२०२३ ची विश्वचषक स्पर्धा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. टी-२० क्रिकेट आणि फ्रँचाइज क्रिकेटचं प्रस्थ कितीही बोकाळलं तरी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाची मजा काही औरच आहे. यंदाचा हा तेरावा विश्वचषक, आणि भारतात होणार चौथा. आधी आपण ३ वेळा (१९८७, १९९६ आणि २०११) मध्ये विश्वचषक आयोजित केला आहे. यावेळी ही स्पर्धा पूर्णपणे भारतात होणार आहे. भारतातील १० शहरे सामन्यांसाठी सज्ज आहेत, आणि आता सगळे संघ देखील भारतात दाखल झाले आहेत. ५ ऑक्टोबर रोजी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड या सामन्याने स्पर्धेची सुरुवात होईल आणि १९ नोव्हेंबर रोजी आपल्याला या स्पर्धेचा विजेता समजेल. ही स्पर्धा तब्बल ६ आठवडे चालणार आहे. जगातील १० सर्वोत्कृष्ट देश या स्पर्धेत भाग घेतील, एकूण ४८ सामन्यानंतर आपल्याला नवीन विश्वविजेता मिळेल. २०१९ च्या विश्वचषकात इंग्लंडने पहिल्यांदा या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. ज्या देशाने जगाला क्रिकेट दिले, त्यांना एकदिवसीय स्पर्धेच्या विजेतेपदासाठी ५० पेक्षा जास्त वर्षे वाट बघावी लागली. आजपर्यंत झालेल्या स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाने ५ वेळा, भारत आणि वेस्टइंडीजने २ वेळा तर पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंडने प्रत्येकी एकदा हा विश्वचषक जिंकला आहे. या स्पर्धेसाठी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे २ वेळचे विजेते वेस्टइंडीज २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत खेळणार नाहीत. त्यांना या स्पर्धेसाठी पात्रता फेरी खेळावी लागली आणि ते त्या फेरीतून बाद झाल्यामुळे मुख्य स्पर्धेत खेळणार नाहीत.
२०२३ च्या स्पर्धेत १० संघ आहेत, जे प्रत्येक संघाविरुद्ध एक सामना खेळतील. त्यानंतर सर्वोत्कृष्ट ४ संघांमध्ये उपांत्य सामने होतील, त्यातून अंतिम सामना खेळवला जाईल आणि आपल्याला नवीन विजेता मिळेल. आयसीसीने ठरवलेला हा स्पर्धेचा फॉरमॅट खरोखर चांगला आहे. सर्वप्रथम १९९२ साली या फॉरमॅटमध्ये सामने खेळवले गेले होते, आणि त्यानंतर २०१९ ची स्पर्धा देखील अशीच खेळवली गेली. या फॉरमॅटमुळे प्रत्येक संघाला एकमेकांविरुद्ध खेळण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेतील काही सामन्यांकडे सर्वांचीच नजर असणार आहे. या यादीतील पहिला सामना म्हणजे अर्थातच भारत विरुद्ध पाकिस्तान. हे दोन्ही संघ आता फक्त आयसीसी ट्रॉफीमध्येच खेळताना दिसतात. १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे होणारा हा सामना आधीच हाऊसफूल झाला आहे यात काही वाद नाही. या सामन्याची तिकिटे काही पटींनी विकली जात आहेत, अहमदाबादची हॉटेल्सच नाही तर हॉस्पिटल्स, धर्मशाळा इत्यादी ठिकाणे देखील पूर्णपणे भरली आहेत अशा बातम्या येत आहेत. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम पूर्णपणे भरून जाईल, लाखो लोक मैदानावर आणि जगभरातून कित्येक कोटी लोक टीव्हीवर या सामन्याचा आनंद घेतील यात काही शंका नाही. तशीच काही हालत भारताच्या बहुसंख्य सामन्यांची असेल. भारतीय संघाला घरच्या मैदानावर, तेही विश्वचषकात खेळताना बघणं आपल्या भारतीयांना नक्कीच आवडेल. भारताचे सामने देखील बहुतेक सर्व शहरांमध्ये – हैदराबाद वगळता, आयोजित केले गेले आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तान हे संघ क्रिकेट रसिकांचे हॉट फेव्हरेट असतील, त्यामुळे त्यांचे सामने बघण्यासाठी रसिकांची गर्दी होईल यात शंका नाही. स्पर्धेचा पहिलाच सामना – इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, तसेच इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान हे सामने देखील चुरशीचे होतील अशी अपेक्षा आहे.
क्रिककथा दिवाळी अंकासाठी बुकिंग सुरु झालं आहे. लेख वाचता आहातच, पटकन बुकिंग पण करून टाका….
https://crickatha.com/shop/
स्पर्धेतील काही संघ – अफगाणिस्तान, नेदरलँड्स, बांगलादेश आणि श्रीलंका, यांची स्पर्धा जिंकण्याची शक्यता तशी कमी आहे. श्रीलंका वगळता इतर संघ फारसे प्रभावी ठरतील अशी शक्यता देखील नाही, पण प्रसंगी कोणत्याही संघाला हरवण्याची ताकद या संघांमध्ये आहे. एखाद्या संघाची लय बिघडण्याचे काम हे नक्की करू शकतात. श्रीलंकेकडे संभाव्य विजेते म्हणून बघणे थोडे अवघड आहे, पण नशिबाची साथ असेल तर ते उपांत्य फेरीपर्यंत नक्की जाऊ शकतील. पाकिस्तानचा संघ कोणत्याही आयसीसी स्पर्धेत कायमच धोकादायक असतो. त्यांची कामगिरी दर आठवड्याला येणाऱ्या नवीन बॉलिवूडच्या चित्रपटासारखी असते. कोणता चित्रपट गल्ला जमवेल (आणि काय कारणामुळे जमवेल) हे सांगणे जसे अवघड आहे, तसेच पाकिस्तानची कामगिरी कशी होईल, ते हिट ठरतील का फ्लॉप होतील हे सांगणे देखील सोपे नाही. नुकत्याच झालेल्या आशिया कप स्पर्धेत ते भारताकडून पराभूत झाल्यानंतर त्यांचे मनोधैर्य देखील कमी असेल. अशावेळी चांगली कामगिरी करून संघाला विजेतेपदाच्या शर्यतीत नेणे हे संघ व्यवस्थापनासाठी महत्वाचे असेल. तशीच काहीशी गत दक्षिण आफ्रिकेची आहे. फरक इतकाच की आफ्रिकेचा संघ मोक्याच्या क्षणी भरात आला आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्यांनी लक्षणीय विजय मिळवला आहे, त्यामुळे क्रिकेट जगताच्या नजर त्यांच्याकडे आहेतच. अर्थात आयसीसी ट्रॉफी आणि दक्षिण आफ्रिका हे विळ्याभोपळ्याचे नाते आहे. आफ्रिकेचा संघ मोक्याच्या क्षणी आयसीसी ट्रॉफीमध्ये मार खातो हा आजवरचा अनुभव आहे. पण तरीही या संघावर नक्कीच लक्ष असेल.
गेल्या स्पर्धेत अंतिम फेरीत खेळलेले दोन संघ – इंग्लंड आणि न्यूझीलंड हे नक्कीच फेव्हरेट असतील. इंग्लंडने गेल्या काही वर्षात आपला खेळाचा दर्जा चांगलाच उंचावला आहे. ‘बाझबॉल’ पद्धतीचे क्रिकेट खेळताना ते प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. २०१९ विश्वचषकानंतर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने संघ उभारणी केली आहे. सलग दुसरे विजेतेपद मिळवण्यासाठी ते नक्कीच उत्सुक असतील. त्यांच्या २०१९ च्या विजेतेपदाचा नशिबाचे गालबोट होते, ते झटकून आता विजय मिळवणे त्यांच्यासाठी महत्वाचे असेल. या नवीन संघात तशी ऊर्जा आणि इच्छाशक्ती आहे, त्यामुळे हा संघ धोकादायक ठरू शकतो. न्यूझीलंडचा संघ देखील तितकाच धोकादायक आहे. हा संघ म्हणजे कोणताही गाजावाजा न करता शांतपणे आपला खेळ करणारा आहे, आणि कदाचित त्यामुळेच तो क्रिकेट रसिकांचा आवडता संघ आहे. गेल्या दोन विश्वचषक स्पर्धेतले (२०१५ आणि २०१९) ते उपविजेते आहेत. आता या स्पर्धेत तो एक मोठा अडथळा पार पाडणे हेच त्यांचे लक्ष असेल. संघातील प्रमुख खेळाडूंनी योग्य कामगिरी केल्यास हा संघ अंतिम ४ मध्ये नक्की असेल, किंबहुना असावा असे क्रिकेट रसिकांची इच्छा आहे.
ऑस्ट्रेलियन संघ आयसीसी स्पर्धेत नेहमीच चांगला खेळतो. किंबहुना आयसीसी स्पर्धेत त्यांचा खेळ कायम ऊंचावतो. ऑस्ट्रेलियन संघ कायमच प्रोफेशनल पद्धतीने मैदानावर खेळतो आणि प्रतिस्पर्धी संघाला वरचढ होण्याची संधी देत नाही. आक्रमकता हेच त्यांचे प्रमुख अस्त्र असते. नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या मालिकेत त्यांना पराभव स्वीकारावा लागला असला तरी देखील त्यांना हलके घेणे इतर कोणत्याही संघाला परवडणारे नाही. ऐन मोक्याच्या क्षणी ते आपला खेळ उंचावतात आणि बाजी मारतात. ऑस्ट्रेलियन संघ ५ वेळचे विजेते आहेत, आणि या स्पर्धेत देखील ते संभाव्य विजेते असतील. संघाचा गेल्या काही महिन्यांचा प्रवास बघता ते अंतिम चार मध्ये नक्की असतील. सरतेशेवटी आपल्या भारतीय संघावर करोडो भारतीय क्रिकेट रसिकांचे लक्ष असेल. घरच्या मैदानावर खेळण्याचा त्यांना नक्की फायदा होईल. फक्त स्पर्धेच्या वेळी असलेला दबाव ते कसा हाताळतात हे बघणे महत्वाचे असेल. भारतीय संघाने नुकताच आशिया कप जिंकला आहे, आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध देखील मालिका जिंकली आहे. आपले खेळाडू चांगल्या लयीत आहेत आणि त्यामुळेच या संघाकडून अपेक्षा आहेत. भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचेल असे निश्चित वाटते.
एकूणच येणारे ५-६ आठवडे भारतात क्रिकेटमय असतील यात शंका नाही. क्रिकेट हा अनेक भारतीयांसाठी जीव की प्राण आहे. त्यात १२ वर्षांनंतर भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत जगातील सर्वोत्कृष्ट १० संघ जीवाची बाजी करतील. विजेतेपद एकाच संघाला मिळणार आहे, पण या निमित्ताने होणारे ४८ सामने क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असेल. २०२३ ची ही दिवाळी ‘क्रिकेटवाली दिवाळी’ असेल यात शंका नाही.