या क्रिकेट खेळण्याला खूप पाठिंबा होता .. आज मी जे काय आहे ते केवळ आईमुळे त्याच सुमारास माझी भेट आचरेकर सरांशी झाली. ही गोष्ट आहे १९७७ च्या आसपासची. माझ्याच एका निकटवर्तीयाने मला सरांकडे नेलं होतं. सरांनी माझा खेळ पाहिला आणि दुसऱ्याच दिवशीपासून नेट्सला यायला सांगितलं. आता इथे खरी मजा होती. माझ्याकडे क्रिकेट खेळण्यासाठी योग्य असे कपडे पण नव्हते. आणि ह्याचं उत्तर पण सरांनीच दिलं. त्यांचे क्रिकेटचे कपडे मला दिले, ते अल्टर करून घ्यायला सांगितले. आणि असा माझा सरांकडे अभ्यास सुरु झाला. पुढे जवळ जवळ ४-५ वर्षे मी सरांकडे क्रिकेटचे धडे गिरवत होतो. क्लब लेव्हलच्या अनेक मॅचेस त्यावेळी गाजवल्या. पुढे १९८१-८२ च्या सुमारास भारतीय रेल्वेमध्ये नोकरीला लागलो. पण क्लब लेव्हलच्या पलिकडे खेळाडू म्हणून नाही जाऊ शकलो. एवढं टॅलेंट नक्की होतं की मुंबई रणजी टीम साठी नक्की खेळू शकलो असतो, पण परिस्थिती नव्हती. घरासाठी नौकरी करणं आवश्यक होतं. त्या थोड्या काळात पण आचरेकर सरांचे खूप संस्कार माझ्यावर आहेत. सरांचं इतकं प्रेम होतं, ते मला स्कूटरवर घ्यायला यायचे. मुंबईमध्ये अनेक ग्राऊंड्सवर घेऊन जायचे. खेळण्यासाठी कायम प्रोत्साहन द्यायचे. आज मी खेळाडू म्हणून नाही पण क्रिकेट कोच म्हणून ओळखला जातो आहे त्यामध्ये पण आचरेकर सरांचे संस्कार, त्यांचा मोठा हातभार आहे हे नक्की. 


प्रश्न: पण मग ह्या सगळ्यामध्ये क्रिकेट प्रशिक्षणाकडे कसे वळलात? 

उत्तर: निव्वळ अपघाताने. माझी रेल्वेमधली नौकरी सुरूच होती. एका बाजूला जमेल तसं क्रिकेट पण सुरु होतं. एकदा मला एका मित्राने – – नितीन परुळेकरने उन्हाळ्याच्या सुट्टीमधल्या क्रिकेट प्रशिक्षण वर्गासाठी विचारलं. गोरेगावच्या एका क्लबला उन्हाळी वर्गासाठी दीड महिना क्रिकेट प्रशिक्षक हवा होता. मी सुरुवातीला नाहीच म्हणालो होतो, पण नंतर वाटलं की करून बघू, एक-दीड महिन्याचा तर प्रश्न आहे. १९९२ ची गोष्ट आहे ही. त्या उन्हाळी सुट्टीमध्ये क्रिकेट प्रशिक्षण सुरु झालं, नंतर त्याच क्लबने प्रशिक्षणासाठी विचारलं, आणि क्रिकेट कोच म्हणून सुरुवात झाली. पुढे मला त्यात मजा पण येत होती आणि आनंद तर नक्कीच होता. सगळ्यात मुख्य म्हणजे माझी क्रिकेटची नाळ अजून घट्ट होत होती. नंतर ३-४ वर्षांनी बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल कडून विचारणा झाली. आणि तेंव्हापासून शाळेबरोबर क्रिकेट कोचिंग सुरूच आहे. शाळेसाठी प्रशिक्षण करणं हा पण चांगला अनुभव आहे. ह्या मुलांना घडवणं ह्यात मला जास्त आनंद मिळतो. शाळेचे मुख्य श्री. योगेश पटेल ह्यांनी पण खूप सहकार्य केलं. व्यक्तिशः माझ्यावर आचरेकर सर आणि मनोहर सुर्वे सरांचा खूप मोठा पगडा आहे. मी दोघांकडेही शिकलो आहे. आणि त्यांनी शिकवलेल्या अनेक गोष्टी मी माझ्या प्रशिक्षणात उतरवण्याचा प्रयत्न करतो.  मुंबईचं स्कूल क्रिकेट वेगळ्याच दर्जाचं आहे. आणि त्यात मुंबई उपनगरातून एक शाळा इतकी पुढे घेऊन जाणं…मला वाटतं ह्यात खूप काही आलं. 


प्रश्न: माझा प्रश्न तोच होता…. हे स्कूल क्रिकेट किती महत्वाचं आहे? 

उत्तर: स्कूल क्रिकेट नक्कीच महत्वाचं आहे. शालेय वयात होणारे संस्कार खूप महत्वाचे असतात, फक्त क्रिकेटच नाही, पण कोणत्याही क्षेत्रात. मी कायमच मुलांना क्रिकेटसाठी प्रोत्साहीत केलं. माझं क्रिकेटवेड होतं कदाचित, पण मी कायम अश्या गुणवान मुलांच्या शोधात असायचो. ह्या मुलांनी आपल्या शाळेसाठी खेळावं ह्या साठी मी कायम प्रयत्नशील असायचो. मला शाळेची एक खडूस टीम बनवायची होती. मुंबई क्रिकेटमध्ये खडूस शब्दाला खूप महत्व आहे. तेच मला शाळेसाठी करायचं होतं. आधी तर आमच्या शाळेत ग्राउंड पण नव्हतं. आम्ही तसाच सर्व करायचो. जमेल तशी बॅटिंग आणि बॉलिंग ची प्रॅक्टिस चालायची. मग हळू हळू एक सिमेंट विकेट आम्हाला मिळाली. छोटं का होईना पण ग्राउंड मिळालं आणि शालेय क्रिकेटचा प्रवास सुरु झाला. हो पण एक आहे, क्रिकेट खेळत असले तरी सगळ्या मुलांनी नीट अभ्यास केलाच पाहिजे ह्याकडे देखील माझं लक्ष असायचं. क्रिकेटमुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये हे पण महत्वाचं आहे. 


प्रश्न: आणि मग अशी शाळेसाठी मुलं शोधतानाच रोहित शर्मा भेटला का? 

उत्तर: हो. आम्ही बोरिवली मध्ये एक मॅच खेळत होतो आणि समोरच्या टीम मध्ये एक ऑफस्पिन टाकणारा लहान मुलगा दिसला. मला तो आवडला. त्याच्यामध्ये एक वेगळाच स्पार्क वाटला. त्याचे काका त्याच्याबरोबर होते. मी त्यांना विनंती केली की ह्याला आमच्या शाळेत घेऊन या. तिथे त्याची ऍडमिशन करू, तो शाळेसाठी क्रिकेट सुद्धा खेळेल. ते आले पण शाळेत. पण हे कुटुंब अगदीच गरीब होतं. शाळेची फी भरण्यासाठीचे पण पैसे नव्हते. मग मी पटेल सरांशी बोलून त्याची फी माफ करून घेतली. रोहित शाळेकडून खेळत होता. चांगला ऑफस्पिन टाकायचा. सुरुवातीला अनेक दिवस मी त्याला बॅटिंग करू दिली नाही, पण एकदा नेट्समध्ये त्याला बॅटिंग करताना पाहिलं. तो चांगले कनेक्ट करत होता. मग पुढे त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित केलं. मला वाटतं ही १९९९ ची गोष्ट असेल. पुढे रोहित स्कूल क्रिकेटमध्ये बॅटिंग करत होता. ती २-३ वर्षे त्याने चांगली गाजवली. त्याच काळात आम्ही हॅरिस शिल्ड मध्ये शारदाश्रमला हरवलं. त्यांना हरवणारा आमचा उपनगरातला पहिला संघ होता. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्या मॅचच्या वेळी आचरेकर सर माझ्या शेजारी होते, ते शारदाश्रमचे प्रशिक्षक होते. त्यांचा संघ तो सामना हरला खरा, पण सरांनी मला कौतुकाची थाप दिली. माझ्यासाठी ती खूपच महत्वाची गोष्ट होती. 


प्रश्न: शार्दुलचं काय? तो कुठे गवसला?

उत्तर: तोही असाच एका स्पर्धेत. आमच्या विरुद्ध संघातून खेळत होता. आणि त्याने जबरदस्त कामगिरी केली होती. तेंव्हाच त्याला विचारलं की आमच्या शाळेत येशील का. त्याच्या आई वडिलांचा विरोध होता, आणि ते साहजिकच आहे. शार्दूल पालघरचा. आमची शाळा बोरिवलीत. जवळजवळ ८० किलोमीटर अंतर होतं. रोजचे ५-६ तास फक्त रेल्वेच्या प्रवासात जाणार. शक्यच नव्हतं. पण मला हा मुलगा खूपच आवडला होता. त्याची इथे मुंबईमध्ये पण काही सोय होत नव्हती. शेवटी एकदा माझ्या पत्नीशी बोललो, आणि मग शार्दुलला आमच्याच घरी ठेवूया असा निर्णय घेतला. त्याच्या पालकांना थोडं समजवावं लागलं, पण तेही तयार झाले. पुढे शार्दूल आमच्या घरी राहिला. खूप लोकांनी विरोध केला ह्या गोष्टीला. माझा मुलगा-मुलगी दोघेही आता मोठे होते, शार्दुलच्याच वयाचे. पण मी ठाम होतो. शार्दूल जवळ जवळ एक दीड वर्ष आमच्या घरी होता. अगदी घरातल्या सारखं वावरला. सिद्धेश आणि त्याची चांगली दोस्ती झाली. 


प्रश्न: आणि रोहित? तो पण तुमच्या घरी राहायचा ना? 

उत्तर: नाही तो घरी नाही राहायचा पण जवळंच होता. त्याचे आई वडील डोंबिवली मध्ये होते.  तो आमच्याकडेच असायचा, हक्काने जेवायला घरी असायचा. तो पण कुटुंबाचा एक भाग झाला होता. अजूनही आम्ही भेटलो की त्या दिवसांची आठवण काढतो. खूप छान दिवस होते. पुढे त्याचं कुटुंब आमच्याच शेजारीच राहायला आले. त्याच्या घरी नॉन व्हेज काही चालत नसे, पण मग माझी पत्नी त्याच्यासाठी करून ठेवायची, आणि तो पण अगदी आवडीने खायचा. शार्दूल असतानाच अजून एक मुलगा – आतिफ अत्तरवाला, तो पण आमच्या घरी राहायला होता. तो आता मुंबई रणजी संघात आहे. माझी दोन मुलं, शार्दूल आणि आतिफ … अगदी भावंडांसारखी राहिली. धमाल, मजा मस्ती, क्रिकेट प्रशिक्षण आणि तेवढाच शाळेचा अभ्यास सुद्धा. त्यांचे लाड पण केले, आणि शिस्तसुद्धा होतीच.  


प्रश्न: सर, हे भन्नाट आहे. क्रिकेटसाठी इतकं? तुमच्या घरच्यांना, खास करून पत्नीला ह्या सगळ्याचं क्रेडिट दिलं पाहिजे. 

उत्तर: प्रश्नच नाही. ती होती म्हणून हे सगळं झालं. तिने कधीही तक्रार केली नाही. मुलांनी देखील नाही. ह्या सगळ्याच मुलांमध्ये एक स्पार्क होता, आणि त्यांचे प्रॉब्लेम्स पण मला कळत होते. आणि क्रिकेट हे माझ्यासाठी पॅशन आहे. मी कधीही त्याच्याकडे व्यवसाय म्हणून बघितलं नाही. ही मुलं माझ्याकडे राहिली, मी त्यांच्याकडून, त्यांच्या आई वडिलांकडून कधीही पैसे घेतले नाहीत. ना कधी शाळेकडून प्रशिक्षणाचे घेतले. आत्त्ता पण नाही घेत. देवकृपेने माझी नौकरी नीट सुरु होती, घर व्यवस्थीत होतं. कधीही ह्या गोष्टींकडे पैसे कमावण्याचं साधन म्हणून विचार पण केला नाही. आजही मुलं येतात, ती गरीब आहे की अब्जावधी वडिलांचं पोर आहे, ह्याचा कधीच विचार करत नाही. मुलात काही चांगले गुण असतील तर ते जोपासण्याचा, त्याचं कौशल्य सुधारण्याचा प्रयत्न करतो. कदाचित माझ्या गुरूंकडून मी हेच शिकलोय. 


प्रश्न: सर आज मुलांच्या आई वडिलांच्या पण अपेक्षा खूप वाढल्या आहेत. त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? 

उत्तर: खरंय. आता क्रिकेट हा व्यावसायिक खेळ झाला आहे. खेळात पैसे आले आहेत. एका अर्थाने चांगलं आहे हे, पण पालकांच्या अपेक्षा पण अवाजवी असतात. आपल्या मुलाने IPL खेळावा हीच अपेक्षा असते. त्यात चूक काही नाही, पण मुलाची तेवढी कुवत आहे का ते सुद्धा बघितलं पाहिजे. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक पालकाला मी हेच सांगतो, मग तो गर्भश्रीमंत असेल किंवा अगदी साध्या घरातला असेल. मी त्या मुलांच्या आर्थिक स्थितीकडे पाहत नाही. मला जर त्या मुळात गुणवत्ता दिसली तर मी त्याच्यासाठी काहीही करायला तयार आहे. पण अनेकदा पालक विनंती करतात, कि तुम्ही त्याला कोचिंग करा म्हणजे त्याचं क्रिकेट सुधारेल. मी अनेक मुलांना कोचिंग करायचं नाकारलं आहे, कारण मला त्या मुलांमध्ये तो स्पार्क दिसला नाही. कित्येक पालक मुलांसाठी प्रायव्हेट कोचिंग लावतात. मला ते पण नाही पटत. मुळात जर गुणवत्ता असेल ना तर तो नक्की चमकेल. ह्या प्रायव्हेट कोचिंग मध्ये कधी कधी पालक स्वतःचंच नुकसान करून घेतात. अजून एक गोष्ट म्हणजे मी पालकांना सांगेन की मुलाच्या प्रशिक्षणामध्ये फार ढवळाढवळ करू नका. प्रत्येक मूल हे नदीचं पाणी आहे, योग्य ठिकाणी ते वाहत जाणार. त्याचे प्रशिक्षक त्याला नक्की घडवतील,  आणि समजा मुलगा क्रिकेट मध्ये नाही प्रवीण झाला तरी तो दुसरीकडे कुठेतरी प्राविण्य मिळवेलच ना. कदाचित दुसऱ्या काही क्षेत्रात त्याचं यश असेल. आणि तुम्हाला मुलाला क्रिकेटपटूच बनवायचं असेल तर थोडा संयम असू द्या, मुलाला त्याचं त्याचं घडण्यासाठी वेळ द्या. त्याच्यासाठी हा एक मोठा अभ्यास आहे, त्या अभ्यासात व्यत्यय आणू नका. एखादा वयाच्या १७ व्या वर्षी चमकतो, एखादा २०व्या. त्यांना त्यांच्या गुणवत्तेवर काम करू द्या. मुलगा १४-१६ च्या वयोगटात पुढे नाही जाऊ शकला, किंवा चमकला नाही तर निराश होऊ नका. त्याच्या प्रशिक्षकाचा जर मुलावर विश्वास असेल, दोघांचीही मेहनत घ्यायची तयारी असेल तर तो मुलगा पुढे नक्की चमकेल. हे वय त्याच्या प्रशिक्षणाचं आहे, त्यावर भर द्या. आणि एक लक्षात घ्या, सचिन तेंडुलकर १०० वर्षात एकदाच होतो. तुमच्या मुलाची तुलना कोणाही बरोबर करू नका. 


प्रश्न: सर, पुढे काय? रोहित, शार्दूल आणि बाकी तुमच्या विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? 

उत्तर: अपेक्षा काही नाही. त्यांनी खेळत राहावं, खेळाचा आनंद घेत राहावा. मी सिद्धेशला पण हेच सांगतो. आज तो रणजी खेळतोय, IPL खेळला आहे. सतत स्वतःमध्ये सुधारणा करत राहणं महत्वाचं आहे. रोहित आणि शार्दुलची प्रतिभा जगणे बघितली आहे. आज ह्या सगळ्यांनीच खूप भरभरून आनंद दिला आहे. आणि मी पण मला जमेल तितका काळ क्रिकेट प्रशिक्षण करतंच राहीन. ह्या साध्या चेंडूफळीच्या खेळणे खूप काही दिलंय. मी त्याच्यासाठी इतकं तर नक्कीच करू शकतो. माझी अपेक्षा काय असेल तर ती सरकारकडून. मी आत्ता ज्या मैदानावर प्रशिक्षण घेतो ते मैदान खूप छोटं आहे. एक मोठं मैदान मिळावं ह्या साठी मी सरकार दरबारी दार ठोठावतो आहे. ह्या मोठ्या मैदानामुळे आमच्या मुलांचा खेळाचा, सामन्यांचा एक मोठा प्रश्न सुटणार आहे हे नक्की. आजवर माझी जवळजवळ ८० मुलं मुंबईसाठी वेगवेगळ्या वयोगटात खेळली आहेत. आणि मला खात्री आहे की मोठ्या मैदानामुळे ही संख्या अजूनच वाढेल. त्यामुळे मी सरकारला नम्र आवाहन करू इच्छितो की एक चांगले मोठे मैदान मला उपलब्ध करून द्यावे. आणि माझ्या हातून अशी क्रिकेट सेवा घडत राहावी.   


सर, तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे. तुमची सगळीच मुलं क्रिकेटमध्ये चमको आणि तुमचं नाव अजून आदराने घेतलं जावो एवढीच अपेक्षा करतो. आणि अर्थातच तुमची मोठ्या मैदानाची इच्छा देखील लवकर पूर्ण होऊ दे. धन्यवाद सर. 

दिनेश लाड … मुंबई क्रिकेट मध्ये  आणि आता भारतीय क्रिकेट मध्ये आदराने घेतलं जाणारं नाव. मोठी माणसं साधी असतात, ऐकून होतो, आज अनुभव पण घेतला.  

महिला क्रिकेट – काल आणि आज 

मला काही दिवसांपूर्वी विचारण्यात आले होते की जेव्हा मी ४५ वर्षांपूर्वी खेळत होते, त्याऐवजी सध्याच्या काळात क्रिकेट खेळणे मला अधिक आनंददायक वाटले असते का? माझी पहिली प्रतिक्रिया होती ‘हो’. महिला क्रिकेट सध्या छान सुरू आहे, आणि अजूनही पुढे जाणार आहे. पण मग मी विचार केला, एक मिनिट, माझे खेळाचे दिवस सर्वोत्तम होतेच पण या प्रश्नामुळे मला त्या काळातील आणि ह्या काळातील खेळाबद्दल सखोल विचार करायला लावला.

आज, महिला क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे आणि जगभरात हा खेळ वाढत आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये आता महिला क्रिकेटचा समावेश झाला आहे. मागच्या आशियाई खेळांमध्ये पण क्रिकेटचा समावेश होता. क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याबद्दल चर्चा सुरू आहेत आणि आयसीसी याबद्दल खूप उत्साहित आहे. मला खात्री आहे की खेळाडू अपेक्षेने वाट पाहत आहेत की क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट केले जाईल कारण जागतिक पातळीवर ऑलिम्पिक हे खेळांसाठी सर्वात मोठे व्यासपीठ मानले जाते.

गेल्या पाच वर्षांमध्ये महिला क्रिकेटचा झपाट्याने विकास झाला आहे. २०१७ साली प्रेक्षकांनी भरलेल्या लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला गेलेला महिला विश्वचषकाचा अंतिम सामना अभूतपूर्व होता. असा अनुभव आधी कधी आला नव्हता. इंग्लंड आणि भारताने अंतिम फेरी गाठली. फक्त अंतिम सामन्यातच नव्हे तर या संपूर्ण प्रवासामध्ये भारतीय संघाकडे सगळ्यांचे लक्ष होते. सोशल मीडियामुळे महिला क्रिकेटपटू घराघरात पोहोचल्या होत्या. पुरुष क्रिकेटपटूंनीदेखील महिला संघाच्या खेळाला प्रोत्साहन दिले, त्यांच्या कामगिरीवर भाष्य आणि कौतुक करून खेळाच्या कक्षा विस्तारल्या. 

महिला क्रिकेट पूर्वीच्या तुलनेत आता अधिक चांगले आहे. जेव्हा क्रिकेट हा पुरुषांचा खेळ समाजाला जायचा तेव्हा आम्ही महिला क्रिकेटच्या पायोनियर होतो. दिवसभर उन्हात उभे राहून खेळणे आणि लेदर चेंडूने खेळणे हे पुरुषांचे काम समजले जायचे. त्या वेळी आम्हाला क्वचितच कोणी प्रायोजक होते. आम्ही ज्या क्लब आणि कॉलेजच्या मैदानावर खेळायचो, ती मैदानेदेखील चांगल्या दर्जाची नव्हती. आम्ही रेल्वेच्या सेकंड क्लासनी प्रवास करायचो आणि तोदेखील बऱ्याचदा आरक्षणाशिवाय. आम्ही वसतिगृहांमध्ये राहिलो. संपूर्ण संघ एकाच खोलीत राहायचा आणि कॉमन टॉयलेट्स वापरायचा. आमच्या खेळण्याच्या दिवसात जेव्हा आम्ही परदेशी जात असू, तेव्हा बहुतेक वेळा आमचा प्रवास इकॉनॉमी क्लासने होत असे, अनेकदा आम्ही युथ होस्टेल्स आणि डॉर्मेटरीमध्ये राहिलो आहोत. सध्याच्या खेळाडूंसाठी हे सर्व बदलले आहे. आता महिला खेळाडू चांगल्या मैदानावर खेळतात. त्रितारांकित किंवा पंचतारांकित (3 Star-5 Star) हॉटेलमध्ये राहतात. त्यांना जेवणासाठी भत्ता मिळतो, बहुतेक सगळीकडे बिझनेस क्लासने प्रवास होतो. मुख्य म्हणजे त्यांच्याकडे आता मुख्य प्रशिक्षक, सहायक प्रशिक्षक, मॅनेजर, गोलंदाजी प्रशिक्षक, व्हिडिओ विश्लेषक, फिजिओ असे सगळे मदतीला आहेत. याचे खूप फायदे आहेत. त्यामुळे आपल्या संघाच्या कामगिरीचेच नव्हे तर दुसऱ्या संघाच्या कामगिरीचे विश्लेषण करून संघाचे धोरण ठरवता येते. खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीचे विश्लेषण करून खेळ उंचावण्यास मदत होते. 

तसेच T20 क्रिकेटच्या आगमनामुळे क्रिकेट वेगळ्या पद्धतीने खेळले जाते. बहुतेक सामन्यांचे टीव्ही प्रक्षेपण होत असल्यामुळे खेळाडूंना खूप काही शिकायला मिळते. आमच्या काळात अशा गोष्टी कधी कळत नव्हत्या. आमच्या काळातील खेळाडू आता त्या वेळेचे फोटो शोधण्याचा प्रयत्न करतात. सामन्याचे व्हिडीओ सापडणे तर दूरची गोष्ट. सर्वात मोठी गोष्ट आहे की जसे इतर देशांमधील खेळाडूंना करारबद्ध केले जाते तसे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारतीय महिला खेळाडूंना करारबद्ध केले आहे. जरी कराराची रक्कम पुरुष खेळाडूंच्या तुलनेत कमी असली तरी खेळाडू आता खेळावर लक्ष केंद्रित करू शकतात. खेळाडू स्वतःसाठी फिटनेस प्रशिक्षक, क्रिकेट प्रशिक्षक नेमून कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्याचा क्रिकेटला फायदा होतो. सध्याच्या संघाची फिटनेस पातळी अधिक चांगली दिसते. चांगल्या मैदानावर खेळल्यामुळे आणि फिटनेस पातळी उंचावल्याचे परिणाम खेळात दिसत आहेत. महिला T20 सामन्यांमुळे आणि पुरुषच्या IPL मुळे भारतीय महिला खेळाडूदेखील महिला IPL ची वाट पाहत आहेत.

सगळा विचार केल्यावर असं वाटतं की महिला क्रिकेट खेळण्यासाठी ही नक्कीच चांगली वेळ आहे. पण हे म्हणूनही आम्ही मैदानावर घालवलेल्या वेळाबद्दल मला खेद नक्की नाही. कारण माझ्या पिढीतील खेळाडू फक्त भारतातील खेळाचे प्रणेते नव्हते पण आज महिला क्रिकेट कुठे आहे याचा प्रत्यक्षात पाया आम्ही रचला. ते रोमांचक क्षण होते. हा पाया नक्कीच भक्कम होता अन्यथा खेळ आतापर्यंत टिकला नसता. माझ्या काळात महिलांनी चांगली कामगिरी केली नसती तर लोकांची आत्ताच्या खेळाबद्दल तेवढी आत्मीयता राहिली नसती. माझ्या वेळी भारतात अनेक दिग्गज खेळाडू होत्या. शांता रंगास्वामी, डायना एडलजी, सुधा शाह, नीलिमा बर्वे – जोगळेकर, उज्ज्वला निकम – पवार, कल्पना परोपकारी – तापीकर ह्या आणि अशा अनेक खेळाडूंमुळे भारतातील महिला क्रिकेट अधिक परिपक्व झालं. ह्या सर्वांनीच चांगला खेळ केला नसता तर कदाचित आज इतक्या वर्षांनीसुद्धा महिला क्रिकेटला ज्या प्रकारे समर्थन मिळत आहे, ते कदाचित मिळालं नसतं. ह्या सर्वच खेळाडू कौशल्य आणि तंत्राच्या बाबतीत कुठेच कमी नव्हत्या. परदेशी दौऱ्यांवरदेखील त्यांनी कायमच चांगली कामगिरी केली.

तसेच, मी खेळलेल्या दिवसांची मला कदर आहे कारण आम्हाला कितीही अडचणी आल्या तरी आम्ही मजेत खेळलो, आम्ही मित्र बनवण्याचा, एकमेकांना पाठिंबा देण्याचा आणि जे काही आहे त्याचा आनंद घेण्याचा मनापासून प्रयत्न केला. मला वाटतं तो एक अप्रतिम काळ होता. आम्हाला क्रिकेट खेळणे आणि आयोजित करणे आवडत होते. आमच्या घरांपासून काही दिवस लांब राहणे आणि एकत्र राहणे मजेदार होते. आम्ही तेव्हा नवीन होतो आणि प्रत्येकाबरोबर थट्टामस्करी करायचो. पण मैदानावर आम्ही तीव्र प्रतिस्पर्धी होतो. आमची त्या वेळेपासून झालेली मैत्री अजून आहे. फक्त भारतात नाही तर जगभरातील खेळाडूंशी मैत्री आहे. हा सर्व अनुभव आणि ते दिवस मी आयुष्यभर आठवणीत राहतील. 

महिला क्रिकेट हे आता एक वेगळं करिअर होऊ घातलं आहे. तुम्ही जर भारतासाठी खेळत असाल, तर तुम्हाला प्रायोजक मिळतील, जाहिरातीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. ह्यामध्ये मिळणारा पैसा आणि प्रसिद्धी हेसुद्धा तुम्हाला यशस्वी नक्कीच बनवतील. पण जरी तुम्ही अगदी भारतासाठी नाही खेळू शकलात, तरीदेखील इतर अनेक गोष्टींमध्ये तुम्ही तुमची कारकीर्द घडवू शकता. तुम्ही क्रिकेट समालोचन, क्रिकेट स्तंभलेखन करू शकता. प्रशिक्षक, क्रिकेट प्रशासक (administrator) बनू शकता. फिजिओ, ट्रेनर आणि अशा असंख्य संधी आजच्या मुलींना उपलब्ध आहेत. आणि कदाचित त्यामुळेच अनेक पालक आज मुलींना क्रीडा क्षेत्राकडे किंवा  प्रामुख्याने  क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी नक्कीच प्रोत्साहित करत आहेत. त्यामुळे जर आज कोणी विचारले की आजच्या काळात मला क्रिकेट खेळायला आवडलं असतं का, तर माझं उत्तर नक्कीच होकारार्थी आहे. पण मला अजून भर घालून सांगावेसे वाटेल की माझ्या काळात खेळलेलं क्रिकेट माझ्यासाठी जास्त जवळचं आहे, जास्त आनंद देणारं आहे.  

माझा सुनीलदादा

क्रिकेट ह्या खेळाविषयीचं माझं प्रेम खूप जुनं आहे. ना ते क्रिकेटच्या बदलत्या स्वरूपांशी निगडित आहे (उलट काही अंशी त्याने क्रिकेटचं नुकसानच केलंय असं मला वाटतं), ना ते कोणत्याही खेळाडूसाठी हपापलेल्या मीडियामुळे कमीजास्त होणार आहे. मी लहान असताना ‘इडियट बॉक्स’ नव्हता. आयुष्य त्या वेळी खूप सोपं होतं, खरं होतं आणि माणसंसुद्धा. ह्या इडियट बॉक्समुळे लोकप्रिय झालेल्या वेगवेगळ्या क्रिकेटच्या स्वरूपांना माझा विरोध नक्कीच नाही. पण कोणता खेळाडू सर्वात जास्त ताकदीने किंवा सर्वात लांब चेंडू मारू शकतो ह्याबद्दलच्या गप्पा मला व्यर्थ वाटतात. माझ्यासाठी क्रिकेट ह्या खेळाची सुरुवात तशी खूपच लवकर झाली, कदाचित मी माझ्या आईला ओळखायला लागलो त्याआधीच. ह्याला कारणीभूत आहे ते म्हणजे मी मुंबईत ज्या वातावरणात वाढलो, जिथे मोठा झालो, तिथली माणसं आणि त्यांचं क्रिकेटप्रेम. ह्या सर्वच माणसांचा माझ्या आयुष्यावर एक मोठा प्रभाव आहे. माझं बालपण मुंबईत ताडदेव भागात गेलं. माझ्या अवतीभवतीचा परिसर हा क्रिकेट, सिनेमा, साहित्य, संगीत ह्या सर्वच गोष्टींनी भारावलेला होता. ही साधारण १९६०च्या जवळपासची गोष्ट. त्या वेळी ह्या सर्वच गोष्टी निरर्थक समजल्या जायच्या. पण तरीही त्या परिसरातली माणसं काही वेगळीच होती. माझ्या घराच्या एक-दीड किलोमीटरच्या परिघात राहणाऱ्या लोकांच्या यादीत अनेक मोठे, नावाजलेले खेळाडू, साहित्यिक, शास्त्रीय गायक, कलाकार आणि असेच अनेक दिग्गज होते. ही सगळीच माणसं त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात ‘लीजण्ड’ होती. आमच्या घराच्या समोरच्याच बिल्डिंगमध्ये सुधीर नाईक होता (त्याला त्याचे मित्र जेम्स म्हणत). सुधीर आणि त्याचे मित्र शेजारीच असलेल्या कंपाउंडमध्ये काँक्रीटच्या खेळपट्टीवर टेनिस बॉलने क्रिकेट खेळत. पुढे सुधीर मुंबईसाठी आणि नंतर भारतासाठीदेखील खेळला. आमच्यासाठी ते कंपाउंड लॉर्ड्सपेक्षा कमी नव्हते, आणि सुधीर त्या लॉर्ड्सवरचा जणू राजाच. माझे दुसरे हिरो होते माझे मामा, द्वारकानाथ ‘बबन’ गावसकर. बबनमामा ग्रेट विनू मंकड ह्यांच्यासोबत क्रिकेट खेळले आहेत. रुईया स्पोर्ट्स क्लबमध्ये ते दोघे एकत्र खेळत. आणि माझा तिसरा हिरो होता… मी बोलणारच आहे त्याच्याबद्दल.

आमच्या घराच्या जवळच भागीरथीबाई बिल्डींग्स नावाच्या इमारती होत्या.  तिथे माझे दुसरे मामा राहायचे, मनोहर गावसकर. माझ्या आईचे थोरले बंधू. मी लहान असताना माझी आई डॉ. सुंदर केंकरे मला माझ्या मामामामींकडे – मनोहर गावसकर आणि मीनल गावसकर ह्यांच्याकडे सोडून तिच्या कामावर जात असे. मी त्या अर्थाने माझ्या मामामामींकडेच मोठा होत होतो. माझं सगळंच लहानपण चिखलवाडीतल्या त्या भागात माझ्या भावंडांबरोबर गेलं. माझी मोठी मामेबहीण नूतन आणि मामेभाऊ सुनील – ह्या कथेचा नायक. सुनील मनोहर गावसकर. माझे मनोहरमामा राहत ते चिखलवाडीमधलं घर तसं मोठं होतं. एक छानसं ३ बेडरूम्सचं ते घर, आणि त्याला लागूनच असलेला तो वऱ्हांडा अजूनही माझ्या नजरेसमोर आहे. आणि घराच्या मुख्य दरवाजाबाहेरच एक निमुळता पॅसेज होता, जिथे सुनीलदादाने त्याचे क्रिकेटचे पहिले धडे गिरवले, कदाचित तिथेच त्याने त्याचे क्रिकेट टेक्निक्स अधिक परिपक्व केले.

मी मोठा होत असताना दादाबरोबर मीदेखील माझी क्रिकेट प्रॅक्टिस करत असे. त्या छोट्याशा पॅसेजमध्ये दादा बॅटिंग करत असताना, पायऱ्यांवर उभा राहून त्याला सीझन बॉल टाकून प्रॅक्टिस देणं हे त्या वेळेचं माझं मुख्य काम होतं. अशा प्रकारे ‘बॉलिंग’ करत असताना अनेकदा माझा खांदा काळानिळा झाला आहे. पण त्याही परिस्थितीमध्ये मला ती क्रिकेट प्रॅक्टिस आवडत असे. कदाचित तिथेच ‘playing with a straight bat’ म्हणजे काय ते नकळतच माझ्या मनावर कोरलं गेलं. पुढे मनोहरमामा दादर पूर्व भागात राहायला गेले, पण ही straight bat ची जादू त्या घरातसुद्धा कायम होती. त्या घरातसुद्धा माझी क्रिकेट सराव करतानाची भूमिका कायम बॉलरची असे, आणि अर्थातच दादा त्याची बॅटिंग प्रॅक्टिस करून घेत असे. त्याही वेळी त्याचा सराव कायम Straight Drive चा असे. फ्लिक, पूल, कट्स आणि इतर फटक्यांना जणू त्या घरात जागाच नव्हती.  दादा तिथे केवळ स्ट्रेट ड्राइव्ह मारत असे, आणि पुढे तोच फटका त्याचा ट्रेडमार्क शॉट झाला. पुढे जेव्हा अनेक क्रिकेट रसिक आणि क्रिकेट पंडित दादाच्या त्या स्ट्रेट ड्राइव्हची तारीफ करत असत, तेव्हा दादाच्या त्या सरावात माझाही थोडा हातभार आहे ह्या विचारानेच माझ्या अंगावर मूठभर मांस चढत असे. माझ्या मामांच्या घरी अनेक पुस्तकांनी, मासिकांनी भरलेलं एक लाकडी कपाट होतं. ते कपाटदेखील मला अतिशय प्रिय होतं. त्या कपाटात अनेकविध पुस्तकं होती, आणि अर्थातच त्यातली अनेक पुस्तकं क्रिकेटला वाहिलेली होती. ह्याच सगळ्या खजिन्यात मला कधी डॉन ब्रॅडमन भेटले, कधी विजय मर्चंट, कधी रोहन कन्हाय तर कधी ५० आणि ६०च्या दशकातले इतर अनेक दिग्गज. मनोहरमामा आणि त्यांचे बंधू अनेक क्रिकेटपटूंच्या गोष्टी अतिशय रंजकतेने सांगत, आणि ह्याच सगळ्या गोष्टींनी माझ्याभोवती क्रिकेट ह्या खेळाचं जाळं विणलं गेलं, ते अजूनही कायम आहे. माझे दोन्ही मामा – सुनीलचे वडील, मनोहर आणि बबनमामा क्लब आणि ऑफिसमध्ये क्रिकेट खेळत. सुनीलचे मामा, माधव मंत्री तर भारतासाठीदेखील खेळले होते. दोन्ही घरांतून बालपणीच त्याला क्रिकेटचे डोस मिळाले होते. 

सुनीलदादाचं मी डोळे झाकून अनुसरण करत असे. तो माझा खऱ्या अर्थाने क्रिकेट हिरो होता. ‘विलक्षण’ ह्या एकाच शब्दात दादाचं वर्णन करता येईल. अनेकदा मी त्याला त्या वऱ्हांड्यामध्ये उभं राहून मॅचसाठी जाताना बघितलं आहे. त्याच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यात, ती छोटी किटबॅग घेऊन, एक बॅट हातात घेऊन बुटांवरची धूळ झटकत तो जायचा तेव्हाची भावना व्यक्त करणं केवळ अशक्य आहे. मला त्या काळी अगदी दादासारखंच बनायचं होतं. त्या काळी त्याने मुंबईचं शालेय आणि नंतर विद्यापीठ क्रिकेट गाजवून सोडलं होतं. त्या वेळी अनेकदा त्याचा फोटो पेपरमध्ये येत असे. माझे वडील तो फोटो दाखवत, तेव्हा अभिमानानं ऊर भरून येई. 

१९७१ साली दादाची निवड भारतीय संघात झाली, आणि २१-२२ वर्षांचा सुनील गावसकर वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेलादेखील. पुढे जे घडलं ते अविस्मरणीय आहे. ५० वर्षांपूर्वीच्या त्या दौऱ्यात आपण वेस्ट इंडीजला पहिल्यांदाच हरवलं आणि एक इतिहास रचला. त्या दौऱ्याची सुरुवात करताना दादा एक तरुण खेळाडू म्हणून गेला होता, पण परत आला तेव्हा तो लीजण्ड बनला होता. वेस्ट इंडीजचा संघ मालिका हरला होता, तरीदेखील अगदी त्रिनिदादपासून, जमैका आणि बार्बाडोसपर्यंत सगळ्याच प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं होतं. त्याच्यावर कहाण्या रचल्या जात होत्या, कॅलिप्सो गायल्या जात होत्या. दादाला त्या घरातल्या वऱ्हांड्यापासून सुरुवात करताना बघणारा मी एक होतो, आणि आता तोच दादा भारतीय रसिकांच्या गळ्यातला ताईत बनला होता. दादाचे अनेक जवळचे मित्र, मिलिंद रेगे, एकनाथ सोलकर किंवा अशोक मंकड आणि इतरही अनेक दिग्गज खेळाडू दादाच्या ह्या प्रवासाचे साथीदार आहेत. मिलिंद रेगे दादाबद्दल खूप छान सांगतो. तो म्हणतो की सुनील त्याच्या इतर साथीदारांपेक्षा वेगळाच होता. कदाचित इतर काही खेळाडूंमध्ये दादापेक्षा जास्त चांगली गुणवत्ता असेल, पण दादाकडे एक गोष्ट होती, जी त्याला ह्या सर्वांपेक्षा वेगळं ठरवायची, आणि ते म्हणजे दादाकडे असलेली तीव्र महत्त्वाकांक्षा. दादा त्याच्या बॅटिंगकडे वेगळ्याच दृष्टिकोनातून बघत असे. त्याची विकेट घेणं हे एव्हरेस्ट जिंकण्यापेक्षा कमी नव्हतं. त्याला बाद करण्यासाठी गोलंदाजाला भारी किंमत द्यावी लागत असे. कायमच. मीदेखील मुंबईमध्ये थोडंफार क्रिकेट खेळलो आहे. पुढे माझ्या कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकऱ्यांमुळे मी अनेक दिग्गज लोकांना भेटलो. त्यामध्ये सुनीलदादाचे मित्र होते, त्याचे पाठीराखे होते, सिनियर होतेच, आणि त्याचे काही हिरोदेखील होते. सुनीलचा असाच एक हिरो म्हणजे हैद्राबादचा स्टायलिश फलंदाज एम. एल. जयसिंहा. मी त्यांना जयकाका म्हणतो. जयकाकांकडून मला सुनीलदादाच्या अनेक गोष्टी समजल्या. १९७१च्या त्या दौऱ्यात जयसिंहा आणि दादा एकत्र होते. त्याच दौऱ्यात जयसिंहांनी सुनीलला मोठं होताना बघितलं. “त्याची क्रिकेटविषयी निष्ठा आणि प्रेम जगापलीकडे होतं,” जयकाका सांगत. “त्याच दौऱ्यात एका सामन्याआधी सुनीलचा दात दुखावला गेला होता. पण तरीदेखील त्या परिस्थितीतसुद्धा तो खेळला, संघासाठी उभा राहिला. हे सगळं केवळ अवर्णनीय आहे,” दादाचे हिरो सांगत होते. ५० वर्षांपूर्वीच्या त्या दौऱ्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. त्या रात्री जेव्हा अजित वाडेकरचा विजयी भारतीय संघ मुंबईत सांताक्रूझ विमानतळावर उतरला त्यानंतरच्या त्या आठवणी शब्दात सांगणं अवघड आहे. तिथे जमलेल्या गर्दीच्या आवाजात जणू त्या विमानांचे आवाज कमी पडत होते. शेवटी वेस्ट इंडीजला हरवून आपण भारतात परतलो होतो. विमानाच्या दरवाजात ती ट्रॉफी घेऊन उभा असलेला सुनील मनोहर गावसकर, अजूनही माझ्या डोळ्यांसमोर तसाच उभा आहे. 

१९७१पासून आजपर्यंत मी दादाच्या अनेक मित्रांना, सहकाऱ्यांना, सिनियर्सना भेटलो आहे. प्रत्येक माणसाने मला दादाचे नवनवीन पैलू उलगून दाखवले. १९८२ साली, मी क्रिकेट क्लब ऑफ इंडियातर्फे ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होतो. आणि मेलबर्नहून अॅडलेडला जाताना, चेक-इन करताना किरण आशर या मुंबईच्या जुन्या खेळाडूने एका खेळाडूशी माझी ओळख करून दिली. त्याच फ्लाईटमध्ये आमच्या बरोबर होते वेस्ट इंडीजचे दिग्गज खेळाडू – सर गारफील्ड सोबर्स. त्या प्रवासात सोबर्स ह्यांनी मला त्यांच्या शेजारी बसण्यास सांगितलं, आणि पुढे साधारण दीड तास ते माझ्याशी दादाविषयी बोलत होते.  त्यांनी १९७१च्या त्या दौऱ्याच्या अनेक आठवणी जागवल्या. सुनील आणि वेस्ट इंडीज प्रेक्षकांचं एक वेगळं नातं उलगडून दाखवलं. त्या वेळी सुनील चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता. त्याच्या धावा होत नव्हत्या. “काळजी नसावी. सुनीलचं तंत्र अचूक आहे. लवकरच तो फॉर्ममध्ये येईल, आणि खोऱ्याने धावा करेल,” सोबर्स सांगत होते. आणि पुढच्या दौऱ्यात तेच झालं. सोबर्स ह्यांची भविष्यवाणी खोटी ठरली नाही. अॅडलेडच्या विमानतळावर उतरल्यानंतर सोबर्स सरांनी विचारलं, “सुनील आर्मगार्ड का वापरतो आहे? त्याला सांग की तो खरं म्हणजे जास्त चांगला फलंदाज आहे, त्याला आर्मगार्डची गरजदेखील नाहीये.” मी काय बोलणार होतो, साहजिकच माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. मुंबईला परत आल्यावर मी सोबर्स सरांचा निरोप दादाला सांगितला. दादा नुसतंच हसला. “गॅरी असं म्हणाला! त्याच्यासाठी ठीक आहे रे. तो त्याची संपूर्ण करिअर थायपॅड (मांडीला लावण्यासाठी असलेलं पॅड) न लावता खेळला आहे, आणि तेसुद्धा जगातल्या सर्वोत्तम गोलंदाजांसमोर.” दादाच्या  त्या मिश्किल चेहऱ्यावर अजूनच खोडकर भाव होते.  

दादा त्याच्या आवडत्या गोष्टींप्रती, त्याच्या प्रोफेशनप्रती कायमच एकनिष्ठ आहे. तो त्याचं खासगी आणि व्यावसायिक आयुष्य अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळतो. काही वर्षांपूर्वी दादा एका कपड्यांच्या ब्रँडचा Ambassador होता. तो करार संपूनसुद्धा अनेक वर्षे लोटली होती. आत्ता काही दिवसांपूर्वी रोहन त्याला काही कपडे विकत घेण्यासाठी दुसऱ्या एका ब्रॅण्डच्या दुकानात घेऊन गेला. पण सुनीलने त्या ब्रँडचे कपडे विकत घेण्यास नकार दिला. एखाद्या ब्रॅण्डसाठी करार केल्यानंतर त्यांच्याच प्रतिस्पर्ध्यांचे कपडे वापरणे त्याच्या स्वभावात बसत नव्हते. त्याची त्या ब्रॅण्डशी असलेली निष्ठा तो करार संपल्यानंतरसुद्धा कायम होती. 

सुनीलदादाच्या सगळ्याच गोष्टी काही ना काही शिकवून जातात. तो कायमच दादर युनियनसाठी खेळत राहिला. कसोटी क्रिकेट खेळत असताना, आणि देशातला सर्वोत्तम खेळाडू असताना, तसेच निवृत्तीनंतरसुद्धा तो त्याच्या क्लबसाठी कायम तयार असे. त्याने क्लबच्या मॅनेजमेंटला सांगून ठेवले होते, की कधीही गरज असेल तेव्हा मी क्लबसाठी खेळायला येईन. आणि तो आलादेखील. 

१९८५ साली मी एका म्युझिकल कॉन्सर्टच्या निमित्ताने वेस्ट इंडीज बेटांवर होतो. त्या वेळी त्रिनिदादमध्ये असताना एका पार्टीत वेस्ट इंडीजचा सर्वोच्च फलंदाज कोण अशी एक चर्चा रंगात आली होती. सर व्हिव रिचर्ड्स आणि रोहन कन्हाय, दोघांचेही समर्थक तावातावाने वाद घालत होते. अशा वेळी, त्या पार्टीच्या आयोजकाने माझी ओळख करून दिली. मी मुंबईचा आहे, आणि सुनील गावसकर माझा भाऊ आहे हे कळल्यानंतर त्या पार्टीचा रंगच पालटला. रिचर्ड्स आणि कन्हाय समर्थकांचा तो वाद तिथेच मिटला. माझ्या त्या सर्व पार्टी मित्रांनी आपले मद्याचे प्याले उचलले, आणि एकसुरात त्या दिग्गजाला मानवंदना दिली. “Cheers to the Maastah!” ती मानवंदना होती सुनील मनोहर गावसकर ह्या माणसाला. सुमारे १३-१४ वर्षांपूर्वी त्याच वेस्ट इंडीजमध्ये मैदानं गाजवलेल्या त्या लीजण्डला. आणि अभिमानाने, डोळ्यात पाणी आणून ती मानवंदना स्वीकारणारा होता त्याचा आत्येभाऊ, मी. सुनील मनोहर गावसकर, माझा क्रिकेटमधला खरा हिरो!

To know more about Crickatha