ball

आता नजर “बोर्डा” च्या परीक्षेकडे

by कौस्तुभ चाटे

भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना – या वाक्यातच बरंच काही साठलेलं आहे. या दोन देशांमध्ये क्रिकेटच्या मैदानावर असलेली खुन्नस आपण कायमच अनुभवतो, नव्हे आपण अनेकदा जगलो आहोत. गेली काही वर्षे आपण उभय देशांमधील मालिका खेळत नाही, पण आयसीसीच्या स्पर्धेत समोरासमोर आलो की दोन्ही देशांमधील हे द्वंद्व बघायला मिळतं. किंबहुना गेल्या काही वर्षात आयसीसीची कोणतीही स्पर्धा केवळ याच सामन्याकडे डोळे ठेवून खेळवली जाते का अशी शंका यावी. टी-२० असो अथवा एकदिवसीय सामना असो, दोन्ही संघ जीवाची बाजी लावून खेळताना दिसतात. आणि अर्थातच त्या सामन्यात भारताने विजय मिळवावा अशीच आपली भारतीयांची इच्छा असते. मागच्यावर्षी टी-२० विश्वचषकात मेलबर्नमध्ये झालेला सामना असो अथवा मागच्या आठवड्यात आशिया कप स्पर्धेत कोलंबो मध्ये झालेला एकदिवसीय सामना असो, प्रत्येकवेळी दोन्ही देशांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली होती. या सामन्याची काय मजा आहे, खेळाडूंच्या आणि प्रेक्षकांच्या देखील काय भावना आहेत हे जर एखाद्याला समजावून सांगावे लागत असेल तर तो मनुष्य भारत-पाकिस्तानातील नाही किंवा त्याला क्रिकेट आवडत नाही असेच म्हणावे लागेल. प्रत्येकवेळी आम्हा क्रिकेट रसिक त्याच भावनेने मैदानावर किंवा टीव्ही समोर (आता मोबाईल समोर) बसतो. क्रिकेट खेळणाऱ्या कोणत्याही देशाकडून हरलात तरी चालेल पण पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंका(च), अशी क्रिकेटप्रेमींची भावना असते. 


१०-११ सप्टेंबर २०२३ हे दोन दिवस असेच विलक्षण होते. कोलंबोमधे भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ भिडणार, म्हणजे संपूर्ण क्रिकेट जगताच्या नजरा त्या सामन्याकडे होत्या. काहीच दिवसांपूर्वी झालेला गटसाखळी मधला सामना पावसामुळे पूर्ण झाला नव्हता. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी त्या सामन्यात कमाल केली होती. भारतीय फलंदाजांना जखडून ठेवण्यात ते कमालीचे यशस्वी झाले होते. ईशान किशन आणि हार्दिक पांड्या उभे राहिले नसते तर कदाचित आपला डाव १५० मधेच आटोपला असता. पण या दोन्ही फलंदाजांनी दर्जेदार खेळ केला आणि आपल्याला एक सन्मानजनक स्कोअर उभा करण्यात मदत केली. दुर्दैवाने पावसामुळे पाकिस्तानचा डाव खेळता आला नाही. त्यांचे फलंदाज आणि आपले गोलंदाज यामधील सामना झालाच नाही. पण सुपर ४ च्या लढतीत संयोजकांनी आयत्यावेळी काही बदल केले आणि खास या सामन्यासाठी ‘रिजर्व्ह डे’ ठेवण्यात आला. त्यामुळे २ दिवस चाललेल्या या सामन्याचा निकाल तर लागलाच पण दोन्ही संघांच्या बलाबलाचा अंदाज देखील आला. 


पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतली. आपल्या वेगवान गोलंदाजांवर त्याचा खासच भरवसा होता. आणि का नसेल? शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि नसीम शाह या घडीचा सर्वोत्तम ‘पेस अटॅक’ आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पहिल्या सामन्यात देखील तिघांनी भारतीय फलंदाजांना सतावले होते. पण सलामीला आलेल्या रोहित आणि गिलच्या मनात काही वेगळेच होते. Attack is the best defence या तत्वानुसार दोघांनीही या गोलंदाजांची पिसं काढायला सुरुवात केली. त्यांच्या वेगाचाच फायदा घेऊन चेंडू सीमापार जाऊ लागले आणि तिघांचीही लय बिघडली. केवळ १३ षटकात भारताने शंभरी गाठली होती, आणि दोघेही फलंदाज अप्रतिम बॅटिंग करत होते. नाही म्हणायला नसीम शाहची गोलंदाजी काही प्रमाणात भेदक वाटत होती. त्याने दोन्ही फलंदाजांना त्रास द्यायला सुरुवात केलीच होती. रोहित आणि गिल पाठोपाठ बाद झाले आणि नंतर आलेल्या विराट आणि राहुलने सूत्रे आपल्या हातात घेतली. पण त्याचवेळी आलेल्या पावसाने त्या दिवशीचा खेळ थांबवावा लागला. दुसरा दिवस याच दोघांचा होता. सुरुवातीला काही वेळ स्थिरावण्यासाठी घेतल्यावर, दोघांनीही पाकिस्तानी गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. ज्या पद्धतीने विराटने आपला डाव उभारला त्याला तोड नाही. पहिल्या ५० धावांची ५५ चेंडू घेणाऱ्या विराटने पुढच्या ७२ धावा काढायला फक्त ३९ चेंडू घेतले. राहुलने देखील त्याला चांगली साथ दिली. त्याच्या फिटनेसवर असलेलं प्रश्नचिन्ह या खेळीमुळे दूर झालं असं म्हणायला हरकत नाही. विराटबरोबर ३०-३२ षटके मैदानावर उभे राहणे, दोघांच्याही धावा पळून काढणे यात तो यशस्वी ठरला. 

विराट आणि राहुलच्या खेळीनंतरच पाकिस्तानात अनेक टीव्ही सेट फुटले असतील. त्यांची जी काय उरली सुरली आशा होती, ती भारतीय गोलंदाजांनी धुळीस मिळवली. जसप्रीत बुमराहच्या फिटनेसवर देखील प्रश्न होतेच, पण त्यानेच पाकिस्तानी फलंदाजीला खिंडार पाडायला सुरुवात केली. त्याची लाईन आणि लेंग्थ प्रभावी होती. त्यावरच इमाम उल हक बाद झाला. तिकडे हार्दिकने अप्रतिम चेंडूवर बाबर आझमला बोल्ड केलं, शार्दुलने तशाच एका चेंडूवर रिझवानला घरी पाठवलं आणि भारताचा विजय सुनिश्चित झाला. ४ बाद ७७ वरून पाकिस्तानी संघ किती तग धरेल हाच प्रश्न होता. विजयाचे पुढचे सोपस्कार कुलदीप यादवने पूर्ण केले. त्याची गोलंदाजी एकही पाकी फलंदाजाला खेळता येत नव्हती. केवळ ३२ षटकात पाकिस्तानचा डाव १२८ धावांत आटोपला, आणि भारताने तब्बल २२८ धावांनी विजय मिळवला. भारताच्या क्रिकेट इतिहासातील हा एक मोठा आणि महत्वाचा विजय आहे हे नक्की. या दोन देशांमधला सामना कायमच भारतीय फलंदाज विरुद्ध पाकिस्तानी गोलंदाज असा बघितला जातो, पण या सामन्यात भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांची नांगी ठेचली. महिनाभरातच हे दोन्ही संघ परत एकदा समोरासमोर येतील, ते देखील विश्वचषकात. त्यावेळी भारतीय संघाला कोलंबो मध्ये झालेल्या या सामन्यामुळे एक वेगळा कॉन्फिडन्स आला असेल यात काही शंका नाही. 

विराट आणि पाकिस्तान हे वेगळं नातं आहे. आपण वेळोवेळी मैदानावर ते बघितलं आहे. विराट मोठ्या सामन्याचा खेळाडू आहे, आणि त्याने ते सिद्ध देखील केलं आहे. टी-२० विश्वचषकात मेलबर्नला खेळताना त्याने हॅरिस रौफला आखूड टप्प्याच्या चेंडूवर समोर लॉन्गऑन च्या डोक्यावरून एक षटकार मारला होता, तसाच षटकार त्याने परत एकदा भारताच्या डावात शेवटच्या चेंडूवर मारला. तो षटकार असेल किंवा रोहितने पहिल्या षटकात आफ्रिदीला मारलेला षटकार असेल, भारतीय फलंदाजांनी आपली तयारी दाखवून दिली आहे. आता प्रतीक्षा आहे ती विश्वचषक सामन्याची.. प्रीलिममध्ये उत्तीर्ण झालेला भारतीय संघ बोर्डाच्या परीक्षेत कशी कामगिरी करतो हे बघणे महत्वाचे आहे.  

To know more about Crickatha