ball

ऋतुराज गायकवाड – आईवडिलांच्या नजरेतून

by कौस्तुभ चाटे

ऋतुराज गायकवाड – कोणी म्हणतंय की तो भारतीय क्रिकेटचं भविष्य आहे. कोणाच्या लेखी त्याच्यासारखा तंत्रशुद्ध फलंदाज आजच्या घडीला भारतात विरळाच आहे. कोणाच्या हिशेबी तो लवकरच भारताच्या कसोटी संघात दिसेल, किंवा कोणाचं म्हणणं आहे की तो भारताच्या एकदिवसीय आणि T20 संघाचा आधारस्तंभ होऊ शकतो. अनेक लोकांची अनेक मतं आहेत. साधारण ३-४ वर्षांपूर्वी जेव्हा त्याने रणजीमध्ये पदार्पण केलं तेव्हापासून मी नकळतच त्याला फॉलो करतोय. सरळ साधं कारण, अरे हा आपल्या महाराष्ट्राचा खेळाडू आहे. अगदी विशीतला ऋतुराज बघता बघता पायऱ्या चढत गेला आणि आता तर तो एक मोठा स्टार होऊ पाहतोय. ऋतुराजच्या मुळांचा शोध घ्यावा, त्याच्या आईवडिलांशी बोलावं असं मनात होतं. आणि म्हणतात ना, तुम्ही ठरवलं की आपसूकच सगळ्या गोष्टी जमून येतात. ह्यावेळी देखील असंच झालं. माझ्या मदतीला ऋतुराजचे बालपणीचे कोच मोहन जाधव सर धावून आले, आणि त्यांनीच माझी भेट घडवली श्री. दशरथ आणि सौ. सविता गायकवाड ह्यांच्याशी. ऋतुराज गायकवाडचे आई-वडील. 

पुण्यातल्या सांगवी भागात आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. वेळ ठरली होती, पण घरी गेलो आणि घराला कुलूप. थोड्याच वेळात गायकवाड काका-काकू आले. सगळ्यात पहिल्यांदा त्यांना बघितल्यावर ह्यांचा मुलगा इतका मोठा क्रिकेट स्टार असेल ह्यावर विश्वास बसणं अशक्य होतं. दोघेही वागायला,  बोलायला अगदी साधे. खूप नम्रपणे त्यांनी आमचं स्वागत केलं, आणि काही वेळातच गायकवाड काका-काकूंनी मला जिंकून टाकलं होतं. काकू शाळेत नोकरी करतात, आणि काका आता शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत. काकूंनी सगळ्यांसाठी मस्तपैकी चहा केला, आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या. विषय साहजिकच ऋतुराज हाच होता. माझी भूमिका ऐकणाऱ्याची होती, आणि जे मिळेल ते साठवून घेण्याचा मी प्रयत्न करत होतो. 

३ खोल्यांचं अगदी साधं घर, पण त्या घरात काहीतरी जादू होती हे नक्की. त्या भिंती, ते छप्पर… सगळ्याच गोष्टी एक प्रकारच्या सकारात्मकतेने भरून गेलेल्या जाणवत होत्या. “ह्याच घरात ऋतुराज लहानाचा मोठा झाला,” काका सांगत होते. “ह्याच खोल्यांमध्ये, गच्चीवर, खाली गल्लीत त्याची मस्ती चालायची. क्रिकेटची आवड अगदी लहानपणापासून. आम्ही काही खेळात भाग घेणारे नाही. कधीतरी टीव्हीवर सामने बघणं इतकाच आमचा क्रिकेटशी संबंध होता. पण ऋतुराजने मात्र तो खेळ पटकन उचलला. मला वाटतं ८-९ वर्षांचा असेल तेव्हाच तो क्रिकेटशी अगदी एकरूप झाला होता असं म्हटलं तरी चालेल. त्याच सुमारास आम्ही त्याचं नाव व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमीमध्ये घातलं आणि पुढे काही वर्षांत सगळं चित्रच बदललं. अकॅडमीमध्ये सुरुवातीला गेलेला ऋतुराज आणि तिथे शिकून सुलाखून बाहेर पडलेला ऋतुराज ह्यात खूप फरक आहे. वेंगसरकर सरांचं मोलाचं मार्गदर्शन त्याला मिळालं. जाधव सरांनी आणि अकॅडमीमधल्या इतर शिक्षकांनी त्याच्यावर घेतलेली मेहनत आणि केलेले संस्कार ह्याचा खूप मोठा हातभार त्याच्या करियरवर आहे हे नक्की. अर्थात तो तसा खूपच फोकस्ड मुलगा होता, अगदी लहानपणापासून. आणि त्याची कष्ट करण्याची तयारी पहिल्यापासूनच होती. आणि मग क्रिकेट सुरू झाल्यानंतर त्या कष्टांना एक प्रकारे दिशा मिळाली. खूप लहानपणीच त्याने क्रिकेट खेळायचं स्वप्न बघितलं होतं, आणि आज ते स्वप्न सत्यात उतरलं आहे.” काकांच्या डोळ्यात मुलाविषयीचा अभिमान दिसत होता, त्यांच्या बोलण्यातून तो जाणवत होता. 

आता काकूही आमच्यामध्ये सामील झाल्या होत्या. “तो तसा लहानपणापासूनच खूप समजूतदार, शांत मुलगा होता. कधी कोणाच्या वाट्याला गेला नाही. आपण बरं, आपला अभ्यास, आपलं क्रिकेट बरं… एवढंच चालायचं त्याचं. कधी त्याने हट्ट केला नाही की कधी कोणाशी उद्धटपणे बोलला नाही. तसं त्याला कायमच घर प्यारं आहे. तो इथे पुण्यात असला की घरीच असतो अजूनही. वर गच्चीवर त्याने एक जिम तयार केली आहे, आणि बराच वेळ तो त्या जिममध्येच असतो. वर टेबल टेनिसचं एक टेबल आहे. कधी कधी तो आणि त्याचे बाबा टेबल टेनिससुद्धा खेळतात.” 

काकूंनंतर परत एकदा काकांनी बोलायला सुरुवात केली. “आमचं मूळ गाव इथेच सासवडजवळ आहे. पण आता मला पुण्यात येऊन अनेक वर्षे होऊन गेली. मी कॉलेजसाठी पुण्यात आलो. मग शिक्षण, नंतर नोकरी ह्या निमित्ताने पुण्यातच राहिलो. तशी घरची काही श्रीमंती नाही, पूर्ण वेळ नोकरी करत, कष्टाने दिवस काढलेत. गावी थोडी शेती आहे. ऋतुराज लहानपणापासून जमेल तेव्हा तिकडे जातो,  त्याला आवडतं तिकडे. पण ह्या इथे पुण्यात राहून त्याला त्याच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करता आलं. त्याला क्रिकेट खेळायचं होतं, चांगलं क्रिकेट खेळायचं होतं. आणि त्यासाठी एखादा चांगला क्लब पाहिजे, एखादी अकॅडमी पाहिजे हेसुद्धा आमच्या गावी नव्हतं. कोणीतरी व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमीबद्दल सांगितलं. वेंगसरकर सरांचं नाव ऐकून होतो. त्यांच्याबद्दल खूप वाचलं, ऐकलं होतं. तिथे आपल्याला कोण विचारणार ही एक भीती होती. पण तसं काही झालं नाही. तिकडे ऋतुराजने खेळायला सुरुवात केली आणि बघता बघता तो तिथे एकदम रुळला. मग तिथे क्रिकेटचा सराव, त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या वयोगटाचे सामने. कधी पुण्यात, कधी बाहेर असं सगळं सुरू झालं. आणि बघता बघता आमचा ऋतुराज कसा मोठा झाला, महाराष्ट्र, भारत अ संघ, चेन्नई सुपर किंग्ससारखा IPL चा संघ… सगळीकडे खेळू लागला, चमकू लागला. मात्र आम्ही कधीही त्याच्या प्रशिक्षणामध्ये ढवळाढवळ केली नाही. कधीही त्याच्या नेट्सच्या सरावाला उपस्थिती लावली नाही. मला वाटतं ते खूप महत्त्वाचं आहे. व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमी त्याच्यासाठी, आणि आमच्यासाठीसुद्धा एखाद्या विद्यापीठासारखी आहे. त्याच्यासाठी ते शिक्षण, ते शिक्षक महत्त्वाचे आहेत. आम्ही आईवडील म्हणून मुलाची प्रगती विचारायला, तो कसा खेळतो आहे ते बघायला, त्यांना काही सूचना करायला कधीही त्यांच्याकडे गेलो नाही. मला वाटतं की ही प्रशिक्षक मंडळी सगळी त्या क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी आहेत. त्यांना त्यांचं काम करू द्यावं. कोणताही खेळाडू घडत असताना ही खूप महत्त्वाची गोष्ट असते.”काकांच्या डोळ्यात मुलाबद्दल कौतुक झळकत होतं. 

“ऋतुराज शाळेत कसा होता?” माझा पुढचा प्रश्न आलाच. “तसा तो व्यवस्थित अभ्यासू आणि हुशार मुलगा होता.  चांगल्या मार्कांनी पास व्हायचा. मुख्य म्हणजे एकदा शिकवलेलं त्याच्या पटकन लक्षात राहतं. पण पुढे त्याने क्रिकेटवरच लक्ष केंद्रित केलं. क्रिकेटपटू व्हायचं आहे हे त्याने आधीच ठरवलं होतं. जणू काही त्याचा अभ्यास क्रिकेटच आहे, त्या सरावालाच त्याने वाहून घेतलं होतं. आणि आम्हाला पण खात्री होती की तो ह्यात नक्की पुढे जाईल. मला वाटतं तो आठवीत होता, इथेच खडकीत तो एका कॉन्व्हेंटमध्ये जात होता. पण शाळेत जाणं तसं कमी असायचं. त्याचे सामने सतत सुरू असायचे. मग एकदा शाळेतून बोलावणं आलं. आणि आम्ही शाळेत गेलो तेव्हा शाळेच्या फादरने तंबीच भरली. आम्ही त्यांना ऋतुराजच्या क्रिकेटविषयी सांगत होतो, पण त्यांना ऐकूनच घ्यायचं नव्हतं. त्यांच्या शाळेत क्रिकेटचा संघ नव्हता, आणि सगळं महत्त्व अभ्यासालाच होतं. त्यांनी ऋतुराजला दोन पैकी एकाची निवड करायला सांगितलं, आणि क्षणाचाही विलंब न लावता ऋतुराजने क्रिकेट महत्त्वाचं आहे असं सांगितलं. तो शाळा बदलायला तयार झाला पण त्याला क्रिकेट सोडायचं नव्हतं. आणि मग मनावर दगड ठेवून आम्ही त्याची शाळा बदलायचा निर्णय घेतला. शैक्षणिक वर्ष सुरु झालेलं होतं, त्यामुळे त्याला कुठे प्रवेश मिळणार का, याबद्दल शंकाच होती. काही ठिकाणी प्रयत्न करून बघितलं पण कुठेच काही होत नव्हतं. शेवटी इथे जवळच अगदी साध्या शाळेत प्रवेश घेतला.” काकांच्या डोळ्यात पाणी तरळत होतं. एकूणच सगळंच वातावरण एकदम शांत झालं होतं. “पण त्या प्रसंगातही ऋतुराज खूप संयमाने वागला. जे समोर आहे ते त्याला मान्य होतं. त्याला त्याच्या क्रिकेटवर लक्ष द्यायचं होतं. माझा मुलगा आहे म्हणून नाही सांगत, पण खरंच खूप गुणी आहे तो. आहे ती परिस्थिती अगदी धीराने सांभाळतो. मागच्या वर्षी IPL च्या आधी त्याला कोरोना झाला होता. त्याची तब्ब्येत खूपच खराब झाली होती. सुरुवातीला चेन्नईसाठी काही सामने तो खेळू शकला नाही. तेव्हा तो निराश झाला होता, पण शांत होता. त्याला संधी मिळाली, पहिले १-२ सामने तो चांगला खेळू शकला नाही. पण त्यानंतर त्याने लागोपाठ ३ अर्धशतकं ठोकली, आणि खऱ्या अर्थाने त्याचं नाव घेतलं जाऊ लागलं. मागच्या वर्षी चेन्नईचा संघ प्ले ऑफमध्ये नाही गेला. पण ह्या वर्षी त्यांच्या संघाने चांगली कामगिरी केली आहे, आणि त्यातही ऋतुराज चांगलाच चमकला आहे. आई-वडील म्हणून आम्हाला त्याचा नक्कीच अभिमान आहे. तो त्याला संघात दिलेली भूमिका पार पाडतो, संघासाठी खेळतो हे महत्त्वाचं.” 

“त्याचं घरातलं वागणं कसं आहे? खाण्याच्या आवडीनिवडी?” ऋतुराज घरी कसा वागत असेल ह्याची मला पण उत्सुकता होतीच. गायकवाड काकूंना मी हा प्रश्न विचारला होता. “साधा आहे तो. त्याला माझ्या हातचं घरचं जेवण आवडतं. खाण्यापिण्याचे काही नखरे नसतात. फक्त सध्या त्याचं डाएटचं खूप असतं. मग तो घरी असला की सांगतो की मला अमुक अमुक पदार्थ खायला दे. मग मी त्याच्यासाठी ते बनवते. आजकाल तो बाहेरच असतो ना, मग तिकडे सगळं बाहेरचं खाणं होतं. घरच्या जेवणासाठी वाट बघतो नक्की.” 

“तुम्ही त्याचं क्रिकेट बघता की नाही?” मी विचारलं. “नाही हो. मला नाही जमत ते. म्हणजे चुकून बाद झाला तर… असं वाटत राहतं. मी अजूनही त्याचा एकही सामना मैदानावर बसून पाहिला नाहीये. मग अगदी क्लबचा सामना असेल तरीसुद्धा मी कधी गेले नाही. आणि टीव्हीवर पण त्याच्या जरा बऱ्यापैकी धावा झाल्या की मी मॅच बघायला बसते,” काकू मनापासून सांगत होत्या. “क्रिकेटव्यतिरिक्त त्याला वेड एकच आहे, ते म्हणजे नीट राहायचं. त्याचे कपडे, बूट, त्याच्या गोष्टी त्याला एकदम नीट लागतात. त्याला असं टापटीप राहायला, साधेच पण चांगले कपडे घालायला आवडतं. त्याचे कपड्यांचे, बुटांचे ब्रँडसुद्धा ठरलेले आहेत. खास करून क्रिकेटचे कपडे – मग ते महाराष्ट्र संघाचे असो, चेन्नई सुपर किंग्सचे, भारतीय संघाचे असो किंवा अगदी क्लबचे असो, ते एकदम व्यवस्थित आहेत ह्याकडे त्याचा कटाक्ष असतो. अकॅडमीच्या ड्रेसबद्दलदेखील तो तेवढाच पझेसिव्ह आहे. तो चुकूनही मिरवणार नाही, पण नीट सगळ्या गोष्टी स्वतःला पाहिजे त्या पद्धतीने करून घेईल. इतकंच काय, पण त्याचं क्रिकेटचं साहित्य, बॅट्स, पॅड आणि बाकी सगळ्या गोष्टी पण त्याला ठरावीक ब्रँडच्याच हव्या असतात. त्याचं वाचन पण चांगलं आहे. तो क्रिकेटवरची बरीच पुस्तकं वाचतो. सचिन तेंडुलकर, धोनी हे त्याचे आवडते खेळाडू आहेत.” 

“ऋतुराजने आमच्यासाठी कार घेतली होती. आणि आम्हाला ते मोठं सरप्राईज होतं. आम्हाला काहीच कल्पना नव्हती. तो जाधव सरांना बोलला होता, आणि दोघे मिळून आम्हाला शोरूममध्ये घेऊन गेले. आणि तिथे गेल्यावर त्याने कारची किल्ली हातात ठेवली. खूप कौतुक वाटलं आम्हाला. आमच्याकडे बरीच वर्षं एक साधी कार होती. त्या कारने मी कितीतरी वेळा ऋतुराजला सगळीकडे मैदानांवर, अकॅडमीमध्ये घेऊन गेलोय. आता तो मोठा झाल्यावर त्याने आम्हाला सरप्राईज दिलं. खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी,” काका आपल्या लेकाबद्दल अभिमानाने सांगत होते. “आता सगळे म्हणतात की ऋतुराजचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. सगळ्या मोठ्या क्रिकेटपटूंनी त्याचं कौतुक केलं आहे. आज तो भारतासाठी फार खेळला नाहीये, पण लवकरच खेळेलसुद्धा. त्याने सर्व प्रकारचं क्रिकेट खेळावं अशीच आमची इच्छा आहे. तो IPL मध्ये चेन्नईकडून खेळतो. त्याच संघाने त्याला नाव दिलं आहे. पुढे तो अजून कोणत्या संघाकडून खेळेल काय माहीत, पण माझी मनापासून इच्छा आहे की त्याने भारतासाठी तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळावं आणि देशासाठी आपलं सर्वस्व द्यावं. त्यालाही देशाचा, भारतीय संघाचा अभिमान आहे. त्याने भारताकडून चांगली कामगिरी करावी एवढीच इच्छा आहे.” 

खरोखर ऋतुराजने भारतासाठी चमकदार कामगिरी करावी ही माझीही इच्छा आहे. ऋतुराज गायकवाड – खरं म्हणजे बस नामही काफी है! माणसाची श्रीमंती त्याच्या आचरणावरून, त्याच्या वागण्यावरून समजते असं म्हणतात. त्या दिवशी मी जगातले खूप श्रीमंत आईवडील बघितले, त्यांचे विचार खूप जवळून ऐकले. श्री. दशरथ आणि सौ. सविता गायकवाड, सलाम आहे तुम्हाला. 

– कौस्तुभ चाटे

To know more about Crickatha