ball

क्रिकेट चा निर्विवाद बादशाह- युवराज सिंग

युवराज सिंग. खरंच ,त्याच्या नावाप्रमाणेच होता तो. एकदिवसीय आणि टी ट्वेटी क्रिकेट चा निर्विवाद बादशाह. “तो आला, त्यानी  पाहिलं आणि त्यानं जिंकून घेतला सार… ” युवराजची इंटरनॅशनल क्रिकेट मधली एन्ट्री काहीशी अशीच होती. दुर्दैवाने युवराजला त्याच्या पहिल्या सामन्यात फलंदाजी करायची संधी नाही मिळाली. पण, त्याच्या कारकिर्दीतील दुसऱ्या सामन्यात तो कांगारूंविरुद्ध असा काही बरसला की पाहणारे थक्क झाले. भारतीय संघ ICC क्नॉक-आऊट ट्रॉफी खेळण्यासाठी नैरोबीला गेला होता. एकोणीस वर्षाचं कोवळा पोरगा तो. पण जेसन गिलेस्पी ,ग्लेन मॅकग्रा, ब्रेट ली ,शेन वॉर्न  अश्या दादा कांगारू गोलंदाजांना खेळायच शिवधनुष्य त्याने लीलया पेललं.

ऑस्ट्रेलियन  संघाने नाणेफेक जिंकून भारतीय टीम ला फलंदाजीसाठी बोलावले. सौरव गांगुली, राहुल द्रविड , सचिन , विनोद कांबळी असे एक से एक महारथी त्याकाळी भारताकडे होते. १३०-४ अशा स्थितीत भारतीय संघ चाचपडत असताना युवराज सिंग पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला. युवराजने ८०  चेंडूंमध्ये ८४ रन्स ची खेळी करून भारताला २६५-९ अश्या सुस्थितीत पोचवले. युवराजने त्या सामन्यात कव्हरच्या दिशेने मारलेले फटके अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. ती त्याची खेळी बघून अनेक जणांना खात्री पटली होती कि हा पठ्या पुढे जाऊन नक्कीच भारतासाठी एक हुकमी एक्का बनणार.

नव्वदीच्या दशकच्या अखेरीस भारतीय  संघाला मॅच फ़िक्सिन्गचे ग्रहण लागले होते. त्यामुळे, बऱ्याच चाहत्यांनी क्रिकेटकडे पाठ फिरवली होती. भारतीय नियामक मंडळाने कर्णधारपदाची धुरा सौरव गांगुलीच्या खांद्यावर ठेवली होती. नवीन संघबांधणीसोबतच , भारतीय क्रिकेट फॅन्सला परत क्रिकेट कडे खेचून आणायची मुख्य जबाबदारी दादाकडे होती. दादाने त्याचे मॅच-विनर खेळाडू आधीच हेरून ठेवले होते ज्यामध्ये द्रविड, लक्ष्मण , सचिन , कुंबळे यांच्याबरोबर हरभजन ,युवराज,सेहवाग ,झहीर खान ,कैफ ,आशिष नेहरा अश्या नवख्या खेळाडूंचा समावेश होता.

सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली युवराजची कारकीर्द खऱ्या अर्थाने बहरायला सुरवात झाली. नेटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या संघाने भारतीय टीम समोर ३२६ रन्सचे बलाढ्य लक्ष्य  ठेवले होते. त्याकाळात, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३०० च्या पुढच्या धावसंख्येचा पाठलाग करणे म्हणजे अश्यक्यप्राय गोष्ट मानली जायची. १४६ रन्सवर जेव्हा भारताचे पाचही फलन्दाज मगरी परतले तेव्हा सर्वानी विजयाच्या आश्या सोडून दिल्या होत्या. खेळपट्टीवर भारताचे दोन नवखे फलंदाज उभे होते – युवराज आणि मोहम्मद कैफ. दोघांनी मिळून इंग्लंड गोलंदाजीची लख्तर अक्षरशः वेशीवर टांगली. १०६ बॉल्स मध्ये १२० रन्सची भागीदारी करून भारताला  अविस्मरणीय असा विजय मिळवून दिला. दादाने शर्ट कडून केलेले सेलेब्रेशन आजही क्रिकेट रसिक विसरू शकलेले नाहीत.

युवराजकडे जन्मतःच टाईमिंगची दैवी देणगी होती. त्याच्या फटक्यांमधली सहजता आणि अचूक टाईमिंग क्रिकेट रसिकांचे मन मोहून टाकायची. २००४ सालच्या अखेरीस महेंद्रसिंग धोनी संघात आला. महेंद्रसिंग धोनी-युवराज सिंग या जोडगोळीने मधल्या फळीमध्ये फलंदाजी करताना भारताला काही अविस्मरणीय विजय मिळवून दिले. २००५-६ पासून हि जोडी बेस्ट फिनिशेर म्हणून संबोधली जाऊ लागली. २००५-६ मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानात जाऊन त्यांना घरच्या मैदानावर लोळवण्याची कामगिरी केली ज्यात धोनी-युवराज या जोडीचा मोठा हातभार होता.

युवराजने कसोटी क्रिकेटमध्ये  त्याच्या गुणवत्तेला म्हणावा तेवढा न्याय दिला नाही. त्याचे एक कारण असेही असू शकेल कि त्या काळात भारताकडे कसोटी क्रिकेटमध्ये एक से एक दादा फलंदाज होते. सचिन, सेहवाग, गांगुली, द्रविड, लक्ष्मण हे भारताचे प्रमुख फलन्दाज असल्यामुळे कदाचित युवीला म्हणावी तेवढी संधी कसोटी क्रिकेट मध्ये मिळाली नाही. २००७ साली पहिलावहिला टी -ट्वेनटी विश्वचषक साऊथ आफ्रिकेत खेळला जाणार होता. क्रिकेटचा नवीन आणि झटपट प्रकार असल्यामुळे सचिन, सेहवाग, गांगुली, द्रविड, लक्ष्मण या सिनिअर खेळाडूंनी टीम मध्ये भाग नाही घ्यायचा ठरवले आणि भारताचा नवखा संघ या विश्वचषकासाठी पाठवण्यात आला.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताच्या नवख्या  संघाने या विश्वचषकात भन्नाट कामगिरी केली. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवत पहिल्या  टी  -२० विश्वचषक आपले नाव कोरले. या कामगिरीमध्ये युवराजचा सिंहाचा वाट होता. युवराजने स्टुअर्ट ब्रॉड ६ बॉल्स मध्ये मारलेल्या ६ सिक्सर्स आणि कांगारूंविरुद्ध सेमीफायनल सामन्यात ३० बॉल्स मध्ये खेळली ७० धावांची पारी  आजही क्रिकेट फॅन्स च्या मनात घर करून आहेत.

२०११ चा विश्वचषक हा युवराजच्या कारकिर्दीमधील सर्वात महत्वाचा टप्पा होता. भारतीय संघ वव्यवस्थापन एका चांगल्या अष्टपैलू खेळाडूच्या शोधात होती. कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीने खूप आधीच हेरले होते कि युवराज भारतीय टीम साठी एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून या विश्वचषकात उपयोगी पडू शकतो. २०११ विश्वचषकाधी युवराज चांगल्या फॉर्म मधून जात नव्हता. पण स्पर्धा सुरु झाल्यावर युवराज हळूहळू त्याच्या मूळ रुपात येऊ लागला. युवराजने केलेल्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारताने २८ वर्षांनंतर पुन्हा एकदा विश्वचषक जिंकायचे करोडो भारतीयांचे स्वप्न सत्यात उतरवले.

त्याच दरम्यान युवराजला कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रासले आणि त्याच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. त्यावरही त्याने जिद्दीने यशस्वीरीत्या मात करून परत भारतीय संघात स्थान मिळवले. २०११ ते २०१७ या काळात तो सतत संघाच्या आत बाहेर येत राहिला. अखेर, १० जून २०१९ रोजी या अवलियाने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला  पूर्णविराम दिला. 

कमाल दिनेश कार्तिकची 

एखाद्या खेळाडुचे कठीण खेळपट्टीवर  शतक,गोलंदाजाचे पाच बळी किंवा फलंदाज, गोलंदाज यांनी केलेले विक्रम क्रिकेट इतिहासात नोंदवले जातात. तसेच काही खेळाडु असे असतात त्यांच नाव नजरेसमोर आले तरी त्यांनी खेळलेली छोटेखानी खेळी लगेच डोळ्यासमोर तरळते अन संघाला विजय मिळवून दिलेला तो अटीतटीचा रोमहर्षक सामना.

बांग्लादेश म्हणल कि overconfidence आठवतो. मग तो भारताविरूद्धचा विश्वचषकातला शेवटच्या तीन चेंडु मध्ये दोन धावा लागत असलेला सामना असूद्या नाही तर त्यांच्या नागीन डान्सने गाजलेली निदाहास ट्राॅफी.


श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळवून सत्तर वर्ष झाली म्हणून निदाहास ट्राॅफीचे आयोजन करण्यात आले.श्रीलंका, भारत आणि बांग्लादेश यांच्यामध्ये ही तिरंगी मालिका होती.श्रीलंकेला हरवुन बांग्लादेश अंतिम सामन्यात भारताविरूद्ध भिडण्यासाठी आला.त्यात श्रीलंकेला हरवल्यावर बांग्लादेश संघाने केलेल्या नागीन डान्समुळे श्रीलंकेच्या पाठिराख्यांचा अंतिम सामन्यात भारताला सपोर्ट मिळण साहजिकच होतं.
रोहित शर्माने टाॅस जिंकुन प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.शब्बीर रहमानच्या 77 धावांच्या खेळीमुळे बांग्लादेशनी 166 धावा स्कोर बोर्डवर लावल्या…
167 धावांचे आव्हान मैदानात घेऊन उतरलेला आपला संघ कर्णधार रोहित शर्मा आणि मनिष पांडे जोपर्यंत खेळत होते तोपर्यंत सहज जिंकेल अस चित्र स्पष्ट होत. परंतु जसा रोहित शर्मा (56 धावा) 14 व्या षटकात बाद झाला तेव्हा अनुभवी कार्तिक ऐवजी नवख्या विजय शंकरला बढती मिळाली. विजय शंकर मैदानात उतरला तो दडपण घेऊनच.तो अडखळत खेळत होता. त्यात 13 चेंडुत 34 धावा लागत असताना वेल सेटेड मनिष पांडे बाद झाला.12 चेंडु 34 धावा असे समीकरण.पांडे परतल्याने दिनेश कार्तिक मैदानावर आला.एकोणिसावे षटक घेऊन होता रूबेल हुसेन.तीन षटकात त्याने फक्त बारा का तेराच धावा दिल्या होत्या.त्यामुळे त्याने त्याचे वैयक्तिक चौथे षटक आणि संघाचे एकोणिसावे षटक जर पहिल्या तीन षटकांसारखे टाकले तर भारताला शेवटच्या षटकात मजबुत धावा करायला लागल्या असत्या.
सामन्यात व्यवस्थित गोलंदाजी करणारा रूबेल हुसेन षटक टाकणार म्हणल्यावर बांग्लादेश संघ, पाठिराखे मैदानावर नागिन डान्स करण्याच्या तयारीलाही लागले असतील,पण दिनेश कार्तिक जणु वेगळ्याच जोशमध्ये मैदानावर उतरला होता.कार्तिकने रूबेलला पहिल्याच चेंडुवर षटकार मारून सांगितले थांबा पिक्चर अजुन बाकि आहे. तब्बल बावीस धावा त्या षटकात मारून रूबेल हुसेनचे गोलंदाजी पृथक्करण DK ने खराब करून टाकले.डोंबारी जसा त्याच्या तालावर माकडाला हवा तसा नाचवत असतो तसाच दिनेश कार्तिक मैदानावर चेंडुला हवा तसा भिरकवत होता अन त्याने शेवटच्या चेंडुवर मारलेला स्कुप त्याच्यातला जिगरा दाखवत होता. 
संघासाठी सहा चेंडुत 12 धावांच समीकरण त्याने मैदानात आनुन ठेवलं.सहा चेंडु बारा धावा.सोमया सरकार गोलंदाजीला. तीन चेंडु नऊ धावा समीकरण अन पाचव्या चेंडुवर बाद होण्याअगोदर अडखळत खेळणार्या विजय शंकरने जाता जाता चौथ्या चेंडुवर एक चौकार मारला होता. विजय शंकर झेलबाद झाल्यामुळे स्ट्राईक बदलली गेली आणि सहाव्या चेंडुसाठी स्ट्राईक DK कडे होती. एक चेंडु पाच धावा समीकरण..चौकार गेला तर सुपर ओव्हर आणि डाॅट किंवा एक दोन धावा गेल्या तर बांग्लादेश विजयी अशी परिस्थिती मैदानावर असताना आऊटसाईड ऑफला टाकलेला सोमया सरकारने चेंडु आणि दिनेश कार्तिकने आपल्या तालावर चेंडुला एक्स्ट्रा कव्हरला नाचवत मारलेला फ्लॅट षटकार सारकाही रोमहर्षक. .सगळ्यांच्या आनंदाला उधाण आल होत. 
भारतीय पाठिराख्यांचा जल्लोष खासकरून श्रीलंकन पाठिराखे यांनी केलेला बांग्लादेशला अन त्यांच्या पाठिराख्यांना उद्देशुन केलेला नागिन डान्स बघण्यासारखा होता .


धोनीचा 2011 च्या विश्वचषकातला कुलशेकराला मारलेला षटकार जसा यादगार आहे तसाच दिनेश कार्तिकने मारलेला षटकारही यादगार राहिल. 8 चेंडुत 29 धावा करत नागीन डान्सची तयारी केलेल्या बांग्लादेश संघाला DK ने गारूडी बनुन आपल्या पुंगीवर नाच नाच नाचवले..सामना झाल्यावर सगळ्या प्रेक्षकांचे अभिवादन स्विकारत असताना रोहित शर्माने भारताच्या झेंड्याबरोबर श्रीलंकेचाही झेंडा सोबत घेऊन श्रीलंकेच्या पाठिराख्यांनी आपल्या संघाला दिलेला सपोर्ट साठी धन्यवाद म्हणत अनेकांची ह्रदय जिंकुन घेतली होती…

To know more about Crickatha